मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 112 ☆ गज़ल ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 112 ?

☆ गज़ल ☆

मी कशासाठी लिहावे नेमका  अंदाज नाही

वाहवा नवखीच आहे तो तुझा आवाज नाही

 

बंड माझे कोंडले होते जरी मी अंतरी या

व्यक्त होण्या आज येथे कोणतीही लाज नाही

 

मी मला वाटेवरी या भेटले आहे नव्याने

पेटवा आता कितीही रान मी नाराज नाही

 

येत  आहे जाग  आता झोपले होते कधीची

सूर्य येथे कोणताही जाहला हमराज नाही

 

मैत्र त्यांचे दो घडीचे पाठ फिरली की कुटाळी 

बुडबुडे ते हो जरासे, सागराची गाज नाही 

 

मज न पर्वा लाभला नाही किनारा ओळखीचा

भीत होते काल मी, ते भय तुफानी  आज नाही

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झटकून टाक जीवा.. ☆ महाकवी ग.दि. माडगूळकर ☆

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

Best Bhojpuri Video Song - Residence w

जन्म – 1 ओक्टोबर 1919  मृत्यु – 14 डिसेंबर 1977 ☆

☆ कवितेचा उत्सव ☆ झटकून टाक जीवा.. ☆ महाकवी ग.दि. माडगूळकर ☆  

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा

फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा

 

होईल ताप काही मध्यान्हिच्या उन्हाचा

अविचार सोड असल्या कोल्हाळ कल्पनांचा

आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणांचा

 

पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे

आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे

हसुनी करी परि ते वर्षाव सौरभाचा

 

का कालचा उद्याला देसी उगा हवाला

द्यावाच वाटतो ना मग जीव दे जीवाला

अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा

 

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा…

 

गीतकार- महाकवी ग.दि. माडगूळकर

चित्र : साभार Gajanan Digambar Madgulkar – Wikipedia

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नभीचा चंद्रमा.. ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ नभीचा चंद्रमा… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

नभीचा चंद्रमा मज आता भुलवत नाही

चांदणेही मनात आज हसत नाही

 

फुललेला मोगरा आता ताजा भासत नाही

बकुळीच्या सुकण्याचाही अर्थ लागत नाही

 

 वारा आज मनात कुजबुजतो काही

संदर्भ देतो जुन्या आठवणींचे काही

 

दाट धुके अंधाराचे शुक्र त्यास वाट देत नाही

सर ओली पावसाची आता मला भिजवत नाही

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 116 ☆ मकरंद ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 116 ?

☆ गोष्ट आहे हीच खरी ☆

काळजाच्या पोळ्यामध्ये, मकरंद साठवला

रान पेटवले कुणी, होता धूर दाटलेला

 

मधमाशा ह्या चौफेर, पहा कशा उधळल्या

आग पाहुनी भोवती, होत्या खूप संतापल्या

मध घेऊन पारधी, होता फारार झालेला

फूलबाग माझी होती, तरी डंख मी सोसला

 

मध पोळ्यातला तुझ्या, कोणी कसा हा चाखतो

एक कप्पा हृदयाचा, दृश्य पाहून फाटतो

काळजाने पहा कसा, होता टाहो फोडलेला

सुख स्वप्नांचा चुराडा, आणि कणा मोडलेला

 

मला पाहून बागेत, होते गुलाब हसले

साखरेच्या बरणीत, पाकळ्यांना मी ठोसले

आले माधुर्य त्यांच्यात, जरी देह तापविला

नाही सडले कुजले, त्याचा गुलकंद झाला

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ षड् रिपु…..☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ षड् रिपु…..☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 षड्रिपुनी भरलेला माझा,

मोह घडा हा शिरावरी !

अडखळत पाऊल पडते,

कधी डचमळते  या उरी!

 

कधी वाटते ओतून द्यावे,

मोहाचे क्षणभंगुर पाणी!

कधी मनी ही भरून राहती,

मदमोहाची मोहक गाणी!

 

काम, क्रोध, भय,मत्सर सारे,

सतत मानवा मनी छळती!

मिळेल कधी का सुटका त्यातून,

प्रार्थीते ईश्वरा माझी  मती!

 

या फेऱ्यातून सुटका नाही,

प्रयत्न करावा परी साचा !

तव भक्ती विण हाती न काही,

सार्थकी लावू जन्म मानवाचा!

 

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 60 ☆ कुठे हरवली प्रीत… ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 60 ? 

☆ कुठे हरवली प्रीत… ☆

(दश-अक्षरी…)

कुठे हरवली प्रीत सांगा

तुटला कसा प्रेमाचा धागा…०१

 

स्नेह कसे आटले विटले

तिरस्काराचे बाण रुतले…०२

 

अशी कशी ही बात घडली

संयमाची घडी विस्कटली…०३

 

मधु बोलणे लोप पावले

जसे अंगीचे रक्त नासले…०४

 

तिटकारा हा एकमेकांचा

नायनाट ऋणानुबंधाचा…०५

 

अंधःकार भासतो सर्वदूर

लेकीचे तुटलेच माहेर…०६

 

भावास बहीण जड झाली

पैश्याची तिजोरी, का रुसली…०७

 

कोडे पडले मना-मनाला

गूढ उकलेना, ते देवाला…०८

 

माणूस मी कसा घडवला

होता छान, कसा बिघडला…०९

 

राज विषद, मन मोकळे

सु-संस्कार, सोनेचं पिवळे…१०

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देह आणि मन ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक 

? कवितेचा उत्सव ?

? देह आणि मन ! ? श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

देह आपला

     असतो कह्यात,

मन असते

     बरेच वाह्यात !

 

देह असला

     जरी धरेवरी,

मन नाठाळ

     मारी भरारी !

 

देह रंगात

     रंगवी स्वतःला,

मन शोधी

     आपला कुंचला !

 

देह धरी ताल

      गोड अभंगावर, 

मन मोहीत

      होई लावणीवर !

 

देह मन जयाचे

        झाले एकरूप,

लोकां दिसे तो

        संत स्वरूप !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एखादा सूर…. ☆ निरंजन उजगरे

? कवितेचा उत्सव ?

☆ एखादा सूर…. ☆ निरंजन उजगरे ☆ 

 

एखादा सूर जर भिडलाच काळजाला

तर निःसंकोचपणे वाहू द्यायचं असतं

पापण्यांना….

वाटा तर वेगळ्या होणारच

नाती तर पुसट होणारच

आठवणी तर सलणारच

आणि या सा-यांना

गुंफित जाणारा एखादा सूर

पापणीला साद घालणारच…..

हे भिडणारे सूर

ही छायागर्भ गाणी

अदृश्यातून जणू पाहतात कोणी…

 

तुमच्या आमच्या काटेरी आयुष्यावर

जमून आलेल्या या दवाच्या थेंबाना

आपण कधी नाकारायचं नसतं…

पापण्यांना निःसंकोच

वाहू द्यायचं असतं…

 

 – निरंजन उजगरे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ धागे…. ☆ श्री राजकुमार कवठेकर

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ धागे…. ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

लोक ते माझेच होते

काचते धागेच होते

 

उध्दटांच्या त्या ‘अरे’ ला

शब्दही ‘का..रे..’च होते

 

दाटले अश्रू सुखांनी

हाय! ते खारेच होते

 

झोपली गात्रे थकूनी

श्वास हे जागेच होते

 

प्रश्र्न ते सोपे; परंतू

उत्तरांनी पेच होते

 

सोबतचे ऐनवेळी

राहिले मागेच होते

 

हाक मी होती दिली अन्

पांगले सारेच होते

 

शांततेच्या अंतरंगी

वादळी वारेच होते

 

गर्द रात्री साथ द्याया

दूरचे तारेच होते

 

जे खरे होते यशश्री

नेहमी साधेच होते

 

रंक वा राजा असू दे

शेवटी प्यादेच होते

 

पाठ राखाया सुखाची

दुःख हे आलेच होते

 

जे दरिद्री ते; मनाचे

आपल्या राजेच होते

 

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नेटकरी….. ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ नेटकरी….. ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

नेटकरी –  ही एक नवीन जात सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. या नेटक-यांना समर्पित

(आदरणीय साने गुरूजींची माफी मागून ?)

आता करुनी डेटा आँन,

नको राहू दे कुठले भान

नेटक-यांनो मज्जेसाठी लाऊ पणाला प्राण

 

मिडीया चॅनेल उठतील

बातम्या सा-या पेरतील

‘मेटा-कुटीला’ सारे येऊन पेटवूया हे रान ?

 

कोण आम्हा अडवील

कोण आम्हा रडवील

अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण

 

नेटक-यांची फौज निघे

‘पुढे ढकलणे ‘ चोहीकडे

विनोदी टोमणे, मिम्स हीच आमची जान

 

पडून ना राहू आता

मारुया शाब्दिक लाथा

‘नेटकरीच’ कामकरी, भांडणावर ठाम

 

आता करुनी डेटा आँन,

नको राहू दे कुठले भान

नेटक-यांनो मज्जेसाठी लाऊ पणाला प्राण

 

( नेटकरी)  अमोल ?

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares