सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ एक तीळ…. ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
एक एवढासा तीळ
तीळ तीळ तुटतो जेव्हा
जीव कोणाचा कोणासाठी तरी
तीळभर दु: खही घ्यावे तसेच
तीळभर सुखही द्यावे तसेच
गहूभर कोणी पुढे जातो
तीळभर मागे येतो
गहूभर यशासाठी जेव्हा
तीळभर दु:ख सोसत राहतो
दु:ख सोसत राहतो, सुखाच्या आशेने
एवढासा तीळ —
एक एवढासा तीळ–
साखरपाकात घोळतो
तळहातावर विसावतो
जिभेवर विरघळतो जेव्हा
गोड बोलावर तेव्हा
गोड पण टोचणारे काटे असतात
एक एवढासा तीळ —
गोड होतो तेव्हा
तीळ तोंडात भिजला नाही तरी चालेल
तिळा तिळा दार उघड म्हंटल्याने
मनाची दारे सताड उघडतात
तेव्हा तो तीळगूळ आपल्यासाठी असतो
आणि आपण सर्वांसाठी असतो.
©️ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈