कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 129 – विजय साहित्य
☆ पैलतीरी… ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
पैलतीरी विठू
कळे कर्मातून
वळे शब्दातून,
पदोपदी. . . !
पैलतीरी भक्ती
काळजाची छाया
जपतोय माया,
उराउरी. . . !
पैलतीरी भाव
नात्यांचे गणित
हातचे राखून,
सोडवितो. . . . !
पैलतीरी मोक्ष
संवादाचा नाद
टाळातोच वाद,
अनाठायी. . . !
पैलतीरी संत
अनुभवी धडा
चुकांचाच पाढा,
वाचू नये. . . . !
पैलतीरी वारी
पिढ्यांचे संचित
होई संस्कारित,
कृतीतून. . . . !
पैलतीरी मेळा
नाते भावनांचे
जाते वेदनांचे,
भारवाही .. . . . !
पैलतीरी छंद
यशोकिर्ती ध्यास
कर्तव्याची आस,
लागलेली. . . . !
पैलतीरी हरी
सदा सालंकृत
शब्द आलंकृत ,
काव्यामाजी . . . !
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈