मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हा सृष्टी नेम आहे…. ☆ प्रा.सौ.सुमती पवार 

प्रा.सौ. सुमती पवार

?ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन’?

☆ कवितेचा उत्सव ☆ हा सृष्टी नेम आहे…. ☆ प्रा.सौ.सुमती पवार ☆

सांगू किती तुला मी फुल येते ग फुलून

रात्रीतली कळी ती पहाटेस उमलून

होती फुले कळ्यांची हा सृष्टी नेम आहे

थांबला ना कधीच चुकला कधी न आहे…

 

येणार ढग काळे कडकडाट ही विजांचा

ताशा ही वाजणार आकाशी तो ढगांचा

धो धो बरसूनी तो होणार रिक्त आहे

पडणार ऊन स्वच्छ हा सृष्टीनेम आहे….

 

क्षितीजावरी धुक्यात पटलात सूर्य जाई

लोपून डोंगरात तो दृष्टी आड होई

येणार रात्र काळी टळणार ते का आहे

प्राचीवरी पहाटे रवी प्रकटणार आहे…

 

ऊन तप्त तापलेले काहील ही जीवाची

झेलून दु:ख्ख घ्यावे वहिवाट ही जगाची

सुखदु:ख्ख समेकृत्वा ही भोगयात्रा आहे

चुकणार नाहीच ती हा सृष्टीनेम आहे….

 

हासून ते जळावे दुज्यास ना कळावे

जे जे जमेल तितके सोसत हो रहावे

जे भोगणेच प्राप्त का व्यर्थ हो कुढावे

प्राक्तन सोबतीला हा सृष्टी नेम आहे …..

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि : ०७/०८/२०२० वेळ : रात्री ११:०४

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 5 –  ते आणि मी ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 5 ☆

☆ ते आणि मी  ☆

 

ते मरतात रुळांवरती-निष्प्राण

मी लिहितो आणखी एक कविता मुर्दाडपणे

ते चालतात,पायाचे तुकडे करतात

मी घेतो वाहवा भेगाळलेल्या टाचांच्या फोटो साठी -बेशरमपणे

ते होरपळतात कच्याबच्यांसह तापल्या मातीत

मी पंख्याखाली थंड होत रहातो-शांतपणे

ते तुडवत रहातात आपल्या खोपटाची वाट

मी पहात असतो माझ्या घराच्या सावलीतून -निवांतपणे

ते शोधतात आयुष्यभर ‘भाकरीचा चंद्र

मी तपासत असतो डझनाचे बाजारभाव -कुतूहलाने

ते मरतात आणि

शेखर कविता करतो.

 

© शेखर किसनराव पालखे 

पुणे

11-05-2020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ धरा – अंबरा ☆ सौ.मंजिरी येडूरकर

☆ कवितेचा उत्सव ☆ धरा – अंबरा ☆ सौ.मंजिरी येडूरकर

कैवल्यदानीच्या दोन पोरट्या धरा,अंबरा

समंजस हि धरा,अंबरा परि खळखळणारी॥

 

म्हणे अंबरा, ” नेसू माझे कधी काळे तर कधी राखाडी

क्वचितच असते रेष त्यावरी लखलखणारी”॥

 

नच खळेना डोळ्यामधले पाणी हळवे

कधी करी आकांत तर कधी मुसमुसणारी॥

 

रंगबिरंगी फुलवेलींची नक्षी रेखली

धरेस मिळते हिरवी साडी झगमगणारी॥

 

अखेर थोडी हसली गाली आज अंबरा,

नेसून दावी पिवळी साडी सळसळणारी॥

 

चैतन्याने रात भारली प्रणयरंगी

काळी साडी, खडी त्यावरी चमचमणारी॥

 

मनोमनी तो आज लाजला, चकोर भोळा

लख्ख प्रकाशी, बघून अंबरा थरथरणारी॥

 

© सौ.मंजिरी येडूरकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆  पाहुनी ही एकता ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ पाहुनी ही एकता ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

 

उगवू दे नी उजळूदे,  साऱ्या मनांचे सूर्य आता ।

अंधाराला भय वाटू दे, पाहुनी ही एकता ।।धृ।।

 

मनसूर्याचा जन्म व्हावा, घेऊनी किरण माणुसकीचे  ।

करुणेचा स्रोत पाझरावा, दर्शन व्ह्यावे प्रीतीचे ।

मानवतेचा जय व्हावा, यावी निववळ नीरामयता ।

अंधाराला भय वाटावे, पाहुनी ही एकता ।।1।।

 

पेटलेली आग हृदयी, नव सार्थकी लागावी ।

धार जिभेच्या तलवारीची, घाव घालण्या नसावी  ।

भेद सारे आता मिटावे, जाणता नि अजाणता ।

अंधाराला भय वाटावे, पाहुनी ही एकता ।।2।।

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 63 – पूर्वज ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  एक समसामयिक विषय पर आधारित अतिसुन्दर नवीन रचना  पूर्वज। पितृ पक्ष में अपने पूर्वजों का स्मरण करने की अपनी अपनी परंपरा एवं अपना अपना तरीका है। सुश्री प्रभा जी ने इस काव्याभिव्यक्ति के माध्यम से अपने पूर्वजों का स्मरण किया है। जो निश्चित ही अभूतपूर्व है। मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 63 ☆

☆ पूर्वज  ☆

पूर्वज माझे लढवय्यै अन पराक्रमी ही

तलवारींची खूण सांगते त्यांची कहाणी

इतिहासाच्या पानावरती खरेच शोधा

रक्ताच्या अक्षरात लिहिली त्यांची गाथा

 

“मर्द मावळ्या रक्ताची मी” म्हणणारी ती

पूर्वज माझी आत्या आजी खापरपणजी

घराण्यातले होते कोणी  माझ्या समही

नर्मदा कुणी वडिलांचीही  आत्या होती

 

जुने पुराणे किस्से सांगत माणिक मामा  ,

“तुझा चेहरा अगदी आहे नमुआक्काचा”

भागिरथी काकींची स्वारी  घोड्यावरती

ऐटबाज अन ताठ कण्याच्या सा-या दिसती

 

आठवते मज माझी आजी आई काकी

स्वर्गस्थ त्याही पहात असती धरणीवरती

किती पिढ्यांशी नाळ जोडली जाते आहे?

पूर्वज सारे या काळी मी स्मरते आहे

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ना बोललो तरीही ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव : ना बोललो तरीही – श्री सुहास रघुनाथ पंडित

 

ना बोललो तरीही सांगून काय गेलो

ना बोलावताही जवळी कशास आलो.

 

अजाणतेपणीही किमया अशीच घडते

फासे असे सुखाचे पडणे उचित होते

 

ठरवून काय मन हे प्रेमात गुंतते का ?

ओथंबल्या घनाला कुणी थांबवू शके का ?

 

रिवाज रिती यांची झाली बहुत ख्याती

मार्गावरी जराशी पेरीत जाऊ प्रीती.

 

सुख सावलीत बांधू अपुले सुरेख घरटे

माझ्या तुझ्या मनीचे डोळ्यात स्वप्न दाटे.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 62 ☆ एकवार पंखावरुनी… फिरो तुझा हात ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता  “एकवार पंखावरुनी… फिरो तुझा हात ।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 62 ☆

☆ एकवार पंखावरुनी… फिरो तुझा हात

(या गाण्याची समछंदी रचना…)

आजकाल सोबत त्याच्या फिरे रुबाबात

होउनी संन्यासी मी जाऊ का वनात, जाऊ का वनात

आजकाल सोबत त्याच्या फिरे रुबाबात

होउनी संन्यासी मी जाऊ का वनात, जाऊ का वनात

 

उगा तुझ्यासाठी झुरलो

उगा तुझ्यासाठी झुरलो

नाही मी माझा उरलो

नाही मी माझा उरलो

येऊन जीवनामध्ये, केला तू घात, केला तू घात

 

आजकाल सोबत त्याच्या फिरे रुबाबात

होउनी संन्यासी मी जाऊ का वनात, जाऊ का वनात

 

रोज माळला मी गजरा, कशा लागल्या या नजरा

रोज माळला मी गजरा, कशा लागल्या या नजरा

ठेवुनी निखारे गेली, याच ओंजळीत, याच ओंजळीत

 

आजकाल सोबत त्याच्या फिरे रुबाबात

होउनी संन्यासी मी जाऊ का वनात, जाऊ का वनात

 

तूच स्वप्न माझे राणी तुझ्याविना नाही कोणी,

नाही कोणी

तूच स्वप्न माझे राणी तुझ्याविना नाही कोणी,

नाही कोणी

तुझ्यापुढे माझा देह, आहे नाशवंत, आहे नाशवंत

 

आजकाल सोबत त्याच्या फिरे रुबाबात

होउनी संन्यासी मी जाऊ का वनात, जाऊ का वनात

 

कुठे डाव कळला काळा, माझ्याशी केली शाळा,

कुठे डाव कळला काळा, माझ्याशी केली शाळा,

आडकली नाव माझी, आहे भोवऱ्यात, आहे भोवऱ्यात

 

आजकाल सोबत त्याच्या फिरे रुबाबात

होउनी संन्यासी मी जाऊ का वनात, जाऊ का वनात

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दोष कुणाचा ☆ सौ.नीलम माणगावे

☆ कवितेचा उत्सव ☆ दोष कुणाचा ☆ सौ.नीलम माणगावे ☆

 

वेदनेचं गळू

ठस ठसू लागलं की ती सरळ

कांदा घेऊन,

विळीवर

चिरायला बसायची!

कळत नकळत

गळवा ला पिन टोचून,

मोकळं सोडायची

आणि वाहत्या धबधब्यात

पार बुडून जायची!

पण आता,

कांदा चिरून झाला तरी

डोळ्यात येत नाही

पाण्याचा टिपूस

समजत नाही,

हा दोष कुणाचा?

 

कांद्याचा?

की तिनं,

जुळवून घेतलेल्या

नव्या सांद्याचा?

 

© सौ.नीलम माणगावे

जयसिंगपूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 13 ☆ प्रेम कविता… प्रेमाची ओढ… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

(कवी राज शास्त्री जी (महंत कवी मुकुंदराज शास्त्री जी)  मराठी साहित्य की आलेख/निबंध एवं कविता विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। मराठी साहित्य, संस्कृत शास्त्री एवं वास्तुशास्त्र में विधिवत शिक्षण प्राप्त करने के उपरांत आप महानुभाव पंथ से विधिवत सन्यास ग्रहण कर आध्यात्मिक एवं समाज सेवा में समर्पित हैं। विगत दिनों आपका मराठी काव्य संग्रह “हे शब्द अंतरीचे” प्रकाशित हुआ है। ई-अभिव्यक्ति इसी शीर्षक से आपकी रचनाओं का साप्ताहिक स्तम्भ आज से प्रारम्भ कर रहा है। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “प्रेम कविता… प्रेमाची ओढ… )

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 13 ☆ 

☆ प्रेम कविता… प्रेमाची ओढ… ☆

 

प्रेमाची ओढ…

निर्मळ असावी

सोज्वळ उमटावी…१

 

प्रेमाची ओढ…

तोडणारी नसावी

जोडणारी असावी…२

 

प्रेमाची ओढ…

मन एक व्हावे

मन न दुखवावे… ३

 

प्रेमाची ओढ…

वाढत वाढत जावी

मनातील घृणा मिटावी… ४

 

प्रेमाची ओढ…

असतेच हृदयस्थ

तिथे प्रेमाचेच प्रस्थ… ५

 

प्रेमाची ओढ…

न कळत होते

मग सवय बनते… ६

 

प्रेमाची ओढ…

मला पण आहे

भार मी सतत वाहे… ७

 

प्रेमाची ओढ…

सतत मी जोपासली

पुष्टी मीच मला दिली… ८

 

प्रेमाची ओढ…

जसे चविष्ट व्यंजन

मंदिरातील पवित्र भजन… ९

 

कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन,

वर्धा रोड नागपूर,(440005)

मोबाईल ~9405403117, ~8390345500

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गेला श्रावण ☆ श्री रवींद्र देवघरे

☆ कवितेचा उत्सव ☆ गेला श्रावण ☆ श्री रवींद्र देवघरे ☆

वाट पाहुनी वाटे वरती थकले मधुबन,

रिमझिम आसव सरीत बरसुनि गेला श्रावण.

 

तृषार्त धरेची मृगातही ‘मृगया’  झाल्यावर,

तृषातृप्तिचे अमृत शिंपुन गेला श्रावण.

 

पाण्यासाठी दाहिदिशांना त्राहि-त्राहि तरी,

पाणवठ्याचे पाउल भिजवुन गेला श्रावण.

 

अंकुरण्यासाठी आसुसलेल्या अवनीला मग,

गर्भ-रेशमी हिरवा शालू देउन गेला श्रावण.

 

वृक्ष-वल्ली पशु-पक्षी सृष्टीतिल सगे-सोयरे,

पर्यावरणाचे निसर्ग नाते शिकवुन गेला श्रावण.

 

सृष्टीतील सर्वांच्या सह अस्तित्वा साठी,

‘राखा वसुधेचा मान’ बजावुन गेला श्रावण.

 

कालपरत्वे आज-उद्याचे जीवन जगवुन,

‘येइन पुढल्या वर्षी’ सांगुन गेला श्रावण.

 

© श्री रवीन्द्र देवघरे

नागपूर.

मो  9561117803.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares