मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पारपत्र… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

पारपत्र ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

(अनलज्वाला)

सूर न जुळला जनी म्हणूनी विजनी आलो

मीच माझिया एकांताची सरगम झालो

*

स्वच्छ चेहरा स्वच्छ आरसा माझा आहे

प्रतिबिंबाहुन आहे सुंदर.. कधी म्हणालो?

*

नाही वंशज मी सूर्याचा.. मान्यच आहे

अंगणात पण अंधाराच्या पणती झालो

*

किती काळ मी उरी जपावी तुमची गुपिते

किल्मिष सारे घेता पोटी.. समुद्र झालो

*

स्वप्नामधले वचन पाळले.. त्याची शिक्षा

डोंबाघरचे भरण्या पाणी.. तयार झालो

*

उघडताच तो तिसरा डोळा…होइल तांडव

डिवचु नका रे भोळ्या सांबा.. सांगत आलो

*

अनवाणी ही वारी माझी.. आता खंडित

विठू तोतया, छद्म पंढरी.. सावध झालो

*

गावशिवेतुन हकालपट्टी झाल्यानंतर

पारपत्र मी दाहि दिशांचे घेउन आलो !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ इडियट… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ इडियट… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

गृप अनेक

सुविचार ही भरपूर

उठल्यापासून झोपेपर्यंत…

*

सणावारी किंवा

विशेष दिनी

रेलचेल फोटोंची

मोबाईल हॅंग होईपर्यंत…

*

चॅटींग, काॅल

विडीओ काॅल सुद्धा

उसंत नाही क्षणाची

बॅटरी डाउन होईपर्यंत…

*

नातवाचं खेळणं

लहान मुलांची लंगोट तपासणं‌ तस

वारंवार मोबाईल पाहाणं

अधीन जग, मरेपर्यंत..

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ इवली बकुळी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ इवली बकुळी ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

इवली बकुळी 

स्वतःही फुलते

गंधदान देते

पवनाशी

*

इवली बकुळी 

फुलते झुलते

नाते जुळतेच

काळजाशी

*

 इवली बकुळी 

 सुगंध केवढा

 गंधीत जाहला

 सारा घरगाडा

*

 इवली बकुळी 

 पहाटे फुलती

 गळून पडता

 सुगंधीत माती

*

 इवली बकुळी 

 कुपी अत्तराची

 जपून स्मृतीत

 ठेवायाची

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मिटे प्रकाशाचे राज्य… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ मिटे प्रकाशाचे राज्य सुश्री नीलांबरी शिर्के 

मिटे प्रकाशाचे राज्य

पडे काळोखाची मिठी

बंद पापण्यांच्या आत

सैलावती निरगाठी

*

मनातल्या निरगाठी

मनातच  सुटतात

पापणीच्या अंधारात

उरातून फुटतात

*

 उरी फुटता फुटता

 शल्य पापणीच्या काठी

 गळणारा अश्रु टिपे

 तम हलकेच ओठी

*

या तमसावरती

तिची जडलिय प्रित

तिचे दु:ख चुंबुनीया

प्रकाशी  ठेवी हसवीत

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अघटित… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ अघटित… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

 हे अघटित आहे खास,

 थंडीत आकाश ढगाळ !

 मनास करते उदास,

 अन् थेंबात उगवे सकाळ!…. १

*

 उबदार थंडीची शाल,

 हेमंत ऋतु पांघरतो!

 घेऊनी ढगाची झूल,

 नकळत दिवस उगवतो…. २

*

 गेलास ऋतुरंग बदलून,

 लपलास कुठे घननिळा?

 प्रश्न पडला मम मनाला,

पावसाळा की हिवसाळा!… ३

*

 शांत, स्तब्ध निसर्गाला,

 निश्चल केले कोणी ?

 चैतन्य कधी त्या येईल,

 वाट पाहते मी मनी !…. ४

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सत्याचा शोध… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ सत्याचा शोध…☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

(व्योमगंगा)

गालगागा गालगागा गालगागा गालगागा

सत्य विश्वाचे खरेतर तज्ञ नसता जाणते मी

नेहमी मसणात जेव्हा पिंडदाना पाहते मी

*

तत्त्वज्ञानी सांगतो ह्या मिथ्य विश्वाची कहाणी

वाचली नाही तरीही विश्वशांती मांडते मी

*

सूर्य येथे चंद्र येथे विश्व आहे सत्य येथे

नाशवंती जीवनाचे सत्य अंती बोलते मी

*

लागता वाटेत डोंगर वापरावा मार्ग दुसरा

वा चढूनी पार व्हावे फक्त इतके सांगते मी

*

तत्त्ववेत्ता शास्त्रवेत्ता वासनेने अंध झाला

शील माझे रक्षण्याला अंग माझे झाकते मी

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 238 ☆ स्नेहामृत… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 238 – विजय साहित्य ?

☆ स्नेहामृत ☆

चहाटळ वृत्तीलाही

संजीवक असे चहा

एकांतात रमताना

चहा पिऊनीया पहा…. 1

*

चहा पिताना डोकवा

आठवांच्या आरश्यात

चहा गवती पाल्याचा

मजेशीर भुरक्यात… !

*

रंग असो कोणताही

वाफाळता हवा चहा

गोडी लागे सवयीने

वेळेवरी हवा पहा… !

*

आवडीचे पेयपान

मरगळ घालवीते

संवादाचा कानमंत्र

जीभेवरी घोळवीते… !

*

चहा नावाचे व्यसन

करी श्रम परीहार

अर्धा कप चहातून

स्नेहामृत उपचार…. !

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दवबिंदू… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

? कवितेचा उत्सव ?

☆ दवबिंदू… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

पहाटेच्यावेळी गवतावर

दवबिंदू विसावलेले दिसत होते.

कृत्रिम प्रकाशातही ते

खूपच गोड भासत होते.

*

पावलांना त्यांचा होणारा

तो थंडगार स्पर्श असा

नकळत मनाला सुखावतो

आपल्या जसा.

*

क्षणभंगुरतेचे जीवन असे परी त्यांचे,

न उरते भान त्यांच्या मनी ह्याचे.

प्रकाशाने उजाडण्याच्या ते गडदतात,

कुठल्याही क्षणी ते नाहीसे होतात.

*

पुढचे जीवन ते गवताला अर्पितात,

जमिनीत मुरून ते एक जीवन देतात.

परोपकारी भावना दिसते त्यांच्याठायी

फोफावत गवत त्यांच्या ह्या जाणीवेपायी.

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “दु:खद वास्तव…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? कवितेचा उत्सव ?

☆ “दु:खद वास्तव…–☆ श्री जगदीश काबरे ☆

सुखांमागे धावता धावता, विवेक पडतो गहाण

पाण्यात राहूनही माशाची मग भागत नाही तहान ॥१॥

*

स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप

वाटीवाटीने ओतलं तरी कमीच पडत तूप ॥ २॥

*

बायका आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ

पैसा आणून ओतेन म्हणतो, पण मागू नका वेळ ॥३॥

*

करिअरच होतं आहे जीवन, मात्र जगायचं जमेना तंत्र

बापाची ओळख मुलं सांगती, पैसा छापणार यंत्र ॥४॥

*

चुकून सुट्टी घेतलीच तरी, पाहुणा ‘स्वतःच्या घरी’

दोन दिवस कौतुक होतं, नंतर डोकेदुखी सारी ॥५॥

*

मुलंच मग विचारू लागतात, बाबा अजून का हो हे जात नाही घरी?

त्यांचाही दोष नसतो, त्यांना याची सवयच नसते खरी ॥६॥

*

सोनेरी वेली वाढत जातात, घराभोवती चढलेल्या,

आतून मात्र मातीच्या भिंती, कधीही न सारवलेल्या ॥७॥

*

आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागत काही,

धावण्याच्या हट्टापायी आपण श्वासच मुळी घेतला नाही ॥८॥

*

सगळ काही पाहता पाहता, आरशात पाहणं राहून गेलं,

सुखाची तहान भागवता भागवता, समाधान दूर दूर वाहून गेलं! ॥ ९॥

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “क्षितिज संग…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “क्षितिज संग” ☆ प्रा. भरत खैरकर 

श्वासामधली अधीर भाषा

कशी कळेना-सखे तुला

प्रणयसुखाच्या फांदीवरती

योवनाचा झुलतो झुला !

*

धडाडती हृदय स्पंदने

अन्‌ उधाणती उसासे

वेदनेच्या कळा साहत

वाजती देहांचे ताशे !

*

धुंद नशेच्या मंथरज्वाला

जाळी माझे अंग अंग

मिठीमाजी सखये तुझ्या

क्षितिजाचा गवसे संग!!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares