मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-5 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

 ☆  जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-5 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

दर पंधरा दिवसांनी डॉक्टर त्याचे चेकिंग करत होते. त्याचा आता छान प्रतिसाद मिळत होते. त्याचं डोकं आता दुखत नव्हते व जखमही बरी होत आली.असंच वर्ष पार पडलं आणि मग त्याला डॉक्टरांनी दहावीच्या परिक्षेला बसण्याची परवानगी दिली. त्याची शाळाही नीट सुरू झाली.

त्याने मनापासून अभ्यास केला आणि तो परिक्षेला बसला. त्याला ८८टक्के मार्क पडले. मग त्याने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्स साईडला प्रवेश घेतला. त्याने छान प्रगती केली. त्याला बारावीला ८५टक्के मार्क पडले. मग त्याने कॉमर्सची डिग्री करता करता सी.ए.ची (एन्ट्रन्स) प्रवेश परिक्षा दिली. ती तो पास झाला. नंतर सी.ए. च्या पुढील परिक्षा व बी.कॉम. चीही डिग्री परीक्षा सर्व चागल्या मार्कांनी पास झाला. त्याने सी.ए.ला ८०टक्के व बी.कॉम.ला ८२टक्के मार्क पडले. नंतर त्याने बाबांच्या ओळखीच्या एका सी.ए. च्या हाताखाली अनुभवासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोडी थोडी कामंही करायला सुरुवात केली.

विश्वासराव व त्यांचा मित्र यांच्या म्हणण्यानुसार त्याने ८-१० ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. तिथे त्याची तिथे संगणकाची व लेखी परिक्षा चांगली होत असे. पण तोंडी परिक्षेत त्याला काही नीट उत्तरं पटकन देता आल्यामुळे त्याची निवड होत नव्हती. त्यामुळे तो थोडा नाराज झाला. नोकरीचा नाद सोडून देतो असे म्हणू लागला. पण त्याचे मित्र, आई, बाबा, शिक्षक, त्यांच्या बरोबर काम करीत असलेल्या सर्वांनी व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या बाबांच्या मित्रांनी त्याची समजूत काढली. नंतर त्याने एका कंपनीचा अर्ज भरला. तिथे संगणकाच्या व लेखी परिक्षेत चांगल्या तऱ्हेने पास झाला. आणि मग त्याला त्या कंपनीने इंटरव्ह्यूला  बोलावल्यावर तो तिथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं थोडी थोडी हळूहळू दिली व काही ठिकाणी अडखळत बोलू लागला. तर त्यांना असे वाटले की तो घाबरत आहे. पण तसे नव्हते.मग तिथे एका अधिकाऱ्याला शंका आली म्हणून त्याने त्याचा बाकीचा परफॉर्मन्स पाहीला. सर्व सर्टिफिकेटस् पाहीली. तेव्हा, त्याला दहावीच्या वर्षी एक वर्ष गँप व डॉक्टरांच्या रजेच सर्टिफिकेट दिसलं. मग त्याने सर्व चौकशी केली. तेव्हा कळलं की त्याच्या बोलण्यावर ऑपरेशनचा परिणाम झाल्यामुळे तो असा बोलतो. मग त्याचा  स्पेशल केस म्हणून इंटरव्ह्यूमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं लिहून द्यायला सांगितले. ती सर्व बरोबर आली. आणि त्याला ती नोकरी मिळाली. पुढे त्याने ५-६वर्षे नोकरी केली. नंतर त्याने स्वतः ची फर्म काढली. त्याला अनुरूप, छानशी सहचारिणी मिळाली. त्यांच्या सहजीवनाची बाग प्रज्ञा व अमोल या दोन फुलांनी फुलली. आणखी काय हवे! झाली पहा परिपुर्ती.

समाप्त.

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-4 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

 

☆ जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-4 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

दिड वाजता आजी-आजोबा व काकू जेवणं आटोपून दवाखान्यात आली. त्यांनी आपण दवाखान्यात थांबतो म्हणून सांगून विश्वासराव, नमिता, व काकांना घरी पाठवले. ती घरी गेली जेवली. सर्वांनी थोडावेळ विश्रांती घेतली. साडेचारला विश्वासराव कामावर गेले. जाताना त्यांनी नमिताला दवाखान्यात सोडले. तिने चहा आणला होता. तो सर्वांनी घेतला. दिपक त्याचवेळी शुध्दीवर यायला लागला होता. पण डॉक्टरांनी त्याला परत विश्रांती मिळावी म्हणून पेनकिलर व सलाईन लावले. रात्री परत विश्वासराव व काका दवाखान्यात थांबले व आजी-आजोबा, काकू, नमिता घरी गेली. मंगळवारी सकाळी १० वाजता गाठीचे रिपोर्ट आले. त्यात काहीच दोष निघाला नाही. त्यामुळे सर्वजण निश्चिंत झाली. मग डॉक्टरांनी दिपकला जखम भरून येण्याची व आराम मिळेल अशी औषधे सुरू केली. त्याला मंगळवारपासून हळूहळू जेवणही नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आले. तो नीट उठून आपापला हिंडूफिरू लागल्यावर १० दिवसांनी सर्व नीट चेकिंग करून टाके काढून औषधांच्या व इतर सुचना देऊन घरी सोडले. त्यावर्षी त्याला शाळेतील दहावीच्या परिक्षेला बसू नको म्हणून सांगून गँप घेण्यास सांगितले. वर्षभर दिपकला डॉक्टरांची ट्रिटमेंट सुरू होती. डॉ. वझेंनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या बोलण्यावर थोडासा परिणाम झाला होता. फार नाही पण काही जोडाक्षरे तो पटकन उच्चारू शकत नसे व थोडा सावकाश बोलत असे. बाकी सर्व छान होते. दर पंधरा दिवसांनी डॉक्टर त्याचे चेकिंग करत होते. आता त्याचा प्रतिसादही छान मिळत होता.

क्रमशः….

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – धन्य सेवक ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – धन्य सेवक ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? लघु बोध कथा?

कथा १८. धन्य सेवक

अनंतपुर नावाच्या नगरात कुंतिभोज नावाचा राजा राज्य करत होता. एकदा तो आपले मंत्री, पुरोहित व इतर सभाजनांसह सभेत  सिंहासनावर बसला होता. त्यावेळी कोणी एक हातात शस्त्रास्त्रे असलेला क्षत्रिय सभेत येऊन राजाला प्रणाम करून म्हणाला, “महाराज, मी धनुर्विद्येचा खूप अभ्यास केलेला आहे. पण मला कोठेही काम न  मिळाल्याने  दुःखी आहे म्हणून आपणा जवळ आलो आहे.”  राजाने त्याला रोज शंभर रुपये वेतन देण्याचे कबूल  करून स्वतःजवळ ठेवून घेतले.  तेव्हापासून तो रात्रंदिवस राजभवनाजवळ वास्तव्य करत होता.

एकदा राजा रात्रीच्या समयी राजवाड्यात झोपला असताना कोण्या एका स्त्रीचा आक्रोश त्याला ऐकू आला. तेव्हा त्याने त्या क्षत्रिय सेवकाला  बोलावून त्याबद्दल चौकशी करण्यास सांगितले.  त्यावर सेवक म्हणाला, “ महाराज,  गेले दहा दिवस मी हा आक्रोश ऐकतोय. पण काही कळत नाही. जर आपण आदेश दिला तर मी याविषयी माहिती काढून येतो.”  राजाने त्याला त्वरित परवानगी दिली. हा सेवक कुठे जातो हे बघण्याच्या विचाराने राजा वेषांतर करून त्याच्या पाठोपाठ जाऊ लागला.

एका देवीच्या देवळाजवळ जवळ बसून रडणारी एक स्त्री पाहून सेवकाने विचारले, “तू कोण आहेस? का रडतेस?”  तेव्हा ती स्त्री म्हणाली, “मी कुंतिभोज राजाची राजलक्ष्मी आहे. तीन दिवसांनंतर राजा मृत्यू पावणार आहे. त्याच्या निधनानंतर मी कुठे जाऊ?  कोण माझे रक्षण करील?  या विचाराने मी रडत आहे.” “राजाच्या रक्षणार्थ  काही उपाय आहे का?”  तसे सेवकाने पुन्हा पुन्हा विचारल्यावर ती स्त्री सेवकाला म्हणाली, “जर स्वतःचा पुत्र या दुर्गादेवीला बळी दिलास तर राजा चिरकाळ जगेल.” “ठीक आहे.  मी आत्ताच पुत्राला आणून देवीला बळी देतो” असे म्हणून सेवकाने घरी येऊन मुलाला सगळा वृत्तांत सांगितला. पुत्र म्हणाला, “तात, या क्षणीच  मला तिकडे घेऊन चला. माझा बळी देऊन राजाचे रक्षण करा. राजाला जीवदान मिळाले तर त्याच्या आश्रयाला असणारे अनेक लोक सुद्धा जगतील.”

सेवकाने मुलाला देवळात नेऊन त्याचा बळी देण्यासाठी तलवार काढली. तेवढ्यात स्वतः देवी तिथे प्रकट झाली व सेवकाला म्हणाली, “तुझ्या साहसाने मी प्रसन्न झाले आहे. मुलाचा वध करू नकोस.  इच्छित वर माग.”  सेवक म्हणाला, “ हे देवी, कुंतिभोज राजाचा अपमृत्यू  टळून त्याने चिरकाळ प्रजेचे पालन करीत सुखाने जगावे असा मला वर दे.” “ तथास्तु!”  असे म्हणून देवी अंतर्धान पावली.  त्यामुळे खूप आनंदित झालेला सेवक मुलाला घरी ठेवून राजभवनाकडे निघाला. इकडे वेषांतरित राजा घडलेला प्रसंग पाहून सेवकाच्या दृष्टीस न पडता राजभवनात उपस्थित झाला. सेवक राजभवनात येऊन राजाला म्हणाला, “महाराज, कोणी एक स्त्री पतीशी भांडण झाल्याने रडत होती. तिची समजूत काढून तिला घरी सोडून आलो”. राजा त्याच्या ह्या उपकारामुळे खूप खुश झाला व त्याने सेवकाला सेनापतीपद बहाल केले.

तात्पर्य – खरोखरच श्रेष्ठ सेवक आपल्या स्वामीवर ओढवलेल्या संकटाचे निवारण करताना प्राणांची सुद्धा पर्वा करीत नाहीत.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-3 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-3 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

विश्वासराव एक यशस्वी उद्योजक होते. त्यांचा बिल्डणली. रक्ताची सोय केली. व दिपकच्या शाळेत त्याच्या शिक्षकांना त्याच्या आजाराची व ऑपरेशनची सर्व माहिती  सांगितली. गैरहजेरीचा एक महीन्याचा अर्ज लिहून दिला. मग त्यांनी दिपकला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारी सकाळी७वाजता दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉ. सानेंनी दिपकला ऑपरेशनची सर्व कल्पना दिली. मगच ते तयारीला लागले.ऑपरेशन करणार हे ऐकून दिपकही थोडा घाबरला. पण आईशी बोलल्यावर तो शांत झाला. विश्वासराव ९.३० वाजता दवाखान्यात आले. ते डॉ. सानेंना जाऊन भेटले. तेथे डॉ. वझे. व डॉ. सतीश देवही हजर होते. त्या सर्वांशी विश्वासरावांच बोलणं झालं. औषधे यादीप्रमाणे आहेत की नाही ते पाहीले. लगेचच लागणारी औषधे काढून घेतली व बाकीची विश्वासरावांना परत दिली. तेवढ्यात भूल देणारे डॉ. कोदेही आले. दिपकला १०.३० लाऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.

बाहेर नमिताचा व इतर सर्वांचा सारखा ‘ओम नमःशिवाय’ चा जप सुरू होता. नमिता मनातून थोडी घाबरली होती. पण ती तशी खंबीर होती. तब्बल तीन तासांनी ऑपरेशन संपले. डॉ. वझेंनी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येऊन ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचे सांगितले. थोड्या वेळाने डॉ. साने, व डॉ. देव ही बाहेर आले. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकले. एक काळजी थोडी कमी झाली.

अर्ध्या तासाने दिपकला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणले. ऑपरेशनच्यावेळी त्याला रक्त व सलाईन चालू होते. सलाईन नंतरही चालूच होते. त्याला शुद्धीवर यायला बराच वेळ लागणार होता. कारण ऑपरेशन तसं मेजर व त्यात रिस्कही खूप होती. गाठीचा रिपोर्ट आल्याशिवाय पुढील औषधोपचार करता येणार नव्हते. दिपकला आय.सी.यू. मधेच ठेवण्यात आले.

क्रमशः….

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-2 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-2 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

रात्री कामावरून आल्यावर त्याला आजोबांनी परत ह्या गोष्टीची आठवण करून दिली. तेव्हा मग त्यांनी त्या द्रुष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली. विश्वासनी आपली कामं हाताखालच्या माणसांना आखून दिली. मग त्याला थोडा मोकळा वेळ मिळाला.

दिपकला प्रथम विश्वासरावांनी त्यांच्या फँमिली (डॉ.साने.)डॉक्टरांना दाखवले. त्यांना सर्व तपासण्या केल्या. नाक, कान, घसा, छाती याची तपासणी केली. रक्त, लगवी, थुंकी हे पण तपासले. एक्स-रे काढले. ह्या सर्व तपासणीत काहीच निघाले नाही. या सर्व गडबडीत २-३ दिवस गेले. काहीच निदान नीट होत नव्हतं. सर्व रिपोर्ट तर नॉर्मलच येत होते. त्यामुळे डॉक्टरांनी फक्त डोकेदुखी तात्पुरती कमी होण्यासाठी तेवढ्या गोळ्या लिहून दिल्या. कुणालाच काही सुचत नव्हते.

“ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय” सारखा नमिताचा, आजोबांचा जप सुरू होता. आजींनी तर देव पाण्यातच ठेवले होते. सर्वजण बेचैन होते. सर्वांची शंकरावर त्यांच्या कुलदैवतावर अपार श्रद्धा होती. सर्वजण त्याचीच आराधना करत होते. सगळे काळजीत बुडून गेले होते.

नवससायास करून झालेला कुलदिपक आजारी होता. कितीही पैसे खर्च करण्याची विश्वासरावांची तयारी होती. पण खरे आजाराचे निदान होत नव्हते. आज दिपकचं डोक थोड कमी दुखत होतं आणि दिपकचे काका दिपकजवळ दवाखान्यात थांबले होते. म्हणून नमिता-विश्वास दोघेही घरी आली होती. थोडी विश्रांती घेऊन विश्वास जरा कामावर चक्कर टाकून येणार होता. आणि नमिता स्वयंपाक करून जेवणाचा डबा घेऊन दवाखान्यात जाणार होती. तेवढ्यात दवाखान्यातून दिपकच्या काकांचा फोन आला. डॉ. सानेंनी दिपकचे ‘सिटिस्कँन’ करण्याचे ठरवले होते व त्याच्या मेंदूची तपासणी करण्यासाठीही डॉ. वझे यांना मेंदूच्या स्पेशालिस्टना कॉल केला होता. विश्वासने फोन ठेवला आणि परत दवाखान्यात जाण्यासाठी तयार होत असतानाच त्यांनी नमिताला हाक मारली,

“नमिताs, नमिता अगं, चल आवर लवकर. परत दवाखान्यात जायला हवं. दिपकला तपासायला मेंदूचे स्पेशालिस्ट डॉ. वझे येणार आहेत. त्याच सिटिस्कँनही करणार आहेत. आई-बाबाss आम्ही येतो हो.”

नमिता दहा मिनिटात जेवणाचा डबा भरून घेऊन तयार झाली. विश्वासने ड्रायव्हरला गाडी बाहेर काढायला सांगितली. २५-३०मिनीटात दोघेही दवाखान्यात हजर झाली. आत जाऊन पाहतात तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तयारी सुरू होती. वॉर्डबॉयच्या मदतीने दिपक स्ट्रेचरवर झोपला व सिटिस्कँन करायला घेऊन गेले. त्याचबरोबर त्याच्या मेंदूचेही फोटोही काढले. सर्व तपासणी नीट झाल्यावर डॉक्टर बाहेर आले. त्यांनी विश्वासरावांना व काकांना कंन्सल्टींग रुममध्ये बोलावून घेतले. थोड्यावेळाने दिपकला त्याच्या रुममध्ये वॉर्डबॉयनी आणून सोडले. त्याच्याजवळ नमिता थांबली आणि विश्वासराव व दिपकचे काका डॉक्टरांबरोबर गेले. डॉ. वझे व डॉ. साने दोघे कन्सल्टींग रुममध्ये होते. त्यांनी दोघांना तिथे खुर्चीवर बसवून घेतले व कॉंम्प्युटरवर मेंदूचा फोटो दाखवून एका ठिकाणी छोटीसी लिंबाएवढी लहान गाठ दिसत होती. ती पॉइंटिंग करून दाखवली. आणि डॉ. वझे विश्वासरावांना म्हणाले,

“दिपकचं ऑपरेशन करून ही गाठ काढायला हवी. त्या गाठीची तपासणी करायला हवी.

 क्रमशः….

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आपला हिस्सा (अनुवादीत कथा) ☆ मूळ कथा – अपना हिस्सा – श्री विजय कुमार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ ☆ आपला हिस्सा (अनुवादीत कथा) ☆ मूळ कथा – अपना हिस्सा – श्री विजय कुमार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

‘अरे यार, या सुमेशला काय म्हणावं तरी काय? इकडे डायबेटीस आहे, पण आपल्या हिश्श्याची मिठाई काही सोडत नाही. बघ .. बघ… तिकडे बघ… रसगुल्ला आणि बर्फीचे दोन पीस उचलून गुपचुप आपल्या पिशवीत ठेवलेत.’ विनोदाची नजर सुमेशकडे लागली होती.

‘मुलांसाठी घेतली असेल. आपल्याला काय करायचय.’ मी म्हंटलं, ’तू आपला खा. पी. आणि पार्टीची मजा घे.’

‘याला कुठे लहान मुले आहेत? म्हणजे एक-दोन पीसमध्ये खूश होऊन जातील.’ विनोद म्हणाला. ‘बघ .. बघ… आता समोसा पिशवीत ठेवतोय. मोठा कंजूष माणूस आहे. जे खाल्लं जात नाही, ते लोक प्लेटमधे तसंच ठेवतात. पण हा कधी टाकत नाही. कुणास ठाऊक, घरी जाऊन काय करतो त्याचं?’

‘काय वाटेल ते करेल. त्याची मर्जी. त्याच्या वाटणीचं आहे ते सगळं. तुझंसुद्धा लक्ष ना, या असल्याच गोष्टींकडे असतं.’

‘ते बघ! तो सगळं सामान घेऊन चाललाय. बघूयात काय करतोय!’ विनोद हेरगिरी करण्याच्या मागे लागला.

‘जाऊ दे ना रे बाबा,’ मी टाळाटाळा करत म्हंटलं.

‘चल रे बाबा,’ म्हणत त्याने मला जवळ जवळ ओढतच बाहेर नेलं।

बाहेर आल्यावर आम्हाला दिसलं, रसगुल्ला, बर्फी, सामोसे वगैरे घातलेली पिशवी, गेटपाशी उभ्या असेलया दोन मुलांकडे देत होता. ती मुले जवळच्याच झोपडीत रहात होती आणि आस-पास खेळत होती.

मी म्हंटलं, ‘ बघ! आपल्या हिश्श्याचा उपयोग याही तर्‍हेने करता येतो. ‘ विनोद काही न बोलता नुसता उभा होता.

 

मूळ कथा – ‘अपना हिस्सा’ –   मूळ  लेखक – श्री विजय कुमार,

सह संपादक ‘शुभ तारिका’ (मासिक पत्रिका), अंबाला छावनी 133001, मोबाइल 9813130512

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-1 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

 ☆ जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-1 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

यंदा दिपक दहावीला होता. एकुलता एक लाडका हुशार मुलगा. त्यामुळे घरात तसेच शाळेतही त्याच्याकडून सर्वांच्या अपेक्षा खूप होत्या. तो शाळेच्या निवडक मुलांच्या बँचमध्येही होता. ह्या बँचचा खुपसा पोर्शन शाळेत व क्लासमध्येही शिकवून झाला होता. जूनमध्ये शाळा सुरू झाली आणि दोन महीने झाल्यावर शाळेत दिपकची पहिली चाचणी परिक्षा झाली. ह्या परिक्षेचे पेपर निवडक मुलांसाठी वेगळे होते. त्यांना आतापर्यंत शिकवून झालेल्या सर्व अभ्यासक्रमावर आधारित होती. त्या परिक्षेत दिपकला नेहमीपेक्षा खूप कमी मार्क पडले. हल्ली त्याची सारखं डोकं दुखत असल्याची तक्रार सुरू होती. पण ते सर्दीमुळे किंवा अभ्यासाच्या ताणामुळे असेल असे वाटून थोडे दुर्लक्ष केले गेले. मार्क कमी पडल्याने त्याला आईबाबांचा व शाळेत शिक्षकांचाही फार ओरडा खावा लागला. पण दिपकच्या आजीआजोबांच्या मनाला मात्र ही गोष्ट फार खटकली. कारण दिपक हा फार सिन्सिअर मुलगा, उगीचच नाटकं करणारा नव्हता. आणि ते दोघेही जास्त वेळ घरात असल्याने त्यांनी त्याच्या डोकेदुखीचे निरिक्षण केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही डोकेदुखी थोडी वेगळी आहे. दिपकचं जेव्हा डोक दुखत असे तेव्हा तो फार बेचैन व अस्वस्थ होत असे. डोकं तो जोराने दाबुन धरत असे, आणि चेहराही फार विचित्र करत असे. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत असे. थोड्या वेळानं वेदना कमी झाल्यावर मग तो ठिक असे. त्याला केव्हातरी किरकोळ तापही येई. तापावरच औषध घेतले की तो उतरे. पण नंतर तो शांत असे. शाळेचा व क्लासचा अभ्यास तो कसातरी पुर्ण करत असे. जास्त खेळतही नसे.ही लक्षणं काही बरोबर नव्हती. काहीतरी योग्य पावलं उचलायला हवी होती. नाहीतर काही खर नाही, असे त्यांना वाटत होते. म्हणून ही गोष्ट त्यांनी विश्वासच्या म्हणजे दिपकच्या वडीलांच्या लक्षात आणून देण्याचे ठरवले. मग त्याच दिवशी दुपारी विश्वास जेवायला घरी आल्यावर विश्वासला जवळ बोलावून ते म्हणाले, “विश्वास मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे दिपकच्या बाबतीत. माझी एक गोष्ट ऐकशील का?”

“हो बाबा बोला. “विश्वास म्हणाला.

“अरे, दिपकचं हल्ली वरचेवर दुखतं. किरकोळ तापही असतो. त्याला, काही वेळा त्या वेदना सहन होत नाहीत. बाकी इतरवेळी तो ठिक असतो. पण मला काही ही लक्षण बरोबर दिसत नाहीत. त्याची लवकरच नीट तपासणी करायला हवी.” आजोबा म्हणाले.

“होय. ते माझ्याही लक्षात आलंय बाबा. पण या कामांमुळे वेळच मिळत नाही.” विश्वास म्हणाला.

“अरे, मग वेळ काढ. जरा बाजूला ठेव तुझी कामं. त्यांना विलंब झाला तरी चालेल. पण हे काम महत्त्वाचे आहे ते आधी कर.दिपकला एखाद्या चांगल्या डॉक्टराला दाखवून नीट इलाज लवकर व्हायला हवेत.” आजोबा म्हणाले.

“हो मी वे काढतो लवकरच.” असं म्हणून विश्वास परत कामावर गेला.

              क्रमशः

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ज्योतिष ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ ज्योतिष ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

ही श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे की निव्वळ योगायोग? कोणास ठाऊक!

माधवराव आपल्या एका मित्राबरोबर भावेंकडे गेले  होते. भावे एक प्रसिद्ध ज्योतिषी होते. मित्राचं काम  झालं आणि ते निघत  होते. तेवढ्यात भावेंनी  त्यांना थांबवलं आणि माधवरावांना सांगितलं, “काळजी घ्या. येत्या पाच दिवसांत तुम्हांला अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनापासून धोका आहे.”

“माझा असल्या थोतांडावर अजिबात विश्वास नाही. आताही मी यांच्याबरोबर आलोय.”

“हे एक शास्त्र आहे. माझा या विषयाचा गाढा अभ्यास आहे. मी बोललो त्यात तथ्य आहे. तुमच्या जिवाला धोका नाही ;पण दीड-दोन महिने तुम्ही अंथरुणाला खिळून राहणार.”

“मी पैज लावतो पाच हजार रुपयांची. तुमचं हे भविष्य खोटं पाडून दाखवतो. मी पाच दिवस घरातच बसून राहीन. मग कसा होईल अपघात?”

“मी हरलो आणि तुम्ही सुखरूप राहिलात, तर मला आनंदच होईल. ठीक आहे. आजपासून पाच दिवसांनी रात्री साडेअकरा वाजता मी तुमच्या घरी येईन  आणि हार स्वीकारून तुम्हाला पाच हजार रुपये देईन.”

चार दिवस कसेबसे गेले. पाचवा दिवस जाता जाईना. तिन्हीसांजेला तर माधवरावांचा धीरच सुटला.

“मी काय म्हणतो, मालू.मी अपघात टाळण्यासाठी  घरातच बसून राहिलो, तर ते चीटिंग होईल. त्यापेक्षा  मी खाली थोडं फिरून येतो. तरी अपघात झाला नाही, तरच ते भाकीत खोटं ठरेल, ना!”

“आणि काही झालं तर? विषाची परीक्षा कशाला घ्या.”

“कसलं विष आणि कसली परीक्षा! माझा असल्या थोतांडावर अजिबात विश्वास नाही. मी  जातो.”

मग मालूने मनिषला फोन लावला.

“बाबा, तुमचा विश्वास नाही, तसा माझाही विश्वास नाही या गोष्टींवर. पण चुकून बोलाफुलाला गाठ पडली आणि काही झालं तर? घरात तुम्ही दोघंच. मी यायचं म्हटलं तरी सात-आठ तास जाणारच आणि आता तर माझी परीक्षा चालू आहे. तुम्ही घरीच थांबा ना. थोडेच तास राहिलेत आता.”

शेजारचा छोटा अनय खेळायला आला होता. तो गोंधळूनच गेला. एकदा काकांकडे, एकदा काकूंकडे, एकदा फोनकडे बघता बघता खेळायचंही विसरला.

माधवरावांनी टीव्हीवर न्यूज लावल्या. आरडाओरडा, हाणामारी, लाठीमार…..

“अहो, त्या न्यूज बंद करा बघू. अनय बसलाय ना इथे.”

“अरे!काय कटकट लावलीय! माझ्याच घरात मला न्यूज ऐकायचीही चोरी?” माधवरावांचा चढलेला आवाज ऐकून अनय भेदरला.

“जा बाळा, तू आपल्या घरी,” मालूचे शब्द ऐकले मात्र, तो पळतच सुटला.

“घड्याळ बंद नाही ना पडलं? मघाशीपण अकराच वाजले होते.”

“अहो, तेव्हा अकरा वाजायला आले होते आणि आता अकरा वाजून गेलेत. असं मिनिटामिनिटाला घड्याळाकडे बघितलं तर हेच होणार ना! झोपा बघू तुम्ही. नसेल झोप येत, तर नुसते पडून राहा डोळे मिटून.”

बरोबर साडेअकरा वाजता बेल वाजली. माधवरावांची सगळी अस्वस्थता पळून गेली. एखाद्या लहान मुलासारखे ते टुणकन उठून बसले.

“भावे आले असणार पाच हजार रुपये घेऊन. ठरवलं की नाही त्यांचं ज्योतिष खोटं!”

आनंदाच्या भरात ते बेडवरून उतरले आणि दरवाजा उघडायला धावले.

अचानक त्यांचा पाय कशावर तरी पडला. ते घसरले आणि उताणे पडले. त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला ;पण त्यांना हलताही येईना.

मालूने दरवाजा उघडला. भावे आत आले. बघितलं तर माधवराव अनयच्या खेळातल्या मोटारीवरून  घसरून पडले होते.

अर्थात ही वेळ हार -जीत वगैरे विचार करायची नव्हती. भावेंनी डॉक्टरना फोन लावला. त्यांच्या सांगण्यावरून ऍम्ब्युलन्स मागवली आणि माधवरावांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

डॉक्टरांनी प्लास्टर लावलं. ‘दीड -दोन महिनेतरी ठेवायला लागेल’ म्हणाले.

माधवरावांना भावेंची क्षमा मागावीशी वाटत होती. पण त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता.

आणि भावे? त्यांना जिंकल्याचा आनंद झाला नव्हता. उलट आधी ठाऊक असूनही आपण भविष्य बदलू शकलो नाही, याच्या कितव्यांदा तरी आलेल्या प्रत्ययाने ते सुन्न झाले होते.

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गोपी – भाग – 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ जीवनरंग ☆  गोपी – भाग – 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

आमचा प्रवास सुरू होता. बाहेर घाटातून वळण घेत आमची टॅक्सी धावत होती. माझे मन सुद्धा कासावीस होऊन हेलकावे खात होते. या चिमुरड्याला काय वाटत असेल? “गोपी, भूक लागली का? बिस्किट खाणार की कुरमुरे खाणार?” संभाषण कसं वाढवायचं तेच मला समजत नव्हतं.

“नाही ग आत्या, भूक नाहीये.  मला ना, आमच्या तिथल्या छोट्या मांजराच्या पिला ची आठवण येते ग. तिकडे ना, दुपारी मी आणि तेच असायचो. त्याची आई त्याला सोडून गेली होती. मीच त्याला बशीतून दूध पाजत होतो. आता मी तर इकडे आलो. त्याला आता कोण दूध देणार?” माझा हात घट्ट दाबत गोपी मला विचारत होता.

त्याचे ते निरागस, प्रेमाचे बोल ऐकून मला भडभडून आलं. त्या पिल्लाची आणि गोपी ची अवस्था एकच होती.पण त्या पिलाची काळजी त्याला पोखरून टाकत होती. पिल्ला च्या आठवणीने तो व्याकुळ झाला होता. आपल्या पप्पां वरच्या गाढ विश्वासाने गोपी माझ्याबरोबर आला होता. त्याला खात्री होती, आपण आता सुखरूप आहोत. आजी-आजोबा आपली वाट पाहत आहेत. त्यांना भेटायला त्याचे मन अतुर झाले होते. तेवढेच पिल्लाच्या आठवणीने त्याचे मन  कातर ही होत होते.

खरच, ही साधी जाणीव मोठ्यांमध्ये का बरे नसावी? तू तू, मै मै च्या जमान्यात प्रेम, आपुलकी, ओढ, मायेचा ओलावा  कसा मिळवायचा या फांदीवरून कोसळणार्‍या नाजूक फुलांनी?

क्रमशः —-

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गोपी – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ जीवनरंग ☆  गोपी – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

छोट्या निरागस गोपी बरोबर माझा मुंबई-पुणे टॅक्सीतून प्रवास सुरू होता. वयानं लहान असला तरी अनुभवानं तो खूप मोठ्या झाल्याचा मला जाणवत होतं. आपली छोटीशी बॅग अगदी पोटाशी कवटाळून मला चिकटून बसला होता.. “आत्या, तू तरी मला आता सोडून जाऊ नको हं.” अशी विनवणी मला त्याच्या स्पर्शामध्ये जाणवत होती.

त्याच्या आई-बाबांच्या भांडणाची,वादावादी ची झळ गोपीला बसली होती. त्याला आपल्यापाशी आणण्याची त्याच्या पप्पांची धडप ड त्यांनी जवळून पाहिली होती. त्यालाही पप्पांचा आधार हवा होता.त्यांच्या मायेची उब त्याला लपेटुन घ्यायची होती. पप्पां कडेच तो राहणार होता. त्याला खात्री होती, तो पप्पांकडे आला की आजी आजोबा तिकडेच येणार. त्यांच्या बरोबर राहायला मिळणार म्हणून तो मनोमन खुश होता, आनंदात होता.

कोर्टा मधल्या त्या विचित्र, नकोशा वाटणाऱ्या वातावरणात, काळ्या कोट वा ल्या वकिलांना, मोठ्या खुर्चीत बसलेल्या जज्ज अंकल ना त्यांनी निक्षून सांगितले होते, “मी माझ्या पप्पांकडे जाणार”. कोवळ्या वयातल्या त्या चिमुरड्या बोलांनी कोर्टातल्या सगळ्यांचे डोळे पाणावले, मन हेलावलं आणि गोपी चा ताबा रीतसर त्याच्या पप्पांकडे आला.

कोर्टाचा निकाल इतका पटकन लागेल अशी गोपीच्या पप्पांना खात्री नव्हती. त्यांना आनंद झाला, पण वेगळाच प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. गोपी कडे आता घरी कोण लक्ष देणार? आजी-आजोबांना यायला तर हवं! म्हणून त्यांनी मला फोन करून बोलवून घेतलं.

क्रमशः —-

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print