☆ सुंदर दृष्टांत ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता. त्याचे सहज लक्ष गेले त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे, बरण्या होत्या.
त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले की “ यात काय आहे? “ दुकानदार म्हणाला, “ त्यात मीठ आहे.” संन्यासी बुवांनी आणखी एका डब्याकडे बोट दाखवून विचारले, “ यात काय आहे? “ दुकानदार म्हणाला, “ यात साखर आहे.“—असे करत करत बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले, “ आणि यात काय आहे? “ दुकानदार म्हणाला, “ यात श्रीकृष्ण आहे.”
संन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला, “ अरे या नावाची कोणती वस्तू आहे ? मी तर कधी ऐकली नाही. हे तर देवाचे नाव आहे.”
दुकानदार संन्यासीबुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला, ” महाराज तो रिकामा डबा आहे, पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत. त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो.”
बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले.
ते ईश्वराला म्हणाले, “अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस. ज्या गोष्टीसाठी मी एवढा भटकलो, घरदार सोडून संन्यासी झालो, ती गोष्ट एका दुकानदाराच्या तोंडून मला ऐकविलीस.
परमेश्वरा मी तुझा शतशः आभारी आहे “— असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला.
जे मन-बुद्धी- हृदय, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, ईर्षा, द्वेष, चांगले-वाईट आणि सुख-दुःख, अशा लौकिक गोष्टीने भरले आहे, तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे– म्हणजेच एकदम स्वच्छ आहे, अशाच ठिकाणी, म्हणजे अशाच मन, बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो.
लोकांना दाखवायला गीता व ज्ञानेश्वरी वाचली, किंवा एकादशीला आळंदी-पंढरपूरची वारी केली, तरी मन-बुद्धी-हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही– म्हणजे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत परमेश्वर तिथे वास करणार नाही..
संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(एकाच मंदिरात दोन गणपती असणारं, भारतातील एकमेव “श्री क्षेत्र पद्मालय”:)
देवदेवतांचा पौराणिक वारसा लाभलेले आणि ३१३७ ईसापूर्व महाभारत काळातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले, खान्देशातील श्री क्षेत्र पद्मालय, म्हणजे संपूर्ण भारतातील श्री गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. श्री. क्षेत्र पद्मालय हे डोंगर माथ्यावर वसलेले आहे. एरंडोलहून पद्मालयला जातांना एक छोटा घाटच चढावा लागतो. श्री क्षेत्र पद्मालय, हे श्री गणेशांच्या साडेतीन पीठांपैकी एक पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. महाभारतातील भीम-बकासूराचे द्वंद्व, पद्मालय येथेच झाल्याचे सांगतात.
जगात कोणत्याही गणपती मंदिरात गेल्यास, गणपतीची एकच मूर्ती पाहावयास मिळते. मात्र, श्री क्षेत्र पद्मालय येथे, एकाच छत्राखाली, एकाच सिंहासनावर, गणरायाच्या दोन मुर्त्या दृष्टीस पडतात, त्यात एक मूर्ती उजव्या सोंडेची व दुसरी मूर्ती डाव्या सोंडेची आहे. दोन्ही स्वयंभू प्रवाळ गणेश आहेत. ते कसे प्रकट झाले याचे वर्णन श्रीगणेश पुराणातील उपासना खंडातील ७३, ७४, ९० व ९१, या अध्यायांत मिळतो. रिध्दिसिध्दी प्राप्त करुन देणारे हे भारतातील, एकमेव श्री गणेशाचं जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
महाभारतात पांडवांवर, जेव्हा अज्ञातवासात राहण्याचा प्रसंग आला, तेव्हा ते एकचक्रानगरीत राहिले होते. ती एकचक्रानगरी म्हणजेच आजचे एरंडोल. त्या काळी, एकचक्रानगरी भोवताली घनदाट जंगल होते. तेथे बकासूर नावाचा राक्षस रहायचा. त्याची भोजनाची व्यवस्था गावकरी करायचे. त्याला रोज गाडीभर अन्न आणि एकमाणूस खायला लागायचा. पांडव ज्या ब्राम्हणाकडे रहात, त्याची पाळी आल्यावर, त्याच्या ऐवजी भीम जंगलात अन्न घेवून गेला. व त्याने बकासूराचा वध केला. त्या नंतर त्याला तहान लागली. त्या जंगलात, त्याने आपल्या हाताच्या कोपराने जमिनीवर प्रहार केला. तेथे मोठ्ठा खड्डा पडला व त्यातून पाणी निघाले. भीमाने त्या पाण्याने आपली तहान भागवली. तेच भीमकुंड. जे आजही पद्मालयला बघायला मिळते. पूर्वी या कुंडात एका खाटेची दोरी बुडेल, इतके ते खोल होते, असं सांगतात. आता ते गाळाने भरुन गेले आहे. एरंडोलला, पांडवांचा वाडा अजूनही बघायला मिळतो. येथून धरणगावहून पद्मालयला जायला भुयार होते असे सांगितले जाते. धरणगांवी दत्त टेकडीवर या भुयाराचं मुख बघायला मिळते, ज्यातून घोड्यावर बसून प्रवास करता येत होता, असं जुनेजाणते सांगतात. हाच तो पद्मालय आणि धरणगावातला अदृष्य बंध. म्हणून आम्हा धरणगावकरांनाही ते वैभवच वाटते. पूर्वी धरणगाव हे एरंडोल तालुक्यातच होते. आता विभाजन झाल्याने धरणगाव स्वतंत्र तालुका झाला आहे.
पौराणिक कथेनुसार राजराजेश्वर सहस्त्रार्जुन याने केलेल्या जप-उपासनेवर प्रसन्न होवून, येथेच त्याला उजव्या सोंडेच्या स्वरूपाने “श्री” नी दर्शन दिले. तर, शेषनागाला शंकर भगवंतांनी टाकून दिले होते. तेव्हा, श्री शंकरांनी पुन्हा त्याला गळ्यात धारण करावे, यासाठी शेषाने “श्रींची” तपश्चर्या केली. त्याला डाव्या सोंडेच्या स्वरूपात श्रींनी तलावातून दर्शन दिले. अशी आख्यायिका पुराणात आहे. म्हणून या ठिकाणी एकाच मंदिरात श्रींची दोन मनभावन रुपं प्रवाळ स्वरुपात अनुभवता येतात.
मंदिरासमोर असलेल्या विस्तीर्ण तलावात सदैव कमळाची फुले फुलतात. यावरून या क्षेत्राला पद्मालय असे नाव पडले आहे. पद्म म्हणजे कमळ आणि आलय म्हणजे निवास. कमळाचे निवासस्थान म्हणजे पद्मालय. हे संपूर्ण क्षेत्र पूर्वीच्या काळी घनदाट आरण्य होते. वनौषधींनी नटलेले, निसर्ग संपदेने परिपूर्ण आणि जंगली प्राणी, श्वापदांनी समृध्द होते. ज्याच्या खाणाखुणा आजही अनुभवता येतात.
श्री क्षेत्र पद्मालय येथील गणपती मंदिराची रचना ही हेमाडपंथी असून बनारस येथील काशी विश्वेश्वराच्या जुन्या मंदिराची ती प्रतिकृती असल्याचे सांगितले जाते. संत गोविंद महाराजांनी १८२५ मध्ये या देवालयाचा जिर्णोद्धार केला आहे. ते अजानबाहू, सिध्द पुरुष होते. त्यांना श्री गजाननांनीच स्मरणसाधनेत दर्शन देवून, आदेश दिल्याने ते येथे आले. या मंदिराचा शोध घेतला आणि जिर्णोद्धार केला. त्यासाठी त्यांनी भडगाव येथील खाणीतील दगड वापरल्याचा उल्लेख जुन्या दस्तऐवजात मिळतो. देवालयात मूर्ती समोर मोठा सभामंडप असून, प्रवेश करताना साडेचार फुट उंचीचा दगडाचा एक मोठा उंदीर पाहण्यास मिळतो. देवालयासमोर मोठा दगडी घाट बांधला आहे.
या ठिकाणी एक मोठी पंचधातू मिश्रित अशी, सुमारे अकरा मणाची, ४४० किलोची घंटा बांधण्यात आली आहे. ही घंटा १८२६ मध्ये श्री क्षेत्र काशीविश्वेश्वर येथील, ठठेरी बाजारातील देवीदयाळ या कारागिराने बनवली आहे–जिचे त्या काळातील मुल्य ११००/-रु होते. जी वाजवली, तर तिचा आवाज एकचक्रानगरी म्हणजे, आजचे एरंडोल पर्यंत ऐकू येत असे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर अनलासुराचे शिर आहे. हा अनलासूर मुखातून अग्नीवर्षाव करत असे. त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळविला होता. त्याचा उपद्रव वाढल्याने, त्याला बालगणेशाने गिळंकृत करुन संपविले. गिळंकृत केल्यावर, गणेशाच्या पोटात जो दाह झाला, तो शमविण्यासाठी श्री गणेशाला, २१ ऋषींनी २१ दूर्वा वाहिल्याची अख्यायिका आहे.
धरणगाव येथून (२२ किमी) जळगाववरुन (३० किमी) व एरंडोल येथून (११ किमी) वर असलेल्या पद्मालय येथे जाण्यासाठी बस सेवा सुरू आहे.
संग्राहक : सुहास सोहोनी
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
आज एक खूपच वेगळी मूर्ती दाखवणार आहे. बहुधा कुणी पाहिली नसावी.
ही मूर्ती चेन्नई आय्.आय्.टी. जवळ, “मध्य कैलाश” नावाच्या मंदिरात आहे. ही मूर्ती फारशी जुनी नाही. अंदाजे पन्नास वर्षांपूर्वीची आहे.
उजवा भाग ‘गणपती’ आणि डावा भाग ‘मारुती’ अशी असणारी ही विलक्षण मूर्ती आहे. उजव्या वरच्या हातात ‘अंकुश’, तर खालच्या हातात ‘तुटका दात’, आणि डावीकडचा हात ‘गदा’ धरून आहे. डोक्यामागून ‘शेपूट’ डोकावते.
या मूर्तीला “अध्यन्त प्रभू” म्हणून ओळखतात. मंदिराच्या विश्वस्तांना स्वप्नात याच रूपात दर्शन मिळाले, म्हणून तशी मूर्ती बनवली गेली.
शक्ती आणि बुद्धी यांचा संगम असलेली ही अभिनव कलाकृती आहे….
संग्राहक : सुश्री शैला मोडक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
विष्णूचे प्रतीक म्हणून शाळीग्रामची पूजा केली जाते.
नेपाळमध्ये पशुपतीनाथापासून साधारणतः १५० कि.मी. अंतरावर असलेल्या मुक्तनाथ येथे गंडकी नदीमध्ये ‘शाळीग्राम’ नावाचे दगड सापडतात. त्याशिवाय या ठिकाणी अशा दगडांचा मोठा डोंगरच असून या दगडापासून मूर्तीसुद्धा तयार करण्यात येतात तसेच या दगडांवर यंत्रे कोरण्याची प्रथाही प्रचलित आहे.
विशिष्ट प्रकारची चक्रे आणि मुखे यावरून या दगडांची परीक्षा केली जाते.
या दगडावर लहानशी सोन्याची रेखाही असते.
शाळीग्राम कसा तयार होतो याविषयी एक कल्पना सांगितली जाते, ती अशी हरिपर्वताच्या पायथ्याशी चक्रतीर्थ नावाचे एक सरोवर असून त्या सरोवरात शाळीग्रामाचा दगड एक हजार वर्षे राहिल्यानंतर श्रीविष्णू वज्रकीर या किड्याच्या रुपाने त्यात शिरून तेथे चक्राची आकृती कोरतो. अशा शाळीग्रामांचे निरनिराळे प्रकार असून त्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे—–
१) शुभ्र – वासुदेव
२) निळा -हिरण्यगर्भ
३) काळा – विष्णू
४) तांबडा – प्रद्युम्न
५) गडद हिरवा – श्रीनारायण
६) गडद निळा – नरसिंह किंवा वामन
७) बारा चक्रे असलेल्या शाळीग्रामाला अनंत हे नाव प्राप्त झाले आहे.
शाळीग्रामाचे असे ८९ प्रकार सांगितलेले आहेत. शालिग्रामचे निरनिराळ्या प्रकारानुसार त्याचे उपयोग —
१) वामन शाळिग्राम – हा छोटा आणि गोलाकार दगड असतो. या शाळिग्रामची उपासना केल्यास अहं, काम, क्रोध यासारख्या विकारांमधून मुक्ती मिळते.
२) अनंतक शाळिग्राम – विविध रंग-रुप आणि ज्यावर नागाच्या फणासारखे चिन्ह असतात. या शाळिग्रामची उपासना कुटुंबाला संकटापासून वाचवणारी तसेच दरिद्रता दूर करणारी मानली गेली आहे.
३) कृष्ण शाळिग्राम – गोलाकार आणि मागील भाग झुकलेला असतो. या शाळिग्रामची उपासना केल्यास श्रीकृष्णाप्रमाणे ज्ञान आणि विवेकतेच्या बळावर यश प्राप्त होते.
४) कूर्म शाळिग्राम – निळा रंग, तीन रेषा आणि बिंदूने अंकित असते ही शीळा. या शाळिग्रामची पूजा शांती, धैर्य, सुख, ताकद प्रदान करणारी मानली गेली आहे.
५) वराह शाळिग्राम शीळा – विषम आकार आणि मध्ये दोन चक्राचे चिन्ह असणारी ही शीळा लवकर लक्ष्य आणि कार्यसिद्धी करून देणारी आहे.
६) हयग्रीव शाळिग्राम शीळा – या शिळेवर पाच रेषा आणि अंकुशाचा आकार असतो. भगवान विष्णूच्या हयग्रीव अवताराप्रमाणे ही शीळा संकटमोचक आहे.
७) दामोदर शाळिग्राम – निळा रंग आणि यामध्ये निळ्या रंगाची चक्रकार शिळा, याच्या केवळ दर्शनाने जीवनात चमत्कारिक बदल घडून येतात
८) लक्ष्मीनारायण शाळिग्राम – दोन चक्र असलेल्या या शिळेची उपासना वैभव आणि शांती प्रदान करणारी आहे.
९) मत्स्य शाळिग्राम शिळा – ही शिळा कमळाच्या आकाराची असते. या शाळीग्रामची पूजा केल्याने अमाप धन, सुख व
अपत्याची इच्छा पूर्ण होते.
दक्षिणेतल्या बर्याच विष्णू मंदिरामधून विष्णूच्या गळ्यात शाळीग्रामांची माळ घातलेली असते.
माध्व संप्रदायाचे वैष्णव लोक शाळीग्रामाला प्रत्यक्ष विष्णूच्या मूर्तीपेक्षाही श्रेष्ठ समजतात. पंचायतन पूजेतही विष्णूचा प्रतिनिधी म्हणून शाळीग्रामच असतो.
माध्व लोक प्रायश्चितासाठी पंचगव्याऐवजी शाळीग्रामाचे तीर्थ घेतात. शाळीग्रामात विश्वातील सर्व पूज्य वस्तूंचा अंतर्भाव होतो. शाळीग्राम फुटला तरी अपूज्य ठरत नाही.
शाळीग्रामाविषयी पद्मपुराणात एक कथा सांगितली आहे ती अशी ——
विष्णूने नवग्रह निर्माण केले आणि माणसाचे बरे वाईट करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. शनि या पापग्रहाला हे सामर्थ्य मिळताच तो ब्रह्मदेवाच्या राशीलाच गेला. ब्रह्मदेवाने त्याला विष्णूकडे पाठविले. विष्णू घाबरला आणि त्याने शनिला ‘उद्या ये’ असे सांगितले. दुसर्या दिवशी शनि गेल्यावर विष्णू जागेवर नाही. शोध घेतला असता विष्णू गंडकी शीळेचा पर्वत होऊन राहिल्याचे समजले. शनिने वज्रकीट नावाच्या किड्याचे रुप घेतले आणि पर्वताच्या पोटात शिरून पोखरू लागला. विष्णूला हे पोखरणे सहन होईना त्याच्या अंगातून घामाच्या धारा बाहेर आल्या. त्याच्या पुढे कृष्ण गंडकी व श्वेत गंडकी म्हणून दोन नद्या झाल्या. बारा वर्षानंतर विष्णू शनिच्या त्रासातून मुक्त झाला. त्याने निजरुप घेतले. आपले प्रतीक म्हणून गंडकीतल्या शाळीग्रामांची लोकांनी पूजा करावी असे त्याने सांगितले.
शालिग्राम
★याला स्वयंभू मानले जाते.
★यांची प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नसते.
★कोणताही व्यक्ती हे घरात किंवा मंदिरात स्थापित करुन पूजा करु शकतो.
-शाळीग्राम वेगवेगळ्या रुपांमध्ये मिळते. काही अंडाकार असतात तर काहींमध्ये छिद्र असतात. या दगडामध्ये शंख, चक्र, गदा किंवा पद्मने खुणा तयार केलेल्या असतात.
संग्राहक – सौ.अंजली दिलिप गोखले
मो 8482939011
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ जेव्हा टायटॅनिक स्वत: आपली दिशा बदलू पाहतं – सुश्री मनीषा कोठेकर☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆
स्त्रियांच्या स्थितीत बदल होऊन आपण खूप पुढे आलो आहोत.तरी देखील अजून स्त्रियांचे प्रश्न सुटले आहेत असे म्हणता येत नाही. नवनवीन समस्या आपल्यासमोर येतच आहेत. अशावेळी आजच्या स्त्रीची नेमकी स्थिती काय हे जाणून घेणे याची गरज भासते.
समाज हे एका अर्थी टायटॅनिक सारखे अवाढव्य आकाराचे जहाजच. त्याची दिशा बदलायची तर बाहेरून खूप मोठी शक्ती(external force ) लावायला हवी. मात्र ज्यावेळी टायटॅनिकच्याच प्रत्येक कणाला आपली दिशा बदलावी असे वाटते व ते सर्व मिळून प्रयत्न करतात तेव्हा कुठल्याही बाह्यशक्ती विनाही हे सहज शक्य होऊ शकतं.
असाच एक प्रयोग महिलांसंबंधीच्या अध्ययनाबाबत झाला . ‘भारतातील महिलांची स्थिती ‘ हे भारतातील महिलांच्या स्थितीचा वेध घेणारे देशव्यापी अध्ययन नुकतेच महिलांच्या संबंधी कार्य करणा-या ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र’ द्वारा करण्यात आले.
भारत हा सर्वदृष्टीने विविधतेने नटलेला देश. संस्कृती, भाषा, शैक्षणिक -सामाजिक -आर्थिक स्थिती, समस्या या सगळ्यांच्या वेगवेगळया. अशा वेळी महिलांच्या स्थितीचे आकलन करावयाचे म्हणजे सगळ्या प्रकारच्या स्थितीतील महिलांपर्यंत पोहोचणे व त्यांची स्थिती जाणून घेणे गरजेचे होते. शिवाय अशाप्रकारचे अध्ययन खूप काळ सुरू राहिले तर ते कालबाह्य किंवा असंगत होऊ शकते .त्यामुळे कमीत कमी वेळात एवढे प्रचंड मोठे सर्वेक्षण करावयाचे तर त्यासाठी तेवढेच मनुष्यबळही गरजेचे. आज भारतातील विविध संघटनांमध्ये कार्यरत महिला कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. या कार्यकर्त्यांनी निर्णय केला की आपण हे काम करावे. यापैकी अनेक संघटनांचे कार्य देशव्यापी आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यात पोहोचून महिलांची स्थिती व त्यांच्या समस्या जाणून घेणे शक्य होते.
शिवाय कार्यकर्त्यांच्या द्वारे सर्वेक्षण होणार म्हटल्याने त्या क्षेत्राची त्यांना नीट माहिती होती. स्थानिक कार्यकर्ते असल्याने भाषेचा अडसर नव्हता. या सगळ्यांनी हा अध्ययनाचा ‘द्रोणागिरी पर्वत’ उचलून धरला.
अध्ययनाचे केंद्र नागपूर ठरले.वेगवेगळया प्रकारच्या समित्या ठरल्या. प्रकल्प संचालक म्हणून डॉ.मनीषा कोठेकर वर जबाबदारी दिल्या गेली. एक तज्ञांची एक केंद्रीय समिती स्थापण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले.
देशभरात सर्व २९ राज्ये व ५ केंद्रशासित प्रदेश व ६४% जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण झाले.यात आंतरराष्ट्रीय सीमावर्ती जिल्हे देखील मोठ्या प्रमाणात होते. साधारण ६००० महिला कार्यकर्त्यांनी यात भाग घेतला. ८०,०००हजाराच्या जवळपास महिलांच्या मुलाखती घेऊन सर्वेक्षणाचे काम पूर्ण केल्या गेले.
२०१६ मधे अध्ययनासंबंधी निर्णय झाला व १७ मधे कामाची पूर्ण आखणी होउन १८ मधे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले.त्यानंतर डाटाएन्ट्री , त्याचे विश्लेषण ,रिपोर्ट लिहिणे व छपाई हे संपूर्ण काम नागपूरातून झाले.२४ सप्टेंबर २०१९ला दिल्लीला प.पू.सरसंघचालक मा.मोहनजी भागवत,मा.निर्मला सितारामन व मा.शांताक्काजींच्या प्रमुख उपस्थितीत या अध्ययनाचे दोन खंड,executive summery व महिलांच्या विशिष्ट स्थितीवरील अध्ययनावरील २६ पुस्तकांचे विमोचन झाले.
महिलांना जेव्हा आपली स्थिती बदलावी असं स्वत: वाटतं व त्या एकसुराने आणि एकदिलाने काम करायचे ठरवतात तेव्हा स्थिती बदलण्याच्या दिशेने त्यांनी टाकलेले ते दमदार पाऊल असतं अन् मग त्यांना त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी कुणीही थांबवू शकत नाही .
ले. : मनीषा कोठेकर
संग्राहक : सुनीत मुळे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
एकदा एका राजाने आपल्या तीन मंत्र्यांना, “ तुम्ही जंगलात जाऊन एक एक पोते भरून फळे घेऊन या “, असा आदेश दिला.
पहिल्या मंत्र्याने विचार केला की, प्रत्यक्ष राजानेच आपल्याला फळे आणायला सांगितली आहेत, म्हणून आपण चांगल्या प्रतीचीच फळे घेऊन गेले पाहिजे. त्याप्रमाणे त्याने चांगली फळे शोधून घेतली.
दुसऱ्या मंत्र्याने विचार केला की, राजाने सांगितले आहे तर खरे, पण राजा तर इतर कामात इतका व्यस्त असतो की, तो कशाला एक एक फळ तपासून पाहणार आहे? म्हणून त्याने मिळतील ती चांगली वाईट फळे आणली.
तिसऱ्या मंत्र्याने विचार केला की, राजा कशाला पोते उघडून पाहणार आहे की, त्यात फळे आहेत की आणखी काही ? तो तर बाहेरून फक्त पोत्याचा आकार पाहील, म्हणून त्याने जंगलात न जाताच पाला पाचोळा आणि फळांच्या आकाराचे दगड धोंडे भरून आणले.
दुसऱ्या दिवशी तिघेही मंत्री आप आपली पोती घेऊन दरबारात हजर झाले. फळे काय आणि किती आणलीत हेही न पाहता राजाने प्रधानजींना आदेश दिला की, या तिघांनाही राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी एक महिना स्थानबद्ध करण्यात यावे आणि त्यांनी जमा करून आणलेल्या फळां व्यतिरिक्त इतर आहार त्यांना देण्यात येऊ नये.
पहिल्या मंत्र्याने चांगली फळे जमा केली होती, त्यामुळे त्याने चांगली फळे खात खात एक महिना मजेत घालवला.
दुसऱ्या मंत्र्याने जी काही चांगली फळे जमा केली होती त्यावर थोडे दिवस चांगले घालवले पण पुढे कच्ची आणि सडलेली फळे खावी लागल्यामुळे तो आजारी पडला.
तिसऱ्या मंत्र्याने दगडधोंडेच जमा करून ठेवल्यामुळे त्याची तर पहिल्या दिवसापासूनच उपासमार झाली.
तात्पर्य :~
चांगल्या वाईट कर्माचे फळ योग्य वेळ येताच त्याच्या त्याच्या कर्त्याला न चुकता शोधून काढते.
संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈