श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ धग ☆
आठवांचे जाळले मी प्रेत नाही
आसवांना झोप म्हणुनी येत नाही
मी उकिरड्यावर तिला फेकून आलो
राहिली धग आज त्या राखेत नाही
पान पिकले अन् तरीही देठ हिरवा
त्यागण्याचा देह अजुनी बेत नाही
मेंढरे शिस्तीत सारी चालली पण
तुजकडुन हे माणसा अभिप्रेत नाही
वादळाचे रूप घेतो तू म्हणूनी
बसत आता मी तुझ्या नावेत नाही
फूल काट्या सोबतीने हासणारे
आज दिसले का मला बागेत नाही ?
चेहऱ्याला वाचता येते मलाही
मी जरी गेलो कुठे शाळेत नाही
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈