सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “खूप अवघड आहे…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
☆
खूप अवघड आहे आयुष्य
पावला पावलावर येतं नैराश्य
उगाच एकदा मला वाटलं
तरीही अर्ध्यावर आलचं की
पावलांना बळ मिळालंच कुठून तरी
मन हळूच म्हणू लागलं…..
आयुष्य नसतं साधं सरळ
नुसत्याच विचारांनी येते मरगळ
उगाच एकदा मला वाटलं
वळणावर सावरत आलीस की
कित्येक मुक्कामावर सहज स्थिरावलीसच की
मन हळूच म्हणू लागलं…..
हार जीत परिमाणे इथली
इथे जिंकणं सोप्प नाही
उगाच एकदा मला वाटलं
रोज नवं आव्हाहन पेलतेसच की
क्षण मोकळे शोधतेसच की
मन हळूच म्हणू लागलं……
जगताना रोजच शिकावं लागतं
माणूस ओळखून जगावं लागतं
कितीही जीव लावला तरी
कोणी कोणाचं कधीच नसतं
सगळचं मला अवघड वाटतं
तरीही सांग जगणं का कोणी सोडतं?
मन माझं हळूच म्हणतं..
सतत स्वतःला समजवावं लागतं
जे आहे ते तसचं स्वीकारावं लागतं
आपण फक्त निमित्त असतो
उगाच एकदा मला वाटतं
इतकं तुला कळतं
मग बघ जगणं किती सोप्प असतं
मन माझं हळूच म्हणतं ….
☆
💞शब्दकळी विजया 💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈