☆ क्षण सृजनचा ☆ कविवर्य ग्रेस ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
जन्म नाव – स्व माणिक सीताराम गोडघाटे टोपणनाव – ग्रेस
(जन्म – १० मे, १९३७ नागपूर मृत्यु – २६ मार्च, २०१२ पुणे)
झाली म्हणजे किती पटकन प्रसन्न होते.नाहीतर एकदा का रूसली की रूसलीच. कवितेच हे असच आहे.
26 मार्च. म्हणजे कविवर्य ग्रेस यांचा स्मृतिदिन. त्यांच्यावर आलेले लेख,व्हिडिओ पाहणे चालू होते. काही नवीन माहितीही मिळाली त्यांच्याबद्दल. वाचणे चालू होतेच. पण त्यांच्या गूढगर्भात्मक कवितांच्या ओळी मनातून जात नव्हत्या. जे लेख वाचले त्यातही गूढता, दुःख यांचा उल्लेख होताच. आणि तरीही त्या कविता वाचू नयेत अस कोणालाच वाटत नव्हतं. अगम्यतेच आकर्षण. समजो न समजो, पुन्हा वाचाव्यात अशा कविता. नकळतपणे आपण गुंतत जातो त्यांच्यात. वाचलेल्या कविता, त्यांची झालेली गीते, सगळं कानाना ऐकू येऊ लागल आणि नकळतपणे मनात गुणगुणलो,
गूढ तुझ्या शब्दांची जादू
मनात माझ्या अशी उतरते…
आणि पुढचं कसं सुचत गेलं, मलाही ठाऊक नाही. ती ही कविता, तुम्हांसाठी सादर.
काही दिवसांपूर्वी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या व्हाट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ आला. तो पाहून त्यावर कोणाला काय सुचते ते कवितेच्या स्वरूपात लिहा,असा मेसेज दिला होता.
जवळपास ७५ वर्षानंतर भेटणाऱ्या दोन वृद्ध मैत्रिणी. त्यांचे वय असेल ८०-८५ च्या घरात. शाळेत बालपणी एकत्र खेळल्या, बागडलेल्या मैत्रिणी. इतक्या वर्षांनी भेटल्यावर ‘काय करू अन् काय नको ‘ असे त्यांना झालेले. पण पाठीची कमान झालेली, हातात काठी, तोंडाची बोळकी. उत्साहाने भरभरून आनंद व्यक्त करायला तेवढी शारीरिक क्षमता नाही. पण सतत तोंड भरून हसत हसत पुन्हा पुन्हा हातात हात धरणाऱ्या ‘त्या ‘ मैत्रिणीं ची सगळी देहबोली आनंदाने फुलूनआली होती.
हे चित्र पाहिल्यावर झटकन मन पन्नास-पंचावन्न वर्षे मागे गेले.आठवले ते शाळेतले सुंदर, फुलपाखरी दिवस. शाळेची ती छोटीशी टुमदार इमारत. तिच्या पुढे- मागे मोठी मैदाने. त्यावर खेळणाऱ्या, धावणाऱ्या, चिवचिवणाऱ्या अनेक मैत्रिणी. वेगवेगळे खेळ,वेडी गुपिते, रुसवेफुगवे, मनधरणी आठवून हसू आले.त्यावेळच्या सगळ्या गोड, रम्य आठवणींनी मनात फेर धरला आणि मनाच्या आतल्या खोल कप्प्यातून शब्दांची लड झरझर उलगडत गेली.व्हिडिओतल्या ‘ त्या ‘ दोन वृद्ध जीवांना जणू नवसंजीवनी मिळाली आणि ते पाहून त्या निष्पाप निरागस मैत्रीने शब्द रूप घेतले.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईत इमारतींच्या रिडेव्हलपमेंटची लाट आली आहे.
जुन्या इमारती बिल्डर ताब्यात घेतात. त्या पाडून त्याजागी उंच इमारती बांधतात. जुन्या रहिवाशांना पूर्वीपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा फ्लॅट दिला जातो. उरलेले फ्लॅट बाहेरच्या माणसांना विकतात.
इमारत तयार होईपर्यंत तीन-चार वर्षं तरी जातात. तेवढ्या अवधीतील तात्पुरत्या निवासासाठी, जुन्या रहिवाशांना भाड्याची रक्कम दिली जाते.
आमच्या जवळची एक इमारत रिडेव्हलपमेंटला गेली. जुने रहिवासी मिळाला तो फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहू लागले. नवीन इमारत तयार होण्याची वाट बघत.
इमारत पाडली. नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. आणि अचानक बांधकाम बंद पडलं. कोर्टकचेऱ्या, स्टे वगैरेंच्या भोवऱ्यात सापडून सगळं काही ठप्प झालं. हळूहळू बिल्डरकडून भाड्याचे चेक मिळणंही बंद झालं.
आठ-दहा वर्षं अशीच गेली. भाड्याच्या फ्लॅटचं नूतनीकरणही कठीण होऊ लागलं. एकाच फ्लॅटमध्ये दोन-तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहायला द्यायला फ्लॅटचे मालक का-कू करू लागले. मग पुन्हा नवीन फ्लॅट शोधणं, सामानाची हलवाहलव वगैरे व्याप.
या सर्व घडामोडींवरून मला ही गझल सुचली. एका स्ट्रक्चरल विषयावरील कविता स्ट्रक्चर्ड फॉर्म असलेल्या गझलमध्ये सुचावी, हा एक योगायोग.
सृजनाचा क्षण कधी कुठे उगवेल हे खरंच सांगता येणार नाही. दुसऱ्या दिवशी अँजीओप्लास्टी करायची ठरल्याने मी आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. स्पेशल रूम मिळाली नाही म्हणून मला जनरल वार्ड मध्ये दाखल केले गेले. गच्च भरलेला तो मोठा हॉल….. जवळ जवळ मांडलेले बेडस, पेशंटसोबत असणाऱ्याला बसायला एक स्टूल एवढीच सोय. इतक्या लोकांसाठी फक्त २-३ नर्सेस आणि २ वॉर्ड बॉय. साहजिकच नर्सेसची धावपळ आणि जोडीला चिडचिड .. वॉर्डबॉयचा हाकांकडे शक्यतो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न…. स्वतःला नेमकं काय झालंय आणि काय करणार आहेत हे न कळल्याने घाबरलेले पेशंट, आणि डॉक्टरांशी नेमकं काय बोलायचं हे कळत नसल्याने बावरलेले, उपचारांसाठी पैसे कसे कुठून उभे करायचे ही मोठीच चिंता चेहेऱ्यावर सतत बाळगणारे नातेवाईक… भीती, चिंता, हतबलता, नैराश्य अशा-सारख्या भावनांनी तिथलं सगळं वातावरण व्यापून टाकलं होतं…….. संध्याकाळी रूम मिळाल्याने मला तिथे शिफ्ट केलं आणि ते हॉस्पिटल म्हणजे फिरता रंगमंच आहे असं वाटलं …..७-८ खोल्यांसाठी ४-५ नर्सेस, ३ वॉर्डबॉय, वरचेवर खोलीची साफसफाई, परीट -घडीच्या चादरी, सोबत आलेल्याला वेगळा बेड …… लागूनच असलेल्या सुपर स्पेशल खोल्यांची ऐट तर आणखी कितीतरी जास्त …… परिस्थितीची ही दोन टोकं पहाताना मनात दाटलेली ही कविता……उठून बसायला परवानगी नसल्याने, गुडधा उभा करून, त्यावर कागद ठेवून अक्षरशः कशीतरी खरडलेली…
मी डी.एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा आशा अनेक संस्था असत. एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. क्रेश म्हणजे संगोपन गृह. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले.
क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आस-पासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्यांची मुले येत. सकाळी ८ वाजता मुले येत. तिथे त्यांना दूध, नाश्ता दिला जाई. शिक्षण, दुपारचे जेवण, पुन्हा शिक्षण, खेळ , गाणी, चित्रे काढणे, सगळं तिथे करायला मिळे. दुपारी बिस्किटे, फळे वगैरे दिली जात. संध्याकाळी ६ वाजता मुले आपआपल्या घरी जात.
तिथल्या मदतनीस क्रेशबद्दलची माहिती संगत होत्या. इतक्यात तिथे एक ८-९ महिन्याची एक मुलगी रंगत आली. माहिती सांगणार्या बाईंनी तिला प्रेमाने उचलून कडेवर घेतले आणि म्हणाल्या, ‘ही आमची पहिली दत्तक मुलगी. आता हळू हळू आम्ही काही अनाथ मुलांना इथे कायम स्वरूपी आसरा देणार आहोत.’ मुलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, एका लेप्रसी झालेल्या भिकारी दांपत्याकडून ही मुलगी आम्ही घेतली. एखाद्या आईने आपल्या मुलीच्या भवितव्याबद्दल बोलावे, तशा स्वप्नाळूपाणे त्या म्हणाल्या, ‘आम्ही तिला डॉक्टर करायचं ठरवलय.. नंतर जर्मनीला पाठवू.’
’तिचा आई-वडलांचा काय?’ मी विचारलं. ’सगळी जबाबदारी आम्हाला घेणं शक्य नाही या परिसरात खूप भिकारी आहेत. आम्ही त्यांना म्हंटलं, ’तुमची मुलगी आम्ही दत्तक घेतो. तिला शिकवतो. तिच्या आयुष्याचं कल्याण करतो. तुमच्यासारखं भीक मागत तिला फिरावं लागणार नाही पण आमची एक अट आहे. तुम्ही तिला तुमची आई-वडील म्हणून ओळख द्यायची नाही.’ त्यांनी ते मान्य केलं.
ही सगळी माहिती ऐकल्यावर माझ्या डोक्यात एक लख्ख वीज चमकली. त्या विजेच्या प्रकाशात ती ८-९ महिन्याची मुलगी एकदम तरुणी दिसू लागली. तेजस्वी, बुद्धीमान, गोड, नम्र, मनमिळाऊ. या तरुणीची कथा मी घरी जाईपर्यंत मनातल्या मनात तयार झाली.
त्या मुलीला मी नाव दिलं जस्मीन. मोहक सुगंधाने सर्वांना हवीशी वाटणारी जस्मीन. त्या क्रेशचही मी बारसं केलं, ‘ममता निकेतन’ आणि कथेतल्या आणि पात्रांनाही मी माझी नावे दिली. मुख्य फादर फिलीप. ‘ममता निकेतन’ची व्यवस्था पाहणार्या मिस रेमंड.
त्या विजेच्या प्रकाशात मला दिसलं, जस्मीन बारावीची परीक्षा उत्तम गुणांनी पास होऊन आता पुढचं मेडीकलचं शिक्षण घेण्यासाठी जर्मनीला निघालीय. ‘ममता निकेतन’च्या हॉलमध्ये तिला निरोप देण्यासाठी सगळे जमलेत. तिचं गुणवर्णन चाललय. तिचा आदर्श सगळ्यांनी डोळ्यापुढे ठेवावा वगैरे… वगैरे…
जस्मीनच्या डोळ्यापुढून मात्र तिचा भूतकाळ सरकतोय. ती जसजशी मोठी होत गेली, तसतशी तिला आपली जीवन कहाणी, कुणाकुणाच्या बोलण्यातून तुकड्या तुकड्याने कळली. लेप्रसी झालेल्या भिकारी जोडप्याची आपण मुलगी, हेही तिला कळले. पण नक्की कोण आपले आई-वडील हे मात्र तिला माहीत नाही. ते विचारायचे धाडसही तिला कधी झाले नाही.
निरोप समारंभाच्या वेळी आपलं मनोगत व्यक्त करताना ती म्हणते, ‘ ‘लेप्रसी’ विषयाचा विशेष अभ्यास करून, त्यावर संशोधन करण्याची आणि ‘ममता निकेतन’च्या परिसरातील रुग्णांवर उपचार करण्याची तिची इच्छा आहे. त्यासाठी सुसज्ज हॉस्पिटल बांधण्याचं तिचं ध्येय आहे.’
जस्मीन बोलतेय. होलामधल्या तिच्या समोरच्या भिंतीवर एक भलं मोठं डिजिटल पोस्टर लावलेलं आहे. त्यामध्ये प्रभू येशू एका महिलेच्या हातावर पाणी घालतोय आणि ती महिला ओंजळीने पाणी पितेय, असे चित्र आहे. चित्राखाली लिहिले होते, ‘त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागावतो, त्याला पुन्हा तहान लागत नाही.’ हे पाणी अर्थात आध्यात्मिक आहे. प्रभू येशूचा उपदेश म्हणजेच हे पाणी आहे. (हे चित्र मी मिरज मिशन होस्पिटलच्या दर्शनी भागात लावलेले पाहिले होते.)
बोलता बोलता जस्मीनचं लक्ष त्या पोस्टरकडे जातं. तिला वाटतं, आपण अगदी समजायला लागल्यापासून हे पाणी पितोय. पण आज आपल्याला अतिशय तहान लागलीय. त्या तहानेने आपले प्राण कासावीस झालेत. आपले आई-वडील कोण, हे जाणून घेण्याची तहान. त्यांना बघण्याची तहान.
जस्मीन निघण्याची वेळ होते. ती टॅक्सीत बसताना शेवटची नजर त्या भिकार्यांकडे टाकते. मनोमनी म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यानो मला आशीर्वाद द्या.’ टॅक्सी निघून जाते. चार विझू विझू झालेले क्षीण डोळे टॅक्सीचा पाठलाग करतात.
जून महिन्यातील असाच एक दिवस. संध्याकाळचे चार वाजून गेले असावेत . आज सकाळपासूनच आभाळ जड झालयं. काळंभोर, घनबावरं झालयं. कोसळू पाहतंय पण कोसळत नाहीय. इथं , कोईमतूर मध्ये मी घरी एकटीच . मुलगा आणि सून ऑफिसला गेलेत. नातूही दुपारचा झोपलाय . खिडकीतून दिसणारे काळे जडावलेले ढग बघत बसलेय मी . मोरही अगदी सहज फिरताना दिसतात या बाजूला . त्यानंही केकारव केला . अरे! हा तर थिरकू लागला !! बघता बघता पावसाचे टपोरे टपोरे थेंब येऊ लागले . थेंबांच्या सरी झाल्या . धो धो कोसळू लागल्या . मन तर बालपणीच्या अंगणात जाऊन गारा वेचून आलं . . . . परकरपोलक्यातून केंव्हाच सटकलं . . . मैत्रिणींच्या बरोबर नाचू लागलं. . .
सरींवर सरी कोसळू लागतात
आठवणींचे मोती सरीत गुंततात
अगबाई . . लग्नंही जूनमधलचं. . त्याही दिवशी असाच पाऊस . . . आता सरींचे हिंदोळे झाले . चांदणफुलांनी त्याची माझी ओंजळ भरली. . . थांब, थांब ना जरा. . .
आठवणींचे तरंगावर तरंग. पाण्यात दगड टाकल्यावर ऊठावेत तसे.
मनाच्या डोहात किती वलयं उठतायत. एकात एक, पुन्हा त्यात एक.. . एकाच केंद्राभोवती. . . की. . की प्रत्येकाचा केंद्र बिंदू निराळा? माझं मन हे केंद्र बिंदू प्रमाणं समजलं तर समकेंद्री . पण असंख्य जीवनाभुवानं वेगवेगळ्या क्षणी मला बहाल केलेल्या स्मृती . . विकेंद्री!!
आठवणी काही आनंदाच्या, काही माझ्याच जीवनवेलीवरील फुलांनी दिलेल्या समाधानाच्या. .
हे काय सरीतील मोती अजूनही ओघळतच आहेत. . . . स्वैर. . . . बेबंद. . . आणि हा वेडापिसा झालेला मोर तर , मान उंचावून; निळाभोर होऊन; आनंदघनात चिंब झालाय.
. . . . . . मी ही एक गिरकी घेतली. मीच मला टाळी दिली. गदिमांच्या थुई थुई नाचणारा निळा सवंगडी मनाच्या अंगणात पदन्यास करु लागला.. . . . .
तशी मी बाथरूम सिंगरही नाही. पण आज या आठवणींच्या सुरावटीनं माझं गाणं ही सुरेल झालंय. माझ्या नकळत माझ्या चेहऱ्यावर उठणारे तरंग आजूबाजूला ऊबदार, सुखद तशाच ‘Positive vibes’ पसरवताहेत. . . . माझं आनंदगान घननील नभापर्यंत उंच उंच झेपावतय.
☆ क्षण सृजनाचा ☆ हवंच सारं सोसायला’ या कविते विषयी…. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
परवा भाजी आणायला गेले होते. ‘मागून आवाज आला,‘बाई.. बाई… ओ बाई..’ मी चमकून मागे बघितलं. ‘बाई नमस्कार. मी सिद्दीकी … ओळखलत का?’
‘अगं किती बदललात तुम्ही! कशा ओळखणार?’ असं म्हणता म्हणता एकदम ओळखलं तिला. आमच्या कॉलेजची ७७- ७८ सालची विद्यार्थीनी. मोठी विनयशील मुलगी. सोशल डिस्टनिंग होतं म्हणून दुरून हात जोडून नमस्कार. एरवी भर रस्त्यातसुद्धा पायावर डोकं ठेवायला संकोचली नसती.
‘इथेच असतेस का?’
‘नाही ढालगावला. सहा महिन्यापूर्वी रिटायर्ड झाले. मुलगा इथे आय. सी. आय. सी. आय. बँकेत असतो. गेल्या वर्षीच बदलून आलाय. सी.ए. केलाय त्याने’ आनंद, सुख, तृप्ती तिच्या देहावरून निथळत होती जशी. तिच्याबरोबर तिचा चार-साडे चार वर्षाचा गोंडस नातू होता.
‘रईस, ये मेरी मॅम है.’ आपल्या नातवाला माझी ओळख करून देत ती म्हणाली. ‘से गुडमॉर्निग…’ इतरांना शिकवणार्या आपल्या आजीलाही शिकवणार्या कुणी मॅम आहेत, या विचाराने काहीसा गोंधळून, विस्फारीत नेत्रांनी माझ्याकडे पहात तो ‘गुडमॉर्निग’ म्हणतो.
‘हा माझ्या पहिल्या मुलाचा मुबारकचा मुलगा॰ कॉलेजमध्ये असताना डिलिव्हरी नव्हती का झाली!’
त्यानंतर ख्याली -खुशाली विचारणं झालं. फोन नंबरची देवाण-घेवाण झाली. ’बाई, घरी या ना!’ ती आग्रहाने म्हणाली. मुलाला गाडी पाठवाया सांगते. ‘बघू. कधी जमतय. मी फोन करते.’ मी म्हंटलं. त्यानंतर खूप काही बोलून आम्ही दोघी आपआपल्या वाटेने निघालो. परतताना तिचेच विचार मनात रेंगाळत होते.
सिद्दीकी आमच्या डी. एड. कॉलेजची ७७-७८ च्या बॅचची विद्यार्थिनी. मोठी विनयशील. ती भेटली आणि कॉलेजचे ते दिवस पुन्हा आठवले. विशेषत: तो दिवस आणि तो प्रसंग.त्या प्रसंगाने माझ्या एका कवितेला जन्म दिला होता.
सिद्दीकी नुकतीच बाळंतपणाची राजा संपवून कॉलेजमध्ये येऊ लागली होती. कॉलेजमध्ये सकाळच्या सत्रात अध्यापन होई आणि दुपारी विद्यार्थिनींचे सराव पाठ होत. त्यांच्या पाठ-सरावासाठी नगरपालिकेच्या वागवेगळया शाळा घेतल्या जात. एका वर्गात 3-4 जणींचे पाठ असत. प्रत्येक वर्गावर एकेक अध्यापक पाठ निरीक्षणाचे काम करीव नंतर पाठाबद्दल चर्चा होई.
नगर पालिकांच्या अनेक शाळांची स्थिती त्या काळात बरीच दयनीय होती. अनेक ठिकाणी वर्ग खोल्यात फरशीही नसे. शेणाने सारवलेली जमीन असे. बर्याचदा ती उखणलेली असे. विद्यार्थीच अधून मधून ती सारवत.
त्या दिवशी अशाच एका शाळेत मी पाठ निरीक्षणाला गेले होते.पाचवीच्या वर्गावर पहिलाच मराठीचा पाठ सिद्दीकीचा होता. ती काही बोलत होती. मुलं न ऐकता दंगा करत होती. पाठाचा तास म्हणजे एक प्रकारे मुलांना दंगा करण्यासाठी मिळालेली सनदच असे. वर्ग शिक्षिकास्टाफरूम मध्ये आरामात बसून गप्पा मारत. वर्गात मुले काही न ऐकता दंगा करत. त्या वर्गातल्या फळ्यावरही लिहिलेलं नीट उठत नव्हतं. कसा-बसा तिचा पाठ झाला. मग ती माझ्याजवळ येऊन म्हणाली,‘बाई मी घरी जाऊ?‘ त्या काळात आम्ही अजून बाईच होतो. मॅडम झालो नव्हतो. मी म्हंटलं ‘का ग? निरीक्षण नाही करणार?’
‘बाई बाळाला ताप आलाय.’ तिच्या डोळ्यातून पाणी आलं. मी तिच्या आठीवरून हात फिरवत तिला धीर दिला आणि घरी जायची परवानगी दिली. ती घरी गेली, पण तिच्या आईपानाके विचार माझ्या मनातून काही जाईनात. इतर पाठ बघता बघता तिच्या आईपणानेच मन-विचारांचा ताबा घेतला आणि एक कविता सुचत गेली. घरी जाईपर्यंत ती पूर्णसुद्धा झाली. शीर्षक दिलं- हवच सारं सोसायला
पावसाळ्यात माझ्या घराच्या पागोळ्यांवरून पडणारे थेंब निरखणे हा माझा विरंगुळा ! समुद्राच्या लाटा पाहण्यात जसा वेळ जातो ना अगदी तसंच काहीसं…….पुन्हा पुन्हा तीच गोष्ट पण मनाला नव्याने जाणवणारी अशी…..
थेंबांचे निरीक्षण करता करता मी थेंबांच्या अस्तित्वा विषयी विचार करू लागले. माझ्या डोळ्यांना दिसतो तोवर त्याचं अस्तित्व का? मातीत विरे पर्यंतच त्याचं अस्तित्व का ?की माझ्या मनात हृदयात आठवणीत तो असेपर्यंत त्याचं अस्तित्व?…..
थेंब नंतर कुठे जातो? ओढ्यात, डोहात, नाल्यात, समुद्रात ,नदीत ,मातीत की पुन्हा ढगात ?
मला तो नानाविध रूपात, रंगाढंगात दिसतो. किमान माझ्या मनात तो आहे हे त्याचं अस्तित्व मी नाकारू शकत नाही.
ह्या त्याच्या नश्वर प्रवासाची कहाणी मी कविता स्वरूपात लिहिली .
☆ क्षण सृजनाचा ☆ आमची सामूहिक कविता ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
माझ्या भाच्याला शाळेत सैनिकांना पत्र लिहून पाठवायचे होते. त्या पत्रातून त्यांना उत्तेजन देण्यासाठी कविता लिहून हवी होती. माझ्या बहीणीचा तसा आम्हाला फोनवर मेसेज आला. आम्ही सर्वांनी तो वाचला.आणि आमच्या डोक्यात विचार सुरु झाला. कशी कविता लिहावी ते नीट सुचत नव्हते. आमच्या ग्रुपमध्ये मी आणि माझा चुलत भाऊ आम्ही नेहमीच आमच्या कविता लिहून पाठवत असू.पण त्या दिवशी आम्हाला काही करून कविता सुचत नव्हती. तेव्हा वाट पाहून शेवटी माझ्या दुसऱ्या बहीणीने कविता लिहून पाठवली आणि मग ती वाचल्यावर सर्वांना सुच लागली. आम्ही त्या माझ्या बहीणीने लिहलेल्या पहिल्या तीन कडव्याना धरूनच पुढील कडवी लिहीली. आणि आमची सामुहिक कविता तयार झाली. कशी ते पहा.
भारत भू च्या सीमेवरती
सदैव रक्षणा तत्पर असती
नाही विसावा ना विश्रांती
सलाम माझा त्या वीराप्रती।।१।।
आले ते घरदार सोडुनी
मायेचे ते पाश तोडूनी
देशसेवेचे व्रत घेऊनी
सलाम माझा त्या वीराप्रती।।२।।
आम्ही इथे सुखाने राहतो
मौजमजा अन् सणात रमतो
आम्हासाठी प्राण आर्पिती
सलाम माझा त्या वीराप्रती।।३।।
धन्य त्यांची देशभक्ती
स्वार्थापलीकडे जनहित साधती
तिरंग्यात ऐसे लपेटून जाती
सलाम माझा त्या वीराप्रती।।४।।
अलौकीक शौर्य छाती निधडी
देहाची करुनी कुरवंडी
राष्ट्रवेदीवर अर्पुनी जाती
सलाम माझा त्या वीराप्रती।।५।।
धेय्य एकच डोळ्यापुढती
शस्त्र सदा घेऊन हाती
अखंड ठेवू मात्रूभू जगती
सलाम माझा त्या वीराप्रती।।६।।
या कवितेत पहिली तीन कडवी सौ. स्मिता ठाकुरदेसाई,चौथ कडव तिची मुलगी कु. सायली, पाचव कडव माझा चुलतभाऊ श्री. अतुल नवरे,आणि सहाव कडव मी म्हणजे अनिता खाडीलकर. अशी सहा कडव्यांची कविता आम्ही चौघांनी लिहीली.
याशिवाय माझ्या चुलतबहीणीने
‘नाही स्वतःची चिंता
उभे सैनिक सीमेवर
देशाचे रक्षण करत
झेलीत गोळ्या छातीवर।।१।।
आहात तुम्ही म्हणून
जगतो आम्ही आरामात
न गुरफटता नात्यात
चिंता करता देशाची।।२।।
नाही जुमानत कधी
उन पाऊस वारा
तुमच्यामुळेच आहे आज
सुरक्षित भारत सारा।।३।।’
सौ.अनुश्री जाहगीरदार. हिने लिहिली.
तर माझ्या भाच्चीनं
‘देशरक्षणापुढे इतर सर्व गौण
ठेवूनिया त्यांच्या त्यागाची जाण
घेऊनीया भूमातेची आण
प्रयत्ने चुकवू त्यांचे ऋण…
ही चारोळी कु.सायली ठाकुरदेसाई. हिने लिहिली.
अशा प्रकारे कधीच कविता न लिहणाऱ्या माणसांनी कविता लिहल्या. आणि पत्र पुर्ण करून पाठवले.
☆ क्षण सृजनाचे : कथा या कवितेचा जन्म ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
1980च्या सुमाराची गोष्ट. मी त्यावेळी सांगलीयेथील क. ज्युनि, कॉलेज येथे अध्यापन करत होते. सकाळी सव्वा अकराला घंटा होई. परिपाठ वगैरे होऊन साडे आकाराला अध्यापन सुरू होई. दुपारच्या सत्रात विद्यार्थिनींचा पाठाचा सराव होत असे. त्यांच्या पाठ-सरावासाठी नगरपालिकेच्या वागवेगळया शाळा घेतल्या जात. एका वर्गात 3-4 जणींचे पाठ असत. प्रत्येक वर्गावर एकेक अध्यापक पाठ निरीक्षणाचे काम करी व नंतर पाठाबद्दल चर्चा होई.
नगर पालिकांच्या अनेक शाळांची स्थिती त्या काळात बरीच दयनीय होती. अनेक ठिकाणी वर्ग खोल्यात फरशीही नव्हती. शेणाने सारवलेली जमीन असे. विद्यार्थीच अधून मधून ती सारवत. वर्गांची निसर्गाशी खूप जवळीक होती. आशा शाळेत येणारी मुलेही आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावरची, तळा-गाळातील म्हणता येईल अशीच होती.
त्या दिवशी अशाच एका शाळेत मी पाठ निरीक्षणाला गेले होते. खाली चार वर्ग आणि वरच्या मजल्यावर तीन वर्ग अशी ती शाळा होती. अरुंद जिना चढून वर गेलं की ओळीने तीन वर्ग आणि त्यांच्यापुढे व्हरांडा.
नेहमीप्रमाणे पाठाला सुरुवात झाली. शिकवणारी विद्यार्थिनी चांगलं शिकवत होती. मुलेही पाठात छान रमून गेली होती. इतक्यात अचानकच पाऊस सुरू झाला. पावसाचा जोर वाढला. छपरातून, तसेच समोरच्या व्हरांड्यातून पावसाचे थेंब आत येऊ लागले. मुले थोडीशी गडबडली. बडबडली. विस्कळीत झाली. पण पुन्हा नीट ऐकू लागली. हा तिच्या शिकवण्याचा प्रभाव होता. एरवी मुलांनी या निमित्त्याने खूप दंगा-आरडा-ओरडा केला असता. हे सगळं बघताना, अनुभवताना मला एकदम सुचलं,
असाच प्रसंग. वर्गात गुरुजी मुलांना एक गोष्ट सांगत आहेत. बाहेर पाऊस पडतोय, पण मुलांना त्याची जाणीवच नाही, इतकी मुले गोष्ट ऐकण्यात तल्लीन झाली आहेत.
एवढ्यात तास संपल्याची घंटा झाली आणि दुसरा पाठ सुरू झाला. त्यादिवशी शाळेतून बाहेर पडेपर्यंत मला ‘कथा ‘ ही कविता सुचली आणि घरी येताक्षणी मी ती लिहून काढली.
कथा –
मरगळल्या दिशा
गच्च भरलेलं आभाळ
आंधारा वर्ग अधिकच काळवंडलेला
पिसाट वारा छ्प्पर फाडून आत आलेला.
फुटक्या कौलारातून निथळणारं पाणी
उसवल्या बाहीतून ठिबकतय खांद्यावर
उठवतय शहारा अंगावर.
पोरं टोरं
कळकट, मळकट
केस विस्कटलेली, शर्ट फाटलेली
बसली आहेत, निमूटपणे
कथा ऐकत
कुणा सुशील, सुंदर राजकान्येची
तिला पळवून नेणार्या
कुणा दुष्ट भयंकर राक्षसाची
प्रेमळ यक्षाची आणि धाडसी राजपुत्राची.
आणि मग सारा वर्गच जातो बनून यक्षनगरी
चमचमणारी, झगमगणारी
प्रेमळ गुरुजी वाटतात, यक्षांचे राजे
वाटा दाखवणारे, वर देणारे
सारी मुलेच मग बनतात राजपुत्र
भरजरी पोशाख ल्यालेले, तलवार घेतलेले
आणि निघतात सोडवायला
त्या सुशील, सुंदर राजक्न्येला
आणि इतक्यात
शाळेचा शिपाई येतो राक्षस बनून.
घंटेची आरोळी ठोकून,
टाकतो सारी कथाच विस्कटून
टाकतो सारी कथाच विस्कटून.
या कवितेला कविसंमेलनातही त्या काळात खूप दाद मिळाली होती.