☆ विविधा ☆ ? अन्न हे पूर्णब्रह्म ?☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
अन्नाद्भवन्ति भूतानि, पर्जन्यादन्नसम्भव: |
यज्ञाद्भवन्ति पर्जन्य: यज्ञ: कर्मसमुद्भव: ||
अर्थ- सर्व प्राणिमात्र अन्नापासून उत्पन्न होतात.पावसामुळे अन्ननिर्मिती होते, यज्ञामुळे पाऊस पडतो तर यज्ञ हे आपल्या विहित कर्मांचे फळ आहे.भगवद्गीतेमध्ये भगवंतांनीच अन्नाचे महत्त्व सांगून ठेवले आहे. आपल्या रोजच्या व्यवहारात मनावर जे वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार होत असतात, अनेक घटक त्यासाठी कारणीभूत ठरतात त्यातला मुख्य. घटक म्हणजे आपण खातो ते अन्न होय.
माणूस जशा प्रकारचे अन्न खातो ,ज्या परिस्थितीत खातो, ज्या मनस्थितीत खातो त्या त्याप्रमाणे त्याच्या मनाची जडणघडण होत जाते.म्हणून नेहमी प्रसन्न मनाने जेवावे. म्हणून आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे की पाट, रांगोळी, उदबत्ती वगैरे थाट करून पंगत बसविली जायची. हल्ली टेबल डेकोरेशन असते. ही वातावरणनिर्मिती मन प्रसन्न ठेवते.
जेवण नेहमी सात्त्विक, षड्रसयुक्त ,ज्याला आपण चौरस आहार म्हणतो,असे असावे. रोजच्या स्वयंपाकातून आपल्याला हे षड्रस मिळतात. मीठ, लिंबू चटणी कोशिंबीर लोणचे भाज्या, डाळ,भात, चपाती,फळे, क्वचित प्रसंगी एक गोड पदार्थ हा आहार योग्य चौरस आहार या सदरात मोडतो.
एखाद्या ऋतूत जे पिकते ते त्याचवेळी खाणे इष्ट ठरते. उदा- आंबा, कैरी वगैरे. भारतामध्ये प्रांतांनुसार खाण्याच्या सवयी ,पद्धती यात बदल झालेला दिसतो.तो तेथील हवामानानुसार योग्य आहे. तसेच अन्न शिजवताना शिजविणाऱ्याच्या मनस्थितीचा परिणामही जेवणावर होतो. म्हणून स्वयंपाक नेहमी प्रसन्न मनाने करावा. एकदा एका माणसाला खानावळीत जेवावे लागले. रोज रात्री त्याला खून केल्याची , झाल्याची तत्सम स्वप्ने पडत. काही दिवसांनी त्याला कळले की तुरूंगातून सुटका झालेला एक खुनी कैदी तिथे जेवण बनवतो.अशा अर्थाची एक कथा गुरूचरित्र ग्रंथात आहे.म्हणून असे सांगितले जाते की घरच्या कर्त्या पुरूषाने नेहमी आपल्या आईच्या, बायकोच्या नाही तर स्वत:च्या हातचेच अन्न खावे.
सात्त्विक आहार नेहमी घ्यावा. हे गीतेत आणि ज्ञानेश्वरीत सांगितले आहे.अन्नाचे सात्त्विक, राजस, तामस असे तीन प्रकार विशद केले आहेत. मूळचे सुरस, ताजे, नीट शिजलेले, स्वादिष्ट, शरीरास हितावह,सहज पचणारे ते सात्त्विक अन्न. त्याने आरोग्य उत्तम राहते. राजस अन्न म्हणजे कोरडे, तिखट, जळजळीत, अति गरम, जास्त शिजलेले असे अन्न.ते पचते पण हितावह नसते. तर तामस अन्न हे आंबलेले, शिळे, उष्टे, अर्धवट शिजलेले करपट, रसहीन असते. माणूस जे खाईल तशी त्याची वृत्ती सात्त्विक, राजस, तामस बनते.
अन्न खूप खाऊ नये. भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत. तसेच उपाशीपोटी राहू नये. अति खाऊ नये.योग्य तेवढेच खावे. अति खाणारा,उपाशी राहणारा, शांत झोप न घेणारा यांना योगप्राप्ती होत नाही असे भगवंतांनीच सांगितले आहे. म्हणून योग्य, सात्त्विक आहार अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे समजून उमजूनच खावे. नकळतसुद्धा अन्नाचा अपमान करू नये. जेवताना भांडू नये. शत्रूसुद्धा जेवत असेल तर त्याला सुखाने जेऊ द्यावे. तसेच एखाद्याच्या तोंडचा घास काढून घेऊ नये.
अन्न शिजवताना , जेवणापूर्वी देवाचे नाव घ्यावे. स्वयंपाकापूर्वी स्त्रियांनी अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे. जेवताना मन शांत ठेवावे. सावकाश जेवावे.
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम् देहमाश्रित:|
प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् ||
असेही भगवंतांनी सांगितले आहे. सर्व अन्नाचे पचन वैश्वानर करतो. प्रत्यक्ष भगवंत वैश्वानर बनून मनुष्याच्या देहात वसतो. म्हणून नेहमी जीवनसत्त्व युक्त, आपल्याला योग्य उष्मांक देणारे अन्न खावे. शरीराचे पोषण उदरभरण, याबरोबरच मनाचेही पोषण करणारे अन्न माणसाने खाणे आवश्यक आहे.
© सुश्री प्रज्ञा परशुराम मिरासदार
A-1, 603, अक्षर एलेमेंटा, पोदार स्कूलजवळ, व्हिजन वन मॉल जवळ, ताथवडे, पुणे – ४११०३३
मोबा. 9657878331
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈