मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चैत्र प्रभाती… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ चैत्र प्रभाती… ☆ श्रीशैल चौगुले ☆

प्रातःकाळी रम्य प्रभाती

कोकिळ हे मल्हार गाती

चैत्र फुलव्यांनी चौफेर

पुर्वभाळी कुसूम ज्योती.

*

नभांगणात किलबील

वेली फुलांनी रंग न्हाती

हळुवार मंजुळ वारा

स्पर्श मना देऊन जाती.

*

धरती कोवळ पदरी

लेते सुखांनी रान माती

तुळशी प्रदक्षिणा भाव

किरणे पांघरुन पाती.

*

घंटा-आरती देव्हार्याशी

जाग लोचना सत्य भ्रांती

पाडस गोठ्यात नाचते

गो-हंबर वात्सल्य क्षिती.

क्षिती – निवासी.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वातंत्र्याचं वारं… ☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

डॉ. तेजस्विनी वाळिंबे

अल्प परिचय 

वैद्यकीय

  • सहकार नगर, पुणे येथे गेली 25 वर्षे नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत.
  • काचबिंदू व मधुमेहातील नेत्रविकार यातील विशेष प्रशिक्षण. 
  • अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये काचबिंदू या विषयावर व्याख्याने.
  • Antiglaucoma drug trials मध्ये सहभाग.

साहित्यिक 

  • ‘पाहू आनंदे, ‘ व ‘स्मृति-सुधा’ ही पुस्तके प्रकाशित.
  • मराठी साहित्य, योगशास्त्र, भारतीय तत्वज्ञान, चित्रकलेची विशेष आवड.

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वातंत्र्याचं वारं… ☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

(प्रतिकूल कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थितीत आपलं स्वातंत्र्य व अधिकार मिळवण्यासाठी झगडलेल्या सर्व स्त्रियांनी समर्पित)

एकदा असाच वारा आला

पिंजऱ्यातला पक्षी मुक्त आकाशात झेपावला

 

आजी माझी सांगत होती….

एकदा असाच वारा आला

घोंगावणारा वारा तिला उंबऱ्याबाहेर घेऊन गेला

 

वाऱ्याच्या झटापटीत खिडकीची तावदाने फुटली

घरातल्या कोंदट हवेला मोकळी वाट मिळाली

 

असाच एकदा वारा आला

स्वामित्वाच्या भिंती फुटून अहंकार चिरडल्या गेला

 

घरी-दारी कल्लोळ उठला

पिंजऱ्याच्या लोखंडी दांड्या तोडून वारा आत घुसला

 

आजी माझी सांगत होती…

जेव्हा असा वारा आला

माझ्या सखीच्या मनी आकांक्षांचे पंख फुटले

चिमुकल्या पंखांना तिच्या वाऱ्याने बळ दिले

 

स्वातंत्र्याच्या प्रकाशाने आकाश उजळून निघाले

निळ्या नभाच्या मोहकतेने तिचे मन आनंदले

 

असाच एकदा वारा माझ्याही घरी आला

शीतल स्पर्श करून मला हलकेच म्हणाला

 

“ऊठ हो जागी चल जाऊ या, उंच नभी “

असाच एकदा वारा आला

…आकांक्षेला स्वातंत्र्याचे पंख लावून गेला

 

© डॉ. तेजस्विनी वाळिंबे

(नेत्रतज्ञ)

पुणे मो. ८८८८८३१९०५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – ती… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ती… ? श्री आशिष  बिवलकर ☆

कधी असते ती मायेचा  निर्झर,

कधी  घेते  ती दुर्गेचा  अवतार!

कधी  होते ती रणरागिणी,

कधी देते ती बुडणाऱ्याला आधार!

*
कधी असते ती स्वप्नवेडी,

कधी होते कर्तव्यासाठी  कठोर!

कधी असते ती धुंधीत,

कधी लागतो तिला संसाराचा घोर!

*
कधी उडते ती आकाशात,

तरी  जमिनीची तिला ओढ!

कधी  राबते  ती शेतात,

संसार करते तिचा गोड!

*

अनेक रूपे, अनेक भूमिका

हसत  हसत  ती निभावते!

अंतरातली घालमेल तिची,

हसऱ्या चेहऱ्याआड लपवते!

*

ती शांत राहते, सहन करते,

गृहीतच तिला धरले  जाते!

असते तिलाही तिचे एक मन,

आतल्या आत तिलाच ते खाते!

*

विचार करा तिच्या मनाचा,

जेव्हा होती ती गरोदर!

काळजावर दगड ठेवते,

उदरातली कळी खुडण्याअगोदर!

*

वंशाचा  दिवा हवा म्हणून,

का धरावा तिच्याच पुढे हट्ट!

मुलापेक्षा जणू स्वतः जन्माला येणारीच,

नाते धरून ठेवते कुटुंबाला घट्ट!

*

वाढवा तिच्या पंखातले बळ,

घेऊ दया तिला गरुडझेप!

आकाशी जरी असली ती,

लावायला येईल जखमेवर लेप!

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुकोबा समर्था… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ तुकोबा समर्था ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

निघालीय दिंडी चला पंढरीला

तिथे चंद्र भागेत जाऊ पुन्हा

अभंगातगोडी विठू सावळ्याच्या

मुखी नाम त्यांचेच ठेऊ पुन्हा

*

उभ्या पावसाची हजेरी असावी

सुखाच्या सुगीचीच गाणी म्हणू

मनी मानसी या खराभावठेवू

पुढे भक्ति मार्गास जाऊ पुन्हा

*

तुकोबा तुलाही लळा माणसांचा

तुझ्या लोकसेवेत आत्मा तुझा

किती भामट्यांचा तुला त्रास झाला

इथे या जगालाच दाऊ पुन्हा

*

तुकोबा समर्था तुझी थोर गाथा

कळेभाववेड्यास श्रद्धा तिची

खरे ते प्रभावी तिचे ज्ञान आहे

तिच्या ज्ञानगंगेत न्हाऊ पुन्हा

*

ख-या साधनेने रमाआत्मरंगी

तिथे देव भेटीस येतो तुझ्या

नको कर्मकांडे नको अंधश्रद्धा

हरीनाम साधेच घेऊ पुन्हा

*

म्हणा पांडुरंगा सगे खेडुताना

सगेसोयरे तेच तुमचे पुढे

तुम्हा सोबतीने भली थोरली ही

पुढे प्रेम वारीच नेऊ पुन्हा

*

कुठे काय होते कळेना कुणाला

समाजात सा-या दंगा घडे

नको तेवढी ही दुही माजलेली

तिला शांत करण्यास धाऊ पुन्हा

(तुकाराम बीज)

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “धर्म…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “धर्म…” ☆ श्री आशिष मुळे ☆

न्याय-अन्यायाची वाख्या

माझी तशी सोपी आहे

डोक्यावरची धर्माची पगडी

माझी खूपच हलकी आहे

*

माझा देव दगडात नाही

असला तर सगळीकडे आहे

माझा देव माणसात नाही

असला तर त्याच्या कर्मात आहे

*

यम-नियम साधना-समाधी

गुप्त-प्रकट लीन-विलीन

शब्दांचा खेळ सारा

खेळण्यात काय मजा आहे?

*

कुस्तीत कर्माच्या

स्वतःच स्वतःतले

जनावर लोळवण्यात

खरा पुरुषार्थ आहे

*

” स्वतःस होईल दुःख, दुसरा कुणी वागता

तसे दुसऱ्या बरोबर वागू नये ”

इतकाच खरं तर धर्म आहे

अवलंबला एकाचवेळी जगानी तर

क्षणात देव अन स्वर्ग प्रकट आहे…

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वातंत्र्याच्या वेदी… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ स्वातंत्र्याच्या वेदी ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

स्वातंत्र्याच्या वेदी वरती,

यज्ञाची सुरुवात जाहली!

यज्ञामध्ये पहिली समिधा,

वासुदेवानी अर्पियली!

*

ज्वाला तेव्हा पेटून उठली,

पारतंत्र्य दूर करण्या झणी!

घेतला वसा स्वातंत्र्याचा,

भगतसिंग ने तरूण पणी!

*

पेटून उठले एकाच रणी,

साथ सुखदेव, राजगुरूची!

धाडस त्यांचे अपूर्व होते,

गाठ घेतली ती मृत्यूची!

*

निर्भयाचे प्रतीक आहे,

कथा त्यांच्या साहसाची!

आठवणीने व्याकुळ होतो,

परिसीमा होती त्यागाची!

*

मनास होती तीव्र वेदना,

आठवून त्यांचा असीम त्याग!

एक दिवसाच्या आठवणीने,

होते का मनीची शांत आग!

*

वंदन करावे त्यांच्या स्मृतीला,

थोर देशभक्त जन्मले भारती!

कधी न विसरू त्यांचा त्याग,

गाऊ आपण त्यांची आरती!

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सु सं वा द! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

😁 सु सं वा द! 😅 श्री प्रमो वामन वर्तक ⭐ 

असू नये गोष्टी वेल्हाळ

लावू नये जास्त पाल्हाळ,

सत्य वाचे सदा वदावे,

जेव्हढ्यास तेव्हढे बोलावे!

*

घालून डोळ्यात डोळे

संवाद आपण करावा,

खोटे न बोलती डोळे

भाव मनीचा पोचवावा!

*

संवाद साधतांना सदा

नका करू हातवारे,

शब्द मुखातुनी मधाळावे

न करता अरे ला कारे!

*

स्वर पट्टी सांभाळून

बोलू नये उगा तारस्वरे,

पकडता संवादाचा धागा

शब्द भिडती ह्रदयी खरे!

*

नियम साधे हे संवादाचे

पाळा करतांना संवाद,

होता ध्येय साध्य मनीचे

मिटून जाती फुकाचे वाद!

मिटून जाती फुकाचे वाद!

© श्री प्रमोद वामन वर्तक

१०-०३-२०२५

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चिमण्यांचे झाड… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ चिमण्यांचे झाड… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

झाडावर बसल्या चिमण्या

झाडास लगडल्या चिमण्या

झाड चिमण्यांचे होऊन गेले

फुलं, पान फळही झाल्या चिमण्या……

*
चिमण्यांच्या चिवचिवाटाने

जणू बोलू लागले झाड

चिमण्यांच्या बागडण्याने

सुखे डोलू लागले झाड…….

 सुखे डोलू लागले झाड…….

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ २० मार्च : जागतिक चिमणी दिवस  — तीन कविता ☆ श्री आशिष बिवलकर, श्री प्रमोद वामन वर्तक आणि शुभदा भा. कुलकर्णी ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? २० मार्च : जागतिक चिमणी दिवस  — तीन कविता ☆ श्री आशिष बिवलकर, श्री प्रमोद वामन वर्तक आणि शुभदा भा. कुलकर्णी ☆

(या निमित्ताने वेगवेगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या तीन कविता.)

श्री आशिष बिवलकर

( १ ) 

दार बंद करून,

चिऊताई बसली |

कळत नाही,

का बर ती रुसली |

*

ओसरीवर रोज नाचणारी,

आता ती दिसेनाशी झाली |

पूर्वापार माणसाळलेली,

माणसांपासून दूर गेली |

*
एक घास चिऊचा, एक काऊचा

भरवत पिढ्यानपिढ्या वाढल्या |

चिऊताई तुझ्या गोष्टी ऐकत,

लहानाच्या मोठ्या झाल्या |

*
काळ बदलत गेला,

फ्लॅट संस्कृतीत कुठं राहिली ओसरी |

तुझेच घरटे हिरावले आम्ही,

भूतदयेचे संस्कार सगळेच ते विसरी |

*
तुझा चिवचिवाट ऐकायला,

मनाची फुरसतच ती राहिली नाही |

चार दाणे तुला टाकायचे असतात,

सुचतच नाही आता मनाला काही |

*

असेल तिथे सुरक्षित रहा,

नामशेष मात्र नकोस होऊ |

चूकचूक करते पाल मनी,

चित्रात तरी उरशील का गं चिऊ?

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

श्री प्रमोद वामन वर्तक

(२) 

निघे शुचिर्भूत होण्या 

सात चिमण्यांची फौज,

लक्ष ठेवती त्यांच्यावर दोघी

रोखून आपली नजर तेज!

*

पंख चिमुकले बुडवून जलात 

घेती आनंद स्नानाचा मनमुराद,

अंग शहारता गार पाण्याने 

झटकून टाकती पाणी क्षणात!

*

उरे बोटावर मोजण्या इतकी 

यांची संख्या बघा आजकाल,

येत्या ग्रीष्मात पाण्यावाचून

आपण त्यांचे टाळूया हाल!

आपण त्यांचे टाळूया हाल!

© श्रीप्रमोद वामन वर्तक

मो 9892561086

सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

(३)  

चिऊताई आली नाचत 

माझ्या दारी अंगणात 

या ग सा-या खेळायला

करू म्हणे गंमत जंमत 

*
छान आहे इथे सारे

हिरवी हिरवी झाडे 

पाना -पानातून लहरते

हवेहवेसे मंद वारे |

*

शांत सुंदर मंत्रांचा 

नाद कानी निनादतो

जगतांना माणसाला 

संदेश देऊया मैत्रीचा |

*

कवयित्री : शुभदा भा. कुलकर्णी.

 मो. ९५९५५५७९०८/

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जसा मनाचा विचार असतो… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

श्री विनायक कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ जसा मनाचा विचार असतो… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆ 

[वृत्त..वनहरिणी  [मात्रा८+८+८+८=३२]]

चार असतो जसा मनाचा तशी आपली असते दृष्टी

वास्तवतेचे भान विसरते कल्पनेतली दिसते सृष्टी

होकारार्थी भाव हरपतो नकारतेची कूस उजवते

असून नाती अवतीभवती एकांताची होते वृष्टी

*

जे नाही ते दिसते सारे डोळ्यांवरती असून पट्टी

आभासांच्या आकारांशी घट्टच जाते जमून गट्टी

दुर्जनतेशी छान मित्रता सज्जनतेशी वैर लाभते

स्नेहासमवे विरह येतसे सौजन्याशी होते कट्टी

*

साधकबाधक विचारांमध्ये सुरूच होते जंगी मुष्टी

भला असूनी जीव बिचारा उगाच होतो दुःखी कष्टी

उघड करावे विवंचनेला कशास नुसती गुंतागुंती

सत्संगाची साथ लाभता सुधारणेला मिळेल पुष्टी

© श्री विनायक कुलकर्णी

मो – 8600081092

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares