मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मिलन ☆ सौ. मुग्धा कानिटकर

☆ कवितेचा उत्सव ☆ मिलन ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆ 

 

सरितेसी भेटावे अधीर निर्झराने

सागरी खळाळणे तिचे आतुरतेने

पवित्र संगम  असे  अवनीवरचे

या सम मिलन का न घडे आपुले?

 

पानोपानी सळसळे लहरींचे गाणे

लाटांमागून लाटांचे किनारी फेसाळणे

भेट ती आपुलकीने एकटेपण न उरले

या सम मिलन का न घडे आपुले?

 

सुंदर गोफ इंद्रधनुचे लेणे नभीचे

मोहक पूनवेचे जळी शोभे बिंब शशीचे

मिलन निसर्गाचे व्यर्थच  का ठरले

या सम मिलन  न घडे  जर आपुले?

 

© सौ. मुग्धा कानिटकर

सांगली

फोन 9403726078

23/10/2020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – माझं माहेर गोंदावली ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ केल्याने होत आहे रे ☆

??? माझं माहेर गोंदावली ???

!! श्रीराम!!

चला माहेरा जाऊया

आला आईचा सांगावा

कंदी पेढे घेऊनिया

चला माहेरा जाऊया !!धृ.!!

 

काय वर्णावं माहेर

गोंदवलीच्या कुशीत

भेटायाला जातं मन

माझं सारखं खुशीत

मंदिरात आहे उभी

चैतन्याची ग ती छाया

होई आनंद मनाला

चला माहेरा जाऊया!!१!!

 

चला माहेरा जाऊया

महाप्रसाद घेऊया

तीर्थप्रसादाने येते

शुद्धी अंत:करणाला !

शिरु कुशीत आईच्या

तिला गुपित सांगूया

माता चैतन्य भेटली

खूप आनंदी होऊया!!२!!

 

महाप्रसाद इथला ,

जणू काला पंढरीचा !

भक्तीभावाने खाताना ,

लाभे प्रसाद रामाचा !!

इथं आल्यावर पडे,

घरादाराचा विसर !

झूल्यावर बसूनिया ,

झोके सुंदर घेऊया !!३!!

 

चला माहेरा जाऊया

श्रींची आरती ऐकूया

सामुदायिक जपाला

सहभागी होऊनिया!!

नाम सहस्त्र विष्णूंचे

घेती भक्त येऊनिया

रामनामी रंगूनिया

चला माहेरा जाऊया !!४!!

रामनामी रंगूनिया

चला माहेरा जाऊया !!

 

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वेदना ☆ श्री शरद दिवेकर

 ☆  कवितेचा उत्सव ☆ वेदना ☆ श्री शरद दिवेकर☆ 

 

नेहमीच तुझं वागणं गूढ असायचं,

तुला कुणालाच काहीच सांगायचं नसायचं.

 

तू स्वतःला बदल असं सांगून,

काळही गेला बराच पुढे निघून.

 

आज एवढी वर्षे होऊन गेली,

तुझी झुरत रहाण्याची सवय नाहीच गेली.

 

तुला आज बोलतं करायला गेलो

आणि तुझे पुर्वीचेच रूप पाहून स्तंभितच झालो.

 

तुझे एकच  सांगणे होते,

वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.

 

वाट बघतो आहे वेदना संपण्याची,

डोळ्यांना ओढ आहे महाकाव्य वाचण्याची.

 

©  श्री शरद दिवेकर

कल्याण

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सोनसळी झाले रान ☆ सौ. राधिका भांडारकर

 ☆  कवितेचा उत्सव ☆ सोनसळी झाले रान ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

(अष्टाक्षरी काव्य प्रकार)

फुले रान मदनाचे…

कस्तुरीचा गंध तुझा

कमरेचा बाक छान

हसताच गाली खळी

सोनसळी होते रान………

 

स्पर्श होता  मखमली

करवंदी जाळीतून

ओथंबले  दवबिंदु

सोनसळी झाली  धून…..

 

नुपुरांच्या  रूणझुणी

कमनीय   कटी कळी

नयनात येता धुंदी

रान झाले सोनसळी….

 

चंद्र किरणांचा सडा

चांदण्यांचे मुक्त गान

अधरात तुझ्या पीता

सोनसळी झाले रान………

 

तुझ्यातला श्वास माझा

केवड्याचा गंध माळी

मुक्त झाला एक लोंढा

रान झाले सोनसळी…….

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अन्न हे पूर्णब्रह्म ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

☆ विविधा ☆  ? अन्न हे पूर्णब्रह्म  ?☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार 

अन्नाद्भवन्ति भूतानि, पर्जन्यादन्नसम्भव: |

यज्ञाद्भवन्ति पर्जन्य: यज्ञ: कर्मसमुद्भव: ||

अर्थ- सर्व प्राणिमात्र अन्नापासून उत्पन्न होतात.पावसामुळे अन्ननिर्मिती होते, यज्ञामुळे पाऊस पडतो तर यज्ञ हे आपल्या विहित कर्मांचे फळ आहे.भगवद्गीतेमध्ये भगवंतांनीच अन्नाचे महत्त्व सांगून ठेवले आहे. आपल्या रोजच्या व्यवहारात मनावर जे वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार होत असतात, अनेक घटक त्यासाठी कारणीभूत ठरतात त्यातला मुख्य. घटक म्हणजे आपण खातो ते अन्न होय.

माणूस जशा प्रकारचे अन्न खातो ,ज्या परिस्थितीत खातो, ज्या मनस्थितीत खातो त्या त्याप्रमाणे त्याच्या मनाची जडणघडण होत जाते.म्हणून नेहमी प्रसन्न मनाने जेवावे. म्हणून आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे की पाट, रांगोळी, उदबत्ती वगैरे थाट करून पंगत बसविली जायची. हल्ली टेबल डेकोरेशन असते. ही वातावरणनिर्मिती मन प्रसन्न ठेवते.

जेवण नेहमी सात्त्विक, षड्रसयुक्त ,ज्याला आपण चौरस आहार म्हणतो,असे असावे. रोजच्या स्वयंपाकातून आपल्याला हे षड्रस मिळतात. मीठ, लिंबू चटणी कोशिंबीर लोणचे भाज्या, डाळ,भात, चपाती,फळे, क्वचित प्रसंगी एक गोड पदार्थ हा आहार योग्य चौरस आहार या सदरात मोडतो.

एखाद्या ऋतूत जे पिकते ते त्याचवेळी खाणे इष्ट ठरते. उदा- आंबा, कैरी वगैरे. भारतामध्ये प्रांतांनुसार खाण्याच्या सवयी ,पद्धती यात बदल झालेला दिसतो.तो तेथील हवामानानुसार योग्य आहे. तसेच अन्न शिजवताना शिजविणाऱ्याच्या मनस्थितीचा परिणामही जेवणावर होतो. म्हणून स्वयंपाक नेहमी प्रसन्न मनाने करावा. एकदा एका माणसाला खानावळीत जेवावे लागले. रोज रात्री त्याला खून केल्याची , झाल्याची तत्सम स्वप्ने पडत. काही दिवसांनी त्याला कळले की तुरूंगातून सुटका झालेला एक खुनी कैदी तिथे जेवण बनवतो.अशा अर्थाची एक कथा गुरूचरित्र ग्रंथात आहे.म्हणून असे सांगितले जाते की घरच्या कर्त्या पुरूषाने नेहमी आपल्या आईच्या, बायकोच्या नाही तर स्वत:च्या हातचेच अन्न खावे.

सात्त्विक आहार नेहमी घ्यावा. हे गीतेत आणि ज्ञानेश्वरीत सांगितले आहे.अन्नाचे सात्त्विक, राजस, तामस असे तीन प्रकार विशद केले आहेत. मूळचे सुरस, ताजे, नीट शिजलेले, स्वादिष्ट, शरीरास हितावह,सहज पचणारे ते सात्त्विक अन्न. त्याने आरोग्य उत्तम राहते. राजस अन्न म्हणजे कोरडे, तिखट, जळजळीत, अति गरम, जास्त शिजलेले असे अन्न.ते पचते पण हितावह नसते. तर तामस अन्न हे आंबलेले, शिळे, उष्टे, अर्धवट शिजलेले करपट, रसहीन असते. माणूस जे खाईल तशी त्याची वृत्ती सात्त्विक, राजस, तामस  बनते.

अन्न खूप खाऊ नये. भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत. तसेच उपाशीपोटी राहू नये. अति खाऊ नये.योग्य तेवढेच खावे. अति खाणारा,उपाशी राहणारा, शांत झोप न घेणारा यांना योगप्राप्ती होत नाही असे भगवंतांनीच सांगितले आहे. म्हणून योग्य, सात्त्विक आहार अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे समजून उमजूनच खावे. नकळतसुद्धा अन्नाचा अपमान करू नये. जेवताना भांडू नये. शत्रूसुद्धा जेवत असेल तर त्याला सुखाने जेऊ द्यावे. तसेच एखाद्याच्या तोंडचा घास काढून घेऊ नये.

अन्न शिजवताना , जेवणापूर्वी देवाचे नाव घ्यावे. स्वयंपाकापूर्वी स्त्रियांनी अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे.  जेवताना मन शांत ठेवावे. सावकाश जेवावे.

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम् देहमाश्रित:|

प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् ||

असेही भगवंतांनी सांगितले आहे. सर्व अन्नाचे पचन वैश्वानर करतो. प्रत्यक्ष भगवंत  वैश्वानर बनून मनुष्याच्या देहात वसतो.  म्हणून नेहमी जीवनसत्त्व युक्त, आपल्याला योग्य उष्मांक देणारे अन्न खावे. शरीराचे पोषण उदरभरण, याबरोबरच मनाचेही पोषण करणारे अन्न  माणसाने खाणे आवश्यक आहे.

© सुश्री प्रज्ञा परशुराम मिरासदार

A-1, 603, अक्षर एलेमेंटा, पोदार स्कूलजवळ, व्हिजन वन मॉल जवळ, ताथवडे, पुणे – ४११०३३

मोबा. 9657878331

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आंदण ☆ श्री प्रकाश लावंड

☆ कवितेचा उत्सव ☆ आंदण ☆ श्री प्रकाश लावंड ☆ 

काढू नको उणेदुणे

नको अनावर त्रागा

पाल इथलं उठलं

शोध दुसरी जागा

 

एक हात सुटता

का तुझा जीव कुढे ?

तुला आधार द्यायला

दहा हात येतील पुढे

 

टाक गाडून इथेच

इथल्या आठवणी

फेक चावऱ्या वहाणा

चाल गड्या अनवाणी

 

तुझ्या दुखऱ्या पावलांना

जडो मखमली कोंदण

विधात्याने दिलीय तुला

सारी पृथ्वीच आंदण

 

© श्री प्रकाश लावंड

करमाळा जि.सोलापूर.

मोबा 9021497977

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 70 – कोजागरी ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 70 ☆

☆ कोजागरी ☆

 

ही कोजागरी  येईल  निश्चितच,

एक नवी आशा घेऊन!

मी नव्याने ओळखू लागले आहे,

तुझ्या मनातलं टिपूर चांदणं,

“अतिपरिचयात अवज्ञा”

म्हणतात तसंच झालं होतं—-

आपलं नातं!

समांतर रेषेसारखं जगत राहीलो,

एका छताखाली!

पण ही पौर्णिमा आणि

कोजागरी चा चंद्र,

घडवणार आहे नवा इतिहास….

सारी किल्मिषं निघून जातील….

त्या चांदणधारेत!

ही कोजागरी निश्चितच वेगळी आहे आपल्या दोघांसाठी!

मी बनण्याचा प्रयत्न करेन,

तुझ्या मनातल्या प्रतिमेसारखी!

पण तूही किंचीत बदलायला हवं ना?

या चांदण्या रात्रीच्या साक्षीने!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव  ☆ डोहाळे ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ कवितेचा उत्सव  ☆ डोहाळे ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

मावळत्या सूर्याची लालबुंद टिकली

चिकटवून गोऱ्यापान नितळ भाळी

 

चमचमत्या चांदण्या माळीन  म्हणते

लांबसडक  काळ्याभोर   कुंतली

 

हिरव्यागच्च जंगल  झाडांची मेखला

बांधून गरगरीत पोटाकमरेला

 

झुलावं झुळझुळणाऱ्या वाऱ्यासारखं

नाचावं खळखळणाऱ्या झऱ्यासारखं

 

राजा, करशील ना रे

माझे हे डोहाळे पुरे?

 

‘तू काय पृथ्वी  समजतेस स्वतःला? ‘

एक गद्य टोमणा आला

 

आणि मग तेव्हापासून

मिटूनच घेतलं मी स्वतःला

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

फोन नं. 9820206306.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माती सांगे कुंभाराला ☆ स्व कवी मधुकर जोशी

स्व कवी मधुकर जोशी 

☆ कवितेचा उत्सव ☆ माती सांगे कुंभाराला ☆ स्व कवी मधुकर जोशी ☆ 

माती सांगे कुंभाराला !

माती सांगे कुंभाराला पायी मज

तुडविसी

तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या

पायाशी !

मला फिरविशी तू चाकावर

घट मातीचे घडवी सुंदर

लग्नमंडपी कधी असे मी कधी

शवापाशी!

वीर धुरंधर आले, गेले

पायी माझ्या इथे झोपले

कुब्जा अथवा मोहक युवती अंती

मजपाशी !

गर्वाने कां ताठ राहसी?

भाग्य कशाला उगा नासशी?

तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी!

कवितेचा

 

स्व कवी मधुकर जोशी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 69 ☆ तरी म्हणे बायको.. ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 69 ☆

☆ तरी म्हणे बायको.. ☆

 

घरासाठी तीच राबराब राबते

तरी म्हणे बायको कुठे काय करते

 

सगळ्यांना उठताच हवा आहे चहा

घरी माणसं दोनच वा असोत दहा

सगळ्यांचा चहा टेबलावर ठेवते

तरी म्हणे बायको कुठे काय करते

 

झाडलोट जन्मजात मिळते ही कला

घाम करी फरशिचा बोळा हा ओला

घर नीटनेटकं नि साफसुफ ठेवते

तरी म्हणे बायको कुठे काय करते

 

नाष्टा प्रत्येकाला वेगळाच हवा

कुणी म्हणे थालिपीठ कुणी म्हणे रवा

दोन तलवारीनेच युद्ध ती लढते

तरी म्हणे बायको कुठे काय करते

 

खाली आहे आग वर ठेवला तवा

तिचा अग्निहोत्राशी रोज खेळ नवा

हात अन् भाकरी दोन्हीही भाजते

तरी म्हणे बायको कुठे काय करते

 

चपळता यावी म्हणून टाकते कात

कमी नाही कुठे ही बाईची जात

संकटांना साऱ्या ती पुरून उरते

तरी म्हणे बायको कुठे काय करते

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print