मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बालपणाची नाव कागदी… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ बालपणाची नाव कागदी… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

पाऊसधारा ओलावत येती

विस्मरणातील  पायवाट ती 

डोळ्यांपुढती अलगद येती

बालपणाची नाव कागदी

नाव कागदी घडीघडीची

त्यात दडली स्वप्न मनीची

निरागसतेने ती नटलेली

बालपणीची नाव कागदी

घडी घडीतुन स्वप्ने फुलती

आनंदाला नाही गणती

प्रत्येकाच्या मनात वसती

बालपणीची नाव कागदी

मोठे होता विरुन जाती

दूर दूर ती वाहून नेती

भिजून पाण्यामध्ये बुडती

बालपणीची नाव कागदी

पाऊस पडता ओढ लागती

बालपणीची स्वप्ने पडती

पुन्हा नव्याने येते हाती

बालपणीची नाव कागदी

चित्र साभार: सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्य सुटत चाललय… ☆ सौ .कल्पना कुंभार ☆

सौ .कल्पना कुंभार

? कवितेचा उत्सव ?

☆ आयुष्य सुटत चाललय… ☆ सौ .कल्पना कुंभार ☆

आयुष्य हातातून सुटत चाललय

काहीतरी निसटतय

पण काय ??

तेच समजत नाही..

 

दुरावत चाललेत नाती

अन् पुसट  होतायेत

संस्काराच्या रीतिभाती..

 

टू बी एच के च्या जंगलात

अंगण हरवत चाललय

आजीआजोबा कधीच गेलेत वृद्धाश्रमात

आता मूल ही अकॅडमी ला जुंपलय..

 

आईपण हरवलय किटी पार्टीत

अन् बाबा अडकलेत ऑफिसमध्ये

आईबाबा असूनही पोरक पोर मात्र

शोधतोय जिव्हाळा मोबाईल मध्ये..

 

आयुष्य हातातून सुटत चाललय

खूप काही निसटत चाललय..

 

सांजवेळी  दिव्यापुढची

शुभं करोति विरून गेलीय

दिवाळीच्या अभ्यगस्नानाची

वेळ आता टळून गेलीय..

 

लाखो रुपयांच्या घरात आता

प्राण्यांसाठी स्पेशल रूम आहे

शो पीस ची सुंदर थीम आहे

घरातले असतात दिवसभर बाहेर

घरसुध्दा  आता बैचेन आहे..

 

आयुष्य हातातून सुटत चाललय

काहीतरी निसटत चाललय..

फसव्या फ्रेंडशिप साठी

खरं मैत्र दुरावत चाललय ..

 

हसणे हरवण्याआधी

माणसे दुरावण्याआधी

श्वास थांबण्या आधी

बघा पकडता आली तर

आपूलकीची नाती..

अश्रू पुसण्यासाठी

तुमच्याजवळ असणारे हात..

 

वेळ निघून गेल्यावर

आलाप करण्याला

 काय अर्थ??..

💞 मनकल्प 💞

© सौ .कल्पना कुंभार

इचलकरंजी

मोबाईल : 9822038378

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 144 ☆ श्रावण- अष्टाक्षरी चारोळ्या भाग -१ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 144 ?

☆ श्रावण- अष्टाक्षरी चारोळ्या भाग -१ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आई वाही शिवामूठ

आई बिल्वपत्र वाही

 गुंफूनिया गुलबक्षी

वेणी पार्वतीला देई

“बुधं त्वं बुद्धीजनको”

मंत्र जपू श्रावणात

बुद्धी दागिनाच मोठा

इथे तिथे त्रैलोक्यात

श्रावणात प्राजक्ताचा

सडा अंगणात पडे

शुभ्र केशरी रंगाचे

खूळ जीवाला गं जडे

माझ्या मनीचा श्रावण

आता दिसतच नाही

आईआजीच्या काळात

मन रेंगाळत राही

आला हिरवा श्रावण

वसुंधरा सुखावली

रिमझिम पावसात

तरंगिणी खळाळली

   बाळकृष्ण तो जन्माला

श्रावणात अष्टमीला

कृष्णपक्ष,काळी रात्र

सौदामिनी सोबतीला

माझ्या श्रावणसरींनो

येऊ नका रपारपा

हलकेच बरसून

माझ्या जाईजुई जपा

दहीहंडी फोडू आता

करू कृष्णाचा जागर

देवा यशोदेच्या कान्हा

भरो माझीही घागर

माझा श्रावण महिना

मला शाळेमधे नेतो

मेंदी भरल्या हातांनी

नवा धडा शिकवतो

आता श्रावणाचे गीत

कसे गाऊ सये बाई

माझ्या हातामध्ये आता

तुझा मऊ हात नाही

तनामनात श्रावण

असा भिनलेला आहे,

तुझ्या नसण्याचे दुःख

सखे सलतच राहे

      पुन्हा श्रावणात भेटू

असं आहे ठरलेलं

इंद्रधनुच्या रंगात

मन चिंब भिजलेलं

तुझा श्रावण असावा

हिर्वाकंच मोरपंखी

आणि अर्थ जगण्याचे

सोनसळी राजवर्खी

रिमझमतो पाऊस

क्षणी हळदुले उन्ह

लपंडावाच्या खेळात 

किती हर्षले हे मन

आता उद्याचा श्रावण

तुझ्या ओटीत घालते

सखे, सूनबाई माझ्या

जुना वसा तुला देते

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रुसले ऋतू ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ रुसले ऋतू… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

उठ मानवा उठ तुझ्यावर रुसून बसला ऋतू

पहा आठवून अशी कोणती केलीस आगळीक तू

 

कळ्या फुलांची मधुर फळांची केली तुजवर वर्षा

दंडित मंडित केलीस सृष्टी काय तुझी ही तृषा

 

इर्षा होती तुझ्या मनासी

सृष्टीला या करू गुलाम

गगनाला ही लगाम घालू

करतील तारे तुला सलाम

 

का नियतीला दावितोस तू विज्ञानाचा ताठा

तव गर्वाने विराण झाल्या हिरव्या पाऊल वाटा

 

गर्जतील ना मेघ नभातून

नृत्य ना करतील मोर वनातून

शेतमळे ना पिकतील आता

उतरलास तू सृष्टीच्या मनातून

 

झटपट श्रीमंती सुखसोयी म्हणजे नोहे खरा विकास

हव्यासाच्या पाईच तुझिया वसुंधरा जाहली भकास

 

जे देवाने दिले भरभरून त्याचा नीट करी सांभाळ

विनम्र हो तू नियती पुढती सौख्याचा होईल सुकाळ

 

सगळे काही मानवनिर्मित

दे सोडून ही दर्पोक्ती

या गगनातून आनंदाचे मेघ बरसतील तुज वरती

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #149 ☆ शापीत मी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 149 ?

☆ शापीत मी…

तुझी मी घेउनी स्वप्ने उशाशी झोपतो आहे

मिटाव्या पापण्या म्हणुनी किती कुरवाळतो आहे

 

पहा तो चंद्रही गेला कधीचा झोपण्यासाठी

असा शापीत मी येथे कशाला जागतो आहे

 

तिने हृदयावरी माझ्या असे गारूड केलेले

इथे तर श्वासही माझा तिच्यावर भाळतो आहे

 

स्वतःचे नित्य जगणेही तिच्या केले हवाली अन्

स्वतःच्या भोवती आता स्वतःला शोधतो आहे

 

गराडा घातला आहे मला ह्या प्रेमवेड्यांनी

नका नादास लागू रे म्हणूनी सांगतो आहे

 

विषाची घेतली आहे परीक्षा आज स्वेच्छेने

विषासाठीच देहाला अता मी सोडतो आहे

 

शरीराने जरी नसलो तरी आत्मा इथे आहे

तुला सोडून जाण्याला मला तो रोखतो आहे

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साद… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ साद… ☆ श्रीशैल चौगुले ☆

मला विठ्ठलाने

साद घातली ही

शब्दा-शब्दातून

भक्ती मातली ही.

 

अभंगाचे शब्द

माझे काव्यरंग

मन-भाव-चित्त

होई पांडुरंग.

 

दाटते आभाळ

आषाढाचे काळे

वाटतो विठ्ठल

पावसात खेळे.

 

आता धार-धार

काव्य शब्द भार

चरणी अर्पावे

अज्ञानाची हार.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 91 ☆ अभंग… सणांची पर्वणी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 91 ? 

☆ अभंग… सणांची पर्वणी… ☆

श्रावण महिना, सुंदर महिना

सात्विक भावना, प्रगटती…!

 

आभाळ गर्जना, पाऊस पडतो

सूर्य ही दिसतो, मध्ये मध्ये…!

 

हिरवळ छान, सर्वत्र दाटली

दरी अंथरली, जैसी काही…!

 

धार्मिक सणांची, असे मंदियाळी

मधुर भूपाळी, मंदिरात…!

 

कवी राज म्हणे, निसर्गाचे लेणे

पाहत राहणे, मुक्तपणे…!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खवय्यांचे श्रावण गीत ! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ खवय्यांचे श्रावण गीत ! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆

श्रावण येता रोज आम्हाला,

पक्वानाचे ताट दिसे !

नागपंचमीच्या लाह्या, तंबिट,

स्वादिष्ट कडबू मनी वसे!

 

श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवी,

दहीकाल्याचा स्वाद असे !

रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा,

नारळी भाताची मूद सजे!

 

श्रावण सोमवार उपास सोडता,

मिळत असे नवनवीन गोडवा!

संपत शुक्रवार ही येता,

पुरणपोळीचा घास हवा!

 

श्रावणातली व्रतवैकल्ये,

अन् पूजा सत्यनारायणाची!

भरपेट जेवूनी, प्रसाद खाऊनी,

तृप्ती करीतसे तनामनाची!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पुनर्जन्म तू घेशील का ? ☆ सुश्री सुमन किराणे ☆

सुश्री सुमन किराणे

? कवितेचा उत्सव ?

☆ पुनर्जन्म तू घेशील का?… ☆ सुश्री सुमन किराणे ☆

व्यथा मनीची मांडत आहे

शब्द तयाचे होशील कां?

भाऊराया असशी तिथनं

पुन्हा परतुन येशील कां?

          नारळी पुणव जवळ आली

          राखी बांधुन घेशील कां?

          परत एकदा रक्षणास मम

          सज्ज तू रे होशील कां?

कसे आवरू मन हे हळवे

समजावण्या येशील कां?

नाहीस तरी जाणीवेतून

तू मज धीर देशील कां?

          तू गेला अन् मी कोसळले

          जरा सावरुन घेशील कां?

          हृदय दाटले बांध फुटले

          डोळे माझे पुसशील कां?

बुडले मी रे दुःख सागरी

देवुन कर वर घेशील कां?

या भगिनीच्या हाकेला तू

प्रतिसाद कधी देशील कां?

          भास सदोदित होतो आहे

          पुन्हा दर्शन देशील कां?

          तव वेड्या या भगिनीसाठी

          पुनर्जन्म तू घेशील का?

© सुश्री सुमन किराणे

पत्ता – मु.पो. हेर्ले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर.

मोबा.9850092676

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्व र्ग ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? स्व र्ग ! ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ 

पात्र खळाळते सिंधचे

पहा वाहे दुथडी भरून,

नदीचा नजारा सोनमर्गी

ठेवी नजरेस खिळवून !

शुभ्र जलद उतरती खाली

आसुसलेले तिच्या भेटीला,

वाटे इथेच या धरणीवर

जणू स्वर्गच अवतारला !

छायाचित्र  – कस्तुरी सप्रे, ठाणा (सोनमर्ग)

© प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares