९ ऑक्टोबर – संपादकीय
* मराठीतील स्त्रीवादी लेखिका विजया राजध्यक्ष या श्रेष्ठ समीक्षक आहेत. आधांतर हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर त्यांचे वैदेही, अनोळखी, अकल्पित इ. १९ कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या कथा, मध्यम वर्गीय स्त्री जीवनावर आधारित आहेत. त्यांची कवितारति आदिमाया, संवाद इ. समीक्षेवरची पुस्तके प्रसिद्ध आहेत. मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ या समीक्षेच्या पुस्तकाला साहित्य ‘अॅकॅडमीचा’ पुरस्कार प्राप्त झालाय. २००० मध्ये इंदूर यथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९३३ चा.
* मराठीतील महान नाटककार म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या महेश एलकुंचवार यांचा जन्मही ९ ऑक्टोबरचा. त्यांनी आपल्या नाटकांची रचना, वास्तववादी, प्रतिकात्मक, अभिव्यक्तीवादी, आशा अनेक शैलीत केली आहे. जन्म ते मृत्यू या दरम्यानच्या अनेक थिम्स त्यांनी आपल्या नाटकातून मांडल्या. त्यांच्या नाटकांची भारतीय आणि पाश्चात्य आशा विविध भाषेत भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या होळी, पार्टी अशा नाटकांवर चित्रपट झाले. गार्बो, वासनाकांड , पार्टी, प्रतिबिंब, मग्न तळ्याकाठी इ. त्यांची नाटके गाजली. तरी सर्वात गाजले, ‘वाडा चिरेबंदी‘. २७ फेब्रुवारी १९ ला त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा ‘विंदा करंदीकर जीवन गौरव’ पुरस्कार मिळाला. २०११ ला त्यांना जनस्थान पुरस्कार मिळाला, तर २०१३ मध्ये संगीत नाटक अॅकॅडमीचा विष्णुदास भावे पुरस्कार मिळाला. मराठी नाट्यसृष्टीला नवे वळण देणारे , नवे आयाम अजमावणारे ते नाटककार आहेत.
*१९ व्या शतकाच्या पूर्वार्धात ( १३ डिसेंबर १९२८ ) गोपाळ हरी देशमुख हे मोठे अर्थतज्ञ होऊन गेले. मराठीतून लेखन करणारे ते पहिले अर्थतज्ञ. त्यांनी अर्थशास्त्रावर ५ पुस्तके लिहिली. समाजहिताला प्राधान्य देऊन त्यांनी, लोकहितवादी या नावाने शंभर पत्रे लिहिली. ’शतपत्रे’ म्हणून ती गाजली. त्यांनी सर्वांगीण समाज सुधारणेला महत्व दिले. बालविवाह, हुंडा घेण्याची पद्धत, बहुपत्नीत्वाची पद्धत यावर त्यांनी टीका केली. त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली. ते इतिहासाचे अभ्यासकही होते. त्यांची इतिहासाची १० पुस्तके आहेत. त्यांनी सामाजिक विषयावरील ५ पुस्तके व संकीर्ण ७ पुस्तके लिहिली आहेत. ९ ऑक्टोबर हा त्यांचा स्मृतिदिन॰
*बाबा कदम – मराठीतील लोकप्रिय कादंबरीकार बाबा कदम यांचं नाव वीरसेन आनंदराव कदम. यांचाही स्मृतिदिन आजच. (१९८९ )॰ त्यांनी ऐतिहासिक पार्श्वंभूमीवर अनेक कादंबर्या लिहिल्या. संस्थानिक, त्यांच्या गढया, वाडे, त्यांची बोलण्याची शैली. रीती-रिवाज इ. ची वर्णने त्यांच्या कथा-कादंबर्यातून येतात. ते स्वत: वकील होते. त्यामुळे त्यांच्या कादंबर्यातून कोर्ट–कचे-या, पोलीस, कायदे इ. गोष्टी येतात. तिथल्या अनुभवावर त्यांनी अनेक कथा-कादंबर्या लिहिल्या. त्यांची ‘आवडलेली माणसे’ (व्यक्तिचित्रण), चक्र (एकांकिका), चार्वाक (नाटक) , पोपटी चौकट, देवचाफा, टेकडीवरचे पीस इ. कथा संग्रह माता द्रौपदी ( नाटक). शाश्वतचे रंग ( समीक्षा ) इ. महत्वाची पुस्तके आहेत.
श्रीमती उज्ज्वला केळकर
(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ)
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈