श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
इंद्रधनुष्य
☆ समर्थशिष्या- संत वेण्णाबाई – लेखिका : सुश्री विजयश्री तारे जोशी ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
मृणालिनी जोशी यांचे १९८९ साली प्रसिद्ध झालेले दुर्मिळ पुस्तक ‘वेणास्वामी ‘ सज्जन गडावर मिळाले. ताईंनी पुस्तक इतके ओघवत्या भाषेत लिहिले आहे की तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो. रसिक वाचकांनी अवश्य वाचावे. परतल्यावर या वेणा स्वामिनी इतके झपाटून टाकले की शब्दब्रम्ह झरझर मोकळे झाले.
सुमारे पाचशे वर्षांपूर्वी समर्थांचा परीस स्पर्श झालेली ही बालविधवा सौदामिनी सारखी चमकून लुप्त झाली. कोल्हापूरच्या गोपाजीपंत देशपांडे कुटुंबात जन्मलेली ही निरागस कन्या मिरजेच्या जनार्दनपंत देशपांडे कुटुंबाची स्नुषा झाली. अत्यंत देखणे सात्विक रूप आणि कुशाग्र बुद्धी यांचा मिलाफ म्हणजे वेणूबाई. दुर्दैवाने अवघ्या दोनच महिन्यात त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. वयाच्या अकराव्या वर्षी त्या कोवळ्या जिवावर जणू आकाशच कोसळले. प्रथेप्रमाणे सुंदर लांबलचक रेशमी केश संभार कापला गेला आणि लाल अलवणात ( विधवे साठी असलेले एक खास वस्त्र) त्यांचा सुकुमार देह गुंडाळला गेला. एका निरागस कळीच्या पाकळ्या पाकळ्या पडून जणू फक्त देह रुपी विद्रूप देठ शिल्लक राहिला. आता तो देह फक्त राब राबण्यासाठी उपयुक्त होता. वेणूच्या पिताश्रीनी त्यांना बालपणीच काळाच्या पुढे जाऊन अक्षर ओळख करून दिली होती. अनेक ग्रंथांचा अभ्यास त्यांच्या कडून करून घेतला म्हणून त्यांचे जीवन थोडे तरी सुसह्य झाले. वैधव्य आले तरी त्यांचे मन धर्मग्रंथांकडे ओढ घेई आणि त्यात रमून जाई. सक्तीचे ब्रह्मचर्य अनुभवताना हळू हळू मन अंतर्मुख झाले आणि आत अनेक प्रश्न तरंग निर्माण होऊ लागले. देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिला, ज्ञान साधनेची वाट दाखवली. आपण ज्ञानाचा उपयोग केला नाही तर आपला जन्म व्यर्थ जाईल असे वाटू लागले. आपल्या आत्मारामाची ओळख कोण करून देईल? अशी त्यांच्या जीवाला गुरू भेटीची आस लागून राहिली.
ती तळमळ स्वामी समर्थांना त्यांच्याकडे घेऊन गेली. ‘जय जय रघुवीर समर्थ ‘ अशी आरोळी अंगणात घुमली आणि वेणूबाईंचा आत्मा गुरू दर्शनासाठी तळमळत होता ते गुरू विधिलिखित असल्या सारखे त्यांच्या दारी उभे राहिले. वेणूबाईंचे देह भान हरपले…. आत्मा गुरूचरणी समर्पित झाला. स्वामींच्या कीर्तनात त्या रंगून गेल्या. काळ वेळेचे देखील भान हरपले. अंबाबाईच्या देवळात रात्री कीर्तनाला गेलेल्या वेणू बाई पहाटेची काकड आरती करून परतल्या. माहेरच्या प्रेमाच्या माणसांना देखील विधवा मुलीने केलेला हा प्रमाद सहन झाला नाही. धर्म रक्षण करणाऱ्या नातेवाईक लोकांनी अनेक आरोप प्रत्यारोप करून त्या अश्राप बालिकेचा जीव हैराण करून सोडला. समर्थां सारखा लफंगा संन्यासी तुला काय मोक्ष देणार म्हणून त्यांना हिणवले. विजेचा कडकडाट व्हावा तसे वेणू बाईंनी सगळ्यांचा समाचार घेतला. उद्वेगाने ‘मी काया वाचा आणि मनाने पवित्र आहे कोणती कसोटी लावता?’ असे विचारले. आप्त स्वकीयांनी विष प्राशन करण्याची शिक्षा ठोठावली. मिरेप्रमाणेच रामराया पुढे ठेवलेले विष त्यांनी हसत हसत प्राशन केले. जहाल विषाने रात्रभर तडफड करणारा सुकुमार देह अरुणोदय होताच शांत झाला. माता पिता आक्रोश करू लागले. लोक अंतिम तयारीला लागले. त्याच वेळी अंगणात ‘जय रघुवीर समर्थ ‘ ही गर्जना घुमली. समर्थांनी ‘वेणू बाळा उठ ‘ असे म्हणताच हळु हळू त्या अचेतन शरीरात प्राण परत आले. दूषणे देणारे सगळेच चकित झाले. आता या वेणू बाई आमच्या बरोबर येतील.. कारण आता त्या तुमच्या नाहीत तर फक्त रामरायाच्या आहेत असे समर्थांनी निक्षून सांगितले. मागे वळूनही न पाहता सारे माया पाश तोडून ही योगिनी समर्थ गुरूच्या पावलावर पाऊल टाकून घरा बाहेर पडली. त्या काळात त्यांनी हे धैर्य दाखवले.
चाफळच्या मठात अनेक विधवा तसेच परित्यक्ता अनाथ स्त्रिया मठातील सगळ्या शिष्यांना रांधून घालायचे काम करत होत्या. समर्थ देखील इतके पुरोगामी होते की रामरायाला या अबलानी केलेला नैवेद्य अर्पण करत असत. समर्थांनी प्रत्येक स्त्रीचा पिंड आणि आवड पाहून त्यांना वेगवेगळी उपासना सांगितली. काहिंना फक्त नाम स्मरण करा असे सांगितले.
विष प्राशन केल्यामुळे वेणुबाईंची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांचा वर्ण देखील काळवंडला होता. वेणूबाई अत्यंत तैल बुद्धीच्या, गोड गळ्याच्या आणि अशक्त प्रकृतीच्या असल्याने समर्थांनी त्यांना ग्रंथ वाचन, पाठांतर करायला लावले इतकेच काय गुरू नेमून गायन देखील शिकायला लावले. एक दिवस या वेणू बाईंना त्यांनी चक्क कीर्तनाला उभे केले. भारत देशातल्या पहिल्या विधवा कीर्तनकार म्हणून त्यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले. त्यांची रसाळ तेजस्वी वाणी पाहून अनेक पंडित, शास्त्री, कीर्तनकार थक्क झाले.
समर्थांनी त्यांना सर्व प्रकारे उत्तम शिक्षण दिले आणि घडवले. कुटुंबाला नकोशा झालेल्या असंख्य स्त्रियांना समर्थांनी आपल्या विविध रामदासी मठात मानाचा आसरा दिला. वेणू बाई परत माहेरी किंवा सासरी गेल्या नाहीत. सासूबाई निवर्तल्या आणि त्यांचा सासरचा वाडा मोकळा पडला.
समर्थांनी वेणू बाईंना त्यांच्या सासरच्या वाड्यात मिरजेला रामदासी मठ स्थापन करून सन्मानाने मठाधिपती करून टाकले. ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. समर्थांची आणि रामरायाची आज्ञा घेऊन वयाच्या पन्नाशीत या दिव्य स्त्रीने अखेरचे कीर्तन सादर केले आणि स्वेच्छेने सज्जन गडावर देह ठेवला.
त्यांच्या समाधीवर लावलेले चाफ्याचे झाड नंतर बहरले. समर्थांनी देह ठेवल्यावर ते झाड मूकपणे गुरूंच्या समाधीवर फुले वाहू लागले! गुरू शिष्य नाते रामरायाच्या चरणी विलीन झाले…. द्वैत सरले. धन्य ते काळाच्या पुढे असलेले गुरू आणि ती जगावेगळी शिष्या
जय जय रघुवीर समर्थ
लेखिका : विजयश्री तारे जोशी, कोल्हापूर
संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈