श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवितेचा उत्सव 
☆ किनारा… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
☆
कसे जगावे ठरले नाही अजून माझे
असे चालले व्यर्थच जीवन निघून माझे
*
अरे ! न हे दव कळ्या.. फुलांच्या.. पानां.. वरचे
हे अश्रू त्यांचे… दुःखाश्रू बघून माझे
*
तुझ्या मनीच्या स्मरणातुन मी जिवंत अजुनी
जरीही गेले पंचप्राण हे विझून माझे
*
काळ वेळही निघून गेली तू येण्याची
तरी बिचारे स्वप्न तिष्ठते सजून माझे
*
तसे एरव्ही राहून जाते जगावयाचे
भेटताच तू पुरते होते जगून माझे
*
अखेर जो भेटला मला तो भोंदू होता
नित्य नको त्यालाच होतसे भजून माझे
*
जरी हिंडतो जगी, न रमते मन हे कोठे
तुझ्या अंगणी थबके पाऊल फिरून माझे
*
नको स्वर्ग वा सुख.. संपत्ती.. स्थावर.. जंगम
रम्य बालपण दे काहीही करून माझे
*
जगणे म्हणजे केवळ आता मरण सोसणे
ऋतु जगण्याचे कधीच गेले सरून माझे
*
समाधान.. आनंदाचा क्षण अनुभवताना
अवचित येती डोळे का हे भरून माझे?
*
सागर-तळ मी अशांत कोणा कळल्यावाचुन
प्रसन्न असणे.. दिसणे.. जरिही वरून माझे
*
बदलू दे जग, परिस्थितीही किती कशीही
वागायाचे कसे, कधीचे ठरून माझे
*
जन्मापासुन मी स्वच्छंदी वादळवारा
कसे म्हणू, ” तू चाल बोट हे धरून माझे.. “
*
विश्वासक तो तुझा किनारा नजरेपुढती
वादळलेले तारू गेले तरून माझे
*
हवेतला ‘मी’ पुन्हा पातलो धरतीवरती
असे-तसेही भलेच झाले हरून माझे
*
श्रावण- ओला तुझ्या प्रितीचा मेघ बरसता
उठले जीवन मरगळले तरतरून माझे
*
कुणा पांघरू? पाय, पोट-या की हे डोके?
हीss थंडी अन् थिटेच हे पांघरूण माझे
*
हा नुसता आवाज घुमे लाटांचा आता
उधाण गेले कधीच ते ओसरून माझे
*
सांग कधी ‘त्या’ यात्रेसाठी निघावयाचे
तयार मी, झाले सारे आवरून माझे
☆
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवी / गझलकार
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈