सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ कवितेचा उत्सव ☆ श्री हरी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
शब्द मंजिर्या खुडीत होते,
रामप्रहरी मी तुळशीच्या!
तुळशीपत्रात मज दिसू लागला,
श्रीहरी प्रसन्न पहाटेचा !
शिरावरी मोरपीस खुललेले,
स्मीत तयाच्या गालावरी !
तुलसीच्या पावित्र्य बंधनी,
गुंतुनी गेला तो श्रीहरी!
बासरी त्याची अखंड वाजे,
अधरावरती स्थान तिचे!
सोबत राधेची ही असता,
एकतानता मला दिसे !
सृष्टीच्या खेळास असे
साक्षीदार तो मनहारी!
माणसाची खळबळ पहाता,
गुढ हास्य त्याच्या मुखावरी!
झाडावरती फळे-फुले अन्
आनंदे विहरती पशुपक्षी!
मुक्त स्वच्छंदी बागडताना,
पाहून खुलला तो सुख साक्षी!
अवघे जगत ही सारी किमया,
त्याचाच खेळ हा पृथ्वीवरी!
अवकाशातून न्याहाळीत तो,
दूर राहुनी नियंत्रित करी!
थांबव आता तुझा खेळ हा,
जाणीव मानवा होई मनी!
तुझ्याशिवाय हे व्यर्थ असे,
वंदिते तुज मी क्षणोक्षणी!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈