☆ विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆
☆ विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?... स्व. वि. दा. सावरकर ☆
पौर्वात्य खंड अवघें जित यत्प्रतापें
दारिद्रय आणि भय कांपति ज्या प्रतापें
नाशासि पारसिक तेहि पलांत गेले
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
तें जिंकी पारसिक, दे जगता दरातें
जें दिग्जयी बल तुझेंहि शिकंदरा, तें
ध्वंसीत रोम तव राजपुरीं रिघालें
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
साम्राज्य विस्तृत अनंत असेंचि साचें
त्याही महाप्रथित रोमपत्तनाचें
हूणें हणोनि घण चूर्णविचूर्ण केलें
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
हा उन्नती अवनतीस समुद्र जातो
भास्वान् रवीहि उदयास्त अखंड घेतो
उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
जे मत्त फारचि बलान्वित गर्ववाही
उद्विग्न- मानस उदासहि जे तयांहीं
हें पाहिजे स्वमनिं संतत चिंतियेलें
विश्वात आजवरि शाश्वत काय झालें?
कवी – वि दा सावरकर
रसग्रहण
ही कविता ‘वसंततिलका’ या अक्षरगणवृत्ते बांधलेली आहे. एकवीस मात्रा व १४ अक्षरांच्या ओळी असणारे हे वृत्त वीर रस व शौर्य भावनेला पोषक आहे. प्रत्येक ओळीच्या शेवटी दोन गुरू (प्रत्येकी दोन मात्रांची दोन अक्षरे) येत असल्यामुळे कोणताही विचार, वाचक अथवा श्रोत्यांवर ठसविण्यासाठी ही वृत्तरचना उपयुक्त आहे. सावरकरांची ‘माझे मृत्युपत्र’ ही कवितादेखिल याच वृत्तात निबद्ध आहे. जाता जाता सावरकर निर्मित ‘वैनायक’ वृत्ताचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. त्यांनी अंदमानात असतांना रचलेल्या ‘निद्रे’, ‘सायंघंटा’, ‘मूर्ती दुजी ती’, ‘मरणोन्मुख शय्येवर’ यासारख्या कांही कविता तसेच ‘कमला’ व ‘गोमंतक’ (उत्तरार्ध) ही दीर्घ काव्ये त्यांनी स्वनिर्मित ‘वैनायक’ वृत्तांतच रचलेली आहेत. एखाद्याच्या प्रतिभेचा संचार किती विविध प्रांतात असावा! अलौकिक!!
प्रस्तुत कविता सावरकरांनी, पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना, १९०२ साली ‘आर्यन विकली’ साठी रचली. कालांतराने ती ‘काळ’ मध्येही प्रसिद्ध झाली. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं १९ वर्षांचं! खरं तर हे वय, निसर्गात भरून राहिलेल्या सौंदर्याचं वर्णन करणार्या कविता किंवा शृंगाररसाने युक्त प्रेमकविता करण्याचं! पण सावरकरांनी मातृभूमीलाच मन वाहिलेलं असल्यामुळे, तिच्या स्वातंत्र्या शिवाय दुसरा कोणताच विचार त्यांच्या मनात येत नसावा. प्रखर बुद्धीमत्ता घेऊन जन्माला आलेल्या या तरूणाने, आपलं तारुण्य स्वातंत्र्य देवतेच्या चरणी अर्पण केलं होतं. अफाट वाचन, चिंतन, मनन यामुळे त्यांच्या या बुद्धीमत्तेला तेज धार आलेली होती. त्यामुळेच कोवळ्या तरूण वयात ते शाश्वत/ अशाश्वत यासारख्या विषयावर भाष्य करू शकतात. ते म्हणतात या विश्वात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही. मग ती चांगली असो वा वाईट, हवीशी असो वा नकोशी! याच्या पुष्ट्यर्थ ते निरनिराळी उदाहरणे देतात.
आपल्या पराक्रमाने ज्यांनी अवघ्या पौर्वात्य खंडावर राज्य केलं, ज्यांच्या राज्यात सुखशांती व सुबत्ता नांदत असे अशा पारसिक म्हणजेच पारशांचं साम्राज्य सिंकंदराने नष्ट केले. म्हणजेच त्यांना जिंकून, त्यांचं शिरकाण करून तसेच धर्मांतर करायला लावून आपलं मुस्लीम साम्राज्य स्थापन केलं. अशा जगज्जेत्या सिकंदराचं जे सत्ताकेंद्र होतं, त्या ग्रीसवर कालांतराने रोमन लोकांनी कब्जा केला. परंतु पुढे जाऊन हूणांच्या रानटी टोळ्यांनी या अजिंक्य समजल्या जाणाऱ्या रोमन साम्राज्याचे तुकडे तुकडे केले. अशा प्रकारे उन्नती पाठोपाठ अवनती येतेच. जे जे म्हणून निर्माण होते, ते ते कालांतराने नष्ट होतेच. जे उदयाला येते त्याचा अस्त होणार हे ठरलेलेच आहे. हे ठसविण्यासाठी ऐतिहासिक दाखल्यांपाठोपाठ कवी, समुद्राची भरती ओहोटी, सूर्याचा उदयास्त असे निसर्गातले परिचित दाखले देतात आणि विचारतात, या विश्वात काय चिरंतन राहिलं आहे? ही गोष्ट बलवान, गर्विष्ठ, उन्मत्त यांच्याप्रमाणेच उदास, उद्विग्न असणाऱ्यांनी देखिल लक्षात ठेवली पाहिजे. कोणतीच स्थिती वा परिस्थिती, मग ती ऐहिक असो वा भावनिक, कायम रहात नाही. ती बदलतेच.
या कवितेतून सर्व भारतीयांना कवी विश्वास देऊ इच्छित असावेत की, भारतमातेची ही दुःस्थिती बदलणार व स्वातंत्र्याचा सूर्योदय होणार हे निश्चित!
जे सत्यात नसते ते कधी कधी स्वप्नात दिसते. स्वप्ने कुणीही पहावीत. कधी कधी स्वप्ने इतकी सुखद असतात की ती संपूच नयेत, त्यातून जाग येऊ नये असेच वाटते. पण तसे होत नाही. सुखद स्वप्नांतून सत्यात आल्यानंतर पुन्हा एकदा मळकट वास्तवाची जाणीव मनाला कातरते. काहीशा अशाच भावनांना निरखून लिहिलेली सुश्री उज्ज्वला केळकर यांची ही कविता…
☆ – कथा – सौ. उज्वला केळकर ☆
मरगळल्या दिशा
गच्च भरलेलं आभाळ
आंधारा वर्ग अधिकच काळवंडलेला
पिसाट वारा छ्प्पर फाडून आत आलेला.
फुटक्या कौलारातून निथळणारं पाणी
उसवल्या बाहीतून ठिबकतय खांद्यावर
उठवतय शहारा अंगावर.
पोरं टोरं
कळकट, मळकट
केस विस्कटलेली, शर्ट फाटलेली
बसली आहेत, निमूटपणे
कथा ऐकत
कुणा सुशील, सुंदर राजकान्येची
तिला पळवून नेणार्या
कुणा दुष्ट भयंकर राक्षसाची
प्रेमळ यक्षाची आणि धाडसी राजपुत्राची.
आणि मग सारा वर्गच जातो बनून यक्षनगरी
चमचमणारी, झगमगणारी
प्रेमळ गुरुजी वाटतात, यक्षांचे राजे
वाटा दाखवणारे, वर देणारे
सारी मुलेच मग बनतात राजपुत्र
भरजरी पोशाख ल्यालेले, तलवार घेतलेले
आणि निघतात सोडवायला
त्या सुशील, सुंदर राजक्न्येला
आणि इतक्यात
शाळेचा शिपाई येतो राक्षस बनून.
घंटेची आरोळी ठोकून,
टाकतो सारी कथाच विस्कटून
टाकतो सारी कथाच विस्कटून.
मुक्तछंदातील ही कविता वाचल्यानंतर आपण कुठल्याशा अविकसित,दैन्यावस्थेतल्या दलीत, पीडीत अशा भागात जाऊन पोहोचतो. तिथले जीवन अत्यंत निकृष्ट,निकस आहे. कुठल्याही प्रगतीच्या खाणा खुणा नसलेल्या या भागातल्या शाळेत शिकून जीवनाला फुलवू पाहणाऱ्या, आकार देऊन पाहणाऱ्या लहान मुलांच्या केविलवाण्या राज्यात व्यथित अंतकरणाने जातो.
मरगळल्या दिशा गच्च भरलेलं आभाळ
अंधारा वर्ग अधिकच काळवंडलेला
पिसाट वारा छप्पर फाडून आत आलेला
फुटक्या कौलारातून निथळणारं पाणी
उसवल्या बाहीतून ठिबकतय खांद्यावर
उठवतय शहारा अंगावर
या काव्यपंक्तीतून कवियत्रीने स्वतःच्या मनातल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.. असे एक वातावरण जे खरं म्हणजे स्वतः अनुभवलेलं नसल्यामुळे प्रत्यक्ष दिसणाऱ्या विदारक दृश्यामुळे त्यांचे मन हेलावते.
एका खेड्यातल्या शाळेचं हे चित्र. आधीच तेथील लोकांचे जीवन दिशाहीन, मरगळलेलं. त्यातून आकाश ढगांनी भरलेलं, अंधारलेल्या वर्गात अधिकच काळोख आणणारं. नुसतं एवढंच नाही तर त्यातून छप्पर पाडणारा सुसाट वारा आणि गळणारे पाणी जे फाटक्या कपड्यातल्या विद्यार्थ्यांना भिजवत आहे. त्या बाल विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक दशा पाहून कवियत्रीच्या अंगावर अक्षरश: शहारे उभे राहतात.
कळकट मळकट
केस विस्कटलेली शर्ट फाटलेली
बसली आहेत
निमुटपणे
कथा ऐकत
हे कळकट, मळकट, केसावर कधीही कंगवा न फिरवलेली विस्कटलेल्या केसांची, फाटक्या कपड्यातील मुले मात्र गुपचुप शांत बसून गुरुजी सांगत असलेल्या कथेत रमली आहेत.
कुणी सुशील सुंदर राजकन्येची
तिला पळवून नेणाऱ्या
कुणा दुष्ट भयंकर राक्षसाची
प्रेमळ यक्षाची आणि धाडसी राजपुत्राची
गुरुजी सांगत असलेल्या कथेत एक सुंदर राजकन्या आहे.ती सुशीलही आहे. तिला कुणा दुष्ट, भयंकर राक्षसाने पळवलेले आहे. मात्र तिच्या रक्षणासाठी प्रेमळ यक्ष— सेवक, तसेच धैर्यवान राजपुत्र ही आहेत.
आणि मग सारा वर्गच जातो बनून यक्षनगरी
चमचमणारी झगमगणारी
प्रेमळ गुरुजी वाटतात यक्षाचे राजे
वाटा दाखवणारे वर देणारे
या कथेच्या माध्यमातून ती सारी कळकट मुले खरोखरच मनाने एका जादुई नगरीत— जी चमचमणारी लखलखणारी आहे तिथे जाऊन रमतात. त्या झगमगाटाने प्रफुल्लित होतात. त्या क्षणी कथा सांगणारे गुरुजी म्हणजे मुलांना त्या यक्ष नगरीचे सम्राट वाटतात आणि तेच आपल्या आयुष्याची वाट आखणार आहेत, सुंदर जीवनासाठी आशिष देणार आहेत याची खात्री मुलांना वाटते.
सारी मुलेच बनतात राजपुत्र
भरजरी पोशाख ल्यालेले
तलवार घातलेले
आणि निघतात सोडवायला
त्या सुशील सुंदर राजकन्येला
कथेत रमलेल्या मुलांना आता वाटायला लागते की ते स्वतःच राजपुत्र आहेत. त्यांच्या अंगावर भरजरी पोशाख आता आहेत. हातात तलवारी आहेत आणि राक्षसाच्या तावडीत सापडलेल्या सुंदर राजकन्येला सोडवण्यासाठी ते आता समर्थ आहेत.
या चार ओळी म्हणजे उज्वला ताईंच्या या काव्यातला गर्भितार्थ सांगणाऱ्या, शिखर गाठणाऱ्या ओळी आहेत. वरवर ही जरी परिकथा वाटत असली, सरळ सरळ अर्थ सांगणारी राजकन्येची गोष्ट वाटत असली तरी त्या कथेशी मनाने जोडल्या गेलेल्या मुलांचे स्वप्नविश्व, भाव विश्व फुलवणारी आहे. भरजरी पोशाख, तलवारी,राजकन्या,राजपुत्र, राक्षस हे रूपकात्मक शब्द आहेत. यातून कधीतरी मरगळलेल्या जीवनाला सौंदर्य आणि गळून गेलेल्या मनाला आत्मविश्वास मिळण्याची आशा दिसून येते. या कथेतील सुंदर राजकन्या म्हणजे एक सुरेख जीवन आणि राक्षसांच्या तावडीत सापडलेली राजकन्या म्हणजेच या सुंदर जीवनावरचे दारिद्र्याचे मळकट आवरण आणि ते दूर करण्याचं बळ आपल्याही हातात आहे हा विश्वास त्या मुलांना मिळतो.
आणि इतक्यात
शाळेचा शिपाई येतो राक्षस बनून
घंटेची आरोळी ठोकून
टाकतो सारी कथाच विस्कटून
टाकतो सारी कथाच विस्कटून…
कथेतला सुखद शेवट कल्पित असतानाच तास संपल्याची घंटा शिपाई वाजवतो आणि घंटेचा तो कर्कश्श आवाज ऐकल्यानंतर सुंदर कथेचा सारा पटच उधळून जातो. कथा तिथेच अर्धवट विस्कटून जाते.
इथे उज्वला ताईंनी शाळेच्या शिपायाला राक्षसाची उपमा दिली आहे. आणि हा राक्षस रुपी शिपाई म्हणजेच मुलांच्या आयुष्यातलं दुःखद वास्तव आहे. राजकन्या, राजपुत्राची कथा म्हणजे सुखद स्वप्न आणि तास संपल्याची घंटा म्हणजे वास्तवाची जाणीव. पुन्हा तेच नैराश्य. तीच उदासीनता.तेच मळकट दैन्य. दिशाहीन आयुष्य.
आणि त्यातूनच उमटणारे अनेक विदारक प्रश्न. या मुलांची आयुष्यं कधी उजळणारच नाहीत का? या मुलांना सुंदर भविष्य बघण्याचा अधिकारच नाही का? प्रगतीचे वारे यांच्यापर्यंत कधी पोहोचणार? शहरे यच्चयावत सुविधांनी सजत असताना खेडोपाडीचे हे दैन्य दूर करण्याचे आवश्यक कार्य कोण, कधी आणि कसे करणार?
उज्ज्वला ताईच्या कथा या सरळ साध्या कवितेतून जणू त्यांनी सहृदयतेने संवेदनशील सामाजिक प्रश्नांनांच स्पर्श केलेला आहे. काव्यातल्या प्रत्येक ओळीतून झिरपणाऱ्या वेदनांना त्यांनी एक लक्षवेधी सामाजिक स्वरुप दिलेले आहे. आपण सारे आपल्याच सुखात रमलो आहोत पण आपल्या झोळीतील काही गोजीरवाणी सुखे, आनंद या नुसतेच स्वप्न पाहणाऱ्या मुलांच्या ओंजळीत कधी पडणार?
या कवितेतून व्यक्त होणारी उज्वला ताईंची सामाजिक जाणीव, कळकळ ही वंदनीय आहे.
जाता जाता इतकेच म्हणेन,” एक सुंदर संदेश देणारी, डोळे उघडे ठेवून आजूबाजूचे जग सह नुभूतीने पाहायला लावणारी दमदार, अर्थपूर्ण कविता— कथा.”
☆ हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆
पूर्वपिठीका –
इंग्रज सरकारला विनंती करून, त्यांच्या अटी मान्य करून अंदमानातून मुख्य हिंदुस्थानात येण्यामागचा सावरकरांचा मुख्य उद्देश राष्ट्रसेवा हाच होता. त्यांना माहित होतं की अंदमानात जेलमधून राहून आपण देशासाठी कांहीच करू शकणार नाही. तेच हिंदुस्थानच्या मुख्य भूमीवरून आपण अप्रत्यक्षरित्या का होईना स्वातंत्र्यचळवळीचा भाग होऊ शकू. निदान या कार्यासाठी लोकांना प्रेरित करू शकू. त्यासाठी अखिलहिंदू एकतेचं महत्व लोकांच्या गळी उतरवून जातीपातीमुळे विखुरलेला हिंदुसमाज एकसंध व्हावा यासाठी प्रयत्न करू. परकियांच्या ‘divide and rule’ या धोरणाला त्यावाचून खीळ बसणार नाही.
अखेर अंदमानातून आणून रत्नागिरी इथे सरकारने त्यांना स्थानबद्धतेत ठेवल्यानंतर चार महिन्यातच त्यांनी हिंदूसभेची स्थापना केली व आपले स्थानबद्धतेतील पहिले भाषण दिले, अस्पृश्यता निर्मूलन कार्याची मुहूर्तमेढ रोवली. सकलहिंदुएकतेचं आपलं ध्येय त्यानी सात वर्षांतच गाठलं व रत्नागिरी इथं श्रीपतीतपावन मंदीर उभारलं, जिथं सर्व जातींच्या हिंदूंना मुक्त प्रवेश होता; इतकंच नव्हे तर गाभाऱ्यात जाऊन पूजापाठ करण्याची, वेदमंत्रोच्चाराची मुभा होती. हिंदुएकता व अस्पृशता निर्मूलनावर त्यांनी अनेक कविता रचल्या व त्या विविध संघटनांद्वारे, विविध ठिकाणी, विविध समारंभातून जाहीर रित्या गायल्या गेल्या अशा प्रकारे समाज प्रबोधन करून त्यांनी ही सामाजिक चळवळ पुढे नेली. थोर समाजसुधारक कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, आपल्या एका भाषणात म्हणाले होते, “मी आयुष्यभर अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम केलं पण अवघ्या सात वर्षांतच या निधड्या छातीच्या वीराने जी सामाजिक क्रांती घडवली आहे ती पाहून मी इतका प्रसन्न झालो आहे की देवाने माझं उरलेलं आयुष्य त्यांनाच द्यावं.”
सावरकरांच्या प्रेरणेतूनच शेठ भागोजी कीर यांनी रत्नागिरी येथे साकारलेल्या पतितपावन मंदिरात देव प्रतिष्ठेचा अभूतपूर्व समारंभ २२ फेब्रुवारी १९३१ रोजी झाला तेंव्हा सर्व जाती, उपजातीचे पाच हजारांहून अधिक हिंदू जमले होते. अनेक सामाजिक व राजकीय नेते, संतमहंत तसेच वेदान्ताचे गाढे अभ्यासक, ‘महाभागवत’ डाॅ शंकराचार्य कुर्तकोटी हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्याप्रसंगी सर्व जाती, उपजातीच्या वीस हिंदु युवतींनी सावरकरांचे हे गीत एक कंठाने गायले.
☆ हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा... स्व. वि. दा. सावरकर ☆
उद्धरिसी गा हिंदुजातिसी केंव्हा
हे हिंदुजातिच्या देवा ॥ धृ. ॥
आब्राम्हण चंडाल पतितची आम्ही
तुम्ही पतितपावन स्वामी
निजशीर्ष विटाळेल म्हणुनि कापाया
चुकलो न आपुल्या पाया
आणि पायांनी राखु शुद्धता साची
छाटिले पावलांनाची
ऐकू न पडो आपुलिया कानाते
मुख कथी न म्हणुनि ज्ञानाते
निज सव्यकरे वामकरा जिंकाया
विक्रियली शत्रुला काया
करु, बंधूसी बंद करु दारा, जे
चोर ते घराचे राजे
हे पाप भयंकर झाले । रे
पेरिले फळाला आले। रे
हृदि असह सलते ते भाले । रे
उद्धार अता! मृत्युदंड की दे वा
हे हिंदुजातिच्या देवा! ॥१॥
अनुताप परी जाळितसे या पापा
दे तरि आजि उःशापा
निर्दाळुनि त्या आजि भेद – दैत्यासी
ये हिंदुजाति तुजपाशी
ते अवयव विच्छिन्न सांधिले आजि
तू फुंकी जीव त्यामाजी
देऊनि बळा वामनासि ह्या काळी
तो घाल बळी पाताळी
जरि शस्त्र खुळा कर न आमुचा कवळी
परि तुझी गदा तुजजवळी
जरि करिसी म्हणू जे आता। रे
म्हणशील करू ते नाथा । रे
उठू आम्ही परि दे हाता। रे
दिधलासि जसा कंस मारिला तेंव्हा
हे हिंदु जातीच्या देवा ॥२॥
कवी – वि दा सावरकर
रसग्रहण
सावरकरांच्या सर्वच कविता गेय आहेत कारण त्या वृत्तबद्ध आहेत. बहुतांश कविता जरी विविध मात्रावृत्तात बांधलेल्या असल्या तरी त्यांनी इतर वृत्तांचा वापर देखिल केलेला आहे.
या कवितेत ते पतितपावनाचा धावा करीत आहेत. अस्पृश्यता पालनामुळे हिंदु धर्माचे नुकसान कसे झाले व आता आम्ही ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करीत असताना आम्हाला तुमच्या सहाय्याची कशी आवश्यकता आहे, हे या कवितेत कवी पटवून देतात. आम्ही पापी आहोत, संपूर्ण हिंदु समाजच पतीत आहे, पण तुम्ही पतितपावन आहात तर तुम्ही आमचा हा हिंदु समाजपुरूष एकसंध करून आमचा उद्धार करा.
वेदांनी ब्राम्हणांना समाजपुरूषाचे मस्तक मानले आहे तर शूद्रांना पाय. कवी म्हणतात आमच्या मस्तकाला विटाळ होऊ नये म्हणून आम्ही आमचे पाय तोडले, इतकच नव्हे तर पायांनी देखिल आपली शुद्धता राखण्यासाठी पावलं तोडली. म्हणजे जसे सवर्णांनी दलितांना दूर लोटले तसेच शूद्रांनी पण अतिशूद्रांना दूर केले, सामावून घेतले नाही.
कानांनी ज्ञान ग्रहण करू नये म्हणून मुखाने त्याचा उच्चार केला नाही. म्हणजे ब्राम्हणांनी शूद्रांना वेदाध्ययनापासून म्हणजेच ज्ञानार्जनापासून वंचित ठेवलं.
क्षत्रियांनी देखिल अशाच चुका केल्या. डाव्या हाताला जिंकण्यासाठी उजव्या हाताने आपलं पूर्ण शरीरच शत्रूला विकलं. जसे जयचंदाने पृथ्वीराजास जिंकण्यासाठी महंमद घोरीला आपलं स्वातंत्र्य विकलं. सख्ख्या भावाला घरात कोंडून चोराच्या हातात आम्ही जामदारखान्याच्या किल्ल्या दिल्या. असं करून आपण आपलच नुकसान करून घेत आहोत हे आम्हाला कळलं नाही.
आता आम्हाला आमच्या चुका समजल्या आहेत. आम्ही पश्चातापदग्ध आहोत. आमच्या चुकांमुळेच हिंदु समाजपुरूष पंगु झाला आहे. आता याची जाणीव आम्हाला झाली आहे.
हा सल भाल्याप्रमाणे आम्हास टोचतो आहे. आता आम्ही हे तोडलेले अवयव जोडले आहेत पण त्यात जीव येण्यासाठी, एकसंधता येण्यासाठी तुझ्या कृपेची आवश्यकता आहे.
तेंव्हा हे हिंदूंच्या देवा, तूच आम्हाला सहाय्य करून आमचा उद्धार तरी कर नाहीतर मृत्युदंड तरी दे. भेदाभेद राक्षसाचे निर्दालन करून आम्ही तुला शरण आलो आहोत, तरी आम्हाला उःशाप दे.
कंसासारख्या दुष्ट प्रवृतींचे उच्चाटन करण्यासाठी जसा तू आम्हाला मदतीचा हात दिलास तसाच आताही दे जेणेकरून अशा समाजविघातक कुप्रथांचे उच्चाटन करून हा हिंदुसमाजपुरुष एकसंध व बलशाली होईल. एवढीच विनंती मी तुला करतो आहे.
विश्वाच्या निर्मितीत जगन्नियंत्याने एक सर्वांगसुंदर निर्मिती केली ती म्हणजे स्त्रीची. शिवाय तिला सृजनत्वाचे वरदान देऊन श्रेष्ठत्वही बहाल केले. स्त्री पुरुष हे समाजाचे दोन आधारस्तंभ. पण स्त्रीला कायमच दुय्यम स्थान दिले गेले आहे. तिला सतत अत्याचार, अन्याय सहन करावे लागतात. त्यात तिची चूक काहीच नसते. अशाच एका पीडितेने अख्ख्या जगाला आपल्या सन्मानासाठी अतिशय कळवळून केलेला प्रश्न आणि शेवटी पेटून उठत दिलेले आव्हान म्हणजे डॉ. निशिकांत श्रोत्री यांची कविता ‘अब्रू’. या अतिशय गाजलेल्या कवितेचा आपण आज रसास्वाद घेणार आहोत.
जगाचं हे मोठंच्या मोठं डिपार्टमेंटल स्टोअर आहे. ते झगमगत्या ट्यूबलाइट्सनी उजळलेलं आणि रंगीबेरंगी चित्रांनी सजवलेलं आहे. इथे छोट्याशा टोकदार टाचणी पासून अजस्त्र मोठ्या विमानापर्यंत अगदी कोणतीही गोष्ट सहजपणे मिळते. मग या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मला माझी अब्रू , माझा सन्मान मिळेल का हो ? असे एक पीडित स्त्री विचारते.
कवीने इथे अख्ख्या जगालाच एका डिपार्टमेंटल स्टोअरचे रूपक योजले आहे. ते स्टोअर अतिशय समृद्ध आहे. इथे काही नाही असे नाहीच. ते अतिशय आकर्षक आहे जणू काही एखादं भुलभुलैय्या नंदनवनच.पण इथे सर्व काही मिळत असतानाही स्त्रीला मात्र काही गोष्टींपासून वंचित ठेवले जाते. आजूबाजूच्या एवढ्या विशाल जगात तिला मात्र कोणी वाली मिळत नाही ही गोष्ट तिला हतबल करून सोडणारी आहे .
ही मुक्तछंदातली कविता आहे. प्रथम पुरुषी एकवचनातली ही कविता एका अत्याचार पीडितेची कहाणी,आर्त तळमळ कथन करते. पण ती फक्त एका स्त्रीची कहाणी एवढीच मर्यादित न रहाता अवघ्या स्त्री जातीची व्यथा वेदना इथे मांडते आहे.
तिचं मोल द्यायला
ना माझ्यापाशी धनाच्या राशी
ना कीर्तीचे डोंगर
जवळ तसं काहीच नाही
मी तर फुटक्या नशिबाची
एक दरिद्री अभागिन
लंकेची पार्वती !
तरीही फुकट कोण देणार
म्हणून बरोबर घेतले होते
माझे लाख मोलाचे शील
तेवढीच माझी पुंजी !
पण या स्त्रीची अवस्था दयनीय झालेली आहे. तिच्यापाशी धनदौलत नाही. तिचं असं काहीच ऐश्वर्य नाही. जे खरेदीसाठी उपयोगी पडेल असं हाती काहीच नाही. इथे ‘लंकेची पार्वती’ हे रूपक तिची अवस्था स्पष्ट करते. ती पूर्ण परावलंबी आहे. तिला कसलेही निर्णय स्वातंत्र्य नाही. हाती धन नाही. सर्वच गोष्टींपासून ती वंचित आहे. फक्त तिची पुंजी म्हणून तिच्याकडे तिचं शील तेवढंच आहे. त्यामुळे ती हतबल झालेली आहे.
ठाऊक नव्हते मला
या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये
कोहळ्याच्या मोलाने मिळतो
छोटासाच, पण
दात आंबवणारा आंबटढाण आवळा !
किती गच्च आवळून सशासारखी
उराशी धरावी लागत होती मला
माझी एकुलती एक पुंजी !
या जगाच्या व्यवहारात फसवणूक करणारेच जास्त असतात. आवळा देऊन कोहळा काढणे हा त्यांचा स्वभावधर्म असतो. ज्याच्यामुळे दात आंबतात असा अगदी छोटासा आंबटढाण आवळा देऊन त्या बदली मोठा पौष्टिक कोहळा ते चतुराईने मिळवतात. या मतलबी लोकांचे कारस्थान ती ओळखू शकत नाही. त्यांच्यात अगदी घाबरून वावरत रहाते. पैशाच्या जोरावर गैरकृत्य करणाऱ्यांचे वर्तन वरून कधीच लक्षात येत नाही म्हणूनच खोटी प्रलोभनं दाखवून या ना त्या कारणाने तिची फसवणूक करत तिचे शील लुटले जाते आणि पुन्हा तिलाच बदनाम करून घरातून बेदखल केले जाते. अन्याय करणारे अंधारात रहातात आणि शिक्षा मात्र तिच्याच माथी येते हे खरे दुर्दैव आहे.
त्या पुंजीवरच माझ्या
डोळा फार सगळ्यांचा
डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये
विक्रीसाठी बसलेल्या व्यापाऱ्यांचा,
खरेदीसाठी आलेल्या गिऱ्हाईकांचा
अन् विकायला ठेवलेल्या मालाचा सुद्धा;
मग दलालांचे तर काही विचारूच नका….
सगळीच गिधाड !
झाडावरचे कावळे देखील भेदरून
उगीचच आपले काणे डोळे
इकडून तिकडे टोलवत बसलेले !
तिच्या त्या पुंजीवरच त्या स्टोअरमधील सर्वांचा डोळा होता. तिथे विक्री करणारे व्यापारी, खरेदी करणारे ग्राहक, अगदी विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंचा सुद्धा मग दलालांचे तर काही विचारूच नका. ते टपलेलेच होते. एकजात सगळी बुभुक्षित गिधाडं. झाडावरचे कावळे सुध्दा मदतीला तर येत नव्हते, पण नजर इकडे तिकडे फिरवत त्रयस्थपणे फक्त मजा मात्र बघत होते.
इथे व्यापारी, गिऱ्हाईक, विक्रीचा माल, कावळे ही माणसांचीच रूपके आहेत. आजकालचे वास्तवही हेच सांगते आहे. तिची बोली लावणारे, तिच्यावर अत्याचार करणारे, हे सर्व तटस्थपणे त्रयस्थांसारखे पाहणारे तिच्या जवळचे, नात्यातले सुद्धा असू शकतात. मग परक्यांची गोष्ट तर विचारायलाच नको. माणसंच माणसांना कशा प्रकारे वागवू शकतात हे कुणालाच सांगता येणार नाही
ही गोष्ट तर फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. द्रौपदी वस्त्रहरण हे तर याचे ज्वलंत उदाहरण आहे. तिच्यावर अत्याचार करवणारे, करणारे आणि हतबलपणे ते बघत निष्क्रिय रहाणारे तर रथी-महारथी असूनही होणारा अनर्थ ते टाळू शकले नाहीत. खरे तर अशावेळी माणुसकी म्हणून सुध्दा कोणीही मदतीला येत नाही. सगळेच नुसती बघ्याची भूमिका घेतात हेच दुर्दैव आहे. धाडस करून कुणी मदतीला आलेच तर होणारा अनर्थ निश्चित टळू शकतो अशीही उदाहरणे आहेत. या वास्तवावर कवी इथे उत्तम भाष्य करतो.
उमगलंच नाही मला
केव्हा लुटली गेली
माझी जिवाभावाची पुंजी
मनानं नाही तरी
देहानं मात्र
करायला मला शीलभ्रष्ट…
फासायला माझ्या अवघ्या अस्तित्वालाच
अन् रुपालाही
अंवसेचा काजळ काळिमा…
तरीहि माझ्या पदरात
अब्रू नाही ती नाहीच !
तिची फसवणूक करत तिचं शील केव्हा लुटलं गेलं हे तिला सुध्दा समजल नाही. मनाने ती पवित्र होती पण देहाने त्यांनी तिला शीलभ्रष्ट केले. तिच्या अवघ्या अस्तित्वाला काळिमा फासला आणि तिला बेरूप केले गेले. एवढं सगळं अघटीत घडूनही त्या बदल्यात तिच्या पदरात अब्रू नाहीच पडली हे तिचे मोठे दुर्दैव .
तिचा काहीच दोष नसताना झालेल्या इतक्या लुबाडणूकीने तिला जगणे अशक्य झाले. तिचे मन शुद्ध असूनही समाज तिच्याकडे विचित्र नजरेने बघू लागला. त्यामुळे तिला उजळ माथ्याने जगणे अशक्य झाले.
दया करा हो, दया करा
पोटाची भूक मारेन
पण अस्तित्वाचीच होणारी
फरपटवणारी ही उपासमार
कुठवर सोसावी आता
अशा अगतिक अवस्थेत ?
उसनी म्हणून तरी
अब्रू मिळेल का हो, मला अब्रू मिळेल का ?
या होणाऱ्या दयनीय अवस्थेने ती स्त्री अगदीच लाचार झालेली आहे. ती एक वेळ भूक सहन करेल. कारण देहाच्या या गरजेकडे दुर्लक्ष करता येईल. पण तिच्या मनाचे काय? तिच्यावर ओढवलेल्या दुरावस्थेमुळे तिच्या पूर्ण अस्तित्वालाच काळीमा फासलेला आहे. समाजात तिला आता मानाचे स्थान राहिलेले नाही. सगळे जग तिच्याकडे कुत्सित नजरेने बघत आहे आणि ही मनाची कुचंबणा तिला अतिशय असह्य होते आहे.
त्यामुळे तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी तिला समाजाकडून सन्मानाची अपेक्षा आहे. तिची कुणी हेटाळणी करू नये. जी चूक तिने केलीच नाही त्याची शिक्षा तिच्या माथी मारू नये आणि तिचे जगणे शांतपणे तिला जगू द्यावे हीच तिची रास्त अपेक्षा आहे.
इथे सगळं विकतच मिळतं
ठाऊक आहे मला
पण माझी पुंजीच
लुटली गेली आहे हो !
अब्रूच्या बोलीवर चक्क फसवणूक !
तरी पण मला हवी आहे
एखादी फाटकी तुटकी तरी
कसलीही अब्रू
उसनी द्या, खात्यावर द्या
नाहीतर भीक म्हणून द्या
पण अब्रू द्या हो, मला अब्रू द्या !
वेगवेगळी प्रलोभने दाखवून तिची फसवणूक केली गेली. तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले गेले आणि यासाठी तिलाच जबाबदार धरण्यात आले. तिलाच बदनाम ठरवून समाजातून उठवले गेले. त्यामुळे घायाळ होऊन ती पुन्हा पुन्हा सर्वांकडे मिनतवारी करते आहे. यात ती पूर्ण निर्दोष आहे म्हणूनच तिला लोकांकडून माणुसकीची अपेक्षा आहे.
नाही देत ?
का हो ?
काय चुकलं माझं ?
तुमच्याच भल्यासाठी ना
उदात्तपणे उधळली मी माझी अब्रू
हुंड्यात आणि पेटत्या ज्वालेत
राखायला तुमची उज्ज्वल प्रतिमा ?
मग आता मात्र
तोंड का वळवता ?
अखेरचेच मागते आहे
तुमच्यापुढे पदर पसरून
मला अब्रू हवी आहे
मला अब्रू द्या.
कधी घराण्याच्या वारसासाठी, कधी हुंड्यासाठी, कधी आणखी काही मागण्यांसाठी स्त्रीलाच वेठीला धरले जाते. अगदी प्रगतीच्या मार्गात तिचा शिडीसारखा वापरही काहीवेळा होतो. त्यासाठी सतत मानहानी, छळ, मारहाण, जोरजबरदस्ती केली जाते.
पण या सगळ्याला तिलाच जबाबदार धरले जाते. तिच्या चारित्र्यावर शंका घेतली जाते .शेवट तिला जाळून मारले जाते, नाही तर तिला आत्महत्या करायला भाग पाडले जाते. ती घरासाठीच हे सर्व करत असूनही तिलाच कुलटा ठरवत घराबाहेर काढले जाते. तिला पूर्ण बदनाम करीत परावलंबी बनवले जाते. यातून बाहेर पडण्यासाठीच तिची ही सन्मानासाठी मागणी आहे.
मुकाट्यानं द्या,
बऱ्या बोलानं द्या…
नाहीतर बलात्कारान चोरावी लागेल मला
तुमच्या अब्रूची लक्तरं
उघड्यावर टांगून
याच डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये
कारण ….
मला अब्रू हवी आहे हो, मला अब्रू हवी आहे !
तिने सर्व पद्धतीने त्यांच्या विनवण्या केल्या. आपल्याला असे बदनाम करू नये. आपले निरपराधीत्व मान्य करून पुन्हा मान द्यावा अशी मागणी केली आहे. सरळपणे हे जर मान्य नाही न केले तर त्यांच्या कुकर्माचा पाढा सर्व समाजापुढे वाचून त्यांच्याच गुन्ह्याची, अब्रूची लक्तरे सर्वांसमोर उघड करायची धमकी दिली आहे. आपल्यावरील अन्यायाने ती आता परती पेटून उठली आहे.त्यामुळे ती आता गप्प रहाणार नाही. नारी शक्ती जर चवताळून उठली तर काय करू शकते हे समाजाने वेळीच लक्षात घेतले पाहिजे. एकवटलेली स्त्री शक्ती समाजात उलथापालथ घडवू शकते. कारण स्त्री शिवाय समाज पूर्ण होऊ शकत नाही. पुरुषाला भावनिक मानसिक आधारासाठी स्त्रीची गरज असते. त्यामुळे तिला योग्य सन्मान देणे हे अगत्याचेच आहे. एकीकडे पूजा करायची आणि दुसरीकडे लाथाडायचे हे पूर्ण थांबवले पाहिजे.
अतिशय भावपूर्ण अशा या कवितेत डिपार्टमेंटल स्टोअर हे प्रचंड विश्वाचे रूपक, तर त्यातले विक्रेते, खरेदीदार, विक्रीचा माल, कावळे ही माणसांचीच रूपके, आवळा, लंकेची पार्वती ही रूपके आहेत. यातून माणसेच माणसांना किती अन्याय्य पद्धतीने वागवतात, कसे अत्याचार करतात हे अचूकपणे सांगितलेले आहे. असे अत्याचार करणारे अगदी जवळचे किंवा दूरचे कोणीही असू शकतात. अशावेळी बाहेरचे त्रयस्थपणे फक्त बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे तिला वाचवायला कोणीच नसते. वास्तवात घडणाऱ्या अशा घटनांनी मन सुन्न होते. अशा घटनांचे वास्तव कवीने या कवितेत नेमक्या शब्दात मांडलेले आहे.
कवीने तिची भावनिक, मानसिक स्पंदने अचूक शब्दांत टिपलेली आहेत. त्यातली आर्तता, तिची कासाविशी आपल्या मनाला जाऊन भिडते. आज काळ बदलला आहे. स्त्रीने आपले कर्तृत्व प्रत्येक आघाडीवर सिद्ध केलेले आहे. तरीही तिचे भोग पूर्णपणे संपलेत असे झालेले नाही. फक्त त्याची रूपे बदलली आहेत.
स्त्रीच्या एका दाहक, जीवघेण्या अनुभवाची ही करूण कहाणी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या ‘अब्रू’ या भावस्पर्शी कवितेतून सांगितली आहे. तिची अनुभूती आपल्याला बेचैन करून जाते. शेवटी ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ हे दुर्दैवी वास्तव आहे.
सावरकरांनी ही कविता १९२६ साली म्हणजेच ते रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत असताना लिहिली आहे. या कवितेमध्ये मांडलीय एक साधी गोष्ट- माला गुंफणे व ती आपल्या आराध्याला अर्पण करणे. पण या साध्या गोष्टीला सावरकर जी अध्यात्मिक उंची व भावनिक खोली देतात ती पाहून अचंबित व्हायला होतं. त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची भरारी सामान्य विरहिणी पासून प्रकृतीदेवीपर्यंत झेप घेते व त्यांची अफाट कवीकल्पना, फुलांपासून ते भूकंपांपर्यंत व सूर्यमालेपासून अश्रुंपर्यंतच्या माला गुंफते. सूर्यमालेची माला, भूकंपांची माला या कल्पनांची कल्पनासुद्धा करणं अन्य कोणाला अशक्य आहे.
जगन्माता जगदंबा त्रिगुणातीताला म्हणजेच शंकराला बेलाच्या पानांची माला घालते. बेलपत्र हे पार्वतीचं रूप आहे. मंदराचल पर्वतावर एकदा पार्वतीच्या घामाचे थेंब पडले व त्यातूनच बेलाचा वृक्ष निर्माण झाला अशी मान्यता आहे. या वृक्षाच्या मुळांत ती गिरिजा रूपात, बुंध्यात माहेश्वरी रूपात, फांद्यात दाक्षायणीच्या, पानांत पार्वतीच्या, फुलांत गौरीच्या व फळांत कात्यायनीच्या रूपात वास करते असं मानलं जातं.
प्रकृती व पुरुष यांनी ब्रम्हदेवाच्या आज्ञेवरून, ब्रम्हांड निर्मिती केली. म्हणून सावरकर म्हणतात प्रकृतीदेवी, विराटासाठी म्हणजेच ब्रम्हासाठी नवग्रहांच्या नवनवीन
सूर्यमाला गुंफित आहे.
कालीमाता हे दुर्गेचे रौद्र रूप आहे. ती स्मशानात राहते व मुंडमाला धारण करते. तसेच महाकाल हे शंकराचे रौद्र रूप आहे तो देखिल स्मशानात राहतो व मुंडमाला धारण करतो. कालीने शुंभ, निशुंभ तसेच चंड व मुंड या असुरांना ठार करून ती मुंडमाला शंकराला अर्पण केली अशी कथा आहे.
सृष्टीदेवी तिच्या निर्मिकाला घालण्यासाठी भूकंपांची मालिका निर्माण करते. कवी येथे हे सत्य अधोरेखित करतात की, निर्मिती व नाश यांचं खूप जवळचं नातं आहे किंवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
सत्यभामेसाठी श्रीकृष्णांनी स्वर्गातून पारिजातक आणला असं मानलं जातं. त्यामुळे सत्यभामा श्रीहरींसाठी पारिजातकाची माला गुंफते आहे.
सुंदर, आकर्षक अशी राणी, वैभवाचे प्रतीक असलेली मोत्यांची माळ आपल्या पतीसाठी म्हणजेच राजासाठी ओवते आहे.
शृंगाराचं प्रतीक असणारी फुलांची माला, साक्षात् शृंगार असलेल्या अनंगासाठी म्हणजेच कामदेव मदनासाठी त्याची पत्नी रती ओवते आहे. रती व मदन यांनी शृंगारिक अविर्भावांनी शंकराचा तपोभंग केल्यावर, क्रोधित शंकरांनी मदनाची जाळून राख केली मात्र नंतर उःशाप म्हणून त्याला शरीरविरहित (अनंग) अवस्थेत कुणाच्याही शरीरात शिरण्याची मुभा दिली; म्हणूनच मदनाला अनंग म्हणतात.
विरहात झुरणारी प्रेमिका मात्र आपल्या प्रियासाठी अश्रूंची माळ ओवते आहे म्हणजेच अश्रु ढाळते आहे. प्रदीर्घ कारावासामुळे सावरकर व त्यांच्या पत्नी माई यांनी विरहयातनांची झळ चांगलीच अनुभवली होती. त्या आठवणींची मालाच ते या ओळीतून गुंफित असतील काय?
निसर्ग हा एक जादुगार आहे. त्याच्या कला त्याच्या लीला अगाध आहेत. फक्त पाहण्याची दृष्टी हवी. रोज उगवणारा सूर्य, त्याची रोज पृथ्वीवर येणारी किरणे! या किरणांच्या मार्गात एखादी वस्तू आली की, किरण थटतात त्यामुळे त्या वस्तूंची सावली पडलेली दिसते. एका साध्या सोप्या शास्त्रीय आधाराने स्पष्ट करण्याजोगी घटना त्यामुळे कधीच त्याचं कुतूहल वाटलं नाही.
पण ह्याच सावलीचं निरीक्षण केलं तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगी विविधता आढळते. प्रत्येक वस्तूची सावली निराळया प्रकारची असते. नारळाची सावली पाहिली की आईच्या पायाला घट्ट धरून मिठी मारणा-या बाळाची आठवण होते. असं वाटतं की ही सावली नारळाचे पाय घट्ट पकडते आहे. नारळानं तिला कितीही दूर ढकलंल तरी ती पाय सोडत नाही.
वेलीची सावली पाहिली की वाटतं जणू वेलीनं सावलीला अभयदान दिलं आहे. त्यामुळे हे निरागस बाळ खाली स्वच्छंदपणे नाचतयं बागडतंय. पण त्याचं वेलीपासून फार लांब जायचं धाडस होत नाही. त्यामुळे वेलीच्या आसपास खेळतंय. आंब्याची सावली निवांत पहुडलेली असते. सर्वांना सामावून घेणारी, शांत असते. हिच्या सावलीत शिरलं की इतकं सुरक्षित वाटतं की, आपल्याला आपल्या सावलीचंही भय रहात नाही. चिंचेची सावली कशी भेदरलेली, घाबरलेली आहे असं वाटतं. तिचं अस्तित्व इतकं अस्पष्ट असतं की वाटतं ती पळून जाण्यासाठी मार्ग षोधतेय पण तिला मार्ग सापडत नाहीय. तिला मोठयांदा ओरडावं असं वाटतयं पण आवाज फुटत नाहीय. एखाद्या झुडपाची सावली कशी अस्तित्वच हरवल्यासारखी, असून नसल्यासारखी!
माणसाची सावली मात्र दिवसभरात निरनिराळी रूपं घेऊन येते. सकाळी उगवत्या सूर्याबरोबर नव्या आशा, नवा उत्साह घेऊन येते. त्यावेळी सावली किती तजेलदार दिसते. आपली सोबत करते, दिलासा देते. पण दुपारच्या भयाण शांततेत कुणाची तरी सोबत हवी असं खूप वाटत असतं, त्यावेळी नेमकी गायब होते. आपल्याला एकटं सोडून! संध्याकाळी थकलेल्या निराश झालेल्या मनाला दिलासा द्यायचा सोडून लांब निघून जाते भरकटत, त्या मनासारखीच! आणि उदास करून जाते. काळोख्या रात्री घाबरलेलं मन नकळतच आसपासच्या आवाजांचा, हालचालींचा कानोसा घेत असतं, आणि त्यांना अचूक टिपण्याचा प्रयत्न करत असतं. त्यावेळी ही नको असणारी सावली हळूच येते आणि भिती दाखवून जाते. एकटेपणाची जाणीव कुठेतरी खोल रुतवून जाते.
अशी ही सावली तिचे अनेक आकार, अनेक रूपं. कांही मनाला भावणारी, तर कांही मनाचा थरकाप करणारी! सांगून, पाहून, वर्णन करून न संपणारी!!
जीवनात चढउतार येतात, मानापमानाचे खेळ सुरू असतात. बरेचदा अपयश, बदनामीमुळे मानसिक, शारीरिक होरपळ होते. यातूनही नव्या जिद्दीने पुन्हा उभे रहात नवा डाव सुरू होतो. अशाच एका जिद्दी, नव्या उमेदीने पुन्हा डाव मांडणाऱ्या माणसाचे मनोगत डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी ‘फिनिक्स’ या कवितेत मांडले आहे. तिचाच आज आपण रसास्वाद घेणार आहोत.
आयुष्यात अपयशाचा, संकटांचा पुन्हा पुन्हा तोच दाहक अनुभव मी घेतला आहे. त्या धगीने नकळतच मी शरीराने आणि मनानेही पूर्णपणे होरपळून निघालो आहे.
या कवितेचे शीर्षकच कवितेचे सार सांगत आहे. आपल्याच राखेतून नवा जन्म घेत आकाशात झेपावणारा पक्षी म्हणजे फिनिक्स. पौराणिक कथांमध्ये त्याला अमरपक्षी म्हणतात. स्वतःच्या राखेतून उठण्याच्या क्षमतेमुळे त्याला अमर म्हटले जाते. अशीच विजिगीषू वृत्ती असणाऱ्या एका परिस्थितीशी लढणाऱ्याचे हे मनोगत.
मुक्तछंदात असणारी ही कविता प्रथम पुरुषी एकवचनात लिहिलेली आहे. कवी मोकळेपणाने आपण आयुष्यात अनुभवलेले दाहक प्रसंग कथन करीत परिस्थितीशी संवाद साधतो आहे. या अनुभवाने आपण पूर्णपणे गलितगात्र झाल्याचे सांगत आहे. अपयश, बदनामी, प्रेमभंग, अपमान अशासारख्या गोष्टींनी पुन्हा पुन्हा या प्रसंगाला सामोरे जातो आहे. त्याची तीव्रता दाखवायला नुसते पुन्हा पुन्हा असे न लिहिता पुन:पुन्हा पुन:पुन्हा असा प्रभावी शब्दप्रयोग केलेला आहे.
क्षणभर बरं वाटलं
अजूनही मन शिल्लक आहेत तर…
… जिवंत आहे
विश्वास बसत नव्हता !
या अवस्थेची जाणीव झाली. संवेदना जागी झाली आणि खूप बरं वाटलं. कारण हे जाणवण्या एवढं माझं मन अजून सावध आहे म्हणजे मी अजून जिवंत आहे. पण खरंच माझा यावर विश्वासच बसत नाही.
बसलेल्या कठोर आघाताने आपण जणू निष्प्राण झालो, पूर्ण उमेद खचल्याने धुळीला मिळालो अशीच कवीची भावना झालेली असते. पण संवेदना जागृत आहेत हे लक्षात आल्यावर आपण अजून जिवंत आहोत ही जाणीव त्याला होते आणि थोडसं निर्धास्त पण वाटतं.
हे सुखही क्षणभराचंच
दुर्लक्ष करता येत नव्हतं
बसणाऱ्या चटक्यांकडे
अन् होरपळून निघालो
याच ज्वाळांच्या
भाजून काढणाऱ्या आठवणींनी !
मी जिवंत आहे या जाणिवेचे सुख क्षणीकच ठरले. कारण त्या दाहकतेने बसणाऱ्या चटक्यांकडे दुर्लक्ष करता येत नव्हतं आणि त्यांच्या त्या भयावह आठवणींनी पुन्हा पुन्हा जीव पोळून निघत होता.
अशा जीवघेण्या आघातामुळे होणारे शारीरिक मानसिक त्रास, चटके हे नेहमी दृश्य असतात. ते सोसावेच लागतात. त्यामुळे विसरता येत नाहीत आणि त्यांच्या आठवणी या जास्त त्रासदायक असतात. त्यामुळे आपण आता संपलो असे वाटून आत्मविश्वास रसातळाला जातो.
आता मात्र ठरवलंय
जळून खाक व्हायचं
…नेहमीसारखंच
पण यावेळी मात्र
उठायचं नाही परत फिनिक्ससारखं
पुन्हा भाजून घ्यायला
अन् पुन्हा जाळून घ्यायला ?
आता मात्र मी ठरवलंय असा पुन्हा अनुभव आला की, नेहमीसारखं त्यात जळून खाक व्हायचं. म्हणजेच नेस्तनाबूत व्हायचं. पण आता या राखेतून त्या फिनिक्स पक्षासारखं पुन्हा उठायचं मात्र नाही. पुन्हा होरपळत त्यात नव्याने जाळून घ्यायचं नाही. म्हणूनच आता पुन्हा कसलाही प्रयत्न करायचा नाही. जिवंत असूनही मेल्यासारखे जगायचे.
कवी झालेल्या होरपळीने इतका गलितगात्र झाला आहे की, आता पुन्हा पुन्हा हा अनुभव घ्यायची त्याची तयारी नाही. त्यामुळे त्याने आता पुन्हा उभारी घ्यायचीच नाही. असंच उध्वस्तपण सोसत रहायचं असा निर्धार केला आहे.
का केलास मग तो
हळुवार संजीवन स्पर्श
माझं मन आणि शरीर
जळून उरलेल्या
या तप्त राखेला
पुन्हा एकदा जन्म द्यायला
एका नव्या फिनिक्सला ?
या दाहक आघाताने जणू जळून राख झालेल्या माझ्या तापलेल्या मन आणि शरीराला तू का तुझा संजीवन देणारा स्पर्श केलास ? आता यातून पुन्हा एकदा नव्या फिनिक्सला जन्म द्यायचा काय ?
इथे कवीला कुणीतरी आधाराचा हात देणारे, मानसिक उभारी देणारे, पुन्हा लढण्याचे बळ देणारे भेटलेले आहे. त्यामुळे तो पुन्हा उभा राहतोय. पण त्याला या पुन्हा पुन्हा येणाऱ्या अपयशाची, कटू अनुभवाची जबरदस्त भीती वाटते आहे. त्यामुळे तो त्या सुहृदाला विचारतो, ” का मला संजीवन देणारा तुझा स्पर्श केलास ? का माझी जीवनेच्छा पुन्हा जागृत केलीस ? “
झाल्या आघाताने कवीचे मानसिक खच्चीकरण होते. त्यातून तो सावरतो. पुन्हा उभा रहातो. पुन्हा कोसळतो. त्याची असह्य तगमग होते. ही सारी मानसिक, भावनिक आंदोलने सहजसुंदर शब्दरचनेत मांडण्यात कवी अतिशय यशस्वी झालेला आहे.
या कवितेत फिनिक्स या रूपकाचा खूप छान उपयोग केलेला आहे. परिस्थितीने पूर्ण हतबल झालेला कवी पुन्हा नव्या उभारीने परिस्थितीला सामोरे जात नव्याने डाव मांडतो. यासाठी योजलेले फिनिक्सचे रूपक अगदी यथार्थ आहे.
ही कविता प्रथम पुरुषी एकवचनात असली तरी प्रत्येकजणच आपल्या आयुष्यात अशा परिस्थितीला केव्हा ना केव्हा सामोरा गेलेलाच असतो. त्यामुळे ही कविता फक्त एकट्या कवीची न रहाता सर्वस्पर्शी होते. कारण असे अनुभव हे सार्वत्रिक असतात. हे अनन्योक्ती अलंकाराचे छान उदाहरण म्हणता येईल.
माणसाला आयुष्याच्या वाटचालीत कधी शत्रूकडून त्रासदायक आघात, व्यवहारात, व्यवसायात पूर्ण अपयश, मित्रांकडून फसवणूक, जोडीदाराकडून प्रेमात अपेक्षाभंग अशा जीवघेण्या अनुभवांना तोंड द्यावे लागते. तो मोडून पडतो. शारीरिक, मानसिक होरपळ होते. आत्मविश्वास लयाला जातो. अशावेळी एखादा मित्र, एखादा हितैषी, जिवलग, जोडीदार आधाराचा हात देतो. पाठीशी खंबीर उभा राहतो. मनाची उभारी वाढवून पुन्हा लढण्याचे बळ देतो. पुन्हा वाटचाल सुरू होते. पुन्हा अशा अनुभवाची पुनरावृत्ती होते. पण माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती, जबरदस्त जीवनेच्छा गप्प बसू देत नाही. त्यामुळे पुन्हा नव्या उमेदीने तो जगण्याला सामोरा जाण्यास तयार होतो.
अशाच पद्धतीने लढणाऱ्याच्या मानसिक आंदोलनाचा एक सुंदर आलेख कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी फिनिक्स मध्ये मांडलेला आहे.
या कवितेचा आकृतीबंध मोठा लोभस आहे. प्रत्येक कडव्यात यमकाने अलंकृत चार छोट्या ओळी व तद्नंतर प्रत्येक कडव्यात ध्रुवपदाशी नातं सांगणाऱ्या दोन मोठ्या ओळी. सर्व आठ कडव्यांतल्या या सोळा मोठ्या ओळी व ध्रुवपदाच्या दोन अशा अठराच्या अठरा ओळी अज्ञाताच्या बंद घरा/दाराविषयी भाष्य करतात व संबोधनात्मक, रे (अरे) ने संपतात. यामुळे कवीची आर्तता, अगतिकता अधोरेखित होते तसेच यामुळे कविता एवढी गेय होते की आपण ती वाचतावाचताच गुणगुणू लागतो.
सावरकरांनी ही कविता ते अंदमानात २५+२५ अशी ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, तेंव्हा लिहिलेली आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही, की ५० वर्षांचा तुरुंगवास झालेल्या माणसाची मनःस्थिती कशी असेल. त्यातून तो माणूस असा की ज्याला मातृभूमीसाठी फक्त राजकीय नाही तर सामाजिक क्रांती देखिल घडवून आणण्याची तीव्र इच्छा होती. तुरुंगवासांत आपलं जीवन व्यर्थ जाणार. आपल्या हातून देशसेवा घडणार नाही या विचाराने त्यांना हतबलतेची जाणीव झाली असेल. हे विश्व संचलित व नियंत्रित करणार्या अज्ञात शक्तीला याचा जाब विचारावा किंवा त्यालाच यातून बाहेर पडण्याचा मार्ग पुसावा असं वाटलं असेल. किंवा कदाचित मृत्यूने येथून सुटका केली तर पुन्हा भारतमातेच्या उदरी जन्म घेऊन परदास्यातून तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करावे असंही त्यांना वाटलं असेल. यासाठी त्या अज्ञाताच्या घराचा बंद दरवाजा किती काळ आपण ठोठावत आहोत पण तो उघडतच नाही असा आक्रोश सावरकर या कवितेत करत आहेत. ही आठ कडव्यांची कविता सावरकरांच्या त्यावेळच्या मनःस्थितीचं दर्शन घडविते.
ध्रु.) अज्ञाताचं घर हे जीवनमृत्यूच्या आदिपासून अंतापर्यंतच्या चक्राकार मार्गावरचे स्थान आहे. जीवनाचे सगळे मार्ग येथूनच सुरू होतात व याच रस्त्याला येऊन मिळतात.
1) सावरकर त्या अज्ञातास उद्देशून म्हणतात, तुझे स्तुतीपाठक म्हणतात म्हणून, मी त्यांच्यावर विश्वसलो, मला वाटले की तुझ्या घरी मला थोडा विसावा मिळेल. पण तुझ्या घराचं बंद दार ठोठावून मी दमलो तरी ते उघडतच नाही.
2) ही भूमी विशाल आहे. तुझ्या घराचं न उघडणारं दार असं ठोठावित बसण्यापेक्षा मी कुणाच्याही घरी जाऊन थोडी विश्रांती घेईन पण तुझ्या घरापाशी येणार नाही कारण ही वज्राप्रमाणे कठीण असलेली तुझ्या घराची दारे सदोदित बंदच असतात.
3) पोथ्यापुराणांतून ज्ञानी माणसांनी सांगितलेल्या राजे राजवाड्यांच्या कथा ऐकून, त्यांच्या मार्गावरून मी युगांचे ‘मैलाचे दगड’ओलांडत त्यांच्या घरी जाऊ लागलो तर त्या मार्गाच्या शेवटी तुझेच घर होते.
4) दुंदुभि, नगारे यांच्या आवाजांच्या कल्लोळात क्रांतीवीर जेथे बेभान होऊन नाचत होते त्या मार्गावर मी त्यांच्यातलाच एक होऊन चालू लागलो तर त्या मार्गाच्या शेवटी पण तुझेच घर होते.
5) मी नटून थटून या मिरवणुकीत सामील झालो. ही मिरवणूक कुठून कुठे जात आहे हे ठाऊक नसतानाही नाचत नाचत त्या वाटेवरून जाऊ लागलो तर ती वाट स्मशानात जाऊन पोचली व तिथेही तुझेच घर होते.
6) हे सगळं सोडून मग मी मिणमिणत्या प्रकाशातल्या, उदास अशा एकांत मार्गावरून जाऊ लागलो. तो उंच सखल रस्ता चढ उताराचा, वळणावळणाचा होता पण तो सुध्दा शेवटी तुझ्या घरापाशीच जाऊन पोचला.
7) तुझ्या घराकडे जाणारा राजमार्ग सोडून मी दुसर्या घराच्या शोधार्थ अरुंद रस्त्यावरून, अणुरेणूंच्या बोगद्यातून जाऊन पाहिलं पण शेवटी तुझ्या घरापाशीच येऊन पोचलो.
8) तू आपलं घर उघडत नाहीस, दुसरं बांधू देत नाहीस. माझे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत पण मला प्रयत्न सोडून देऊन बसणं पण प्रशस्त वाटत नाही म्हणून मी पुनःश्च तुझ्या घराची बंद दारं ठोठावत आहे.
सावरकर अज्ञात शक्तीला उद्देशून म्हणतात, ” जीवनाचे सर्व मार्ग जर तुझ्यापाशी येतात व तुझ्यापासून सुरू होतात तर आता माझ्या जीवनाचा मार्ग मला अशा ठिकाणी घेऊन आला आहे की मला पुढचा मार्गच दिसत नाही. म्हणून तू मला मार्ग दाखव जेणेकरून मी माझ्या देशसेवेला अंतरणार नाही. यासाठी मी तुझ्या घराचे बंद दार ठोठावतो आहे. तू दार उघडतच नाहीस म्हणून मी निरनिराळ्या मार्गांनी जाऊन दुसरे पर्याय शोधून पाहिले पण सगळे मार्ग शेवटी तुझ्या बंद दाराशीच येतात. तू तुझे दार उघडत नाहीस, दुसरे घर बांधू देत नाहीस म्हणजे तू सोडून दुसरं कोणी मला या परिस्थितीतून बाहेर काढू शकेल अशी शक्यता तूच निर्माण केली नाहीस वा करू दिली नाहीस म्हणून मी पुनःपुन्हा तुझेच दार ठोठावत आहे व ठोठावत राहेन” असं सावरकर त्या अज्ञात शक्तीला ठणकावून सांगत आहेत.
☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
कृष्णभक्त रसखान यांच्या ‘सवैये’चा काव्यानुभव
(काही जाणकारांच्या मतानुसार रसखान यांचे काव्य इतके ‘रसमय’ आहे की ते त्यांना सूरदास या प्रसिद्ध कृष्णभक्त कवीच्याच श्रेणीत नेऊन ठेवतात.)
सवैय्या
आता सवैय्या म्हणजे काय हे बघू या मंडळी! सवैया एक छन्द (वृत्त) आहे. चार ओळी (प्रत्येक ओळीत २२-२६ शब्द) अशा या छंदांना समूह रूपात हिंदीत ‘सवैया’ असे परंपरेने म्हणतात. रसखान यांचे सवैये फार प्रसिद्ध आहेत. निम्नलिखित कविता ‘मानुष हौं तो वही रसखानि’ ही त्यांच्या कृष्णभक्तीचे सुंदर उदाहरण आहे. यात विविध प्रकारे कवी असे सांगतो की मला कृष्णाशिवाय काही नको. त्यांच्या साऱ्या कवितांचा आत्मा कृष्णलीला हाच आहे. कृष्णाची काठी व कांबळे यांवर आठ सिद्धी व नऊ निधींचे वैभवही ओवाळून टाकावे, अशा अलौकिक शब्दांत कवीने आपली कृष्णभक्ती प्रकट केली आहे. आता रसखान यांच्या या प्रसिद्ध कवितेचा आस्वाद घेऊ या. यांतील कांही मोजक्याच सवैयांचा अर्थ समजून घेऊ, कारण कविता रसपूर्ण तर आहे पण बरीच मोठी आहे. हे रसग्रहण करतांना कवीची कृष्णभक्ती जशीच्या तशी प्रस्तुत करायचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे.
“मानुष हौं तो वही रसखानि”
मानुष हौं तो वही रसखानि, बसौं मिलि गोकुल गाँव के ग्वारन।
जो पसु हौं तो कहा बस मेरो, चरौं नित नंद की धेनु मँझारन॥
पाहन हौं तो वही गिरि को, जो धर्यो कर छत्र पुरंदर धारन।
जो खग हौं तो बसेरो करौं मिलि कालिंदीकूल कदम्ब की डारन॥
रसखान ब्रजभूमीशी इतके समरस झालेत की तेथील कृष्णाशी संबंधित प्रत्येक गोष्टीशी त्यांना नाते जोडायचे आहे. कवी वरील सवैयात आपल्या इच्छा व्यक्त करीत म्हणतात, ‘देवा, माणसाच्या जन्माला घालायचे तर गोकुळातल्या एखाद्या गुराख्याच्या किंवा गवळ्याच्या जन्माला घाल, पशूच्या जन्माला घालायचे तर गोकुळातील नंदाच्या घरच्या गाई किंवा पाड्याच्या जन्माला घाल, रोज कान्हा वनात घेऊन जाईल याची ग्यारंटी! अन हो, दगडच व्हायचे तर जो गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला ना तिथेच पडून राहू दे मला. त्या पवित्र पर्वताचे छत्र करंगळीवर धारण करून कधी काळी इंद्रदेवाच्या कोपापासून गोकुळातल्या लोकांचे प्राण वाचवले होते त्या गिरीधराने! अरे पक्ष्याच्या जन्माला घातलेस तरी हरकत नाही, मात्र अशी सोय कर बाबा की, मी ब्रजभूमीवर जन्म घेईन अन कालिंदीच्या तटावरील एखाद्या कदंबाच्या फांदीवर आपले घरटे बांधीन. अरे कधी काळी याच कदंबाच्या फांद्यांचे हिंदोळे घेत असतील राधा अन गोपाळकृष्ण! नाही तर याच कदंब वृक्षावर बसून तो कृष्ण मुरली वाजवून गोपींना रिझवीत असेल! असे माझे नशीब असेल का की, जिथे जिथे कृष्णाचा आणि गोपगोपींचा वास होता तिथंच मी पण जन्म घेईन?’
या लकुटी अरु कामरिया पर, राज तिहूँ पुर को तजि डारौं।
आठहुँ सिद्धि, नवों निधि को सुख, नंद की धेनु चराय बिसारौं॥
ए रसखानि जबै इन नैनन ते ब्रज के बन बाग तड़ाग निहारौ।
कोटिक हू कलधौत के धाम, करील के कुंजन ऊपर वारौं॥
वरील सवैयात कवी रसखान यांना श्रीकृष्णाच्या बालपणीच्या वस्तूंचा भारीच मोह पडलाय असे दिसते. त्यांच्यासाठी ते कशा कशाचा त्याग करायला तयार आहेत हे बघा! ते म्हणतात, ‘या गवळ्याची काठी आणि कांबळे मला अतिप्रिय, त्यांच्यावरून त्रिलोकाचे राज्य जरी मिळाले तरी मी ओवाळून टाकीन! नंदाच्या गाई चरावयास घेऊन जायचे सुख मिळणार असेल तर आठ सिद्धी (अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व) तसेच नऊ निधी (पद्म निधि, महापद्म निधि, नील निधि, मुकुंद निधि, नंद निधि, मकर निधि, कच्छप निधि, शंख निधि आणि खर्व) यांच्या सुखाचा मी त्याग करू शकतो. मी स्वतःच्या नेत्रांनी ब्रजभूमीतील वने, उपवने, उद्यान आणि तडाग हे सर्व जीवनभर बघत राहून ते नेत्रात साठवीन. ब्रजभूमीतील काटेदार वृक्षवेलींकरता कोटी कोटी सुवर्ण महाल अर्पण करावयास मी आनंदाने तयार होईन.’
सेस गनेस महेस दिनेस, सुरेसहु जाहि निरंतर गावै।
जाहि अनादि अनंत अखण्ड, अछेद अभेद सुबेद बतावैं॥
नारद से सुक व्यास रहैं पचि हारे तऊ पुनि पार न पावैं।
ताहि अहीर की छोहरियाँ, छछिया भरि छाछ पै नाच नचावैं॥
कवी वरील ओळींमध्ये म्हणतात, ‘शेष (नाग), गणेश, महेश (शिव), दिनेश (सूर्य) आणि सुरेश (इंद्र) हे देव त्याचे (कृष्णाचे) निरंतर ध्यान करतात, त्याचे आकलन करू न शकलेले वेद त्याचे गुणगान असे गातात ‘तो अनादी, अनंत, अखंड, अछेद (छिद्र नसलेला) आणि अभेद्य, आहे.’ नारद मुनी, शुक मुनी, वेदव्यास सारखे गाढे ज्ञानी ऋषी मुनी ज्याच्या नावाचा सतत जप करतात, तरीही त्याचा भेद जाणू शकत नाहीत, असा परात्पर परब्रह्म असलेल्या या गोकुळातील बाळकृष्णाला या गवळणी (अहीर की छोरियाँ) ताकाचे भांडे (छछिया-ताक ठेवण्याचे मातीचे लहान भांडे) दाखवत नाचायला लावतात, कधी पैंजण घालायला लावतात तर कधी घागरा चोळी!’ जगाला नाचवणारा हा भगवान कृष्ण! त्याच्या लीला अपरंपार! आणि या जगदीश्वराला आपल्या मनाला वाटेल तसे नाचवणाऱ्या या गवळणींचे भाग्य किती थोर बरे! त्याचे बालरूप इतके मनमोहक आणि सुजाण असूनही अजाण गोपींसाठी हा अशा लीला करतो.
(असे म्हणतात की स्त्रीरूप घेऊन भगवान विष्णूंशी एकरूप होण्यासाठी देव आणि ऋषी मुनी यांनी गोपिकांचे रूप घेतले. पण गोपिका झाल्यावर ते आपले मूळ रूप विसरले आणि भोळ्या भाबड्या गोपिकांच्या रूपात त्यांना कृष्णाचा असा सहवास लाभला! खरे काय अन खोटे काय त्या पूर्णब्रह्म कृष्णालाच माहित, एक मात्र सत्य, जगाला नाचवणारा हा भगवान कृष्ण गोपींसाठी नृत्य करायला सदैव तयार असायचा, फक्त लोण्याचा गोळा अन वाडगाभर ताक द्यायला लागायचं!)
धुरि भरे अति सोहत स्याम जू, तैसी बनी सिर सुंदर चोटी।
काग के भाग बड़े सजनी, हरि हाथ सों लै गयो माखन रोटी॥
वरील सवैयात एक गोपी आपल्या सखीजवळ कृष्णाच्या सुंदर रूपाचे वर्णन करीत म्हणते, “सखे, अगं, धुळीत खेळून खेळून कृष्णाचं सगळं अंग धुळीने माखलय, कित्ती शोभून दिसतोय नाही हा असा! आणि त्याचे कुरळे केस बघ कसे सुंदर बांधले आहेत,, एक चोटी (चुट्टी) शिरावर शोभून दिसतेय (द्वारकेत गेल्यानंतर सोन्याचा मुकुट आला तरी ही बालपणीची शेंडी काहीं न्यारीच!) अंगणात खेळता खेळता खाणे अन खाता खाता खेळणे हे तर हृदयंगम दृश्य, खातो काय तर पोळी अन लोणी (माखन रोटी). असे धावत पळत अन पडत असतांना पायातील चाळ (पैंजण) छुनून छुनून वाजताहेत, ते नादब्रह्म म्हणजे सप्तसुरांपलीकडले, अर्थात आठवे!!!, आठवावा आठव्याचा (कृष्णाचा) आठवा स्वर, अर्थात त्याच्या पैंजणाची झंकार! (रुमझुम रुमझुम चाल तिहारी, काहे भयी मतवारी, हम तो बस बलिहारी, बलिहारी!!!) त्याने पीतवर्णाची लंगोट घातलेली आहे (मोठे झाल्यावर पितांबर, धन्य हो, किसनकान्हा!). या कृष्णाच्या मनमोहक आणि मनभावन स्वरूपाने सगळ्यांना वेड लावलच आहे, त्याच्या सौंदर्यशोभेपुढे प्रत्यक्ष कामदेव आणि कलानिधी चंद्र देखील आपल्या करोडो सुंदर रूपांना ओवाळून टाकीत आहेत. अगं सखये, जरा बघ तरी, त्या मेल्या कावळ्याचे भाग्य कसे फळफळलेय ते, चक्क कृष्णाच्या हातातील ‘माखन-रोटी’ वर झपाटून डल्ला मारला आणि ती घेऊन कसा उडून गेला बघ!”
कानन दै अँगुरी रहिहौं, जबही मुरली धुनि मंद बजै है।
माई री वा मुख की मुसकानि, सम्हारि न जैहै, न जैहै, न जैहै॥
रसखान वरील ओळींमध्ये गोपी कृष्णाच्या प्रेमात किती वेड्या झालेल्या आहेत ते सांगतात. एक गोपी आपल्या सखीला म्हणतेय, “अगं सखये, कृष्णाची मंद मंद सुरेल नादमधुर बासरी वाजते ना तेव्हा, माझ्या कानात कोणी बोटे घालावी, अर्थात मला ना त्याच्या बासरीची तान मुळी ऐकायचीच नाही बाई! तो ना माझ्या घराच्या वरच्या मजल्यावर चढून येईल आणि मुद्दामच माझ्या मनाला मोहून घेणाऱ्या ताना घेत गायी चरायला नेत असता गवळी म्हणतात ती गाणी (गौचारण) गात बसेल. पण मी ना सर्व ब्रजवासीयांना ओरडून ओरडून सांगेन, मला भलेही काहीही अन कितीही समजावून सांगून बघा, पण हे सखी, या श्यामलतनु कृष्णाच्या मुखावरील ते मंद, मधुर स्मितहास्य तर माझ्या मनाचा ताबा घेतंय! मला माझं मनच आटोक्यात ठेवता येत नाहीय. तो माझ्या हृदयकमलाभोवती भ्रमरासारखा गोड गुंजारव अन प्रेमालाप करीत फिरतोय! अर्थात् मी कृष्णाच्या प्रेमात अगदी आकंठ बुडालेय. मी इतकी व्याकुळ आणि उन्मत्त झाले आहे की काय सांगू अन कसं सांगू! मी सगळी लाज सोडून श्रीकृष्णाकडे धाव घेत आहे.”
मोर-पखा सिर ऊपर राखिहौं गुंज की माला गरे पहिरौंगी।
ओढि पितंबर लै लकुटी वन गोधन ग्वारनि संग फिरौंगी॥
भाव तो वोहि मेरो रसखानि सो तेरे कहे सब स्वाँग करौंगी।
या मुरली मुरलीधर की अधरान धरी अधरा न धरौंगी॥
कवीने या सवैयात गोपीचे कृष्णावरील आगळेवेगळे प्रेम प्रकट केले आहे. कृष्णाच्या वस्तूंना धारण करण्याची तिची कशी तयारी आहे बघा. एक गोपी आपल्या सखीला म्हणतेय, “अगं सखये, मी ना आपल्या शिरावर (कृष्णासारखाच) मोरपंखाचा मुकुट धारण करेन. गुंजांची माळ गळ्यात घालीन, झालच तर पीत वस्त्रे परिधान करून हातात काठी घेऊन आणि गवळण बनून वनावनात गायी चरायला घेऊन जाईन अन त्यांच्या मागे फिरत फिरत छान रखवाली करीन. कृष्ण तर मला इतका परमप्रिय आहे, की त्याच्यासाठी मी वाट्टेल ते करीन, त्याला प्राप्त करायला तू सांगशील ते सोंग घेईन. पण एक लक्षात ठेव बाई, कृष्णाची जी मुरली आहे ना, जिला तो अधरात धरून ठेवतो, तिला मात्र मी माझ्या अधरात कध्धी म्हणून कध्धी धरायची नाही हं!” (सवत आहे ना!)
मोरपखा मुरली बनमाल, लख्यौ हिय मै हियरा उमह्यो री।
ता दिन तें इन बैरिन कों, कहि कौन न बोलकुबोल सह्यो री॥
अब तौ रसखान सनेह लग्यौ, कौउ एक कह्यो कोउ लाख कह्यो री।
और सो रंग रह्यो न रह्यो, इक रंग रंगीले सो रंग रह्यो री।
गोपिका म्हणतात, ‘शिरावर मोरपंख, ओठांत मुरली आणि गळ्यात वनमाळा घातलेल्या कृष्णाला बघत राहिल्याने मन वाऱ्यावर डोलणाऱ्या कमलपुष्पासारखं डुलतय. माझ्या अशा प्रेममग्न अवस्थेत कोणी वैरीण जरी उलटे सुलटे बोलली तरी सहन केल्या जातंय! रसखान म्हणतात, जेव्हा लावण्याचा गाभा अशा कृष्णाशी इतके स्नेहबंध जुळले आहेत की, कोणी एक म्हणू दे किंवा कोणी लाख वेळा टोकले तरी, आता इतर कुठलाच रंग असो व नसो, त्या सावळ्या कृष्णसख्याच्या रंगातच रंगून राहायचे आहे!’ जाता जाता याच अर्थाचे माणिकबाईंचे गाणे आठवले, ‘त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे ग, न कळे मनास आता त्या आवरू कसे ग!’
ज्याच्या गळ्यात वैजयंतीमाला शोभायमान होते अशा कुंजबिहारी, गिरधरकृष्ण मुरारी, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी ही शब्द कुसुमांजली अर्पित करते!
काव्यानंद या सदरात मराठी भाषेतील कवितेचे रसग्रहण अपेक्षित आहे.आज आम्ही अपवादात्मक बाब म्हणून हिंदी भाषेतील काव्य रचनेचे रसग्रहण प्रकाशित करीत आहोत.आपला अंक तिनही भाषेत प्रकाशित होत असल्यामुळे त्या त्या भाषेतील साहित्य प्रकाशित होईल.यापुढील काळात मराठी अंकासाठी अन्य भाषेतील साहित्य पाठवले जाणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी, ही विनंती.
संपादक मंडळ (ई-अभिव्यक्ती -मराठी)
काव्यानंद
☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
कृष्णभक्त रसखान यांच्या ‘सवैये’चा काव्यानुभव
प्रसिद्ध कृष्णभक्त रसखान हे ब्रज भाषेचे कवी! वल्लभाचार्यांपासून सुरु झालेला संप्रदाय म्हणजे वल्लभ संप्रदाय. जेव्हापासून गोकुळ हे वल्लभ संप्रदायाचे केंद्र बनले, तेव्हापासून ब्रजभाषेत कृष्णावरील साहित्य लिहिण्यास सुरुवात झाली. या प्रभावामुळे ब्रजची बोली भाषा (मथुरा, गोकुळ व वृंदावन येथील) एक प्रतिष्ठित साहित्यिक भाषा बनली. सूरदास आणि रसखान यांच्या कृष्णभक्तीने रसरसलेले मधुर ब्रज भाषेतील काव्यप्रकार अतिशय सुंदर भावानुभव देतात. ‘कृष्णलीला’ हा त्यांच्या काव्याचा प्रमुख विषय. त्याची खोली अनुभवायची तर रसखान यांचे काव्यवाचन हाच एकमेव उपाय. त्यातीलच भक्तिप्रेम रसाने परिपूर्ण अशा त्यांच्या कांही प्रसिद्ध ‘सवैये’ या काव्यप्रकाराचा या लेखात समावेश करीत त्यांचे रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
सय्यद इब्राहिम खान उर्फ रसखान यांचा जन्म काबुल येथे (१५७८) झाला तर मृत्यू वृंदावन येथे झाला (१६२८). ते प्रसिद्ध भारतीय सुफी कवी आणि कृष्णाचे परम भक्त होते! आपण बादशाही वंशातील आहोत, असा कवीने स्वतःचा उल्लेख केला आहे. त्यावरून त्यांचे बालपण चांगल्या स्थितीत गेले असावे, असे समजल्या जाते. भागवताचा फारसी अनुवाद वाचून त्यांच्या हृदयात श्रीकृष्णाबद्दल भक्ती उत्पन्न झाली. या संदर्भात अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. शेवटी तात्पर्य इतकेच, की त्यांना अनेक प्रसंगामुळे कृष्णभक्तीची ओढ लागली. वल्लभाचार्यांचे पुत्र विठ्ठलनाथ यांनी कृष्णभक्तीची दीक्षा दिल्यानंतर मुसलमान असूनही त्यांनी वैष्णव भक्ताप्रमाणे जीवन व्यतीत केले.
त्यांनी प्रेमवाटिका हे काव्य १६ व्या शतकात रचले आणि ते वृंदावन येथे खूपच प्रसिद्ध झाले. बावन दोह्यांच्या या काव्यात प्रेमाची महती वर्णिली आहे. ‘सुजान रसखान’ या केवळ १२९ स्फुट पदांच्या संग्रहाचा नायक आहे ‘सुजान रसखान’ चा प्रिय, आपल्या मुरलीने गोपींना मोहित करणारा श्रीकृष्ण! यातील ‘कवित्तसवैय्ये’ अतिशय लोकप्रिय आहेत. ‘ऐकवा एखादी कविता’ या अर्थी ‘सुनाओ कोई रसखान’ असा वाक्यप्रयोगच या संदर्भात केला जात असे. ब्रजभाषेत कविता रचणाऱ्या या कवीचा भागवत आणि अन्य संस्कृत ग्रंथांशी चांगलाच परिचय होता असे दिसून आले आहे. आपल्या काव्यात रसखान यांनी या पौराणिक संदर्भांचे उल्लेख केलेले आहेत. त्याच्या कवितेत अरबी, फारसी आणि अपभ्रंश भाषांतील शब्दांचाही विपुल वापर आढळून येतो. त्यांची भाषा साधी व सरळ असूनही सरस आणि समृद्ध आहे. त्यांनी दोहा, कवित्त, घनाक्षरी व सवैय्या छंदांचा (वृत्त) वापर अधिक प्रमाणात केला. आपल्या रचनांतून कृष्णाचे बालपण, त्याच्या विविध लीलांचे रसपूर्ण मनोज्ञ घडवणारा कवी हाच रसखान यांचा सर्वात महान परिचय! काही जाणकारांच्या मतानुसार रसखान यांचे काव्य इतके ‘रसमय’ आहे की ते त्यांना सूरदास या प्रसिद्ध कृष्णभक्त कवीच्याच श्रेणीत नेऊन ठेवतात.