सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “स्वीकार बदलांचा…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
☆
हवीहवीशी वाटणारी गोष्ट
कधीतरी नकोशी होऊन जाते
वेळेसोबत सारं काही बदलते
इतकं सगळं कळूनही
वेडे मन हे कुठेही का गुंतते…. ??
सुखानंतर दुःख
दुखानंतर सुख ही येतेच
तरीही वेडे हे मन
सुखात का अडकते आणि
दुःखात का तडफडते…. ?
अपयशानंतर यश
कुठेतरी मिळतेच
अपयशही खूप काही
शिकवून जाते तरीही
अपयशात मन का डगमगते.. ??
घडायचे ते घडून जाते
घडायचे ते घडणारही आहे
आपण फक्त निमित्त असतो
सुख समाधानासाठी धडपडत रहातो
आनंदासाठी प्रयत्न करत असतो…
वाईट त्यात काहीच नाही
चूक त्यात कोणाची नाही
सुखाची व्याख्या वेगळी प्रत्येकाची
जगताना आशा असतेच गरजेची
चढ उतरांशिवाय किंमत कळत नाही जीवनाची….
म्हणूनच जे होतंय ते होऊ द्यावं
मनापासून स्वीकारून ते पहावं
वास्तवात जगावं स्वप्नात रमावं
आयुष्य एकदाच मिळतं
उगाच निसटू त्याला न द्यावं….
हवं ते सारं काही करून पहावं
कधी लढून कधी रडून ही घ्यावं
आयुष्य असतं खूप छोटं पण
अनुभवाचं विश्व भलंमोठं
येईल त्या परिस्थितीत जगावंच लागतं…
☆
💞शब्दकळी विजया 💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈