मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मराटी असे आमुची मदरटंग – भाग -2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ जीवनरंग ☆ मराटी असे आमुची मदरटंग – भाग -2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

त्या दिवशी छोट्याने अतिशय निराsगसपणे मला विचारलं, “ममा, तुला माहीत आहे, चर्चमध्ये प्रेयर म्हटली नाय तर काय करतात?”

“त्यांना माफ करतात,” ‘ते काय करताहेत, ते त्यांचं त्यांनाच….’वगैरे वगैरे म्हणणारा जीझस माझ्या तोंडून वदता झाला.

“रॉंग! त्यांना उंच जिन्यावर नेतात आणि वरच्या पायरीवरून ढकलून देतात. आजच आम्हाला शिकवलं –

देअर आय मेट ऍन ओल्ड मॅन

व्हू वुडन्ट से हिज प्रेयर्स

आय किक्ड हिम अप

अँड ही फेल डाऊन द स्टेअर्स ”

बाई ग! काय काय ही भयंकर गाणी! झाडाला बांधलेल्या पाळण्यात झोका घेणारं बाळ फांदी मोडल्यावर कसं खाली पडेल, भिंतीवर मजेत बसला असताना खाली पडून चक्काचूर होणारा हमटी डमटी आणि ज्याच्या आम्ही ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा ‘म्हणून मिनतवाऱ्या करतो, त्याला ‘डू नॉट शो युवर फेस अगेन ‘अशी दिलेली अपमानास्पद वागणूक.

अलीकडेच वाचनात आलं की, ही सगळी गाणी मुळी लहान मुलांसाठी लिहिलीच नव्हती. प्लेगच्या की  कसल्यातरी साथीवर  लिहिलेल्या ‘रिंगा रिंगा रोझेस’ला मग मरणवास येऊ लागला. बाकीची गाणी तत्कालीन राजकारण, युद्धे वगैरेंवर रचली गेली होती.

आणि छोटी छोटी इंग्लिश बाळं आई -वडिलांचे कपडे लहान करुन घातल्यासारखी बिच्चारी वाटायला लागली.

“मम्मा, लवकर फिनिश कर ना ग तुझं वर्क. पायजे तर मी तुला विसल करायला हेल्प करतो.”

“विसल करायला?”

माझ्या डोळ्यांपुढे एकदम दोन्ही हातांच्या तर्जन्या दोन्ही बाजूनी तोंडात घालून मवाली स्टाईल व्हिसल मारणारी मी आणि माझा लडिवाळ छकुला असं दृश्य तयार झालं. आणि समोर अंगाचा तीळपापड झालेले माझे वडील. लहान असताना एकदा मी अशीच शिटीवर गाणं येतं का, म्हणून बघत होते, तर बाबांनी अशी झोड झोड झोडली होती मला!

“हो ग. विसल करायला. भांडी विसल करायला.”

आता मात्र भांडी विसळायची तशीच टाकून मी तडक ह्यांच्याकडे गेले.

“बघितलेत तुमच्या पोराचे प्रताप? झाली ना इंग्लिश मिडीयमची हौस पुरी?”

“अग, वापरत असेल थोडे इंग्रजी शब्द. पण मराठी बोलतोय तरी ना! माझ्या अर्ध्याअधिक मित्रांच्या मुलांना तर मराठी बोलायचीच लाज वाटते,”- इति  ‘चित्ती असो द्यावे समाधान ‘ वगैरे कोळून प्यायलेला माझा नवरा.

“ममा, फायटिंग वगैरे तुम्ही नंतर करा. पहिलं मला ते सॉंग लिहून दे ना. आणि मग मी स्पीच प्रिपेअर केलंय, ते चेक कर.”

या शेवटच्या शब्दांनी जादू केली.स्वतःहून भाषण लिहून काढणाऱ्या माझ्या छकुल्याविषयीच्या जिव्हाळ्याने आणि अभिमानाने माझं मातृहृदय  अगदी थबथबून गेलं.

सगळी कामं आणि भांडणं अर्धवट टाकून मी त्याला उराशी कवटाळलं आणि म्हटलं, “अरे, माझ्या चिंकुल्याने लिहिलंय स्पीच?”

“मी नाय लिहिलं. माझ्या टीचरने लिहून दिलं आणि मला बायहार्ट करायला सांगितलं. मी म्हणतो, तू चेक कर.

‘प्रिन्सिपल, टीचर्स आनि माझे डिअर फ्रेंड्स. आज आम्ही मराटी डे सेलिब्रेट करतो आहोत. मराटी ही आमची स्टेट लँग्वेज आहे. म्हणून आपण सर्वांनी ओथ करूया की आम्ही जास्तीत जास्त मराटीत बोलणार. मराटीत लिवणार, मराटीत स्वास घेणार. गिव्ह मी अ बिग हॅन्ड ‘

त्याच्यानंतर मी ते सॉंग म्हणणार, ‘मराटी असे आमुची मदरटंग. ‘ पुढे काय ग ममा?”

“पुढे? ‘कमॉन मारूया आपण तिला टँग.”

समाप्त

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मराटी असे आमुची मदरटंग – भाग -1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ जीवनरंग ☆ मराटी असे आमुची मदरटंग – भाग -1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

“ममा, तू म्हणतेस ना, ते सॉंग मला कम्प्लिट लिहून दे ना ग.”

“कुठचं रे?”

“ते ग.’मराटी असे आमुची मदरटंग.’ ”

“काssय?”

“तू म्हणतेस नाय का नेहमी? मला लवकर लिहून दे ना ग. ते सॉंग मला बायहार्ट करायचंय. उद्या सिलेक्शन आहे.”

“कसलं सिलेक्शन?”

“नेक्स्ट मंडेला आमच्या स्कुलमध्ये  ‘मराटी डे ‘आहे ना! टीचरने सांगितलंय, प्रत्येकाने ‘मराटी’वर एक सॉंग बायहार्ट करुन या. मग त्यातून उद्या फोर सॉंग्ज सिलेक्ट करणार. ती नेक्स्ट मंडेला असेम्बलीमध्ये सिंग करायची.”

“वा रे मराटी गाणी सिंग करणारे!त्यापेक्षा एक दिवस शुद्ध मराठी बोलून ‘मराठी दिन’ साजरा करा म्हणावं.”

“एकच दिवस कशाला? मराटी पिरियडला फुल क्लास मराटीमध्येच बोलतो. मिस सांगते,’ज्या मुलानला मराटी बोलायला नाय येल, त्याने एक लेसन फाय टाइम्स कॉपी करायचा.’ ”

टीचरच्या मराठीप्रेमाने धन्य धन्य होऊन मी तिचं नाव विचारलं.

“सॅली डिकून्हा.”

काय हा दैवदुर्विलास! या मायमराठीच्या स्वतःच्या साम्राज्याच्या राजधानीत असूनही या शाळेला मराठी शिक्षक मिळू नये ना!आणि मारे आम्ही जागतिक मराठी परिषदेच्या बातम्यांनी स्वर्गाला हात टेकतो.

आणि पुन्हा नेहमीच्या विचाराने मनात उसळी मारली, चालू प्रवाहाबरोबर वाहत जाऊन आपण त्याला इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये घातलं, हे बरोबर की चूक? कारण प्रश्न फक्त भाषेपुरताच मर्यादित नाही. मराठी आणि इंग्लिश मिडीयममधल्या मुलांवर होणाऱ्या संस्कारातही किती अंतर असतं!

आता या नर्सरी ऱ्हाइम्स.

‘पिगी ऑन द रेल्वे….’    ‘रेल्वे’ म्हणताना त्या बिचाऱ्या चिमुकल्या जिभा अशा काही पिळवटल्या जातात आणि लेल्वे, लेर्वे, लेवले किंवा असंच कुठचंतरी रूप घेऊन ‘रेल्वे’ त्या इवल्याशा जिवणीच्या बोगद्यातून बाहेर पडते.

‘पिकिंग अप स्टोन्स’ म्हणजे काय ते एक देव जाणे आणि दुसरा पिगी जाणे!

‘डाऊन केम अँन इंजिन

अँड ब्रोक पिगीज बोन्स ‘

आता मराठीतलं बडबडगीत असतं तर मुलांनी त्याला मलम लावलं असतं, डॉक्टरकडे नेलं असतं आणि मुळीच न दुखणारं इंजक्शन द्यायला लावलं असतं. पण आंग्ल भाषेतला इंजिन ड्रायव्हर ‘आय डोण्ट केअर’ म्हणून चालायला लागतो. मुलंही गाणं संपवून ‘त्या पिगीचं बिचाऱ्याचं काय झालं असेल’ वगैरे चांभारचौकशा न करता शांतपणे, कपाळ फुटून भळाभळा रक्त वाहणाऱ्या जॅकचं आणि डोंगरावरून गडगडत खाली येणाऱ्या जिलचं गाणं म्हणायला लागतात.

अर्थात मुलांचाही काही दोष नाही म्हणा. त्यात काही भयंकर वगैरे असेल, अशी पुसटती शंकासुद्धा त्यांच्या मनात येत नाही.

याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे त्यांच्यावर झालेले मीडियाचे संस्कार. हल्ली म्हणे सेन्सार  बोर्डाने सक्तीच केलीय की, प्रत्येक सिनेमात कमीत कमी दोन तरी माणसं उंच कड्यावरून किंवा कन्स्ट्रक्शन साईटवरून खाली कोसळली पाहिजेत आणि प्रत्येक पन्नास फुटांत किमान एक तरी माणूस घायाळ होऊन त्याच्या शक्यतो चेहऱ्यावरून भळाभळा रक्त वाहिलं पाहिजे. असा सीन नसेल तर ते पन्नास फुटांचं रिळ कट.फायटिंगमध्ये हिरोने व्हिलनचा मार खाल्ला रे खाल्ला की सगळे ज्युनिअर सिटीझन्स ‘होss!’ करुन ओरडणार. (आमच्या लहानपणी हिरोने व्हिलनला मारल्यावर ओरडायची पद्धत होती.)

                         क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विज्ञान कथा – बलिदान – भाग – 3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

Author: Hemant Bawankar - साहित्य एवं कला विमर्श

 ☆ जीवनरंग ☆ विज्ञान कथा – बलिदान – भाग – 3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

पण ती आमची शेवटचीच भेट ठरली. परत आल्यावर तब्बल दहा वर्षांनी मी निलेश ला आणि चं दाला भेटतोय. पण हा असा, दोघांच्या समाधीपुढे. म्हणजे हे मोठे वृक्ष आहेत ना. हाच तो प्रयोग प्रयोग केलेला आडवा वाटलेला हिरवागार पानांनी वेढलेला वृक्ष म्हणजे माझी मैत्रीण चंदा ! आणि त्या शेजारच्या त्याला वेढुन डेरेदार वाढतोय तो माझा निलेश. खरंच हे दोन वृक्ष म्हणजेच चंदा आणि निलेश.

ठरवल्याप्रमाणे निलेशने आपला प्रयोग चंदावर सुरू केला. सलाईन लावून त्यातून क्लोरोफिल, झिंक, मॅग्नेशियम मोजून-मापून तिच्या शरीरात इंजेक्ट केलं. तिच्याशी गप्पा मारत बसत असे. त्याला विद्यापीठातही जावे लागत होते. कारण दोघेही एम एस सी फर्स्ट क्लासमध्ये पास झाले होते आणि तिथेच डिपार्टमेंटमध्ये त्याला रिसर्च साठी फेलोशिप मिळाली. त्यामुळे त्याचे काम सुरू होते. विद्यापीठातले काम झाले की लगेच गाडी वरून इकडे चंदा जवळ येई. तिच्याशी गप्पा मारत, डोस ऍडजेस्ट करत, सलाईन बदलत याचा दिवस कसा जाई त्याचे त्याला समजत नसे.

एकदा मात्र तो विद्यापीठात गेला आणि गावांमध्ये काही कारणाने दंगा उसळला. इतका की कर्फ्यू पुकारावा लागला आणि निलेश दोन दिवस तिकडेच अडकून पडला. दोन दिवसांनी कर्फ्यू उठल्याउठल्या तो धावतच चंदाकडे आला आणि समोरचे दृश्य बघून हबकूनच गेला. चंदा कॉटवर कुठे दिसतच नव्हती. कॉटच्या खालून जमिनीकडे मूळं वाढत होती आणि तिच्या शरीरावर छोटी छोटी हिरवीगार पालवी फुटली होती. तिचे डोळे नाक हेही नक्की कुठे आहे ते निलेश ला दिसेना. कॉट जवळ जाऊन जोराने तो चंदा, चंदा हाका मारू लागला. पण पाने जागच्याजागी थरथरल्याचा त्याला भास झाला.

त्या चा आपल्या स्वतःवर, डोळ्यांवर विश्वासच बसेना. हे घडतंय ते त्याला अपेक्षित होतं. पण चंदा कुठे गेली? तिचं अस्तित्वच नाहीसं झालं. याचा आपण विचारच कसा केला नाही? निसर्गाच्या नियमानुसार न वा गता आपण भलत्याच फंदात पडलो आणि मानवी चं दाला मुकलो. हे त्याला कळून चुकले. आता वाईट वाटून नही काहीच उपयोग नव्हता.

त्याच क्षणी त्याने आपला प्रयोग लिहून ठेवला आणि पाकिटात घालून माझे नाव घालून पाकीट बंद केले आणि तेव्हापासून स्वतःही अन्नपाणी न घेता तो चंदा जवळ बसून राहिला.

सलग आठ दहा दिवस विद्यापीठात आल्याने त्याचे गाईड सर त्याला शोधत इकडे आले आणि त्या ना मरणासन्न निलेश दिसला. प्रयत्न करूनही ते निलेशला वाचवू शकले नाहीत. अखेर चंदाच्या शेजारीच नवीन रोप लावून त्याची राख, त्याच्या शरीराची हाडं तिथे रोपा बरोबर पुरण्यात आली आणि तोच हा वृक्ष वाढला.

आज दहा वर्षांनी हे पाकिट मला मिळालं आणि निलेश चंदाच्या अमर प्रयोगाची माहिती सर्वांना झाली. त्याच्या पत्रातल्या काही ओळी अजून माझ्या डोळ्यापुढून हलत नाहीत.

“निसर्गाच्या विरुद्ध प्रयोग करायला मी गेलो आणि चंदा सारख्या हुशार जिद्दी आणि मनापासून प्रेम करणाऱ्या प्रिय व्यक्तीला मुकलो. तिच्या बलिदाना पुढे मला जगावेसे वाटत नाही.. तिच्या या परिस्थितीस सर्वस्वी मीच जबाबदार आहे.. केवळ म्हणूनच मी अन्नत्याग करत आहे. अजूनही खूप काही करायचे मनात होते पण यंदा शिवाय करणे केवळ अशक्यच! म्हणून मी इथेच थांबतोय.”

“इथून पुढेही कोणीही प्रयोग जरूर करावेत पण परिणामांचा फार विचार करून आणि मुख्य म्हणजे निसर्गाबरोबर काम करायला हवे निसर्गाविरुद्ध नको!”

     …. झाडांशी निजलो आम्ही

             झाडात पुनः उगवाया….

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विज्ञान कथा – बलिदान – भाग – 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

 ☆ जीवनरंग ☆ विज्ञान कथा – बलिदान – भाग – 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

“अरेच्या! काय विचित्र मनाचा माणूस आहे हा! हि परप्रांतातील मुलगी आपलं आयुष्य याच्यावर उधळायला तयार आहे आणि याची याला काहीही किंमत नाही आणि फक्त या विक्षिप्त बरोबर आयुष्य काढायचं? कोणाशीही संपर्क ठेवायचा नाही? काय आहे काय याच्या मनात?”

“निलेश, कशासाठी ही अट? काय प्रयोग करणार आहेस का तिच्यावर?” मी विचारले.

“एक्झॅक्टली !त्यासाठीच मी तिची निवड केली.हे बघ,तिने मला हॉटेलवर उद्या जेवायला बोलावले, त्यावेळी तू ही ये. तुझ्या साक्षीनेच मी तिलाही घालणार आहे. एका दृष्टीने उद्याच्या दिवस माझ्या आणि तिच्याही आयुष्यातला महत्त्वाचा ठरणार आहे”.

“अरे पण मला का मध्ये घालतोय? तुमचं तुम्हीच ठरवा ना. मी आलेले तिला आवडणार नाही.”

“ठीक आहे. तू येऊ नको माझं मी बघून घेईन.”या विक्षिप्त मित्राने विक्षिप्तपणा पुन्हा एकदा सिद्ध करत मला गप्प केलं.

दुसऱ्या दिवशी मीच रात्री आठ पासून त्याची चातकासारखी वाट पहात रूमवर बसलो होतो.साडेनऊ झाले तरी याचा पत्ता नाही.शेवटी दहा साडेदहाला निलेश आला. माझ्याशी काहीही न बोलता डोक्यावरुन पांघरूण घेऊन झोपला ही ! मला वाटले,चंदाने बहुदा नकार दिलेला दिसतो. कोण्याच्या विचित्र पणाला आनंदाने होकार देईल?

दुसऱ्यादिवशी लायब्ररीत चंदा भेटली. ती मात्र अगदी खूश दिसत होती. लांबूनच हाय करून तिने मला थांबण्याची खूण केली.मला वाटले आता हि पुन्हा निलेश संबंधी, त्याच्या त्या अटी संबंधी माझं डोकं खाणार. पण झालं भलतंच. लगबगीने माझ्यापाशी येऊन चंदा म्हणाली “चला एका चांगल्या न्यूज बद्दल मी तुम्हाला कॉफी देणार आहे.”

“चांगली न्यूज?” मी आश्चर्य करीत तिच्याकडे बघत राहिलो. “तुम्हाला निलेशने काहीच सांगितले नाही ना? अहो त्याच्या प्रपोजलला मी होकार दिलाय.” “काय?” मी केवढ्यांदा किंचाळलोच. ” खरच, मी त्याच्या शिवाय जगू शकत नाही. शिवाय त्याच्या संशोधनात मी मदत करू शकते ना! काय पाहिजे मला?”

आणि खरच, परीक्षा झाल्या झाल्या निलेश च्या बागेतच, अगदी साधेपणानं थोड्या लोकांच्या उपस्थितीत दोघांनी विवाह  केला.

ठरल्या प्रमाणे दुसर्या दिवसापासून आम्हा कोणालाच भेटली नाही. मी दोन-तीनदा बघितले त्यांच्या घरीही गेलो. पण चंदाचे नखही मला दिसले नाही. बरे निलेश ला विचारावे तर हा, “तुला काय करायचे? म्हणायलाही कमी करायचा नाही किंवा माझ्याकडे येऊ नको माझ्याशी बोलू नको असेही म्हणाय चा.” मी आपला गप्पच राहिलो.

त्यादिवशी त्यानेच आपण होऊन आपल्या धाडसी प्रयोगाची माहिती मला दिली. त्याच्यामते आपण मानव खाण्याच्या बाबतीत सर्वस्वी वनस्पतीवर अवलंबून आहोत. आपला मेंदू प्रगल्भ आहे. इतके नवनवीन शोध लावतो, पण आपले स्वतःचे अन्न आपण तयार करू शकत नाही, जे फक्त वनस्पती करतात. वनस्पतीमध्ये मुख्यत्वे क्लोरोफिल नावाचे हिरवे रंगद्रव्य असते. केवळ त्यामुळे ते आपले स्वतःचे अन्न,ग्लुकोज तयार करू शकतात.आपल्या शरीरात क्लोरोफिल नाही. मी काय करणार, क्लोरोफिल,, पाणी, झिंक, मॅग्नेशियम सलाईन मधून इंजेक्ट करणार आहे. त्यामुळे पेशींच्या रचनेत बदल घडवून वनस्पतींत प्रमाणे आपल्या ही पेशी अन्न तयार करू शकतील. हा माझा प्रयोग यशस्वी झाला तर या जगात पहिली मानव ठरेल कि जी खरीखुरी स्वयंसिद्ध असेल. तिच्यासाठी मी मुद्दाम  काथ्यांनी विणलेली कॉट तयार करून घेतली आहे.चार-पाच च्या अंगणात झकास ऊन येते.तिथं ही कॉट ठेवणार आहे.एक मोठा काचेचा गोल डोम तयार करून घेणार, कॉटच्या भोवती ठेवणार. कारण हा प्रयोग यशस्वी व्हायला किती महिने लागतील कोण जाणे? तिला पावसाचा, थंडी चा,उन्हाचा त्रास नको व्हायला”.

 एका दमात त्याने आपल्या प्रयोगाची रूपरेषा मला सांगितली. “अरे,तिला कायम झोपून ठेवणार तू? त्रास नाही का होणार?” मी काळजीने विचारले. “हे बघ, ती आपणहून तयार झाली आहे. मी काही मागे लागलो नव्हतो किंवा  तिला फोर्स केला नाही. आता सगळं ठरलं आम्ही दोघं लवकरच प्रयोग सुरू करणार आहोत.”

 “ठीक आहे. ऑल द बेस्ट! तुम्हा दोघांनाही. उद्या मी चाललोय बेंगलोरला. परत येईन तेव्हा भेटूच. गुड बाय!”

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विज्ञान कथा – बलिदान – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

 ☆ जीवनरंग ☆ विज्ञान कथा – बलिदान – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

बरोबर दहा वर्षापूर्वी याच बागेत मी निलेश बरोबर गप्पा मारत होतो. त्याचं आपल्या बागेवर खूप प्रेम होतं. पहिल्यापासूनच झाडाझुडपात राहणार त्याचं संवेदनशील मन होतं. म्हणूनच मेडिकलला ऍडमिशन मिळत असूनही तो गेला नाही. त्याच्या आवडत्या ”बॉटनी” तच त्यानं BSc आणि M Sc सुद्धा केलं. मला स्वतःला त्याच्या मैत्रीमुळे, त्याचा सहवास मला आवडायचा आणि त्याहीपेक्षा काढलेल्या नोट्स तो मला अभ्यासाला द्यायचा म्हणून मी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून M.Sc केलं. नंतर मला एका कोर्सला बेंगलोर ला ऍडमिशन मिळाली आणि नोकरीसाठी म्हणून  मी दहा वर्ष तिकडेच होतो. त्यामुळे तिथे निलेश च्या आयुष्याची झालेली उलथापालथ मला समजू शकली नाही. त्याच्या आणि चंदाच्या !

होय चंदा ! सी. चंदा. साउथ इंडियन. मुद्दाम एम एस सी साठी इकडे आली आणि इकडची होऊन गेली. निलेश सारखं तिचंही बॉटनी वर फार प्रेम होतं. दोघांचंही एकच स्पेशलायझेशन. त्यामुळे त्यांची मैत्री व्हायला वेळ लागला नाही. निलेश सदैव आपल्या विषयाच्या विचारांच्या तंद्रीतच असायचा. त्याच्या मेंदूत इतके सारखे सारखे नवनवीन विचार प्रश्न येत असत की बरेचदा त्याला वर्तमानकाळाची शुद्ध नसायची. यामुळे युनिव्हर्सिटीत तो विक्षिप्त म्हणूनच प्रसिद्ध होता. पण त्याच्या हुशारीवर, विक्षिप्तपणा वर चंदाचा जीव जडला आणि निलेश च्या मनात नसतानाही तिने आपला आयुष्याचा जोडीदार त्याला निवडले. संसार -लग्न -दोन वेळचं जेवण. घर असल्या मध्ये निलेशच मन रमणारच नव्हतं. त्याला फार मोठे संशोधक व्हायचे होते. आपल्या डोक्यातले विचार प्रत्यक्ष सिद्ध करायचे होते. त्यामुळे तो चंदाला दाद देत नव्हता.

एकेदिवशी होस्टेलवर रूमवर आम्ही दोघेही वाचत बसलो होतो. पण रोजच्या सारखे निलेश चे वाचनाकडे लक्ष दिसत नव्हते. तेवढ्यात त्यानेच मला हाक मारली, “अरे, प्लीज माझ्यासाठी दहा-पंधरा मिनिटे देतोस? मला फार महत्त्वाचे बोलायचे आहे तुझ्याशी.”

“हो, मी एका पायावर तयार आहे. काय रे निलेश? माझ्याशी गप्पा मारायला तुला विचारायची काय गरज? बोल बोल. काय  चंदाचा विचार करतोस की काय ” मी उगाचच त्याला  विचारले.

“अगदी बरोबर. चंदा चाच विचार करतोय मी. अरे, ही हट्टी मुलगी माझा पिच्छा सोडत नाहीये. आपली परीक्षा झाली की रिझल्ट लागेपर्यंत आपण होस्टेलवर या रूमवर राहू शकणार नाही. मी आमच्या गावातल्या बागेतच छोटी लॅब टाकून संशोधन सुरू करायचं म्हणतोय आणि त्यासाठी चंदाची मदत घ्यावी असे मी ठरवतोय. केवळ तेवढ्यासाठी तिच्या प्रेमाला होकार देणार आहे. लवकर लग्न करून मी तिला एक मोठी अट घालणार आहे. ऐकतोयस ना? लग्न झाल्यावर तिनं फक्त माझ्या बरोबर राहायचं. बाकी कोणाशीही बोलायचे नाही, भेटायचे नाही, अगदी तुला सुद्धा किंवा तिच्या स्वतःच्या आई-वडिलांना सुद्धा.”

“अरे पण का? ही कसली अट ?”मी एकदम न रहावून विचारले,”ती तयार होईल असली विचित्र अट मान्य करायला?”

“निश्चित होईल. “निलेश शांतपणे म्हणाला, ”ती तशी तयार नसेल तर मी तिच्या प्रेमाचा स्वीकारच करणार नाही ना.. जाऊदे. कुठे जायचे तिथं. करू दे कोणाशी लग्न. माझे काहीच बिघडणार नाही.”

क्रमशः ….

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – कठपुतली ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – कठपुतली ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

“मम्मी, काल आमच्या शाळेत कठपुतलीचा खेळ दाखवला,” जमिनीवर बसून वहीत ड्रॉइंग काढत असलेली पारंबी म्हणाली.

“अरे वा, काय काय दाखवलं?” गाईला चारा घालून परत घरात येता येता मम्मीने विचारलं.

“अगं ए, गाईला चारा-पाणी देऊन झालं असेल तर जरा इकडे ये, आणि माझे पाय दाबून दे,” कॉटवर आरामात लोळत पडलेल्या नवऱ्याने हुकूम फर्मावल्यासारख सांगितलं.

“सगळं दाखवलं मम्मी— त्या बाहुल्यांनी विहिरीतून पाणी काढून घरात आणून ठेवणं, चुलीवर स्वैंपाक करणं, मुलांना आंघोळी घालणं, कपडे धुणे, इस्त्री करणं — सगळं सगळं दाखवलं—” काढलेलं चित्र रंगवता रंगवता पारंबीने सांगितलं.

“कसा वाटला तुला तो कठपुतलीचा खेळ?”— नवऱ्याच्या पायापाशी बसून आता ती बायको त्याचे पाय चेपायला लागली होती.

“खूपच छान”, पारम्बी उत्साहाने सांगायला लागली.

“दोऱ्यांचे एक एक टोक खेळ दाखवणाऱ्या त्या माणसाच्या बोटांना बांधलेले होते, आणि दुसरी टोके त्या बाहुल्यांच्या अंगावर बांधलेली होती. तो माणूस त्या बाहुल्यान्ना इशारा केल्यासारखा बोटं हलवतो, आणि मग त्या बाहुल्यांचे अंग हलायला लागते. मग तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते त्यांच्याकडून करून घ्या. उड्या मारायच्या, खाली पडायचं, नाचायचं, गाणं- बजावण करायचं, भांडणं करायची—- हे सगळंही करत होत्या त्या. खूप खूप मज्जा आली मम्मी मला.”

” थांब– पुरे झालं पाय चेपन”

” थांब— पुरे झालं आता. एक तरी काम व्यवस्थित करायला कधी शिकणार आहेस कोण जाणे”— नवरा रागावून म्हणाला. बायको कॉटवरून खाली उतरताच तो पुन्हा गुरगुरला— “चाललीस कुठे लगेच? जरा तेल लावून डोक्याला मालीश करून दे– आणि सावकाश कर– मान तोडायची नाहीये माझी,” त्याच्या आवाजात कडवटपणा होता.

“बाळा तू रिमोटवर चालणाऱ्या कठपुतळ्या पाहिल्या आहेस का?”– आता नवऱ्याच्या डोक्यापाशी बसून, त्याच्या डोक्याला तेलाने मालिश करणाऱ्या बायकोने विचारलं.

“रिमोटवर चालणारी म्हणजे?”– खोडरबराने चित्र खोडता खोडता पारंबीने विचारलं.

“म्हणजे– म्हणजे फक्त आवाज ऐकून सगळं काही करते ती — कठपुतली– जसे की– तुम्ही हुकूम द्या– जा, गाईला चारा घालून ये– की ती जाऊन गाईला चारा घालून येईल. मग तुम्ही सांगा, की इकडे येऊन पाय चेपून दे– मग ती पट्कन येऊन पाय चेपत बसेल. — मग तुम्ही तिला दम देत सांगायचं, की आता डोक्याला तेल —“.

एखादे झुरळ झटदिशी उडावे, तसे पारंबीचे लक्ष त्या चित्रावरून उडाले आणि ती मम्मीकडे बघायला लागली. खरं तर तिच्या लक्षात आलं होतं की, तिच्या मम्मीचा आत्ताचा आवाज हा आवाज नाही, तर बरसण्यासाठी व्याकूळ झालेले – गच्च दाटून आलेले काळे ढग होते. हातातलं खोडरबर तिथेच टाकून ती उठली, आणि जाऊन कॉटवर तिच्या मम्मीला चिकटून बसली — आणि तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाली — “मम्मी मी कठपुतली होणार नाही– मुळीच नाही– कधी म्हणजे कधीच होणार नाही मी कठ पुतली — तू मला स्वतःसारखी कठपुतली बनवू नकोस मम्मी—-

मूळ हिंदी कथा : श्री भगवान वैद्य “प्रखर”

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – कल्पक योजना ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – आव्हान ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

?लघु बोध कथा?

(लघु बोध कथांचा हा  उपक्रम आज संपतोय. आज शेवटची कथा आपण वाचणार आहोत. संस्कृत दुर्मिळ कथांचे मराठीत भाषांतर या निमित्ताने पूर्ण झाले. अरुंधती ताईंचे अत्यंत आभारी आहोत. ? रसिकहो या बद्दल आपल्याही प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. ?  – सम्पादक ई-अभिव्यक्ति  (मराठी) )

कथा २१. आव्हान

महिलापुर नगरात एक वाणी होता. त्याच्या पत्नीचे नाव चंद्रमुखी व मुलाचे नाव सुमती होते. सुमती पाच वर्षांचा असतानाच वाण्याचे निधन झाले. आता त्या दोघांचे रक्षण करणारे कोणी नव्हते म्हणून चंद्रमुखी सुमतीला घेऊन पतीच्या मित्राकडे – दुसऱ्या वाण्याकडे आली. त्याने त्या दोघांना आदराने स्वतःच्या घरी ठेऊन घेतले व अन्न-वस्त्र देऊन रक्षण केले.

काही काळाने सुमतीचा विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर चंद्रमुखी त्याला म्हणाली, “आता तू काहीतरी करून जीवन व्यतीत करावेस. आता इथे रहाणे योग्य नाही. आपला वाण्याचा पूर्वापार उद्योग आहे. तेव्हा तूसुद्धा तो केलास तर बरे होईल. त्यासाठी तुला काय करायचे आहे ते ऐक. या नगरच्या जवळच कुंडिनपुर नावाचे नगर आहे. तेथे धर्मपाल नावाचा वाणी आहे. तो त्याच्याकडे आलेल्यांना व्यापारासाठी अपेक्षित धन देतो. तू त्याच्याकडे गेलास तर सुखी होशील.”

सुमती आपल्या मातेचा निरोप घेऊन त्या धर्मपालाकडे आला. तेव्हा तो पूर्वी त्याच्याकडून अनेकवेळा धन घेऊन गेलेल्या व पुन्हा काही धन मागण्यासाठी आलेल्या माणसाला संबोधून म्हणाला, “अरे, आजपर्यंत तू मागत असलेले धन मी तुला दिले. तू काहीसुद्धा धनार्जन न करता ते धन संपवून परत धन मागण्यासाठी आलास! बुद्धिमान लोक मेलेल्या उंदरालासुद्धा भांडवल करून त्याच्या प्रयोगाने धनप्राप्ती करू शकतात. तू धन कमावण्यास पात्र नाहीस. मी तुला थोडेसुद्धा धन देणार नाही.”

सुमतीने वाण्याचे ते बोलणे ऐकून तो मृत उंदीर मला द्यावा अशी त्याच्याकडे विनंती केली. हा मुलगा माझी टिंगल करण्यासाठी आला आहे असे समजून रागावलेल्या वाण्याने त्याला एक मेलेला उंदीर देऊन निघून जाण्यास सांगितले.

सुमती तो मृत उंदीर बाजारात विकण्यासाठी घेऊन आला. तो गिऱ्हाईकाची प्रतिक्षा करत असताना एका मनुष्याने आपल्या मांजरीच्या पिल्लाला खाण्यासाठी म्हणून तो उंदीर भाजलेले चणे त्याला देऊन विकत घेतला. नंतर सुमती गावाजवळच्या एका मोठ्या झाडाच्या सावलीत बसून त्या मार्गाने जाणाऱ्या थकलेल्या लाकूड वाहणाऱ्या लोकांना थोडे चणे व पाणी देत असे. चणे खाऊन व पाणी पिऊन ताजेतवाने झालेले ते लोक आपल्या लाकडाच्या भाऱ्यातील एक एक लाकूड काढून त्याला मोबदला म्हणून देत असत.

अशा प्रकारे थोड्या दिवसांनंतर त्याच्याजवळ जमा झालेले लाकूड सुमतीने विकले. त्याद्वारे जमा झालेल्या पैशांतून तेथे आणलेल्या सगळ्या लाकडाच्या भाऱ्यांची खरेदी करून सुमतीने ते लाकूड स्वतःच्या घरी आणले. दुसऱ्या दिवसापासून आठ दिवस सतत मुसळधार पाउस पडत होता. त्यामुळे लोकांना इंधन मिळणे कठीण झाले. त्यावेळी सुमतीने साठवलेल्या लाकडाच्या भाऱ्यांची अधिक किंमत घेऊन विक्री केली. त्यामुळे त्याला भरपूर धनप्राप्ती होऊन तो सुखाने राहू लागला.

तात्पर्य – बुद्धिमान लोक टाकाऊ गोष्टीचा सुद्धा युक्तीने उपयोग करून त्यांची उपयुक्तता सिद्ध करून दाखवतात व सुख मिळवतात.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/म्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-4 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-4 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

खरंच मला आश्चर्य वाटलं ते वीस वर्षांपूर्वीची टवळी, बेजवाबदार, आई वडिलांच्या डोक्याला ताप देणारी, भावंडाच्या, मित्रमैत्रिणीच्या खोड्या काढून त्यांना हैराण करणारी शैतान मिस जोकर हीच का ती? तिचे आता वेगळंच रूप मी पहात होते. सारं हॉस्पिटल, स्टाफ,  पेशंट, त्यांचे नातेवाईक हिला देव मानत होते. कोणाला आर्थिक तर कोणाला मानसिक मदत, कोणा पेशंटसाठी गरज असेल तर रात्री जागरण कर, कोणा पेशंटच्या नातेवाईकांची राहण्याची, जेवणाची तात्पुरती सोय कर. हेच तिचं काम ह्यातच तिला समाधान. हेच तिचं सुख. मग लग्न कार्य हवं कशाला? हे तिचं म्हणणं. कामात चोख, हुशार,चटपटीत, अपार मेहनत घेण्याची तयारी. त्यामुळे डॉक्टरांचा पण उजवा हात. डॉक्टर वेळ प्रसंगी तिच्यावर हॉस्पिटलची  जबाबदारी टाकून सेमिनारला, बाहेर फिरायला, बिनधास्त जात होते. डिग्री नव्हती पण कामात डॉक्टराच्या इतकीच अनुभवाने, वाचनाने निष्णात झाली होती. हाताला यश पण चांगले  होते. डिलिव्हरीसाठी लांबून लांबून स्त्रिया हिच्या धीरावर हॉस्पिटल मध्ये येत होत्या. कर्णोपकर्णी तिची कीर्ती वाढलेली. त्यामुळे डॉक्टर तिला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये पाठवयाला तयार नसायचे.

आता 31 मार्च उजाडला. क्लोझिंगचा बिझी दिवस. मिस जोकर वर  काका  काकूंना सोपवून आम्ही निर्धास्त. कारण कोणालाही त्या दिवशी दांडी मारणे शक्यच नव्हते. एक एप्रिलला रविवार होता. मीच आमच्या ग्रुप मधल्या नीलाच्या मुलाशी, जो इव्हेंट मॅनेजर होता. त्याला कॉन्टॅक्ट केले. हॉस्पिटलचा स्टाफ, आमचा मित्रमैत्रिणीचा ग्रुप, तो ठणठणीत होऊन गेलेला पेशंट- विनोद धमाले, जोकरला मागणी घातलेले त्याचे आई वडील ह्या सगळ्यांना दुपारी जेवणाचं आमंत्रण दिले. काकांचा बंगलोरला असलेला मुलगा आणि सून पण शनिवार रविवार जोडून सुट्टी घेऊन काकूंना बघायला आणि जमले तर त्यांना घेवून जायला आले  होते. सगळंच सरप्राईझ. योगयोगाने जोकरचा तो जन्मदिवस. तिकडे पण आई बाबांना एप्रिलफूल केले होते जोकरने. तिच्या आजारी आईच्या सोबतीला कोणाला तरी बसवून तिच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये आणण्याची व्यवस्था मी केली. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मिस जोकरचा सत्कार समारंभ करण्याचा घाट घातला. तिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा  केला. आम्ही  पण रोजच्या धावपळीतून रिलॅक्स झालो होतो. मिस जोकर  ह्या सरप्राईझने चकीत  पण खूप आनंदी झाली कारण आजपर्यन्त तिच्यासाठी कोणी असे कधी केलेचं नव्हते. तिचं फायदा घेऊन सगळेचं पसार व्हायचे. तिचे वडिल हा सत्कार समारंभ बघून गहिवरले. स्टाफचा  पण उत्साह ओसंडून जात होता. त्यांनी सगळ्यानी आपल्या लाडक्या मिस जोकरबद्दल छान छान बोलून तिच्यावर स्तुतीसुमनांचा  वर्षाव केला. आता पाळी आली तिला मागणी घालणाऱ्या विनोदच्या आई वडिलांची. ते तर पुऱ्या तयारीनिशीचं आले होते. डायरेक्ट सगळ्यांच्या समोर त्यांनी तिला मागणी घातली. तिच्या वडिलांशी, आम्हा मित्र-मैत्रिणीशी पण चर्चा केली. त्या वयस्कर मीना नर्सने पण त्याना दुजोरा दिला. आणि जोकरला पण मनापासून विनोद आवडत होता हे तिच्या चेहऱ्या वरून दिसतच होते. चला. विनोदच्या आईवडिलांनी दोघांच्या एंगेजमेंटचा दिवस 15 दिवसांनी येणारा गुढी पाडव्याचा मुहूर्त नक्की केला. आम्हाला तिकडेच आमंत्रण दिले. जोकरला शकुनाची साडी, श्रीफळ दिले. आम्ही तिच्या आईला आणि रेवतीला  विडिओ कॉल करून समारंभात सामील केले होते. भावी वधुवरांनी  सगळ्यांना वाकून नमस्कार केला. सगळ्यांनी काका काकूंना मनापासून धन्यवाद दिले. काकूंच्या पडण्यामुळेचं तर आज मिस जोकरची मिसेस विनोद धमाले झाली होती.

समाप्त!

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

ही मिस् जोकर अग इतकी सोन्यासारखी पोर. हो मी पोरच म्हणते माझी तिला.स्वतःच्या कुटुंबासाठी झिजली. भावाला शिकवले. परदेशी पाठवले. तो गेला तो गेलाच. लग्न केले. तिकडेच स्थायिक झाला. बहिणीचे मोठ्या घरात सालंकृत कन्यादान केले. दोघेही आपापल्या संसारात सुखी आहेत. पण आईबापांकडे बघणार कोण? आहे मिस जोकर. हक्काची सगळ्यांसाठी राबणारी तिचा विचार कोण करतो? आई आज दीड वर्ष अंथरुणात. तिचं सगळे करुन ही आपली ड्युटी हसतमुखाने करते. कधी उशीरा येणं नाही कि लवकर जाणं नाही. हॉस्पिटल मध्ये सगळ्यांना हवीहवीशी वाटते. अर्धे अधिक पेशंट औषधापेक्षा हिच्या बोलण्यानेच सुधारतात. त्यांच्या नातेवाईकाना  धीर मिळतो. मध्यंतरी  दोन, तीन मानसिक रुग्ण केवळ आणि केवळ हिच्यामुळेच सुधारुन ठणठणीत होऊन घरी गेले. विनोद धमाले म्हणून एक मुलगा चांगला शिकलेला, चांगल्या हुद्यावर नोकरीला. तुमच्या भाषेत व्हेलसेटल. डिप्रेशन मध्ये होता. हिच्यामुळे सुधारुन खडखडीत बरा झाला. त्याचे आई वडील इतके खुश झाले. हिची वागणूक, चालचलन बघून हिला मागणी घातली. पण हिचे आपले ‘मला लग्न करायचं नाही. रुग्णाची सेवेतच मी आयुष्य घालवणार. हाच  माझा संसार हेच माझं सुख.आता तु तरी तिला समजावून सांग.”

इतक्यात दुसरी एक नर्स धावत आली. “सिस्टर लवकर चला. चिल्डर्न वॉर्ड मधली तीन नंबर  बेबी दूध, इंजेक्शन, काही घ्यायला, झोपायला तयारच नाही. तिला मिस जोकरच पाहिजे गाणे म्हणून झोपवायला. तिचा ताप पण चढतोय. चला लवकर”

“असंच आहे बघ इथे. त्या मिस जोकर  शिवाय इकडे कोणाचं  पान हलत नाही. अशाने तिला विश्रांती मिळत नाही. ह्याचा विचार ती स्वतः तर करत नाहीच पण हे लोक पण करत  नाही.”

क्रमशः….

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

फोन नं.8425933533

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

स्वागतिकेला विचारले, ” मिस् जोकर कोण, कुठे ,कधी भेटेल मला? काका कुठे आहेत आता?”

ती म्हणाली, “आमच्या मुख्य  नर्स म्हणजे ‘मिस् जोकर’.आता येतील ड्युटीवर इतक्यातच.येताना काकांना पण घेऊन येतील.फार प्रेमळ, उत्साही, परोपकार आणि मुख्य म्हणजे विनोदी आहेत.त्या आपल्या विनोदाने, मस्करी ,मज्जा करुन पेशंटचे अर्धे आजार बरे करतात आणि त्यांच्या नातेवाईकांचं  अर्धे टेन्शन.”

इतक्यांत “Good morning everybody” म्हणत एक चाळीशीची एक गोरी, सडसडीत, हसतमुख बाई काकांबरोबर येताना दिसली. हीच ती माझी आणि स्वागतिकेची ‘मिस जोकर.’

मला बघितल्यावर चक्क मला तिने मिठीच मारली. तिला जुनी ओळख पटली. जवळपास पंधरा वर्षानी आम्ही भेटलो. मला म्हणाली, “मी वाॅर्ड मध्ये रोजची फेरी  मारुन येते. सगळे पेशंट बघून येते. मग निवांत आपण बोलू या.”

मी काकांना विचारले “काय काका, काल कुठे होतात तुम्ही?” काका म्हणाले ”काल तुम्ही सगळे गेलात.पण मला तुमच्या काकूंना सोडून जायला मन तयार होईना. मग बसलो इकडेच. नाहीतरी घरी जाऊन भुतासारखा हिच्याशिवाय  एकटा रात्र कशी काढणार? पण रात्री ह्या मुख्य नर्स बाई आल्या. त्यानी बळेबळेच मला स्वतःच्या रुम वर नेले. गरम गरम जेवू घातले. झोपण्याची व्यवस्था केली. आता सकाळी पण नाश्ता वगैरे दिला. आणि इकडे घेऊन आल्या. वर बजावले जोपर्यंत काकू इकडेअॅडमिट आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या कडे रहायचे अगदी निःसंकोचपणे. तुमच्या मुलीकडे आहात असे समजा”.

थोड्या वेळाने मुख्य नर्स बाई राऊंड मारुन सगळ्या पेशंटची विचारपूस करून त्यांना जरुरीनुसार सुचना देऊन आल्या. मला म्हणाल्या, ” चल ग आपण चहा घेत घेत दहा पंधरा मिनीटे गप्पा मारुया. “मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी तिला विचारले, “तु एक नंबरची टवळी. ह्या सिरीयस आणि तुझ्या स्वभावाशी विसंगत अशा पेशाकडे कशी काय वळलीस”.

मग ति सांगू लागली, “मी घरच्या परिस्थितीमुळे इंटरनंतर  काॅलेज सोडले नर्सिंगचा कोर्स घेतला. मला काय लग्न संसारात फारसा रस नव्हता. पण समाजासाठीं काही करण्याची मनापासून इच्छा होती. खरं तर डाॅक्टरी पेशा मला फार प्रिय. पण ते होणं परिस्थितीने आणि बुध्दीमतेने पण शक्य नव्हते. म्हणून मग परिचारिका बनून लोकांची सेवा करु.असा विचार केला आणि स्विकारला. “ह्या जोकरला इतके गंभीरपणे बोलताना मी पहिल्यांदाच बघत होते.”

त्या दिवशी मनात असून पण मार्च महिना, इयर एंडिंग म्हणून दांडी तर मारू शकत नव्हते. ठरवले रात्री झोपायलाच जाऊ या. काकूंना सोबत आणि त्यांच्या बरोबर निवांत गप्पा पण होतील. सकाळी  घरी सगळ्यांची व्यवस्थित रात्रीच्या जेवणखाणाची तयारी करून रात्री परस्पर बँकेतून हॉस्पिटल मध्ये गेले. काकूंशी गप्पा मारल्या. बाहेर सोफ्यावर झोप येईपर्यंत वाचत बसले.  रात्रपाळीच्या नर्सची स्टाफची कामे चालूच होती. माझ्याशी मधे मधे गप्पा मारायला मला कॉफी, हवे नको विचारायला आस्थेने येत होत्या, कारण मी त्यांच्या ‘मिस जोकरची’ मुख्य नर्सबाईंची मैत्रिण होते ना.

मीना म्हणून एक वयस्कर नर्स माझ्याशी गप्पा मारायला बसली., “ताई, ताई म्हटले तर चालेल ना तुम्हाला?” माझ्या होय नाहीची वाट न बघता पुढे बोलू लागली. ” ताई तुम्ही, तुमची मिस जोकर माझ्या मुलीसारख्या म्हणून जीव तुटतो. इतकी सुंदर,शालिन मुलगी. साऱ्या करिता धडपडते, झटते.”

क्रमशः…

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print