सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
Marathi Kavita
सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
श्री सुनील देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “प्रेषित…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
☆
प्रेषित निघून जातात कालातीत विचारांचे ठसे ठेवत.
आम्ही मात्र काळाच्या पडद्यावर रक्तलांच्छित ठसे ठेवतो.
*
ते सुळावर चढतात आमच्या कल्याणा साठी.
त्यांच्या विचारांना आम्ही सुळी देतो स्वार्थासाठी.
*
ते आपलाच क्रूस वागवतात खांद्यावर स्वतःच्याच.
आम्ही जबाबदारीचे ओझेही पेलत नाही स्वतःच्याच.
*
मृत्यूनंतरही ते पुन्हा प्रकटतात आमच्या भल्यासाठी.
मारेकरी मात्र सतत जन्म घेतात क्रौर्यासाठी.
*
एकदा क्रूरपणे त्यांना प्रत्यक्ष मारण्यासाठी,
मग अधिक क्रूरपणे विचारांना मारण्यासाठी.
☆
© श्री सुनील देशपांडे
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सौ. अर्चना गादीकर निकारंगे
कवितेचा उत्सव
☆ ओढ… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆
☆
संध्याकाळच्या वेळेस पक्ष्यांची माळ घरट्याकडे परतत होती,
दूरवर राहिलेल्या घरट्याला कवेत घेऊ पाहत होती.
चुकलेला, राहीलेला असेल मागे कोणी
म्हणाली, ” पुरे आता, फिरा माघारी, नका थांबू आणि,
*
अनुभवलेल्या गोष्टींचे भांडार होते तिच्यापाशी,
भविष्यासाठी असेच शिकणार होते ते प्रत्येक दिवशी.
अंगातला थकवा रात्रीच्या विसाव्याने घालवून,
प्रसन्न मनाने ते उदया परत उडणार होते आनंदून.
*
पण त्यासाठी आज घरी परतणे अनिवार्य होते,
काहींचे कुटुंब येण्याची त्यांच्या वाट पाहत होते,
सांगायचे होते काहींना आज त्यांनी काय पाहीले,
जे घरी राहून न गेलेल्यांचे अनुभवायचे राहीले.
☆
© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
प्रा. भरत खैरकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “मन में है विश्वास” – लेखक : विश्वास नांगरे पाटील ☆ परिचय प्रा. भरत खैरकर ☆
पुस्तक : “मन मे हैं विश्वास”
लेखक : विश्वास नांगरे पाटील
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे.
मूल्य – 300 रु
तरुणपण घोडचुकामधे, प्रौढत्व संघर्षात आणि म्हातारपण पश्चातापात जावू नये असं वाटत असेल तर बालपणापासूनच आयुष्याची इमारत उभारायला, मजबूत करायला सुरुवात झाली पाहिजे. न थांबता,न थकता, न हरता पेकाट मोडेपर्यंत व बुडाला फोड येईपर्यंत अभ्यास केला पाहिजे. मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखात बळ निर्माण करण्याची लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची जिद्द व त्यासाठी अविरत संघर्ष करण्याची तयारी आजच्या तरुणांमध्ये असली पाहिजे. ज्या दिव्यांमध्ये खैरातीच तेल आहे, त्या दिव्याचा उजेडही मला नको अशी भावना त्यांच्या मनात हवी.
“अभ्यास करून मोठा साहेब हो.” असं सांगणार्या बाबांसाठी जिद्दीने पेटून उठलेला विश्वास पुढे मोठा पोलीस अधिकारी झाला. कोणतीही गोष्ट गुद्धयांनी नाही, मुद्दयाने सोडवायची शिकवण बालपणीच विश्वासला मिळाली होती. ‘ दुखायचं दुखतं कळ काढ ‘, निसर्ग सगळं काही वेळेत दुरुस्त करतो.
तारुण्याच्या काळात संपत्ती व सत्ता एकत्र आल्यावर अनर्थ घडू शकतात, म्हणून विद्यार्थ्याने अभ्यास काळात संयम, विवेक आणि धीर सोडू नये.
संपत्तीचा मोह आणि सत्तेचा माज कधीही चढू द्यायचा नाही ! ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे,देहामध्ये शक्ती आहे,मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीत विवेक आहे, हृदयामध्ये करूणा आहे, मातृभूमी वर प्रेम आहे, इंद्रीयांवर संयम आहे. माणूसपण स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे,इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचं बळ आहे, सिंहासारखा जो निर्भय आहे, ध्येय उच्च आहे. व्यसनमुक्त जीवन आहे, जीवनात शिस्त आहे,निती आहे, ज्याचे चारित्र्य शुद्ध आहे, असा आदर्श युवक स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला आहे. रस्ता कठीण असला तरी ध्येय गाठण्यासाठी हा एकच मार्ग आहे. ह्याच मार्गाने मनात दीर्घ “विश्वास” ठेवून जर एखादा युवक मार्गक्रमण करतो तर यश निश्चितच आहे.
काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. बचतीची व काटकसरीची सवय लहानपणापासून असणे चांगले आहे. वेगवेगळी आत्मचरित्रे वाचून आपला आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी तर त्यांचा गाव म्हणजे एक विद्यापीठच
असतं! जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट घेणार नाही, ही खूणगाठ मनाशी बांधणे गरजेचे आहे.
स्पर्धा परीक्षांबाबत कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता प्रत्येक क्षणाची,प्रत्येक कणाची आणि मनाची चाचणी घेणे गरजेचे आहे. पेनाने ” पेन” होईस्तोवर लिहिलं तर यश तुमचेच आहे. पराकोटीचा संयम आणि मनावर कठोर नियंत्रण ह्यामुळे कोणतेही यश आपण मिळवू शकतो,असा विश्वास लेखक या पुस्तकात मांडत आहे.
” इस दुनिया में आप किसलिए आए हो? ” ह्या प्रश्नाचं दिलेलं हे उत्तर मिळवण्यासाठी “मन में है विश्वास” हे पुस्तक वाचणे अत्यंत गरजेच आहे. जसं घोड्यावर मांड टाकली की स्वार किती दमाचाआहे हे कळतं. तसंच विद्यार्थ्यांचे असतं. त्याची बैठक किती आहे, ह्यावर त्याचं स्पर्धा परीक्षेचे यश अवलंबून असतं. आयत्या मिळालेल्या घबाडाला बळी पडायचं नाही, लढायचं, उठायचं, दोन द्यायचे,दोन घ्यायचे, तरच यश तुमचेच आहे. स्वतःच्या नजरेतून स्वतः कधी उतरायचं नाही हा गुरुमंत्र ह्या पुस्तकातून लेखकाने दिला आहे. प्रत्येक घरी हे पुस्तक असणं गरजेचे आहे.
परिचय – प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 240 – विजय साहित्य
☆ सौभाग्य कंकण..! ☆
(काव्यप्रकार अष्टाक्षरी.)
☆
सौभाग्य कंकण,
संस्कारी बंधन.
हळव्या मनाचे,
सुरेल स्पंदन…! १
*
सौभाग्य भूषण,
पहिले कंगण.
माहेरी सोडले,
वधुने अंगण…!२
*
सौभाग्य वायन ,
हातीचे कंकण.
मनाचे मनात,
संस्कारी रींगण..!३
*
सप्तरंगी चुडा,
हिरव्या मनात .
हिरवी बांगडी,
हिरव्या तनात…!४
*
प्रेमाचे प्रतीक,
लाल नी नारंगी .
जपावा संसार ,
नानाविध अंगी..!५
*
निळाई ज्ञानाची,
पिवळा आनंदी.
सांगतो हिरवा,
रहावे स्वच्छंदी…!६
*
यशाचा केशरी ,
पांढरा पावन .
जांभळ्या रंगात,
आषाढ श्रावण..!७
*
वज्रचुडा हाती ,
स्वप्नांचे कोंदण.
माया ममतेचे,
जाहले गोंदण…!८
*
आयुष्य पतीचे ,
वाढवी कंगण.
जपते बांगडी,
नात्यांचे बंधन…! ९
*
चांदीचे ऐश्वर्य,
सोन्याची समृद्धी.
मोत्यांची बांगडी ,
करी सौख्य वृद्धी..!१०
*
भरल्या करात,
वाजू दे कंकण ,
काचेची बांगडी,
संसारी पैंजण…!११
*
चुडा हा वधूचा,
हाती आलंकृत .
सासर माहेर ,
झाली सालंकृत..!१२
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ सेतू… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
झाडांनाही माहित असतं
सगळीच पानं पिवळी होऊन चालत नाही
उद्या उमलणा-या कळ्यांसाठी
काही पानांना हिरवं रहावच लागतं
माहित असतं त्यांना,
करावाच लागतो संघर्ष
स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी
फांद्यांना आकाशाचे वेध लागले तरी
मुळांना माती सोडून जाता येत नाही
पिकली पानं गळून जातील आपोआप
पालवीही फुटेल,आपोआपच,
तरीही
फुलणं आणि सुकणं
यांना जोडणारा सेतू होऊन
झाड झुंजत राहतं वादळवा-यात,
पिवळ्या पानांना निरोप दे॓ऊन
हिरवी पानं अंगावर मिरवत
प्रत्येक ऋतूचं स्वागत करत !
प्रत्येक ऋतूचं स्वागत करत !
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ आजी आजोबा… ☆ श्री सुजित कदम ☆
☆
आजी आजोबांशी
रोज मनसोक्त बोलू या
दिवसभरातला थोडा वेळ
त्यांच्यासाठी देऊया…!
*
आजी आजोबा म्हणजे
भर उन्हात सावलीचं झाड
कुशीत घेऊन पुरवत असतात
हवे तेवढे आपले लाड…!
*
वाढत जातं वय आणि ..
थकत जातात त्यांचे पाय
तरीसुद्धा नातवा सोबत
चालत असतात हेच पाय
(धावू लागतात हेच पाय)
*
दूर दूरच्या नातवांसाठी..
आतून जिव तुटत असतो
त्यांच्या आठवणीत आसवांचा
तोल सुध्दा सुटत जातो…!
*
गालावरुन ओघळत जातात
आसवांचे काही थेंब..
तरी सुद्धा वाढत असतं
सर्वांबद्दल त्यांच प्रेम…!
*
दिसत जरी कमी असलं तरी
मनातलं त्यांना नक्की कळतं
प्रश्न अवघड असला तरी
इथे उत्तर नक्की मिळतं..!
*
बाहेरचा राग किती वेळा
आपण ह्यांच्यावरतीच काढतो
कारण नसताना किती वेळा
आपण यांच्यावरच चिडतो.
*
तरीसुद्धा शांतपणे ..
ते घेतात सारे ऐकून,
रात्री आपण झोपल्यावर मग
हळूच जातात डोकावून ..!
*
आठवत असतं त्यांना सुद्धा
“त्यांचं असं बालपण”
आपणच मात्र विसरून जातो
“त्यांचं असं म्हातारपण”..!
*
सुरकुतलेला हात त्यांचा
रोज हातामध्ये घेऊ..
त्यांच्या मनातलं थोडं तरी
जाणून आपण घेऊ..!
*
कितीही असलो मोठे तरी
लहान आपण होऊया
उतार वयातलं बालपण त्यांचं
थोडं समजून घेऊया..!
*
आजी आजोबांशी
रोज मनसोक्त बोलू या
दिवसभरातला थोडा वेळ
त्यांच्यासाठी देऊया…!
☆
© श्री सुजित कदम
मो .. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ चिरंतन कविता… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
अगदीच कांही माझ्या,
स्वप्नी असत्य नव्हते.
सत्यात वास्तवाच्याही,
स्वप्न सत्य होते.
वाहणार कालसरिता,
घेउन पोटी सारे.
राहणार चिरंतन कविता,
सांभाळीत दोन किनारे.
महाकवी मी युगांचा,
वेगळेच माझे विश्व.
अव्यक्त अश्वमेधासाठी,
चाैफेर धावती अश्व.
बंदिस्त गणगोतासाठी,
मी शोधीतो नव्याने नाती.
अव्याहत प्रयत्न माझे,
मातीमोल ठरती अंती.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
प्रा. भरत खैरकर
कवितेचा उत्सव
☆ “तू…” ☆ प्रा. भरत खैरकर ☆
☆
वेदनेची कळ अन्
लढण्यातल बळ तू
*
मुलांच रडणं अन्
मोठ्यांच भिडण तू
*
आगीचा जाळ अन्
पाण्याची धार तू
*
मायेचा पाझर अन्
दृष्टातला माजोर तू
*
कुराणातला अल्ला अन्
गीतेतला सल्ला तू
*
अनेकातला एक अन्
एकातला अनेक तू
*
अनादी तू अनंत तू
तूच तू तोच तू
*
हाही तू तोही तू
तूही तू तूही तू
☆
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
🌹 मार्जाराचे आर्जव 🌹 श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
आज माझी प्रिय सखी
बसे उंच मजवर रागावून,
अपराध काय घडे माझा
नकळे माझ्या हातून !
*
करुनी तुझी प्रेमाराधना
रग लागली हाता पाया,
वाकुल्या दावीत गवाक्षात
सावरून बसलीस काया !
*
मधू इथे आणि चंद्र तिथे
चालती प्रेमचाळे मानवात,
डोळे मिटून दूध पिणारी
असे आपली मार्जार जात !
*
बघता फासला दोघातला
विरह संपेल तव उडीत,
मिलन होता दोघे चाखू
गोडी प्रणयाची थंडीत !
…… गोडी प्रणयाची थंडीत !
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈