(सहवास फक्त सुखासाठी नसावा ,सावरण्यासाठीही असावा.जसा शरीर न् मनाचा सहवास..! मनाचा सद्सद्विवेकाचा अंकुशच तर शरीर-मनाच्या सहवासाचं प्रयोजन..! पण तोच अंकुश जुमानला नाही तर..? याच जर-तरची ही कविता…!)
……..
त्याचा रंग,आकार,उंची,रूंदी
कांहीच कधी नव्हतं जाणवलं
तेच माझं मन एक दिवस
माझ्या अलगद स्वप्नात आलं
तिर्हाईतासारखं समोर उभं राहिलं !
उभ्या शरीरात भरून राहिलेली
मनाची माझ्या रिती पोकळी…
चटकन् जाणवली न् मी त्याला ओळखलं…
तेही मग भरून पावलं
छानसं हसलं,तेवढ्याशा हसण्यानंही ….
त्याचं थकलं रूप एकदम उजळलं !
“किती थकलायस..,किती वाळलायस..”
त्याला मी एवढंच विचारलं
त्यातल्या ओतप्रत ओलाव्यानं,
ते…थोडं शहारलं…!
रोखून फक्त पहात राहिलं ..
नजरेतली त्याच्या धग पाहून
मी हळूच खाली पाहिलं
त्याला नजर द्यायचंच टाळलं..!
माझीच किंव केल्यासारखं
उपहासानं ते म्हणालं ,
“तुझ्या सुखाच्या इमल्याचं,
बांधकाम आता सुरू होतंय
‘पायाभरणीचा दगड’म्हणून..
तूच तर माझा बळी देतोयस..
मरण माझं आता असं
अटळ तर आहेच,
सोबत बोचरी एक खंतही आहे..
माझं हे बलिदान व्यर्थच तर जाणार आहे……
अरे,असं रानोमाळ भटकून सुखाच्या शोधात
मिळवू शकशीलही तू सुख समाधान..,पिऊन मृगजळ,
पण मीच हयात नसेन तेव्हा
ते ठेवशील कुठे, ..कुणाजवळ..?”
अभय मागत ते मला सतत हेच
विचारत राहिलं आणि चिडून जाऊन मीच त्याला मुठीत पकडून आवळून टाकलं….
त्याच्याच आकांताने जेव्हा
दचकून झोपेतून जाग आली,आळसावलेल्या सुस्त शरिराने मनाच्या उभारीची वाट पाहिली…..पण..मन..??