सुश्री राजलक्ष्मी देशपांडे
संक्षिप्त परिचय
शिक्षण – एम.ए. अर्थशास्त्र
वयाच्या आठव्या वर्षापासून कविता करण्यास सुरुवात झाली. अनेक मासिकांमधून कविता, कथा, ललित लेख इत्यादी प्रकाशित झाले आहेत. काव्यसंमेलनांची अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
प्रकाशित साहित्य:-
कवितासंग्रह – १) झंकार २) वाटेवरच्या कविता कथासंग्रह- १) काही बोलायाचे आहे ललित लेख संग्रह – १) संस्कृतीच्या प्रसादखुणा चरित्रात्मक कादंबऱ्या – १) पुत्र अमृताचा २) जगन्माता मूल्यशिक्षणावर आधारित पुस्तक – १)बीज अंकुरे अंकुरे हिंदी अनुवाद – १) “पुत्र अमृताचा” या स्वत:च्या पुस्तकाचा हिंदी अनुवाद “अमृतपुत्र” २) “साई माझा लेकुरवाळा” या मराठी पुस्तकांचा केलेला हिंदी अनुवाद “वात्सल्यसिंधू साई” मराठी अनुवाद – १)स्वामी चिदानंद सरस्वती यांच्या मनाच्या श्लोकावरील मूळ इंग्रजी प्रवचनांचा मराठी अनुवाद..”मनाचे श्लोक: मुक्त भाष्य”
पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी या संस्थेत संस्कृत संस्कृती संशोधिका विभागात काम करत असताना स्वामी दयानंद सरस्वती आणि भगिनी निवेदिता या दोघांवर संशोधन करून दोन चरित्रे लिहिली आहेत.
☆ कवितेचा उत्सव : घर ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे ☆
येणार असलात आमच्या घरात
तर आनंदाने या
हसर्या स्वागताचं शुभशकुनी तोरण
नेहमीच झुलतं आमच्या दारावर !
आमचे सारे आनंद सदैव तुमचेही असतील
तुमचे अश्रू आंदण घेऊन
आमचेही डोळे भिजलेले असतील…
नाहीच आवडला इथला निवास
आमचा सहवास
तर हसत हसत निरोप घ्या .
थोडंही मळू देणार नाही आम्ही आमचं मन
तसे वेगळेच असतात शेवटी प्रत्येकाच्या आवडीचे क्षण !
मात्र जाताना धक्का लावू नका
या घराच्या भिंतींना. .छताला..
इथल्या भिंती कवितेच्या आहेत
आणि छत आभाळाच्या मनाचं
नंतर रास ओतलीत पैशाची तरी
पुन्हा नाही सजणार
तुमच्यासाठी हे घर
कदाचित तुम्हाला माहित असेल
बाजारात मिळत नाहीत
कविता आणि मनही !
© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे
9850931417
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈