श्रीमती अनुराधा फाटक
कवितेचा उत्सव
☆ शोध … ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
सागराला भेटण्याच्या ओढीने
त्याच्या मनाचा तळ शोधत
त्यात आपलं मन गुंतवत
कित्येक वर्षाच्या तपश्चर्येने
नदी झेपावली
उंच कड्यावरून उड्या मारत
अंतरात काटेसराटे साठवत
विरहाचं अंतर कापत कापत
अखेर ती पोचली
सागर किनाऱ्याजवळ
सागरानं तिला आपल्यात घेतलं
आणि
तिचं नदीपण संपूनच गेलं
आता ती स्वतःला शोधते आहे
आपल्याच उगमाजवळ..!
© श्रीमती अनुराधा फाटक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈