मराठी साहित्य – जीवनरंग ☆ इव्हेंट.. ☆ सुश्री स्वप्ना मुळे

? जीवनरंग ?

☆ इव्हेंट.. ☆ सुश्री स्वप्ना मुळे  

“नले काय कमाल झाली ग तुझी?? ह्या वयात तू ही त्या पोरांसोबत खुशाल गाण्यावर थिरकली काय,.. परवा त्या मेहंदीच्या कार्यक्रमात हाताभर मेंदी काढलीस,..शोभत का आपल्याला ह्या वयात आणि काल तर नातू म्हणतोय आजी अशी पोज दे तर लगेच त्याच्या मैत्रिणींसोबत काढलास तसा तोंड माकडासारखे करून फोटो कमाल आहे हं तुझी,म्हणत सुशीने नेहमी प्रमाणे नलीला सुनावलंच,..पण या वेळी नेहमी प्रमाणे नली गप्प नव्हती,..तिने सुशीला हात धरत कालच्या टेरेसवर नेलं,….जिथं काल मेंदी प्रोग्रॅम रंगला होता,..तिथं नलीने बनवलेल्या लोकरीपासून बनवलेले लटकन सगळीकडे वाऱ्यावर डोलत होते,..त्यात अडकवलेल्या बारीक घंटा वाऱ्याने किणकिण करत होत्या,….नलीच्या माहेरचं ताब्यांच जड घंगाळ लक्ख करून त्यात दिवे सोडलेले होते पाण्यावरचे,..भोवती मोगऱ्याची टपोरी फुल त्या मिणमिणत्या प्रकाशासोबत मंद सुगंध पसरवत होती,..नलीने सुशीला त्या घंगाळजवळ बसवलं आपला थरथरता हात त्यावर फिरवत म्हणाली,..”तुला आठवतं हे आईने हट्ट करून मला रुखवंतात दिलं होतं,..काही दिवस ते सासरी मिरवलं हळूहळू काळवंडायला लागलं,.. तसं सासुबाई त्याला घासण्यासाठी माझ्या मागे लागायच्या,..सगळ्यांच्या अंघोळी झाल्या की एक दिवस त्याला तासभर घासत बसावं लागायचं,.. जीव चिडायचा वाटायचं कशाला दिलं आईने हे त्रासदायक घंगाळ मला,..??पुढं लेकरं बाळ आयुष्यात आली,.. हळूहळू त्या घंगाळाला माळ्यावर टाकलं कधी तरी डोळ्यासमोर दिसलं की वाटायचं मोडीत घालू मग परत आई आठवायची हट्टाने ते घेणारी,..मग स्टील, प्लास्टिक असं काय काय येत राहिलं,..तरी त्याच महत्व मनात होतं कायम पण त्याच्या स्वछतेपायी त्याला दूरच ठेवलं,..सुनबाई म्हणाली,” नकोच त्या हमाल्या..” म्हंटल नको तर राहू दे आपल्यालाच नाही जमलं तर ह्यांना कुठे बळजबरी करता,..

नलीला मध्येच अडवत सुशी म्हणाली,”अग मी तुला दोन दिवसांपासून तू इतकी ह्या पिढीसोबत मोकळी ढाकळी वागलीस त्याबद्दल विचारलं तर तू हे काय इतिहास सांगत आहेस मला,..?”

नली हसून म्हणाली,”अग तेच सांगते,….वर्षानुवर्षे माळ्यावर अडगळ होऊन पडलेलं घंगाळ ती इव्हेंट मॅनेजमेंट वाली पोरगी घेऊ का? म्हणून मला विचारायला आली,.. मी हो म्हणताच ते खाली काढून तिने त्याला स्वच्छ करून नकली फुलांची माळ गुंडाळली त्यात पाणी सोडलं आणि हे कमळाचे दिवे हि मोगऱ्याची फुलं,.. मला म्हणाली,”आजी जून असलं तरी नव्याने त्याला जगू देऊ या,..माझ्या टेबलावर पडलेल्या लोकरीच्या फुलांची माळ तिने ह्या रिकाम्या कागदाच्या ग्लासात अडकवली,..मला म्हणाली,” जगणं तेच फक्त त्याला लूक नवा दयायचा म्हणजे आंनद मिळतो..मी सहज ते सगळे लटकन बघितले तर खरंच माझीच लोकरीची फुलं इतक्या दिवसांपासून त्या कोपऱ्यात पडून राहिलेली आज मस्त वाऱ्यावर डुलत होती जणू मोकळा श्वासच घेत होती,..हे हल्ली इव्हेंट इव्हेंट म्हणतात ते फार काही दुसरं नाही ग तर आहे तो कार्यक्रम आनंदाने साजरा करणं त्यासाठी हि सजावट पडीत वस्तूतूनही किती छान करता येते हे त्या मॅनेजमेंट वालीने दाखवलं आणि मग मनात वाटलं,..आपण सुद्धा आयुष्याचा इव्हेंट करायला हवा,..आनंदी मॅनेजमेंटने,..आपण नाही वापरलं ते घंगाळ,.. ती फुलं तशीच तशीच तर पडून आहेत,….मनातल्या उत्साहाची फुलं देखील तशीच पडू दिली आपण नाही वाऱ्यावर डोललो कधी,..मोकळेपणाने आणि अजूनही नाही तर मग कधी?आयुष्य तर असंच गंजून जाईल त्या माळ्यावर पडलेल्या घंगाळा सारखं कोणी येईल आणि लक्ख करेल ही वाट कशाला बघायची ?आपल्या आयुष्याचा इव्हेंट मॅनेज आपणच करावा,..हे नाही आलं आजपर्यंत लक्षात पण हि पिढी शिकवतीये ना मग घेऊ या शिकून,..त्याक्षणी जगून घेणं,..तो क्षण आठवणीत राहील असा साजरा करणं,..

सुशे तुलाआपले लग्नकार्य भांडण आणि रुसण्याशिवाय काय आठवतं ग?? ह्या उलट काल आमच्या मेंदीत लेक आणि सून मला मध्ये घेऊन फोटोसाठी उभे राहिले तेंव्हा नातू म्हणाला ,” आजीला जवळ घ्या बाबा,.. आणि लेकांन मला जवळ घेतलं तेंव्हा काय सांगू काय भरून आलं ग एरवी आपल्याला बोलायला वेळ नसणारी माणसं ह्या इव्हेंट ने एकमेकांना स्पर्श करताहेत ग,..सुनेनी नातवानी जवळ घेऊन भरपूर फोटो काढले तेंव्हा वाटलं आपणही कधीच आपल्या सासूला असा हात लावला नव्हता,..लेकीने तरी कुठे ग असे गळ्यात प्रेमाने हात टाकले,..फक्त आदर आदर ह्याच्या नावाखाली हे एकमेकांना प्रेमानं जवळ घेणं आपण विसरायला लागलो ते ह्या इव्हेंट मध्ये सापडलं ग मला ह्या लख्ख झालेल्या घंगाळा सारखं आणि मग मनातही मोगरा फुलला,..क्षण जगून घ्यावा हा विचार आतमध्ये ह्या कमळाच्या पाकळ्यांसारखा उमलत गेला,..म्हणून मी आता ठरवलं आयुष्य इव्हेंट करून जगायचं अगदी सुंदर आणि आंनदी..”

सुशी नुसतीच हसली कारण नलीच्या वाक्यावर वरची लटकणारी फुलच डोलत आपल्या किणकिण घंट्या वाजवत ह्या सगळ्या बोलण्याला दुजोरा देत होती?

 

©️ स्वप्ना मुळे (मायी)

औरंगाबाद

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बुद्धिजीवी (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?जीवनरंग ?

☆ बुद्धिजीवी (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

“ यावेळच्या  निवडणुकीच्या बाबतीत काहीतरी करायला पाहिजे यार .” 

“ बोल– काय करूयात ?” 

“ अरे आपल्या इथून जो कोणी निवडून येतो, तो फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपला वापर करून घेतो. नंतर सामान्य जनतेसाठी काही काम करणं तर लांबच, पुढची काही वर्षं त्या माणसाचं तोंडही दिसत नाही आपल्याला. “

 “बरोबर आहे तुझं म्हणणं, पण आपण करून करून काय करू शकू शकणार आहोत ? “

 “ आपण खूप काही करू शकतो रे. आपल्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या सभा आयोजित करून लोकांना याविषयी जागृत करू शकतो. त्यांना समजावून सांगू शकतो की, ‘ नेते मंडळी आपल्याला मोठमोठ्या वचनांचे आमिष दाखवून आपली मते मिळवतात. पण निवडून आल्यानंतर मात्र आपल्या भागाच्या विकासासाठी कधीच काहीच करत नाहीत. आणि सगळ्यांना ही वस्तुस्थिती माहिती आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून, एकमताने आता असा निर्णय घ्यायला पाहिजे की, यावेळी आपण अशाच उमेदवाराला मत द्यायचं, जो आपल्याला असं वचन देईल की, निवडून आल्यानंतर तो आपल्या या भागाचा विकास आणि प्रगती करण्यासाठी अतिशय मनापासून, निष्ठेने, आणि पूर्ण इमानदारीने प्रयत्न करेल. – आणि तो जर त्याचं हे वचन निभावू शकला नाही, तर त्याला राजीनामा द्यावा लागेल.’ “ 

 “ हे सगळं अगदी बरोबर आहे बाबा, पण अशा सभांचा खर्च करण्यासाठी तेवढे पैसेही हवेत ना ? “

 “ हे बघ, पैसे गोळा करणं काही फारसं अवघड नाहीये. आपण लोकांना आव्हान करू, आणि त्यांच्याकडून पैसे गोळा करू. शेवटी कुणालातरी पुढाकार घ्यायलाच पाहिजे ना— नुसतं वाटतंय , म्हणून आपोआप काहीच होणार नाही. “ 

 “ ठीक आहे. मग कधीपासून सुरुवात करू या ? “

 “ तू म्हणशील तेव्हापासून–”

बोलत बोलत हे दोघे बुद्धिजीवी बसस्टॉपवर पोहोचले. त्यांची चर्चा सुरूच होती. —- इतक्यात बस आली. पळत जाऊन बसमध्ये चढता-चढता पहिल्या बुद्धिजीवीने दुसऱ्याला सांगितलं – “ चल रे— बाय. मी जातो. तुझ्या बसचीही वेळ झालीच आहे. “ 

 “ बाय — पण या विषयी आणखी चर्चा करण्यासाठी पुन्हा कधी भेटूयात ? “

 “ अरे सोड ना यार. बसची वाट बघत थांबावं लागतं, तो वेळ घालवण्यापुरता हा विषय ठीक आहे. तसंही आपण पडलो बुद्धिजीवी — त्या राजकारणाशी आपलं काय देणंघेणं आहे ? “

हे उत्तर ऐकून त्या दुसऱ्यालाही ‘ आपण बुद्धिजीवी आहोत ‘ हे एकदम आठवलं, आणि तो गुपचूप त्याच्या बसच्या रांगेत जाऊन उभा राहिला.  

 

मूळ हिंदी  कथा – ‘बुद्धिजीवी’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ टाईमपास ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

?जीवनरंग ?

☆ टाईमपास ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

जोशीकाका पुणे महानगरपालिकेतून निवृत्त झाले त्याला चार पाच वर्षे होऊन गेली होती. काकांना ना चित्रपटांची आवड ना टीव्हीवरच्या मालिकांची. त्यामुळे निवृत्तीनंतर ते टाईमपास कसा करतात हा त्यांच्या मित्राला पडलेला यक्षप्रश्न.

“जोशा, लेका तुला ना काही छंद , ना वाचनाची आवड, ना अध्यात्माची. रिटायर झाल्यावर टाईमपास तरी कसा करतोस तू ?”

जोशी काकांना आपल्या मित्राच्या भोचकपणाची आणि नसत्या चौकशा करण्याच्या वृत्तीची चांगली कल्पना होती. त्याच्या डोक्यात एकदा हा कीडा वळवळला आहे म्हणजे त्या शंकेचं निरसन होईस्तोवर तो आपल्याला काही सुखाने जगू देणार नाही हेही त्यांना ठाऊक होतं. 

“तुला कालचीच गोष्ट सांगतो,” काकांनी शंकासमाधानाला सुरुवात केली. “मी आणि बायको गेलो होतो पु ना गाडगीळमध्ये. पाचच मिनिटे दुकानात डोकावलो. बाहेर येऊन बघतो, तर दुकानासमोर पार्क केलेल्या गाडीशी ट्रॅफिक पोलीस येऊन ऊभा – हातात पावतीपुस्तक.

आम्ही दोघेही कावरेबावरे होत त्याच्याकडे गेलो आणि अजीजीने त्याला सांगू लागलो – “बाबा रे, मोजून पाचच मिनिटे गेलो होतो रे. एक वेळ सोडून दे.” 

तशी तो म्हणू लागला, “सगळेजण दर वेळी असंच म्हणतात. आपली चूक कबूल कोणीच करत नाही. हजार रुपयांची पावती फाडावी लागेल. एकदा पावती फाडली म्हणजे पुढच्या वेळी चूक होणार नाही.”

“तसे नाही, आमची चूक समजली आम्हाला. पुन्हा नाही होणार असं. आणि हजार रुपये म्हणजे फार होतात हो. आम्ही निवृत्त कर्मचारी आहोत हो. आमच्या पांढऱ्या केसांकडे तरी बघा.”

“लाखांच्या गाड्या फिरवता, पु ना गाडगीळमध्ये खरेद्या करता,  कायदा मोडता आणि तुम्हाला हजार रुपये जड होतात होय ? बरं चला, तुम्ही वयस्कर आहात, म्हणून तुमच्याकडून फक्त दोनशे रुपये घेतो आणि देतो सोडून तुम्हाला या वेळी.”

” ‘त्या दोनशे रुपयांची पावती मिळेल ना ?’ माझा निरागस प्रश्न” – जोशी काका सांगत होते.” तशी वस्सकन अंगावरच आला तो हवालदार.”— 

“ओ, पावती हवी असेल तर हजारचीच होईल. दोनशेची काही पावती बिवती मिळणार नाही.”

“असं कसं ? पैसे दिल्यावर पावती नको ? सगळं कसं नियमानुसार व्हायला नको का ?  सरळ सांग ना, तुला लाच खायची आहे म्हणून.”

माझ्या या बोलण्याने तो एकदम भडकलाच. आणि मग माझंच वाक्य धरून बसला. 

“अस्सं म्हणताय काय ? सगळं नियमानुसार व्हायला पाहिजेल काय ? मग होऊनच जाऊ दे. मी म्हटलं म्हातारी माणसं आहेत, जरा सबुरीने घेऊ, तर तुम्ही मलाच अक्कल आणि कायदे शिकवताय ! चला, सगळे नियमच काढतो तुमचे आता.” हवालदाराने रौद्र रूप धारण केले.

आणि मग तो हात धुऊन गाडीच्या मागे लागला. एक आरसाच तुटलेला आहे, मागची नंबर प्लेटच नीट नाहीये, PUC संपलेलं आहे “ – तीन चार हजार रुपयांपर्यंत मामला गेला.

हे फारच वाढतंय म्हटल्यावर मी बायकोला म्हटलं -” तू सांगून बघ, तुझं ऐकतोय का तो ते.”

ती त्याला म्हणाली, “अरे बाळा, तू असं रागावू नकोस. हे काय बोलले ते मनाला लावून घेऊ नकोस. सोडून दे. त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू. हे घे दोनशे रुपये.”

पण आता तो हवालदार काहीही  ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. 

“नको मला तुमचे ते दोनशे रुपये. आता पावतीच फाडणार मी.”

मग पुढे पाच दहा मिनिटे हे असंच चाललं, ती त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती आणि दुखावला गेलेला तो, पावत्या फाडल्याशिवाय थांबणार नव्हता.” जोशी काका सांगत होते.

“अरे बाप रे ! दोनशे रुपये वाचवायला गेलास आणि हे भलतंच होऊन बसलं. मग काय केलं काय तुम्ही शेवटी ?” – मित्राची पृच्छा.

“मग काही नाही, आमची बस आली, आम्ही त्यात चढलो आणि घरी आलो.” 

“आं ? मग गाडी ? तिच्या पावत्या ? दंड ? आणि तो हवालदार ?” मित्राला काहीच उमगेना.

“काय संबंध ? ती गाडी आमची नव्हतीच रे. आम्ही तर बसने आलेलो—

तू मला विचारलंस – मी टाईमपास कसा करतो, ते मी तुला सांगत होतो. आम्ही बसमध्ये चढलो तेव्हा त्या हवालदाराच्या तोंडावरचे भाव मात्र पहाण्यासारखे होते – आत्ता तुझ्या चेहऱ्यावर आहेत ना, तसेच होते अगदी ! “

जोशीकाका निर्विकारपणे म्हणाले आणि आणखी टाईमपास करायला नवीन गिऱ्हाईक शोधू लागले——

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लायकी दाखवण्याचे दिवस ☆ संग्राहक – कालिंदी नवाथे

?जीवनरंग ?

☆ लायकी दाखवण्याचे दिवस ☆ संग्राहक – कालिंदी नवाथे ☆ 

गवार वीस रुपये… 

कलिंगडं शंभरला तीन !

सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. कपाळाचा घाम पुसत उभा. सोसायटीचा वॉचमन त्याला लांब थांबायला सांगत होता. तसा तो पोऱ्या वॉचमनला हात जोडत थांबू देण्याची विनंती करत होता. मी आवाज दिला आणि त्या पोऱ्याला थांबायला सांगितलं. पोऱ्यानं मान डोलावली. तोंडाला रुमाल बांधून खाली गेलो. तोपर्यंत दोन चार बाया आणि काही पुरुषही त्याच्याभोवती येऊन थांबले होते. सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही सगळे गवार, कलिंगड घेऊ लागलो. इतक्‍यात तो पोऱ्या एकाला म्हणाला,

“ दादा, तांब्याभर पाणी मिळंल का? “ दादानं तोंड वाकडं करत, “समोरच्या चौकात पाण्याची टाकीये. तिथं पी .” असा सल्ला दिला.

“ एवढ्या सकाळी तहान कशी लागते रे तुला? “ दुसऱ्या दादानं असं विचारत स्मित केलं. तसा तो पोऱ्या म्हणाला, “ पहाटं पाचला निघलोय साहेब घरातून. सात किलोमीटर चालत आलोय. पाण्याची बाटली होती. पण, ती बी संपली. म्हणून म्हणालो.” 

तशी एक ताई लॉजिक लावत म्हणाली, “ वाह रे वाह शहाणा? म्हणजे आम्ही तुला तांब्याभर पाणी देणार. तू ते पाणी पेणार आणि तुला कोरोना असला  तर तो आम्हाला देऊन जाणार.”– ताईंच्या या वाक्‍यावर पोऱ्या काही बोलला नाही. आवंढा गिळत त्यानं शांत राहणं पसंत केलं. 

आम्ही सो कॉल्ड व्हाईट कॉलरवाली माणसं होतो. रस्त्यावरच्या अशा कोण्या एैऱ्यागैऱ्याला पाणी देऊन आम्हाला आमची इमेज खराब करायची नव्हती. ‘आज ह्याला पाणी दिलं की, उद्या वॉचमन पाणी मागेल, परवा कचरा उचलणारी बाई पाणी मागेल, परवा पेपर टाकणारा पोऱ्याही पाणी मागेल. त्यांनी त्यांच्या औकातीत रहायचं आणि आम्ही आमच्या रुबाबात,’ अशी काहीशी अव्यक्त भावना आम्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. 

आम्ही सगळेजण स्वत:ला उच्चविद्याभूषित, सुशिक्षित आणि श्रीमंत समजत खरेदी करत होतो. तितक्‍यात तिथे एक स्कॉर्पिओ आली आणि थोड्या अंतरावर थांबली. त्यातून एक दाढी मिशीवाला रांगडा माणूस उतरला. त्याच्या हातात पिशवी होती. तो चालत आला आणि ती पिशवी त्यानं पोऱ्याच्या हातगाडीवर ठेवली. “ उन्हाच्या आत घरी ये रे भैय्या.” असं म्हणत तो माणूस पुन्हा स्कॉर्पिओत बसला आणि निघून गेला. आमच्यातला एक दादा हसत म्हणाला, “त्यांच्याकडं कामाला आहेस का रे तू भैय्या? “  पिशवीतून बिसलेरी काढत भैयानं पाणी तोंडावर ओतलं. नंतर चार घोट घशात ढकलले आणि तोंड पुसत म्हणाला,” ते वडील होते माझे.” 

त्याच्या वाक्‍यावर आम्ही सगळ्यांनी एकाचवेळी आवंढा गिळला. तरीही रुबाब कमी न करता भुवयांचा आकडा करत एक ताई म्हणाली, “ घरी स्कॉर्पिओ असून तू हातगाडीवर भाजी विकत  हिंडतोय होय? “  गवार तोलत भैय्या म्हणाला, “ घरी एक नाय चार गाड्याहेत ताई. तेवीस एकराची बागायतबी आहे. पुण्यातल्या मार्केटयार्डात तीन गाळे आहेत. —-

पण तात्या म्हणत्यात, “आपल्यासारख्या शेतकऱ्यांना लोकांची नियत समजून घ्यायची असेल, तर हाच भारी चान्स आहे . आत्ताच्या काळात गरीबाबरोबर  लोक जेवढं वाईट वागत्यात, तेवढं याच्याआधी कधीच वागले नाय. आमच्या धंद्याला ते लय गरजेच असतंय ताई. म्हणून रोज हातगाडी घेऊन पाठवत्यात मला. आज ना उद्या सगळा धंदा मलाच सांभाळावा लागणारे. रोजचा दोन अडीच लाखाचा माल निघतोय. तेवढा सांभाळण्यासाठी लोकांची लायकी समजून घ्यायला पाहिजेच ना.” 

त्याचं वाक्‍य संपलं, तसे पटापट त्याच्या हातावर पैसे टेकवत सोसायटीतले आम्ही सगळे ताई, दादा पटापट आपापल्या फ्लॅटकडं निघालो. मी गॅलरीतून गुपचूप पाहत होतो. आम्हाला आमची लायकी दाखवणारा तो गरीब माणूस पुढच्या श्रीमंताना त्यांची लायकी दाखवण्यासाठी निघाला होता—–

संग्राहक :– कालिंदी नवाथे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिळ्या कढीला ऊत ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

?जीवनरंग ?

☆ शिळ्या कढीला ऊत ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

सून फोनवर आईशी बोलत होती, “आई मी काय सांगू, आजकाल शिळ्या कढीला पण ऊत आलाय ! सासरेबुवा निवृत्त झाल्यापासून, दोघेही गार्डनमध्ये एखाद्या फिल्मी जोडप्यासारखे दिवसभर झोपाळ्यावर बसलेले असतात. आपल्या पिकल्या केसांकडे बघून तरी वागायचं त्यांनी ! अजूनही स्वतःला पंचविशीतलेच समजतात.” 

तेवढ्यात उदास मनाने सासूबाई स्वयंपाकघरात शिरल्या. त्यांनी हे सर्व ऐकले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी शांतपणे चहा बनवला आणि सुनेलाही तिच्या खोलीत जाऊन दिला. नवऱ्यासाठी चहा घेऊन जाताना सुनेने पाहिलं अन पुन्हा तोंड वेडंवाकडं केलं. पण त्यांनी तिच्याकडे दुर्लक्षच केलं.

पती निवृत्त झाल्यापासून हा आता त्यांचा रोजचाच दिनक्रम झाला होता. त्यांच्या इच्छेनुसार ती रोज चांगले चांगले कपडे घालून गार्डनमध्येच आपला बराचसा वेळ घालवायची. आयुष्यभर त्यांनी फक्त मुलांसाठीच  खस्ता खाल्ल्या होत्या. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी, ते दोघेही एकत्र वेळ घालवायचे.

अन्नपूर्णा भवन… दोन मजली बंगलेवजा घर– हे अशोक आणि प्रभा यांचे आजीवन स्वप्न होते. घराच्या समोर असलेल्या बागेत प्रभाबाईंनी बेल, जास्वंदी, चाफा, मोगरा अशी कितीतरी फुलझाडे लावली होती. एका छोट्या टाकीत छानशी कमळेही फुलली होती. हिवाळ्यात त्या तेथे भाज्यांचीही लागवड करत. स्वयंपाकघरासाठी लागणारी ताजी कोथिंबीर, पुदिना, मेथी तिथलीच असायची !

पण इतकी वर्षे कामाच्या गडबडीत अशोकजींना त्या जागेचा कधीच आनंद घेता आला नाही. पण आता मात्र त्यांचा सगळा मोकळा वेळ तिथेच जात असे. खरं तर त्या जागेत एक छानसं टुमदार घर दोघांसाठी बनवायचं, म्हणून ती अतिरिक्त जागा त्यांनी घेतली होती. पण आता ते शक्य नव्हतं. प्रभाबाईंना तिथे एक झोपाळा  हवा होता तो त्यांनी आणला. आता त्यांचा बराचसा वेळ त्या झोपाळ्यावर गप्पा मारण्यातच जायचा.

आता पती-पत्नी दोघांनाही आरामाचे क्षण जगायचे होते. त्यांच्या घरात सर्व आवश्यक सोयीसुविधाही होत्या, तरीही सुनेला त्यांचं हे दिवसभर झोपाळ्यावर बसणं खटकायचं. अगोदर दिवसभर तिच्यासोबत असलेल्या सासूबाई आता त्यांच्या पतीला थोडा अधिक वेळ देऊ लागल्या होत्या.

त्यांना टोमणे मारायची एकही संधी ती सोडत नसे. एकदा त्यांना त्या जागेतून हटवण्यासाठी तिने एक युक्ती केली.

“आपण मोठी कार का खरेदी करत नाही … नवीन ?”

“कल्पना चांगली आहे, पण ठेवायची कुठे? आपल्याकडे फक्त एकच गॅरेज आहे.” नवीन थोड्या चिंतेच्या स्वरात म्हणाला.

“जागा का नाही, ती बाग आहे ना ! जिथे आजकाल दोन लव्हबर्ड्स बसतात !”

“तू जरा जास्तच बोलतेस !” म्हणत नवीनने तिला फटकारले खरे, पण त्यानेही याबाबत बाबांशी बोलायचे ठरवले होते.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो वडिलांकडे गेला आणि म्हणाला, “बाबा! मला आणि सोनमला मोठी कार घ्यायची आहे.”

“पण बेटा, मोठी गाडी आधीच घरात आहे, मग तू ती ठेवणार कुठे?”

“या बागेतच नवं गॅरेज बांधायचा विचार करतोय मी! सोनम काही बघणार नाही, आणि आई तरी अजून किती दिवस काळजी घेईल? त्यापेक्षा ही झाडे तोडणे चांगले होईल.”

प्रभाबाईंच्या छातीत ते ऐकून धस्स झालं ! रागावर नियंत्रण ठेवत बाबा म्हणाले, “मला तुझ्या आईशी बोलावं लागेल, मला थोडा वेळ दे.”

“काय पप्पा … आईला काय विचारायचे .. या जागेचा काय उपयोग?”, नवीन जरा चिडूनच म्हणाला. “तुम्ही दोघेही दिवसभर कुठलाही विचार न करता, चार लोकांचा विचार न करता इथे बसता. आता सोनम सुद्धा घरात आहे, लहान मुलंही आहेत. पण तुम्ही मात्र दोघेही दिवसभर झोपाळ्यावर डुलता.”

आतून सोनमची बडबड चालूच होती.

नवीन आणि सोनमने त्या संध्याकाळी बाहेरून जेवण मागवले. पण ते जेवण काही केल्या या दोघांच्याही घशाखाली उतरले नाही. इच्छाच नव्हती कसली. दोघेही रात्रभर जागेच होते !

पण सकाळी त्याबद्दल विचार करताना, बाबांच्या ओठांवर एक स्मित उमटले. त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच चहा बनवला. पण खूप निराश झालेल्या प्रभाताई त्यादिवशी झाडांना पाणी देण्यासाठीही  बाहेर पडल्या नाहीत, किंवा कोणाशीही बोलल्या नाहीत.

दिवसभर सर्वकाही सामान्य होते, पण संध्याकाळी, “ घर भाड्याने देणे आहे “असा बोर्ड घराबाहेर लटकलेला पाहून नवीनने गोंधळलेल्या आवाजात बाबांना विचारले, “पप्पा, घर मोठे आहे हे मान्य, पण हे काय ?” 

” पुढच्या महिन्यात माझ्या स्टाफमधले मिस्टर गुप्ते सेवानिवृत्त होत आहेत, ते या घरात राहतील “, त्यांनी शांतपणे उत्तर दिले.

“पण कुठे?”

” तुमच्या भागात “, अशोकजींनी साध्या आवाजात उत्तर दिले.

“आणि आम्ही?”

” तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल इतके सक्षम तर मी तुम्हाला बनवलेच आहे. दोन तीन महिन्यांत तुम्ही दुसरा फ्लॅट पाहा किंवा कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी जा, जिथे तुम्ही तुमच्या वयाच्या लोकांबरोबर राहू शकाल ! आम्ही दोघेही आमच्या वयाच्या लोकांमध्ये राहू. तुमच्या आईचं संपूर्ण आयुष्य तुम्हा सर्वांची काळजी घेण्यात गेलं. आता तुमच्याकडून शहाणपणाचे धडे शिकणे एवढंच बाकी होतं.”

“बाबा, मला असे म्हणायचे नव्हते,” नवीन हात जोडत म्हणाला.

“नाही बेटा, तुझ्या पिढीने आम्हालाही व्यावहारिक होण्याचा धडा दिला आहे. जर आम्ही दोघे तुम्हा दोघांना एकत्र पाहून आनंदित होऊ शकतो, तर मग तुम्हाला आमच्यापासून त्रास का होतो ? हे घर तुझ्या आईने बांधले आहे. ही झाडं , ही फुलं, तुमच्यासाठी भोगलेल्या अनंत कष्टांचे साक्षीदार आहेत. म्हणून मी कोणालाही तिचा हक्काचा कोपरा हिसकावण्याचा अधिकार देणार नाही.”

“बाबा, तुम्ही गंभीर झालात “, नवीनचा आवाज आता हळवा झाला होता.

“नाही बेटा … तुझ्या आईने आजवर खूप त्याग करून, खूप दुःख सहन करून मला पाठिंबा दिला. आज तिच्या कृपेने माझ्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही. म्हणूनच फक्त हा कोपराच नाही, संपूर्ण घर तिचे ऋणी आहे. तुमच्यापेक्षा तिचा या घरावर अधिक हक्क आहे—-

—–आमची मुलं असल्याचा फायदा जरूर घ्या. पण जर देव मंदिरात जोडीने शोभून दिसतात तर आईवडील का दिसू नयेत ?” 

 

संग्राहक : – सुहास सोहोनी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पुस्तके (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ पुस्तके (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

नरेंद्रजी आमच्या इथले सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्याचप्रमाणे ते साहित्यप्रेमीही आहेत. त्यांनी आपल्या निवासस्थानी साहित्य चर्चेचं एकदा आयोजन केलं होतं. शहरातील अनेक लेखक, कवी आणि श्रोते या कार्यक्रमात सामील झाले होते. नरेन्द्रजींनी बाहेर व्हरांड्यात एक टेबल ठेवलेलं होतं. त्यावर जुन्या, एकापेक्षा एक चांगल्या डायर्‍या ठेवलेल्या होत्या. शेजारी एक फलक टांगलेला होता. त्यावर लिहिलेलं होतं, ’ज्या व जितक्या डायर्‍या पसंत असतील, तितक्या नि:शुल्क घेऊन जा.’

चर्चेला आरंभ झाला, तेव्हा नरेंद्रजी म्हणाले, “ दर वर्षी अनेक डायर्‍या भेट म्हणून मिळतात. काही इतक्या सुंदर असतात, की टाकून द्यायला मन धजत नाही. जमेल तसा वाटत सुटतो. तरीही इतक्या साठल्या आहेत. तेव्हा विचार केला, की आपल्याला लिहायला उपयोगी पडतील.”  चर्चा संपल्यानंतर नरेन्द्रजींनी बघितलं, सगळ्या डायर्‍या संपलेल्या होत्या. यामुळे उत्साह वाढून त्यांनी दसर्‍याच्या दिवशी आणखी एक उपक्रम केला. दसर्‍याच्या दिवशी समाजातले सगळ्या थरातले लोक त्यांना भेटायला रात्री उशिरापर्यंत येत असतात. दोन मुलांची लग्ने, त्याचप्रमाणे नातवंडांचे वाढदिवस  यावेळी आलेल्या अनेक निरुपयोगी भेटींची अनेक पॅकेट्स् एका खोलीत किती तरी वर्षं जागा अडवून पडली होती. नरेन्द्रजींनी ती सगळी पॅकेट्स् बाहेर काढली आणि व्हरांड्यात ठेवली मागच्यासारखाच फलक लावला, ‘ ज्याला जे पसंत आहे, ते त्याने घेऊन जावे. ’ दुसर्‍या दिवशी सकाळी नरेन्द्रजींनी बघितलं, व्हरांड्यात एकही पॅकेट् शिल्लक नव्हतं. 

एवढ्यातच नरेन्द्रजींनी आपला ७५ वा वाढदिवस साजरा केला. अनेक लोक त्यासाठी उपस्थित होते. त्यांचे अभिनंदन करत होते. त्यांना शुभेच्छा देत होते. यावेळी त्यांनी आपल्याजवळ साचलेली सुमारे ५०० पुस्तके बाहेर ठेवली होती आणि त्यावर फलक लावला होता, ‘ ज्यांना जितकी पसंत आहेत, त्यांनी तितकी घेऊन जावीत.’

समारंभ संपल्यानंतर नरेन्द्रजींनी आपल्या व्हरांड्यात लावून ठेवलेला पुस्तकांचा ढीग बघितला, तेव्हा ते हैराण झाले. याचा शोध घेतल्यानंतर असं कळलं, की काही जण जेवण झाल्यानंतर आपआपल्या घरी गेले आणि त्यांनी आपल्या घरातून पुस्तके आणून त्या ढिगात टाकली. फलकाच्या आस – पास नरेन्द्रजींनी ठेवलेली पुस्तके जशीच्या तशी होतीच, पण त्या व्यतिरिक्त आणखी तीनशे –चारशे पुस्तके जमा झाली होती. 

मूळ हिंदी  कथा – ‘पुस्तके’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दागिना ☆ सुश्री स्वप्ना मुळे

? जीवनरंग ?

☆ दागिना ☆ सुश्री स्वप्ना मुळे  

“आज तुझं मी काही ऐकणार नाही आई,.. तुला शरूच्या लग्नाला यायचंच आहे.. आई, अगं बाबा गेल्यापासून दोन वर्षात कुठेही बाहेर पडली नाहीस तू.. किती दिवसात तुझ्या ठेवणीतल्या हलका अत्तर- सुगंध पसवणाऱ्या त्या साड्या नेसली नाहीयेस तू.. आज नाही नको म्हणूस.. तुला असं शून्यात हरवलेलं बघून मला आणि दादाला त्रास होतो गं.. प्लिज आमच्यासाठी चल ना तू लग्नाला..”

तिची री ओढत तो पण बोललाच, “आई चल ना गं.. तुझ्या ह्या उदासपणामुळे जगापासून तुटल्यासारखं, अगदी एकाकी झाल्यासारखं वाटतंय आपलं घर.. आई, बाबा तर गेलेत, पण म्हणून काय आपण जगणं सोडून द्यायचं का..?”   

“शरूच्या आईने तुला कितीदा फोन केले आहेत.. त्या दोघांनी घरी पत्रिका आणून दिली. आपल्या सोनीची बालमैत्रिण ती.. किती वर्षांचा आपला सहवास. त्यांच्या विनंतीला तर मान दे.. प्लिज चल ना..” त्याने आईचा हात हातात घेतला..

आई रडतच म्हणाली, ” नको वाटतं रे चार चौघात आपली गरिबी घेऊन मिरवायला.. त्यादिवशी वहिनीने असंच बळजबरी करून बारश्यात नेलं, तेव्हा सगळ्या बायकांचे एकच विषय.. ‘ही साडी ऑनलाईन घेतली.. ही ज्वेलरी किती तोळ्याची? हा ड्रेस ह्या ब्रॅंडचा आहे का??’ 

एक तर मला म्हणाली देखील, “अगं तुझी ही साडी खूप कार्यक्रमात बघितली गं.. आणि हे कानातले जरा काळवंडलेत , जरा बदलून घे ना.. ‘ अश्या एक ना अनेक सूचनेच्या त्या नजरा…. ते सगळं इतकं मन दुखावणारं होतं की मी बारश्यात बाळाचा पाळणा येत असून म्हटले नाही. अशी मनाची अवस्था होते रे गर्दीत गेलं की..” 

तिघांच्या ह्या गप्पात आजी हळूच शिरली.. सूनबाईच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली..

” परदुःख शीतळ असतं.. त्यामुळे ती लोक जे वागले ते चूक नाही त्यांच्या दृष्टीने, ते योग्य गं.. साड्या, दागिने हे सगळं मन काही काळ आनंदी करणारं, त्यात ते अडकलेत, तुला नको वाटलं, पण सुनबाई.. तुला आनंदी ठेवणारा गोड गळ्याचा दागिना का नाही जपलास..? तू त्या बारश्यात जर एक पाळणा म्हटला असता ना, तर तुझं वेगळेपण, तुझा निसर्गाने दिलेला हा दागिना सगळ्यात उठून दिसला असता—-पैसे, दागिने ह्या भौतिक गोष्टी माणसाने निर्माण केलेल्या. त्या आपल्याकडे नसल्या तरी देवाने दिलेल्या गोष्टी, त्यात रमायला शिक. जगणं सुंदर होईल— आयुष्यात मिळालेली माणसं, पैसे, दागदागिने, कपडे किती सोबत राहतील सांगता येत नाही, पण निसर्गाने दिलेले आपले दागिने कायम आपल्या सोबत आहेत, त्यासोबत जगायला शिक..”

आजीचं वाक्य धरून मुलगा म्हणाला.. “मग आमची आजी बघ बरं.. कॉलनीत आजही रांगोळीसाठी फेमस आहे..”

आजी उदास हसत म्हणाली, ” हे गेले तेव्हा तरुण वय माझं… असे प्रसंग आले माझ्यावर पण… अनेकदा बायका दागिने दाखवायच्या समोर.. एक मैत्रीण तर बोटातल्या अंगठ्या नाचवत असायची सतत.  तिथं सुचलं.. आपल्या बोटात तर डिझाईनची जादू आहे.. मग काय, कोणाचे बारसे, डोहाळजेवण, लग्न, काही असो, माझ्या बोटांनी जादू केली, त्यांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. हळूहळू व्यवसाय झाला.. आता तुम्ही करू देत नसले तरी रोज अंगण तर सजतं… मला आनंद मिळतो, माझा निसर्गाने दिलेला दागिना सांभाळल्या गेल्याचा.. तसा सुनबाई तू तुझा गळ्याचा दागिना जप..”

“चला निघा लग्नाला उशीर होतोय…” म्हणत मुलीने आईला बळंच आवरायला लावलं.. तिनेही पटकन आवरलं, साधंसच….

मुलीने हट्टाने आईच्या गळ्यात जुनीच काळवंडून गेलेली मोत्याची सर घातली,.. गर्दीत आपल्या साध्या साडीकडे बघणाऱ्या नजरांमुळे ती बुजतच होती.. तेवढ्यात ओळखीच्या काकू  स्वतःचा तन्मणी चाचपत  म्हणाल्याच, “मोत्याला चमकच पाहिजे, तरच गळ्यात शोभतात..”

ती कसनुशी हसली. आत खोलवर कुठेतरी दुःख झालं, तिलाही आणि मुलांना देखील… पण तिला सासूबाईंचं वाक्य आठवलं..

ती वरातीच्या मागेच स्टेजवर चढली.. गुरुजींच्या खणखणीत आवाजाने मंगलाष्टकाला सुरुवात झाली… आणि मध्येच मधुर मंगलाष्टकाने सगळा हॉल शांत झाला.. शब्दांची फेक, स्वर आणि भावना यामुळे मंगलाष्टक अगदी मन लावून ऐकावं असं झालं.. 

सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. मुलगा आणि मुलगी बघतच राहिले, आई किती आत्मविश्वासाने ते म्हणत होती.. लग्न लागल्यावर तिच्या भोवती गर्दी जमली, “आम्हाला लिहून द्या, अप्रतिम म्हटलं तुम्ही..”

त्या गर्दीत तन्मणीवाल्या बाईने घाबरून हाताने तन्मणी चापपला, कारण तिच्या गळ्यातले काळवंडलेले मोती आता आत्मविश्वासाने चमकत होते, हिच्या तन्मणीपेक्षाही.. हे दोन्ही मुलांच्या लक्षात आलं.—

©️ स्वप्ना मुळे (मायी)

औरंगाबाद

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वारकरी…सिद्धी पाटील भुरके ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? जीवनरंग ❤️

☆ वारकरी…सिद्धी पाटील भुरके ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

गोविंद अपार्टमेंटमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्ण आढल्यामुळे  खळबळ माजली होती.  सत्तर वर्षांचे  जोशी आजी-आजोबा कोरोनाबाधित झाले होते. दोघांनाही सौम्य लक्षणं असल्याने हॉस्पिटलमधे न ठेवता घरातच राहण्यास सांगितले होते. सकाळीच पालिकेचे लोकं येऊन जोशीआजोबांचा मजला सील करून गेले होते. 

इथे मीराला सकाळपासून नुसते फोनवर फोन येत होते. काही नातेवाईकांचे- काही मैत्रिणींचे. 

“अग तुमच्याच सोसायटीमधे सापडले ना रुग्ण?? “

“बापरे.. आता काय होणार ग तुमचं?? “

वगैरे वगैरे कोरड्या काळजीचे फोन घेऊन मीरा जाम वैतागली होती. सोसायटीच्या वॉट्सअप ग्रुपवर तर कहरच चालू होता. जोशी आजीआजोबांना अगदी वाळीत टाकल्यातच जमा केलं होतं.

मीराला प्रश्न पडला होता की ज्यांना हा आजार झाला आहे, ते कसं करतील याबद्दल कोणी चकार काढला नाही. बाकी नको त्या गोष्टींवर चर्चा करत बसलेत सगळे. “खरंच किती चांगले आहेत जोशी आजीआजोबा.. दरवर्षी न चुकता पुणे ते सासवड वारीला जाणारे ते विठ्ठलभक्त दोघे कधी कोणाच्या अध्यात ना मध्यात.. नेहमी आनंदी राहणारे.. मुलगा परदेशात स्थायिक झाल्याने पडत्या वयात एकमेकांना आधार देऊन राहणारे एकदम हैप्पी गो लकी कपल आहेत ते सोसायटी मधले आणि त्यांच्यावर ही वेळ यावी?? अर्थात कोणाचा स्वभाव बघून हा रोग होत नाही.” या सगळ्या विचारांचे मीराच्या मनात काहूर माजले होते. 

इथे जोशी आजीआजोबा तापाने फणफणले होते. तोंडाची चव गेली होती आणि अंगात अजिबात ताकद नव्हती. तरी कसंबसं आजींनी डाळतांदळाची खिचडी केली होती आणि ती खाऊन दोघे निपचित पडून होते. आजी राहूनराहून विठ्ठलाचा धावा करत होत्या.

“पांडुरंगा अरे काय वेळ आणलीस आमच्यावर..  काय चूक झाली आमची? तुझ्या दारी मरण यावं हीच इच्छा होती. पण आता आमचे मृतदेह पण कोणी घेणार नाही. कुठे कमी पडलो आम्ही तुझ्या भक्तीत? “–  “अग असं अभद्र बोलू नकोस. काहीही होणार नाहीये आपल्याला. शांत हो बघू आधी “. जोशी आजोबांनी आजींना शांत केलं.

इथे आपलं मन शांत करण्यासाठी मीराने पुस्तकांचे  कपाट उघडलं आणि चांगलं पुस्तक शोधू लागली. तोच तिच्या हाती तिच्या आजीने लहानपणी भेट दिलेले ‘गोष्टी संतांच्या ‘हे पुस्तक लागले. पुस्तक घेऊन मीरा थेट आजीच्या फोटोसमोर जाऊन बसली आणि एक एक गोष्ट वाचू लागली. आपल्या लाडक्या आजीच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले. मीराची आजीसुद्धा पायी पंढरपूरची वारी करत असे. मीरा लहानपणी तिला नेहमी विचारत असे की “आजी वारकरी म्हणजे काय ग? ” –

“अग नुसती वारी केली म्हणजे कोणी वारकरी होत नाही.  ज्याला जळी, स्थळी, काष्टी परमेश्वर दिसतो, भूतदया मानवता या तत्वांवर जो जीवन जगतो, तो खरा वारकरी .”

आजीचे हे उत्तर मीराला फार आवडे. आजीच्या आठवणीतून भानावर येऊन मीराने पुन्हा पुस्तक वाचायला सुरवात केली आणि त्या गोष्टी पुन्हा एकदा वाचून तिच्या हे लक्षात आले की देवानेही देवपण सोडून अडचणीत असलेल्या भक्तांची नेहमी मदत केलीये. या विचाराने मीरा भानावर आली. पटकन उठून स्वयंपाकघरात गेली. चहा आणि पोहे करून डब्यात भरले आणि तो डबा जोशीआजोबांच्या दारात ठेऊन आली.

घरी येऊन मीराने जोशीआजोबांना फोन केला आणि म्हणाली, “आजोबा दार उघडून डबा घ्या आणि हो, आजींना सांगा आजपासून सकाळसंध्याकाळ मी तुम्हाला जेवणाचा डबा देणार आहे. “

“अग मुली तुला माहितीये ना आम्हाला काय झालंय ते?” जोशी आजोबा म्हणाले.

“हो चांगलंच माहितीये. तुमच्या दारात डबा ठेवल्याने मला कोरोना होणार नाहीये . मी काहीएक ऐकणार नाहीये तुमचं. आजपासून तुमच्या जेवणाची मी सोय करणार आहे “. असं म्हणून मीराने फोन ठेऊन दिला. आणि त्या दिवसापासून अगदी सकाळच्या चहापासून ते रात्री हळदीच्या दुधापर्यंत सर्व काही मीरा जोशीआजोबांच्या दारात ठेऊ लागली.

असेच काही दिवसांनी दुपारी जोशी आजोबांचा मीराला फोन आला.

“आजोबा बस 15 मिनिटात डबा ठेवते.. सॉरी आज जरा उशीर झाला. “

“अग मुली किती गडबड.. मी तुला वेगळ्या कारणासाठी फोन केलाय. आज आमच्या पुढच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत.. “

“आजोबा अहो काय सांगताय..!!  किती आनंदाची बातमी दिली तुम्ही “..मीराचा चेहरा आनंदाने फुलला.

“हो.. आमच्या मुलालासुद्धा सांगितलं नाही अजून.. पहिला फोन तुलाच केला.. “

जोशीआजोबांकडून आज्जीने फोन घेतला आणि म्हणाल्या “मुली अगदी देवासारखी धावून आलीस बघ.. मी उगाच विठुरायाला दूषण देत होते. तुझ्या रूपात आमच्या मदतीला तो धावून आला बघ. “

“अहो आजी फार मोठेपणा दिला तुम्ही मला. मी फक्त माझ्या आजीच्या व्याख्येतील ‘वारकरी’ बनण्याचा प्रयत्न केला, जो मानवता आणि भूतदया या तत्वांवर आपले जीवन जगतो.” डोळे पुसत मीरा म्हणाली, “आज डब्यात गोडाधोडाचं देते. काळजी घ्या आजी.”

इथे जोशीआजींनी देवाजवळ दिवा लावून साखर ठेवली आणि विठूरायाची क्षमा मागितली आणि म्हणाल्या, “देवा तुझी लीला अपरंपार आहे. आज तुझ्या देवळाची दारं बंद झाली.. अगदी तुझी वारीपण रद्द झाली.  पण तू घराघरात वास करून माणसातला देव बघायला शिकवलं. “

मीरासुद्धा आपल्या लाडक्या आजीच्या फोटोसमोर बसली.. हात जोडून आजीला म्हणाली,

“आज खरं मी तुझी नातं शोभतिये. तुझ्या शिकवणीमुळे आज मी वारकरी  झाले.. हा वारसा असाच पुढे नेईन याची मी तुला खात्री देते. ” मीराचे डोळे आनंदाश्रूंनी  भरून आले आणि नकळत ती आजीचे आवडते भजन गाऊ लागली—–

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे

देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी

देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी

देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी——-

लेखिका – सिद्धी पाटील भुरके

प्रस्तुती :- संग्राहिका मीनाक्षी सरदेसाई 

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ओंजळभर नाणी… राधिका माजगावकर पंडित ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

? जीवनरंग ❤️

⭐ ओंजळभर नाणी… राधिका माजगावकर पंडित  ⭐  प्रस्तुती  सौ.अस्मिता इनामदार ⭐

ओंजळभर नाणी-

भल्या मोठ्या जनरल स्टोअर्सचे मालक दादासाहेब आचार्य माझ्या चांगल्याच परिचयाचे झालेले होते. मला बघितल्यावर हिशोबाची वही बाजूला सारत ते म्हणाले, “अलभ्य लाभ, वहिनी बरं झालं तुम्ही आलात ते. मी तुमची वाटच बघत होतो. तुम्हाला एक गमतीशीर किस्सा सांगायचा आहे.” असं म्हणून त्यांनी सांगायला सुरवात केली…..      

काल तीन मुले दुकानात आली. अगदी लहान वयाची, बावरलेली, काहीशी बिथरलेली ती मुलं आत येऊन दुकानातील वस्तू शोधक नजरेने, कुतूहलाने बघत होती. दोन भाऊ व बहीण असावेत ते.

वस्तू बघत असता “अरे, ही नको ती घेऊ या” असे संवाद त्यांच्यात चालले होते. दुकानात गर्दी नसल्याने मी लांबूनच त्यांची होणारी गडबड, गोंधळ, बोलणं ऐकत होतो.  नोकरांनी त्यांना अनेक वस्तू दाखवल्या, मात्र तिघात एकमत होत नव्हतं.

सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ तिघांची शोध मोहीम चालू होती. अचानक तिघांची नजर एकाच वेळी वीणाधारी सरस्वतीच्या आकर्षक मूर्तीकडे गेली. तिच्याकडे बोट दाखवून तिघेही एकाच वेळी एकाच आवाजात गरजले, ” ही भेटवस्तू आईला खूपच आवडेल.”

त्यांच्यात झालेलं एकमत पाहून मला बरं वाटलं. त्यांना विविध वस्तू दाखवणारा नोकर मात्र अगदी त्रासून गेला होता. तिघांचे ते शब्द कानी पडताच त्याने त्या मूर्तीकडे झेप घेऊन आणि त्यांचे मतपरिवर्तन होणाच्या आत गिफ्टपॅकमध्ये बांधून बालकांच्या हाती सोपवली. 

“या पॅकवर नाव कोणाचे घालायचे” असं विचारलं असता तिघेही आनंदान चित्कारली, 

” यावर आमच्या तिघांचीही नावे टाकायची आहेत.” मुलांच्या चेहऱ्यावरील मिश्किल हासू व निरागस आनंद न्याहाळताना मला पण हसू आले.         

बिलाचा कागद पुढ्यात आल्यावर तो पाहून त्यांना किंमत सांगणार…. तेवढ्यात काउंटरवर ‘खळ.. खळ’ असा आवाज झाला. 

काउंटरवरच्या काचेला तडा गेला की काय, असा विचार मनात येऊन मी नोकराकडे रागाने पाहणार, इतक्यात माझं  लक्ष मुलांकडं गेलं. पाहतो तर तिथं उभ्या असलेल्या त्या छोटुकल्याने हातातील नाणी भरलेली पिशवी काउंटरवर रिती केली होती.

मुलगी जाणकार होती. आपल्या धाकट्या भावाने केलेल्या कृतीने ती गडबडली. त्यांचा मोठा भाऊ हुशार होता. प्रसंगावधान राखून तो काही बोलणार, एवढ्यात धाकटा भाऊ भडाभडा बोलून गेला, ” हे आम्ही साठवलेले पैसे आहेत,आमच्या आईचा परवा वाढदिवस आहे. आम्हाला तिला भेटवस्तू देऊन चकित करायचे आहे. या पैशातून आम्हाला आवडलेली मूर्ती द्या ना…..! नाणी मोजून घ्या बर का…” 

छोटुकल्याचे ते बोलणे ऐकून मी तर अवाक् झालो, गडबडलो. मला काही वेळासाठी काहीच सुचेना. धाकटा परत परत विचारत होता, ” आजोबा… देणार ना ती मूर्ती आम्हाला. पैसे पुरतील ना? आमच्याकडे एवढेच आहेत…”

मी पटकन भानावर आलो. नोकर नाणी मोजायला पुढे धावला. मी त्याला हातानेच थांबवले. न मोजता सारी नाणी गल्ल्यात टाकली. तो अगदी भरगच्च भरला. आज होत असलेली कमाई अनमोल होती, निरागस, निर्मळ. कारण ती झाली होती छोट्या निरागस मातृभक्त बछड्यांकडून…   

आज जगातील फार मोठा श्रीमंत माणूस ठरलो होतो. चार आणे, आठ आणे, या सारख्या सर्व प्रकारच्या नाण्यांनी हजेरी लावली होती माझ्या या गल्ल्यांमध्ये.” 

दादासाहेब म्हणाले, “एक सांगू वहिनी, या वेळी मला सोमवारची खुलभर दुधाची कहाणी आठवली. म्हाताऱ्या आजीबाईंच्या खुलभर दुधाने गाभारा गच्च भरला होता, तद्वत आज या ओंजळभर नाण्यांनी माझा गल्ला अगदी भरून पावला. माझ्या तिजोरीला जहागिरीचे स्वरूप आले. पांडुरंगावर माझी श्रध्दा आहेच. माझ्या डोळ्यासमोर मातृ- पितृ भक्त पुंडलिक उभा राहिला.”

दादासाहेब आणि आमचा जुना संबंध. मी म्हणाले, “किती सुंदर गुणी मुले होती ती. खरंच त्यांचे आई वडील किती भाग्यवान आहेत. पण दादासाहेब, कोणाची होती ही मुले?”

दादासाहेब खळखळून हसले व म्हणाले, “अहो वहिनी, खरोखर खूप भाग्यवान आहात तुम्ही.”

“अहो, आता इथं माझा काय संबंध बरं !”

माझे वाक्य पुरे होण्याच्या आत ते म्हणाले, “अहो, आहात कुठे तुम्ही. ही गुणी मुले दुसरी तिसरी कोणी नसून तुमची लेकरे आहेत. त्या बॉक्सवर नावे टाकताना त्यांनी टेचात नावे सांगितली होती– ‘राजेश, मीनल, प्रसाद, गोपीनाथ पंडित.'”

हे सारे ऐकल्यावर मी तीन ताड उडाले. आता अचंबित होण्याची पाळी माझी होती. बाप रे… उद्या माझा वाढदिवस, म्हणून गुप्त कट होता वाटतं या तिघांचा. केवढ हे लेकरांचं आपल्या आई- वरचं प्रेम. कधी एकदा घरी जाऊन माझ्या पिल्लांना जवळ घेईन असं झालं होतं.

थोड्याच वेळात वास्तवाचे भान आले. मी दादासाहेबांना विचारले, “किती पैसे झाले हो त्या मूर्तीचे? “

माझे वाक्य अर्धवट तोडत ते म्हणाले, “नाही नाही, ती चूक करु नका. या ओंजळभर नाण्यांमुळं मला लाखावर धन मिळालं आहे. मी जगातील श्रीमंत माणूस ठरलो आहे. हा निरागस ठेवा कायम, अगदी अखेरपर्यंत माझ्या तिजोरीत मी आठवण म्हणून जपून ठेवणार आहे.”

——— मी भारावले आणि दुकानाच्या बाहेर पडले.

©️ सौ राधिका गोपीनाथ (माजगावकर) पंडीत.

8451027554

प्रस्तुती : सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विमानातील जेवण ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ जीवनरंग ☆ विमानातील जेवण ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

विमानात मी माझ्या सीटवर बसलो.  दिल्लीला जायचे अंतर सहा तासांचे आहे.  पुस्तक वाचणे, तासभर झोप घेणे .. या गोष्टी मी माझ्या प्रवासात बहुधा करतो.

टेक ऑफच्या अगदी आधी १० सैनिक आले आणि माझ्या आजूबाजूच्या सीटवर बसले. सर्व जागा भरल्या. 

मी माझ्या शेजारी बसलेल्या सैनिकाशी संवाद साधला …

“कुठे जात आहात ?”

“आग्रा, सर ! दोन आठवडे तिथे प्रशिक्षण घेणार आहोत. त्यानंतर, आम्हाला ऑपरेशनसाठी पाठवले जाईल,” तो म्हणाला.

तासभर गेला. घोषणा ऐकू आली.  ज्यांना पाहिजे ते पैसे भरून जेवणाची पॅकेट्स मागवू शकतात. दुपारच्या जेवणाचा ताप संपला असे मला वाटले होते. मी पर्स घेऊन माझे दुपारचे जेवण बुक करण्याचा विचार करत असताना एका सैनिकाचे बोलणे ऐकू आले.

“आपणही जेवण मागवूया का ?”  एका  सैनिकाने विचारले, 

“नाही ! त्यांचे जेवण महागडे आहे. आपला प्रवास पूर्ण झाला की विमानातून उतरून नेहमीच्या हॉटेलमध्ये जेवू या ! “

“ठीक आहे !” इतर सैनिकांनी लगेच मान्य केले.

मी फ्लाइट अटेंडंटकडे गेलो व तिला सर्व सैनिकांच्या जेवणाचे पैसे दिले अन् म्हटले “सगळ्यांना जेवायला द्या.”  मला तिच्या डोळ्यात अश्रू दिसले.  “माझा धाकटा भाऊ कारगिलमध्ये आहे, सर ! तुम्ही त्याला जेवण दिल्यासारखं वाटतंय सर.” 

मी माझ्या सीटवर येऊन बसलो.

अर्ध्या तासात सर्वांसाठी जेवणाची पॅकेट्स आली… मी जेवण संपवून विमानाच्या मागे वॉशरूमला जात होतो. मागच्या सीटवरून एक वृद्ध गृहस्थ आला, ” माझ्या सगळं लक्षात आलंय, तुझं अभिनंदन, मला या चांगल्या कामात वाटा घ्यायचा आहे ” असे म्हणून माझ्याशी हस्तांदोलन केले व 500 रुपयांच्या काही नोटा त्याने माझ्या हातात ढकलल्या … ” मला तुझ्या आनंदात सहभागी होऊ दे.”

मी परत आलो व माझ्या सीटवर बसलो. अर्धा तास गेला. विमानाचा पायलट माझा सीट नंबर शोधत माझ्याकडे आला. तो माझ्याकडे बघून हसला. तुमच्याशी हस्तांदोलन करायचे आहे असे तो म्हणाला. मी माझा सीट बेल्ट सोडला आणि उभा राहिलो. 

तो माझा हात हलवत म्हणाला,— 

“मी फायटर पायलट होतो. तेव्हा तुझ्यासारख्या कोणीतरी मला जेवण विकत आणले. ते तुझ्यातील प्रेमाचे प्रतीक आहे. ते मी कधीच विसरणार नाही.”

विमानातील प्रवाशांनी टाळ्या वाजवल्या. मी थोडा संकोचलो. मी केली ती चांगली गोष्ट होती पण मी ते कौतुकासाठी केलेले नव्हते.

प्रवास संपला. मी उठलो आणि पुढच्या सीटकडे गेलो व उतरण्यासाठी दाराजवळ उभा राहिलो. एका तरुणाने माझे नाव टिपुन घेतले आणि माझ्याशी हस्तांदोलन केले. दुसऱ्या एका व्यक्तीने माझ्या खिशात काहीतरी ठेवले आणि न बोलता निघून गेला. दुसरी टीप.

विमानातून उतरताना माझ्यासोबत उतरलेले सैनिक एका ठिकाणी जमा झाले होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि विमानातील सहप्रवाशांनी मला दिलेल्या नोटा काढल्या आणि त्यांच्या हातात दिल्या, “तुम्ही तुमच्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी हे पैसे तुम्हाला काहीही खाण्यासाठी उपयोगी पडतील. आम्ही जे काही देतो ते कमी आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या संरक्षणापेक्षा … “ 

माझ्या डोळ्यात नकळत अश्रू आले.

ते दहा सैनिक विमानातील सर्व प्रवाशांचे प्रेम आपल्यासोबत घेऊन जात आहेत. माझ्या गाडीत चढताना, ”  जे या देशासाठी प्राण देणार आहेत त्यांच्या दीर्घायुष्याची काळजी घे, परमेश्वरा !” अशी मी मनापासून देवाला प्रार्थना केली. —–

( एक सैनिक असा असतो जो भारताला दिलेल्या कोऱ्या चेकप्रमाणे आयुष्य घालवतो.

तरीही त्यांचे मोठेपण न जाणणारेही आहेत ! तुम्ही शेअर करा किंवा नका करू तुमची निवड ! भारतमातेच्या या प्रेमळ बालकांचा आदर करणे म्हणजे आपल्या स्वतःचा आदर करणे होय ! ) 

  जय हिंद

– अज्ञात 

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print