सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ माघाची थंडी ..☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
☆
माघामधली थंडी केवढी सोसना बाई
बळीराजाचं सोनं घेतलं बनवली रजई
*
शेतकर्याचं जिणं किरपा हो अस्मानी
मालाला त्याच्या भाव दया सुलतानी
पैका नसता त्याला माल इकायची घाई
बळीराजाचं सोनं घेतलं बनवली रजई
*
कष्टानं फुलवितो बाई माजा भावं शेती
पांढरं सोनं पिकवितो काळी काळी माती
पान्याचा धिंगाना उरलं सुरलं हाटात नेई
बळीराजाचं सोनं घेतलं बनवली रजई
*
धनी माझं घरी आलं शेकोटीला बसलं
भाकर अन चटणी खाऊन मन तृप्त जालं
निजायला मी मग हंथरली हो चटई
बळीराजाचं सोनं घेतलं बनवली रजई
*
माघामधली थंडी केवढी सोसना बाई
बळीराजाचं सोनं घेतलं बनवली रजई
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈