☆ हिरवी कोडी… वि. म. कुलकर्णी ☆ रसास्वाद – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
निष्कलंक, निरागस, बालपणातील आठवणी मनाच्या कोप-यात घर करून राहिलेल्या असतात. वर्षामागून वर्षे निघून जातील पण या आठवणी तिथेच अंग चोरून बसलेल्या असतात. मनाचा कोपरा कधी तरी साफ करावासा वाटतो आणि नकळत लक्ष जातं अशा कोप-यातल्या आठवणींकडे. शांत जलाशयावर एखाद्या धक्क्याने तरंग उठावेत तसे मनोपटलावरही तरंग उठतात आणि आठवणींच्या लाटा हळुवारपणे एका मागे एक उमटू लागतात. मनच ते. जितक पुढ धावेल तितकंच मागे मागेही जाईल. मग बालपणातल्या टवटवीत आठवणी डोळ्यासमोर जाग्या व्हायला कितीसा वेळ लागणार?
कवीवर्य वि. म. कुलकर्णी यांच्या ‘हिरवी कोडी ‘ या कवितेत हेच भाव व्यक्त झालेत असे वाटते. स्नेह भाव व मनाची नितळता ही त्यांच्या फक्त स्वभावातच नव्हती तर कवितेतूनही दिसून येत होती. हिरवी कोडी मध्ये त्यांनी जे प्रसंग चित्रित केले आहेत ते किती सौम्यभाषेत रंगवलेले आहेत ते समजून घेण्यासारखे आहे. आयुष्यतील कारकिर्दीची वर्षे ही शहरात व्यतीत झाली असली तरी मनातील गावाकडील बालपणीच्या आठवणींचा झरा बुजलेला नाही. शालेय जीवनातील सवंगडी आणि एखादी बालमैत्रिण दृष्टीआड झाली तरी स्मृतीआड होत नाहीय. ते गाव, तिथला ओढा, तिचं त्या गोड पाण्यात खेळणं, अंगावर उडणारे शिंतोडे , त्यामुळे होणारी जीवाची थरथर!शिंतोडे नव्हतेच ते, तो तर होता तिचा अप्रत्यक्ष स्पर्श. त्याशिवाय का जीवाची थरथर होईल?चवळीच्या शेंगांसारखा रानचा मेवा. त्या शेंगांनी भरलेली ओंजळ याच्यासाठी रिकामी व्हायची, केवळ मैत्रीपोटी. आणि तो झोपाळा आजही झुलवतोय मनाला. झोका द्यायचा तिचा हुकूम हा मुकाट्याने कसा काय पाळायचा?केवळ मैत्री. जणू काहीनितळ मनाचे शीतल चांदणे.
आणि आज? ओढा गेला दूर देशी. शाळा झाली नजरेआड. घर म्हणजे फक्त आठवण. धुक्यामुळे धुसर दिसावे तसे काळाच्या पडद्याआडून पुसटसे दिसते आहे, थोडेसे स्मरते आहे. मन थरथरून उठते आहे. आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत राहतात मनात फुलणारी हिरवी कोडी! हो, कोडीच. ज्यांची उत्तरं तेव्हाही मिळाली नव्हती आणि आताही मिळत नाहीत. किंवा उत्तरं मिळू नयेत असही वाटत असेल. कोडी मात्र हिरवी आहेत. तेव्हाही आणि आताही. हिरवेपणा न संपणारी, कधीच न उलगडणारी ! तुमच्या आमच्या मनातही असतातच ना अशी काही कोडी?
वि. मं. नी ती आपल्यालासमोर मांडली. आपणही उलगडूया आपल्या मनातली कोडी, हिरवी,
वीस एप्रिल हा डॉक्टर सरोजिनी बाबर, लेखिका, लोकसाहित्यिका, कवयित्री, बालगीतकार यांचा स्मृतिदिन ! त्यानिमित्ताने:
खेळाचा चक्कर भवरा…
नदीच्या तासात वाळूच्या जोषात
कहार उन्हात कामाला उपस्थित
आळवावा सारंग धरा
हासर्या नजरेनं खुशीच्या बोलीनं
फुलवाव्या येरझारा
गर्जू दे नभाला
नाचू दे वीजेला
सोडीत अमृतधारा
करा रे हाकारा
पिटा रे डांगोरा
खेळाचा चक्कर भवरा…
☆ रसग्रहण ☆
जुन १९७३ साली मान्यवर कवयित्री सरोजिनी बाबर यांनी लिहिलेली ही सुंदर, आशयघन, मानव आणि निसर्ग यांच्या नात्यावरची ही कविता.
ही कविता वाचताना सहज लक्षात येतं की, या कवितेत एक आळवणी आहे. पाऊस म्हणजे जीवन. या पर्जन्य धारांची सारं चराचर आतुरतेनं वाट पहात असतं.
जसं बळीराजाचं जीवन त्यावर अवलंबून असतं तसंच, जीवलोकांत अनेकांचं असतं. त्यातलाच एक सारंगधर.
एक नावाडी. खलाशी. किंवा नदीच्या पात्रांत, समुद्राच्या ऊदरात मच्छीमारी करणारा कोळी.
मग या पावसाची ही भक्तीभावाने ,हसर्या नजरेनं, खुशीच्या स्वरात केलेली एक आर्त अशी विनवणी या कवितेत जाणवते. पावसाच्या आगमनासाठी केलेली प्रयत्नपूर्वक, कष्टमय तयारीही आहे. मग पाऊस येणार आहे, आकाश गडगडणार आहे, वीजा चमकणार आहेत, आणि मग अमृतमय पर्जन्यधारा कोसळणार आहेत.. हा आनंदीआनंद होत असताना, एका नादमय हर्षकल्लोळात एक चक्कर भवरा म्हणजे मन गिरक्या घेणार आहे.
कवयित्रीने अतिशय आनंदमयी शब्दांतून सारंगाशी हा स्फूर्तीदायी संवाद साधला आहे.
सारंग या शब्दाचा संगीतातील एका रागाशीही संबंध आहे.
हा एक मधुर सुरावटीचा राग असून, त्याच्या आळवणीने, ऊष्म प्रहरात शीतलतेचाही अनुभव येतो.कवयित्री सरोजिनी ताईंनी आळवावा सारंगधरा याअर्थानेही म्हटले असावे.
आणखी एक अर्थ असाही जाणवतो. की सारंग म्हणजे शीव. शीवाची आळवणी म्हणजेही पर्जन्यदेवतेचीच आराधना.
मात्र या संपूर्ण काव्यरचनेला एक नाद आहे. लय आहे. गती आहे. वेग आहे. आणि शब्दाशब्दांत चैतन्य ठासून भरलेलं आहे. या काव्यशब्दांबरोबर संवेदनशील मन या आनंदरसात किंवा या हर्षलाटेत डुंबून जाते.. एक शीतल, ओलाव्याचा अनुभव येतो.
सारंगधरा, येरझारा, अमृतधारा, हाकारा, डांगोरा भवरा या यमकीय शब्दांमधला वेग नाद आणि लय इतकी सुंदर आहे की ही कविता पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते गावीशी वाटते.
मूळातच डाॅ.सरोजिनी बाबर हे एक लोकव्यक्तीमत्व होतं.
महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी आयुष्यभर केला. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समीतीच्या त्या अध्यक्ष होत्या. दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य
त्यांनी संकलीत केल. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या, लोकवाङमयाचा खूप मोठा संग्रह त्यांनी केला. त्यात कोळ्यांची गीते, कथा, कहाण्या, म्हणी, ऊखाणे, सण ऊत्सव, रितीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे.
अर्थातच, त्यांच्या लेखनावर, काव्य रचनेवर लोकसंस्कृतीचा, लोकजीवनाचा आणि निसर्गाचा प्रभाव जाणवतो.
ऊपरोक्त, नदीच्या तासात वाळूच्या जोषात.. ही कविताही लोकसाहित्याच्याच अनूषंगाने जाणारी आहे.
त्यातले, कहार, हाकारा, डांगोरा, चक्कर भवरा हे बोलीभाषेतले शब्द वेगळ्याच माधुर्याने लिंपलेले आहेत.
या कवितेतला सारंगधर हा कष्टकरी वर्गातला, निसर्गाशी बांधलेला प्रतिनिधी आहे. आणि सरोजिनीताई काव्यातून त्याच्या जीवनाशी सहजपणे समरस होतात. हेच या काव्याचे वैशिष्ट्य.
अडगुळं मडगुळं
सोन्याचं कडबुळं
खेळायला आलं ग
लाडाचं डबुलं
जावळात भुरभुरलं
नजरेत खुदखुदलं
सोन्याच्या ढीगाव
बाळ गं बैसलं..
हे त्यांचं बडबडगीत घराघरातली माता आपल्या तान्हुल्या साठी गाते.
त्यांच्या झोळणा, चाफेकळी या काव्य संग्रहातील कविता वेगळ्या का वाटतात? कारण ते शब्दालंकारच जीवनाला भिडणार्या संस्कृतीतले आहेत. त्यात अपार आपलेपणा आहे. त्यातल्या भावना नैसर्गिक आहेत. त्या चटकन् भिडतात.
‘माझ्या खुणा माझ्या मला’ .. हे आत्मचरित्रही त्यांनी लिहीलं.
दूरचित्रवाणीवर, रानजाई या कार्यक्रमातून, कवीश्रेष्ठ शांताबाई शेळके यांच्याशी केलेल्या गप्पा प्रचंड गाजल्या.
जाता जाता, सहज एक लोकभाषेतला, या कार्यक्रमातला गंमतीदार किस्सा आठवला तो सांगते.
कुणीतरी घरातल्या कारभारणीला विचारतात,
“का वं मालक हायत का घरला? “
कारभारीण उत्तरते, ” काय की हो..खुंटीवरचं मुंडासं दिसं नाय मला…”
याचा अर्थ मी ऊलगडवून सांगायला नको. त्यातली गंमत तुम्हीच अनुभवावी..
तर असं हे विलक्षण सरोजिनी बाबर नावाचं विलक्षण लोकव्यक्तीमत्व!त्यांनी पाचशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली. बळीराजा, जा माझ्या माहेरा, कुलदैवत, कारागिरी,एक होता राजा या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्या.
एक गोष्ट खेदपूर्वक आणि जाणीवपूर्वक नमूद करावीशी वाटते की पुस्तकांसाठी खास प्रसिद्ध असलेल्या पुण्यातल्या आप्पा बळवंत चौक इथल्या एकाही दुकानात ,डाॅ. सरोजिनी बाबर यांचं साहित्य उपलब्ध नाही. त्यांचं पुनर् मुद्रण व्हावं ही अपेक्षा ठेवून या थोर व्यक्तीमत्वाला आजच्या स्मृतीदिनी मी सादर वंदन करते…
☆ माझिया माहेरा जा ! … कवी राजा बढे ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
☆ माझिया माहेरा जा ! ☆
माझिया माहेरा जा, रे पाखरा,
माझिया माहेरा जा !
देतें तुझ्या सोबतीला, आतुरलें माझें मन
वाट दाखवाया नीट, माझी वेडी आठवण
मायेची माउली, सांजेची साउली माझा ग भाईराजा !
माझ्या रे भावाची ऊंच हवेली
वहिनी माझी नवीनवेली
भोळ्या रे सांबाची भोळी गिरिजा !
अंगणात पारिजात, तिथं घ्याहो घ्या विसावा
दरवळे बाई गंध, चोहिंकडे गावोगावा
हळूच उतरा खाली, फुलं नाजुक मोलाची
माझ्या माय माऊलीच्या काळजाच्या कीं तोलाचीं
‘तुझी ग साळुंकी, आहे बाई सुखी’
सांगा पाखरांनो, तिचिये कानी
एवढा निरोप माझा !
गीत — राजा बढे
संगीत — पु. ल. देशपांडे
स्वर — ज्योत्स्ना भोळे
संकलक — ज्योत्स्ना तानवडे. पुणे
☆ रसग्रहण ☆ ” माझिया माहेरा जा ” कवी — राजा बढे ☆
श्री. राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्यलेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख कवी आणि गीतकार अशीच होती.
अतिशय भावमधुर, नाजूक, हळव्या भावनांची अप्रतिम भावगीते लिहिणारे ते कोमलवृत्तीचे प्रतिभासंपन्न कवी होते. संस्कृत काव्य आणि उर्दू शायरीचाही त्यांचा खूप अभ्यास होता. त्यांची भावगीते प्रचंड लोकप्रिय झाली होती.
चांदणे शिंपीत जाशी, हसतेस अशी का मनी, दे मला गे चंद्रिके, त्या चित्त चोरट्याला, कशी ही लाज गडे, कळीदार कपुरी पान, कशी रे तुला भेटू, जय जय महाराष्ट्र माझा, दार उघड बये आता दार उघड अशी एकाहून एक अप्रतिम गीते लिहिणाऱ्या राजा बढे यांचे असेच एक सर्वांग सुंदर गीत म्हणजे ” माझिया माहेरा जा ! “
‘माहेर’ हा समस्त स्त्री वर्गाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. मग स्त्रीचे भावविश्व व्यापणाऱ्या माहेर या विषयावर अतिशय संवेदनशील शब्दप्रभू राजा बढे लिहीत असतील तर काय ? एक अतिशय हळुवार, भावसंपन्न काव्य जन्माला आले, ” माझिया माहेरा जा पाखरा “
पूर्वीच्या काळी सतत माहेरी जाणे सहज शक्य व्हायचं नाही. संपर्काची तर कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. पण मन मात्र सतत माहेरच्या विचारात गुंतलेले असायचे. मग हेच विचार जात्यावरील ओव्यातून, उखाण्यातून, नाहीतर अशा एखाद्या गाण्यातून व्यक्त व्हायचे. म्हणून ते गाणाऱ्याच्या, ऐकणाराच्या दोघांच्याही अंतर्मनाला स्पर्शुन जायचे. त्यामुळेच या गीतात एक सासुरवाशीण एका पाखराला आर्जवी स्वरात विनंती करते ती आपल्या मनाला भिडते.
आईला कुणा हाती निरोप पाठवावा हे न समजून ती पाखरापाशी आपले मन मोकळे करते. त्याच्याबरोबर निरोप पाठवायची ही कल्पनाच मनोहरी आहे. माहेरच्या विचाराने अधीर, उत्सुक बनलेले तिचे मन प्रत्येक शब्दातून प्रत्ययाला येते. आपले माहेर ओळखण्याच्या खाणाखुणा ती सांगते. सोबतीला आपले आतुरलेले मन आणि वाटाडी म्हणून आपली आठवण देते. भावाची हवेली उंच आहे. ती सापडणे अगदी सहजशक्य आहे. नवीन लग्न झालेली नवीनवेली वहिनी घरी आहे. ही वहिनी म्हणजे भोळ्या शंकराची जणू भोळी गिरिजा अशीच आहे. घराबद्दल सांगताना घरातल्यांच्या बद्दलच्या आपल्या भावना पण ती पाखराला सांगून जाते. अंगणातल्या पारिजातकाचा दरवळ म्हणजे मायेच्या माहेराची चहूकडे पसरलेली कीर्ती. माय माऊलीचे काळीज या फुलांच्या इतकेच नाजूक. किती छान उपमा आहेत ना ! ‘तुझी लेक सासरी सुखात आहे’ एवढाच निरोप आईला सांगायची तिची विनंती आहे. एवढ्या निरोपानेही दोघीजणी आपापल्या ठिकाणी बिनघोर होणार आहेत. हे अंतर्मनाचे संकेत आहेत.
‘माहेर’ या भावनेची पकड संपूर्ण गीतात कुठेच सैल होत नाही. यातूनच हे उत्तम काव्य साकार होते. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न संगीतकाराने या गीताला अप्रतिम चालीत बद्ध केले आहे. योग्य तिथे येणारा ताल आणि गायनाचा ठेहराव शब्दांची परिणामकारकता वाढवितो. ‘हळुच उतरा खाली’ या ओळीच्या सुरावटीने अगदी पायर्या खाली उतरल्या सारखे वाटते. संपूर्ण गाणे एक हळुवार अप्रतिम सुंदर अनुभूती देऊन जाते.
राजा बढे यांचे भावपूर्ण शब्द, पु.ल.देशपांडे यांची भावानुकूल स्वररचना आणि मन आकर्षित करणारी ज्योत्स्ना भोळे यांची गायन शैली यांच्यामुळे हे भावगीत प्रचंड लोकप्रिय झाले होते. या त्रिवेणी संगमा मुळे ही भावकविता आजही तितकीच मनाला जाऊन भिडते.
आज सतत माहेरी जाता येते, हाताशी संपर्काची विविध माध्यमे उपलब्ध असण्याच्या काळात या गीताची अपूर्वाई तितकी जाणवणार नाही. पण त्या काळाची कल्पना करून गीत ऐकले तर निश्चित ती अनुभूती जाणवेल.
माझे वडील हार्मोनियमवर हे गाणे वाजवत आणि आई अतिशय सुंदर ते म्हणत असे. त्यामुळे माझ्यासाठी तर ही मर्मबंधाची ठेव आहे.
कवी. राजा बढे यांच्या या सुंदर रचनेला सलाम आणि त्यांना विनम्र अभिवादन.
वाटे पापचि मूर्तिमंत वृष रे त्वजन्म हा अंतरी ।।२।।
ऐके तू वृष शांतिने सकल हे उद्गार त्याचे असे
दावोनि स्मित मंद ज्यांत बहुधा धिक्कार भारी वसे.
बोले हिंदुसी त्या,अरे मज बहु निंदावचे ताडिले
दावि त्वस्थिति अल्पही न तुजला हे म्यां मनी ताडिले।।३।।
निंदाव्यंजक शब्द योजूनी बहु माझ्या धन्या निंदसी
कैसा वागवितो तुला तव धनी शोधूनी पाहे मनी।।४।।
ज्याते राज्य अफाट आर्यवसुधा तैसी जया अर्पिली
दोहायास सुवर्णभू सतत त्वां हस्ते ज्याला दिली
लोखंडी असताही कांचनमया केलीस यद् भू अरे
तो देई तुज काय वेतन तुझा स्वामी कधी सत्वरे।।५।।
किंवा तू म्हणशील की तव धनी आभार भारी वदे
राजे रावबहाद्दुरादिक तुला मोठ्या किताबांसी दे
ऐसे शुष्क किताब घेउनी तुवा स्वातंत्र्य संपत दिली।।६।।
दारिद्र्यासह पारतंत्र्य दुबळ्या मानेवरी लादती
तेव्हां येउनि मानवी तनुस बां तू साधिले काय ते
भूभारापरी गर्वभार अजुनु त्वचित्त का वाहते।।७।।
सोडी गर्व स्वदेशभार हरण्या यत्नांसी आधी करी
होई इशपदी सुलीन पुरवी सद्हेतुला श्रीहरी।।८।।…..
☆ रसग्रहण ☆
वृषोक्ती ही कविता सावरकरांनी १९०१ साली लिहीलेली आहे. एकदा जव्हार घाटातून बैलगाडीने प्रवास करत असताना त्यांना ती सुचली. या कवितेतली त्यांची कल्पकता आणि विचार दोन्हीही थक्क करणारे आहेत.
१९०१ सालचा काव्यकाळ हा वृत्तबद्ध ,
छंद काव्याचा होता.अलंकारिक भाषेचा होता.आजची मराठी आणि तेव्हांची मराठी यात खूप अंतर होते. त्यावेळची भाषा संस्कृतप्रचुर,नटलेली अवघड होती.पण अर्थातच रसाळ होती.वृषोक्ती या सावरकरांच्या कवितेचं रसग्रहण करताना मला ते जाणवलं.शिवाय ,ने मजसी ने …किंवा जयोस्तुते ..या काव्यरचनांची संगीतबद्ध गाणी झाली म्हणून ती आपल्यापर्यंत पोहचली पण सावरकरांच्या अशा अनेक कविता आहेत की त्यातून सावरकर एक संवेदनशील ,डोळस,कणखर व्यक्तीमत्व आपल्याला दिसतं..
वृष म्हणजे बैल आणि वृषोक्ती म्हणजे बैलाने ऊद्गारलेले…ही काव्यरचना शार्दुलविक्रीडित या वृत्तात बद्ध आहे.या वृत्तात चार चरण, १९वर्ण आणि प्रत्येक बारा वर्णानंतर यती असतो.या दृष्टीनेही ही कविता व्याकरण शुद्ध आहे.लयीत आहे म्हणून अर्थ उलगडता येतो.
या कवितेत एक काल्पनिक संवाद आहे.
बैलाचा आणि एका गर्विष्ठ माणसाचा..
तो पारतंत्र्याचा काळ होता.आणि स्वातंत्र्याचे वारे हळुहळु वाहत होते.
गाडीला जुंपलेल्या, हळुहळु घाट चढून पार दमलेल्या बैलाकडे पाहून एक स्वत:त रमलेला भारतीय माणूस त्याची निर्भस्तना करतो.मानेवर जू ठेवून धन्याची सेवा करणारा बैल म्हणून त्याचा धिक्कार करतो.
त्याचवेळी हा बैल मनोमन हसतो आणि त्याला एक चपखल, प्रखर उत्तर देतो.
“अरे! तू माझी आणि माझ्या धन्याची काय निंदा करतोस..तू कधी तुझा विचार केला आहेस…आज तुझी काय स्थिती आहे हे कळलंय् का तुला..आर्यांची तुझ्या कष्टाने उभारलेली ही सुवर्णभूमी तू परकीयांच्या हवाली केलीस.स्वत:च्याच भूमीत तू त्यांची चाकरी करतोस. त्याचं वेतन तरी तुला कधी मिळतं का वेळेवर ? त्यांनी दिलेले राजे रावबहादुर या किताबातच तू खूष आहेस…त्यांच्या भाषेतला आभार हा बेगडी शब्द तुला भुलवतो…अरे त्या बदल्यात तुझं लाखमोलाचं स्वातंत्र्य हरण केलय् त्यांनी.. याची जाणीव आहे कां तुला..
त्यापेक्षा मी बैल बरा ..धन्याच्यात आणि माझ्यात परस्पर सांमजस्य आहे..प्रेम आहे.
तू माणसाच्या जन्माला येऊन काय मिळवलंस…? परकीयांची गुलामगिरी..
धिक्कार असो तुझा…माणूसपणाचा मला जो गर्व दाखवतोस ,तो सोड..स्वभूमीला पारतंत्र्यातून सोडव…
प्रयत्नांची पराकाष्ठा कर…या उदात्त कार्यात परमेश्वरही तुला मदत करेल…..
हा या कवितेचा सारांश! एक सुंदर रुपकात्मक संदेश देणारा…ही कविता वाचताना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सावरकर किती झपाटलेले होते हे जाणवतं.
लोकांमधे जागृती निर्माण करण्याची त्यांची तळमळ दिसून येते.अरे परकीयांचं जोखड घेऊन जगण्यार्या तुझ्यापेक्षा तो बैल बरा…
अशा शब्दात ते त्याची कानउघाडणी करतात…
सावरकरांचा कणखरपणा ,विद्रोह शब्दाशब्दात जाणवतो.ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी वीर सावरकरांनी काव्य हे माध्यम प्रभावीपणे वापरलं.त्याचा थेट परिणाम लोकांच्या मनावर नक्कीच झाला.
या काव्यात उद्विग्नतेबरोबर उपहासही जाणवतो…
शिवाय ही कविता, आता काळ ओलांडून गेली असेही वाटत नाही.ती कालातीत आहे.
जेव्हांजेव्हां माणसाच्या मनावर वैचारिक गंज चढतो तेव्हा माणूस परिस्थितीचा गुलामच बनतो.आज देश स्वतंत्र असला तरीही एक बौद्धीक पांगळेपण समाजात जाणवतं. अशावेळी सावरकरांची ही वृषोक्ती नक्कीच परिणामकारक आहे..
२६फेब्रुवारी हा सावरकर यांचा स्मृतीदिन!! त्या निमीत्ताने त्यांच्या कवितेतलं हे विचार मंथन…
स्थूलमानाने, कवितेचे २ महत्वाचे पैलु म्हणजे आशय आणि अभिव्यक्ती. सोप्या भाषेत—
“काय सांगितले?” आणि “कसे सांगितले?”
कोणतीही कविता वाचतांना हे दोन्ही पैलु डोळसपणे ,वेगवेगळ्या अंगाने पारखणे ,आणि त्याच कसोटीवर कवितेचा जनमानसावर होणाऱ्या परिणामांचा विचार करणे म्हणजे रसग्रहण.त्यामुळे कवितेचा आस्वादही मनापासुन घेता येतो. दुःख, आनंद,आश्चर्य, भिती, प्रेम, वात्सल्य राग, चीड ,संताप अशा कोणत्या ना कोणत्यातरी भावना मनात निर्माण होतात.कविता मनाची पकड घेते. कविता भावते.
अशीच एक भावलेली कविता.,ज्यावर आज मी माझे विचार मांडणार आहे.
ही कविता आहे शुभदा कुलकर्णी ,पुणे यांच्या भावफुले या काव्यसंग्रहातील. डॉ अमृता ह. मराठे यांनी अभ्यासपूर्ण,सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. अमृताताईंनी म्हटल्याप्रमाणे वैयक्तिक, कौटुंबिक,सामाजिक, वैचारिक, निसर्गविषयक, सणांसंबंधी अशा विविध विषयांवरील कवितांनी समृध्द असा हा काव्यसंग्रह आहे.सर्वच कविता मनाला भिडणाऱ्या आहेत.
पण मी ही कविता निवडली कारण ती वाचतांना मला वाटले की मी जणु माझेच प्रतिबिंब आरशात पहात आहे.
विषय तसा साधाच, — सामान्य संसारी स्त्रीचा. ती स्वीकारत असलेल्या वेगवेगळ्या भुमिका,.
त्या वठवतांना ,कालानुरूप बदलतांना,मनाला जाणवणारी थोडीफार खंत उदास करते.
खरंच ,हे कारण असेल का?
हा संभ्रमही मनात निर्माण होतो. शुभदाताईंनीकवितेला दिलेले नावही साधे पण सार्थ आहे.
खरंच कां?
कवितेच्या आधी व्यक्त केलेल्या मनोगतात त्या म्हणतात, “वय उतारा लागलं ,cहे स्विकारलं की ,सगळं सोपं होत.—थोडा मनःस्ताप—पण आनंदाचे नविन मार्ग शोधावे—“
पहिल्या ४ कडव्यात नेहमीच्या चाकोरीबद्ध पध्दतीने स्वीकारलेल्या भुमिका,अन् त्यामुळे येणारा काहीसा खेदजनक अनुभव मांडला आहे.
स्त्री –घराचा केंद्रबिंदू –सर्वेसर्वा-.-गृहस्वामिनी,–ही तिला आवडणारी भुमिका .पण कळतनकळत ती या भूमिकेतून बाहेर पडते .अन् तिला काय वाटते ते शुभदाताईंनी १ ल्या कडव्यात सांगितले आहे.
“बघता बघता हे काय झालं?
गृहसम्राज्ञीच पद माझ्या हातुन गेलं– कळलं नाही माझं मला,असं कसं झालं?
खरंच का माझं वय उताराला लागलं?””
पुर्ण घराची राणी राहिली नाही तरी ,स्वयंपाक —तिचा हुकमाचा एक्का तरी हातात आहे असे वाटते. त्याच्या वापर करुन खेळात बाजी मारता येईल असे तिला वाटते.. पण तिथला अनुभव–? छान शब्दांत मांडला आहे या दुसऱ्या कडव्यात–
“”आपणही काही चवीढवीचं,
करावंसं वाटलं,
कसं कोण जाणे ,भांडं हातातुन निसटलं,
आवाज कानी आदळला—
कोण आत कडमडलं?
तेल तर सांडलच–अन्
पाठी धुपाटणं आलं–
खरंच का वय माझं उताराला लागलं?”
ठीक आहे.,काम होत नसेल आता.शरीर,भले थकले तरी मन जवानीत रमु पहाते. . आयुष्यभराचा जोडीदार तरी आपल्या भावना समजुन घेणार ही अपेक्षा असते.आणि तेही रास्तच आहे. पण?
त्याबाबत काय होते ते सांगणारे पुढचे कडवे —
“”फुलांच्या ठेल्याजवळ घुटमळले
मी जरा,
हळुच स्वारींना म्हटलं–‘घ्या ना गडे गजरा’
डोळे मोठे करीतच हे वदले,’जरा वयाचा विचार करा’
माझी मीच गोरीमोरी,भोवताली पाहिलं—
खरंच का वय माझं उताराला लागलं?”
नातवंडे —- दुधावरची साय.अन् आजी म्हणुन मनात मायाममतेचा पुर भरुन येतो.त्याची ऊधळण नातवंडावर करावी असे वाटणे स्वाभाविक आहे.पण त्याही बाबतीत
काय होऊ शकते हे ४ थ्या कडव्यात सांगितले आहे.
“”हौसेनं नातवंडांचं करायला गेले ,
तर सुनबाईंनं मान हलवत नाक की
हो मुरडलं—
नात म्हणाली, ‘आजी नको मधे मधे येऊ,
तुझं तु बघ आपलं-‘-
तुम्हीच सांगा आता,माझं काय चुकलं?
खरंच का वय माझं उताराला लागलं?”
कोणीही समजुन घेत नाहीत ,मनासारखे होतच नाही मग निराशा येणारच. पण,शुभदाताईंनी शेवटच्या ५ व्या कडव्यात एकदम यु टर्न घेतला.
“”हसतच हे म्हणाले,
‘बाईसाहेब, संपली तुमची सद्दी,
स्वखुषीने सोडलीत ना,
तुम्ही तुमची गादी?
बाहेर पडा यातुन जरा,पुसा डोळे,
चेहरा करा हसरा,
साहित्य-साधनेसारखा मित्र नसे दुसरा
मलाही सारं पटलं–
प्रसन्नपणे हसतच,कुठे कसं विसावायचं
माझं मी ठरवलं, —माझं मी ठरवलं
बदलत्या काळाप्रमाणे, वाढत्या वयामुळे जुन्या मार्गावरून चालणे शक्य होणार नाही. तिथे नाकारले गेलो तरी त्याची खंत न करता, नविन मार्गावरून नेणारा कोणीतरी जोडीदार भेटतो. आणि वाढत्या वयातही नव्या मार्गक्रमणाचा आनंद मिळवता येतो.
खरंच, किती सकारात्मक विचार शुभदाताईंनी आपल्या कवितेतुन मांडला आहे.
मला वाटते,काही तरुण मैत्रिणी अपवाद आहेत.पण बर्याच ज्येष्ठ मैत्रिणींच्या दृष्टीने आपला साहित्यसमुह म्हणजे असाच भेटलेला जोडीदार .आणि आपणही त्याच्या हातात हात घालुन साहित्यसेवेच्या या मार्गावरून आनंदाने विहार करीत आहोत,.
कारण आपले ब्रीदवाक्य
” लिहा आणि लिहित्या व्हा”
हेच आहे.
माझ्या एका मैत्रिणीनेच लिहीलेली ही कविता मला आवडली, म्हणुनच तुमच्यासाठी निवडली.
☆ कुंपण…. कवी कै. वसंत बापट ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक ☆
कवी कै. वसंत बापट
जन्म – 25 जुलाई 1922
मृत्यु – 17 सितम्बर 2002
कुंपण
आई आपल्या घराला
किती मोठं कुंपण
तारामागे काटेरी
कां ग रहातो आपण?
पलिकडे कालव्याजवळ
मोडक्या तुटक्या झोपड्या
मुलं किती हाडकुळी
कळकट बायाबापड्या
लोक अगदी घाणेरडे
चिवडतात घाण
पत्रावळीतले उष्टे म्हणजे
त्यांचे जेवणखाण !
काळा काळा मुलगा एक
त्याची अगदी कमाल
हातानेच नाक पुसतो
खिशात नाही रुमाल
आंबा खाऊन फेकली
मी कुंपणाबाहेर कोय
त्यानं म्हटलं घेऊ कां?
मी म्हटलं होय
तेव्हापासून पोटात माझ्या
कुठतरी टोचतयं गं
झोपतानाही गादीमध्ये
कुंपण मला बोचतयं गं !
कवी कै. वसंत बापट
आपल्या घरापेक्षा वेगळे वातावरण बघणाऱ्या बालमनाला पडलेले प्रश्न आदरणीय कवी वसंत बापट यांनी मुलाच्याच शब्दातून या कवितेत मांडले आहेत
सुस्थितीतील एका कुटुंब
झोपडपट्टी जवळच्या सर्व सोयीनी युक्त एका शानदार
घरात रहायला आल्यावर त्या घरातल्या बाल्यावस्थेतील एका मुलाचे घराभोवती फिरणे,
निरीक्षण करणे सुरु झाले तेव्हा
‘आपल्या घराभोवती एक काटेरी कुंपण असून त्याच्या जवळ असलेल्या मोडक्या तोडक्या झोपड्या त्याला दिसल्या.अशा झोपड्या कधीच न पाहिलेल्या त्याची झोपड्या व त्यात रहाणाऱ्या माणसांबद्दलची उत्सुकता वाढली.कुंपणाजवळ उभा राहून तो निरीक्षण करू लागला. ते पहात असताना त्याच्या मनात जे बालसुलभ प्रश्न निर्माण झाले ते तो आईला विचारू लागला.
‘आई, आपण रहातो त्या घराभोवती मोठे काटेरी कुंपण कां आहे? आपल्या समोरच्या त्या मोडक्या तोडक्या झोपडपट्ट्या आहेत तेथे कितीतरी मुलं असून ती हाडकुळी असून तिथल्या बायाबापड्या कळकट असतात. ही घाणेरडी माणसे आपण टाकलेल्या पत्रावळीतले अन्न चिवडतात, जेवण म्हणून खातात. त्यातला एक काळा मुलगा खिशात रुमाल नसल्याने हातानेच नाक पुसतो. आंबा खाऊन मी कोय फेकली ती त्याने मला विचारून घेतली.
तेव्हापासून आई मला काहीतरी वाटते,
झोपलेल्या मऊ गादीवर मला कुंपण बोचतेयं ‘
कविवर्य वसंत बापट यांनी मुलाच्या मनातील प्रश्नातून समाजाचे विदारक चित्र आपल्यासमोर उभे केले आहे कुंपण हे गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये असलेल्या दरीचे प्रतिक असून ते साधेसुधे नाही तर काटेरी आहे गरीब हे शेवटपर्यंत गरीबच रहाणार आणि श्रीमंत आपल्याजवळ कोणी येऊ नये स्वतःभोवती कुंपण घालणार. श्रीमंत, गरिबांचे खाणे,रहाणीमान यातील तफावत बालवृत्तीला न समजल्याने त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले .मऊ गादीवर त्याला झोप येत नाही. तर घराभोवतीच्या कुपणाचे काटे त्याला टोचतात म्हणजे असे कां? आपण आंबा खायचा आणि त्यांनी कोय कां? त्याना केव्हा आंबा मिळणार?आपल्या घराभोवतीचे काटेरी कुंपण निघाले तर….त्याना काहीतरी देता येईल. कधी निघणार हे कुंपण ही अस्वस्थता,’ मऊ गादीमध्ये कुंपण बोचते या ओळीतून जाणवते.
लहान मुलांना पडणारे प्रश्न मोठ्यांना पडले तरच समाजभान जागे होईल असाही या कविता लेखनाचा हेतू असावा.समाजदरी कमी करण्याचा एक प्रयत्न म्हणजे ही कविता असे वाटते.विचार प्रवृत्त करणारी ही कविता बरेच काही सांगून जाते.
☆ प्रिय विणकरा….शांताबाई शेळके ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक ☆
प्रिय विणकरा
मलाही तुझे कौशल्य शिकव
प्रिय विणकरा..
नेहमी तुला पाहिलं वस्त्र विणताना
जेव्हा एखादा धागा तुटतो किंवा संपतो तेव्हा
दुसरा त्यामध्ये गुंफून
तू पुढे विणू लागतोस
तुझ्या या वस्त्रात पण
एकही गाठ
कुणाला दिसत नाही
मी तर फक्त एकदाच
विणून पाहिलं होतं
एका नात्याचं वस्त्र
पण त्याच्या साऱ्या गाठी
स्पष्ट दिसताहेत
प्रिय विणकरा
– शांता शेळके
कवी गुलजार यांच्या,’ यार जुलाहे ‘ या हिंदी कवितेचा अनुवाद !
एखाद्या विणकराच्या घराशेजारी कवीचे वास्तव्य असावे.तो रोज विणकराचे विणकाम बघत असावा. हळूहळू कविच्या मनात विणकराच्या कामाबद्दल इतका आदर निर्माण झाला असावा की त्याचे कौतुक वाटता वाटता तो कवीचा प्रिय मित्र बनला असावा.एक दिवस तो विणकराला म्हणला असणार,
‘ हे प्रिय विणकरा मी तुला नेहमी वस्त्र विणताना बघतो.किती सुंदर वस्त्र विणतोस..वस्त्र विणताना एखादा धागा जर तुटला किंवा संपला तर त्यात तू दुसरा धागा इतका सहजपणे गुंफतोस की असा जोडलेला धागा न ओळखण्याइतका सफाईदार असतो की धागा जोडलेल्या ठिकाणी बारीकशी ही गाठ दिसत नाही इतके दोन्ही जोड एकरूप झालेले असतात.
माणसाच्या नात्याचेही असेच आहे.दोन नाती अशी जोडली गेली पाहिजेत की दोन्ही एकच,एकरुप झाली पाहिजेत तरच आयुष्याचे तलम वस्त्र तयार होईल.’
प्रिय विणकरा असा विचार करून मी एकदाच एक नात्यांचे वस्त्र विणायला घेतले नाती जोडायला गेलो पण विचार एकरूप न झाल्याने त्या वस्त्रावर अविचार, गैरसमज, मतभेदांच्या गाठी दिसू लागल्या.प्रिय विणकरा त्यामुळे दुसरे वस्त्र विणावेसे वाटलेच नाही.
या कवितेत कविला अभिप्रेत असलेला विणकर म्हणजे सुविचारी,एकमेकांच्या विचारांचा सांधा जो आपल्या कौशल्याने दुसऱ्याचे दोष सुविचारात परिवर्तित करतो.आयुष्याचे तलम वस्त्र विणण्यात यशस्वी होतो.आणि कवी हा त्यातला दुसरा घटक ज्याला हे कौशल्य प्राप्त करता आले नाही त्यामुळे तो नाती जोडू शकला नाही, टिकवू न शकणारा असा अप्रिय विणकर ठरला.
कवी गुलजार यानी अगदी सहजपणे नात्यांची जोडणी कशी होते,तोडणी कां होते हे मार्मिकपणे सांगितले असून आदरणीय कवियत्री शांता शेळके यानी अतिशय सुंदर असा अनुवाद केला आहे
तेव्हा आपण नात्याची तोडणी न करता जोडणी करू या .आताच्या विस्कळीत समाजमनाला त्याची नितांत गरज आहे.
☆ अजून त्या झुडुपांच्या मागे……कवी वसंत बापट ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆
वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमीत्त…
वसंत बापट यांचे खरे नाव विश्वनाथ वामन बापट. पण त्यांचे साहित्यविश्वातले प्रसिद्ध नाव मात्र वसंत बापट कवी, ललीत गद्यलेखक. प्रवासवर्णनकार, स्वातंत्र्यशाहीर, वक्ता, प्राध्यापक म्हणून जनमनात त्यांची प्रतिमा आहे..
वसंत बापटांच्या आयुष्याची घडण आणि त्यांची कविता यांच्यात निकटचे नाते आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय अंदोलनाच्या काळात, समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी काव्य लेखन केले. जनजागरण हे त्यांच्या प्रारंभीच्या कवितेचे प्रयोजन होते. राष्ट्रीय गीते, स्फूर्तीगीते, पोवाडे, वगनाट्ये, लिहीली. त्यामुळे त्यांच्या कवितेचे रुप प्रचारात्मक होते.
पण तरीही बापट मूलत: प्रेमकवीच आहेत.
कवी स्व वसंत बापट
प्रेमभावनाआणि निसर्ग चित्रण यांचे सहचर्य बापटांच्या कवितेत दिसून येते.प्रेमभावनेच्या अविष्कारासाठी पार्श्वभूमी म्हणून बापटांनी निसर्ग जवळ केला आहे…
अशीच एक मनातली कविता अथवा ओठावरचं गाणं,अगदी ह्रदयात वसलेलं म्हणजे…
अजुन त्या झुडपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते
,अजुनी आपुल्या आठवणींनी
शेवंती लजवंती होते..
तसे पहाया तुला मला ग
अजुन दवबिंदु थरथरतो
अर्ध्यामुर्ध्या कानगुजास्तव
अजुन ताठर चंपक झुरतो..
अजुन गुंगीमधे मोगरा
त्या तसल्या केसांच्या वासे
अजुन त्या पात्यात लव्हाळी
होतच असते अपुले हासे
अजुन फिक्कट चंद्राखाली
माझी आशा तरळत आहे
गीतांमधले गरळ झोकूनी
अजुन वारा बरळत आहे…
हे गाणं आठवणीतलं.वारंवार ऐकावं असं..
अतंत्य हळुवार आणि भावपूर्ण काव्य!
या काव्यात गतायुष्यातल्या प्रेमाच्या मधुर सुखद आठवणी आहेत.त्या आठवताना कवीचं मन अत्यंत कोमल झालेलं आहे.अगदी फुलासारखं नाजुक नितळ सुगंधी..
अजुन त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते..
इथे झुडुप याचा अर्थ चाकोरीत गुंतलेलं जीवन.
आणि त्या झुडपाच्या मागे प्रीतीच्या आठवणी दडल्यात .आणि त्याकडे पाहून मनातली सदाफुलीही अशीच हळुच हसते…
या संपूर्ण कवितेत प्रीतीविषयक भावनांना सदाफुली, शेवंती दवबिंदु ,चंपक मोगरा लव्हाळी यांचं रुप दिलं आहे…
तसे पहाया तुला मला ग अजुन दवबिंदु थरथरतो…
ताठर चंपक झुरतो..
विसरायचंच असा निर्धार केलेल्या मनाला ताठर चंपकाची उपमा दिली आहे…पण उत्कट भावनांमुळे त्याचा ताठरपणा लवचिक होतो आणि अंतस्थ तो झुरत आहे..
प्रेमकाव्य उलगडतांना, या निसर्गातल्या कोमलतेचा त्यांनी रुपकात्मक आधार घेतला आहे… दवबिंदुंचं थरथरणं, झुरणारा चंपक या कवीच्या अस्तित्वाचाच भाग आहेत. भावनांना यांत सहज गुंतवले आहे… एकेकाळचे त्यांच्या प्रीतीचेही ते साक्षीदार अजुनही मनांत दडलेले आहेत… पुन्हा एकदा मीलनाची ओढ असणार्या कवीमनाला हे कुठेतरी आतून जाणवत आहे..
प्रेयसीच्या आठवणींनी थरथरणं, झुरणं हे व्यक्त करताना त्यांनी किती सुंदर निसर्ग चित्रच मनासमोर साकारलं आहे.
कवीने प्रांजळपणे सांगितलं आहे की पात्यांमधल्या लव्हाळ्याचं हंसणं,तिच्या केसात माळलेल्या मोगर्याचा सुगंध अजुनही मनात तसाच दरवळत आहे.
शेवटच्या कडव्यात कवी अधिक भावुकआणि आशावादी आहे.
अजुन फिकट चंद्राखाली
माझी आशा तरळत आहे
गीतामधले गरळ झोकूनी
अजुन वारा बरळत आहे..
फिकट चंद्राखाली हे शब्द प्रीतीच्या अंधुक धूसर
पूर्णत्वासाठी आहे..अंत:र्मनात एक कोंडलेला वारा अजुनही आहे आणि तोच मनातलं हे मीलनाच्या आशेचं गरळ या माझ्या गीतांतून बरळत आहे…
यात गरळ, बरळत आहे हे कठोर शब्द संस्कारक्षम मनावर चढवलेल्या मुखवट्यांना प्रवाहाविरुद्ध जाऊन फोडणार्या मानसिकतेसाठी वापरले आहेत.
बाकी शब्दांची कोमलता,आणि भावनांचा झुळझुळता काव्यरुपी झरा अत्यंत नादमयआणि लयबद्ध आहे..खरोखरच ,मनावर हळुहळु पांघरत जाणारी ,धुंद करणारी ही प्रेमाची काव्यरचना आहे..
☆ जिना…कवी वसंत बापट ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक ☆
जिना
कळले आता घराघरातून
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेवुनी
हळूच जवळी ओढायला
जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडधड
मूक असाव्या सर्व पायऱ्या
कठडाही सोशिक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा
वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहुनी
चुकचुकणारी पाल असावी
जिना असावा असाच अंधा
कधी न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधी न करावी चहाडखोरी
मी तर म्हणतो-स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पृथ्वीवरल्या आठवणीनी
वळणावळणावरी हसावे
– वसंत बापट
‘जिना’ या एका साध्या शब्दावरचे कवी वसंत बापट यांचे काव्य वाचताना कवी केशवसुत यांच्या,’ साध्याही विषयात आशय मोठा किती आढळे ‘ या ओळींची आठवण होते.एक मजल्यापेक्षा अधिक मजल्यांच्या घराने जिना निर्माण केला आणि तो कवितेचा विषय बनला.
ही कविता लिहिताना पहिल्याच कडव्यात कविने जिनाच्या बारशाची तयारी दाखवली आहे.आपल्या घरातल्या जिन्याला आपण आपलं आवडत नाव ठेवावं .त्या नावाचे स्मरण होताच जिन्यात जाऊन बसावयासाठीच त्या नावाची गरज !प्रत्येक घराला जिना असावा असे कवीला वाटते. हा जिना नागमोडी वळणाचा असावा कारण असे वळण घेताना लहानपणापासून सर्वांना वेगळे वाटते. वळणातला वेगळेपणा वर्णन न करता येण्यासारखा असतो. जिना सावकाशपणे चढता यावा,जातायेता कुणीतरी धक्का द्यावा अशी ही कल्पना, जिना अरुंद असावा असा विचार करणाऱ्या कविच्या मनात असावी. तो थोडा अवघड असावा म्हणजे जिना चढताना बसता येते,जिन्याशी बोलता येते. जिन्यातला अंधारही कविला हवासा वाटतो.अंधारात धडपडत चालणे हे सर्व कविच्या मनाला गुदगुल्या, करणाऱ्या गोष्टी वाटतात.
कधी कधी कविता पायरीवर एकांतात बसून हितगुज करावेसे वाटणे कवीच्या,’ मुक्या पायऱ्या’ या शब्दातून व्यक्त होते.जिना चढताना पडणे,खरचटणे आपल्याला सहन करावे लागते पण लोकांचे हे वागणे सोशिक जिना सहन करतो अशी कवी कल्पना आहे.जिन्याच्या वळणावळणाच्या जिन्यावर चालणारी गुप्त चर्चा, देवाण घेवाण, लाडिक बळजोरी बरोबर नाही असे वाटून जिन्यावरच्या छतावर आडोशाला बसलेली पाल चुकचुकत असावी,तिचे ते चुकचुकणेही गरजेची मानणारा कवि वळणाला महत्त्व देतो. जिन्याला आंधळा म्हणतो.
जिना प्रकारात कविला ‘ स्वर्ग सोपान’ अधिक आवडतो कारण स्वर्गात पटकन जाता येत नाही.कवितेच्या या विचारात कुंतीच्या गजगौरी व्रत उद्यापनासाठी स्वर्गातला हत्ती आणण्याकरिता अर्जुनाने तयार केलेल्या बाणांच्या जिन्याची आठवण होते
वसंत बापटांची अतिशय सुंदर अशी ही कविता आयुष्यातील चढ उतारांचे रूपक ठरावी अशी आहे.जिन्याचे वर्णन करताना कविनी वापरलेले शब्द आयुष्यात येणाऱ्या प्रसंगाशी तंतोतंत जुळणारे वाटतात.
आजच्या फ्लॅटसिस्टिमच्या जमान्यात लिफ्टचा वापर करणारे या कवितेतील शब्दानंदाना नक्कीच मुकतील.
आयुष्याचे चढउतार समजण्यासाठी जिना हवा आणि तोही कवि श्री. वसंत बापट यानी आपल्या कवितेत रंगविल्याप्रमाणेच असावा.एक अप्रतिम कविता असे या कवितेचे वर्णन करता येईल.
☆ रिकामे मधुघट… भा. रा. तांबे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
भास्कर रामचंद्र तांबे
काव्यानंद. : रिकामे मधुघट अर्थात मधु मागसी माझ्या…
काही कवींच्या रचना या इतक्या अर्थपूर्ण असतात की स्वर आणि संगीताच्या दुनियेत रमणा-या कलावंतालाही त्या आकृष्ट करून घेतात.शब्दांना स्वर आणि संगीताचा साज चढला की त्या काव्याचे एका सुमधूर भावगीतात रूपांतर होते आणि मग ते काव्य रसिकांच्या ओठावर विराजमान होते. अशा कवींपैकी एक कवी म्हणजे राजकवी भा. रा. तांबे. तांबे यांच्या रचनांना शंभर वर्षे होऊन गेली पण त्या काव्याचे गीत कधी झाले समजलेही नाही. सुस्वर आणि संगीत लाभूनही गीतातील मूळ शब्द कुठेही हरवलेले नाहीत. हेच कवीच्या शब्दांच सामर्थ्य आहे! कवीवर्य भा.रा.तांबे यांच्या अनेक कविता भावगीते बनून आपल्या समोर आल्या आहेत. त्यातील एक कविता म्हणजे ‘मधुमागशी माझ्या सख्या परी …’
कोण हा सखा? त्याला कोण म्हणत आहे हे? कवीच्या अखेरच्या काळात लिहीली गेलेली ही रचना आहे. एखादी सुंदर कविता कवीकडून व्हावी आणि ती आपल्याला वाचायला मिळावी अशी रसिकाची अपेक्षा आहे. त्यावेळेस कवी त्याला आपल्या शब्दात उत्तर देत आहे .
हा सखा म्हणजे रसिक वाचक. आपल्या प्रिय कविच्या एकाहून एक मधुर रचना वाचून त्याची सवय झालेला हा रसिक वाचक. त्याला काव्याच्या घटातील मधुर रस हवाहवासा वाटतो आहे आणि तो कविला मागतोही आहे. पण कवी मात्र आता त्या मनस्थितीत नाहीय. कमळांच्या द्रोणातून मध पाजावा त्याप्रमाणे कविने आजपर्यंत अनेक उत्तमोत्तम रचना रसिकांच्या सेवेला सादर केल्या. पण आता नाही.कारण आता पैलतीर दिसू लागला आहे. आयुष्याची संध्याकाळ दिसू लागली आहे. बघता बघता संध्या छाया गडद होऊन जातील आणि दिवस ….आयुष्याचा दिवस…. केव्हा संपला समजणारही नाही. आता तू मागावस आणि मी द्याव इतकी ताकद माझ्यात उरली नाही. बागेतील टपोरी, सुगंधी फुलं संपावीत आणि काटेरी कोरांटीच तेवढी उरावी अशी माझी अवस्था झाली आहे. संसाराच मर्म सांगणारी, यौवनाने रसरसलेली, निसर्ग संगीताने नटलेली अशी कविता तुला हवी आहे. पण आता ते शक्य नाही. मनात तशा उर्मी नाहीत आणि हातात तितकी ताकद नाही. तेव्हा आतापर्यंत केलेली काव्यसेवा आठव आणि माझा काव्यमधुघट रिकामा पडला आहे हे समजून घे.
एकिकडे रसिकांची अपेक्षा तर दुसरीकडे कवी ची असमर्थता. पण ती असमर्थता व्यक्त करतानाही कविने किती सुंदर शब्दांची योजना केली आहे हे पाहण्याजोगे आहे.नकार देताना त्रागा नाहीच, उलट रसिकालाच रागावू नको, रोष करू नको अशी विनंती कवी करत आहे. कारण आपली प्रत्येक रचना ही रसिकासाठीच आहे याची जाणीव कवीला आहे. म्हणून तो एकीकडे बळ न करि अशी विनवणी करतो आहे तर दुसरीकडे करि बळ नाही हे मान्यही करतो आहे. एकाच शब्दपंक्तितून दोन अर्थ व्यक्त करण्याची ताकद त्याच्या लेखणीत अजूनही आहे. पण तो मात्र होणा-या अस्ताच्या चाहुलीने मनातून भयभीत झाला आहे.
भा.रा.तांबे यांच्या एकाहून एक सुंदर अशा कवितांपैकी ही एक कविता. काव्यरसाच्या घटातून त्यांनी एक एक काव्याचा पेला रसिकांना अर्पण केला. पण शेवटी शेवटी मात्र त्यांच्या मनात असाहयतेची भावना जागृत झालेली दिसते. पण खरे पाहता ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांचा मधुघट रिकामा झाला आहे असे वाटत नाही. कारण या काव्याची रचनाही इतकी सुंदर, अर्थपूर्ण, गेय आहे की त्यांच्या इतर कवितांप्रमाणेच त्याचे गीत झाले आणि रसिकांना एक वेगळा आनंद उपभोगता आला. कारण हा काव्यभास्करच आहे. मराठी काव्यक्षितिजावरून तो कसा मावळेल? खरे ना ?