एकवीरा आईचे मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला या लेण्यांजवळ आहे..
कार्ला निवासीनी शक्तीदायीनी श्री एकविरा देवी आई महाराष्ट्राची आराध्य कुलदेवता, हाकेला धावणारी, नवसाला पावणारी आई एकविरा देवी म्हणजेच आदिमाता रेणुका.. परशुरामाची माता…
जगप्रसिद्ध कार्ला लेणीच्या तोंडाशी असणारे एकविरा देवीचे मंदिर म्हणजे कोळी बांधवांबरोबरच तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान… या देवीची मूर्ती ही स्वयंभू असून हे देवस्थान पांडवकालीन असल्याचे मानले जाते… आई एकविरेचे स्थान कार्ला गडावर स्वयंभू असून अतिशय प्राचीन आहे. आईची मूर्ती स्वयंभू तांदळा दगडात प्रगटलेली “शेंदूर चर्चित” आहे.. लेण्यांमध्ये असलेले तिचे स्थान हे मंदिराचे वेगळेपण.. प्राचीनता आणि तिचे लोभस रूप यामुळे या देवीचे महत्व काही वेगळेच आहे..
आपण मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम आपल्या नजरेस पडतो आईचा चांदीचा नक्षीदार गाभारा.. ते नयनरम्य नक्षीकाम पाहून मन मोहून तर जातेच पण आईचे लोभस रूप पाहून आपण आपलेच राहत नाही.. ते लोभस तेजस्वी रूप डोळ्यात साठवत डोळ्यातून अश्रू कधी वाहू लागतात ते समजतही नाही.. तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडलावरील हास्य व ते प्रसन्न रुप पाहून मन अगदी उल्हासित होतं. मनात नवीन चैतन्यं निर्माण होतं..
शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होताच वातावरणात एक वेगळीच उर्जा सामावल्याची अऩुभूती होते. एका अद्वितीय शक्तीचा जागर या नऊ दिवसांमध्ये केला जातो.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत एकविरा मातेच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी व देवीचा नवस फेडण्यासाठी येतात.
!! एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी !!
असे म्हणत आराध्य दैवत असलेल्या आणि नवसाला पावणारी म्हणून कोळी समाजात एकविरा देवीचं स्थान पूजनीय आहे…नवसाला पावणारी कोळी बांधवांचे आराध्य दैवत असणारी देवी..
देवळाच्या भोवती निसर्ग सिध्दहस्ताने वंदन करत आहे. कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती स्फूर्तीदेवता आहे..
डोंगरातलं स्थान, प्रसन्न रूप, जागरूक देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महत्व असलेल्या या देवीचं लोभसवाणं रूप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळ्यात साठवून घ्यायलाच हवे.. नव्या उमेदीने जगण्यासाठी आई एकविरेचे दर्शन व परिसरातील निसर्ग- सौंदर्याने आपले मन प्रफुल्लित होऊन जाते हे मात्रं निश्चितच…
संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे
9870451020
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
भक्तांची अगाध श्रद्धा बघुन देव – दिकांना, स्व:स्थान सोडून भक्ताकडे धाव घेतली, यातीलच एक पौराणिक कथा म्हणजे पुणेनिवासीनी चतु:शृंगी ही देवी आहे.
इसवी सन ६१३ मध्ये पुणे येथे फक्त दहा-बारा घरे असल्याचा उल्लेख सापडतो. राष्ट्रकूट वंशातील कृष्ण राजा याने तयार केलेल्या दानपत्रामध्ये (इ.स. ७५८) या शहराचे नाव ‘पुण्य विषय’ असे असल्याचे आढळते. पुढे त्याचे ‘पुनक विषय’ झाले. आणि इ. स. ९९३ मध्ये ते ‘पुनवडी’ झाल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर ते पुणेश्वर मंदिरामुळे ‘पुणे’ असे झाले असावे. एकंदर पुणे नावविषयी अशा आख्यायिका आहेत.
चतु: शृंगी पुण्यात कशी आली ती कथा पुढे आहे.
नाशिक जवळच्या वणीचे म्हणजेच सप्तश्रुंगीदेवीचे पुण्यातील स्थान म्हणजे चतु:श्रुंगी. सप्तश्रुंगनिवासिनी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक व अनेकांची कुलस्वामिनी.
पुण्यात विद्यापीठ परिरसरात सेनापती बापट रस्त्यापासून सुमारे दीडशे फूट उंच चढून गेल्यावर चतु:शृंगी मातेचे विलोभनीय दर्शन होते. चतु:शृंगी माता स्वयंभू व जागृत असून ती नवसाला पावते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
या मंदिरासंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते.
पेशव्यांचे पुण्यातील एक सावकार दुर्लभशेठ पीतांबरदास महाजन हे देवीचे परमभक्त होते. दरवर्षी ते नाशिकजवळील श्रीसप्तशृंगी गडावरील देवीच्या यात्रेस जात असत. कालमानाने ते अतिशय वृद्ध झाले व वारी चुकणार असे त्यांना वाटू लागले व ते अतिशय दु:खी झाले. तेव्हा श्रीसप्तशृंगी देवी त्यांच्या स्वप्नात आली व पुण्याच्या वायव्येस असलेल्या डोंगरावर आपण वास्तव्यास असल्याचे त्यांना सांगितले. त्याप्रमाणे त्यांना या डोंगरावर देवीचे स्वयंभू स्थान आढळले.परंतु वेळेआधीच दुर्लभशेठ देवीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले तेंव्हा देवी पूर्ण प्रकट झालेली नसून तीन हात व चेहेराच प्रकट झाल्याचे त्यांना आढळून आले. हे स्थान म्हणजेच चतु:श्रुंगी होय. अर्थातच या स्थानी दूर्लभशेठने मंदिर बांधले.
वणीची सप्तशृंगी येथे अवतरली सप्तशृंगी देवीच्या मंदिरापाशी डोंगराची सात शिखरे होती असे म्हणतात. आता तेथे चारच शिखरे दिसतात म्हणून या देवीला चतु:शृंगी’ हे नाव मिळाले
पुणे शहरातील नरपगीर गोसावी यांना देवी प्रसन्न झाल्यामुळे त्यांनी तेथे सभामंडप, पायऱ्या व विहीर बांधली.
हनुमान जयंती चैत्री पौर्णिमा शनिवार, पूर्वा नक्षत्र शके १६८७ हा देवीचा प्रकटदिन आहे. चैत्र पौर्णिमेचा हा विशेष दिवस देवीचा प्रकट दिन म्हणून दरवर्षी मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. मंदिराचा सभामंडप, धर्मशाळा, पाय-या, विहीर, रस्ते, दागदागिने हे सर्व भक्तांनी श्रद्धेने अर्पण केले आहे.
चतु:शृंगी मंदिराच्या परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून नवरात्रीत मोठी जत्रा भरत असे, ती कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालत असे.
पुण्यात उत्तर पेशवाईत दुर्लभशेठने नाणी पाडण्याचा म्हणजेच टाकसाळीचा मक्ता घेतला होता, तसेच नाशिकजवळही दूर्लभशेठची एक टाकसाळ होती. दूर्लभशेठने पुण्यात एक धर्मशाळा बांधली व तेथे कालियामर्दनाची मूर्ती स्थापन केली.
*लक्ष्मीरस्त्यावर सतरंजीवाला चौकानजीक ही मूर्ती आजही पाहायला मिळते. चतु:श्रुंगी हे पूर्वीपासून पुणेकरांचे श्रद्धास्थान राहिले आहे. नवरात्रात गावातून तालीमबाज नारळाचे तोरण घेऊन चतु:श्रुंगी येथे पहाटे पळत जात असत. आता तालीमबाज व पळत जाणे बाजूला पडले असले, तरी आजही पुण्याच्या पेठांमधून चतु:श्रुंगीला तोरण वाहण्याची प्रथा सुरू आहे.
चतु:श्रुंगीचे दुसरे एक मंदिर रविवार पेठेत आहे हे मात्र थोडक्याच जणांना माहित असेल. सुमारे २०० वर्षांपूर्वी किसनदास राजाराम यांनी येथे देवीची स्थापना केली व बढाई समाजाने मंदिर बांधले. येथे देवी तांदळा स्वरूप आहे. सुभानशा दर्ग्याच्या चौकातून गोविंद हलवाई चौकाकडे जाऊ लागले की उजव्या बाजूस हे मंदिर आहे.
अशी चतु:शृंगी देवीची पौराणिक कथा आहे.
संग्राहक : सुश्री शैला मोडक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ केळवे गावची श्री शितला देवी ☆ संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी ☆
!! तू केळव्याची शितल आई
तुझ्या महतीची ही पुण्याई
तुझ्या कीर्तीनेच धाव घेती जर्जर
तुझ्या प्रसादाने मुक्त होती सत्वर
तुझी थोरवी ही देशोदेशी जाई !!
मनाला शितलता देणारी केळव्याची केळवे गावची श्री शितला देवी
केळव्याच्या समुद्र किनाऱ्या जवळ असलेले श्री शितला मातेचे सुंदर आणि अति प्राचीन मंदिर आहे. मंदिरात अतिप्राचीन अशी तेजस्वी शितला मातेची मूर्ती आहे. केळवे गावाचे प्राचीन नाव कर्दलीवन केळवे हे एक बेट आहे… गावाला पौराणिक आणि ऐतिहासीक महत्व लाभले आहे…. राम वनवासात असताना त्याचा प्रवास केळवे (कर्दलीवन) या गावतून झाला होता अशी आख्यायिका आहे. या मंदिरात अतिप्राचीन अशी तेजस्वी शितला मातेची मूर्ती आहे..
चैत्र शुद्ध पौर्णिमेला श्री शितलाईची खूप मोठी यात्रा भरते.. नवरात्रोत्सव आणि यात्रोत्सव हे दोन देवीचे उत्सव मानले जातात.. नवरात्रोत्सवात संपूर्ण मंदिर आणि परिसरातील दिव्यांची रोषणाई केली जाते.. देवीपुढे नऊ प्रकारची धान्ये पेरतात नऊ घर रामकुंडातल्या पाण्याने भरून स्थापिले जातात.. रोज झेंडू फुलांच्या दोन माळा देवीसमोर टांगल्या जातात.. देवीला नूतन वस्त्रांनी, अलंकारांनी सजविले जाते
भरजरी कपड्यांनी सुवर्णलंकारांनी नटलेल्या देवीचे अतिशय विलोभनीय सौंदर्य व तेजस्वी रूप डोळ्यांत साठवत आपण तिच्या समोर आपोआप नतमस्तक होतो..
नऊ दिवसात रोज निरनिराळे कार्यक्रम सादर होत असतात.. भजन, कीर्तन, गायन इ. कार्यक्रम उत्साहाने होत असतात.. अष्टमीला होमहवन होतो..यावेळी मातेचे दर्शन अतिशय विलोभनीय व सुखकारी असते.. माता दोन्ही हातांनी भाविकांना भरभरून देते.
या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकर ह्यांनी केला होता. शितला मातेच्या मंदिरात सिद्धीविनायक, पार्वती बरोबर शंकराची पिंडी स्थानापन्न आहे.. मंदिराच्या बाहेर हनुमानाचे छानसे मंदिर आहे. शितला मातेच्या समोर राम कुंड आहे.. सितामातेला जेव्हा तहान लागली होती तेव्हा श्री रामाने आपल्या बाणाने त्या तलावाची निर्मिती केली होती अशी आख्यायिका प्रचलीत आहे आणि म्हणून ह्या तलावाला रामकुंड असे म्हणतात. हनुमान जयंतीच्या दिवशी शितला देवीची यात्रा उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा होतो.. यात्रा उत्सव कालावधीत शितलादेवी मंदिराच्या आजुबाजूचा परिसर आनंदाने, रोषणाईने आणि भक्त भाविकांच्या अलोट गर्दीने भरुन गेलेला असतो…
हे शितला देवी तू जगाची माता तूच जगाचा पिता आणि तूच जग थारण करणारी आहेस अशा शितला देवीला
माझा नमस्कार…
संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे
9870451020
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ गणेशविद्या – भाग 2 – प्रा. अनिल गोरे ☆ प्रस्तुती – सौ कुंदा कुलकर्णी ☆
कोणीही केलेल्या संशोधनाची नोंद त्या संशोधकाच्या नावाने करण्याची पद्धत सध्या आहे. पूर्वी अशी पद्धत नव्हती. कोणी संशोधन केले, कविता रचली तर त्याबाबतच्या लिखित आशयातच संशोधकाचे, कवीचे नाव गुंफण्याची अथवा त्या संबंधी नामानिधान किंवा संज्ञांमध्येच संबंधिताचे नाव गुंफण्याची पद्धत होती.
शल्याने शरीर कापून त्यात दुरुस्तीची पद्धत सुरु केली, त्या पद्धतीला शल्यकर्म म्हणतात. रुग्णांची नियोजनपूर्वक देखभाल पद्धत शुश्रुताने सुरु केली, त्या पद्धतीला शुश्रूषा म्हणतात. डिझेल नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलेल्या इंधनाला त्याचे नाव आहे. सुखकर्ता दुखहर्ता…. या आरतीत दास रामाचा वाट पाहे म्हणून रामदासांनी ओळख दिली. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, तुका म्हणे, येणे वरे ज्ञाना सुखिया झाला, केशवासी नामदेव भावे ओवाळिती, कहत कबीर सुन भाई साधू या ओळींतून जनार्दन स्वामी, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, कबीर यांनी आपले नाव गुंफले.
देवनागरी वर्णाक्षरांच्या सध्याच्या स्वरुपात ग, ण, श ही अक्षरे इतरांपेक्षा वेगळी असून त्यांच्या बाराखडीत पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे! ग, ण, श यांच्या बाराखडीत पहिल्या स्थानी सुट्टा काना असणे हाच, ही वर्णव्यवस्था गणपतीने निर्माण केल्याचा संकेत मानून या लिपीला गणेशविद्या म्हणतात.
देवनागरी लिपीत १८ स्वर, ३६ व्यंजने असून स्वरांचा मानवी मुखाशी तर व्यंजनांचा मानवी मणक्यांशी संबंध आहे. कान या मराठी शब्दाची सुरूवात क अक्षराने होते. चेहरा व दोन कान दिसतात तसे क अक्षरचिन्ह दिसते. ड, ळ अक्षरांनी डोळा शब्द बनतो. उघडा डोळा, भिवई, पापणी मिळून ड चा भास होतो. दोन डोळे एकत्र पाहताना ळ चा भास होतो. झोपलेल्या माणसाचे नाक पाहून न चा भास होतो. घसा तपासताना वैद्यबुवांना घ दिसतो.
मानवाला प्राथमिक अवस्थेत ज्या वस्तूंना नावे देण्याची गरज भासली, ती नावे लिहिण्यासाठी देवनागरी अक्षरांना त्या वस्तूंचे आकार दिले असावेत. मुखाशी संबंधावरून ३६ व्यंजनांचे दंतव्य, तालव्य, ओष्ठव्य, मूर्धन्य, अनुनासिक हे पाच प्रकार आहेत. वेगवेगळी व्यंजने उच्चारताना वेगवेगळ्या मणक्याजवळ संवेदना जाणवतात.
व्याकरणकार पाणिनीने देवनागरी वर्ण आणि मानवी मणके यातील हा संबंध सूचित केला आहे. कोणत्या मणक्याचा कोणत्या अक्षराशी संबंध आहे याबाबत पाणिनीने जे सुचवले त्याचा आधार घेऊन मी ते एका चित्रात दाखवले आहे. मानवी शरीराशी, मानवी जीवनाशी देवनागरी लिपीचा घनिष्ठ संबंध असल्याने मानवी उच्चारांना अचूक लेखनाची जोड देण्यास आवश्यक सोयी देवनागरी लिपीत, जोडाक्षर पद्धतीत आहेत.
कोणत्याही मानवी भाषेतील ९९.९९ टक्के शब्द या लिपीतून हुबेहूब लिहिता येत असल्याने ही लिपी जगाची भाषिक एकात्मता साधू शकेल. लेखन, उच्चारात सर्वाधिक सुसंगतीसाठी ही जगातील सर्वोत्तम लिप्यांपैकी एक आहे. देवनागरी लिपीचिन्हांत आणि बंगाली, गुजराती, कन्नड, पंजाबी, तमिळ, उडिया, तेलुगू, मल्याळी लिपीचिन्हांत थोडा बदल जाणवतो पण सर्व भारतीय लिप्यांमध्ये लक्षणीय एकात्मता आहे !
लिपीचिन्हांतील या बदलांची कारणे भौगोलिक, राजकीय आहेत. लिखाणासाठी भारताच्या उत्तरेत भूर्जपत्रे तर दक्षिणेत ताडपत्रे वापरत. भूर्जपत्राला पुरेशी उंची असल्याने देवनागरी लिपीतील मात्रा, रफार, रुकार, उकार, अनुस्वार, चंद्र, हलन्त उपचिन्हे वर्णाक्षरांच्या वर, खाली लिहिता येत.
ताडपत्रावर उंची कमी, रुंदी अधिक म्हणून दक्षिणी लिप्यांमध्ये ही उपचिन्हे वर्णाक्षरांच्या डावी, उजवीकडे लिहिणे सोयीचे होते. अनेक देवनागरी अक्षरे आडवी केल्यास दक्षिणी लिपीतील अक्षरे मिळतात. शत्रूला संदेश समजू नये म्हणून काही भारतीय राजांनी स्वत:ला व त्याच्या अधिकार्याना, प्रजाजनांना समजणारी, पण इतरांना न समजणारी भाषा, लिपी तयार केली.
देवनागरी लिपीशी बरेच साम्य आणि किरकोळ बदलाने नव्या लिप्या झाल्या. अनेक भारतीय लिप्यांतून लिहिताना कमी जागा, कमी कागद, कमी शाई वापरली जाते. कागद कमी लागल्यास जंगलतोड कमी होते. शाईत शिसे किंवा जड धातू वापरतात. शाई कमी लागल्यास शिशाचे व जड धातूंपासून होणारे प्रदूषण कमी होते.
समाप्त
ले : प्रा. अनिल गोरे
संग्राहक : कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ गणेशविद्या – भाग 1 – प्रा. अनिल गोरे ☆ प्रस्तुती – सौ कुंदा कुलकर्णी ☆
गणपतीने ज्या वर्णसंचातून महाभारत लिहिले असे मानतात त्या वर्णसंचात स्वर, व्यंजनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे. त्या संचासाठी वेळोवेळी नवी चिन्हे निर्माण केली गेली. त्या चिन्हांच्या सध्याच्या संचाला देवनागरी लिपी म्हणतात. ही लिपी वेगाने तसेच उच्चारानुसार लिखाणासाठी अत्यंत सोयीची आहे.
यातील अ ते ज्ञ अक्षरे वळणदार, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ० ते ९ अंक देखणे आहेत. कोणताही देवनागरी अंक लिहिताना सुरुवातीला टेकवलेली लेखणी अंक लिहून होईपर्यंत उचलावी लागत नाही. या लिपीतील चिन्हे १८ स्वर, ३३ व्यंजने व ३ संयुक्त व्यंजने यांचे प्रतिनिधित्व करतात.
५२ मुळाक्षरांच्या परस्पर संयोगाने जोडाक्षरे, बाराखड्यांच्या स्वरुपात लाखो स्वतंत्र अक्षरसमूह चिन्हे लिहिता येतात. भारतीय भाषांसाठी योजलेल्या लिप्या वगळता जगातील इतर अनेक लिप्यांमध्ये अशी संपन्नता नाही. गणपतीने म्हणजे देवाने ही लिपी नागरिकांसाठी बनविली या समजुतीने तिला देवनागरी लिपी म्हणतात.
ही समजूत कशी झाली याबाबत एक आख्यायिका प्रचलित आहे.
महर्षी व्यासांनी महाभारत लिहिण्यासाठी गणपतीला पाचारण केले. गणपतीने त्यांना एक अट घातली की, व्यासांनी महाभारत इतक्या सलगपणे सांगावे की, लिहिताना खंड पडू नये. व्यासांनी ही अट मान्य करतानाच एक अपेक्षा व्यक्त केली की, गणपतीने ध्वनीवर आधारित तसेच उच्चार आणि लेखन यात संपूर्ण सुसंगती असेल अशा वर्णसंचात लेखन करावे. गणपतीने महाभारत लेखन करताना असा नवा वर्णसंच निर्माण केला. उच्चार मुखातून बाहेर पडत असले तरी उच्चाराचा संबंध शरीरातील कोणत्या भागांशी आहे का याचा गणपतीने अगोदर वेध घेतला. वेगवेगळे ध्वनी उच्चारताना मानवी शरीरातील पाठीच्या वेगवेगळ्या मणक्यांत तसेच मुखात संवेदना जाणवतात असे गणपतीच्या लक्षात आले. प्रत्येक मणक्याशी अशा प्रकारे जोडल्या गेलेल्या प्रत्येक स्वतंत्र ध्वनीसाठी गणपतीने एक चिन्ह निर्माण केले. अशा प्रत्येक चिन्हाला एक वर्ण म्हणतात. मानवी मणक्यांची संख्या ३३ आहे म्हणूनच गणपतीने आरेखित केलेली मणक्यांशी संबंधित वर्ण चिन्हे देखील ३३ होती. या ३३ वर्णांनाच आपण सध्या व्यंजने म्हणतो. या व्यंजनांचा उच्चार होताना जीभ मुखात कोठे ना कोठे टेकते असे लक्षात आल्यामुळे व्यंजनांचे कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य असे पाच प्रकार गणपतीला आढळले. या शिवाय काही उच्चारांचा मणक्यांशी संबंध नसून मुखाशी असलेल्या संबंधातही एक वैशिष्ट्य आहे हे गणपतीच्या लक्षात आले. या उच्चारांच्या वेळेस जीभ मुखात कोठेही टेकत नाही असे गणपतीला आढळले. अशा वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारांसाठी गणपतीने जी वेगळी चिन्हे निर्माण केली त्यांना आपण आता स्वर म्हणतो. हे स्वर १६ आहेत. गणपतीने अशा प्रकारे ३३ चिन्हे व्यंजनांसाठी आणि सोळा चिन्हे स्वरांसाठी निर्माण केली. या चिन्हांचे दृश्य रूप काळाच्या ओघात बदलत गेले. गणपतीने कल्पिलेल्या सर्व वर्णांसाठी त्यानेच आरेखित केलेल्या चिन्हांमध्ये अनेक वेळा बदल झाले आणि त्या ४९ चिन्हात पुढील काळात आणखी ३ चिन्हांची भर पडून सध्या आपण वापरत असलेल्या ५२ चिन्हांच्या सध्याच्या रूपाला आपण देवनागरी लिपी म्हणतो. वाचन आणि लेखन अधिक वेगाने होण्यासाठी गणपतीने या चिन्हांपैकी काही अर्धी आणि एक पूर्ण जोडून जोडाक्षर निर्मितीही केली. जोडाक्षर हे देवनागरी लिपीचे महत्वाचे वैशिष्ट्य असून ते अनेक भारतीय लिप्यांमध्ये आढळते. मानवी शरीरातील भागांशी उच्चारांच्या असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे मानवी बोलणे ९९.९९% प्रमाणात अचूक व नेमके लिहिणे देवनागरी लिपीतून जमते.
ही लिपी खरेच देवाधिदेव गणपतीने बनविली का? यावर आस्तिक, नास्तिकांचा वाद सुरु आहे, पण ही जगातील अत्यंत उपयुक्त लिप्यांपैकी एक महत्वाची लिपी आहे याबाबत दुमत नाही. ही लिपी जगातील बहुतेक सर्व भाषांमधील आशय उमटवण्यासाठी वापरता येते. सुमारे दोनशे भाषांमधून त्या प्रत्येक भाषेतील दहा हजारांपेक्षा अधिक लोक ही लिपी दैनंदिन स्वरूपात वापरतात.
क्रमशः….
ले : प्रा. अनिल गोरे
संग्राहक : कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ सारागढीची लढाई.. भाग 2 – श्री राजेश खवले ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆
(चौकीच्या तटबंदीवरून होणारा मारा इतका तीव्र होता की, अफगाणांना सारागढीच्या तटापर्यंत पोहोचणे मुळीच जमत नव्हते.) इथून पुढे ——
थोडयाच वेळात ईश्वरसिंह गोळी लागुन गतप्राण झाला. हेलीकोग्राफ हाताळणारा गुरुमुखसिंह या सर्व घडामोडी लोखार्टच्या किल्ल्यावर स्थित कर्नल हटन याला कळवत होता.
वारंवार हल्ले करुनही अफगाण -पश्तूनांना यश येत नव्हते. आता शत्रुने एक आगळीच युक्ती लढविली. त्यांनी सारागढीच्या आजूबाजूला असणा-या झुडूपांना आग लावून दिली. त्यातून धुरांचे प्रचंड लोट निर्माण झाले. त्या धुरामध्ये स्वतःला लपवत दोन पश्तून सैनिक सारागढीच्या तटबंदीजवळ येवून पोहोचले. टोकदार अशा चाकुंनी त्यांनी तटबंदीचे दगड उकरून काढायला सुरुवात केली. भिंतीतला चुना उकरुन त्यांनी काही दगड मोकळे केले, लवकरच त्यांनी तटबंदीला भगदाड पाडले. तटबंदीला भगदाड पडल्यामुळे शीख सैनिकांना भगदाडाकडे वळावे लागले. दरवाजावरील सुरक्षा त्यामुळे कमकुवत झाली. शेवटी भगदाडातून शत्रुने चौकीत प्रवेश केला. शीख सैनिक प्राणपणाने लढत होते. त्यांनी हातघाईची लढाई सुरु केली. शत्रुचे सहाशेहून जास्त सैनिक मारल्या गेले. लढता लढता सर्व शीख सैनिक कामी आले. हेलीकोग्राफ हाताळणारा एकटा गुरुमुखसिंह तेवढा बाकी होता. त्याने कर्नल हटनकडून हेलीकोग्राफ बंद करण्याची परवानगी घेतली. संदेशवहनाची सामग्री एका चामडयाच्या पिश्वीत गुंडाळली. रायफलला संगीन लावून तो शत्रूवर तुटुन पडला. मृत्युने त्याला कवेत घेण्यापुर्वी त्याने शत्रुचे २० सैनिक ठार केले. ‘सवा लाखशे एक लढावू’ म्हणजे काय असते ते सारागढीच्या २१ शीख सैनिकांनी जगाला दाखवून दिले.
सारागढीच्या लढाईत सर्व २१ शीख सैनिक शहीद झाले. शत्रूने सारागढीला आग लावून दिली. सारागढी नष्ट केल्यानंतर अफगाणांनी आपला मोर्चा किल्ले गुलीस्तानकडे वळविला. पण तोपर्यंत अधिकची कुमक किल्ले गुलिस्तानपर्यंत पोहोचली होती. दोनच दिवसांनी म्हणजे १४ सप्टेंबर, १८९७ रोजी शीख रेजिमेंटने तोफांचा भयंकर मारा करून सारागढी पुन्हा जिंकून घेतली.
सारागढीची लढाई सामुहिक शौर्याचे अत्यंत प्रखर उदाहरण आहे. युनेस्कोने एकमताने ठरविलेल्या सामुहिक शौर्याच्या आठ घटनांमध्ये सारागढीच्या लढाईचा समावेश होतो. सारागढीच्या लढाईत प्राणांची आहूती देणारे सर्व २१ सैनिक पंजाबच्या (भारत) फिरोजपूर जिल्हयातील होते. या सर्व सैनिकांची नावे नूद असणारा स्तंभ सारागढी येथे उभारण्यात आला आहे. या सर्व सैनिकांना मरणोत्तर ‘इंडीयन ऑर्डर ऑफ मेरीट’ ने सन्मानीत करण्यात आले. हा सध्याच्या ‘परमवीरचक्र’ पुरस्काराच्या बरोबरीचा तत्कालीन सन्मान होता. एकाच लढाईतील सर्व सैनिकांना इतका मोठा सन्मान मिळाल्याची ही जगातील एकमेव घटना आहे. कमांडींग ऑफिसरने पंजाबच्या गव्हर्नरला या लढाईची हकिकत कळविली. अशा प्रकारे या लढाईची बातमी ब्रिटीश सरकारपर्यंत जावून पोहोचली. ब्रिटीश पार्लमेंटमध्ये जेव्हा सारागढीच्या लढाईची हकिकत सांगण्यात आली तेव्हा शहिदांच्या सन्मानार्थ सर्व सदस्य उभे राहिले होते.
आजच्या शिख रेजिमेंटद्वारा १२ नाव्हेंबर हा दिवस ‘रेजिमेंटल बॅटल ऑनर’ दिवस म्हणून पाळल्या जातो. थर्मापीलीच्या खिंडीत लढणारे ग्रिक सैनिक आणि सारागढी लढविणारे शिख सैनिक यांच्या शौर्याची धार सारखीच आहे. चुहार सिंह यांनी सारागढीच्या लढाईत शहिद झालेल्या शिख सैनिकांचा गौरव करणारी ‘खालसा बहादूर’ ही पोवाडयासारखी दिर्घ कविता पंजाबी भाषेत रचली आहे.
आयुष्य म्हणजे एक लढाईच आहे. ही लढाई शौर्याने आणि धैर्याने लढावी लागते. सध्याच्या कोरोना विषाणूने ग्रासलेल्या वातावरणात याचा प्रत्यय सातत्याने येत आहे. आयुष्याच्या लढाईत ज्यांना यश प्राप्त करावयाचे आहे त्यांनी सारागढी लढविणा-या त्या एकविस शिख सैनिकांचा आदर्श आपल्या नजरेपूढे सतत ठेवला पाहिजे. सारागढीच्या शिख सैनिकांप्रमाणे जे लढतील ते आयुष्याच्या लढाईत निश्चितच विजयी होतील.
समाप्त
श्री राजेश खवले
संग्राहक : सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ सारागढीची लढाई.. श्री राजेश खवले ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆
जीवनाची लढाई जिंकण्यासाठी सारागढीच्या शिख सैनिकांप्रमाणे लढा !
सध्याच्या पाकिस्तानातील समाना पर्वतरांगेतील कोहाट जिल्हयातील सारागढी हे एक छोटेसे गाव होते. २० एप्रिल, १८९४ रोजी कर्नल जे कुक यांच्या अधिपत्याखाली ब्रिटीश सैन्यातील ३६ वी शीख रेजिमेंट निर्माण करण्यात आली. ऑगस्ट १८९७ मध्ये या शीख रेजिमेंटच्या पाच कंपन्या ले.कर्नल जॉन हटन यांच्या अधिपत्याखाली उत्तर-पश्चिम प्रांत अर्थात खैबर-पश्तुनखॉ येथील समाना टेकडया, कुराग, संगर, सहटोपधार आणि सारागढी येथे हलविण्यात आल्या.
या भागात महाराजा रणजीतसिंग यांच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या किल्यांची एक शृंखला होती. यामध्ये लोखार्टचा किल्ला आणि किल्ले गुलिस्तान हे अत्यंत महत्वपूर्ण होते. लोखार्टचा किल्ला हिंदुकुश पर्वतातील समाना डोंगररांगात, तर गुलिस्तान किल्ला सुलाईमान पर्वतरांगेत स्थित होता. या दोन किल्ल्यामधील अंतर फक्त काही मैल होते. हे किल्ले जवळ-जवळ असले तरी मध्ये उंचवटा असल्यामुळे एका किल्ल्यावरून दुसरा किल्ला दिसत नसे. दोन्ही किल्ल्यामध्ये संदेशवहन व्हावे म्हणून मधल्या उंचवट्यावर सारागढीची चौकी बांधण्यात आली होती. हेलीकोग्राफीच्या माध्यमातून हे संदेशवहन करण्यात येत असे. ग्रीकभाषेत ‘हेलीआस’ म्हणजे सूर्य. ‘ग्राफीन’ म्हणजे लिहिणे. हेलीकोग्राफीमध्ये मोर्स कोडचा वापर करुन आरशाद्वारा सूर्यकिरणे परावर्तीत करुन संदेश पाठविला जात असे. ही सांकेतिक भाषा सॅम्युअल मोर्सने (१७९१-१८७२) शोधून काढली होती. मोर्स हा अमेरीकी चित्रकार आणि संशोधक होता.
सारागढीची चौकी उंच खडकावर बांधण्यात आली होती. तिच्याभोवती तटबंदी होती. हेलिकोग्राफी संदेशवहनाकरीता एक उंच मनोरादेखील बांधण्यात आला होता. या भागात अफगाण, पश्तून, आफ्रीदी टोळया सक्रीय होत्या. ब्रिटीश सैन्यावर आणि चौक्यांवर त्या वारंवार हल्ले करत असत. १८९७ च्या सुमारास अफगाणांचे सार्वत्रिक उठाव या भागाकरीता नित्याचे झाले होते.
३ आणि ९ सप्टेंबर, १८९७ रोजी अफगाण टोळयांनी किल्ले गुलिस्तान जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. पण किल्ले लोखार्टमधील सैनिक किल्ले गुलिस्तानच्या मदतीला धावून गेले. त्यांनी अफगाण टोळयांना हुसकावून लावले. लोखार्टचे सैनिक परत जातांना त्यांनी सारागढीची सुरक्षा मजबूत केली. तेथे एक हवालदार आणि २० सैनिक तैनात केले. हे सर्व शीख सैनिक होते.
१२ सप्टेंबर, १८९७ रोजी सुमारे १० हजार अफगाण -पश्तुनांनी सारागढीच्या चौकीवर हल्ला केला. यावेळी गुरुमुखसिंग नावाचा सैनिक हेलीकोग्राफ हाताळत होता. लोखार्ट किल्ल्यावर कर्नल हटन स्थित होता. गुरुमुखसिंहाने हेलीकोग्राफच्या सहाय्याने कर्नल हटनला हल्ल्याची बातमी कळविली. परंतु आपण तातडीने मदत करण्यास असमर्थ आहोत असा उलट संदेश हेलीकोग्राफीद्वारा हटनने पाठविला. आता सारागढीच्या त्या २१ सैनिकांना लढणे किंवा शरण जावून चौकीचे दरवाजे खूले करून देणे असे दोनच पर्याय उपलब्ध होते. एक शीख सैनिक विरुध्द शत्रुचे ५०० सैनिक असा हा सामना होता. त्या २१ सैनिकांचा प्रमुख होता ‘हवालदार ईश्वरसिंह’. त्याने आणि त्याच्या सहकारी सैनिकांनी रक्ताचा शेवटचा थेंब सांडेपावेतो लढण्याचा निर्धार केला.
अफगाणांनी सारागढीवर जोरदार गोळीबार सुरु केला. त्यात भगवानसिंह या सैनिकाला गोळी लागून तो गंभीररित्या जखमी झाला. अफगाणांचा नेता सारागढीतील शीख सैनिकांना सारखा ओरडून सांगत होता की, ” तुम्ही शरण या, चौकीचे दरवाजे उघडा तुम्हाला काहीही इजा होणार नाही.” पण शीख सैनिक बधले नाहीत. हवालदार ईश्वरसिंहाने अतुलनीय शौर्याचा प्रत्यय आणून देत उर्वरीत सैनिकांना आतल्या तटबंदीतून लढायला पाठविले, आणि स्वतः पुढच्या तटबंदीवरून शत्रूवर ‘मार्टीनी-हेन्री’ रायफलीनी गोळया चालवायला सुरुवात केली. त्याने कित्येक अफगाणांना ठार केले. चौकीच्या तटबंदीवरून होणारा मारा इतका तीव्र होता की, अफगाणांना सारागढीच्या तटापर्यंत पोहोचणे मुळीच जमत नव्हते.
क्रमशः….
श्री राजेश खवले
संग्राहक : सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈