मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तडजोड – भाग -2 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

? जीवनरंग ❤️

☆ तडजोड – भाग – 2 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

भाईसाहेबांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

“”विकीदादा,निरज,–तुम्ही दोघांनी हे मान्य केलेत याचा खुप आनंद झाला.निरज,कारखान्यात  तुमची जबाबदारी वाढली ,आता घराकडे लक्ष द्यायला होणार नाही.अन् सुप्रियाची जबाबदारी तुमच्यावरच आहे.त्यांच्या लग्नाचा  विचार केंव्हा करणार?”

त्याचबरोबर, सुप्रिया आणि भाईसाहेबांनी चमकुन एकमेकांकडे पाहिले. वहिनीसाहेबांच्या नजरेने ते बरोबर हेरले.२,३ वर्षे त्या दोघांचे सुरु असलेले प्रकरण त्यांना समजले होते.

 नवर्‍याचे वयाने एवढ्या लहान मुलीबरोबर संबंध —-त्या पार कोलमडल्या होत्या.अगदी जीव द्यायचेही मनात आले.

पण मुळ स्वभाव विचारी असल्याने त्यांनी मनाचा तोल अजिबात ढळु दिला नाही.आपल्या जीव देण्याने ,बंटी पोरका होईल.आपल्या वैयक्तिक सुखदःखासाठी त्याचे आयुष्य वाया घालवणे योग्य नाही.

उच्चशिक्षण घेतले नसले तरी व्यावहारिक अनुभव ,आणि साधकबाधक विचार प्रवृती होती.त्यांची निर्णयक्षमता जेवढी जबरदस्त,,नियोजनही तेवढेच प्रभावी होते.त्यामुळे निर्णयाच्या याबाबत कोणाच्याही मनात शंका नसे..

किंचित हसुन ,””निरज,तुम्ही करु नका निष्कारण विचार.आम्ही केला आहे त्याला हो म्हणा.”

सगळेच त्यांच्याकडे बघु लागले.

भाईसाहेबांना रहावेना ,””काय ठरवलेत ?निरजला न विचारता?'”

वहिनीसाहेब शांतपणे,””हो,ज्यात सगळ्यांचेच हित आहे असेच ठरवले. निरज, विकीदादांना तुम्ही जवळुन पाहता,.त्यांच्यावर आलेल्या संकटातुन बाहेर काढण्यासाठी तुम्ही खुप मदत केलीत.तुमच्या मनात  त्यांच्याविषयी चांगल्या भावना आहेत.म्हणुनच, विकीदादांच्या साठी आम्ही सुप्रियाचा हात मागतो.—“

त्यांचे बोलणे ऐकुन एवढा वेळ शांत बसलेले विकीदादा,””पण,वहिनी —-तुम्हाला माहित—-नाही”.

वहिनीसाहेब,हात दाखवुन ,विकीदादांचे बोलणे थांबवून ,धीम्या पण करारी आवाजात,” हो ,आम्हाला सगळ माहित आहे.निरज हे लग्न होणार,.अगदी लवकर चांगला मुहुर्त बघुया,.कारखान्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहेच.विकीदादा आणि सुप्रिया, —दोघेजण शेताची,गावाकडची पुर्ण जबाबदारी घेतील,पण त्याआधी ,शेती संबंधी व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी दोघेही,२ ,वर्षे परदेशात रहातील .आम्ही त्यासंबंधी चौकशी केली आहे.”

सुप्रियाला कड्यावरून ढकलून दिल्यासारखे वाटले, शब्द तोंडातच थिजले तर डोळ्यातले पाणी लपवणे अवघड झाले.

भाईसाहेबांची अवस्था तर काहीही बोलण्याच्या पलिकडे गेली.”सौदामिनी,एवढे घाई कशाला? त्यांना जरा विचार करु दे”. हे तोंडाशी आलेले शब्द त्यांनी मुकाटपणे गिळले.

   एवढा वेळ जाणूनबुजून दुर्लक्षित केलेल्या सुप्रियाचा हात हातात धरुन “”चला,आपण खाली जाऊया,तुम्ही पण सर्व खाली देवघरात या”.वहिनीसाहेब. देवासमोर तिला बसवुन ,चांगली भारीतली साडी ,अन् सोन्याचा नेकलेस देऊन ,पाच फळांनी ओटी भरली, तिच्या डोळ्यातले पाणी पुसत, 

“”हे सर्व ठरवणे आम्हालाही सोपे नव्हते.पण पुढील वाताहात टाळण्यासाठी —-  हा निर्णय घेतला. लहान वयामुळे तुम्हाला आता मान्य होत नसेल पण स्विकारावे लागेल. –आयुष्याशी करावी लागणारी तडजोड समजुन.”

*  समाप्त  *

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तडजोड – भाग -1 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

? जीवनरंग ❤️

☆ तडजोड – भाग -1 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

सोमवारी सकाळी घरी येऊन भेटण्याचा निरोप वहिनीसाहेबांकडुन आला.तेंव्हापासून सुप्रिया काहीशी धास्तावली होती.देसाईसर आणि आपल्याविषयी समजले असेल का त्यांना?

निरजदादाला सांगावे का? त्याच्याशिवाय आपल्याला दुसरे आहे तरी कोण?पण त्याला सांगायचे तरी कसे,? नकोच.त्यालाही हे पटणारे नाहीच.देसाईसरांना किती मान देतो तो.आईबाबांच्या अपघाती मृत्युनंतर काकाकाकुंनी सांभाळले आपल्या दोघांना,पण आता त्यांचे छत्रही गेले.

सोमवारी निरजच्या कारखान्याला सुटी.तो घरीच असणार असे वाटले,पण तो तिच्याआधीच आवरून बाहेर पडला.आधीच देखणी आणि नेहमी व्यवस्थित रहाणारी सुप्रिया, आज मात्र मन थार्‍यावर नसल्याने कशीबशी आवरून बाहेर पडली.

देसाईंचा “साफल्य ” बंगला शोधायला फारसा वेळ लागला नाही.अपेक्षेपेक्षा खुपच सुंदर होता.आत गेल्यावर,””वहिनीसाहेब पुजा करत आहेत,तुम्हाला बसायला सांगितले “म्हणुन कावेरीने सांगितले.

बंगल्याची आतली सजावटही उच्च अभिरुची दाखवत होती.तिला वाटले देसाईसरांचीच निवड असणार सगळी.वाट बघण्याची ती ५,७मिनीटे– मनातील धाकधुक आणखीनच वाढवून गेली.

दारातून  वहिनीसाहेब—सौ. सौदामिनी देसाई आल्या.तसा रंग ऊजळ असला तरी रुप सुमारच, आणि चणही पुरुषी.डोळ्यात करारीपणा,जरब.पण पोकळ डामडौल नाही तर कर्तृत्वाची जोड ,त्यामुळे आत्मविश्वास .

बर्‍यापैकी भारी माहेश्वरी साडी,मोजकेच पण छान  दागिने. कुठेही भपकेबाजपणा नव्हता.

तशी सुप्रियाची आणि त्यांची २,४वेळा भेट झाली होती .पण बाहेरच आणि तशी घाईघाईतच.२४,२५ वयातील सुप्रियाला आपल्या देखण्या रुपाचा थोडा अभिमान होता.पण चाळीशीतल्या एखाद्या बाईचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी असु शकते हे वहिनीसाहेबांकडे निरखून बघितल्यावर तिला समजले.

तेवढ्यात समोरच्या जिन्यातून — देसाईसर खाली आले.४५ कडे झुकले तरी देखणे ,रुबाबदार व्यक्तिमत्व.तिच्यादृष्टीने देसाईसर तरी सर्वजण भाईसाहेब म्हणत.तसे पिढीजात श्रीमंत,भरपुर शेती,मोठा कारखाना.शिवाय प्रतिथयश C.A.म्हणुन चांगली प्रॅक्टिस.

अनेक संस्थांचे कार्याधिकारी. त्यातील एका शिक्षणसंस्थेशी जास्त जवळीक,हौस म्हणुन तिथे शिकवत .तिथेच MBAकरणार्या सुप्रियाशी २,३वर्षांपुर्वी भेट झाली.

नकळत बंध जुळले.आणि वेगळेच वळण घेऊन नाते निर्माण झाले.

सुप्रियाला तिथे बघुन त्यांना आश्चर्य वाटले,आणि गोंधळात पडले.

“या, निरज, तुमचीच वाट पहात आहोत,” या वहिनीसाहेबांच्या शब्दांनी आता सुप्रियाही चांगलीच गोंधळली.

वहिनीसाहेब ,” चला ,आपण वरच्या हॉलमध्ये जाऊया,कावेरी,विकीदादांनावर पाठव”.

विकीदादा—विक्रम देसाई,भाऊसाहेबांचा लहान भाऊ.तसे वयात जरा जास्त अंतर,परदेशात शिकुन आलेले पण लाडावलेले ,म्हणुन मध्यंतरी बहकले.एका पोरीच्या प्रेमात असतांनाच ,तिच्या खुनाच्या आरोपात अडकले. वहिनीसाहेबांमुळे सहीसलामत बाहेर पडले पण अजुन बिथरलेलेच म्हणुन ना कारखान्याकडे लक्ष ना शेती बघणे.ना ईतर कोणत्या कामात रस.

देसाई कुटुंबाच्या सर्वेसर्वा तशा वहिनीसाहेबच. भाईसाहेबांना मुळातच कौटुंबिक बाबतीत स्वारस्य कमी.वहिनीसाहेब नात्यातल्याच. त्यामुळे घरचे रितीरिवाजांची त्यांना लग्नाच्या आधीपासूनच माहिती.वहिनीसाहेबांच्या कर्तेपणाचा अनेक वेळा अनुभव आल्यामुळे ते कशातच हस्तक्षेप करत नव्हते.विक्रम आणि आपला मुलगा बंटी —यांची जबाबदारी पण वहिनीसाहेबांनी समर्थपणे पेलली.त्यातुन अडचण आलीच तर  ,त्या भाईसाहेबांना सल्ला विचारीत.दोघांमध्ये चर्चा होई,पण शेवटी,”सौदामिनी  तुम्हीच काय योग्य वाटेल तसे ठरवा.” म्हणुन भाईसाहेब सुत्र त्यांच्या हातात देऊन मोकळे होत.

आताही,विक्रमचे कारखान्याकडे लक्ष नाही हे त्यांच्या लक्षात आले.म्हणुन कारखान्याची जबाबदारी कोणावर तरी सोपवावी हा विचार त्यांनी केला.

निरज,व्यवस्थापक म्हणुन अतिशय उत्तम काम करत होता.पण शेवटी तो पगारी नोकर .त्याला भागीदार करुन घेतले तर ,तो अधिक लक्ष घालुन काम करेल हा विचार करुन त्यांनी आज सगळ्यांना बोलावले होते.अर्थात ,आधी भाईसाहेबांच्या संमतीनेच.त्यांचा हा निर्णय ऐकुन ,निरज,सुप्रिया,आनंदले,पण विक्रमलाही आपली जबाबदारी कमी होणार याचा आनंद झाला.

निरजची भांडवलाची अडचणही त्याने सांगितली.पण ,त्याकडे  वहिनीसाहेबांनी जरा दुर्लक्षच केले.

भाईसाहेब मात्र अजुन संभ्रमात होते.वहिनीसाहेबांच्या चेहर्‍यावरून त्याच्या मनात आणखी काहीतरी नक्कीच आहे असे त्यांना वाटत होते.

“हं, सौदामिनी, आता झाले ना तुमच्या मनासारखे, सगळ्यांचे तोंड गोड करा. चालु देत तुमच्या गप्पा .मला जरा बाहेर जायचे, निघतो मी.’ भाईसाहेब.

किंचित विचार करीत,वहिनीसाहेब,

“नाही, थांबा जरा. अजुनही महत्वाचे सांगायचेच.”

क्रमशः….

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, माझी मैत्रीण आणि…. साठीची ताकद – भाग 3 ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ मी, माझी मैत्रीण आणि…. साठीची ताकद – भाग 1 ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

(मागील भागात आपण पहिले – . ” मनात मी खुश झालो होतो पण साठीच्या ताकदीने मनातली ख़ुशी काही मी चेहऱ्यावर न आणता चंदाला “भेटू ८.३० वाजता” असे बोलून बाय केले. इथून पुढे )

ठीक ८.३० वाजता मी एकदम टकाटक होऊन, अंगावर परफ्युम मारून चंदाच्या रूमच्या बाहेर उभा ठाकलो. तोंडात माऊथ फ्रेशनर मारला. आज साठीची ताकद जाणवत होती. जुन्या मैत्रिणीला हॉटेलमधल्या एका रूममध्ये भेटायचं आणि ते पण बायकोच्या परमिशनने. एकदम भारी वाटत होते. सरिताचा माझ्यावरचा विश्वासच आज माझी आणि चंदाची भेट करून देत होता. चंदाच्या रूमची बेल मारली आणि चंदाने लगेच दरवाजाही उघडला. आत गेलो तर जरा हिरमुसला झालो. मला वाटले होते चंदा एकटी असेल पण रूममध्ये तो पण होता. तो…पवन राठी. टकल्या… पवन राठी. मी आत मध्ये गेलो तसा तो उठला आणि बाहेर जायला निघाला. चंदाने त्याला थांबवायचा खोटा आग्रह केला पण त्यानेही त्याची कोणीतरी वाट बघतंय असे सांगितले आणि तो बाहेर पडला. चंदाने आमच्या ड्रिंक्सची मस्त तयारी करून ठेवली होती. तिनेच सराईतासारखे दोन ग्लास भरले आणि आम्ही चिअर्स केले. नंतर जवळ जवळ अर्धा तास आमच्या शाळेतल्या आठवणी काढत गप्पा रंगल्या होत्या. गप्पांच्या आणि शाळेतल्या मित्र मैत्रिणींच्या आठवणी काढत चंदाने भरलेला दुसरा पेग मी कधी संपवला मलाही कळले नाही. चंदा आणि मी मुक्तपणे, हसत खिदळत जुन्या आठवणींना उजाळा देत होतो. ‘ हम तुम एक कमरेमे बंद हो, और चाबी खो जाये ‘ हे गाणे आम्ही खूप वर्षांनी परत एकदा गायलो. एक तासाने म्हणजे ९.३० ला चंदाने मला सांगितले, ” चल…. आता आपण तुझ्या रुमवर जाऊया. सरिता बिचारी एकटी असेल तिलाही आपल्या गप्पांमध्ये सामील करूया.”  चंदाचा असा यु टर्न मला अनपेक्षित होता.   “अग सरिता आता झोपली असेल. तिला लवकर झोपायची सवय आहे. नको उगाच तिला आता उठवायला” असे मी बोलत असतानाच अजून मला काही बोलायची संधी न  देता माझा हात धरून ती मला तिच्या रूमच्या बाहेर घेऊन आली. पुढच्या दुसऱ्या मिनिटाला आम्ही माझ्या आणि सरिताच्या रूमच्या बाहेर उभे होतो. अजूनही  मी चंदाला समजावत होतो ” अग नको उठवूया तिला. झोपेतून उठवलेले तिला नाही आवडत.” मी बोलेपर्यंत माझ्या शर्टच्या खिशातले डोअर कार्ड काढून तिने आमच्या रूमचा दरवाजा उघडला आम्ही आत मध्ये गेलो आणि ……

आणि मी बघतच राहिलो. तो ….. तो  चंदाचा मित्र पवन …टकल्या पवन राठी. तो आणि सरिता हसत खिदळत गप्पा मारत होते. त्यांचेही ग्लास भरलेले होती. हे काय चालले आहे ते मला काही कळत नव्हतं. आता  त्यांच्यात  चंदाही सामील होऊन ते तिघे जोर जोरात हसत होते आणि मी नुसता  वेड्यासारखा त्यांच्याकडे बघत होतो.

सरिता, चंदा आणि पवन हे तिघेही एकाच कॉलेजचे. पवन आणि सरिता हे एकाच बॅचचे. पवन गुप्ते आणि चंदा ह्यांचे लव्ह मॅरेज झाले. गेल्या महिन्यात त्यांच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींचे  रियुनिअन होऊन जेंव्हा ते तिघे एकमेकांना भेटले तेव्हा चंदा आणि सरिताच्या बोलण्यातून सरिताला समजले की मी माझी चंदा, शाळेतल्या मैत्रिणीचा जो उल्लेख करतो ती हिच चंदा आहे आणि तिघांनी मिळून ही आजच्या भेटीची आखणी केली  आणि माझा पोपट केला.  हे सगळे समजल्यावर मलाच माझे हसू आले आणि माझ्या संयमी स्वभावानेच आज माझी साठीची ताकद शाबूत ठेवली ह्याची जाणीव झाली.

हो आणि एक खरं सांगू का….. शाळेत असताना चंदाने मला तिचा बेस्ट फ्रेंड म्हणून निवडले असले तरी माझी बेस्ट फ्रेंड ती पल्लू … पल्लवी कामत होती…. तिचा काही तपास लागतो का बघायला पाहिजे.

चला आता परत एक ग्लास भरून चिअर्स करून माझ्या बायकोच्या त्या टकल्या मित्र आणि जाड्या मैत्रिणी बरोबर डिनरला जायला लागेल.

समाप्त 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रखमाचं काय झालं ? – भाग-5 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-5 ☆ श्री आनंदहरी 

पोलिसांना रखमाचा तपास लागलाच नाही. या साऱ्या प्रकणात कितीतरी वेळा सदाला पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या होत्या.  त्याला कामावर जाता आले नव्हते. या साऱ्यामुळे त्याची नोकरी सुटली होती.. पोराची जबाबदारी पडू नये म्हणून रखमाच्या भावाने, आईने कधीच पाठ फिरवली होती. सदा दिवसभर  हताश, उदास, विचारात गढून गेलेल्या अवस्थेत आढ्याकडे बघत बसून राहू लागला होता. बायजाला त्याची ही अवस्था पाहवत नव्हती.. ती त्याला सांगायची, समजवायची…  त्याच्या पोटाला दोन घास करून घालायची ..तान्ह्या पोराला सांभाळायची.. पोर संगती घेऊन भाजीपाला विकायला जायची. गल्लीतला प्रत्येकजण सदाची अवस्था पाहून हळहळत होता.

शेजाऱ्या-पाजाऱ्यांची सहानुभूती हळूहळू ओसरत गेली होती. शेवटी प्रत्येकाचे हातावर पोट होतं.. स्वतःसाठीही बसून राहणे परवडणार नव्हते.. प्रत्येकाची दिनचर्या पूर्ववत सुरू झाली होती.. बायजाम्हातारी, नात्याची ना गोत्याची पण मागल्या जन्मीचे काहीतरी सोयर असल्यासारखी सदाची, त्याच्या पोराची काळजी घेत होती. सदाला या साऱ्यातून बाहेर काढायला हवं, सावरायला हवं असे तिला वाटायचे.. सदाला सांगून -समजावून ती  स्वतःबरोबर भाजी विकायला बाजारात घेऊन जाऊ लागली होती. चार लोकांत वावरत राहिल्याने सदामध्ये बदल होईल असे बायजाला वाटत होते.. तसाच बदल सदामध्ये होऊ लागला होता. 

काळ कधी कुणासाठी, कशासाठी थांबत नाही.. तो पुढे सरकतच असतो आणि काळ हेच सगळ्यावरचे औषध असते. सदाचे पोर काळाबरोबर बायजाच्या मायेत वाढत होते. सदा पूर्ण सावरून घरातली बरीचशी कामे करू लागला होता. बायजाम्हातारीबरोबर बाजारात बसून व्यापारात तयार झाला होता. पोटापूरते मिळत होते. दुःखावर खपली धरली होती.  सदाचा कामात बदल एवढे एक सोडलं तर सारे पूर्ववत चाललंय असे वाटत होते.

रखमा जणू काळाच्या पडद्यावरून पुसून गेली होती. लोकांच्या विस्मरणात गेली होती. सदाही तिला विसरून गेला असेल असे लोकांना वाटू लागले असावे.

‘असे एकट्याने कसं जगता ईल ? त्यात लहान पोर आहे.. संसाराचा गाडा सांभाळायला कुणीतरी बाईमाणूस पाहिजेच ‘ कुणीतरी सदाच्या लग्नाचा विषय बायजाजवळ काढला होता. खरेतर बायजाच्याही मनात अधून मधून हाच विचार येत होता पण तिने सदाजवळ कधी विषय काढला नव्हता.  हळू हळू कुणी थेट, कुणी आडून आडून सदाला सुचवू लागले.

” पोरा, तुझं काय वय झाल्याले न्हाय, परपंचाचा गाडा  कुठंवर एकटा वडशील. पोटाला पोर हाय तुझ्या. वरीस झालं.. आता तरी लगीन करायचा इचार कर. “

एके दिवशी रात्रीची जेवणं झाल्यावर बायजाने सदाला लग्नाबद्दल सांगितलेच. सदा आधी काहीच बोलला नाही. नंतर म्हणाला,

“आज्जे, समद्यांनी पाठ फिरीवली पर तू आई हून हुबा ऱ्हायलीस ..पयल्या दिसापासनं पोराला पोटाशी धरलंस…माज्या पोटाला करून घातलंस.. “

“आरं, माजे म्हातारीचं आसं किस्तं दिस ऱ्हायल्यात पोरा. आरं, मी काय जन्माला पुरणार हाय व्हय ? “

” कोण कुणाच्या जन्माला पुरतं आज्जे ? माझी रखमी कुठं पुरली  ? “

” आरं, पोरा, जाउंदेल , सोड त्यो इशय..”

” कसा सोडू ? माणूस मेल्याव ‘मेलं ‘ म्हणून रडून मोकळं हुता येतं..त्यो कुठं गेलाय हे ठावं असतं.. गेलेला आता कवाच माघारी येणार न्हाय ह्येबी ठावं असतं. पर रखमी ?  रखमी हाय.. पर कुठं , कशी ? काय बी ठावं न्हाय ? आज्जे, ती हात धरून कुणासंगं पळून जाणाऱ्यातली बाय न्हाय ही ठावं हाय मला. मग ती गेली कुठं ? पोटच्या तान्ह्या पोराला टाकून जाईलच कशी ती ?  ती कुठं गेली न्हाय मग मला सांग.. माझ्या रखमाचे काय झालं ? “

सदाच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी येऊ लागले होते.. साचलेला बांध फुटला होता. बापाला रडताना पाहून पोर घाबरून बायजाज्जीला बिलगले होते. त्याला घट्ट जवळ घेऊन बायजाने डोळ्यांना पदर लावला..

सदाच्या, बायजाच्या डोळ्यांतील एकेक थेंब जणू अवघ्या भवतालाला, ज्याचे उत्तर मिळत नव्हतं असा एकच प्रश्न विचारत होता..

‘ रखमाचं काय झालं … ?’

‘रखमाचं काय झालं…?’

‘रखमाचं काय झालं…?

समाप्त 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रखमाचं काय झालं ? – भाग-4 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-4 ☆ श्री आनंदहरी 

रखमाचा काहीच मागमूस लागला नव्हता. रात्रभर सदाचा डोळा लागला नव्हता. मनातील शंका -कुशंका थांबत नव्हत्या. मनात उलट-सुलट नाना विचार येत होते पण नुसता विचारांचा गोंधळ होत होता. पहाटे दूध तापवून, झोपलेल्या तान्ह्या बाळाला घरात एकटं टाकून, घराचे दार नुसते ओढून घेऊन रखमा कुठे आणि का गेली असेल ? ती स्वतःहून कशी जाईल ? मग..तिला कुणी  जबरदस्तीने नेली  असेल  का ? पण कुणी आणि का ? जर कुणी तिला जबरदस्तीने नेले असे म्हणावे तर त्यावेळी तिने आरडाओरडा का केला नाही ?

पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला सदा गेला. तिथेही याच निरुत्तर करणाऱ्या प्रश्नानंतर पोलिसांचा सदालाच प्रश्न… ‘ रखमा ला का मारलेस ? ”  पोलिसी खाक्याने सदाला सारे विचारून झाले. आधीच रखमाच्या  जाण्याने गलितगात्र झालेल्या सदाला मरणप्राय वेदना झाल्या.  अनेक लोक, अनेक पावसाळे पाहिलेली बायजाआज्जी सोबत आली होती ती सदाचा पुन्हा एकदा आधार झाली होती.

पोलिसांच्या समोर संशयित म्हणून एकमेव नाव होतं ते सदाचे.. त्या दिशेने तपास सुरू झाला.. घराची झडती घेतली, काना- कोपरा तपासला, वस्तू न वस्तू विस्कटून पाहिली.. हाती काहीच लागले नाही.  घरा पासून जाणारा रस्ता चौकात जाणारा.. जवळचा सीसीटीव्ही म्हणजे चौकातला.. त्या सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये रखमा एकटी किंवा कुणासोबत कुठे जाताना दिसत नव्हती.चौकातून रात्रीपासून सकाळपर्यंत फार तुरळक वाहने जाता-येताना दिसत होती पण त्यात संशयास्पद असे  पोलिसांना काहीही आठळले नव्हते. सदावरचा संशय आता जास्तच दृढ होत होता… पण त्याने रखमाला मारल्याचा कोणताही पुरावा सापडत नव्हता…रखमाचा मृतदेहही सापडत नव्हता..  पोलिसांनी अनेकवेळा  त्यांच्या पद्धतीने सदाची चौकशीही केली पण सदाचे एकच उत्तर होते.. आणि ते खरेही होते.. सदाला रखमाबद्दल काहीही माहिती नव्हते. तो संध्याकाळी सहा वाजता डबा घेऊन रात्रपाळीला कामावर गेला होता व सकाळी आठ च्या दरम्यान परतला होता.

चौकातल्या तसेच त्याच्या कामावर जाण्याच्या मार्गावरच्या सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये तो जाताना , येताना दिसत होता. त्याच्या कामाच्या ठिकाणच्या कॅमेऱ्याचे  फुटेजही पोलिसांनी तपासले होते. त्यात ही तो रात्रभर कामावर असल्याचे दिसत होते.. दोन -चार मिनीटाहून जास्त तो कॅमेऱ्याच्या बाहेरही नव्हता.. किंवा आवर्जून कॅमेऱ्यात राहण्याचा प्रयत्नही करत असल्याचेही जाणवत नव्हते.. त्याचे फोन रेकॉर्ड तपासायला त्याच्याकडे फोनच नव्हता. पोलिसांनी त्याच्या विषयी गल्लीत, मित्रपरिवारात, कामाच्या ठिकाणी चौकशीही केली..  सदा सरळ, साधा, कष्टाळू, आपण बरे आपले काम बरे अशा वृत्तीचा होता.  जसजशी सदाबद्दलची माहिती मिळत गेली तसतसा सदा पोलिसांच्या संशयितांच्या यादीतून मुक्त होत गेला. सदाने काहीही केलेले नाही याची पोलिसांना खात्री पटली आणि… रखमाचे नेमकं काय झाले ? हा प्रश्न पुन्हा अनुत्तरितच राहिला..

रखमा जणू हवेत अदृश्यच झाली होती.. पोलिसांनी वेगवेगळ्या बाजूनी कसोशीने तपास करून पाहिला होता. गल्लीत अनेकच्याकडे चौकशी केली होती..तपास केला होता.   पोलिसांनी अगदी रखमाच्या माहेरीं जाऊन, तिच्या लग्नाआधीपासूनचा तिचा भूतकाळ आणि लग्नानंतरचा भूत आणि वर्तमानकाळ अगदी बारकाव्याने, कसोशीने तपासून पाहिला. त्यांना रखमाबद्दल कुठेही वावगा शब्द ऐकायला मिळाला नाही की कुठे कधी शंकास्पद आढळले नाही. पोलिसही चक्रावून गेले होते.. एक व्यक्ती अशी गायब झाली होती की जणू ती कधी अस्तित्वातच नसावी.. कुठलाच मागमूस नव्हता.. कुठलेच धागे-दोरे गवसत नव्हते.. रखमा होती आणि ती गायब झाली होती हे आणि एवढंच मात्र अगदी खरे होते.. पण ती गायब झाली ते नेमके कधी ? नेमकी  कशी ? नेमकी  कुठे ? दिशा गवसत नव्हती.. नेमकेपणाने काही कळत नव्हते.. सांगताही येत नव्हते.. तपासाचा प्रवास जिथून सुरु होत होता तिथंच येऊन थांबत होता… प्रत्येकवेळी.

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रखमाचं काय झालं ? – भाग-3 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-3 ☆ श्री आनंदहरी 

सदा दिवसभर पायाला भिंगरी लावल्यासारखा रखमाचा शोध घेत फिरत होता.. सगळ्या पाहुण्या-पै कडे,  परिचितांकडे चौकशी करून झाली.. रखमाच्या माहेरी चौकशी करताच तिची आई आणि भाऊ लगोलग घरी आले होते.  फिरून फिरून दमला – भागलेला सदा हताश होऊन घरी परतला तेव्हा दारात सगळी गल्ली गोळा झालेली होती.. प्रत्येकजण दुसऱ्याजवळ  कुजबुजत होता.. सदाने दारात पाऊल टाकले तशी त्याची सासु रडत ओरडत त्याच्याकडे धावली.. ‘ या मुडद्यानंच माझ्या लेकीचं कायतरी बरं वाईट केलं असणार.. माझी गुणाची ती लेक.. ह्येनं.. ह्येनंच मारली असणार तिला.. ‘  बायजा तिला अडवायला, थांबवायला  पुढे सरसावली तोवर रखमाचा भाऊ पुढं झाला होता आणि त्याने आईला थोपवायचे सोडून तिचीच वाक्ये म्हणत सदाला बडवायला सुरवात केली होती.. सदा आधीच रखमाच्या अचानक गायब होण्याने गांगरून गेला होता.. त्याला नेमकं कोण काय म्हणतेय ते ही समजत नव्हते.. या अचानक हल्ल्याने  तो पुरता गोंधळून गेला होता.. बायजाने सदाच्या सासूला मागे ओढली.. गल्लीतलेच कुणीतरी मध्ये पडून रखमाच्या भावाला सदापासून दूर नेऊन सदाची सुटका केली होती.

” काय बोलतायसा पावनीबाय ? त्यो कशाला करील आसं ?.. अवो, त्यो गेलावता रातपाळीला.. सकाळच्या पारी घरला आला तवा त्येला समाजलं.. रखमा न्हाई ती. “

बायजा रखमाच्या आईची समजूत काढू लागली होती. वातावरण एकदमच बिघडून गेलं होते.. बाहेर चर्चेला वेगवेगळे धुमारे फुटायला लागले होते. लोकांना चघळायला आणखी एक विषय मिळाला होता..

 ” व्हय रे सदाने मारली आसंल रखमाला ? मला तर  ही काय पटत न्हाय बाबा ..”

 ” तेच्यात न पटण्याजोगं काय हाय ? “

 ” आरे, सदा गरीब हाय.. मुंगीबी मारायचा न्हाय कवा.. आन वाईच सदाकडं बग तरी… रखमा सकाळधरनं न्हाय तर पार कोलमडून गेलाय ? “

” आरं, ही समदं दाखवायचं दात असत्यात..  आरं, रखमीची आयच म्हंतीया.. भाव बी म्हंतुय म्हंजी कायतरीं आतली धुसफूस ठावं असणारच त्यासनी.. उगा कोनबी जावाय पावण्याला असे म्हनल का चार लोकांत..? “

” आरं पर त्यो तर रातपाळीला कामाव हुता न्हवका  ? “

” आरं तकडं हजरीं लावून मदनंच येऊन मारलं आसंल..बॉडी कुटंतरी दिली आसंल टाकून..आन गेला आसंल पुन्यांदा कामाव.. आरं, पोलीसांस्नी अशी लय घावल्यात.. कामाव असूनबी खून केल्याली..मी तर म्हंतो,  तसंच असणार .. न्हायतर मला सांगा सदा आजूनबी पोलिसात का ग्येला न्हाई ? “

” आरं, पर कशापायी मारंल त्यो ? कवा भांडान बी न्हाई ऐकू आले तेच्यातलं.. आरं, त्येंचा तर लय जीव हुता एकमेकाव.. छया s छयाss उगा आसलं कायबी बोलण्यात अर्थ न्हाय..”

रखमा गेली कुठं ? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकजण आपापल्या मनानुसार आखाडे बांधून शोधत होता.. आपल्याला वाटतंय तेच खरं आहे असे वाटून दुसऱ्याला ठासून सांगून पटवण्याचा प्रयत्न करत होता.. तेच वाक्य मीठ-मिरची लावून एकाकडून दुसऱ्याकडे जात होते..  चर्चेचे, अंदाजांचे, अफवांचे पेव फुटले होते. त्यातल्या कुणालाच रखमाच्या जाण्याचे दुःख नव्हते की सदाबद्दल, त्याच्या लेकराबद्दल दया, आपुलकी नव्हती.  सदाची सासरची मंडळी पण तशीच.. सदाला दोष देऊन रिकामी झाली होती.. सदा हताश झाला होता.. फक्त बायजा म्हातारी एकीकडे पोराला सांभाळत होती.. दुसरीकडे सदाला धीर देत होती.. त्याच्या पाठीशी खंबीर उभी होती.. रात्र झाली तरी रखमाचा पत्ता नव्हता..ती आलीही नव्हती आणि तिचा कुठे मागमूसही लागला नव्हता.. सदा पार कोलमडून गेला होता.. नेमके काय झाले असावे..? काहीच समजत नव्हते. तर्क-वितर्क सुरूच होते.. निरागस पोर दूध पिऊन झोपले होते. सदा शून्यात नजर लावून बसून होता.. बायजाने आग्रह करूनही त्याने दोन घास खाल्ले नव्हते.  थकलेली बायजा तिथंच पोराजवळ कलंडली पण मनात प्रश्न खदखदत होते..’रखमा अशी अचानक गायब कशी आणि का झाली असेल ? तिच्याबाबतीत नेमकं काय झाले असावे ? ती कुठं असेल ? कशी असेल ? तिला कुणी कशी आणि का नेली आसंल ?’

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रखमाचं काय झालं ? – भाग-2 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-2 ☆ श्री आनंदहरी 

बायजा म्हातारी एकीकडे पोराच्या मायेने भिजत होती, दुसरीकडे भाजी विकायचा खोळंबा झाल्याने मनातल्या मनात चरफडत होती. मधूनच तिला रखमाचा, सदाचा राग येत होता तर कधी मनात त्यांच्याबद्दल नाना शंका-कुशंका येऊन काळीज कुरतडून निघत होते. ती पोराजवळ बसून त्याला थोपटत असली तरी तिची नजर दारातून बाहेर दूरपर्यंत रेंगाळत होती .. दूरवर कुणी दिसले की तो सदाच असणार किंवा रखमाच असणार असे वाटून  मनात आशा पल्लवित होत होत्या.. दुसऱ्याच क्षणी ते दुसरेच कुणीतरी आहे याची जाणीव झाली की मन कोंबडीवानी खुडूक होत होते. तिची नजर रस्त्यावरून वळून पोराकडे जात होती अन तिथेच थबकत होती.

पोराकडे पाहिले की मनातले सारे विचार क्षणकाळासाठी का होईना गळून पडत होते आणि मुलावरची माया मन भरून टाकत होती.. मायेने पोराला थोपटत असतानाच अचानक तिची नजर दरवाज्यातून बाहेर गेली.. दूरवर सदासारखाच कुणीतरी येताना दिसला..  तिची नजर त्याच व्यक्तीवर खिळून राहिली होती.. ती व्यक्ती काही अंतर पुढे आल्यावर तिला तो सदाच असल्याची खात्रीं पटताच बायजाची नजर त्याच्या अवतीभवती रखमाला शोधू लागली.. रखमा काही दिसेना..

‘ संगं रखमा न्हाई.. सदा एकलाच हाय..काय झालंय पोरीला कुणाला ठावं.. ? आजारली आसंल म्हणून दवाखान्यात तर ठेवली नसंल..? पर तसं आसतं तर पोराला एकल्याला घरात सोडून नसती गेली दवाखान्यात.. संगती नेलं असतं.. दवाखान्यात न्हाय तर मग रखमा हाय कुठं ?.. ‘ मनात नाना विचार येऊन गेले..

सदा दारात आला. हातात जेवणाच्या डब्याची पिशवी पाहून बायजा काहीशी चक्रावलीच.. ‘ म्हंजी.. सदा रातपाळी करून आलाय कामावनं..  मग रखमा कुठं हाय ? ‘ 

” बायजाज्जी तू ? येरवाळचा बाजार सोडून तू कशी इथं ?   पोराला बरं न्हाय काय ? आन रखमा कुठं गेलीया .. औशिद आणाय गेलीया व्हय ? काय झालंय पोराला.. सांच्यापारी तर ब्येस खेळत हुता.”

बायजाला बाजार सोडून पोराजवळ थांबलेलं बघून काळजी वाटून सदाने विचारले.. पटकन हातातली डब्याची पिशवी तिथंच खिळ्याला अडकवून  तो  पोराजवळ बसला. बायजाला काय उत्तर द्यायचं आणि कसे उत्तर द्यायचं ते क्षणभर समजेचना..

” उगा नगं काळजी करू.. पोरगं बरं हाय .  थांब वाईच पाणी आणून देते. हातपाय तोंड धू… “

तिने आतून पाण्याची कासांडी आणून दिली.

” पर रखमा हाय कुठं ?”

त्याच्या प्रश्नाला उत्तर न देताच ती झटकन आत गेली आणि तिने चहाचे आदण ठेवले. सदाला पिण्यासाठी तांब्याभर पाणी आणून बाहेर ठेवले. आणि चांगला कप कपभर चहा घेऊन बाहेर आली. 

  ” आज्जे , पर रखमा …?

” च्या पे आदी.. गार हुईल ?”

 चहा पिऊन झाल्यावर तिने विचारले,

” सदा, काल तुझं न तिचं भांडान झालंवंतं काय रं ? “

” न्हाय.. पर अशी का ईचारतीयास ? “

“आरं, येरवाळच्यानं रखमा घरात न्हाई.. मी बाजारला जाया निघालेवते, पोराचं रडणं ऐकाय आलं.. रखमाला दोनचार हाळ्या मारल्या.. एक न्हाय न दोन न्हाय.. इवून बघतीया तर दार निस्तं फुड केलेलं…”

बायजाने सदाला सुरवातीपासूनचे सगळे सांगितले तसे त्याला रखमाची जास्त काळजी वाटू लागली. विचार करकरून डोके फुटायची वेळ आली. मनात येणारा एकेक विचार मनच रद्द करीत होते.. एवढ्याशा पोराला घरात एकटे टाकून कोणतीही माऊली कुठे जाईलच कशी ?  मग रखमा कुठे गेली ? कशी गेली ?कधी गेली ? आणि सर्वात महत्वाचे का गेली ? सारे निरुत्तर करणारे प्रश्न.. मनात खदखदत असताना, कुठल्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नसताना बायजाच्या मनात प्रश्न आला.. ‘ रखमाला कुणी पळवून तर न्हेलं नसंल न्हवं ? ‘ 

मनात प्रश्न आला आणि बायजा अस्वस्थ झाली. मनातली शंका सदाजवळ व्यक्त करावी की नको अशी तिची द्विधा मनस्थिती झाली. तिचे मन स्वतःशीच मनातील कुशंका पडताळून पाहू लागले. रखमा तरुण होती, देखणी होती.. पण एका तान्हुल्याची आई होती.. पण एखादा नजर ठेवून पळवून न्हेणारा असेल तर.. त्याला तान्हुल्याशी काय देणं घेणं असणार म्हणा.. पण कुणी पळवून नेत असताना रखमाने आरडा-ओरडा केला असता .. सगळी गल्ली गोळा केली असती.. मग ती स्वतःहूनच गेली असेल काय ?  बायजाच्या मनात आलेली, ‘ ती स्वतःहून पळून जाण्याची शंका’  तिने स्वतःच धुडकावून लावली. ती रखमाला चांगलेच ओळखत होती… मनात नाना शंका – कुशंका येत होत्या आणि त्या चुकीच्या वाटून रद्दही होत होत्या.. पण एक अनुत्तरित प्रश्न मात्र मन पोखरत होता, मग नेमके तिचे झालंय काय ?

बायजा स्वतःच्या विचारांच्या नादात असतानाच अचानक तिचे सदाकडे लक्ष गेले..  तो काहीच न सुचून,  गुडघ्यात तोंड खुपसून हताश होऊन रडत होता. बायजा उठली . त्याच्या पाठीवर हात ठेवून धीर देत म्हणाली,

” आरं , असे बसून कसे चालंल.. रखमाचा तपास कराय नगं..? ती कायतरी कारणाने म्हायेराला गेली हाय का ते बगाय पायजेल.. उठ..  असा बसून नगं ऱ्हाऊस.. मी हाय पोरापाशी “

माहेरी जाण्याचा मुद्दा बायजाला स्वतःलाच पटला नव्हता तरी तिने त्याला हताशपणातून बाहेर काढण्यासाठी उगाचच त्याला सांगितला होता…

त्याच्या मनात आशेचा काजवा टिमटीमला असावा.. तो झटक्यात उठला आणि बाहेर पडला.

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रखमाचं काय झालं ? – भाग-1 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-1 ☆ श्री आनंदहरी 

बायजा म्हातारी सकाळीच हातगाड्यावर भाजीची पहिली पाटी ठेवत असतानाच तिला सदाच्या घरातून त्याच्या पोराच्या रडण्याचा आवाज आला पण सगळ्या पाट्या ठेवून हातगाडी सकाळी लवकरच मंडईच्या कोपऱ्यावर उभी केली तरच भाजीचा खप चांगला होत असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले . शिवाय लहान पोर झोपेतून उठल्यावर जवळ आई नाही म्हणल्यावर रडायचंच ,असाही तिने विचार केला होता. ,घरातल्या बाईची सकाळी किती तारांबळ उडते हे तिला ठाऊकच होते.. आणि रखमा, सदाची बायको त्याच तारांबळीत असणार हे ही ती जाणून होती.

हातगाडीवर भाजीच्या सगळ्या पाट्या, कोथिंबिरीचं पोतं, वजनकाटा सारं व्यवस्थित ठेवेपर्यंत नाही म्हणलं तरी अर्ध्या तासाहून जास्त वेळ गेलाच.. त्या गडबडीत पोराचं रडणे थांबले – नाही थांबले याकडे तिचे लक्षही नव्हते पण जसे सारे आवरले आणि मंडईत जाण्यासाठी ती हातगाडी ढकलणार इतक्यात सदाचं पोर अजूनही रडत असल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिला आश्चर्य वाटले. तिने हातगाडी ढकलायची म्हणून काढून हातगाडीवरच ठेवलेली चाकाची घूण्याची दगडे परत चाकांना लावली आणि ‘ रखमा s ए रखमा ss !’ अशी हाळी मारत सदाच्या घराकडे निघाली. पुढे लोटलेले दार उघडून ती आत आली तर वाकळंवर पोर रडत होते. घरात कुणाचीच चाहूल लागेना. तिने बाहेर येऊन रखमाला हाका मारल्या..  सदालाही हाका मारल्या. पण कुणाचेच प्रत्युत्तर आले नाही तशी  बायजा म्हातारी परत घरात गेली. पोराला उचलले. पोर भुकेलेलं आहे हे जाणवताच तिने चुलीकडे पाहिले. चुलीपुढे निखाऱ्यावर दुधाचे पातेले होते. अजून दूध जरासे कोमटच आहे हे लक्षात येताच तिने वाटीत दूध काढले आणि पोराला मांडीवर घेऊन चमच्याने पाजायला सुरवात केली. दूध पोटात जाऊ लागले तसे पोर रडायचे थांबले. तिने त्याला पोटभर दूध पाजताच पोर पूर्ण शांत झाले.. तिने त्याला परत वाकळंवर ठेवताच पोर हातपाय हलवत खेळू लागले. तिने वाटी-चमचा चुलीजवळ ठेवला. पोर शांत झाले तसे तिच्या मनात परत रखमाचा, सदाचा विचार आला..

‘ येवढ्याशा पोराला घरात ठिवून दोगंबी कुणीकडं गेलं आस्तिली ? ‘

तिच्या मनात प्रश्नाचे, विचारांचे आणि काळजीचं वादळ उगाचंच भिरभिरु लागले होते.  तिने पोराकडे नजर टाकली. पोर आपल्याच नादात खेळत होते. ती दाराशी आली अन तिची नजर तिच्या भाजीच्या गाड्याकडे गेली तशी तिच्या काळजीत आणखीनच भर पडली. ‘आधीच भाजी विकायला जायला उशीर झाला होता.. आणखी उशीर झाला तर भाजी विकली जाणार नव्हती.. पालेभाजी नाशवंत माल.. विकली गेली नाही तर त्याचे पैसे अंगावर पडणार होते.  आधीच भाजी विकून कशीतरी हाता-तोंडाची गाठ पडत होती.. त्यात भाजीचे पैसे अंगावर पडले तर मग काही बोलायलाच नको.. ‘ तिच्या मनात विचार आला. तिला भाजी विकायला जावेच लागणार होते पण पोराला एकटं टाकून ती जाऊ शकत नव्हती..  त्यात रखमाचा, सदाचा पत्ताच नव्हता.. पोराला असे एकटं टाकून तिचा पायच निघाला नसता. वस्तीतील शेजारपाजारच्या घरातील बाया-माणसे येरवाळीच कामाला जात असल्याने घरांना कुलपंच होती.. एखादं -दुसरे पोर गल्लीत खेळत असले तरी पोरा-ठोरांच्या ताब्यात इवल्याशा पोराला देऊन ती जाऊ शकत नव्हती..गल्लीत टोकाच्या घरात एक म्हातारा होता पण तो स्वतःलाच सांभाळू शकत नव्हता. तो त्या इवल्याशा पोराला काय सांभाळणार ?

मनातल्या मनात ती वस्तीतल्या सगळ्या घरातून डोकावून, घर न् घर पाहून आली होती. काय करावे ते तिला सुचेनासे झाले होते.. ‘ आत्ता रखमा येईल, सदा येईल ,ते आले की आपण जाऊ.. भाजी कमी विकली जाईल पण जेवढी विकली जाईल तेवढंच नुकसान कमी..तेवढाच डोईवरला बोजा कमी.. ‘ असा विचार तिच्या मनात येत होता.. ती आतुरतेने रखमाची, सदाची वाट पहात होती. हळूहळू तिची सहनशक्ती कमी होत चालली होती..

” येवढ्या येरवाळचं कुनीकडं उलथलीत दोगंबी..? येवंडंसं प्वार घरात ठेवलंय..आय-बा हायती का कोण ? आसं कोण प्वार घरात ठिवून जातं व्हय ? कुणीकडं जायाचं हुतं तर पोराला संगं न्ह्याचं.. “

बायजा म्हातारी स्वतःशीच बडबडत अस्वस्थतेने आत-बाहेर फेऱ्या घालत होती. खेळता खेळता पोर परत झोपी गेले होते..

‘प्वार झोपलंय, दार वडून घिऊन जावं का बाजारात ? ‘

तिच्या मनात विचार आला..

‘ बायजे, येवड्याश्या पोराला येकलं टाकून जायाचा इचार करतीस, माणूस हायस का कोन ? प्वार पुन्यानदा उठलं म्हंजी ? ‘

‘आगं, पर आज भाजी न्हाय इकली तर नासुन जाईल, त्येचा पैसा अंगावं पडंल.. समदी नुक्सानीच की..’

‘ व्हय पर माणुसकी हाय का न्हाय काय ? आन तशीबी दोन दिस उपाशी ऱ्हायलीस तर काय मरत न्हाईस .. ‘

ती अस्वस्थतेत स्वतःशीच बोलत होती.. इतक्यात पोराची झोप चाळवल्याचे तिला जाणवले.

” प्वार उठतंय का काय ? “

ती पोराजवळ वाकळंवर येऊन बसली.. आणि त्याला थोपटू लागली..

‘ रखमा-सदाचं काय वाईट-वंगाळ तर झालं नसंल न्हवका ? ‘

पोराला थोपटता थोपटता मनात आलेल्या विचाराने ती दचकली.

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गुंफण नात्यांची – भाग 6 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ गुंफण नात्यांची – भाग 6 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

आईच्या अगदी विरुद्ध टोकाचे विचार आहेत लेकीचे. काय काय ऐकायला आणि पाहायला मिळणार देव जाणे! बघता बघता तन्वीची परीक्षा संपली आणि घरामध्ये ट्रीपचे वातावरण तयार झाले. कपड्यांची बॅग, खाण्याची बास्केट, पाण्याचा कॅन, थोडीफार औषधं. नाही नाही म्हणता दोन मोठ्या बॅग्ज झाल्याच. शिवाय तिघींच्या पर्सेस. तन्वीच्या आईनं प्रवासाची चोख व्यवस्था केली होती. संपूर्ण ए.सी.चे रिझर्वेशन असल्यामुळे आरामच आराम होता. प्रवासात तन्वीचा चिवचिवाट सुरूच होता. मोठ्या मजेमध्ये आणि आनंदात प्रवास सुरू होता. तिघीजणी प्रसन्न होतो. दक्षिण भारतातली मोठीमोठी मंदिरं, अथांग समुद्रकिनारे, मोठमोठाली प्राणी संग्रहालयं, हिरव्यागार बागा बघून हरकून गेलो होतो. कन्याकुमारीचे स्वामी विवेकानंदांचे स्मारक बघून मला आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले होते. लेकीवर असलेली नाराजी समुद्राच्या लाटांबरोबर केव्हाच मागे पडली होती. तिघींची मनं आनंदानं तृप्त झाली होती..

आता परतीचा प्रवास सुरु झाला होता. प्रवासाचा शीण आला होता. थोडाफार थकवाही आला होता. पण त्या रम्य आठवणी मनामध्ये सतत रुंजी घालत होत्या. समुद्राच्या लाटा, त्यांचा मखमली स्पर्श, सूर्यास्त आणि सूर्योदयाचे अलौकिक सौंदर्य, काय पाहिजे आता आयुष्यात?

कुठल्याशा एका स्टेशन वर त्यांच्या बोगीमध्ये तन्वी एवढाच एक मुलगा आणि त्याचे बहुदा वडील असावेत ते आले. झालं तन्वीला ओळख करून घ्यायला काही वेळच लागला नाही. ती सफाईदारपणे इंग्रजी बोलत असल्यामुळे भाषेचा अडसरच आला नाही. हिची आई आणि त्याचे बाबा लॅपटॉप वर आपले काम करण्यात गुंग होऊन गेले. आजी आपल्या नाती वर लक्ष ठेवून होत्या. नुसतेच लक्ष नाही तर करडी नजर ठेवून होत्या.

कार्टी किती मोकळेपणाने बोलतेय त्याच्याशी, ओळख ना पाळख. पण अगदी हातावर टाळी देऊन काय हसायचे? छे! हल्लीची मुलं फारच थिल्लरपणाने वागतात. दोघांनी आपापले फोन नंबर्स एकमेकांना दिले. नंबर सेव्ह करून झाल्यावर रिंग होते का चेक करून झालं. काय बोलत होते कोण जाणे? पण अखंड टकळी चालू होती दोघांची. आजी मात्र दोघांवर करडी नजर ठेवून होत्या.

बहुदा तो आणि त्याचे वडील उतरणार होते. त्याच्या वडिलांनी लॅपटॉप बंद केला. त्या मुलांनीही आपल्या पाठीवर सॅक अडकवली.

“बाय तन्वी, सी यू. वुई विल मीट ऑनलाइन, अँड बाय मोबाईल ओके? आय एम व्हेरी ग्लॅड टुडे. आय थँक गॉड फाॅर गिविंग मी अ व्हेरी स्वीट सिस्टर लाईक यू. बाय!” असं म्हणत हातानं बाय बाय करीत तो खाली उतरला.

मी तन्वीकडे पाहिलं. ती पण हलक्या हातांनी आणि भरल्या डोळ्यांनी त्याला निरोप देत होती. पटकन उठून माझ्याजवळ आली.

” आजी, काय छान भाऊ मिळाला बघ मला या प्रवासात. अगं तो के. प्रसाद त्याला पण ना, मला बघितल्यावर बहिण असावी तर अशीच, असंच वाटलं. त्यालाही खूप फ्रेंड्स आहेत पण बहीण नाही. किती छान ना! आता आम्ही भेटणार सारखं नेटवर. फोनही करणार. आजी, मी पण आज खूप आनंदात आहे.”

उमललेल्या टवटवीत फुलासारखी स्वच्छंदी आणि आनंदी तन्वीला बघून आजीच मन भरून आलं. अजून सगळीकडे वाळवंट झालं नाही. अशी हिरवळ कुठेतरी उगवते आहे. नात्यांची गुंफण अजूनही फुलते आहे. वरवर रुक्षपणा जाणवत असला तरी आत कुठेतरी ओलावा आहे. आपल्या नकळत तो झिरपतो आहे. महिला राज्याचा गर्व किती जरी महिलांना वाटत असला तरी हा भावनिक आधारही तिला हवा आहे. हे नातं पूर्ण जळून खाक झालं नाहीये. कुठेतरी धुकधुक आहे. आपल्यासारख्यांनीच त्यावर फुंकर घालायला पाहिजे. त्याची जपणूक करायला पाहिजे. त्याचा ओलावा टिकवून ठेवला पाहिजे. त्याला प्रेमाचं पाणी घालायला पाहिजे.

तन्वीचा हात थोपटत आजीनं मनाशी निर्धार केला.

समाप्त 

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गुंफण नात्यांची – भाग 3 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ गुंफण नात्यांची – भाग 3 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

ट्रीपला जायच्या आनंदात तन्वी आवरुन पटकन झोपली सुद्धा. तन्वी ची आई आपल्या खोलीत तन्वी पलीकडच्या कॉटवर. आजीला काही झोप येईना. काय म्हणावं या पोरीला? आता माझी मुलगी म्हणून पोरीला म्हणायचं नाहीतर चाळिशीला आलेली बाईच की ही. सगळं आपलं आपणच ठरवते आणि अंमलातही आणते. विचारणं नाही, परवानगी मागणं दूरच. आपलीच मुलगी पण आपल्यातला बुजरेपणा थोडासा ही तिच्यात नाही. नाहीतर लहानपणापासून ही धीटच. कशाला म्हणून घाबरायचं नाही. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये तिच्या या स्वच्छंदी स्वभावाला खतपाणी मिळालं. मुलगी म्हणून मार्दव काही नाहीच. कॉलेजमध्ये प्रत्येक गोष्ट मुलांच्या बरोबरीने करायची. इतकं बिनधास्त वागणं तर मला आवडायचं नाही. पण मला विचारतच होती कुठं ती? उलट मलाच ती सुनवायची, “आई, का गं सहन करीत बसतेस? आजी काही बोलते तुला? किती काम करून घेते तुझ्याकडून. करणार नाही म्हणून ठासून सांगत जा ना. बाबा सुद्धा किती गृहीत धरतात तुला. कशाला ऐकतेस सगळ्यांचं?” धाड धाड तोफेतून गोळे सुटल्यासारखी बोलायची. आता कसं समजवायचं हिला? अगं यालाच तर संसार म्हणतात. आजी कामे सांगते पण त्यामुळे तर आपलं घर व्यवस्थित चालतं ना?.. बाबांचं म्हणशील तर त्यांना बाहेर काम करायचं असतं. तिथं काहीतरी मनाविरुद्ध घडलं तर त्याचा राग थोडा वेळ माझ्यावर काढतात. बस्स इतकंच. एवढं कशाला मनाला लावून घ्यायचं? पण ही नवी पिढी पुरुषांच्या बरोबर नाही; त्यांच्यापुढे चार पावले टाकण्यात धन्यता मानणारी, इतरांना तुच्छ लेखणारी. कसं व्हायचं हिचं? मला काळजीच होती.

शिक्षण झाल्यावर धडपड धडपड करून कुठलासा कोर्स केला, परीक्षा दिली आणि मनासारखी नोकरी सुद्धा लागली. म्हटलं, “हुश्श, आता हिच्या लग्नाचा विचार केला पाहिजे. मी माझ्या परीने हालचाल सुरू केली. मात्र हिनेच आमच्या समोर बाॅम्बस्फोट केला.”

“आई, बाबा, तुम्ही माझ्या लग्नाची खटपट करताय; पण माझा निर्णय मी घेतलाय. मी लग्न करणारच नाहीये. मला तो विचारच पटत नाही. इतकी वर्ष तुमच्याबरोबर राहिले का म्हणून आता दुसऱ्याच्या घरी जाऊ? मला अजिबात मान्य नाही ते. मी तुमच्याबरोबर राहणार, तुमची सेवा करणार. सारखा सारखा लग्नाचा विषय काढला तर मी दुसऱ्या गावाला बदली करून घेईन आणि तिकडे राहीन.” असं तिनं सांगितलं आणि खरोखरच सहा महिन्यांनी तिनं आपली बदली करून घेतली. एकटीच तिकडे जाऊन राहायला लागली.

एकटीच राहते म्हणून कसं व्हायचं हीचं? ही काळजी करण्याचं कारणच नव्हतं. हिच्यामुळं कुणाला त्रास होणार नाही ना? असंच मला वाटायचं. शनिवार-रविवार घरी यायची. आम्हा दोघांना काय काय आणायची. बाबांना बी.पी.चा त्रास सुरू झाला म्हणून बी.पी. चेक करायचे मशीनच घेऊन आली. मला भारीपैकी स्वेटर काय, शेकायची पिशवी काय, काही विचारू नका. एकदा भारीपैकी मोबाईल आणून दिला आम्हाला. त्यावर स्वतःचा नंबर, काही पाहुण्यांचे, ओळखीच्यांचे नंबर फीड करून दिले. तो वापरायचा कसा ते आम्हाला शिकवलं. एक मुलगा काय करेल; तसं आमचं ती करत होती, इतकंच समाधान होतं. पण रुखरुख होतीच होती. आता ठीक आहे. आमच्या माघारी कोण जीव लावणार हिला? लग्न म्हणजे फक्त बंधनच वाटतं हिला? त्या बंधनात सुद्धा आपुलकी असते, चांगली भावना असते हे कसं कळत नाही? याबाबतीत कधी शहाणी होणार? ऑफिसमध्ये कुणी भेटला तर बरं होईल. मला आपली वेडी आशा वाटत होती.

क्रमशः…. 

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर ८४८२९३९०११

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print