ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १३ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १३ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

कै. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित)

इंदिरा संत

“अजंठ्याच्या कलाकाराची विसरून राहिलेली एक पुसट रेषा माझ्या रक्तातून वाहते आहे”

स्वतःच्या काव्य निर्मितीविषयी असे मत व्यक्त करणा-या आणि कवितेला आपल्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा मानणा-या ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचा आज स्मृतीदिन.

महाविद्यालयीन जीवनापासून कविता लेखन करणा-या इंदिरा संत यांच्या कविता ज्योत्स्ना, साहित्य, सत्यकथा अशा मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. त्यांनी बी.ए., बी.टी., बी.एड्. शिक्षण पूर्ण करून अध्यापनाचे काम केले. कवी व निबंधकार ना. मा. संत यांच्याशी त्यांचा  विवाह झाला. 1 941 साली त्या उभयतांचा ‘सहवास’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. 1946 मध्ये त्यांच्या पतींचे निधन झाले. पुढील सर्व आयुष्य सांसारिक जबाबदा-या व पतिविरहाच्या दुःखात व्यतीत झाल्यामुळे त्याचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात दिसून येते. त्यांची कविता त्यामुळेच आत्ममग्नतेतून सार्वत्रिक सुखदुःख व्यक्त करणारी वाटते. निसर्गाच्या माध्यमातून मानवी भावना व्यक्त करणारी त्यांची कविता निसर्गा इतकीच चिरतरूण वाटते. स्वानुभवातून साधलेला शब्दसंवाद एक वेगळाच सौंदर्यानुभव देऊन जातो. त्यांचे गद्य लेखनही नितळ काव्यात्मक अनुभूती देणारे आहे.

इंदिरा संत यांची साहित्यसंपदा:

कविता- शेला, वंशकुसुम, रंगबावरी, मेंदी, मृगजळ, मरवा, निराकार, गर्भरेशमी, बाहुल्या, चित्कळा

ललित लेख – मृद्गंध, फुलवेल, मालनगाथा

कादंबरी – घुंघुरवाळा

कथा – शामली, कदली, चैतू

बालसाहित्य – गवतफुला, अंगत पंगत, मामाचा बंगला.

पुरस्कार:

‘गर्भरेशमी’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार व अनंत काणेकर पुरस्कार.

घुंघुरवाळा’ ला साहित्य कला अकादमी पुरस्कार.

शेला, रंगबावरी व मृगजळ या काव्यसंग्रहाना महाराष्ट्र शासन पुरस्कार.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार.

“मातीतून मी आले वरती

मातीचे मम अधुरे जीवन”

असे म्हणणा-या या कवयित्रीचे वयाच्या 86व्या वर्षी 13 जुलै2000 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया, कोलाज इन.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ११ जुलै – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ ११ जुलै -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मंगेश तेंडुलकर

मंगेश तेंडुलकर हे मराठी हास्य-व्यंग चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली. त्यांच्या व्यंगचित्रांची अनेक प्रदर्शने झाली. ते उत्तम व्याख्यातेही होते. प्रसिद्ध नाटककार आणि लेखक विजय तेंडुलकरांचे ते धाकटे बंधू. वडलांचे पुस्तकांचे दुकान असल्याने लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती. लेखन  आणि व्यंगचित्रे दोन्ही डगरींवर त्यांनी सफलतापूर्वक पाय रोवले.वयाच्या ६०व्या वर्षी त्यांनी कॅरीकेचार हा प्रकार हाताळला.

मंगेश तेंडुलकर यांची पुस्तके

 १.भुईचक्र, २.रंगरेषा व्यंगरेषा, ३. संडे मूड,

संडे मूडमध्ये ५३ लेख आहेत आणि तेवढीच व्यंगचित्रे आहेत.

नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले काही सुप्रसिद्ध लेख –

अतिक्रमण, कुणी पानपतो अजून काळोख , चौकटीतल्या आत्म्याला, व्यंगचित्रांची भाषा, व्यंगचित्रातून संवाद साधताना, इ. 

पुरस्कार – संडे मूड या पुस्तकाला वि. मा. दी. पटवर्धन पुरस्कार   , महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चिं. वि. जोशी पुरस्कार. 

☆ ☆ ☆ ☆ ☆

शांताराम नांदगावकर  (१९ ऑक्टोबर १९३६ – ११ जुलै २००९)

अनेक उत्तम चित्रपट गीते, भावगीते लिहिणारे कवी म्हणून शांताराम नांदगावकर यांची ओळख मराठी रसिकांना आहे. ते कोकणातील कणकवलीजवळच्या नांदगावचे. पुढे मुंबईत परळ येथील शिरोडे हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. १९८५ साली महाराष्ट्र विधान परिषदेवर ते निवडून आले.

कारकीर्द –

अशी ही बनवाबनवी, अष्टविनायक, गंमत जमंत, तू सुखकरता, धुमधडाका, नवरी मिळे नवर्या ला, पैजेचा विडा इ. चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली.

शांताराम नांदगावकर  यांची गाजलेली गीते –

१.    अनुरागाचे थेंब झेलती प्रीत लतेची पाने

२.    अश्विनी ये ना

३.    अष्टविनायका तुझा महिमा कसा

४.    असाच यावा पहाटवारा

५.    कुठं कुठं जायाचं हनिमूनला

६.      तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला

७.      दाटून कंठ येतो

८.      धुंदीत गांधीत होउनी सजणा

९.      दोन बोक्यांनी आणला हो आणला चोरून लोण्याचा गोळा

१०.      हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा 

इ. अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी लिहिली. १९८७ सालली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ‘दलितांचा राजा ‘ या आल्बमसाठी त्यांनी अप्रतिम गाणी लिहिली.

☆ ☆ ☆ ☆ ☆

सुहास शिरवळकर (१५ नोहेंबर १९४८ – ११ जुलै २००३ )

सुहास शिरवळकर हे सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक आणि कादंबरीकार. १९७४ साली त्यांनी आपल्या कथालेखनास सुरुवात केली. १९७९ पर्यन्त त्यांच्या छोट्या- मोठ्या २५०  लिहून झाल्या. १९८० पासून त्यांनी सामाजिक कादंबर्यास लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी काही लघुकथाही इहिल्या. त्यांचेही संग्रह झाले. त्यांनी बालकथादेखील लिहिल्या.

त्यांच्या देवकी या कादंबरीवर मराठी चित्रपट झाला, तर ’दुनियादारी’ आणि ‘कोवळीक’ दूरचित्रवाणी मालिका तयार झाल्या. त्यांची बरीचशी पुस्तके दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केली. 

सुहास शिरवळकर यांची काही पुस्तके –

१.    वेशीपालीकडे, २. ऑब्जेक्शन युयर ऑनर, ३. वंडर ट्वेल्व्ह, ४. शब्दवेध ५. इंसनियत, ६. सालं, ७. सॉरी सर ८. जाई, ९. हॅलो… हॅलो’, १० जस्ट हॅपनिंग

एके काळी त्यांच्या रहस्यकथांवर तरुणाई अतिशय खूश असायची.

मंगेश तेंडुलकर, शांताराम नांदगावकर, सुहास शिरवळकर या तिघाही प्रतिभावंतांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १० जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १० जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

साम्यवादी विचारसरणीचे मराठी लेखक, समीक्षक, आणि पत्रकार श्री. प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांचा आज स्मृतिदिन. 

(९/१/१९१८ – १०/७/१९८९)

मार्क्सवादी विचारवंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. ऊर्ध्वरेषे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सुरुवातीपासूनची जडणघडण आणि स्थित्यंतरे जवळून अनुभवलेली होती. त्याच अनुषंगाने “ नवे जग “ या साम्यवादाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या, तसेच “ युगवाणी “ या त्रैमासिकाच्या संपादकपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. 

नोकरीच्या शोधात ते ब्रह्मदेशला गेलेले असतांना, म्हणजे १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरु झाले. आणि चारशे मैलांचा पायी प्रवास करत त्यांना भारतात परत यावे लागले. त्यानंतर नागपूर विद्यापीठात इंग्रजीचे रीडर म्हणून त्यांनी काम सुरु केले. 

पण मराठीवरही त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. त्यांनी धर्म आणि राजकारण या विषयांचाही सखोल अभ्यास केला होता. “ प्रतिभा “ आणि “ किर्लोस्कर “ या मासिकांमध्ये लिहिलेल्या लेखांपासून “ लेखक “ म्हणून ते ओळखले जाऊ लागले. “ आम्ही हिंदू आहोत का ?” हा १९४२ साली किर्लोस्कर मासिकात प्रकाशित झालेला त्यांचा पहिला लेख.

“ प्राध्यापकांनो, शिक्षक व्हा “ हाही त्यांचा त्याकाळी गाजलेला एक लेख. 

त्यांचे प्रकाशित साहित्य असे आहे —-

१. “ आई “ — मॅक्झिम गॉर्की यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद . 

२. “ बियॉन्ड दि लास्ट ब्लू माऊंटन “ — रुसी लाला यांच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद. 

३. “ शृंखलाबद्ध प्रॉमिथ्युस “ – ग्रीक नाट्यकृतीचे भाषांतर . 

४. “ सफलतेमधील आनंद “ — जे.आर.डी. टाटा यांच्यावर रुसी लाला यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद. 

५. “ हरवलेले दिवस “ – हे अगदी वाचनीय असे आत्मचरित्र. यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते म्हणून  अनुभवलेल्या कम्युनिस्ट पक्षाचे सविस्तर चित्रण श्री. ऊर्ध्वरेषे यांनी केलेले आहे.  या पुस्तकाला १९८९ सालचा “ साहित्य अकादमी पुरस्कार “ दिला गेला होता. 

६. याव्यतिरिक्त त्यांनी चिनी आणि रशियन भाषेतील अनेक पुस्तकांचे , तसेच माओ , स्टॅलिन , पुश्किन यांच्या ग्रंथांचे अनुवाद केलेले आहेत. 

एक सुस्वभावी , उत्साही , आणि इंग्रजीचे विद्यार्थीप्रिय निष्णात प्राध्यापक अशी ज्यांची ओळख सांगितली जात असे , त्या श्री. प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांच्या स्मृतीस विनम्र प्रणाम.🙏

☆☆☆☆☆

इतिहास-संशोधक आणि मराठी – कोंकणी लेखक म्हणून सुपरिचित असणारे श्री. पांडुरंग सखाराम शेणवी-पिसुर्लेकर यांचाही आज स्मृतिदिन. (३०/५/१८९४ – १०/७/१९६९ )

श्री. पिसुर्लेकर हे सुरुवातीला एका पोर्तुगीज शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असत. पुढे इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी इतिहास-संशोधन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी तेव्हाच्या पोर्तुगीज सरकारच्या दफ्तर-खात्यात ते विनावेतन काम करू लागले. तिथे पोर्तुगीज, डच, फारसी, कन्नड, तमीळ, बंगाली, मराठी, अशा अनेक भाषांमधल्या विस्कळीत पडलेल्या अनेक कागदपत्रांची योग्य मांडणी करता यावी यासाठी , कोंकणी, मराठी बरोबरच पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश, संस्कृत, अशा अनेक भाषा त्यांनी आवर्जून शिकून घेतल्या ही गोष्ट विशेषत्वाने लक्षात घ्यावी अशीच. त्यांच्या नियोजनबद्ध कामाची दखल घेत १९३० साली त्यांची त्याच खात्याचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली, आणि तेव्हा कुठे त्यांना वेतन द्यायला सुरुवात झाली. आणखी संशोधनासाठी पोर्तुगीज सरकारने त्यांना लिस्बन आणि पॅरिस इथे पाठवले. 

त्यांचे सर्व संशोधन त्यांनी लिहिलेले अनेक शोधनिबंध आणि पुस्तके याद्वारे प्रकाशित झाले होते , आणि यामध्ये इतर भाषांमधीलही अनेक पुस्तकांचा समावेश होता. 

यापैकी, मराठा साम्राज्य व भारतातील पोर्तुगीज वसाहतींच्या परस्पर संबंधांवर लिहिलेला “ पोर्तुगीज – मराठे संबंध – अर्थात पोर्तुगीजांच्या दफ्तरातील मराठ्यांचा इतिहास“ हा अतिशय महत्वाचा ऐतिहासिक ग्रंथ मानला जातो. त्यांच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या इतर भाषांमधील अनेक ग्रंथांपैकी, “अ आंतिगिदादि दु कृष्णाइज्मु “ या ग्रंथाद्वारे ‘कृष्ण संप्रदाय इसवीसनापूर्वीपासून अस्तित्वात होता ‘ हे सिद्ध करण्याचा श्री. पिसुर्लेकर यांनी प्रयत्न केला होता. 

त्यांचे हे इतके सगळे काम त्यावेळी खूपच दखलपात्र ठरले होते. आणि त्यामुळेच त्यांना पुढीलप्रमाणे गौरविण्यात आले होते —

१. इतिहास संशोधनाबद्दल लिस्बन विद्यापीठातर्फे ‘ डी. लिट. ‘ पदवी देऊन गौरव. 

२. बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीकडून ‘ जदुनाथ सरकार ‘ सुवर्णपदक . 

३. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीतर्फे ‘ कॅम्बल मेमोरियल ‘ सुवर्णपदक .   

४. पोर्तुगीज सरकारने दिलेले उच्च किताब —– ‘ नाईट ऑफ दि मिलिटरी , ऑर्डर ऑफ सॅंटियागो ऑफ सायन्स, लेटर्स अँड आर्टस् ‘ , ‘ शेव्हेलियर ‘. 

५. पॅरिसच्या पौरस्त्य सोसायटीचे माननीय सदस्यत्व – सन १९२३.  

६. सन १९२६ मध्ये पणजीच्या ‘ इन्स्टिट्यूट वास्को दि गामा ‘ या सरकारी संस्थेचे सभासदत्व . 

अशा कितीतरी महत्वाच्या मानसन्मानांना पात्र ठरलेले अतिशय मोलाचे आणि तितकेच कष्टप्रद काम सातत्याने ज्यांनी केले, आणि पुढच्या पिढीसमोर एक वेगळाच आदर्श ठेवला, त्या आदरणीय श्री. पांडुरंग पिसुर्लेकर यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी मनःपूर्वक आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ९ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ ९ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

सोनोपंत दांडेकर

सोनोपंत दांडेकर यांचे मूळ नाव  शंकर वामन दांडेकर.ते सोनुमामा  तसेच मामासाहेब दांडेकर या नावाने प्रसिद्ध होते.ते विचारवंत,शिक्षणतज्ञ,तत्वज्ञान व संत साहित्याचे अभ्यासक व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.पुणे येथील सर परशुरामभाऊ ( एस्.पी.)महाविद्यालयाचे प्राचार्य होते.

त्यांचे प्रकाशित साहित्य: अध्यात्मशास्त्राची  मूलतत्वे, अभंग संकीर्तन भाग 1 ते4, ईश्वरवाद, दैनिक स्वाध्याय, भारतातील थोर स्तीया, श्रीमद्भगवद्गीता, सटीप ज्ञानेश्वरी, तुकारामांचे आध्यात्मिक चरित्र, सौंदर्याचे व्याकरण, ज्ञानदेव आणि प्लेटो, श्री ज्ञानदेवांचे जीवनविषयक तत्वज्ञान इ.इ.

सन्मान: पालघर येथे महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.तसेच तत्वज्ञान विषयक ग्रंथाला त्यांचे नावे पुरस्कार देण्यात येतो.

09/07/1968 रोजी मामासाहेब दांडेकर यांचे दुःखद निधन झाले.ज्ञानेश्वरी तसेच अन्य संत साहित्याचा घरोघर प्रसार करण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे.त्यांच्या कार्यास शतशः प्रणाम! 🙏

☆☆☆☆☆

 डाॅ. गंगाधर मोरजे

डाॅ.गंगाधर मोरजे हे लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक होते.बार्शी व अहमदनगर येथील महाविद्यालयत त्यांनी प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.”मराठी लावणी प्रारंभ ते 1850 ” ह्या विषयात त्यांनी डाॅक्टरेट मिळवली होती.तसेच “गोमंतकातील ख्रिस्ती-मराठी वाड्मय” हा सुद्धा त्याच्या अभ्यासाचा विषय होता.लोकसाहित्याचा अभ्यास करून त्यातील गूढ,अद्भुत,रहस्यमय कथा त्यांनी प्रकाशात आणल्या.

मोरजे यांचे प्रकाशित साहित्य: लोकसाहित्य: बदलते संदर्भ, बदलती रूपे.

जिप्सी लोककथा, लोककथांतर्गत नवलकथा, श्री ज्ञानेश्वरी शब्दरूपसंबं इ.

संपादित: सगनभाऊकृत लावण्या व पोवाडे संपादन.

सन्मान: गंगाधर मोरजे स्मृती प्रित्यर्थ लोकगंगा पुरस्कार लोकसाहित्य विषयक ग्रंथांना दिला जातो.

आज त्यांचा स्मृतीदिन आहे.त्यांच्या कार्यास अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ८ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ८ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

बा. भ. बोरकर

बाळकृष्ण भगवंत बोरकर (30 नोव्हेंबर 1910 – 8 जुलै 1984) हे कवी, लेखक, कथाकार होते.

बा.भ.मूळचे गोव्याचे. त्यांचे शालेय शिक्षण गोव्यात व धारवाडला झाले . कर्नाटक कॉलेजमध्ये शिकत असताना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहिले. थोडे दिवस मुंबईला राहून ते गोव्याला परतले. तिथे एका इंग्रजी शाळेत त्यांनी शिक्षकाची नोकरी धरली. नंतर त्यांनी पुण्याच्या रेडिओ स्टेशनवरही काम केले.

त्यांचा पहिला कवितासंग्रह 1930मध्ये प्रसिद्ध झाला. नंतर ‘जीवन संगीत’, ‘चैत्रपुनव’, ‘चांदणवेल’,  ‘कांचनसंध्या’ वगैरे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध झाले.

त्यांच्या कवितेवर भा. रा. तांबे यांचा प्रभाव होता. निसर्गसौंदर्य, दिव्यत्वाचा साक्षात्कार, समृद्ध शब्दभंडार, नादमय रचना ही त्यांच्या कवितेची लक्षणे होती. अक्षरगणवृत्ते, मात्रा, जातिवृत्ते यावर त्यांची हुकमत होती.

कवितांव्यतिरिक्त त्यांनी इतरही लेखन केले.त्यांची ‘कागदी होड्या’, ‘चांदण्याचे कवडसे’, ‘सासाय’ इत्यादी ललित लेखांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. स्टीफन झ्वाइगच्या कादंबऱ्यांचा व  महात्मा गांधीसंबंधित काही पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला. रवींद्रनाथ टागोरांवरही त्यांनी काही पुस्तके लिहिली. कोकणी भाषेत त्यांच्या दहा साहित्यकृती आहेत.

मराठी ‘आमचा गोमंतक’ व  कोकणी ‘पोर्जेचो आवाज’चे संपादक म्हणूनही बा.भ.नी काम केले.

भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. गोव्याच्या स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागाबद्दल त्यांना ताम्रपट मिळाला होता.

बा. भ. बोरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, मराठी माती, फोंडिया.कॉम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ६ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ६ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

प्रसिद्ध मराठी लेखिका श्रीमती कमला फडके यांचा आज स्मृतिदिन. ( ४/८/१९१६ – ६/७/१९८० ) 

त्या काळचे सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री. ना. सी. फडके यांच्या सुविद्य पत्नी , आणि सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांची धाकटी बहीण , अशी ठळक ओळख असणाऱ्या कमला फडके यांनी स्वतःच्या समृद्ध लेखनामुळे साहित्यविश्वाला स्वतःची “ उत्तम लेखिका “ अशी पूर्णपणे स्वतंत्र आणि तितकीच ठळक ओळख करून दिली होती. 

ना. सी. फडके यांच्या “ झंकार “ या साप्ताहिकात कमलाताईंचे लेख , कथा , मुलाखती हळूहळू प्रसिद्ध होऊ लागल्या, आणि त्यांच्यातली लेखिका वाचकांसमोर आली. पुढे याच साप्ताहिकात इंग्रजी साहित्याचा परिचय करून देणारे त्यांचे एक वेगळे सदर प्रसिद्ध होऊ लागले , आणि लेखिका म्हणून त्यांची खरी ओळख निर्माण झाली. अनंत अंतरकर यांच्या ` हंस ` आणि ` मोहिनी ` या सुप्रसिद्ध मासिकांमध्ये त्यांच्या अनेक विनोदी कथा प्रसिद्ध झाल्या. तसेच इतर कथा ` किर्लोस्कर ` आणि ` स्त्री ` मासिकांमध्ये प्रकाशित झाल्या. 

लेखनासोबतच त्यांनी नागभूषण नावाच्या प्रख्यात गुरूंकडून कथक नृत्याचेही शिक्षण घेतले होते. तसेच ना. सी. फडके यांच्या “ जानकी “ या नाटकातली मुख्य भूमिकाही त्यांनी समर्थपणे साकारली होती, ज्याचे चिंतामणराव कोल्हटकरांसारख्या मान्यवरांनी कौतुक केले होते. आणि या दोन्ही गोष्टी विशेषत्वाने सांगण्यासारख्या आहेत.

त्यांचे वैविध्यपूर्ण असे प्रकाशित साहित्य :— 

 १. आसावरी – ही संगीत-विश्वावर आधारित कादंबरी 

 २. ` उटकमंडची यात्रा ` आणि ` त्रिवेंद्रमची सफर ` – ही दोन प्रवासवर्णने 

 ३. एडमार पो यांच्या भयकथा — हा अनुवादित कथासंग्रह 

 ४. जेव्हा रानवारा शीळ घालतो —  कादंबरी 

 ५. थोरांच्या सहचारिणी – लेखसंग्रह 

 ६. धुक्यात हरवली वाट – कादंबरी 

 ७. निष्कलंक – अनुवादित कादंबरी – मूळ लेखक हिल्टन 

 ८. पाचवे पाऊल – एका अणुशास्त्रज्ञाच्या आयुष्यावर आधारित कादंबरी 

 ९. प्रा. फडके यांची गाजलेली भाषणे – संकलन व संपादन 

१०. बंधन – मिरजेच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरच्या आयुष्यावर आधारित कादंबरी 

११. भूल – हातून चुकून झालेल्या खुनाची किंमत चुकवणाऱ्या एका पुरुषाची कथा सांगणारी कादंबरी 

१२. मकरंद – कथासंग्रह 

१३. हृदयाची हाक — १९७१ साली जगातली पहिली हृदयरोपणाची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड यांच्या 

     “ One Life “ या इंग्रजीतील आत्मकथनाचा मराठी अनुवाद 

१४. ओशो, म्हणजेच आचार्य रजनीश यांच्या अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठीत केलेले अनुवाद 

–यापैकी “ निष्कलंक “ या त्यांच्या कादंबरीला दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात खास पारितोषिक देऊन 

गौरविण्यात आले होते. 

असे विविधांगी लेखन करणाऱ्या श्रीमती कमला फडके यांना त्यांच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली . 🙏

☆☆☆☆☆

इतिहास-संशोधक म्हणून अधिकतर प्रसिद्ध झालेले श्री. पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांचाही आज स्मृतिदिन. 

( ५/१/१८८६ – ६/७/१९२१ ) 

पुण्याच्या ` भारत इतिहास संशोधक मंडळात ` सदस्य म्हणून कार्यरत असतांना श्री. पटवर्धन यांचे त्या मंडळाच्या वृत्तांमध्ये आणि त्रैमासिकांमधून इतिहासविषयक अनेक लेख सातत्याने प्रकाशित होत असत. 

याच्याच जोडीने “ राष्ट्रहितैषी “ नावाचे साप्ताहिकही त्यांनी बराच काळ चालवले होते. 

“ राष्ट्रकुटांचा पुणे ताम्रपट “ हाही त्यांनीच प्रकाशित केला होता. 

त्यांचे विशेषत्वाने सांगायला हवे असे पुस्तक म्हणजे “ बुंदेल्यांची बखर “ हे त्यांनी अनुवादित केलेले पुस्तक —

“ तारिखे दिलकुशा “ हे भीमसेन सक्सेना लिखित एक फारसी हस्तलिखित होते. कॅप्टन जोनाथन स्कॉट यांनी १८७४ मध्ये त्याचा इंग्रजी अनुवाद केला होता. आणि १९२० साली श्री. पटवर्धन यांनी त्याचा मराठीत केलेला अनुवाद म्हणजे हे पुस्तक . 

इतिहास संशोधनासाठी केले जाणारे काम लोकांपर्यंत पोहोचावे या हेतूने उत्तम लेखन करणाऱ्या श्री. पटवर्धन यांना विनम्र आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ५ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ५ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

बाबूराव अर्नाळकर

चंद्रकांत सखाराम चव्हाण हे मूळ नाव असलेले प्रसिद्ध मराठी रहस्यकथा लेखक म्हणजेच बाबूराव अर्नाळकर! आयुष्यभर त्यांनी याच टोपणनावाने लेखन केले.

त्यांचे शिक्षण फक्त मॅट्रीक पर्यंत झाले होते.पण वाचकांच्या सर्वख थराला आवडतील अशा 1042 रहस्यकथा लिहून त्यांनी लोकांमध्ये वाचनाची गोडी लावली. ज्या काळात ना.सि.फडके,साने गुरुजी,वि.स.खांडेकर यांचा खूप मोठा वाचक वर्ग होता,त्या काळात अर्नाळकर यांनी आपलाही एक वाचक वर्ग तयार केला होता. विजयदुर्ग किल्ल्यावरून परतताना त्यांना एक कथा सुचली.ती कथा म्हणजे ‘सतीची समाधी’.त्यांची ही पहिली कथा करमणूक मासिकातून प्रसिद्ध झाला.ज्येष्ठ लेखक नाथमाधव यांच्या वाचनात ही कथा आली.त्यांनीच अर्नाळकर यांना रहस्यकथा लिहायला प्रोत्साहन दिले.तेव्हापासून बाबूरावांनी अखेरपर्यंत आपली लेखणी रहस्यकथांसाठी वाहून घेतली.नाथमाधव यांच्याप्रमाणेच त्यांना आचार्य अत्रे,यशवंतराव चव्हाण,अनंत काणेकर,पु.ल.देशपांडे,वि.भि. कोलते यांनी लेखनासाठी प्रोत्साहन दिले.

त्यांनी 1942 च्या चळवळीतही भाग घेतला होता.तसेच स्वा.सावरकरांच्या आवाहनानुसार त्यांनी 1946 ते1948 या काळात सैन्यात काम केले होते.त्या दोन वर्षानंतर त्यांनी पुन्हा लेखन चालू ठेवले.

त्यांच्या कथा पाश्चिमात्य कथांवर आधारित असल्या तरी त्याला मराठी समाजजीवनाचे सुंदर रूप दिलेले असल्यामुळे त्या अस्सल देशीच वाटत असत.त्यांच्या प्रत्येक कथेचा शेवट ‘सत्यमेव जयते’ ने होत असे.

त्यांच्या पाचशे कथांचे लेखन झाल्यावर महाराष्ट्र शासनाने 10,000/रूपये देऊन त्यांचा सन्मान केला होता.

पोलिस अधिकारी आनंदराव, चंद्रवदन उर्फ काळापहाड, कृष्णकुमारी, चारूहास, धनंजय, छोटू, पंढरीनाथ, झुंजार, दर्यासारंग ही त्यांची वारंवार येणारी लोकप्रिय पात्रे !

त्यांच्या कथा लता मंगेशकर, बालगंधर्व यांच्याकडून रसिकतेने वाचल्या जात असत.

त्यांची काही पुस्तके: कृष्णसर्प, काळापहाड, कालकन्या, कर्दनकाळ, अकरावा अवतार, ज्वालामुखी, चौकटची राणी, वेताळ टेकडी, रूद्रावतार, भद्रंभद्र, भीमसेन, मृत्यूचा डाव, राजरहस्य, चोरांची दुनिया इत्यादी.

वयाच्या 90 व्या वर्षी 05/07/1996 ला त्यांचे दुःखद निधन झाले व मराठी रहस्यकथांचे एक पर्व अस्तास गेले.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ४ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ४ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

र. वा. दिघे

रघुनाथ वामन दिघे (25 मार्च 1896 – 4 जुलै 1980) हे ग्रामीण वास्तव प्रभावीपणे मांडणारे साहित्यिक होते.

ते बी.ए., एलएल. बी. होते. त्यांनी पुणे व पनवेल येथे 16 वर्षे वकिली केली. नंतर ते खोपोलीजवळच्या विहारी येथे राहून लेखन व शेती करू लागले.

 ते हाडाचे शेतकरी होते. कोकणात न पिकणारा गहू आपल्या शेतात पिकवून दाखवल्याबद्दल 1954-55 साली खालापूर तालुका विकास संघाने ‘प्रगतशील शेतकरी’म्हणून त्यांचा गौरव केला.

1940-45 साली र. वां. नी शेतकऱ्यांच्या कळीचे प्रश्न आपल्या लेखनातून मांडले. आता शेतकरी आत्महत्या करत आहेत. हा इशारा र. वां.नी त्याकाळीच दिला होता. ‘फक्त शेतीवर अवलंबून न राहता काहीतरी जोडधंदा करा’, ‘ पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे विचार त्यांनी त्याकाळी आपल्या कादंबऱ्यांतून मांडले होते.

त्यांच्या कादंबऱ्या बहुधा ग्रामीण पार्श्वभूमीवरील असत. त्यांचे नायक शेतकरी व वारकरी असत. ते संतांच्या शिकवणीनुसार नैसर्गिक आपत्तींशी झगडा देत.

त्यांच्या साहित्यात नाट्यपूर्ण, साहसी घटना, अद्भुतरम्य वातावरण, काव्यात्म वर्णन, ठसठशीत व्यक्तिदर्शन व ग्रामीण जीवन यांचे प्रत्ययकारी चित्रण आढळते.

र. वां.नी ‘पानकळा’, ‘आई आहे शेतात’, ‘कार्तिकी’, ‘पड रे पाण्या’, ‘निसर्गकन्या रानजाई’, ‘गानलुब्धा मृगनयना’ वगैरे 11 कादंबऱ्या,’सोनकी’, ‘रम्यरात्री’, ‘पूर्तता’ इत्यादी 6 कथासंग्रह, ‘माझा सबूद’, ‘द ड्रीम दॅट व्हॅनिश्ड'(इंग्रजी) इत्यादी 3 नाटके व ‘गातात व नाचतात धरतीची लेकरं’ हा लोकगीतसंग्रह एवढे बहुविध साहित्य लिहिले आहे. त्यांची अपूर्ण राहिलेली ‘हिरवा सण’ ही कादंबरी त्यांचे मित्र ग. ल . ठोकळ यांनी नंतर पूर्ण केली.

त्यांच्या ‘पाणकळा’वर ‘मदहोश’ व ‘सराई’वर ‘बनवासी’ हे हिंदी चित्रपट निघाले. ‘पड रे पाण्या’वर ‘धरतीची लेकरं’ हा मराठी चित्रपट आला.

र. वां.च्या साहित्यिक कारकिर्दीचे विश्लेषण व मूल्यमापन करणारा ‘कादंबरीकार र. वा. दिघे’ हा समीक्षाग्रंथ रवींद्र ठाकूर यांनी लिहिला आहे.

डॉ. आनंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली र. वा. दिघे यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून ठाकूर यांनी पीएच.डी. मिळवली.

1940 साली जमखिंडी येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात उत्कृष्ट कादंबरीचा ‘ना. सी. फडके पुरस्कार’ विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’ व ‘र. वां.ची ‘पाणकळा’ या दोन कादंबऱ्यांना विभागून देण्यात आला.

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी र. वां.चा ‘अस्सल मराठी मातीतला शेतकरी कादंबरीकार’ म्हणून गौरव केला.

अशा र. वा. दिघेंचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त  त्यांना विनम्र अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया, अक्षरनामा. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मराठी लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, निर्माता, दिग्दर्शक, संस्थाचालक, नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेता , अशी अनेकांगी ओळख असणारे श्री. मधुकर तोरडमल यांचा आज स्मृतिदिन. (२४/७/१९३२ – २/७/२०१७)

श्री. तोरडमल यांच्या अभिनयाची सुरुवात शाळेपासूनच झाली होती. मुंबईतल्या पोद्दार शाळेत पहिल्या दिवशी स्वत:ची ओळख करून देत असतांनाच, आपल्याला नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे त्यांनी वर्गशिक्षिकेला सांगितले. ते लक्षात ठेवून बाईंनी त्यावर्षीच्या गणेशोत्सवात एका नाटकाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली, आणि त्यांनी चिं.वि.जोशी लिखित ‘प्रतिज्ञापूर्ती’ हे नाटक बसवले-  दिग्दर्शन आणि अभिनयही त्यांनीच केला… आणि मग शाळेत असेपर्यंत गॅदरिंग किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी नाटक बसवण्याची  जबाबदारी दरवर्षी त्यांच्यावरच सोपवण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आधी मुंबईतच एका कंपनीत कारकूनी केली… आणि तिथून नगरला येऊन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते रूजू झाले….  राज्यनाट्य स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला होता. तेव्हा  ‘एक होता म्हातारा’ या नाटकात साकारलेल्या ‘बळीमामा’ या भूमिकेमुळे, सगळे त्यांना ‘मामा’ म्हणायला लागले आणि तेव्हापासून ते अवघ्या नाट्यसृष्टीचे मामा झाले. — इथूनच पुढे व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचा प्रवेश झाला. प्राध्यापकी आणि नाटक ही कसरतच होती. शेवटी नाटकाला प्राधान्य देत ते पुन्हा मुंबईला आले. आणि नाट्यक्षेत्रात आपला चांगलाच जम बसवला.

‘मामा’ हेच नाव अनेकांच्या तोंडी झाल्याने त्यांनी पुढच्या आयुष्यातल्या आठवणी “ उत्तरमामायण “ या त्यांच्या पुस्तकात सांगितल्या आहेत.

त्यांचं  नाव ऐकताच लगेचच आठवतं ते “ तरुण तुर्क म्हातारे अर्क “ हे नाटक आणि त्यात मामांनी अजरामर करून ठेवलेली प्रो.बारटक्के यांची भूमिका. या नाटकाचे ५००० हून जास्त प्रयोग झाले. सुरुवातीला काही समीक्षकांनी ‘‘ सुशिक्षित-सुसंस्कृत स्त्रियांनी हे नाटक बघू नये ’’ असे जाहीरपणे सांगितले, पण त्याचा परिणाम उलटाच झाला.. रसिकांची उत्सुकता वाढली. तिकिटासाठी रांगा लागायला लागल्या. या एकाच नाटकाचे एकाच नाट्यगृहात एकाच दिवशी तीन प्रयोग होणे ही आश्चर्यकारक गोष्टच होती. विशेष म्हणजे – त्या  दिवशी सकाळच्या प्रयोगाला श्री. बाळ ठाकरे, दुपारी श्री. ग.दि.माडगूळकर, आणि रात्री वसंत देसाई या दिग्गजांनी सहकुटुंब हजेरी लावली होती.

याचबरोबर तेव्हाच्या सुप्रसिद्ध असणा-या चार नाट्यसंस्थांतर्फे सादर केल्या गेलेल्या अनेक नाटकातूनही  त्यांनी कामे केली. ‘अखेरचा सवाल’, ‘गुड बाय डॉक्टर’, काळं बेट लाल बत्ती’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘मत्स्यगंधा’, ‘मृगतृष्णा’ ही त्यातली काही गाजलेली नाटके होत. त्यांनी स्वत:ची `रसिकरंजन` नावाची नाट्यसंस्थाही सुरू केली होती.

आत्मविश्वास, सिंहासन आणि अशाच काही चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकांनाही रसिकमान्यता मिळालेली होती. ‘संघर्ष’ या दूरचित्रवाणीच्या मालिकेतही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

र.धों. कर्वे यांनी लिहिलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या इंग्रजी लेखसंग्रहाचा आणि अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंब-यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे. या व्यतिरिक्त, १५ नाटके, “आयुष्य पेलतांना “ ही रूपांतरीत कादंबरी, “ तिसरी घंटा “ हे आत्मचरित्र,  असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाचा २००९-१० साठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा नाट्यपुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलेले होते . २००३ ला नगरला झालेल्या नाट्यसंमेलनाचे ते उद्घाटक होते .

मामा तोरडमल या अक्षरश: चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाला आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी आदरपूर्वक श्रद्धांजली. 🙏

☆☆☆☆☆

नामवंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे प्रा. रामचंद्र महादेव तथा राम बापट यांचा आज स्मृतिदिन. (१८/११/१९३१ – २/७/२०१२) .

श्री. राम बापट यांची ख्याती प्रामुख्याने एक मराठी लोकाभिमुख विचारवंत आणि राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक अशी होती. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींमधील कितीतरी नेते आणि कार्यकर्ते पन्नासहून जास्त वर्षे त्यांच्या सतत संपर्कात होते. त्यातील बऱ्याच चळवळींचे आणि संघटनांचे ते स्वतः सर्वेसर्वा होते. पण पेशाने मात्र ते एक हाडाचे शिक्षक होते. पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागात सन १९६५ ते १९९१ इतका प्रदीर्घ काळ ते आधी व्याख्याता म्हणून , मग प्रपाठक म्हणून आणि नंतर विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रं त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तव्यामुळे गाजली होती. त्यांची रसाळ व्याख्याने , आणि त्यातून गुंतागुंतीचे तत्वविचार मांडण्याची त्यांची हातोटी महाराष्ट्राची वैचारिक परंपरा पुढे नेणारी होती असे त्यांच्याबद्दल गौरवपूर्वक म्हटले जायचे. तसेच “ मौखिक परंपरेचे पाईक “ असेही त्यांच्या कार्याबद्दल बोलतांना आवर्जून म्हटले जायचे.

खरं तर एक सच्चा लोकशिक्षक हीच भूमिका मनापासून स्वीकारत त्यांनी “ लोकशिक्षणाचे “ जणू व्रतच अंगिकारले होते असे म्हणणे जास्त उचित ठरेल . समाज-सुधारणांच्या बाबतीत  “ एक समाज-शिक्षक “ म्हणून त्यांचे योगदान फार महत्वाचे होते. विशेषतः दलित ,आदिवासी , मागासवर्गीय समाज आणि त्याचबरोबर पर्यावरण रक्षण , याविषयीच्या चळवळींमध्ये त्यांना जास्त रस होता. त्यांनी अनेकांना नवा विचार करण्याची प्रेरणा तर दिलीच. त्याचबरोबर वैचारिक क्षेत्रात नवनव्या विषयांचा परिचयही लोकांना करून दिला. शिक्षण , मार्गदर्शन , आणि प्रबोधन या माध्यमातून तरुण सामाजिक कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात त्यांचा मोठा आणि मोलाचा सहभाग होता.

याबरोबरच , नाट्यशास्त्र , कला , सौंदर्यशास्त्र , संरक्षणशास्त्र , या विषयांचाही त्यांचा सखोल अभ्यास होता , आणि या संदर्भातही त्यांनी अनेक व्याख्याने दिली होती. त्यांच्या एकूण भाषणांची संख्या हजारातच मोजावी लागेल.

त्यांच्या असामान्य विचारशक्तीचा देशभरात लौकिक होता.

त्यांच्या लिखाणाचा विचार करता त्यांना “ एका वेगळ्या पठडीतले साहित्यिक असंच म्हणायला हवं. त्यांचे प्रकाशित साहित्य असे —-

१) “ परामर्श “ – हा त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकांसाठी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण अशा सहा प्रस्तावनांचा संग्रह आहे, आणि या संग्रहाला “ उत्कृष्ट मराठी गद्य “ म्हणून पुरस्कार दिल गेला आहे.

२) “ राज्यसंस्था  , भांडवलशाही , आणि पर्यावरणवाद “ या पुस्तकात त्यांचे काही लेख आणि व्याख्याने यांचा समावेश केलेल्या आहे.

३) “ भारतीय राजकारण : मर्म आणि वर्म “ १९९७ साली नाशिकमध्ये झालेल्या चौथ्या  “ विचारवेध “ संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

थोर विचारवंत म्हणून ख्यातनाम झालेल्या श्री. राम बापट यांना मनःपूर्वक आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गणेश हरि पाटील 

“कळीचे फूल झालेले पाहणे व लहान मुलांच्या मनाचा विकास झालेला पाहणे यासारखे दुसरे सुंदर व मनोगत दृश्य नाही.”

हे विचार आहेत लेखक व कवी गणेश हरि पाटील यांचे , जे ग.ह.पाटील या नावानेच प्रसिद्ध होते.मुलांचे भावविश्व जाणून घेवून त्यांनी निर्माण केलेले साहित्य हे आजही फुलांसारखे ताजे टवटवीत वाटते.देवा तुझे किती सुंदर आकाश,पाखरांची शाळा भरे पिंपळावरती,शर आला तो धावून आला काळ,डरांव डरांव का ओरडता, छान किती दिसते फुलपाखरू या कविता आठवतात ना ? या सर्वांचे कवी आहेत ग.ह.पाटील.

त्यांची काही पुस्तके:बालशारदा,रानजाई,पाखरांची शाळा,लिंबोळ्या,एका कर्मवीराची कहाणी,आधुनिक शिक्षण शाळा,गस्तवाल्याची गीते इ.

ग.ह.पाटील यांचे निधन वयाच्या 83 व्या वर्षी 01/07/1989 ला झाले.त्यांच्या सुंदर कवितांचा आस्वाद घेत त्यांचे स्मरण करू.

☆☆☆☆☆

लक्ष्मण नारायण जोशी

ल.ना.जोशी हे ऐतिहासिक आख्यायिकांचे संग्राहक,लेखक,ग्रंथसंपादक व पत्रकार होते.त्यांनी मॅट्रीक नंतर पशूवैद्यकशास्त्र शिक्षण घेतले.

सुरूवातीला त्यांनी ‘इंदुप्रकाश’ व ‘गुराखी’ या पत्रांतून लेखन केले.त्या काळात केलेल्या लेखनामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला व त्यांना तुरूंगवास भोगावा लागला.त्यानंतर मात्र त्यांनी पूर्णवेळ लेखन सुरू केले.त्यांनी विविध एकवीस विषयांवर सुमारे दीडशे पुस्तके लिहिली आहेत.

त्यांच्या लेखनाची विविधता अशी:

चरित्रलेखन: संत एकनाथ, नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, बाजीराव,महाराणा प्रताप इ.

भाषांतरे: अथर्ववेदाचे अन्वयासहित भाषांतर,ऋग्वेदाचे कविताबद्ध रूपांतर,धर्मसिंधु,सार्थ छंदोबद्ध पुरूषसूक्त व शेक्सपियरच्या तीन नाटकांचे भाषांतर. इ

स्वतंत्र लेखन : धंदे शिक्षण,फलाहारचिकित्सा,सचित्र ब्रह्मयोग विद्याशिक्षण,लोकमान्यांचा स्वर्गीय संदेश, विनोदलहरी, शांतिनिकेतनमाला, सुगंधी शिक्षक, वर्णजल चिकित्सा शिक्षक  इत्यादी.

याशिवाय त्यांनी अकरा कादंब-या लिहील्या आहेत.

असे हे चतुरस्त्र लेखक वयाच्या 74 व्या वर्षी 01/07/1947 रोजी निधन पावले.त्यांना जाऊन इतका काळ लोटला असला तरी त्यांच्या समृद्ध लेखनामुळे ते अमरच आहेत.त्यांच्या स्मृतीस वंदन!

☆☆☆☆☆

रामचंद्र चिंतामण ढेरे

रा.चिं.ढेरे हे मराठी इतिहास संशोधक व लेखक होते.प्राच्यविद्या संशोधनात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.सांस्कृतिक इतिहास या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे.त्यांचे अनेक संशोधकांनात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत व त्यांना सार्वत्रिक मान्यता मिळाली आहे.समकालीन कागदपत्रांचा संदर्भ पाहून इतिहास संशोधन करावे असे त्यांचे मत होते.त्यांचा स्वतःचा ग्रंथसंग्रह प्रचंड होता.त्यात संत साहित्य,लोकसाहित्य,

लोकसंस्कृती अशा विविध विषयांचा व मराठी वाड्मयाचा समावेश होता.हा सर्व संग्रह त्यांनी अभ्यासकांसाठी खुला केला आहे.

साहित्य संपदा :

अमृतकन्या, श्री आनंदयात्री, कथापंचक, कल्पद्रुमाचे तळी, कल्पवेल, गंगाजल, चित्रप्रभा, श्री तुळजाभवानी, त्रिविधा, नाथ संप्रदायाचा इतिहास, नामदेव-एक विजययात्रा, पुण्याई, प्राचीन मराठीच्या लोकधारा, लोकसंस्कृतीचे विश्व, विराग आणि अनुराग, इत्यादी.

माहितीपुस्तिका:

एका जनार्दनी–पैठण

श्रीगुरूंचे गंधर्वपूर–गाणगापुर

श्रीगुरूदेवदत–औदुंबर,नृ.वाडी

श्रीगोदे भवतापहरी-नासिक,त्र्यंबकेश्वर

जागृत जगन्नाथ–जगन्नाथपूरी

क्षिप्रेच्या सोनेरी आठवणी–उज्जैन  इ.क्षेत्रांच्या माहितीपुस्तिका.

पुरस्कार:

साहित्य अकादमी 1987 – श्री विठ्ठल एक महासमन्वय

म.सा.प.चा गं.ना.जोगळेकर 2013

पुण्यभूषण-त्रिदल फाउंडेशन.2010

महर्षि वाल्मिकी पुरस्कार–पुणे म.न.पालिका 2013

अ.भा.यादव महासंघाचा विशेष पुरस्कार2015

साहित्य सेवा सन्मान,पुणे2016

अशा या संशोधक साहित्यिकाचे वयाच्या 86 व्या वर्षी 01/07/2016 ला निधन झाले.

त्यांच्या कार्यकर्तृत्वास विनम्र अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया, बाइटस् ऑफ इंडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares