सौ. अमृता देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “संदेश…” ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
(कीर्तनभूषण कृष्ण हरीभट्ट रेगे या गोमंतकीय आद्य पिढीचे कीर्तनकार. त्यांनी कीर्तनाबरोबर काव्याचा छंदही जोपासला होता. त्यांनी “ह्रदयनाथ, कविग्मुतभरण” अशा टोपण नावे काव्य केले आहे. त्यांची 1967 मध्ये लिहिलेली एक कविता खूप गाजली होती.)
राज्य तुझे पणजीत
होईल तरीच आमचे हित ll धृ
तुजसी विधानसभा लाभेल
मनिचि उद्दिष्ट की गाठशील
याच पावली मंत्रीही होशील
जननेता म्हणवीत ll
गोड वागणुक मिळता येथिल
सोन्याहुनमग पिवळे म्हणशिल
ख्रिश्चन हिंदु मुस्लिमादितिल
वीरश्री स्मुखीत ll
बहु गोव्याच्या वैशिष्ट्याचे
घेसि मंगल अनुभव साचे
भारत भाग्य विधात्या गुरुचे
मूलभूत वचनोक्त ll
हो स्वामी या भूदेशाचा
महाचालक उद्योगांचा
डंका शुभसंकल्प कीर्तिचा
गर्जो भावना ऐक्यात ll
कुलशीलवंत चरित आठवून
हो सर्वाशी समरस जीवन
क्षमा दया शांती ठेव राखुन
असे घ्यावे ह्रदवित्त ll
– हृदयनाथ
धृवपद मिळून बावीस ओळींच्या या कवितेतील प्रत्येक तिसरे अक्षर घेता एक संदेश मिळतो.
“तुळशीची पाने वाहून गोमंतभूमीचा आशीर्वाद घ्या” हा संदेश.
समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना खान निघाल्याची बातमी अशा प्रकारे काव्यरचना पाठवून कळवली होती.
(संदर्भ – लेखक श्री. गोविंद काळे यांच्या “नाचू कीर्तनाचे रंगी “ या गोमंतकीय कीर्तनकारांवरचे पुस्तकातील आहे)
प्रस्तुती – सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈