सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ खंत… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
(अष्टाक्षरी)
(राधिकाताईंची वाळा कथा वाचल्यानंतर माझी काव्यमय प्रतिक्रिया. – धन्यवाद!)
उघडला दरवाजा
एके दिवशी मनाचा
एक कोपरा दिसला
होता भरला खंतीचा…..
नाही ऐकले बाबांचे
काळ सरला वेगाने
आयुष्याच्या संध्याकाळी
शिकू लागले मी गाणे…..
शिकायला वय नाही
जरी हे असेल खरे
पण काळ जातो पुढे
मग हाती काय उरे?…..
लहानपणापासून
केला असता रियाज
मीही असते गायिका
कोणी नामवंत आज…..
थोडे फार शिकले मी
मान्य आहे मला जरी
सागरात या सुरांच्या
गंटागळ्या खाते तरी…..
देवा एक मागते मी
पुनर्जन्म दे मजला
जन्मा येऊन नव्याने
नष्ट करीन खंतीला…..
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈