☆ सांज ये गोकुळी… कवी : श्री सुधीर मोघे – रसग्रहण – सुश्री कविता आमोणकर ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
काव्यानंद
सांज ये गोकुळी सावळी सावळी
जेंव्हा दिवस संपून रात्र होण्यास सुरवात होणार असते, त्या वेळी म्हणजेच संध्याकाळी वातावरणात एक गूढता निर्माण होते. उन्हे कलत असतानाच आकाशात रंगीबेरंगी रंगाची उधळण होत असते आणि अशा वेळी अंधारून यायला सुरवात होते… दिवसाच्या प्रकाशात जेंव्हा रात्रीचा अंध:कार मिसळला जात असतो, तेंव्हा निर्माण होणारा सावळा रंग कवी सुधीर मोघे यांना ही मोहवून गेला आणि सांज ये गोकुळी.. सावळी सावळी! .. या सुंदर गाण्यांचे नादमय शब्द त्यांच्या लेखणीतून प्रसवले.
एकच शब्द जेंव्हा दोनदा कवितेत वापरला जातो, तेंव्हा होणारा नाद हा कानाला सुखावतो. या गाण्यात ही सावळी सावळी… या पुन्हा पुन्हा येणार्या शब्दांनी जो नाद निर्माण केला आहे, तो नाद आशा ताई यांनी आपल्या आवाजात इतक्या अप्रतिम पणे सादर केला आहे की, हे गाणे ऐकताना आपण अगदी नकळत या गाण्यावर डोलत राहतो. आणि या गाण्यातील शब्दांचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर अक्षरश: उभे राहते. संगीताच्या सुरांचे बादशाह श्रीधर फडके यांनी पूर्वा कल्याण रागात या गीताला आशा ताई यांचा आवाज देताना गाण्याला उच्च दर्जा प्राप्त करून दिला. आशा ताई यांनी सुरवातीचा जो आलाप घेतला आहे, त्या आलापातच त्यांनी संपूर्ण गाणे जिंकले आहे. हे गाणे “ वजीर ” या चित्रपटामध्ये अश्विनी भावे या अभिनेत्रीवर चित्रीत केले गेले आहे.
सांज ये गोकुळी
सावळी सावळी
सांवळ्याची जणू साउली! ..
या कडव्यात गीतकार सुधीर मोघे यांना संध्याकाळच्या वातावरणात पसरणारी संध्याछाया ही जणू काही सावळ्या कृष्णाचीच सावली भासते! … किती सुंदर उपमा! .. त्या सावळ्या कृष्णाची सावळी छाया.. या सावळ्या वातावरणात अवघे वातावरण हे कृष्णमय होऊन गेले आहे आणि कृष्णाच्या गायी या संध्यासमयी गोधुळ उधळवत निघाल्या आहेत.. ( गायी जेंव्हा संध्याकाळाच्या वेळेस आपल्या घरी जायला निघतात, तेंव्हा त्यांच्या खुरांनी जी धूळ उडते, तिला गोधुळ म्हणतात ) त्या उडणार्या गोधुळी मुळे आधीच सावळ्या झालेल्या वातावरणात पायवाटा ही गोधुळीमय झाल्या.. या रंगाला कवी सुधीर मोघे श्यामरंग असे नाव देत पुढे लिहितात…
धूळ उडवीत गाई निघाल्या
श्यामरंगात वाटा बुडाल्या
परतती त्यांसवे
पाखरांचे थवे
पैल घंटा घुमे राउळी…
गोधुळ उडवत गाई निघाल्या आणि त्यांच्या सोबत पाखरांचे थवे ही आपल्या घरट्याकडे परतू लागले आहेत… अशा सावळ्या संध्याकाळच्या रंगात देवळात वाजणार्या घंटेचा नाद ऐकू येतो आणि सुंदर असे हे वर्णन या गीतात ऐकताना आपल्या डोळ्यासमोर सावळ्या श्रीकृष्णाची हातात मुरली धरलेली सावळी छबी उभी राहते! ..
वातावरणात भरून राहिलेल्या या सावळ्या रंगात दूर दिसणार्या उंचच उंच अशा पर्वतांच्या टोकांवर सावळा रंग हा असा झाकोळला गेलेला आहे की, ती पर्वतांची रांग जणू काही काजळाची रेघ दिसत आहे आणि वातावरणातल्या सावळ्या रंगामुळे समोर असलेल्या डोहात पडलेले पांढरेशुभ्र चांदणे ही सावळे होऊन गेले आहे. आणि हे सर्व कवी आपल्या शब्दांत साकारताना म्हणतात….
पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले
चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली! ….
कवी सुधीर मोघे यांच्या शब्दांतली गूढता इथे जाणवते. सावळ्या रंगात रंगून जाताना अवघे विश्व सावळे म्हणजे कृष्णमय होऊन गेले आहे ही त्यांची कल्पना कृष्णप्रेमाची ओढ दर्शविते.
माऊली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा..
मंद वार्यावरी
वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी…
सांजेच्या सावळ्या रंगात आता अंधाराला पान्हा फुटत आहे, म्हणजेच आता अंधाराचे साम्राज्य वाढत चालले आहे. आणि सावळ्या रंगाच्या श्रीकृष्णाच्या सावळ्या रंगात अवघे विश्व रंगून ते ही कान्हामय होऊन गेले आहे… संध्याकाळी सुटलेला हा मंद गार वारा हलकेच सुटला आहे आणि झाडापानातून वाहणार्या वार्याचे सूर हे सावळ्या श्रीकृष्णाच्या सावळ्या साउलीच्या वातावरणात त्या सावळ्या श्रीकृष्णाच्याच बासुरीतूनच वहात येताना अमृताच्या ओंजळीत सामावून जात आहेत, अशी सुंदर कल्पना या गीताच्या ओळींत सुरमय केली आहे.
स्वप्नं, महत्त्वाकांक्षा, ध्येयंं, नव्या वाटा, नवी क्षितिजे यांची आस बाळगणं त्यासाठी झोकून देणं या सर्वांसाठी लागते चिकाटी, जिद्द मनोबल. या दिशेचा मार्ग सरळ, सोपा नसतो. खाचखळग्यांचा, काट्याकुट्यांचा असतो. स्वप्नपूर्तीच्या मागे लागणाऱ्यांना भवतालचे अनेक घटक सतत मागे खेचत असतात, उणीवांवर बोट ठेवून मानसिक खच्चीकरण करत असतात, या सर्वांवर मात करून अंतप्रेरणेने चालत राहणं, ध्येयपूर्तीचा टप्पा गाठणं यासाठी प्रचंड मनोधैर्य लागतं.
A WILL WILL FIND A WAY
किंवा
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या उक्तीप्रमाणे एक ना एक दिवस यश दारात उभे राहते आणि त्या वेळेचा जो आनंद असतो त्याला सीमा नसते. अनेक घटिकां-पळांच्या तपस्येचं ते फळ असतं आणि त्या क्षणी “आपण हे करू शकलो, हे मिळवू शकलो” ही भावना कृतार्थ करते. जगणं सार्थ झालं असं समाधान लाभतं. याचसाठी केला होता अट्टाहास हा भाव उत्पन्न होतो.
याच अर्थाचे डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांचे मी कृतार्थ जाहले हे सुंदर गीत! या गीताचा आपण आज रसास्वाद घेऊया.
☆ मी कृतार्थ जाहले ☆
☆
स्वप्न माझ्या मनात मूर्त साकारले
यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ॥ध्रु॥
*
चिमणीला पदरातिल गरुडपंख लाभले
उंच घेऊनी भरारी राज्य नभी थाटले
देवी साम्राज्याची भाग्य मला लाभले
यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ॥१
*
दुर्गम गिरीशिखराप्रति मार्ग कठीण हो किती
साथ लाभता मना निग्रहा नसे भीती
संकल्परूप माझे या वांच्छनेस लाभले
यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले।२
*
नाही अहंकार कधी दंभ ना स्पर्शले
सेवेतुनि जगताच्या कर्मफला जाणिले
अर्पण जीवन सारे विश्वपदी वोपिले
यशोमन्दिरात आज मी कृतार्थ जाहले।३
☆
कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री (निशिगंध)
हे एक यशोगीत आहे. एक आनंदगीत आहे. साफल्याची भावना व्यक्त करणारे हे सुरेख शब्दातले गीत आहे. पूर्ततेचा आनंद, हर्ष आणि त्यानंतर येणारा कृतार्थतेचा भाव हे गीत वाचताना जाणवतो. एका यशप्राप्त कन्येचे मनोगत या गीतात व्यक्त केलेले आहे.
स्वप्न माझ्या मनात मूर्त साकारले
यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले।ध्रु।
ध्रुवपदात कवितेतल्या आनंदमयी भावना जाणवतात. आनंद कसला तर स्वप्नपूर्तीचा. “अजी मी ब्रह्म पाहिले” सारखाच, त्याच तोडीचा आनंद गीतातल्या या कन्येला झालेला आहे. ती म्हणते,
“आज माझं कित्येक वर्षं मनात बाळगलेलं एक स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे आणि या यशाच्या शिखरावर मला कृतार्थ झाल्याचे समाधान लाभत आहे. ”
ध्रुवपदाच्या या ओळीतला यशोमंदिर हा शब्द खूपच लक्षवेधी आहे. यशाचे मंदिर किंवा यशाचे द्वार म्हणजे जणू काही मंदिरच. यशाला दिलेली ही मंदिराची उपमा फारच पवित्र, मंगलमय आणि सूचक वाटते. चांगल्या मार्गाने मिळवलेल्या यशाची ती ग्वाही देते.
चिमणीला पदरातिल गरुड पंख लाभले
उंच घेऊनी भरारी राज्य नभी थाटले
देवी साम्राज्याची भाग्य मला लाभले
यशो मंदिरात आज मी कृतार्थ जाहले. १
इतके दिवस मी लहान होते. पंखात माझ्या ताकद नव्हती. उडण्याचे सामर्थ्य नव्हते. म्हणून ते मिटलेल्या अवस्थेत होते पण माझ्या आयुष्यात एक दिवस असा आला की जणू काही उंच गगनात सहजपणे भरारी मारणाऱ्या गरुडाचे पंखच मला लाभले आणि हे जग मी माझ्या मुठीत बंदिस्त करू शकले. जगाला माझं अस्तित्व मान्य करावंच लागलं. कर ले दुनिया मुट्टी मे हे माझं स्वप्न जणू काही पूर्ण झालं. माझ्याकडे बघणाऱ्यांच्या नजरेत मला आता आदर, अभिमान आणि आश्वासकता दिसत आहे. हेच मला हवं होतं आणि ते मी मिळवलं म्हणून माझा जन्म सार्थ झाला असे आता वाटत आहे. ”
हे संपूर्ण कडवं रूपकात्मक आहे. गरुडपंख लाभले या शब्दरचनेत आत्मविश्वास, आत्मनिर्भरता याचा मनोमन उगम झाल्याचा अर्थ अभिप्रेत आहे. कवीने योजलेल्या या रूपकात्मक शब्दातून जे अशक्य वाटत होते ते शक्य करून दाखवण्याचा अभिमान जाणवतो. “गुलामगिरीच्या शंखला तोडून उच्च स्थानावरचे माझे स्वतःचे असे एक राज्य निर्माण करण्यात मला यश लाभले आहे” हा विश्वास जाणवतो.
देवी साम्राज्याची या शब्दातून तिने रोवलेल्या विजयपताकेचा विलक्षण अभिमान आणि भाग्य ती उपभोगीत आहे हे दिसतं. आजपर्यंत जिला पायाची दासी मानलं जात होतं तिला देवीचं स्थान मिळालं. एका सक्षम सबल रूपात ती नव्याने अवतरली.
दुर्गम गिरीशिखराप्रति मार्ग कठीण हो किती
साथ लाभता मना निग्रहा नसे भीती
संकल्प रूप माझीया वांच्छनेस लाभले
यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले २
“यश तर पदरी आलंच पण मागे वळून पाहताना जाणवत आहे की या यशाचा मार्ग सोपा नव्हता. अवघड होता. सरळ नव्हता! वळणावळणाचा होता. एखाद्या असाध्य डोंगराचे शिखर गाठण्यासारखेच होते ते. अत्यंत साहसाचा हा मार्ग होता पण तरीही अंतर्मनाची कुठेतरी विलक्षण साथ होती, मनात जिद्द होती, चिकाटी होती, एक दुर्दम्य आशावाद आणि निग्रहही होता ज्यामुळे मनात दाटलेल्या भीतीवर मी मात करू शकले, निर्भय बनले. स्वशक्तीचा, स्वसामर्थ्याचा वेध घेऊ शकले आणि त्याच बळावर माझ्या या संकल्पांना, इच्छेला एक निश्चित असा आकार मिळू शकला. खरोखरच आज मी धन्य झाले.”
गिरीशिखराप्रति ही शब्दयोजना इथे अगदी चपखल आहे. कुठलाही डोंगर ओलांडणं हे अत्यंत साहसाचं आणि आव्हानात्मक असतं. उरी बाळगलेली स्वप्नं सत्यात उतरवणं हे येर्या गबाळ्याचं कामच नव्हे तर त्यासाठी गिरीशिखरावर पोहोचण्याइतकं सामर्थ्य हवं. . हे अधोरेखित करणारी ही शब्दयोजना वाचकाला नक्कीच भावते. या ओळींमध्ये वीरश्री जाणवते. वीर रसाचा इथे भावाविष्कार झालेला अनुभवास येतो.
गिरीशिखराप्रति मार्ग कठीण हो किती
साथ लाभता मना निग्रह नसे भीती
यात अनुप्रास आणि यमक हे दोन्ही अलंकार अतिशय सुंदरतेने गुंफले आहेत.
नाही अहंकार कधी दंभ मना स्पर्शले
सेवेतूनी जगताच्या कर्मफला जाणिले
अर्पण जीवन सारे विश्वपदी वोपिले
यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ३
“मला जे हवं होतं ते मिळवताना माझी मानसिकता मात्र संतुलित होती. मी माझ्या मनाचा तोल कधीही ढळू दिला नाही. माझ्या ध्येयमार्गावरून जाताना मी कुणालाही तुच्छ लेखले नाही. मी कुणीतरी इतरांपेक्षा वेगळी आहे असा अहंकार बाळगला नाही. कुठल्याही ढोंगीपणाचा बुरखा पांघरला नाही उलट एका सेवाभावाने मी जगताच्या जीवनातला अज्ञानांधकार दूर करण्याचा प्रयत्न केला. मी- ची ओळख पटवताना मी समाजाच्या जीवनप्रवाहाला कधीही अव्हेरलं नाही. त्यातूनच ठेचकाळत, शिकत, शिकवत, समजावत, पटवत शांततेच्या, अहिंसक मार्गाने मी माझ्या कष्टाचे फळ मिळवले आणि माझे स्वप्न पूर्ण केले. स्वप्नपूर्ती नंतरही माझे पाय सदैव जमिनीवरच ठेवले. यशाने मी हुरळून गेले नाही. भले मी मनस्वी आनंदले असेन पण त्याची नशा किंवा धुंदी मी माझ्या मनावर येऊ दिली नाही. अखेर कोsहं या भावनेने मी एक निमित्तमात्र असे समजून समर्पित भावानेच या यशाकडे, तृप्त मनाने आणि प्रातिनिधिक स्वरूपात पाहते.”
या गीतातला हा शेवटचा चरण अतिशय अर्थपूर्ण आहे, संदेशात्मक आहे. आनंद होणं ही सर्वसाधारण सामान्य भावना आहे. ती एक सहज अशी अभिव्यक्ती आहे पण त्याचा अवास्तव आकार न होऊ देणे हे सामान्यातले असामान्यत्व आहे आणि याच असामान्यत्वाचा पाठपुरावा कवीने या शेवटच्या चरणात जाता जाता सहज केला आहे.
वोपिले हा शब्द ज्ञानेश्वरी ची आठवण करून देतो आणि त्या शब्दातला गोडवा सांभाळून या गीतातल्या ओळीत तो अगदी बेमालूमपणे सहज गुंफलेला जाणवतो.
वोपिले म्हणजे अर्पिले, देऊन टाकले या अर्थाने इथे तो योजला असावा.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन याच अर्थाचा बोध करणाऱ्या या शेवटच्या काव्यपंक्ती आहेत.
विश्वपदी वोपिले हा खूप विस्तारित, उदात्त अर्थांचा शब्दसमूह आहे. “ जिथून मिळालं तिथेच अर्पिलं” हा भाव तिथे आहे. “माझं यश हे आता माझ्यापुरतं मर्यादित नाही तर या यशामुळे जे सामर्थ्य, जी ताकद मला लाभली आहे त्याचा सुयोग्य उपयोग या विश्वासाठीच मी करेन. ” हा व्यापक निर्धार त्यात जाणवतो.
विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो।।
असा एक अव्यक्त दडलेला अर्थ या गीतात व्यापून राहिलेला आहे.
जे गीत एका सामान्य कन्येच्या यशोनंदाने सुरू होते ते गीत सहजपणे एका विश्वरूपी संदेशात रूपांतरित होते. केवळ १४ ओळीत डॉक्टर श्रोत्रींनी साधलेला हा महान अर्थ वाचकाला एका वेगळ्याच विचारप्रवाहात घेऊन जातो. धन्य तो कवी! धन्य त्याची शब्दलीला!
या संपूर्ण गीताची यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ही एक टॅगलाईन आहे आणि या टॅगलाईनला, या ओळीला साजेसा प्रत्येक चरणातला तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द …लाभले— वोपिले हे अतिशय लयबद्ध वाटतात. .
यश कोणते, यश कसले याचा स्पष्ट अथवा विशिष्ट असा उल्लेख या गीतात नाही. यश कोणतेही असू शकते. आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय अगदी कोणतेही …. पण या गीतातला एक अंतर्गत भाव जाणवतो तो हा की कुठल्याही स्त्रीचे यश, तिची स्वप्नपूर्ती आणि पुरुषाचे यश– सामाजिक फुटपट्टीने मोजले तर त्यात महत् अंतर असते. पुरुषांपेक्षा एखाद्या स्त्रीला तिच्या स्वप्नपूर्तीसाठी जो संघर्ष करावा लागतो तो अधिक आव्हानात्मक आणि अवघड असतो. कुठेतरी कवीने या स्त्री संघर्षाचा सन्मान आणि दखल घेतल्यामुळे एका स्त्रीच्या भूमिकेतून मला त्याचे मूल्य अधिक वाटते हे निःसंशय …
☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’… कवि – कुसुमाग्रज ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
#विशेष कविता रसग्रहण उपक्रम#
…आज मी तात्यांची म्हणजेच कवि कुसुमाग्रज अर्थात वि.वा शिरवाडकरांची, आगगाडी व जमीन ही कवितेच रसग्रहण करत आहे.
सन 1942 साली पहिला प्रसिध्द झालेल्या विशाखा या कविता संग्रहातील ही कविता आहे. कवितेच्या शेवटी कविता लेखनाचा काल 1938 नि स्थल पुणे अस दिलेल आहेत.
तात्यांनी अहि-नकुल,हा काठोकाठ कटाह भरा, जा जरा पूर्वेकडे, गुलाम, शेवटचे पान ,आव्हान,कुतूहल, भक्तिभाव, बालकवी ,आणि आगगाडी व जमीन या सारख्या कविता लिहिल्या…त्यांच्या विशाखा या कविता संग्रहाला भाऊसाहेब तथा वि.स.खांडेकरांनी अर्ध्यदान स्वरुपात प्रस्तावाना लिहली आहे .ते म्हणतात त्यांची प्रतिमा ही लुकलुक करणारी चांदणी नाही,ती चमचम करणारी बिजली आहे,आपली कविता ही मुरली नाही,ती तरवार आहे याची योग्य जाणीव त्यांना आहे.या तरवारीला कल्पकतेच्या सुंदर आणि बळकट मुठीची जोडही सुदैवाने मिळालेली आहे,त्यामुळे अनुभूतीच्या कुठल्याही प्रदेशात त्यांची प्रतिभा रणरागिणीच होईल. आणि भविष्यवाणी पुढे तंतोतंत खरी ठरलेली आपण पाहिलीच आहे…
☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’ ☆
☆
नको गं ! नको गं ! आक्रंदे जमीन
पायाशी लोळत विनवी नमून- 2
*
धावसी मजेत वेगात वरून
आणिक खाली मी चालले चुरुन !
*
छातीत पाडसी कितीक खिंडारे
कितीक ढाळसी वरून निखारे ! 2
*
नको गं ! नको गं ! आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू बेहोष होऊन.
*
ढगात धुराचा फवारा सोडून
गर्जत गाडी ती बोलली माजुन- 2
*
दुर्बळ ! अशीच खुशाल ओरड
जगावे जगात कशाला भेकड !
*
पोलादी टाचा या छातीत रोवून
अशीच चेंद्त धावेन ! धावेन ! 2
*
चला रे चक्रानों,फिरत गरारा
गर्जत पुकारा आपुला दरारा !
*
शीळ अन कर्कश गर्वात फुंकून
पोटात जळते इंधन घालून ! 2
*
शिरली घाटात अफाट वेगात
मैलांचे अंतर घोटात गिळीत !
*
उद्दाम गाडीचे ऐकून वचन
क्रोधात इकडे थरारे जमीन ! 2
*
“दुर्बळ भेकड !”त्वेषाने पुकारी
घुमले पहाड घुमल्या कपारी !
*
हवेत पेटला सूडाचा धुमारा
कोसळे दरीत पुलाचा डोलारा ! 2
*
उठला क्षणार्ध भयाण आक्रोश
हादरे जंगल कापले आकाश
*
उलटी पालटी होऊन गाडी ती
हजार शकले पडली खालती ! 2
☆
या कवितेचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे सरल सरल दोन भाग पडलेले दिसतात. पूर्वार्धात जमीन आगगाडीची विनवणी करताना दिसतेय.. तू अशी धाड धाड दाण दाण करत तूही पोलादी चाक माझ्या अंगावरुन नेऊ नकोस त्याने माझ्या मातीचा ,आजूबाजूच्या परिसरसराची धूळधाण होते.शिवाय तू अशी जोशात जातेस तेव्हा ते जळते लालभडक निखार्यानीं अंग अंग पोळून निघते. तूला जायाला मज्जाव करत नाही पण तुझ्याइतकी सशक्त नाही.तेव्हा माझा तू सहानुभूतीने विचार कर.माझं अस्तित्व टिकल तरच तुझ्या असण्याला फिरण्याला अर्थ आहे. या ठिकाणी जमीन ही शोषित वर्गाच्या प्रतींनिधीचे प्रतीक दाखवले आहे. मजुरांची कामगारांची मालकवर्गाने काळजी घेतली तर मालकांचा व्यवसाय अव्यहात टिकेल अन्यथा…
तर उत्तरार्धात आगगाडी जमिनीच्या विणविणीची अवहेलना करते. दुर्बल भेकड म्हणून तिचा अवमान करते.पायाची वाहाण पायीच बरी असते. आपल्या उद्दाम, सहानुभूतीशून्य वागण्याने जमिनीला चेंदून टाकण्यास तयार होते. प्रचंड वेगाने आगीचे लोळ फुत्कारत घाटाला गिळत पुढे पुढे निघते. मालक वर्ग कामगार वर्गाची एनकेण प्रकारे पिळवणूक करत राहतो. कामगरांच्या सुख्दुखाशी त्याच काहीएक देण घेण नसत.
आणि शेवटी अन्यायाने,अपमानाने,कष्टाने त्रस्त झालेली जमीन सूडाचा बदला म्हणून आगगाडीच्या वाटेवरचा खींडितला पूल जेव्हा पाडून टाकते तेव्हा गुरमीत असलेलली पण बेसावध आगागडीचा अपघात होतो.मोठी जीविहहाणी बरोबर साधनसंपत्तीचा सर्वनाश होतो. कामगार जेव्हा पेटून उठतो तेव्हा संप,दंगल,क्रांतीचा,बंड करून उठतो आणि मालकाला दे धरणीमाय करून सोडतो. भांडवलशाही विरूध्द समाजवादाची लढाईच चित्रचं या कवितेत दाखवलेले दिसते.
कुसुमाग्रज हे मानवतेचे कवि आहेत.आजच्या सामाजिक असंतोषाचा ज्वालामुखी त्यांच्या कवितेतून इतर काव्यांप्रमाणे नुसता धुमसत नाही ,तो अग्निरसाचा वर्षाव करीत सुटतो.विषमता,पिळवणूक,गांजणूक आणि अन्याय यांच्याविषयीची बहुजनसमाजाची चीड कुसुमाग्रजांनी अत्यंत उत्कट आणि सुंदर स्वरुपात आपल्या काव्यातून व्यक्त केली आहे.
आगगाडी व जमीन या कवितेत कवीची कल्पकता व त्याची प्रेरकता यांच्यामध्ये जणूकाही शर्यतच लागली आहे !दलितवर्गावर होणार्या जुलूमाचे आणि त्याच्या प्रतिक्रियेचे या कवितेतील चित्रण अत्यंत प्रभावी आहे.क्षणाक्षणाने आणि कणाकणाने सुधारणा होऊन मानव जात सुखी होईल हा भोळा आशावाद दुर्बल ठरतो आणि क्रांतीचे निशाण हातात घेतलेल्या समतादेवीकडे समाजाचे डोळे लागतात. ‘हा काठोकाठ कटाह भरा, जा जरा पूर्वेकडे, गुलाम,बंदी आणि आगगाडी व जमीन या तेजस्वी कवनांतून कुसुमाग्रजांनी क्रांतीच्या दर्शनाचा मानवजातीला लागलेला ध्यास मोठ्या तन्मयतेने वर्णन केला आहे.त्यांची कल्पकता प्रत्येक वेळी नव्या नव्या सुंदर रूपकांचा आश्रय करून या ध्यासाचे चित्रण करते, अश्याप्रकारच्या सर्व कवितांतून कुसुमाग्रज एकच तुतारी फुंकत आहेत असेच मला वाटत राहते…
☆ स्वतंत्रतेचे स्तोत्र… कवी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सौ. ज्योती कुळकर्णी ☆
☆ स्वतंत्रतेचे स्तोत्र… कवी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ☆
जयोस्तुते
*
जयोस्तुते श्री महन्मंगले शिवाs स्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुताम् वंदे
*
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची
स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तू ची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी
*
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्य तू ची
स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्ट होशी
*
मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते
*
हे अधम रक्त रंजिते सुजन पुजिते
श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते
*
तुझं साठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरत भूमीला दृढालिंगना कधी देशील वरदे
*
हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रीडा तेथे करण्याचा का तुला वीट आला
होय आरसा अप्सरांना सरसे करण्याला
सुधा धवल जानवी स्त्रोत तू का गे त्यजिला
स्वतंत्रते भगवती ss
या सुवर्णभूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्परोज घे ताजे वेणीला
*
ही सकल संयुता, अमुची माता, भारती असता
का तुवा ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्याची दासी झाली
जीव तळमळे, का तू त्यजिले उत्तर याचे दे
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुताम् वंदे
☆
– स्वा. विनायक दामोदर सावरकर.
☆ स्वतंत्रतेचे स्तोत्र ☆
स्वा. सावरकरांच्या अनेक उत्कृष्ट कवितांमधूनही ही कविता मला अतिशयच आवडते. मोराचा पिसारा ज्याप्रमाणे सुंदर रंग लेवून मोराचा बाज खुलवितो, त्याचप्रमाणे आशयसौंदर्य, भाषासौंदर्य व काव्यसौंदर्याने मराठी भाषेचा बाज खुलविणारी तसेच छंदबद्ध, वृत्तबद्ध व लयबद्ध असलेली ही कविता मला फारच आवडते.
स्वा. सावरकरांचे विचारधन म्हणजे शुद्ध, निखळ सौंदर्य! त्याला आणखी आशयघनता देऊन आणि विविध अलंकारांनी नटवून त्यांनी ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे. देशप्रेमाची तीव्र भावना व उपजत बुद्धिमत्ता यामुळेच त्यांना हे शक्य झाले आहे.
आपण काव्यार्थाचा आस्वाद घेऊ या. कवितेकरता घेतलेली मध्यवर्ती कल्पना अतिशय सुंदर रितीने त्यांनी आपल्यापुढे मांडली आहे.
आपण आपल्या संस्कृतीत जलदेवता, अग्निदेव, वरुणदेव मानले आहेत. त्यांचा कोप होऊ नये म्हणून आपण त्यांची प्रार्थना करत असतो. हीच कल्पना डोळ्यापुढे ठेऊन, स्वतंत्रतेलाच देवी मानून, तिने पारतंत्र्यातून भारतमातेला मुक्त करावे यासाठी प्रार्थना करण्यासाठी हे स्तोत्र लिहिले आहे.
आपण बघतोच की घरात कर्त्या पुरुषाची हुकूमशाही असली, वागण्याचं स्वातंत्र्य अजिबात नसले तर सगळ्यांचाच जीव गुदमरतो. परकीय सत्तेच्या अंमलाखाली पूर्ण देशच त्याकाळी गुदमरला होता. त्यातून सुटकेसाठीच्या इच्छेच्या भावना या कवितेतून व्यक्त झाल्या आहेत.
” हे मातृभूमि तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले”
हेच त्यांच्या साहित्याचे उद्दिष्ट आहे.
अशाच देशभक्तिच्या उदात्त आशयसौंदर्यानी युक्त अशी ही कविता आहे. शब्दसौंदर्य व इतरही अलंकारांनी नटलेल्या कवितेचे वर्णन करायला खरं म्हणजे माझ्यासारखीचे शब्दच अपुरे पडतील.
जगातल्या प्रत्येक गोष्टीचे सौंदर्य खुलायला स्वातंत्र्य अत्यावश्यक असते, हे किती सुंदर कल्पना व शब्दांचा मेळ घालून या कवितेत त्यांनी मांडले आहे बघा…..
स्वातंत्र्यामधे काय सामावलेले नसते?म्हणूनच स्वातंत्र्य-देवीला आळवतांना ते म्हणतात….
“राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची
स्वतंत्रते भगवती!श्रीमती राज्ञी तू त्यांची”
हे स्वातंत्र्यदेवते!आमच्या राष्ट्राचे मूर्तीमंत चैतन्य तूच आहेस. पारतंत्र्यात असल्याने, तुझी अनुपस्थिती असल्याने साहाजिकच ते चैतन्यच आज हरवले आहे. तसेच नीती आणि संपत्ती यांची देखील तू राणी आहेस. कारण नीतिमत्ता काय?किंवा संपत्ती काय ? जो आपल्याला पारतंत्र्यात ठेवतो त्याच्या मर्जीवरच अवलंबून असते.
स्वातंत्र्यदेवते! तू कशी आहेस? तर…
“परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी”
परवशतेचा काळ म्हणजे एक अंधःकारमय पर्व, या पर्वात मिळालेले थोडीशीही स्वातंत्र्याची आशा म्हणजे पर्वणीच!ही आशा म्हणजेच जणू लखलखणारी चांदणीच!जी आपल्याला आकर्षित करू शकते. योग्य प्रतिमान वापरून ‘चमचम’ ‘लखलखशी’ सारख्या शब्दांनी काव्याचे माधुर्य वाढतेच व ते वाचणे म्हणजे आपल्यालाही आनंदाची पर्वणीच!
प्रत्येकच कडव्यात मांडलेल्या एकापेक्षा एक सुंदर कल्पना म्हणजे शब्द आणि विचार यांचा अपूर्व संगमच! उपजत बुद्धिमत्ता व सुंदर कल्पना यांचे दुग्ध-शर्करा मिश्रणच!हे काव्यरसाचे मिश्रणच रसपाना साठी आपल्या समोर ठेवले त्यांनी. रसपान करतांना त्यांच्या आर्त शब्दांचे घोटही आपल्या मनाला भिडतात.
पूढे ते लिहितात…
“गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली”
हे कडवे वाचतांना तर एक अपूर्व शब्दचित्रच आपल्यापुढे डोलते. गालावरच्या लालिमायुक्त सौंदर्याचे
फूल केव्हा विलसेल? गालावरच्या सुंदर फुलाची लाली मुक्त विहार करणार्या व्यक्तिच्या गालावरच विलसू शकेल. गालावरचे फूल किंवा फुलांचेच गाल ही एकमेकांवरच्या प्रत्यारोपाची भ्रांतिमान कल्पना एक अपूर्व शब्दमाधुर्य निर्माण करते. ते फक्त रसिकांनाच जाणवू शकते, व्यक्त करणे कठीणच!
पुढे देवीला किती अर्थपूर्ण विशेषणे लावतात बघा….
“तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यही तूची”
हे स्वातंत्र्यदेवते! सूर्याचे तेज तथा सागराचे गांभीर्यही तूच आहेस. अतिशय तेजस्वी असूनही ग्रहण लागल्यावर तो तेजोहिनच होतो. ग्रहण सुटल्यावरच त्याला परत पूर्वीचे तेज प्राप्त होते. सागराच्या गंभीरतेचा अर्थ तरी काय आहे?उथळ किनार्यावर, आपल्या मनातली खळबळ, लाटांच्या स्वरुपात धडकवण्याचे स्वातंत्र्य घेऊनच आतल्या खोल समुद्राला गंभीरतेचे सौंदर्य प्राप्त होते नं!विचारस्वातंत्र्य नसतांना मांडलेल्या तत्त्वज्ञानाला काय अर्थ आहे?ते ही परतंत्रच असते. आणिबाणीत स्वराज्यात देखील आपण ते अनुभले आहेच.
त्यांची स्वातंत्र्याबद्दलची ओढच इतकी जबरदस्त होती की त्या व्यक्त करण्यासाठी त्यांनी मांडलेल्या कल्पना सहजस्फूर्तच वाटतात. भारतीय तत्त्वज्ञानातील कल्पनांचा आधार घेऊन पुढे ते म्हणतात….
“मोक्ष मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदान्ती”
मोक्ष आणि मुक्ति तरी काय?तुझीच म्हणजेच स्वातंत्र्याचीच रूपे! इतकेच नाही तर या जगात जे काही उत्तम! उदात्त! आणि नितांत सुंदर आहे त्याला ‘तुझा’ म्हणजेच ‘स्वातंत्र्याचा’ परीसस्पर्श असतोच! कारण राजकीय दडपशाही असेल तर कुठलाही योग्य विचार, तत्त्वज्ञान मांडण्याचे स्वातंत्र्यच कुठे असते?पृथ्वी गोल आहे आहे हे सिद्ध करू शकत असला तरी शास्त्रज्ञाला ते मांडायचा अधिकार राजसत्तेच्याच मर्जीवर!
म्हणूनच दुर्गामाता, कालीमातेप्रमाणेच अधम अधम लोकांच्या रक्ताने रंगलेल्या व चांगल्या लोकांचे पूजन करणार्या देवतेला ते सांगतात….
“तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण चराचर शरण”
स्वातंत्र्यासाठी जगण्याची इच्छा असणारी पूर्ण चराचर सृष्टी तुलाच शरण जाते, तुला मिळवण्याचीच धडपड करत असते. म्हणूनच आम्हा सगळ्या भारतवासीयांतर्फे मी तुला प्रार्थना करतो की आम्हाला अलिंगन द्यायला तू लवकर ये”.
” सकल चराचर शरण चराचर शरण”
अनुप्रासयुक्त ओळी मधून नादमाधुर्याबरोबरच आशयही द्विगुणीत होतो. अलंकाराचे सौंदर्य जपतांना अर्थाची ओढाताण कुठेही होत नाही या काव्यात!आशयासोबत अलंकार रत्नजडीत दागिण्यांप्रमाणे मिरवतात या कवितेत.
यानंतरच्या कडव्यात तर त्यांचा सूर अतिशयच हळवा व लाडिक झाला आहे. ते म्हणतात….
“हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रीडा तेथे करण्याचा का वीट तुला आला”
प्रत्यक्ष भगवान शंकरालाही कैलास पर्वतावर रहाण्याचा मोह झाला आणि तुला मात्र येथे क्रीडा करायला देखील यावेसे वाटत नाही?
यानंतरची कल्पना बघा किती सुंदर आहे! ते म्हणतात, जान्हवीचा सुधाधवल स्त्रोत अप्सरांना देखील सरसे करण्याला आवडतो. भारतभूमीला ‘सुवर्णभूमी’ म्हटल्या जाते. या सुवर्णभूमीत रहायला काय कमी पडले तुला?हवं तर कोहिनूरचे ताजे पुष्प वेणीत माळायला घे पण इथे वास्तव्याला लवकर ये. पूर्वीप्रमाणेच आमच्यावर प्रेम कर. माझ्या सकलगुणसंपन्न मातेसाठी, तुला प्राप्त करण्यास यश मिळावे म्हणून मी माझ्या शब्दांची आरती करतोय तुझी!
खरंच! या शब्दप्रभूने किती आंतरिक तळमळीने व सुंदर शब्दात आळवणी केली आहे या स्तोत्राद्वारे!
मम्मटाने काव्यप्रकाशात काव्याच्या रसास्वादासाठी अनेक निकष व अलंकारांचे वर्णन केले आहे. स्वा. सावरकरांनी देखील अर्थालंकार व शब्दालंकारांची पखरण करीत, उत्तमोत्तम कल्पना व प्रतीमांच्या आधारे काव्याची एक मनोहर यात्रा या कवितेद्वारे आपल्याला घडवली हे आपण बघितलेच. काव्यात गेयता असेल तरच एखादे सुंदर काव्य संदेशासकट लोकांपुढे सादर होते. मधुकर गोळवलकरांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत लतादिदींनी आपल्या मधुर आवाजात गाऊन अजरामर केले आहे. अर्थातच स्वा. सावरकरांची किर्ती म्हणजे ‘स्वयमेव मृगेंद्रता!
मम्मटानी काव्यप्रकाश मधे म्हटले आहे..
“काव्यं यशसेsर्थकृते, व्यवहारविदे, शिवेतरक्षतये,
सद्यःपरनिवृत्तये, कांतासंमिततयोपदेशयुजे”
काव्य यश, पैसा, कल्याणकारी, वाचल्याबरोबर आनंद देणारे, पत्नी व मित्राप्रमाणे योग्य मार्गदर्शन करणारे असावे.
देशासाठी घरादाराची होळी झालेल्या या देशभक्ताला अर्थप्राप्तीची अभिलाषा कधीच नव्हती.
पारतंत्र्यरूपी अमंगलाचा नाश व्हावा व देशाचे कल्याण व्हावे हेच यातून सूचित होते. सद्यः परिस्थितीत लोकांपुढे कार्याचे उद्दिष्ट काय असावे याचा परिपाठच या स्तोत्राने घालून दिला आहे.
त्यांच्या काव्याचे गाण्यामधून जे सुंदर रुपडे रसिकांपुढे येते ते हे गीत रसिक आपसुकच गुणगुणतात व नंतर त्यांच्याही मनात सावकरांइतकी नसली तरी अंशतः का होईना, देशभक्तिची भावना जागृत होते. त्यातूनच देशाने वेळोवेळी पुकारलेल्या आव्हानांना आपण एकत्र येऊन प्रतिसाद देतो. कानीकपाळी अोरडून सांगितलेल्या भाषणापेक्षा सुंदर काव्यातून निर्माण होणारी जागृती नक्कीच दीर्घकाळ परिणामकारक ठरते.
कुठलाही भाव मनात नसतांना ‘जयोस्तुते’ हे भावपूर्ण गीत कानावर पडते त्यावेळी गाण्यातील एकेक शब्द रसिकांच्याही मनात घर करून रहातो. त्यावेळी उरलेले असते ते गाण्याचे शुद्ध, सात्त्विक स्वरुप! आणि ते आपल्याला आनंदाची वारंवार प्रचिती आणून देत असते.
या काव्यात संस्कृतप्रचुर शब्द असूनही काव्याची मधुरता कुठेही कमी होत नाही. तसेच मला तरी असे वाटते की पहिल्यांदा वाचतांना काव्य थोडे कठीण वाटले तरी पुन्हा वाचतांना काव्य दुर्बोध वाटत नाही. मध्यवर्ती कल्पना नीट समजावून घेतल्यानंतर अनेक शब्दांचा अर्थ आपल्यापुढे आपोआप उलगडत येतो. कुठलेही कठीण शब्द उगाच मधे आल्यासारखे बोचत नाहीत. उलट हवा तो आशय व्यक्त करणारे व काव्याची गोडी वाढवणारेच वाटतात. ऐकणार्या प्रत्येकाला, तो कुठल्याही प्रकारच्या पारतंत्र्यात असला तरी हे गीत स्वातंत्र्याची ओढ लावल्याशिवाय रहाणार नाही. हेच या काव्याचे मोठे यश आहे असे मला वाटते.
☆ योगी… कवयित्री – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण.. श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
माणसाचा आणि निसर्गाचा काहीही संबंध नाही असे समजणारी माणसे समाजामध्ये आहेत. पण ती माणसे हे विसरुन जातात की माणूस हाच मुळी निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. आपला प्रत्येक सण, उत्सव किंबहुना आपली संस्कृतीच निसर्गावर आधारलेली आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे कवी, कवयित्री, चित्रकार यासारख्या कलाकाराला स्वतःच्या आयुष्याकडे पाहतानाही निसर्ग हा आठवतोच! निसर्गातील प्रतीके वापरुन मानवी जीवनाचा अर्थ व्यक्त करणारी अनेक काव्ये, साहित्यकृती आपण वाचल्या आहेत. अशीच एक रुपकात्मक कविता वाचनात आली. ती म्हणजे कवयित्री सौ. राधिका भांडारकर यांची ‘ योगी ‘ ही कविता.
सौ राधिका भांडारकर
☆ योगी ☆
☆
मातीतल्या बीजाला
अंकुर फुटतो
धरणीला आनंद होतो
पावसाचे शिंपण होते
अन् रोप उलगडते
हळुहळू त्याचा
वृक्ष होतो
तो बहरतो, फुलतो, फळतो
आनंदाची सर्वत्र पखरण करतो
मग आयुष्याचा तो क्षण येतो
पानगळीचा…
एक एक पान गळू लागते
फांदीला सोडून धरणीवर उतरते
त्याचवेळी आभाळाची ओढ सरते
ज्या मातीतून उगवले
तिथेच परतीची पाऊले
विलग पानांचा होतो पाचोळा
वार्यावर उडतो कचरा सोनसळा
वृक्ष होतो बोडका
तरी भासतो योग्यासारखा
गळणार्या पर्णांना निरोप देताना
उभा ताठ, ना खंत ना वेदना
कर्मयोगी निवृत्तनाथ
ऋतुचक्राशी असे बद्ध
एकाकी हा कातरवेळी
संवाद करी पानगळी
हा शिशिर सरेल
पुन्हा वसंत फुलेल
नव्या जन्मी नवी पालवी
हिरवाईने पुन्हा नटेल. .
~ राधिका भांडारकर
‘योगी’ ही एक रुपकात्मक कविता आहे. माणसाचं जगणं समजावून सांगण्यासाठी निसर्गातील वृक्षाचा रुपक म्हणून उपयोग करुन घेतला आहे. कविता जसजशी वाचत जावी तसतसं लक्षात येत की हे सगळं मानवी जीवनाला लागू होतय. सुरुवातीला कवयित्री म्हणते,
“मातीतल्या बीजाला
अंकुर फुटतो
धरणीला आनंद होतो
पावसाचे शिंपण होते
अन् रोप उलगडते
हळुहळू त्याचा
वृक्ष होतो
तो बहरतो, फुलतो, फळतो
आनंदाची सर्वत्र पखरण करतो”
बाळाला जन्म दिल्यावर मातेला होणारा आनंद आणि बीजाला अंकुर फुटल्यावर मातीला होणारा आनंद — मातेला होणारा असो किंवा मातीला होणारा आनंद असो — त्या आनंदाची अनुभूती एकाच प्रतीची नाही का ? सृजनशीलतेचा आनंद अगदी एकसारखाच आहे. पुढे पाऊस पडतो. पाणी मिळत जातं आणि रोप उलगडते. आई तरी याशिवाय वेगळं काय करते ? संगोपनाच्या मेघातून मायेचा वर्षाव होतो आणि मूल मोठं होत जातं, नाही का ? कवितेत पुढे म्हटल्याप्रमाणे रोपाचा जसा वृक्ष होतो तसे त्या बाळाचेही रुपांतर पूर्ण व्यक्तीमध्ये होते. वृक्षाने सर्वांगाने बहरावे त्याप्रमाणे माणूसही त्याच्यावर होणार -या संस्कारांमुळे पूर्ण विकसित होतो. त्याच्या कर्तृत्वाने फुलतो, कर्माची फळे मिळवत जातो आणि आनंदाची, सौख्याची पखरण करतो–एखाद्या वृक्षाप्रमाणेच!
निसर्गाचा जो नियम वृक्षाला लागू, तोच नियम माणसालाही लागू होतो. (कारण माणूस निसर्गापासून वेगळा नाहीच). यापुढील काव्यपंक्ती,
“मग आयुष्याचा तो क्षण येतो
पानगळीचा. . .
एक एक पान गळू लागते
फांदीला सोडून धरणीवर उतरते
त्याचवेळी आभाळाची ओढ
सरते. “
या काव्यपंक्ती काय सुचवतात पहा. वृक्षांची पानगळ सुरु होते. पूर्ण बहरलेला वृक्ष एक एक पान गाळू लागतो आणि निष्पर्ण होऊ लागतो. त्याचे वैभव ओसरते. ही पानगळ असते त्या वृक्षाच्या आयुष्यातील उतरणीचा, संकटाचा काळ असतो. माणसाच्या आयुष्यातही संकटे येतात. माणूस काही काळ खचून जातो. वैभवाला, प्रगतीला उतरती कळा लागते. कवयित्रीने पुढे म्हटल्याप्रमाणे ” आभाळाची ओढ सरते “. म्हणजे नवीन काही करण्याची, पुढे जाण्याची, आभाळ कवेत घेण्याची उमेद रहात नाही. त्यापुढील काव्यपंक्ती
“ज्या मातीतून उगवले
तिथेच परतीची पाऊले”
या ओळी हेच सांगतात की ज्या मातीतून पाने वर वर आली त्याच मातीत पानगळीच्या निमित्ताने ती पाचोळा होऊन खाली पडत आहेत, वृक्षापासून अलग होत आहेत. म्हणजे जिथे वैभव मिळाले तिथेच ते सोडून देण्याची वेळ येते. बघता बघता वृक्ष बोडका होतो. फक्त शुष्क फांद्या दिसू लागतात. पानगळ होत असताना तो निमुटपणे सहन करत एखाद्या कर्मयोग्यासारखा, खंत, खेदाच्या पलीकडे जाऊन ताठपणे उभा असतो. जी पाने गळून गेली त्याबद्दल दुःख नाही. उलट ऋतूचक्राशी असलेले नाते समजून घेऊन पानझडीचा शिशिर संपण्याची वाट पहात उभा असतो. कारण त्याला माहित असतं, पुढे वसंत येणार आहे. पालवी फुटणार आहे. नवी पाने येणार आहेत. पुन्हा हिरवाईने नटायचे आहे. आभाळाकडे झेप घ्यायची आहे.
मानवी जीवनाचे यापेक्षा वेगळे काय आहे ? संकटांचा ऋतू आला की सुखाची पानगळ सुरु होते. प्रगती थांबली की काय असे वाटू लागते. हे सगळं यश, वैभव इथेच सोडून जावं लागणार की काय ? अशीही भावना होऊ लागते. पण… पण तरीही माणूस डगमगत नाही. कारण त्यालाही जीवनचक्राचे नियम माहित होतात. दुःखाचे वादळ आले तरी त्याला वावटळ समजून अंगावर घेतले पाहिजे. कारण पुढे सुखाचा वसंत येणार आहे याची खात्री असते. हा विश्वास त्याला कुठून मिळतो ? निसर्गातूनच! असा एखादा वृक्ष दिसू लागतो पुनःपुन्हा बहरणारा आणि त्याच्या मनाच्या मातीतही उमेदीचे अंकुर फुटू लागतात. मानवी जीवन आणि निसर्ग यांच हे अतूट नातं कवयित्रिने अगदी अचूकपणे टिपले आहे.
कवितेत वापरलेले ‘कर्मयोगी निवृत्तीनाथ’ हे शब्द मला फार महत्त्वाचे वाटतात. कारण कर्म करुनही त्याचे फळ मिळाले नाही किंवा मिळालेले फळ निसटून गेले तरी मनाची शांती ढळू न देता जो निवृत्त होतो तोच खरा कर्मयोगी आणि निवृत्तीनाथ ! वृक्षाच्या प्रतिकातून मानवी जीवनावर सहजपणे भाष्य करताना कवितेला झालेल्या या आध्यात्मिक विचारांच्या स्पर्शामुळे कविता एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचते. आयुष्यातील चढउतार पचवायची ताकद ख-या कर्मयोग्यातच असते. निवृत्त होऊनही नव्या जन्मीच्या हिरवाईची वाट पाहणारा जीवनाविषयीचा आशावाद, सकारात्मकता या कवितेतून दिसून येते.
“ज्या मातीतून उगवले
तिथेच परतीची पाऊले”
या ओळी वाचताना “माती असशी, मातीत मिसळशी” किंवा “तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी, माती सांगे कुंभाराला” या काव्यपंक्तींची आठवण येतेच. एकच विचार प्रत्येक कवी आपल्या स्वतंत्र प्रतिभेने कशा पद्धतीने मांडत असतो हे अशा काव्यांतून स्पष्ट होते.
वृक्षाच्या अंगी असलेले कर्मयोगीत्व जर माणसाने अंगिकारले तर त्याचं जीवनही पुनःपुन्हा प्रगतीच्या, वैभवाच्या हिरवाईने बहरून येईल असा सुप्त संदेश देणारी ही कविता एक सुंदर निसर्ग काव्याचे रुप घेऊन आपल्यासमोर सादर केल्याबद्दल कवयित्री सौ. राधिका भांडारकर यांना मनःपूर्वक धन्यवाद!
रसग्रहण – सुहास रघुनाथ पंडित
सांगली.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ हेचि दान देगा देवा… कवी : संत तुकाराम ☆ रसग्रहण – सौ. वृंदा गंभीर☆
☆
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा..
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी..
नलगे मुक्ति धन संपदा. संतसंग देई सदा..
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी..
हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा
जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात देवा एक दान दे किंवा वरदान दे तुझा विसर कधी पडू देऊ नको.
मानव जन्म आला कि व्याप हाल अपेष्टा आल्याचं संसार आलाच कष्ट आलेच… संसारात गुंतून न राहता तुझी आठवण कायम असू दे तुझे गोड नाम मुखात असू दे दुसरं काही नको…
अमृताहूनी गोड नाम तुझे देवा
देवा तुझे नाम अमृताहून गोड आहे तुझ्या नामात शक्ती आहे तुझे नाम म्हणजे सत्य आहे. योग्य मार्ग आहे तेंव्हा देवा तुझा विसर पडू देऊ नको.
गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी
तुझे गुण मी आवडीने गाईन सत्कर्म करत राहील तुझे नाम अतिप्रिय आहे तुझं विस्मरण मी कधी होऊ देणार नाही देवा तू नेहमीच स्मरणात असावास म्हणून मी तुझे गोड गुणगान गात राहील.
घरादार मुलं बाळ धन संपदा जोडण्यापेक्षा मी पुण्य जोडत राहील धन जमा करण्याच्या नादात तुझा विसर पडतो तुझे कार्याचा विसर पडतो.
मानव जन्म मिळून पण जीवनाचे सार्थक करता येत नाही नाशिवंत सुखाच्या मागे धावून शाश्वत सुख विसरतो शाश्वत सुख तुझ्या नामात आहे म्हणून मी तुझ्या नामाशी जोडला जाणार आहे.
जीवनात अध्यात्मिक सुख पाहिजे कलियुगात भौतिक सुखाच्या मागे लागून दुःख प्राप्त होतं आणि तुझा विसर पडतो.
मला हे सुख नको आहे मला शाश्वत सुख जोडायचं आहे.
न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा
मला धन नकोय मुक्ती नकोय संतांची संगत हवी आहे.
मुक्ती मिळाली तर मी तुझ्या पासून लांब जाईल मला पुन्हा पुन्हा मानव जन्म दे मी तुझे गुणगान गाईल तुझी सेवा करत राहील.
तुझी सेवा घडावी म्हणून मला संतांची संगत दे संत सहवासात राहूदे * गुरु असावा महाज्ञानी गुरु महाज्ञानी असेलतर जीवनात मार्ग सापडतो म्हणून संत संगत दे…
सुसंगतीने सुविचार प्राप्त होतात तर कुसंगतीने जीवन बरबाद होतं.
संगत जशी असेल तसं जीवन घडत असतं. जीवन सार्थकी लावायचे असेलतर संत संग आवश्यक आहे.
देवा, हे पांडुरंगा मला फक्त संत संग दे धन नको मुक्ती नको भक्ती दे.
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावेआम्हीसी
तुकाराम महाराज म्हणतात आता सुखाने जाऊदे गर्भातून तुझी सेवा करण्यासाठी आलो होतो आता तुझी सेवा झाली माझे कार्य संपले आहे. तेंव्हा देवा मला आनंदात स्वर्गसूख मिळूदे जिथे फक्त तुझे चरण असतील.
“गर्भात असताना सोहंम सोहंम जप होतो, बाहेर आल्यावर कोहम कोहम सुरु होतं.
कोहम, म्हणजे का आणलंस तू इथे मला का दूर केल तुझ्यापासून ही आर्त हाक असते बाळाची.
म्हणून महाराज म्हणतात गर्भवासी होतो आता सुखाने स्वर्गवासी होऊ दे शेवटचा दिवस गोड व्हावा
☆ आनंद जीवनाचा – कवी – अज्ञात ☆ रसग्रहण.. सौ. वृंदा गंभीर☆
☆ आनंद जीवनाचा ☆
*
आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा,,,
आनंद या जीवनाचा,,,
*
झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा
हे जनता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा
आनंद या जीवनाचा,,,
*
संसार वेली वरही सुख दुःख फुलुनी फुलावे
संदेश हा जीवनाचा दुःखी मनी हर्षवावा
आनंद हा जीवनाचा,,,
*
जीवनी जगता हसुनी सुख दुःख प्रतिसाद द्यावा
हसता हसता हसुनी गतकाळ ही आठवावा
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा
गीतकार – अज्ञात
*
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा
*
आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात.
माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.
बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.
झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा
हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा
स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जाणता आलं पाहिजे. जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.
हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी. आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत, काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करायला हवे. जीवन फार सुंदर आहे. ते जगता यायला हवं. दुसऱ्या साठी जगायला हवं. तेंव्हाच मनुष्य मूर्ती रूपाने गेला तरी किर्ती रूपाने कायम राहतो. जीवनाचा अर्थ ज्याला कळतो तो आमरत्व प्राप्त करून जातो. त्यांना कोणीही विसरू शकत नाही. जसे आपले रतन टाटा जी, सिंधुताई सपकाळ असे अनेक आहेत ज्यांनी चंदनासारखे झिजून दुसऱ्याला सुंदर जीवन दिल.
संसार वेलीवरही सुख दुःख फुलुनी फुलावे
संदेश हा जीवनाचा दुःखी मनी हर्षवावा
संसाराची वेल नाजूक आणि कठीण असते. सुख दुःख अपार असतात. त्याही पलीकडे जाऊन ते फुलावावे लागतात. संसार प्रेमाने हळू हळू बहरत जातो, फुलत जातो. संयम, त्याग, एकमेकांची साथ असेलतर फुलत जातो. हार न मानता फुलावावा लागतो.
पूर्वी एक म्हण होती ” संसार सुई वरून बारीक आणि मुसळहून ठोसर आहे ” काटकसर, तडजोड, नियोजन करून संसार पुढे न्यावा लागतो.
सुख न सांगता जीवनाचा हा संदेश दुःखीत मनांना आनंद देईल असे करावे. आपलं सुख सांगून इतरांना दुःख देण्यापेक्षा आपण काय करून कुठले दुःख भोगून संकटांचा सामना करून इथपर्यंत पोहचलो याची जाणीव करून प्रेरणा द्यावी.
जीवनाची कहाणी सांगावी. म्हणजे दुःख सहन करण्याची ताकद मिळते.
जीवनी जगता हसुनी सुख दुःख प्रतिसाद द्यावा
हसता हसता परंतू गतकाळ ही आठवावा
आपण जीवन हसत जगत असलो तरी इतरांच्या सुख दुःखाला प्रतिसाद देता आला पाहिजे. त्यात सहभागी होता आलं पाहिजे. सुखमय सगळे होतात. दुःख वाटून घेता आलं पाहिजे. सुखात सगळेच बरोबर असतात. दुःखात राहता आलं पाहिजे. हेच जीवनाचं सार आहे. हाच जीवनपट आहे.
आपल्याला सुख आल्यावर चेहऱ्यावर हसू आल्यावर आपला भूतकाळ आठवत राहिलं पाहिजे. म्हणजे पाय जमिनीवर राहतात व माणूस माणसा सारखा वागतो. त्याला गर्व अहंकार शिवत नाही. मी पणाची बाधा होत नाही. आपला गतकाळ नेहमी स्मरणात असावा. यशाची दिशा आपोआप मिळत जाते.
भुकेलेल्याला अन्न तहणनेलेल्याला पाणी ही आपली संस्कृती जपावी हेच मोठं सुख आणि श्रीमंती.
हे तत्व पाळले तर आनंद मिळेल. आनंद वाटता येईल आणि सुगंध किर्ती रूपाने दरवळत राहील
माणिक सिताराम गोडघाटे म्हणजेच कवी ग्रेस (१० मे, १९३७ – २६ मार्च, २०१२). साहित्य विश्वात कवी ग्रेस हीच त्यांची खरी ओळख. बा.सी. मर्ढेकरांनंतर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये त्यांची गणना होते. ग्रेस यांच्या कवितेत एकप्रकारची दुर्बोधता जाणवते. यावर त्यांचे उत्तर असायचे की,” मी जे काव्य करतो ते माझे स्वगत असते आणि स्वगतात भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगताला श्रोता नसतो. मीच माझा फक्त असतो,”
असा हा एक मुक्त काहीसा कलंदर कवी. ज्ञानाचे सोंग न करणारा, दुर्बोधतेत संदेश देणारा आणि त्याच वेळी सामाजिक भान ठेवणारा, शब्दकोषांना नवीन शब्द देणारा असा नामांकित कवी.
संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनाऱ्यावरती
*लाटांचा आज पहारा…*किंवा
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते अथवा
मी महाकवी दुःखाचा, प्राचीन नदीपरी खोल
दगडाचे माझ्या हाती, वेगाने होते फुल
अशा कितीतरी ग्रेस यांच्या काव्यपंक्ती मनाला चिपकलेल्या आहेत.
नुकतीच मी त्यांची कर्णभूल ही कविता पुन्हा वाचली. खूप वेळा वाचली. अर्थ शोधत शोधत वाचली आणि या कवितेत मला काहीतरी सापडलं आणि जे मला सापडलं ते तुमच्यापाशी बोलावं असं वाटलं म्हणून या कवितेचं रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न करत आहे.
सुरुवातीला आपण त्यांची कर्णभूल ही कविता संपूर्ण वाचूया.
☆ कर्णभूल – कवी : ग्रेस ☆
*
त्याने दान मांडताना
तिची झोळी तपासली
चंद्र चांदण्याच्या खाली
होत्या वाळवीच्या साली
*
उभा राजवाडा लख्ख
शोधे जादूची बासरी
पट्टी डोळ्याची बांधून
कुठे पाहे ना गांधारी
*
चंद्र सूर्याची सावली
त्याचे सत्य हले डूले
स्वप्नसंगात सोडतो
कर्ण कवचकुंडले
– ग्रेस
ही कविता वाचल्यावर पटकन जाणवते ते या कवितेत महाभारतातील घटनेचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या पात्रांचा उल्लेख आहे. शिवाय कवितेच्या शीर्षकावरूनही प्रारंभी हाच बोध होतो. कर्ण ही महाभारतातील उपेक्षित व्यक्ती पण तरीही बहुआयामी आणि आदरणीय. उपेक्षित असली तरी दुर्लक्षित नक्कीच नाही. कर्णाच्या मनातल्या भावभावनांचा प्रवाह कवीने या काव्यात एका विशिष्ट वैचारिकतेतून मांडला आहे असे वाटते.
त्याने दान मांडताना
तिची झोळी तपासली
चंद्र चांदण्यांच्या खाली
होत्या वाळवीच्या साली…१
कुरुक्षेत्री कौरव पांडव यांच्यात घनघोर युद्ध होणार आहे. या युद्धातले खरे नायक म्हणजे धनुर्विद्यानिपुण अर्जुन आणि राजनीतिज्ञ युगंधर कृष्ण. युद्ध अटळ आहे. कृष्णाची शिष्टाई असफल ठरली आहे. फक्त एकच हुकुमाचे पान तेवढं बाकी आहे. कर्णाच्या जन्माचे रहस्य जे कुंतीने आजपर्यंत लपवून ठेवलंय. कुंती जाणून आहे की कर्ण हा अर्जुना इतकाच तोलामोलाचा योद्धा आहे. पण तो शत्रुपक्षात असल्यामुळे तिला पांडवांच्या विजयाबद्दल कुठेतरी भय आहे आणि याच क्षणी कर्णाच्या दानशूर वृत्तीची जणू काही परीक्षा घेण्यासाठीच ती स्वतः कर्णाला युद्धापूर्वी भेटते आणि कर्णाच्या जन्माचे रहस्य त्याला सांगते आणि त्याचवेळी अर्जुनाच्या प्राणांचे दान मागते. थोडक्यात ती कर्णाला भावनिक आवाहन देते. (इमोशनल ब्लॅकमेलच करते म्हणाना!)
त्यावेळी कर्णाच्या अंतरात भावनांचं वादळ उठलं असणार. मागितलेलं दान तर द्यायलाच हवं पण ते देण्याआधी त्याच्या मनात कुंतीविषयी नक्कीच करुणा उत्पन्न झाली असावी.
तिची झोळी तपासली या शब्दरचनेतून कवी ग्रेस जणू काही कर्णाचं मन मांडत आहेत. कुंतीच्या अस्तित्वाचा विचार कर्णाच्या मनात येतो आणि त्याला जाणवतं की “या माऊलीच्या वाटेवर फक्त वरवरच चंद्र चांदण्यांची पखरण असल्यासारखी भासते पण प्रत्यक्षात मात्र तिच्या जीवनाला जणू काही व्यथांच्या वाळवीनेच पोखरलेलं आहे. ती एक असहाय, दुःखात्मा आहे याच दृष्टीकोनातून कर्ण या भेटीच्या वेळी तिच्याकडे पहात असावा. कुठली सुखे होती तिच्या जीवनात? शापितच आयुष्य तिचे… पती-वियोग, वनवास सारे सारे भोगले हिने.
या चरणात झोळी, वाळवी, हे कुंतीच्या दुःखासाठी योजलेले प्रतिकात्मक शब्द आहेत आणि त्यातूनच तिचे करुणामय जीवन उलगडते.
उभा राजवाडा लख्ख
शोधे जादूची बासरी
पट्टी डोळ्यांची बांधून
कुठे पाहे ना गांधारी॥ २ ॥
या चरणामध्ये वाचकांपुढे येथे ती डोळ्याला पट्टी बांधून वावरणारी गांधारी. जशी कुंती तशीच गांधारी. दोघीही राजवाड्यात राहूनही दुःखीच. वास्तविक गांधारी म्हणजे हस्तीनापुरची महाराणी! उभा राजवाडा लखलखतोय पण गांधारीच्या आयुष्यात साचलाय तो अंधार.. दाट काळोख! पातिव्रत्य सांभाळत अंध पतीसाठी तिनेही जीवनभर डोळ्यावर पट्टी बांधली आणि एका गुढ अंधारातच ती जगली. आश्वासक असं तिच्याजवळ काय होतं?
शोधे जादूची बासरी या शब्दरचनेतून कृष्ण दर्शन होते पण गांधारीला कुठे मिळाला कृष्णचरणी विसावा? कृष्ण प्रेम हेही पांडवांसाठीच नित्य होते. खरोखरच गांधारीच्या आयुष्याचे सारेच सूर हरवलेले होते.
चंद्र सूर्याची सावली
त्याचे सत्य हाले डुले
स्वप्न संगात सोडतो
कर्ण कवच कुंडले..॥३॥
हा शेवटचा चरणही प्रतिकात्मक आहे. चंद्र, सूर्य, सावली ही यश अपयशाच्या अर्थाने वापरलेली रूपके असावीत आणि जेव्हा हा विचार मनात येतो तेव्हा अर्थातच कर्णाचा जीवनपट उभा राहतो. आयुष्यभर सुतपुत्र म्हणूनच त्याची उपेक्षा झाली. क्षत्रिय असूनही त्याच्या क्षात्रतेजाला योग्य ती मान्यता मिळाली नाही. त्याच्या जन्माचे रहस्यही कुणी जाणण्याचा प्रयत्न केला नाही. त्या वेळेच्या समाजासाठी तो एक परित्यक्त, सुतपुत्र, राधेय होता. मात्र दुर्योधनाने चाणाक्षपणे त्याला मैत्रीचा हात दिला. अंगद देशाचे राज्यपद ही दिले. आणि एक प्रकारे त्याच्या जीवनात शीतल सावली आणली.
त्याचे सत्य हाले डुले यातला हाले डुले हा कवीने वापरलेला जोडशब्द फारच चपखल आहे. सत्य कुणालाच कळले नाही आणि जो काही मानसन्मान मित्र दुर्योधनाकडून कर्णाला मिळाला होता त्यातलाही आनंद परिपूर्ण नव्हता. जीवनात अनेक चढ —उतार, खड्डे, यश अपयश, अवहेलना याचा सामना कर्णाला करावा लागला होता.
दाता, दानशूर म्हणून त्याचा लौकिक होता. जगाला दान देण्याचं एक समाधानयुक्त स्वप्न तो पूर्ण करत असतानाच, कुरुक्षेत्री युद्ध सुरू होण्यापूर्वी साक्षात इंद्र कर्णापुढे उभा राहतो आणि कर्णाला मिळालेली जन्मजात कवच कुंडले दान म्हणून मागतो. कर्णाच्या जीवनातला अत्यंत कसोटीचा क्षण पण इंद्राला कवच कुंडले अर्पण करून तिथेही कर्ण दात्याचा धर्म अक्षरशः पाळतो. नियती ही नेहमीच कर्णाच्या विरोधात राहिली. अर्थात यामध्ये स्वप्न, धर्म आणि समाधान यांच्या बदल्यात कर्ण एक प्रकारे युद्धाच्या प्रारंभीच स्वतःचे बलिदान जणू काही मान्य करतो.
हे तीनही चरण वाचल्यानंतर मनात अनंत प्रश्न उभे राहतात. कवी ग्रेसच्या काव्याचं वैशिष्ट्य हेच आहे की काव्यातलं अव्यक्त जे आहे ते वाचकाने स्वजाणिवेतून जाणावे. प्रथम वाचकांचं मन घुटमळतं ते शीर्षकाभवती.
कर्णभूल
कर्णाची चूक असा अर्थ घेतला तर मनात येते.. काय चूक होती कर्णाची किंवा कोणती चूक कर्णाने केली? दुर्योधनासारख्या अधर्मी पक्षासाठी त्याने का आपले जीवन व्यर्थ घालवले? त्याचवेळी कर्णभूल या शब्दरचनेतले इतर अनेक रंग, अनेक अर्थ आणि अनेक दृष्टिकोन उलगडण्यातच वाचकांचे मन गुंतून राहतं.
कर्णभूल याचा दुसरा अर्थ असाही असू शकतो की कर्णाला समजून घेण्यामध्ये इतरांची झालेली चूक. कर्णाला कुणीच समजून घेतले नाही का?
कुंती, गांधारी आणि कर्ण हे मग समदु:खी जाणवायला लागतात. तसेच कवीच्या मनातल्या, या पात्रांनी केलेल्या चुका वाचकांपुढे सुस्पष्ट होऊ लागतात.
का कुंतीने कर्णाच्या जन्माचे रहस्य दडवून ठेवले?
का गांधारीने केवळ संकेताच्या मागे जाऊन डोळ्यावर पट्टी बांधली? कदाचित गांधारी दृष्टी घेऊन वावरली असती तर महाभारत वेगळे झाले असते का?
का कर्णाने मैत्रीच्या वचनाखातर दुर्योधनाची अनिती दुर्लक्षित केली?
या विचारांती हे संपूर्ण तीनच कडव्यांचं लहानसं वाटणारं काव्य डोंगराएवढा अर्थ घेऊन आपल्यासमोर खळाळतं. या काव्याच्या आणि त्यातल्या ओळखीच्या पात्रांच्या माध्यमातून कवी ग्रेसना वेगळंच काहीतरी सांगायचं आहे का?
कुंती, गांधारी, कर्ण यांची जीवनेही मग प्रतिकात्मक वाटू लागतात. मानवी जीवनाशी यांचा संदर्भ जुळवताना वाटते, अखेर सत्य एकच… चुकीचा कुठलाही मार्ग यशाच्या दिशेने जात नाही. चूक छोटी किंवा मोठी नसतेच. चूक ही चूकच असते आणि त्यांचे अंतिम परिणाम हे नकारात्मक असतात आणि हेच सत्य कदाचित ग्रेस ना महाभारतातील या पात्रांद्वारे जगापुढे मांडायचे असतील…
समाजात वावरत असताना कधी कधी आपणही नकळत एक मुखवटा चढवलेला असतो. अनेकांच्या मुखवट्यासोबत तोही वावरत असतो. आपल्या मनात नक्की काय चाललं आहे हे इतरांना कळू नये म्हणूनही असेल कदाचित ही यातायात पण कधीतरी हा बुडबुडा फुटतो आणि अजाणता आपलाच आपल्या मनाशी संवाद घडतो. मनात अनेक प्रश्न उभे राहतात. का? कशाला? का मी या सगळ्यातून स्वतःला सोडवू शकत नाही आणि त्या क्षणापासून सुरू होतं एक सूक्ष्म मानसिक परिवर्तन, बदल, एक ठाम निर्णय, ठोस भूमिका.
अशाच अर्थाची माननीय कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांची नाते स्वतःशी ही गझल वाचण्यात आली आणि रसिक काव्यप्रेमींपुढे त्याची रसात्मकता मांडावी असे तीव्रतेने वाटले म्हणून हा लेखनाचा अट्टाहास…
सुश्री अरुणा मुल्हेरकर
☆ नाते स्वतःशी ☆
☆
मी बोलते स्वतःशी समजावते मनाला
सारेच हे मुखवटे पाठी पळू कशाला
*
वाणीतली मधुरता आहेच साफ खोटी
हे डोंगळे गुळावर फसवू कशी स्वतःला
*
नात्यात नाही उरले काहीच बंध आता
माणूस एकटा हा नाही पुसे कुणाला
*
हा राजहंस विहरे स्वानंद घेत आहे
पाण्यातल्या सुखाचा स्वर्गीय मोद त्याला
*
स्वच्छंद स्वैर जगणे तोडून बंधने ही
घ्यावी अशी भरारी ना मोज त्या सुखाला
*
सूर्यास्त होत आला दिन मावळेल आता
पाने गळून गेली निष्पर्ण वृक्ष झाला
*
संवाद साधते मी नाते जुळे स्वतःशी
कोषात मीच माझ्या हे सांगते जगाला
*
— गझलकारा अरुणा मुल्हेरकर, मिशिगन
ही गझल प्रातिनिधिक स्वरूपात आहे असे म्हटले तर काहीच गैर ठरू नये. सारं काही जणू आपल्याच मनातलं आहे अशी भावना वाचकाच्या मनात ही गझल वाचताना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही आणि इथेच, याच क्षणी गझलेतला अस्सलपणा जाणवतो.
मी बोलते स्वतःशी समजावते मनाला
सारेच मुखवटे मी पाठी पळू कशाला
मतल्याची सुरुवातच फार परिणामकारक झालेली आहे. जगता जगता एक क्षण असा काही येतो की साऱ्यांचाच उबग येतो. अवतीभवती वावरण्यार्यां विषयी शंका निर्माण होतात. काहीतरी चुकतंय, नको असलेलं पुन्हा पुन्हा आपल्यापाशी येऊन ठेपतंय आणि “पुरे झाले आता” अशी भावना निर्माण होऊन आपल्याच मनाला समजवावं लागतंय. “अरे! हे सारं किती फोल आहे, पोकळ आहे! यांच्या मुखवट्यामागची अव्यक्त गढूळ वृत्ती जाणल्यानंतरही मी त्यांच्यात का गुंतून पडू? कशासाठी मी या फसव्या लोकांच्या पाठीमागे पळत राहू?
वाणीतली मधुरता आहेच साफ खोटी
डोंगळे गुळावर फसवू कशी स्वतःला
अधरावर अमृत आणि उदरात मात्र जहर. यांच्या गोड बोलण्याला मी का खरं समजावं? जरी त्यांची वाणी मधुर असली तरी ती खोटी आहे, कावेबाज आहे हे मी जाणलंय. हे सारेच गुळाला चिकटलेले मुंगळे आहेत. हे सारे गोड बोलून माझा फायदा घेणारे आहेत. यांना माझ्याविषयी जराही आत्मीयता नाही. सारेच मतलबापुरते माझ्या भोवती आहेत. “गरज सरो ना वैद्य मरो” हेच यांच्या मनातलं कडवट वास्तव मला माहीत आहे आणि हे मी पूर्णपणे जाणल्यानंतरही मी माझी फसवणूक का करून घेऊ?
या शेरात गझलकाराने वापरलेला डोंगळे गुळावर हा शब्दप्रयोग अगदी चपखल आहे. खरंच यालाच दुनियादारी म्हणतात. जोपर्यंत राजा आहे तोपर्यंत प्रधान आहे. राज्य गेलं की सगळ्यांची पाठ फिरते. स्वार्थापुरते सारेच जवळ येतात. अशा लोकांची साथ नेहमीच अशाश्वत असते. डोंगळे गुळावर या दोनच शब्दातून कवयित्रीने हेरलेला जगाचा स्वभाव स्पष्टपणे व्यक्त होतो.
नात्यात नाही उरले काहीच बंध आता
माणूस एकटा हा नाही पुसे कुणाला
गणगोत, नातीगोती, त्यातले भावबंध जणू काही आता संपलेत. जो तो स्वतःत मशगुल आहे. प्रेम, आपुलकी, आस्था, माया, उपकृतता, कर्तव्य काही काही उरले नाही. जो तो स्वतःत मग्न आहे. इतरांचा विचारही करण्याची त्याला गरज वाटत नाही. नात्यातून जाणवत असलेला हा कोरडेपणा कवयित्रीला अक्षरशः व्यथित करत आहे. हा बदल अनपेक्षित आहे. धक्का देणारा आहे पण तरीही हे वास्तव आहे आणि या वास्तविकतेने मन विदीर्ण झाले असतानाच कवयित्रीच्या मनात सहज येते…
हा राजहंस विहरे स्वानंद घेत आहे
पाण्यातल्या सुखाचा स्वर्गीय मोद त्याला
पाण्यात मुक्तपणे पोहणाऱ्या राजहंसाचे चित्र कवियत्रीच्या मनात साकारते. त्याच्याशी नकळत तुलना केली जाते.
“पहा! कसा हा राजहंस पक्षी स्वतःच्या धुंदीत स्वैरपणे विहरत आहे. त्याचं नातं फक्त भोवतालच्या अथांग, निर्मळ, पवित्र जलाशयाशी आहे आणि पाण्याचा निर्मळ, निरपेक्ष स्पर्श म्हणजेच त्याच्यासाठी जणू काही स्वर्गीय आनंद आहे. ”
संपूर्ण गझलेवर कळस चढवणारा हा शेर आहे. या शेरात राजहंस— पाणी हे रूपकात्मकतेने वापरलेले आहे. पाणी म्हणजे जीवन. माणूस आणि जीवन यांचा संबंध उलगडणारं हे रूपक अतिशय प्रभावी वाटतं. “जगावं तर राजहंसासारखं! जगण्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद जीवनात वेचावा. ” हा अत्यंत मोलाचा संदेश या शेरातून मा. अरुणाताईंनी किती सहजपणे दिला आहे!
स्वत:शी संवाद साधता साधता आता कवयित्रीच्या मनात काही निर्णयात्मक विचार येऊ लागले आहेत. त्या आता स्वतःला सांगत आहेत,
स्वच्छंद स्वैर जगणे तोडून बंधने ही
घ्यावी अशी भरारी ना मोज त्या सुखाला
आता जगायचं ते मुक्त, स्वच्छंद, स्वैर बंधन मुक्त, नको बेड्या, नको शृंखला. कशाला ज्यातत्यात अडकून नैराश्य येऊ द्यायचे आणि उरी जखमा करून घ्यायच्या? या संकुचित, आक्रसलेल्या, गढूळलेल्या, जीवनरुपी डबक्याचा त्याग करून उंच, मोकळ्या, अथांग, गगनी मुक्त झेप का न घ्यावी? खरोखर अशा या भरारीतल्या अनमोल सुखालाच मला आता कवटाळायचं आहे.
किती सुंदर शेर! किती लयबद्ध आणि अर्थपूर्ण! हा शेर वाचताना मला सहज गदिमांच्या ओळी आठवल्या.
जोड झणी कार्मुका
सोड रे सायका
मारही त्रटिका रामचंद्रा..
प्रस्तुत गझलेतल्या ओळी आणि गदिमांच्या या ओळीतले अर्थ, प्रसंग, वातावरण निराळे असले तरी आवेश तोच आहे. काहीतरी सोडताना, तोडताना मग ती जगण्यातली बंधने का असेनात पण त्यासाठी एक आवेश लागतो, जोश लागतो आणि तो व्यक्त व्हावा लागतो आणि वरील शेरात तो याच ताकदीने व्यक्त झालेला मला जाणवला.
आता अरुणाताईंची गझल पुढे सरकते..
सूर्यास्त होत आला दिन मावळेल आता
पाने गळून गेली निष्पर्ण वृक्ष झाला
वा क्या बात है!
हा शेरही रूपकात्मक आहे. सूर्यास्त, मावळता दिन, पानगळ हे शब्द संपत आलेल्या जीवनाविषयी सांगत आहेत. “एक दिवस हे जग सोडून जायचंय. सूर्य मावळण्याची चिन्हं क्षितिजावर उमटत आहेत, या जीवनरुपी वृक्षांची पानं गळून जात आहेत, हळूहळू हा वृक्ष निष्पर्ण होईल, गात्रे थकली.. ती आता केव्हाही निस्त्राण होऊ शकतात. ”
या शेरामध्ये कवयित्रीची जीवनाच्या अंताविषयीची एक स्वीकृती तर जाणवतेच पण शब्दांच्या पलीकडचं, त्यांच्या मनातलं काहीतरी सहजपणे वाचता येतं. आता कशाला? हा एक सूर त्यात जाणवतो. संपतच आलं की सारं आता! जे काही शेवटचे क्षण उरलेत ते तरी मुक्तपणे मनासारखे का जगू नयेत? याच भावनेतून त्या त्यापुढे म्हणतात..
संवाद साधते मी नाते जुळे स्वतःशी कोषात मीच माझ्या हे सांगते जगाला या क्षणी, या सांजवेळी, आयुष्याच्या या किनारी मी माझ्याच मनाशी साधलेला हा संवाद आहे. माझ्या मनाशी जुळवलेले माझे हे निखळ नाते आहे. माझ्या भोवती मीच विणलेल्या या कोषातून मुक्त होऊन मी माझ्या मनातले काहीतरी जगाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ”
जणू काही या ओळीतून अरुणाताई काहीतरी निर्वाणीचं सांगत आहेत. ते जरी निर्वाणीचं वाटत असलं तरी ते निर्णयात्मक आहे. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला असा भाव कुठेतरी या ओळीतून उलगडतो.
अप्रतिम गझल.
मी दूरस्थपणे गझलकाराची मानसिकता टिपण्याचा फक्त प्रयत्न केला आहे. या गझलेला असलेली एक तात्त्विक बैठक शोधण्याची धडपड केली आहे. सुरुवातीला ही गझल काहीशी नकारात्मक भासत असली तरी हळूहळू ती सकारात्मकतेकडे झुकत जाते. जीवनातले अस्सल अर्थ उलगडत जाते. आनंदकंद वृत्तातील ही मुसलसल गझल मनाला भिडते ती त्यातल्या सहज, सोप्या पण अर्थपूर्ण शब्दांमुळे. प्रत्येक शेरातला उला आणि सानी यात अर्थाची सुरेख सरमिसळ झालेली जाणवतते. स्पष्ट राबता आणि सुरेख खयालत यामुळे ही गझल फारच परिणामकारक झाली आहे. रदीफ विरहित आणि मनाला कशाला स्वतःला कुणाला त्याला सुखाला झाला जगाला या काफियांनी गझलेची रुची आणि उंची अधिक वाढलेली आहे.
या गझलेचा आनंद आपण सर्वांनी जरूर घ्यावा हीच अपेक्षा..
☆ व्यथेला शब्द लाभावे… कवयित्री : सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆
☆
☆ कविता ☆ व्यथेला शब्द लाभावे ☆
☆
व्यथेला शब्द लाभावा,
अशी बांधीव ती नाही
तुला देऊ कशी लाही?
तशी आटीव ती नाही…
*
मनाच्या खोल अंधारी
स्मृतींचा कालवा दाटे
तमा पिंजून एखादा
दिठीला काजवा भेटे…
*
क्षणाला लख्ख बिल्लोरी
उजेडा, अर्थ दे ना तू
धुनीसाठी हवी ऊर्जा,
असे अंतस्थ हा हेतू…
*
नको वरपांग काहीही,
उरातिल आर्त उसळू दे
मनाच्या मंथनापोटी
खरा उद्गार मिसळू दे…
*
व्यथेला शब्द लाभाया,
युगे तिष्ठूनिया पाही
लिपीला भार का व्हावा?
अनर्था, बोल ना काही…
*
— आश्लेषा महाजन.
Mob. 9860387123
रसग्रहण
व्यथेला शब्द लाभावा,
अशी बांधीव ती नाही
तुला देऊ कशी लाही?
तशी आटीव ती नाही..
“व्यथेला शब्द लाभावे “हे काव्यशीर्षक वाचताच स्मृतींचा कालपट क्षणाचा कालावधी न सरताच नजरेसमोर तरळतो. प्रत्येकाच्या काळजात व्यथेची कथा नांदतच असते. या व्यथेला बोल, शब्द लाभावेत व ती तिच्या परिमाणासकट परिणामांना व्यक्त करणारी असावी असा आंतरिक घोष कानी निदादतो. व्यथेची भावना तशी सार्वत्रिकच आहे. प्रत्येक जण कधी ना कधीतरी तिला सामोरा गेलेला असतो. व तो दाहक अनुभव, ती अनुभूती माणसाच्या काळजाला निरंतर छळत राहते. साहजिकच कवितेच्या अंतरंगाकडे हृदय आकृष्ट होते. कवयित्रिच्या शब्दभात्यातले सुयोग्य शब्दबाण आपल्या व्यथेला घायाळ करतील आणि तिचे ते शब्दरूप पाहायला मिळेल अशी सुप्त इच्छा वाचकाच्या मनात मूळ धरू लागते. व्यथेची व्याप्ती व्यक्त करायला शब्द लाभावेत, ते पुरेसे यथार्थ व अर्थपूर्ण असावेत ही भावना कवितेत व्यक्त होताना दिसते. असामान्य वाटणारी प्रत्येकाची व्यथा निराळी! तिचा भार अर्थवाही शब्दांनी वाहून न्यावा ही कामना प्रत्यक्षात येणे सहज सोपे नाही हे वास्तव कविता वाचताना ध्यानात येते. कवयित्री म्हणते व्यथेला शब्द लाभावा, ती अबोल राहू नये, तिने व्यक्त व्हावे, तिला व्यक्त करावे. व्यथा भोगणाऱ्याला ती व्यक्त करण्यासाठी तसेच खुद्द व्यथेलाही शब्द लाभावेत असा अर्थ अभिप्रेत असावा. मनातली ही इच्छा फलद्रूप व्हावी. पण यासाठी तिचे रूप, स्वरूप व्यक्त करण्याजोगे दृष्यमान असायला हवे ना ! तिचे मनात वसत असलेले रुप कल्पनेच्या कुंचल्यातून व शब्दमाध्यमातून व्यक्त करणे वा तिचे वर्णन करणे हे कठीणच! ही व्यथा बांधीव, एकसंध नाही. विस्कळीत, दुभंगलेली, पसरलेली, इत:स्तत: विखुरलेली आहे. जणू काही ती सर्वव्यापी आहे. तिची जमवाजमव करून तिला शब्दरूप देणे गरजेचे आहे. हे आकळले तरी ते प्रत्यक्षात कसे घडवून आणावे, कसे घडावे? व्यथेला शब्दात बांधणे म्हणजे शब्दांकित करणे तसेच “बांधून टाकणे” हाही अर्थ अभिप्रेत असावा. व्यथेला शब्द लाभावा असे जरी वाटत असले तरी तिच्या रूपामुळे तिला तो लाभणार नाही असा काहीसा सूचक निर्देश निदर्शनास येतो. या व्यथेची लाही, तिचा लहानसा कण कसा कुणाला द्यावा?कारण ती आटीव म्हणजे आटलेली, घट्ट झालेली, संपृक्त नाही. अजून ती धगधगती आहे, लाहीसम तडतडणारी आहे, बेचैन करणारी आहे, प्रवाही आहे. नानाविध व्यथा असल्याने तिचे रूप एकसमान नाही.
मनाच्या खोल अंधारी
स्मृतींचा कालवा दाटे
तमा पिंजून एखादा
दिठीला काजवा भेटे…
कुठेही कसेही न सामावणाऱ्या अदृश्य, अथांग अशा मनाच्या आत आत अगदी तळघरात, खोल खोल अंधारात स्मृतींचा कालवा दाटलेला आहे. कालवा या शब्दाचा सुंदर अर्थ मनाला भावतो. मानवनिर्मित प्रवाह म्हणजे कालवा. येथे व्यथेचा प्रवाह हा कालव्यासम आहे हा अर्थ अभिप्रेत आहे. अर्थात ही व्यथा मानवनिर्मित आहे हे लक्षात आणून दिले आहे. तसेच अंतरंगात कालवाकालव करणारा तो कालवा. व्यथेचे मूळ व कूळ, तिची उत्पत्ती व व्याप्ती दर्शवणारा हा शब्द!! व्यथेचा हा काळाकुट्ट तम अंतरंगात व्यापून उरलेला आहे. तो काळोख अगदी पिंजून काढला तर नजरेला एखादा काजवा जो क्षणिक आणि स्वयंप्रकाशी आहे तो कधीतरी भेटतो. येथे “पिंजून काढणे” हा वाक्प्रचार म्हणजे खूप प्रयत्न केल्यावर गवसणे. कवितेतील आशयाला हा एकदम समर्पक आहे. एखादा आशेचा किरण व्यथा भोगताना अथक प्रयत्नाने कधीतरी खुणावतो ही भावना व्यक्त केली आहे. तसेच व्यथा दूर करण्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांचे महत्त्व सांगितले आहे.
क्षणाला लख्ख बिल्लोरी
उजेडा, अर्थ देना तू
धुनीसाठी हवी ऊर्जा,
असे अंतस्थ हा हेतू…
काजव्याच्या सानुल्या उजेडाकडे कवयित्री याचना करते आहे की हे उजेडा! त्या विविक्षित क्षणाला लखलखीत बिल्लोरी अर्थ दे. अर्थात त्या अंधारात लाभलेल्या उजेडाने आयुष्याला चमक, झळाळी लाभो. बिल्लोरी या शब्दातून केवळ चमकदार उजेड अंतर्भूत नाही तर तो इंद्रधनु सम सतरंगी असावा अशी भावना व्यक्त केली आहे. या प्रकाशामुळे जगण्याचे अर्थपूर्ण भान येऊ दे, आयुष्याला चांगला मार्ग मिळू दे असा भावार्थ!! आणि हे सर्व गरजेचे आहे कारण ही धुनी पेटती राहावी, यासाठी तिला ऊर्जेची गरज आहे. येथे धुनी ही शरीराची आहे. ती पेटलेली आहे, धगधगती आहे हे लक्षात येते. तसेच जगण्याचा जो यज्ञ, धुनी आहे त्यात समिधा म्हणून अर्पण करण्यासाठी जगण्याचीच ऊर्जा लाभावी. आशेच्या अर्थपूर्ण ऊर्जेचा एखादा तरी किंचितसा स्त्रोत लाभावा अशी मनीषा व्यक्त केली आहे, कारण अंतरंगात स्थित असणारा, नेहमी वसणारा हा आंतरिक हेतू आहे. अंतस्थ म्हणजे आतला, खोल मनाच्या गाभ्यातला हेतू!!जगण्याची इच्छा सोडलेली वा सुटलेली नाही. व्यथेच्या अटळ स्थानाचे भान राखून जीवन आशेच्या किरणावर जगण्याचा प्रयत्न आहे.
नको वरपांग काहीही
उरातील आर्त उसळू दे
मनाच्या मंथनापोटी
खरा उद्गार मिसळू दे….
कवयित्रीला कुठले ही काही ही वरवरचे, उथळ, वरपांगी, सकृतदर्शनी आहे असे दिसणारे, खोलवर विचार न करणारे काहीही नकोय. दुसऱ्याच्या व्यथाभावनेला लाभणारे वरवरचे सहानुभूतीपर शब्द ही नकोत. अर्थात व्यथा भोगताना कुणाच्या अर्थहीन निरुपयोगी सहाय्याची अपेक्षा कवयित्रीला नाही. आपल्या वेदनेवर तिला स्वतःच आधार शोधायचा आहे. यासाठी उरातील, काळजातील आर्त भावना उसळून येऊ देत. व्यथा या नेहमी उरात दडलेल्या, दडविलेल्या असतात हे सत्य लक्षात घेतले आहे. त्या उसळून येऊन एक प्रकारे त्यांचा उद्रेक व्हावा व तसे झाल्याने व्यथेच्या भोगातून बाहेर पडण्याची प्रखर व तीव्र जाणीव स्वतःला असल्याशिवाय व झाल्याशिवाय व्यथेपासून सुटका नाही, यावर दुसरा उपाय नाही. मनाचे मंथन यातून सखोल चिंतन अपेक्षित आहे. जीवनात समाधान मिळावे व ते मिळवण्यासाठी व्यथेच्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा. काय करायचे याचे विश्लेषण करून त्यातून निष्कर्ष काढणे हे गरजेचे आहे. असे झाले तर तो खरा अर्थपूर्ण उद्गार लाभेल. उद्गार या शब्दाचा अर्थ अभिव्यक्ती करण्यासाठी योग्य वचन, बोल उक्ती मिळणे हा आहे. या शब्दयोजनेतून मनाच्या मंथनाप्रती मनात असलेली कवयित्रीची तळमळ किती प्रांजळ आहे हे लक्षात येते. ताकदीचा व खरा उद्गार लाभला व मनाच्या मंथनात मिसळला तरच मार्ग मिळेल, मार्ग दिसेल याची खात्री आहे.
व्यथेला शब्द लाभाया
युगे तिष्ठूनिया पाही
लिपीला भार का व्हावा?
अनर्था, बोल ना काही…
व्यथेची भावना, तिची तीव्रता व खोली सापेक्ष आहे. तिची जाण संपूर्णपणे होणे सर्वथा अशक्य आहे याचे सजग भान कवयित्रीला आहे. त्यामुळे व्यथा व व्यथेला स्वतःला व्यक्त करण्यासाठी, बोलके होण्यासाठी यथार्थ शब्द लाभावेत अशी अपेक्षा केली आहे. यासाठी व्यथा युगानुयुगे तिष्ठत उभी आहे असे कवियत्रीने म्हटले आहे. यातून कालातीत असलेली व्यथा काळाशी सुसंगतपणे व्यक्त होणे अशक्यप्राय आहे हे कळते. व्यथेला अभिव्यक्त करण्याची घाई न करता योग्य शब्द-भाव-रसनिष्पत्ती होईपर्यंत थांबायची तयारी आहे. अगदी युगानुयुगे वाट पाहायची तयारी आहे. वाट पाहत राहून ही, तिष्ठत असूनही ते शब्द, ते बोल मिळू शकत नाहीत. “तिष्ठत” शब्दातून आतुरतेने बराच काळ वाट पाहणे हे जाणवून दिले आहे. लिपीला म्हणजे लिखाणाच्या सूत्रबद्ध पद्धतीला, अक्षरांना व्यथेचा भार होतोय. अर्थात ती अक्षरेही असमर्थ ठरत आहेत व्यथा व्यक्त करण्यासाठी !कवितेतील आशय अगदी खोलवरपणे लक्षात येतो व मनाला भिडतो ही. तसेच लिपीने का व कशासाठी व्यथेचा भार वाहायचा असा मूलभूत प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत कवयित्री मनात व जीवनात भरून राहिलेल्या अनर्थालाच काही बोलायची विनंती करते आहे. लिपी तर बोलत नाही, बोलू शकत नाही तर अनर्था आता तूच बोल असे अतिशयोक्तीपूर्ण मागणे कवयित्रीने केले आहे.
व्यथेची सार्वत्रिक भावना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द लाभणे अत्यंत अवघड आहे कारण व्यथा ही भावना समजून घ्यायची आहे, तिचे दृश्यरूप दृष्टीस पडत नाही. अत्यंत संवेदनशील मनाचा आविष्कार या कवितेत जाणवतो. उचित, वेचक व वेधक शब्दांचा समर्पक प्रयोग, भावनेचा स्तर कळावा म्हणून योजलेले विविध साहित्यिक अलंकार कवितेतील आशयाला पूरक व पुष्टी देणारे आहेत. व्यथेला शब्द लाभावा, मनाचा खोल अंधार अशी अनेकानेक चेतनागुणोक्तीची उदाहरणे या कवितेत सुंदर रीतीने मांडली आहेत. त्यांना चेतना प्रदान करून त्यांचे व्यक्ती स्वरूप वर्णिले आहे. काळोखाला पिंजणे मधील अतिशयोक्ती अलंकार, स्मृतींचा कालवा मधील रूपक तसेच कवितेला असलेली लयबद्धता असे अनेक काव्यविशेष मनाला मोहविणारे आहेत. हे वियद्गङ्गा वृत्त आहे. कवितेचा “काव्यप्रकार” म्हणून मोल वृद्धिंगत करणारे आहेत. कवयित्रीने कवितेतून व्यथेला शब्द लाभावा असे म्हणताना तिला बोलके केले आहे. तिच्या मूकपणात तिचे अस्तित्व प्रकर्षाने लक्षात येते.
मनाचा वेध घेणारी ही कविता आहे. वाचक जेव्हा आपल्या मनाची नाळ कवितेशी जुळवतो तेव्हा ती सार्वत्रिक होते आणि यातच त्या कवितेचे महत्त्व अधोरेखित केले जाते. अशी ही नितांत सुंदर भावपूर्ण कविता मनात रेंगाळत राहील व निरंतर स्मरणात राहील या बद्दल दुमत होणे नाही.