मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || श्री गणेश || ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ || श्री गणेश ||  ☆ सौ. विद्या पराडकर ☆

वंदन श्रीयेशा,

वंदन श्रीयेशा,

बुद्धिदायक हे परमेशा,

यशकीर्तिच्या परेशा ||

 

कार्यारंभी आवाहन करतो,

मनोभावे पूजा करतो,

सुरवर सारे तुजला स्तविती,

दैत्यांनाही येई प्रचिती ||

 

रिद्धीसिद्धी चा आहेस कर्ता,

विघ्ननाशका विघ्नहर्ता,

सुखकारक तू दुःखहर्ता,

सगुणरुपी तू आनंद दाता ||

 

पृथ्वी प्रदक्षिणेची चुरस लागली,

कार्तिक, गणेश सज्ज जाहले,

प्रथम निघाले मयुरावरी कार्तिक,

श्रीगणेशाने मातेलाच प्रदक्षिणा घातली ||

 

प्रदक्षिणेने श्रीगणेशास जयश्रीने सजविले,

बुद्धिमत्तेचे द्योतक श्रीगणेश शोभले,

चौदा विद्यांचा खरे आहेस तू कर्ता,

चौसष्ट कलांचा आहेस दाता ||

 

इतिहासाने सांगितले,

गणेशजी मुषकावरून जात असता कोसळले

त्यामुळे चंद्र हासला शाप दिला गणेशाने

मुख चंद्राचे जो पाही, आळ चोरीचा येई ||

 

शंकराचे आत्मलिंग लंकेश्वर नेता,

अडविले श्रीहरीने गणेश हस्ता,

पश्चिम समुद्री स्थापिले आत्मलिंग हे असे

गोकर्ण महाबळेश्वर म्हणून नावाजले कसे ||

 

ये हासत नाचत गणेशा

दूर करी रे देश समस्या

एकजुटीचा मंत्र देई

देशभक्तीचे गीत गाई ||

 

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस असा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस असा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

पाऊस असा घनघोर ,

जिवाला घोर.

खचतील ,

संयमी भिंती .

पाऊस जरी घनघोर ,

होउन यार,

ठरवितो व्यर्थ ,

मनाची भीती.

पाऊस असा मायावी,

गारुड घालून अवघे,

व्यापतो पुरा,

मनस्वी .

पाऊस असा दयावंत ,

बरसून अमृतधारा.

संपन्न चिंब करुनी,

साक्षात उभा भगवंत.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बहिणाबाई चौधरी… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ बहिणाबाई चौधरी ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

बहिणाबाई चौधरी - विकिपीडिया

बहिणाबाई चौधरी

(११ ऑगस्ट, इ.स. १८८० – ३ डिसेंबर, इ.स. १९५१)

बहिणा तुझ्या नजरेने

टिपले अवघे सजीव

बांधून त्याना शब्दात

दिलेस अमरत्व !

ताकद पक्षी चंचूची

समजली तुला कशी गे

मानवाची दहा बोटे

वाटली तुला फिकी गे !

चुलीवरचा तवा देतो

जरी चटके हाताला

तोच तवा गरम भाकरी

खाऊ घालतो आम्हाला !

नित्य साध्या गोष्टीतून

दिलेस तू आम्हा ज्ञान

त्यामुळेच असून निरक्षर

ठरलीस खरी साक्षर !

गिरवावा तुझा धडा

पुस्तकाच्या शिक्षणाने

असे तुझे तत्वज्ञान

 मिरवावे अभिमाने !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चाफा बोलेना… ☆ कवी बी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ चाफा बोलेना… ☆ कवी बी ☆

चाफा बोलेना, चाफा चालेना

चाफा खंत करी काही केल्या फुलेना ।।

 

गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी

आम्ही गळ्यात गळे मिळवूनी रे॥

 

गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला मनी

नागासवे गळाले देहभान रे॥

 

चल ये रे, ये रे गड्या, नाचू उडू घालू फुगड्या, खेळू झिम्मा

झिम पोरी झिम पोरी झिम॥

 

हे विश्वाचे अंगण

आम्हा दिले आहे आंदण

उणे करू आपण दोघेजण ॥

 

जन विषयांचे किडे

यांची धाव बाह्याकडे

आपण करू शुद्ध रसपान ॥

 

चाफा फुली आला फुलून

तेजी दिश्या गेल्या आटुन

कोण मी-चाफा?कोठे दोघे जण?

 – कवी बी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #153 ☆ माझी किंमत… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 153 ?

☆ माझी किंमत…

वस्तुसारखी माझी किंमत ठरते कळले होते

वेश्या म्हणुनी या देहाला रोज डिवचले होते

 

रूप वसंता तुझे घेउनी आले होते वादळ

वेलीवरच्या फुलास त्याने सरळ फसवले होते

 

अंगावरती घाण टाकली ज्याने होती माझ्या

हात पाहिले त्याचे तेव्हा तेही मळले होते

 

नव्हती तेव्हा रंग पंचमी रंगाला तो आला

अंगावरती नको नको ते रंग उधळले होते

 

कोठडीत मी अन् सूर्याचे स्वप्न पाहिले रात्री

सभोवताली फक्त काजवे माझ्या जमले होते

 

नव्हे शृंखला ते तर पैंजण हाती नाही बेडी

फासावरती केवळ माझे स्वप्नच चढले होते

 

या देहाचा ठेका नाही कुणी घेतला येथे

काल भेटले त्यांना तर मी आज वगळले होते

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अशी मी सांज पाहिली ☆ सौ. विद्या वसंत पराडकर

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ अशी सांज मी पाहिली… ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

पश्चिम क्षितिजावर पदन्यास करणारी,

नववधूच्या सुंदर साजाने नटलेली,

काहीही बावरलेली, काहीशी शहारलेली,

प्रियतमाच्या भेटीस आतुरलेली,

अशी सांज मी पाहिली

 

गालावर अनुरागाचे गुलाब उधळणारी,

प्रियतमाच्या स्पर्शाकरता मोहरलेली,

नवथरीच्या भावविश्वात फुललेली,

प्रियकरायच्या बाहूपाशाकरिता उत्सुकलेली,

अशी सांज !

 

सौ विद्या वसंत पराडकर

वारजे पुणे.

ई मेल- [email protected]

मो.नंबर – 91-9225337330 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 95 ☆ माझी कविता… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 95  ? 

☆ माझी कविता… ☆

कविता माझी, खूप वेगळी

तिची रूपे, खूप आगळी…

 

मुक्तछंद छंदमुक्त,

छंदबद्ध चारोळी

आर्या,ओव्या,

अभंग त्या ओळी…

 

कधी होते,

कविता भावुक

कधी तिचा भाव,

मऊ साजूक…

 

प्रेमात ती,

कोमल बनते

रागात ती,

क्रोध आणते…

 

भावदर्शक,

कविता होते

हसत हसत,

रडायला लावते…

 

कविता मला,

जवळ घेते

माझ्यातील शब्द,

तीच बोलते…

 

तिची उपासना, सतत करणार

तिच्याच करता, श्वास घेणार…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बरसात… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ बरसात… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : हरिभगिनी) (मात्रा : ८+८+८+६)

क्षितिजकरांनी शिंपित जीवन गगन धरेवर झुकले रे

किती दिसांनी आभाळाला फुटला पाझर ऐसा रे !…

 

लोट धुळीचे आले उडवित घोंघावत वादळवारे

बघता बघता होय नभांगण काजळकाळे सारे रे !

वीजशलाका अजस्त्र कडकड लखलख अंबर उजळत रे !

 

गगनघोष तो कृष्णघनांचा दुमदुमतो दाहि दिशांना

पुण्यात्म्याच्या कंठामधली दिव्यभव्यचि जणु प्रार्थना

जीवनगाणे जयनादाचे चराचरातुन झंकृत रे !

 

मुकुट धुक्याचे लेवुन सजली उन्नत पर्वतशिखरे ती

दरीदरीतुन तुषार उडवित निर्झर सारे झुळझुळती

रुजला अंकुर नवसृजनाचा उरी धरेच्या गंधित रे !

 

तुडुंब ओहळ तुडुंब शेते तुडुंब भरली तळी तळी

भरुन दूथडी नद्या वाहती दिशान्त बुडले सर्व जळी

येत दर्पणी जलाशयाच्या इंद्रधनू सतरंगी रे !

 

सुदुर हासती प्रसन्न हिरवी चिंब भिजूनी वने वने

प्राशुन अमृत धारांमधले हिरवी हिरवी रणे रणे

अभिषेकामधि मम प्राणांचे गोकुळ अवघे न्हाले रे !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओंजळ… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ.मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ ओंजळ… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

निरखून पाहताना

ओंजळ सुखाची

सय अव्यक्त

भावनांची

दाटून

आली

गें

 

गाठोड्यात बांधल्या

कित्येक जाणीवा

समजावीत

भोळ्या जीवा

संसार

श्रेष्ठ

गें

 

स्वप्नात जरी काही

साजिरे सोहळे

इच्छापूर्तीचे

ते डोहाळे

मधुर

होते

गें

 

मौनात असता मी

अर्थ उमगतो

प्रभू कृपेचा

प्रसाद तो

वाटून

घेऊ

गें

 

ओंजळ रिती व्हावी

सत्पात्री दानाचा

आनंदघन

वर्षावाचा

समय

आता

गें.

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सरता श्रावण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ सरता श्रावण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 आला सरता श्रावण ,

   मन माझे हुरहुरे !

वर्षेची ती रिमझिम,

   अंगणात झुर झुरे !

 

 जाई पावसाची सर ,

   भिजवी सृष्टीचा शेला!

 दिसे  नभी अंगावर ,

   इंद्रधनुष्याची  माला !

 

 हिरवीगार ही सृष्टी ,

   लोभवते क्षणोक्षणी!

 किमया ही निसर्गाची,

    भूल घाली मनोमनी !

 

अरे, श्रावणा,श्रावणा,

  तुझे अप्रूपच मोठे !

कृष्णजन्माची ती वेळा,

   नेते आनंदाच्या वाटे!

 

 सृष्टी गीत गाता गाता,

   जाई श्रावण पाऊल !

 स्वागताला आतुरलो ,

   लागता गणेश चाहूल !

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares