कवितेचा उत्सव
☆ कंटकांचा नियम येथे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त :व्योमगंगा)
(गालगागा गालगागा गालगागा गालगागा)
कंटकांचा नियम येथे, फूल हा अपवाद होता
या फुलाच्या क्षणिकतेला,अमृताचा गंध होता
मिसळलो मातीत तेव्हा, बहरलो अंकूरलोही
सांडले मालिन्य सारे, अंबराचा स्पर्श होता !
भंगलेल्या गोकुळीही बासरीचा घोष चाले
विद्ध वेळूच्या क्षतांचा,आर्त तो उद्गार होता !
छेडिल्या माझ्या विणेच्या,मंद तू हळुवार तारा
जन्मले संगीत नाही,मान्य माझा दोष होता !
मंत्र आणी मांत्रिकाचा, संपलेला खेळ सारा
स्वप्नरम्या मंत्रबाधा, दो घडीचा स्वर्ग होता !
मित्र सारे पांगलेले,शून्यता ही जीवघेणी
रंगलेल्या मैफिलीला,भंगण्याचा शाप होता !
चिंब भिजतो मीच माझा,उत्सवी या रक्तरंगी
फक्त गर्दी, कोण दर्दी?पोरका आकांत होता !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈