सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ अनुबंध सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
अनुराग तुझा नी माझा|
कि बंध हा रेशमाचा |
जो कधी न तुटायाचा|
विश्वास मनी मम साचा|१|
शत चांदण्या या वेचून|
तव केशकलापी माळून|
केतकीच्या गंधात भिजून|
गेलो तव नजरेत गुंतून|२|
मध भिजल्या चांदणराती|
जागल्या धुंद त्या किती!
तव मलमली तनूवरती|
नक्षत्रे सजली तरी किती!
|३|
श्वासात श्वास मिसळून|
स्वप्न नयनी हे रेखून |
किती रंगबावरे होऊन|
अनुबंध आले हे जुळून|४|
अचानक काय हे घडले|
मम मनाची झाली शकले |
संशय का मनी हे आले|
प्रीतीचे फूल कसे सुकले?
|५|
बंध असे तुटून जरी गेले|
आशेचे मनी या इमले|
ते सजवाया परी आपुले|
वळतील तुझी पाऊले |६|
मज भासतेस तू जवळी|
येशील अधिऱ्या वेळी|
प्रीतीचासागरउसळी
अनुरक्त गोजिरी कळी|७||
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈