सौ. उज्ज्वला केळकर
📚 क्षण सृजनाचा 📚
☆ कथा : पांघरूण … ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
मी डी. एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा अशा अनेक संस्था असत.
एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. क्रेश म्हणजे संगोपन गृह. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले. क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आस-पासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्यांची मुले येत. सकाळी ८ वाजता मुले येत. तिथे त्यांना दूध, नाश्ता दिला जाई. शिक्षण, दुपारचे जेवण, पुन्हा शिक्षण, खेळ, गाणी, चित्रे काढणे, सगळं तिथे करायला मिळे. दुपारी बिस्किटे, फळे वगैरे दिली जात. संध्याकाळी ६ वाजता मुले आपआपल्या घरी जात.
तिथल्या मदतनीस क्रेशबद्दलची माहिती सांगत होत्या. ‘ इथल्या मुलांना जर्मनीतील काही लोकांनी दत्तक घेतले आहे. त्यांचा खर्च ते करतात. तिथल्या मुलांना खेळणी पाठवतात. चित्रे पाठवतात. ग्रीटिंग्ज पाठवतात. आम्ही ते सगळं मुलांना देतो.. पण इथे खेळायला. बघायला. त्यांना खेळणी वगैरे घरी नेऊ देत नाही. आपल्या घराचे फोटोही मुलांचे दत्तक पालक पाठवतात. पत्रे पाठवतात. आम्ही या मुलांच्या आयांना नेहमी
सांगतो, ‘तुम्ही पण त्यांना पत्र लिहा. काय लिहायचे, ते सांगा. आम्ही इंग्रजीत लिहून त्यांना पाठवू. ’ पण आम्हाला फारसा प्रतिसाद मिळत नाही. ’
त्यांनी मग आम्हाला अशी काही पत्रे, खेळणी, ग्रीटिंग्ज दाखवली. कुठली कोण माहीत नसलेली मुले.. पण चर्चच्या सांगण्यावरून ते परदेशी, या मुलांचा खर्च करत होते. सामाजिक बांधिलकीचा केवढा व्यापक विचार. चर्चचा आदेश म्हणजे त्यांच्यासाठी जणू प्रभू येशूचा आदेश होता.
त्या दिवशी त्या क्रेशमध्ये आणखी एक कार्यक्रम होता. थंडीचे दिवस होते. त्यामुळे तिथे मुलांसाठी त्या दिवशी चादरी वाटण्यात येणार होत्या. प्रमुख व्यवस्थापिका रेमंड मॅडमनी त्या दिवशी मुलांच्या आयांना बोलावून घेतले होते. हॉलमध्ये सगळे जमले. दोघे शिपाई सोलापुरी चादरींचे गठ्ठे घेऊन आले.
प्रार्थना, सर्व उपस्थितांचे स्वागत झाले. प्रभू येशूची शिकवण, तो सगळ्यांकडे कसा कनवाळू दृष्टीने बघतो, असं सगळं बोलून झालं. मुलांच्या परदेशातील पालकांनी चादरीचे पैसे दिल्याचे सांगितले गेले. ‘ त्यांचे आभार मानणारे पत्र आमच्याकडे लिहून द्या. आम्ही तिकडे ते पाठवू, ’ असंही तिथे सांगण्यात आलं.
तिथे चादरी वाटप सुरू झाले आणि माझ्या मनात एक कथा साकारू लागली. तिथल्याच शाळेतील एक मुलगा. — त्याचं नाव मी ठेवलं सर्जा आणि त्या क्रेशचं बारसं केलं ‘करूणानिकेतन क्रेश. ’
हिंडेनबुर्गमधील एका मोठ्या नामांकित चर्चची इथल्या चर्चला आणि क्रेशला मदत होती, ही तिथे मिळालेली माहिती. त्या चर्चने त्यांच्या देशातील सुखवस्तू सज्जनांना, इथल्या एकेका मुलाला दत्तक घ्यायला सांगितले होते. क्रेशमध्ये सध्या अशी ५० मुले होती. त्यांचे ५० दत्तक पालक, त्यांचा रोजचा खर्च करणारे. क्रेशच्या माध्यमातून त्यांना ती मिळत होती. हे अर्थातच तिथे कळलेले वास्तव.
कथेतल्या सर्जालाही तिथल्या एका कुटुंबाने दत्तक घेतलय. ते कुटुंब मात्र माझ्या कल्पनेतलं.
ज्यो पप्पा, मेरी मम्मी, अग्नेस, मार्था, डेव्हीड हे त्याचं दत्तक कुटुंब. त्यापैकी डेव्हीड त्याच्या साधारण बरोबरीचा. पप्पांचं, डेव्हीडचं त्याला पत्र येत असे. पण त्याला ते वाचता येत नसे. मॅडम पत्र वाचून दाखवत. मराठी भाषांतर करून सांगत. पत्र वाचता आलं नाही, तरी सर्जा किती तरी वेळ त्या गुळगुळीत कागदावरून हात फिरवत राही. पत्र नाकाजवळ नेऊन त्याचा सुगंध घेत राही. अशा अनेक कल्पित
प्रसंगांची मालिका मी कथेत गुंफली आहे. त्यातून सर्जाचं साधं, भोळं, निरागस व्यक्तिमत्व आणि त्याच्या बालमनातले विचार, भावना कल्पना प्रगट करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
डेव्हीड एकदा सर्जाला पत्र पाठवतो. त्याबरोबरच तो आपल्या लाडक्या कुत्र्याचा- जिमीचा फोटो पाठवतो. पत्रात तो लिहितो, ‘तुझा म्हणून मी रोज जिमीचा स्वतंत्र कीस घेतो. ’ मग सर्जा फोटोतल्या जिमीच्या अंगावरून हात फरवतो आणि फोटोतल्या जिमीची पप्पी घेतो.
डेव्हीड सर्जाला, ’ तू तुझ्या घराचे फोटो पाठव, ’ असं पत्रातून लिहीत असे. सर्जाला वाटे, कसलं आपलं घर… घाणेरडं, कळकट. आपली भावंडे, शेंबडी, केस पिंजारलेली. फाटक्या लुगड्यातली आई, खोकून खोकून बेजार झालेली आजी… यांचे कसले फोटो काढून पाठवायचे आणि काढणार तरी कोण? सर्जाच्या मनात तुलना सुरू व्हायची. — फोटोत बघितलेलं ज्यो बाबांचं घर कसं – मॅडम गोष्टी सांगत, त्यातल्या राजाच्या
महालासारखं. घरातली सगळी माणसं कशी छान दिसणारी. झकपक कपड्यातली. आणि सर्जाचं घर–
सर्जाचं घर, मी, तळागाळातलं कुठलंही प्रातिनिधिक घर असेल, तसं रंगवलं. त्याची आई विड्या वळून संसार चालवणारी. म्हातारी, दमेकरी सासू, दोन भावंड–दिवसभर उनाडणारी, बाप रिक्षा चालवायचा पण सगळा पैसा बाई-बाटलीत उडवायचा. मनात येईल, तेव्हा बायकोच्या तोंडावर काही नोटा फेकायचा. तेवढंच त्याचं आपल्या संसाराबाबतचे कर्तव्य. ‘साल्या, भडव्या, रांडेचा ’ शिवाय बोलणं नाही. आई देखील सदा कारवादलेली.
सर्जावर झालेले स्वछतेचे संस्कार तो आपल्या भावंडांवर करू शकत नाही, याचे त्याला दु:ख आहे. नुकताच तो शाळेत येऊ लागला होता, त्यावेळचा प्रसंग… एकदा त्याने नाश्त्याच्या वेळी प्लेटमधले पोहे आपल्या भावंडांना देण्यासाठी शर्टाच्या खिशात भरले. खिशाला तेलकट, पिवळट डाग पडले. मॅडमनी चोरी पकडली. सर्जाला वाटले, आता आपल्याला मार बसणार. मॅडमनी त्याला मारलं नाही पण त्या रागावल्या. ‘चोरी करणं पाप आहे’ म्हणाल्या. त्यांनी त्याला येशूच्या फोटोपुढे गुडघे टेकून बसायला सांगितलं. प्रार्थना करायला सांगितली. क्षमा मागायला सांगितली. मग त्या म्हणाल्या, ‘लेकराच्या
हातून चूक झाली. तू त्याला माफ कर. तुझं अंत:करण विशाल आहे. तू आमचा वाटाड्या आहेस. आम्हाला क्षमा कर. ’
– – हा प्रसंग लिहिताना, म्हणजे मॅडमबद्दल लिहिताना, कुठे इकडे तिकडे काही पाहिलेलं, ऐकलेलं, मनात रुजून गेलेलं आठवलं. त्याचा उपयोग मी त्या प्रसंगात केला. त्यानंतर सर्जाने असं पाप पुन्हा केलं नाही. त्याच्या धाकट्या भावंडांना उचलेगिरीची सवय होती. सर्जा त्यांना म्हणे, ‘प्रभू येशू म्हणतो, असं करणं पाप आहे. ’ त्यावर आई म्हणे, ‘तुला रं मुडदया रोज चांगलं चुंगलं गिळाया मिळतय, तवा हे पाप हाय, सुचतं.
कधी भावा-बहिणीसाठी येवढं- तेवढं काय-बाय आणलंस का?’ आणावसं वाटे, पण तो आणू शकत नव्हता. त्याची तगमग होई.
त्याला या शाळेत त्याच्या मामानं आणलं होतं. त्याने ठरवलं होतं, खूप अभ्यास करायचा. खूप शिकायचं आणि नंतर पुढच्या शिक्षणासाठी जर्मनीला ज्यो पप्पांकडे जायचं. ज्यो पप्पा त्याला पत्रातून नेहमी असंच लिहीत.
त्या दिवशी क्रेशमध्ये चादरी वाटपांचा कार्यक्रम झाला. चादरी वाटायला व्यवस्थापिका रेमंड बाई स्वत: आल्या होत्या. चर्चचे प्रमुख फादर फिलीप यांच्या हस्ते चादरींचे वाटप होणार होते. सुरूवातीला डोळे मिटून प्रभू येशूची प्रार्थना झाली.
– – मी माझ्या कथेत प्रार्थना घेतली – –
‘ मेंढपाळ हा प्रभू कधी ने हिरव्या कुरणी मला
कधी मनोहर जलाशयावर घेऊनी मज चालला. ’
– – ही प्रार्थना, मी डी. एड. कॉलेजमध्ये लागल्यानंतर आमच्या विद्यार्थिनींनी म्हणताना
ऐकली होती. तिचा उपयोग या कथेसाठी मी केला.
त्यानंतर मॅडम रेमंडनी सर्वांचं स्वागत केलं. येशूच्या उपदेशाबद्दल सांगितलं आणि
चादरी वाटप सुरू झालं. माझ्या कल्पनेने मात्र त्या चादरींची ब्लॅंकेट्स् केली. निळ्या, हिरव्या, लाल,
गुलाबी, सोनेरी रंगांची ब्लॅंकेट्स् मोहक. आकर्षक डिझाईन असलेली ब्लॅंकेट्स्.
आपल्याला कोणतं ब्लॅंकेट मिळेल, याचा सर्जा विचार करतोय. कधी त्याला वाटतं आपल्याला निळं, निळं, आभाळासारखं ब्लॅंकेट मिळावं, कधी सोनेरी, कधी हिरवं. त्याला लाल ब्लॅंकेट मिळतं. मग त्याला आठवतं डेव्हीडच्या खोलीतल्या बेडवर याच रंगाचं ब्लॅंकेट आहे. ज्यो बाबांनी डेव्हीडसारखंच ब्लॅंकेट आपल्यालाही पाठवलं, म्हणून तो खूश होऊन जातो.
कार्यक्रम संपला. बायका आपआपल्या चादरी घेऊन आपआपल्या घरी निघाल्या. माझं मन कथेतल्या सर्जाच्या आई पाठोपाठ त्याच्या घरी निघालं. काय घडलं पुढे?
– – सर्जा भयंकर उत्तेजित झाला होता. त्याला आज जेवण-खाण काही सुचत नव्हतं. तो घरी आल्या आल्या आपल्या भावंडांना बोलावतो आणि सगळे ते ऊबदार ब्लॅंकेट पांघरून झोपून टाकतात.
सर्जाचा बाप दारू पिऊन घरी येतो आज त्याच्या खिशात दमड्या नसल्यामुळे त्याला बाईकडे जाता आलेलं नाहीये. तो अस्वस्थ आहे. घरी येताच त्याचा पाय त्या नव्या ब्लॅंकेटमध्ये अडकतो. तो खाली पडतो. उठता उठता त्याचे लक्ष एकदम त्या आकर्षक ब्लॅंकेटकडे जाते. त्याच्या डोक्यात वीज चमकते… ‘ हे ब्लॅंकेटच आज तिला द्यावं. ती एकदम खूश होऊन जाईल… अशी चिकटेल, लई मजा येईल. ’
तो सर्जाच्या अंगावरचे ब्लॅंकेट ओढू लागतो. ब्लॅंकेट दे म्हणतो. सर्जा म्हणतो, ‘ माझ्या जर्मनीतल्या
बापाने माझ्यासाठी पाठवले आहे. मी देणार नाही. ’
‘ तुझ्या जर्मनीतल्या बापाकडेच निघून जा, ‘ असं म्हणत सर्जाचा बाप ते ब्लॅंकेट हिसकावून निघून जातो. पाठीमागच्या सीटवर ब्लॅंकेट ठेवून तो रिक्षा सुरू करतो.
सर्जा रडत राहतो. त्याच्या अश्रूभरल्या डोळ्यासमोर येते, ते फोटोतल्या ज्यो बाबांचे उबदार घर. त्याला अधिकच उघड्यावर पडल्यासारखं वाटतं. रडत रडत तो आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवतो. आई आपल्या फाटक्या धडुत्याचा पदर त्याच्या अंगावर सरकवते.
‘पांघरूण’ या माझ्या कथेची ही जन्मकथा. साधारण १९८२- ८४ च्या दरम्यान ही कथा मी लिहीली. त्या काळात दर्जेदार समजल्या जाणार्या किर्लोस्करमध्ये ती प्रकाशित झाली. अनेक वाचकांची कथा आवडल्याची खुषीपत्रे मला आली. पुढे या कथेचा हिंदीमध्येही अनुवाद झाला. तो ‘प्राची’सारख्या प्रतिष्ठित मासिकात प्रकाशित झाला.
“ पांघरूण “ ही कथा वास्तवाच्या पायावर उभी राहिलेली आहे. कथेमधले अनेक तुकडेही वास्तव आहेत. त्याच्या विविध प्रसंगांच्या भिंती, त्याला मिळालेलं भाव-भावनांचं रंगकाम, पात्रांच्या मनातील विचारांचं नक्षीकाम आणि एकंदर घराच्या अंतर्भागातील सजावट कल्पनेने सजवली आहे.
– – मला नेहमीच वाटतं, त्या दिवशी त्या क्रेशला आम्ही भेट दिली नसती, वा त्याच दिवशी तिथे चादरी वाटपाचा कार्यक्रम झाला नसता, तर इतकी चांगली कथा मला सुचली नसती.
© सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈