श्री राजीव गजानन पुजारी
इंद्रधनुष्य
☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
डिसेंबरमध्ये आम्ही बेंगलोरला ईशाकडे गेलो होतो. मला बरेच दिवस इस्रो करत असलेल्या प्रक्षेपकांचे प्रक्षेपण प्रत्यक्ष बघण्याची अतिशय इच्छा होती. त्यामुळे बेंगलोरमध्ये असतानाच सहज म्हणून बेंगलोर ते श्रीहरीकोटा अंतर गुगलवर बघितले. ते कारने साधारण सहा तासांचे आहे असे दिसले. ऑक्टोबरमध्ये इस्रोने वन वेब कंपनीच्या छत्तीस उपग्रहांच्या तुकडीचे प्रक्षेपण केले होते. पुढील छत्तीस उपग्रहांचे प्रक्षेपण जानेवारी २०२३ मध्ये करण्यात येईल असे इस्रोने तत्वतः जाहीर केले होते. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निघतांना मी योगेशला म्हटले, ” बहुतेक या महिन्यात मी परत येईन असं दिसतंय. कारण या महिन्यात इस्रो एक प्रक्षेपण करणार आहे आणि मला ते बघायचे आहे.” तो म्हणाला, “मग कशाला जाताय? प्रक्षेपण बघूनच जावा कि!” पण प्रक्षेपणाची तारीख नक्की नसल्याने आम्ही सांगलीला परत आलो. सांगलीला आल्यावर कांही दिवसांनी हे प्रक्षेपण मार्च २०२३ ला होणार असल्याचे समजले. दरम्यान सात फेब्रुवारीला सहज फेसबुक बघत असताना इस्त्रोच्या फेसबुक पेजवर वाचनात आले की दहा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी SSLV-D2(Small satellite launch vehicle-demonstration launch 2)चे प्रक्षेपण आहे. मला माहित होते की हल्ली सतीश धवन अंतरिक्ष केंद्रात थेट प्रक्षेपण बघण्यासाठी एक प्रेक्षागार उभारण्यात आले आहे व तेथून आपणास प्रक्षेपकाचे प्रक्षेपण थेट पाहता येते व त्यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागते. त्यानंतर रजिस्ट्रेशन कसे करायचे हे SDSC-SHAR (Satish Dhavan space center- Shriharikota high altitude range)च्या वेबसाईटवरून हुडकून काढले. lvg. shar. gov या साइटवर ‘Schedulded’ म्हणून एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक केले असता एक पेज उघडते त्या पेजवर ‘click here for witness the launch’ असा ऑप्शन येतो. त्यावर क्लिक केले असता आपणास रजिस्ट्रेशन करता येते. अशा पद्धतीने माझे रजिस्ट्रेशन झाले (REGISTRATION NO/SNO: T333A0C7774/7382). मला अत्यंत म्हणजे अत्यंत आनंद झाला. लगेच मी इशाला फोन केला. हे घडले संध्याकाळी साडेचार वाजता. दहा तारखेला सकाळी प्रक्षेपण म्हणजे नऊ तारखेलाच मला तिथे पोचावे लागणार होते. ईशाने लगेचच संध्याकाळच्या साडेपाचच्या कोंडुस्करच्या स्लीपरचे बुकिंग केले. मी नेट कॅफेमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केल्यावर आलेल्या पासची प्रिंट काढून आणली. तोपर्यंत श्रीहरीकोटाला कसे जायचे हे अजिबात माहीत नव्हते. बेंगलोर मध्ये ईशा व योगेश यांनी व मी कोंडुस्कर मध्ये बसल्या बसल्या google वरून माहिती मिळवली. बेंगलोरहून चेन्नई व तेथून सुलूरूपेटा या श्रीहरीकोटा जवळ असलेल्या गावी मला जावे लागणार होते. प्रत्यक्ष श्रीहरीकोटा मध्ये राहण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे श्रीहरीकोटा पासून १७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात मला मुक्काम करावा लागणार होता व तेथून प्रक्षेपणाच्या दिवशी मला श्रीहरीकोटाला जावे लागणार होते. ईशा- योगेश यांनी नऊ तारखेचे बेंगलोर ते चेन्नई साठीचे रिझर्वेशन पाहिले.पण कोणत्याही गाडीचे रिझर्वेशन उपलब्ध नव्हते. मग त्यांनी बेंगलोर ते पेराम्बूर आठ तारखेचे रात्री साडेबाराचे म्हणजेच नऊ तारखेचे 0.30 चे रिझर्वेशन केले. पेरांबूर गाव चेन्नई सेंट्रल पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. चेन्नई ते सुलुरूपेटा रिझर्वेशन एसी टू टायरचे मिळाले.
बेंगलोरला सकाळी सात वाजता पोचलो. योगेश घ्यायला आला होता. आठ वाजता घरी पोचलो. नाश्ता वगैरे झाल्यावर ईशाने सुलुरूपेटा मधील हॉटेल बुक केले. प्रक्षेपण झाल्यावर व्ह्यूइंग गॅलरीमध्येच स्पेस म्युझियम व रॉकेट गार्डन आहे असे SHAR च्या साइटवर दिसले. त्यामुळे परतीची रिझर्वेशन्स ११ तारखेची केली. जेवण करून मस्तपैकी झोप काढली. रात्री साडेबारा वाजता मुजफ्फुर एक्सप्रेसने मला जायचे होते. ईशा व योगेश मला सोडायला आले होते. सकाळी सात वाजता गाडी पेरांबूर स्टेशनवर पोहोचली. रिक्षा करून मी चेन्नई सेंट्रलला आलो. एमजीआर चेन्नई सेंट्रल(MAS) ते सुलुरूपेटा नवजीवन एक्सप्रेस दहा वाजून दहा मिनिटांनी होती ती साडेअकराला सुलुरूपेटा येथे पोहोचली. उतरल्यावर रिक्षा केली आणि अगोदर बुकिंग केलेले श्री लक्ष्मी पॅलेस हे लॉज गाठले. (जनरली गाडी एक नं प्लॅटफॉर्मला लागते. तेथून वर उल्लेखलेल्या लॉजला जायला रिक्षा केली तर महाग पडते, म्हणून रेल्वे ब्रिज वरून दुसऱ्या टोकाला जाऊन तिथून रिक्षा केली तर स्वस्त पडते) सुलुरूपेटा हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामानाने हे लॉज खूपच चांगले आहे. रूम स्वच्छ, प्रशस्त व हवेशीर आहेत. ए.सी. व टी.व्ही. ची सोय आहे. २४ तास गरम पाणी उपलब्ध असते. रूममध्ये गेल्यावर अन्हीके उरकून खालीच असलेल्या चंदूज रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो. शाकाहारी व मांसाहारी एकत्र आहेत. राईस प्लेट मिळत नाही. वेगवेगळे जिन्नस मागवावे लागतात आणि अति महागडे आहेत. जेवण एवढे खास नव्हते, पण भुकेपोटी खाऊन घेतले. जेवण करून थोडे विश्रांती घेतली. नंतर काउंटर वर जाऊन लॉजचे मालक श्री दोराबाबू यांना भेटलो व श्रीहरीकोटाला कसे जायचे याची चौकशी केली. त्यांनी खिडकीतून जवळच असलेल्या एका चौकाकडे बोट दाखवून सांगितले की येथे सकाळी सहा वाजल्यापासून SHAR ला जायला जीप मिळतात. एका जीपमध्ये दहाजण बसवतात व माणसे पन्नास रुपये आकारतात. माहिती जाणून घेतल्यावर मी गावात रपेट मारायला बाहेर पडलो. तालुक्याचे गाव जसे असायला पाहिजे तसेच हे आहे. दोन तास फिरून परत रूमवर आलो. दुपारचे जेवण जास्त झाल्याने लॉज शेजारच्या मॉल मधून ब्रेड व बटर आणून खाल्ले. सकाळचा साडेपाचचा गजर लावून झोपलो. उद्या प्रत्यक्ष प्रक्षेपण बघायचे या कल्पनेने बराच वेळ झोप लागली नाही, पण नंतर लागली. सकाळी साडेपाचला उठून अन्हीके आवरून बरोबर सहा वाजता चौकात आलो. जीप उभी होती. जीपमध्ये अजून कोणी आले नव्हते, म्हणून ‘गणेश टी स्टॉल’ असे नांव लिहिलेल्या टपरीवर कॉफी प्यायला गेलो. कॉफी अप्रतिम होती. टपरीचा मालक राजस्थानी होता. त्याला हिंदी व इथली तेलगू भाषा दोन्ही चांगल्या अवगत होत्या. बोलता बोलता मला शारला जायचे आहे असं मी त्याला म्हणालो. तेथेच एक रिक्षावाला होता. तो कॉफीवाल्याला तेलगूत म्हणाला, ” यांना म्हणावं मी त्यांना तीनशे पन्नास रुपयात शारला नेतो.” कॉफी वाल्याने मला हे हिंदीत सांगितले. मी कॉफीवाल्याला सांगितले, “तीनशे रुपयात नेतो काय विचार.” तो तयार झाला. नाही तरी जीपमध्ये दहा माणसांची जुळणी व्हायला किती वेळ लागणार होता कोणास ठाऊक! मी रिक्षात बसलो. मस्त गुलाबी थंडी होती. दोन्हीकडे समुद्राच्या भरती ओहोटीमुळे तयार झालेली क्षारपड जमीन आहे. सूर्योदय व सूर्यास्त बघण्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर मचाणे आहेत, त्यांना व्ह्यू पॉईंट्स म्हणतात. अर्ध्या तासात आम्ही श्रीहरीकोटाच्या मुख्य प्रवेशाजवळ पोहोचलो. तेथे रिक्षावाल्याने मला सोडले. उजवीकडे towards viewing gallary असा बोर्ड होता. तेथे गणवेशधारी जवान होते. त्यांनी माझ्याकडील आधार कार्ड व पास बघून मला पुढे जाण्याची अनुमती दिली. मी विचारले, “किती चालावे लागेल?” ते म्हणाले, “साधारण दोन मैल” मी चालायला सुरुवात केली.
– क्रमशः भाग पहिला
© श्री राजीव गजानन पुजारी
विश्रामबाग, सांगली
ईमेल – [email protected] मो. 9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈