☆
ग्रीष्मामधल्या झळा उन्हाच्या
भाजून काढती वसुंधरेला
*
झाडे सारी मुकीच झाली
पशुपक्षीही मनी उसासली
*
लाही लाही साऱ्यांची झाली
गारव्याला शोधू लागली
*
कुठेच मिळेना थंडावा जराही
दिवसरात्र उरी धपापती
*
आकाशाकडे डोळे लागले
निरभ्रता पाहून मनी कष्टले
*
एक दिवस मात्र अनोखा आला
सोसाट्याचा वारा सुटला
*
आकाशी काळे मेघ दाटले
प्राणीमात्रही मोहरुन गेले
*
अन् अचानक पाऊस आला
धरणीला उरी भेटायाला
*
काय वर्णावी ती भेट आगळी
मातीचा गंध दरवळून गेली
*
धरती-नभाचे मिलन झाले
आसमंती ओला गंध पसरे
*
मिलनाचा हा सुंदर सोहळा
वीजेने कडकडून ताल धरला
*
अनोख्या भेटीचे या कौतुक झाले
सारेच तयाने रोमांचित झाले
☆
© सुश्री त्रिशला शहा