इंद्रधनुष्य
☆ ||लंकायां शांकरी देवी||… श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
सध्या मार्गशीर्ष मास चालू आहे. मार्गशीर्षातील गुरुवारी लक्ष्मीची शक्तीची उपासना अत्यंत फलदायी असते हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. आज मातेच्या कृपेने एका दुर्मिळ देवस्थानाची आणि एका अज्ञात स्तोत्राची माहिती देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आज एका वेगळ्या आणि आपल्याला अपरिचित देवीबद्दल माहिती देतोय.
अष्टदशा शक्तीपीठातील प्रथम पीठ “ लंकायां शांकरी देवी.” रावणाच्या लंकेची ग्रामदेवता. जागृत शक्तीपीठ लंकेतील शांकरी देवी. यास्थानी देवी सतीच्या मांडीच्या अस्थी कोसळल्या होत्या अशी वदंता आहे. अर्थात हे एक्कावन शक्तीपीठांच्यापैकी एक पीठ आहे.
आदि शंकराचार्य विरचित अष्टदशा शक्तीपीठ स्तोत्र आहे. यातील प्रथम नाम लंकायां शांकरी देवीचे आहे. ही देवी अष्टभुजा आहे. या देवीचे दर्शन आचार्यांनी घेतले आहे. या देवीचे मंदिर श्रीलंकेत त्रिंकोमाली शहरात आहे. इथेसुद्धा मूल स्थान पोर्तुगीजांनी उध्वस्त केले. आता जीर्णोद्धार केला आहे. ही देवी म्हणजे अन्य कोणी नसून अष्टभुजा भवानी माता आहे.
या पोस्टसह जोडलेले स्केच कोणेश्वरम, त्रिंकोमाली इथल्या मूर्तीचे आहे. तिथे तिला मथुमाई अम्मम म्हणतात आणि तिचे स्वरूप हे आपल्या श्री ललिता सहस्त्रानामाच्या दृष्टीने मनोन्मयी देवीचे आहे. या नामाचे विवेचन माझ्या ‘ श्री ललिता सहस्त्रनाम भावार्थ निरुपण ‘ या ग्रंथात केले आहे.
ज्या शांकरी देवीची उपासना रावणाने आणि आदि शंकराचार्यांनी केली ते देवीचे रूप आणि हे रूप यात भिन्नत्व आहे. परंतु तिचाच अंश म्हणून आज या देवीची उपासना केली जाते.
देवीच्या अष्टभुजा रुपात तिच्या हातातील शस्त्रे म्हणजे चक्र , दंड, गदा, खड्ग, अक्षमाला, धनुष्य, त्रिशूल आणि अभय मुद्रा..
माझा अंदाज चूक नसेल तर आपल्या तुळजाभवानीची मूळ मूर्ती सुद्धा अशीच असणार.
शांकरी देवीचा ध्यानाचा श्लोक देतोय… खूप सुलभ आणि अर्थपूर्ण आहे.
रावणस्तुतिसंतुष्टा कृतलंकाधिवासिनी ।
सीताहरणदोषेण त्यक्तलंकामहेश्वरी ।।
सज्जनस्तुतिसंतुष्टा कदंबवनवासिनी ।
लंकायाम् शांकरी देवी रक्षेत्धर्मपरायणा ।।
अर्थ : रावणाच्या स्तुतीने संतुष्ट झालेली लंकेची ग्रामदेवता, जिच्या उपासनेने रावणाच्या सीताहरण दोषाचे निराकरण झाले. जी सज्जनांच्या स्तुतीने प्रसन्न होते. जी कदंबवनात निवास करते. अश्या लंकेच्या शांकरी देवीला मी नमन करतो. तिने मला धर्मरक्षणाची प्रेरणा प्रदान करावी आणि मला धर्मपरायण वृत्तीला अंगी धारण करण्याचे सामर्थ्य प्रदान करावे.
आदि शंकराचार्य विरचित
|| अष्टादश शक्तिपीठ स्तोत्रम् ||
लंकायां शांकरीदेवी कामाक्षी कांचिकापुरे ।
प्रद्युम्ने शृंखलादेवी चामुंडी क्रौंचपट्टणे ॥ १ ॥
अलंपुरे जोगुलांबा श्रीशैले भ्रमरांबिका ।
कॊल्हापुरे महालक्ष्मी मुहुर्ये एकवीरा ॥ २ ॥
उज्जयिन्यां महाकाली पीठिकायां पुरुहूतिका ।
ओढ्यायां गिरिजादेवी माणिक्या दक्षवाटिके ॥ ३ ॥
हरिक्षेत्रे कामरूपी प्रयागे माधवेश्वरी ।
ज्वालायां वैष्णवीदेवी गया मांगल्यगौरिका ॥ ४ ॥
वारणाश्यां विशालाक्षी काश्मीरेतु सरस्वती ।
अष्टादश सुपीठानि योगिनामपि दुर्लभम् ॥ ५ ॥
सायंकाले पठेन्नित्यं सर्वशत्रुविनाशनम् ।
सर्वरोगहरं दिव्यं सर्वसंपत्करं शुभम् ॥ ६ ॥
इति अष्टादशशक्तिपीठस्तुतिः ।
लेखक : – श्री सुजीत भोगले
संग्राहक : श्री सुनीत मुळे