डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ अन्न तारी.. अन् अन्न मारीही… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(“निरु, माझं ऐक. आता तू खरोखर छान दिसते आहेस. आजपासून रात्री थोडं जेवायला सुरवात कर बाळा. अगदी चार घास तुला आवडेल ते खायला लाग. मी तुला मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या देते त्या घ्यायला लाग. म्हणजे तू हेल्दीही रहाशील. एक महिन्याने हिला घेऊन या केतन.”) – इथून पुढे.
अनुराधा तिची आतुरतेने वाट बघू लागल्या. , न राहवून त्यांनी मधेच केतनला फोन केला.
केतन म्हणाला, “ डॉक्टर, तिने तुमचं काहीही ऐकलं नाहीये. बळजबरी केली तर ती अन्न ओकून टाकते. तिला घेऊन मी आजच येतो तुमच्याकडे. ”
केतन निरुपमाला घेऊन आला. वजनाच्या काट्यावर तिला उभं केलं. काटा तिचं वजन 42 किलो दाखवत होता. ही बाब फार गंभीर होती. ताबडतोब अनुराधाने निरुपमाला चांगल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. तिला सलाईन लावलं. त्यात सर्व शक्तिवर्धक औषधे घातली. तिला सकाळी ब्रेडची स्लाईस आणि दूध दिलं. तिने ते खाल्लं आणि लगेच उलटी करून ते काढून टाकलं.
अनुराधा म्हणाल्या, “ याला ब्युलिमिया म्हणतात. आपलं वजन वाढू नये म्हणून असले अघोरी उपाय करणारे लोक अमेरिकेत मी बघितले आहेत. केतन, निरु नीट ऐका. मी एका हॉस्पिटलला भेट दिली. तिथे असल्या मुली होत्या. भडक मेकप केलेला, पार खंगलेल्या, हाता पायाच्या अक्षरश:काड्या झालेल्या. आई त्या मुलीला व्हीलचेअरवर बसवून ढकलतेय. मुलीचं वजन झालं होतं पंचवीस किलो. सगळ्या व्हायटल सिस्टिम्स निकामी झालेल्या. ओव्हरी गर्भाशय पूर्ण आक्रसलेले. ही मुलगी आता कशी नॉर्मल होणार? अजूनही तिचं शरीर अन्न नाकारतच आहे. असे मुलगे मुली मी बघितले आणि त्यांचे हताश आईवडील. निरुपमा, तुला असं जगायचं आहे का? नाही ना, मग मरायचं आहे का? असं होत राहिलं तर तू त्याच दिशेने जाताना मला स्पष्ट दिसते आहेस. अजून वेळ गेलेली नाहीये. या उपर तू आणि तुझं नशीब. ”
डॉ. तिथून निघून गेल्या. त्या पंधरा दिवसात निरुपमाचं वजन दोन किलो वाढलं. तिला मऊ भात खीर पचायला लागलं. हॉस्पिटल मधून जयाताईंनी निरुला त्यांच्या घरी नेलं.
निरुपमा आता थोडं थोडं खायला लागली. तिच्या अंगावर जरा तुकतुकी आली. आई तिला अगदी थोडं थोडं नवनवीन करून खायला घालायला लागली. निरु आता केतनच्या घरी गेली.
आता निरुपमाचं वजन नीट वाढायला लागलं. तिला अन्न पचायला लागलं. तिचं 42 किलो वजन हळूहळू करत 60 किलो पर्यंत आलं. निरुपमा पूर्वीसारखीच हसती खेळती आणि तेजस्वी दिसायला लागली.
या गोष्टीलाही सहज चार वर्षे झाली. डॉ. अनुराधांनी दवाखान्याचा व्याप कमी करत आणला.
त्या आता बऱ्याच वेळा परदेशात आपल्या मुलाकडे असत.
त्यादिवशी त्या अमेरिकेहून परत आल्या आणि कारची वाट बघत बाहेर थांबल्या होत्या. त्यांचा ड्रायव्हर कार घेऊन आला आणि त्यांची कार फूड मॉल जवळ थांबली. अनुराधा फ्रेश होऊन आल्या आणि एका टेबल जवळ बसून कॉफी पीत होत्या. समोरूनच एक मध्यमवयीन मुलगा आणि त्याच्या बरोबर एक मध्यम वयाची मुलगी त्यांच्याच दिशेने येताना त्यांना दिसले.
“ हॅलो डॉ अनुराधा. मला ओळखलं का? “
डॉक्टर जरा विचारात पडल्या आणि मग म्हणाल्या, “तुम्ही केतन मराठे का? ”
प्रश्नार्थक नजरेने त्यांनी केतनबरोबरच्या मुलीकडे बघितलं.
केतन म्हणाला, “ हो. मी केतनच. बाई, तुम्ही डिस्पेन्सरीत कधी येणार आहात? मला तुम्हाला भेटायचं आहे.
हे माझं कार्ड बाई. डिस्पेनसरीत आलात की नक्की नक्की फोन करा. खूप काही बोलायचं आहे मला तुमच्याशी. ”
बाई पुण्याच्या दिशेने निघून गेल्या आणि केतन मुंबईच्या.
जरा प्रवासाचा थकवा कमी झाल्यावर अनुराधा दवाखान्यात आल्या.
दुसऱ्या दिवशी त्यांनी केतनला फोन केला.
“ बाई, मी भेटायला उद्या येऊ का? ” त्याने विचारलं.
“ या की. या उद्या संध्याकाळी. ”
दुसऱ्या दिवशी केतन त्यांना भेटायला आला.
“ बाई, तुमच्याशी खूप बोलायचं होतं. पण समजलं तुम्ही इथे नाही. परदेशात गेला आहात. पण परवा अचानक भेट झाली आपली. मी काही कामासाठी मुंबईला गेलो होतो म्हणून तर अचानकच आपली भेट झाली” केतन म्हणाला.
“ ते जाऊ दे. निरुपमा कशी आहे? ठीक आहे ना सगळं? ”
केतन गप्प झाला. ”तेच सांगायचं आहे डॉक्टर तुम्हाला. आपण सगळ्यांनी अथक प्रयत्न केले, तुम्ही तिला त्या एक प्रकारच्या मानसिक आजारातून बाहेर काढले. नंतरचे काही महिने खूप छान गेले आमचे. निरु पुन्हा चांगली झाली, छान रहायला लागली. पुन्हा तिचा स्वतःवरचा कंट्रोल सुटला आणि वजन झालं 80 किलो. पुनः ती त्या वजन कमी करण्याच्या दुष्ट चक्रात सापडली. यावेळी तिने खाणेपिणे सोडले आणि ब्यूलीमियाने तिच्या मनाचा ताबा घेतला. मला तिची अवस्था बघवेना. तिला आम्ही अनेक वेळा ऍडमिट केले, पण तिची परिस्थिती गंभीरच होती. तिचं वजन तर आता 30 किलो झालं. उठता बसता येईना. हाता पायांच्या काड्या. सर्व रिपोर्ट्स अगदी वाईट होते हो तिचे. खूप प्रयत्न करूनही डॉक्टरांना तिला जगवता आलेच नाही. शेवटी म्हणायची, ‘ माझ्या हाताने मी माझा नाश करून घेतला. मला जगायचंय केतन. मला वाचवा. मला मरायचं नाहीये. ’
तीस हे कोणाचं मरायचं वय असू शकतं का हो डॉक्टर? बघवत नव्हती निरुपमा शेवटी. सगळे केस गळले, डोळे बाहेर वटारल्यासारखे दिसत. व्हील चेअर वर बसून असायची ती. खाणे तर जवळ येऊ सुद्धा द्यायची नाही. शेवटी मी तिला घरी आणलं. मग तर पाणीही पचेना तिला. हाल हाल होऊन मग गेली निरुपमा. आम्हा सगळ्याना अतिशय वाईट होते ते दिवस. तरणीताठी सून व्हील चेअरला खिळलेली. वाटेल ते बोलायची ती आम्हाला. ‘ मी इथे मरतेय आणि तुम्ही सगळे जेवा पोटभर. काहीही वाटत कसं नाही माझ्या समोर बसून हे खाताना? माझ्या पोटात अन्नाचा कण नाही. ’ बरं ती समजावून सांगण्याच्या पलीकडे गेली होती आता. काय वाटेल ते बोलायची ती. माझ्या आईवडिलांना, तिच्या आईला. ती गेली तेव्हा वाटलं, ती आणि आम्हीही सुटलो यातून. डॉक्टर, मीही तरुण आहे. फार फार सोसलं मी आणि आमच्या कुटुंबाने सुद्धा. तिच्या मृत्यूनंतर सैरभैर झालो मी. पण मग मला ही निकिता भेटली. तिनं सावरलं मला.
फार चांगली आहे निकिता. मी लग्न केलं तिच्याशी. परवा बघितलीत तुम्ही तिला. दिसायला ती निरु इतकी सुंदर नाही पण मला आता नकोच हो ते सौंदर्य आणि ती फिगर. मी सुखात आहे अगदी. हे सगळं सांगून मला खूप बरं वाटलं डॉक्टर. तिच्या आजाराच्या तुम्ही साक्षीदार आहात. “
अनुराधाने केतनच्या पाठीवर थोपटले. “ केतन, उत्तम केलंत तुम्ही लग्न केलंत. निरुपमासाठी आपण शक्य होतं ते सर्व केलं. पण हे लोक त्यातून फार कमी वेळा बाहेर पडतात. त्याच त्याच चक्रात पुन्हा पुन्हा अडकतात. निरुपमाचं तसंच झालं. ठीक आहे. तिचं आयुष्य तेवढंच होतं म्हणू या. ”
… केतन त्यांचा निरोप घेऊन गेला आणि डॉ अनुराधाला हकनाक आयुष्याला मुकलेल्या निरुपमाबद्दल अतिशय वाईट वाटलं.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈