सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 126
☆ आभाळ भरून आलं होतं… ☆
सिंगापूर मधली रविवारची
सुंदर सकाळ….
आम्ही बाहेर जायच्या तयारीत,
आभाळ भरून आलं होत,
मनात आलं—
कसं पडायचं बाहेर?
सूनबाई म्हणाली,
इथे रोज पाऊस पडतो….
छत्र्या घेऊन बाहेर पडायचं!
खिडकीच्या काचेतून मस्त कोसळणारा पर्जन्यराजा पहात,
वाफाळणारा चहा घेत असतानाच,
विजाही कडाडू लागल्या!
चहा संपला आणि….
“झाले मोकळे आकाश” …..
मी गुणगुणले !
बस स्टॉपवर आल्यावर
नातू म्हणाला,
“आपण एकही छत्री घेतली नाहीए आज”
बस…ट्रेन..मधून पोहचलो…
सनटेक सिटी….मरीना बे …
च्या स्वप्ननगरीत !!
हा रविवार खूपच अविस्मरणीय…
एक-दोन चुकार थेंब पावसाचे…
अल्हाददायक!
सारंच वातावरण रमणीय!!!
टेस्टी फूड….कोल्ड कॉफी…
डोळ्याचं पारणं फेडणारी भव्यता!!
कुटुंबासमवेतची,
ही मस्त भटकंती !
नातवाला म्हटलं हा स्वर्गच आहे रे…
मानवनिर्मित,
तो हसला आणि म्हणाला,
“काश्मिर निसर्गनिर्मित स्वर्ग आहे तसं का ?”
उदंड फोटो काढले या स्वर्गीय सौदर्याचे….
आणि आठवलं,लहानपणी तंबूत पाहिलेल्या सिनेमातलं गाणं,
“जीवनमे एक बार आना सिंगापूर” ।
खरंच अनुभवला,
मस्त मस्त माहौल….
सुंदर संध्याकाळी—-
मन भरून आलं होतं,
सकाळच्या पावसासारखं !!!
© प्रभा सोनवणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈