श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग ☆ सन्मानचिन्ह ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
बर्याच दिवसात शरद भेटला नव्हता. आज वेळ होता म्हणून त्याच्याकडे गेलो. शरद माझा जिगरी दोस्ती. शाळेपासूनचा. नेहमी काळ्यावर पांढरे करत असतो. अलीकडे साहित्य क्षेत्रात त्याचे चांगले नाव होऊ लागले आहे.
त्याच्या घरात गेलो आणि दिवाणखान्यातील शो-केसने लक्ष वेधून घेतले. तिथे दहा-बारा साहित्य संस्थांनी दिलेली सन्मानचिन्हे व्यवस्थित मांडून ठेवलेली होती. मी थोडसं रागावूनच शरदला विचारलं, ‘अरे, इतक्या वेळा तुझा सन्मान झाला, तुला इतके इतके पुरस्कार मिळाले, एकाही कार्यक्रमाला तुला दोस्ताला बोलवावसं वाटलं नाही? आम्ही आलो असतो, टाळ्या वाजवायला.’
तो म्हणाला, ‘कार्यक्रम झालाच नाही.’
‘म्हणजे?’ आता चकीत व्हायची वेळ माझी होती.
‘हे सन्मानचिन्ह बघ.’ त्याने एका मोमेंटोकडे बोट दाखवलं.
अक्षर साहित्य संस्थेने दिलेले सन्मानचिन्ह होते ते. मला काहीच कळेना. मग त्याने कागदाची एक चळत माझ्यापुढे केली. वरचं पत्र अक्षर साहित्य संस्थेचं होतं. त्यात लिहीलं होतं, ’आपल्या साहित्य सेवेबद्दल आम्ही आपल्याला सन्मानित करू इच्छितो. पुरस्कारात आपल्याला शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख ५००० रुपये दिले जातील. कृपया आपली स्वीकृती लगेच कळवावी.’
‘मग?’
‘मी माझी स्वीकृती लगेच कळवली. रात्री संस्थेच्या अध्यक्षांचा फोन आला. ‘आपण २०,००० चा चेक पाठवून संस्थेचे संरक्षक सभासद व्हावे. म्हणजे आपल्याला पुरस्कृत करणे आम्हाला सोयीचे जाईल.’ विचार केला, इतके पैसे भरणं काही आपल्याला जमणार नाही. पण संस्थेची इच्छा आहे मला सन्मानित करण्याची, तर आपण त्यांच्या इच्छेचा आदर करून त्यांच्या नावाचे सन्मानचिन्ह बनवून घ्यावे. ही दुसरीही पत्रे बघ, वेगवेगळ्या साहित्य संस्थांची. फरक इतकाच की प्रत्येकाची वेगवेगळ्या रकमेची मागणी आणि देऊ केलेली पदे वेगवेगळी. म्हणजे कुठे आजीव सभासद, कुठे संस्थेचे अध्यक्षपद, कुठे विश्वस्त. मी त्या त्या संस्थेच्या इच्छेनुसार माझ्या खर्चाने , सन्मानचिन्ह बनवली. त्यांना या पत्रांचा आधार आहे. पण हे काम खूपच कमी खर्चात झालं.’
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈