मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 146 ☆ माझ्या मनाचे आभाळ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 146 ?

माझ्या मनाचे आभाळ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

माझ्या मनाचे आभाळ,

नेहमीच भरून यायचे आणि…

बरसत रहायचे धुवाँधार …..

उगीचच!

शाळेत असताना…

इवलेसेच होते आकाश …

दप्तरातल्या वह्या पुस्तकात कमी आणि

कथा कादंबरीत जास्त रमायचे !

गुंतायचे रेडिओवरच्या गाण्यात…

हिंदी सिनेमातही ….!

 

माझ्या मनाचे आभाळ,

माझ्यासारखेच वेंधळे…

ओढाळ आणि एकाकी

गुलशन नंदाच्या उपन्यासात…

शोधत असायचे चंद्र सूर्य तारे !

 

खिळून रहायचे राजेंद्र यादवांच्या

“सारा आकाश”च्या पानापानावर,

मनाच्या आभाळाला,

आपोआप मिळायचे,

कुठले कुठले रंग….

इंद्रधनुष्यही यायचे हातात !

चंद्र सूर्य तारेही

आपल्याच मालकीचे वाटायचे !

चांदण्या मस्त

रुणझुणत रहायच्या,

वारे ही वहायचे मर्जीनुसार

 

पण खूप एकटे होते माझे ते

मूठभर आकाश!

विस्तारण्याची स्वप्नेही

नव्हते पहात !

महत्त्वाकांक्षेच्या वारूवर

नाही झाले स्वार कधी ,

माझ्या मनाचे आभाळ

 नेहमीच

जमीनीवर राहिले!

 

काळे पांढरे रंग सोसत,

निरभ्र होत गेले!

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ !! अमृतगाथा !!☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ !! अमृतगाथा !! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

(अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळा )

मंगल भूमी पवित्र भूमी अभिमाने वंदू

शौर्य स्फूर्तिची अमृतगाथा उच्चरवे गाऊ ||

 

थोर वारसा असे लाभला क्रांतिकारकांचा

अभिमानाने ऊर भरतसे आठव वीरांचा

त्यांच्या शौर्या सलाम करुनी उतराई होऊ 

शौर्य स्फूर्तिची अमृतगाथा उच्चरवे गाऊ ||

 

स्मरण ठेवुनी बलिदानाचे देशहितास जपू

भारतभूची कीर्ति पताका उंच उंच नेऊ 

पांग फेडणे मातृभुमीचे खूणगाठ बांधू

शौर्य स्फूर्तिची अमृतगाथा उच्चरवे गाऊ ||

 

ध्येय घेऊनि प्रगतीसाठी धाव घेत राहू

जगा जिंकता मानवतेचे भान नित्य ठेवू

यश कीर्तीचे  निशाण अविरत फडकत ते ठेवू

शौर्य स्फूर्तिची अमृतगाथा उच्चरवे गाऊ ||

 

कला संस्कृती परंपरांची मनी जाण ठेवू

मातृभुमीच्या उध्दरणाचे वाण ओटी घेऊ

पवित्र उज्वल नावलौकिका अखंडीत राखू

शौर्य स्फूर्तिची अमृतगाता उच्चरवे गाऊ||

 

मंगल भूमी पवित्र भूमी अभिमाने वंदू

शौर्य स्फूर्तिची अमृतगाथा उच्चरवे गाऊ ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दोन दिवस…☆ नारायण सुर्वे ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ दोन दिवस…☆ नारायण सुर्वे ☆ 

दोन दिवस…

दोन दिवस वाट पाहण्यात गेले

दोन दुःखात गेले

हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

 

शेकडो वेळा चंद्र आला,तारे फुलले,रात्र धुंद झाली

भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली.

 

हे हात माझे सर्वस्व,

दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले,

कधी कलम झालेले पाहिले.

 

हरघडी अश्रू वाहवले नाहीत ,पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूंचं मित्र होऊन सहाय्यास धावून आले.

 

दुनियेचा विचार हरघडी केला असा जगमय झालो

दुःख पेलावे कसे,पुन्हा जगावे कसे,याच शाळेत शिकलो.

 

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले,दोन दुःखात गेले.

          

 – नारायण सुर्वे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #151 ☆ जादूचा पेला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 151 ?

☆ जादूचा पेला…

दारीद्र्याला चटके देतच एक दागिना केला

आणि फाटक्या आयुष्याचा उसवत गेलो शेला

 

जाता येता फुंकर मारी तो सुमनांच्या गाली

वात आणला या वाऱ्याने चावट आहे मेला

 

शिशिर नाहीच कधी पाहिला नित्य घाततो पाणी

बारा महिने वसंत आहे कसा घरी नटलेला

 

रोज रात्रिला प्राशन करतो तरी पुन्हा भरलेला

आंदणात मज होय मिळाला हा जादूचा पेला

 

नीती नाती विसरुन जातो सत्तेसाठी सारी

क्षणात टोपी नवी घालतो स्वार्थासाठी चेला

 

मुखडा ठेवुन बाजूला ती समोर आली होती

खरा चेहरा समोर येता तडा जाय काचेला

 

आभाळाला हात टेकले शस्त्रे केली गोळा

बसू लागले धक्के आहे आता मानवतेला

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तिरंगा ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

 🇮🇳 तिरंगा 🇮🇳  सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆

तीन रंगात फडकत राहील,

 माझ्या देशाचा सन्मान !

आकाशातून विहरत  जाई,

 भारताचा अभिमान !

 

केशरी, पांढरा,अन् हिरवा,  

रंगध्वजाचे येत क्रमाने.!

वैराग्याला प्रथम स्थान

ते.. ..   दिले असे देशाने!

 

पावित्र्य जयाचे दावून सर्वा, 

 शुभ्र पांढरा मध्ये असे!

हिरव्या रंगाने ती अपुली,

सस्यशामल भूमी दिसे. !

 

विजयचक्र हे मधोमध दावी

‘विजयी भव’ चे रूप सर्वा!

चक्रा वरच्या आऱ्या दावती,

देशभक्तांच्या शौर्या!

 

उंच लहरता तिरंगा अपुला,

स्वातंत्र्याची ग्वाही देतसे!

दरवर्षी नव जोशाने हा,

स्वातंत्र्यनभी फडकतसे!

 

गर्वाने आम्ही पुजितो,

जो देशाचा मानबिंदू खरा!

त्याच्या छत्राखाली  भोगतो,

 स्वातंत्र्याचा रंग हा न्यारा!

 

स्वातंत्र्यदिन, असो वा प्रजासत्ताक दिन असो!

आमचा तिरंगा, फडकत राहील !

तिरंग्याच्या रक्षणासाठी

प्रत्येक बांधव,सज्ज राहील!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 93 ☆ स्वप्ने गोड असतात… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 93  ? 

☆ स्वप्ने गोड असतात ☆

(विषय:- जगू पुन्हा बालपण… (अष्ट-अक्षरी))

जगू पुन्हा बालपण,

होऊ लहान लहान

मौज मस्ती करतांना,

करू अ,आ,इ मनन.!!

 

जगू पुन्हा बालपण,

आई सोबती असेल

माया तिची अनमोल,

सर कशात नसेल..!!

 

जगू पुन्हा बालपण,

मनास उधाण येईल

रात्री तारे मोजतांना,

भान हरपून जाईल..!!

 

जगू पुन्हा बालपण,

शाळा भरेल एकदा

छडी गुरुजी मारता,

रड येईल खूपदा..!!

 

जगू पुन्हा बालपण,

कैरी आंब्याची पाडूया

बोरे आंबट आंबट,

चिंचा लीलया तोडूया..!!

 

जगू पुन्हा बालपण,

नौका कागदाची बरी

सोडू पाण्यात सहज,

अंगी येई तरतरी..!!

 

जगू पुन्हा बालपण,

नसे कुणाचे बंधन

कधी अनवाणी पाय,

देव करेल रक्षण..!!

 

जगू पुन्हा बालपण,

माय पदर धरेल

ऊन लागणार नाही,

छत्र प्रेमाचे असेल..!!

 

जगू पुन्हा बालपण,

कवी राज उक्त झाला

नाही होणार हे सर्व,

भाव फक्त व्यक्त केला..!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तिरंगा आमुचा प्राण… ☆ सौ. विद्या पराडकर

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ तिरंगा आमुचा प्राण… 🇮🇳  ☆ सौ. विद्या पराडकर ☆

(भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो 💐 स्वातंत्र्याच्या निर्मात्यांना लाख प्रणाम)

दिडशे वर्षांच्या पारतंत्र्याची

जाऊनी रजनी गुलामीची

पुजन करू या प्राचीचे

स्वातंत्र्याच्या उष:कालाचे

 

उंच अंबरी, फडकत राही

तिरंगा आमुचा प्राण

या प्राणाला जपून ठेवू

स्वातंत्र्याची शान

 

तीन रंगाचा सुरेख संगम

अशोकचक्र शोभे अनुपम

सांगे उज्वल इतिहास भारताचा

भाग्यशाली भारत मातेचा

 

मूल्यवान हा तेजस्वी

मूल्य अमोल असे

देशभक्तांच्या असीम भक्तीचे

तेजस्वी द्योतक कसे

 

हे भारत मातेच्या शिरोमणी

स्वातंत्र्याचा कंठ मणी

राहो चिरंतन ही

आस असे मनोमनी

 

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घर कसं असावं? ☆ रमण रणदिवे ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ घर कसं असावं? ☆ रमण रणदिवे ☆

केवळ अपुल्या स्वार्थासाठी

कलह नसावा घरामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे

 

येणार्‍याला पाणी द्यावे

स्वागतातही गोडि हवी

जाणार्‍याच्या मनांत फिरुनी

येण्यासाठी ओढ हवी

ऐसा प्रेमळ माणुसकीचा

झरा वहावा घरामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे

 

भांड्याला लागतेच भांडे

विसरुन जावे क्षणामधे

परस्परांना समजुन घ्यावे

अढी नसावी मनांमधे

रुसवे फुगवे नको फुकाचे

मोद रहावा घरामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे

 

नित्य काळजी घरात घ्यावी

वय झालेल्या पानांची

ज्याची त्याला द्यावी जागा

वयाप्रमाणे मानाची

एकमताने निर्णय घ्यावे

नको दुरावा मनामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ परसदारची सकाळ ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? परसदारची सकाळ ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ 

अशी सकाळ गावाकडची

आहे का कधी पाहिली ?

याच जागी सकाळपासून 

राबत असे घरची माऊली !

पडे हिरव्या पाना वेली मधुनी

सडा सूर्य किरणांचा सोनेरी,

मातीच्या धगधगत्या चुलीवर

रटरटते गुरगुट्याची न्याहरी !

छायाचित्र  – प्रकाश चितळे, ठाणे.

© प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गौरवकाव्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ गौरवकाव्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆

हे गीत जीवनाचे

देशभक्ती ऋणांचे

हा जन्म भूमीतला

नाते सद्गुणांचे.

 

शहिद जीव होतो

बहाल देशासाठी

स्वातंत्र्य मानवी

मानवता ललाटी.

 

गगनात लहरे

तिरंगा अभिमानी

समुद्र-पर्वत हे

गातील राष्ट्रगाणी.

 

समता विश्वतारा

जणू सूर्य प्रभात

ख्याती ती संस्काराची

गीता-रामायणात.

 

भारतमाता वदे

अमर पुत्र वाणी

युध्द भेदूनी सत्य

गौरव सन्मानांनी.

 

शब्दमालांचा हार

चरणी या अर्पण

संस्कृती युगेयुगे

लोकशाही दर्पण.

 

शपथ या पिढीला

ईतिहास महान

वीरांची त्या आहुती

ज्ञानसमृध्दी प्राण.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares