सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ नंदादीप … ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
अंधाराचा नाश करून
दिवा देतो प्रकाश
यासाठी तो पूजनीय,वंदनीय
अंधारात कसे चालावे?
धडपडणार नाही का आपण?
सरळ रस्ता सोडून
जाऊ की हो भलत्याच मार्गावर!…
दाटला अंधार माणसाच्या मनात
दिसत नाही त्याला
काय चांगले काय वाईट.
भरकटत जातो मग
आणि पडतो की हो खड्यात…
महाराष्ट्राची परंपरा मोठी
लावले त्यांनी ज्ञानदीप
माणसाला प्रकाश देण्यासाठी
पंत संत तंत
वाटा उजळविल्या त्यांनी
सुश्लोक वामनाचा
ओवी ज्ञानेशाची
अभंग तुकयाचा
आर्या मयूरपंताची
हीच पणती मिणमिणती,
हीच समई नि हाच लामणदिवा…
ज्ञानेशांचा ज्ञानदिवा
अखंड तेवत आहे
सामान्यांना परमात्म्याचे
ज्ञान वाटत आहे.
असीम त्यांचे शब्दभांडार
जीवनातील द्दृष्टांत देऊन
आत्मज्ञानाचा प्रकाश टाकत आहे
मनावरची मळभे दूर सारत आहे…
तुकाराम,नामदेव,जनाबाई
संत प्रत्येक जातीतले
संसाराच्या दरेक वस्तूत
दिसला त्यांना साक्षात परमेश्वर
वाट दाखविली भक्तीची
महिमा वर्णिला समर्पणाचा
अंधःकार दूर झाला
माणसाच्या मनातला…
संसार करता करता
ठेचकाळला माणूस अंधारात
विसरला त्याचा धर्म,त्याची कर्तव्ये
दासांनी दिला बोध प्रापंचिकाला
दिवटी धरून हातात सन्मार्ग दाखविला…
सुभाषितांनी केले ज्ञानाचे वाटप
शिकविला भल्या बुर्यातला फरक
कोणा वंदावे कोणा निंदावे
जाणिले सज्जन आणि दुर्जनांना
सतत तेवत आहे हा नंदादीप…
आभार ह्या दीपाचे कसे मानावे?
त्याने दाखविलेल्या वाटेने चालावे
हीच त्याची पूजा हीच कृतज्ञता…
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈