मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तो चिडतो… आणि आता तो चिडत नाही… भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ तो चिडतो… आणि आता तो चिडत नाही… भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

“हॅलो, मंगेश का” तासाभरात काकूंचा आलेला तिसरा फोन.

“हो, काकू. बोला”

“अरे, एक सांगायचं राहिलं म्हणून परत फोन केला. तीन-चार रविवार ‘संडे डिश’ आल्या नाहीत. ”

“मी तर पाठवल्यात”

“मला नाही मिळाल्या. बहुतेक व्हाटसपचा प्रॉब्लेम झालाय. आता काय करू”

“घरातल्या दुसऱ्या कोणाचा नंबर सांगा. त्यावर पाठवतो. ”

“नको रे बाबा”

“का”

“लेकाला कळलं तर चिडेल आणि तुला फोन केलेला त्याला आवडणार नाही. ”

“मी अवीशी बोलतो”

“नाही. नको, फोनच्या प्रॉब्लेमविषयी रोज सांगतेय पण माझ्यासाठी कोणाला वेळच नाहीये. सगळे बिझी फक्त मीच रिकामटेकडी आहे आणि त्यात तू जर अवीला काही बोललास तर आमच्या घरात महाभारत होईल. ”

“तसं काही होणार नाही. तुम्ही नका काळजी करू. ”

“अवीला सांगण्यापेक्षा तूच फोन दुरुस्त करून दे ना. प्लीज. विनंती समज”

“असं परक्यासारखं का बोलतायं. ”

“म्हातारपण वाईट रे!! माझ्यामुळं सगळ्यांना त्रास होतो. वयामुळे विसरायला होतं. थोडावेळा पूर्वी बोललेलं लक्षात राहत नाही. पुन्हा पुन्हा तेच बोललं जातं”

“आत्ता घरात कोणी आहे का”मी विषय बदलला.

“सगळे बाहेर गेलेत म्हणूनच फोन केला. अवी परत यायच्या आत म्हटलं बोलून घ्यावं. आजकाल फार चिडचीड करतो. मला तर सारखं धारेवर धरलेलं असतं. हे कर, ते कर, असं करू नको, तसं करू नको. हेच चाललेलं असतं. तो घरात असला की फार टेंशन येतं. भीती वाटते. कसं वागावं हेच कळत नाही. ”काकू भावुक झाल्या. मलाही काय बोलावं हे सुचेना म्हणून विषय बदलण्यासाठी म्हणालो “एक उपाय आहे. ”

“अरे वा!! कोणता?”काकूंनी उत्साहानं विचारलं.

“व्हॉटसप डिलिट करून नवीन डाउनलोड करायचं. ”

“असं करता येतं. ”काकू 

“हो, एकदम सोपयं”

“मग तूच दे ना करून”

“त्यासाठी तुमचा फोन लागेल”

“अरे देवा!! मग रे”

“अवीला सांगतो”

“नको, तो चिडेल”

“मग सूनबाई”

“तिच्याविषयी न बोललेलं बरं”

“मग एखादी मैत्रीण, शेजारी, नातेवाईक वगैरे”

“ढीगभर आहेत पण अवीला कळलं तर तो चिडेल. ”

“मग काय करायचं तुम्हीच सांगा. ”

“सॉरी हं!!तुला खूप त्रास देतेय पण काय करू. हा फोन चांगला टाईमपास होता पण आता तो सुद्धा रागावला”

“अवीसारखा!!”माझ्या बोलण्यावर काकू दिलखुलास हसल्या.

“बरं ठेवते. दाराची बेल वाजतेय म्हणजे अवी आला. फोनवर बोलताना पाहिलं तर परत पन्नास प्रश्न विचारेल. ” काकूंनी घाईघाईत फोन कट केला.

 शालिनीकाकू, माझ्या मित्राची आई, वय सत्तरीच्या आसपास. तब्येतीमुळे घराबाहेर पडणं अवघड झालेलं. वेळ घालवण्यासाठी मोबाईल, टीव्ही हाच मोठा आधार. त्यात मोबाईल नीट काम करत नसल्यानं काकू अस्वस्थ.

स्पष्ट बोलल्या नसल्या तरी काकूंच्या वेदनेचा ठणका जाणवला. खूप बेचैन झालो. डोक्यात विचारांचा भुंगा सुरु झाला. कितीतरी वेळ फोनकडचं पाहत नुसताचं बसून होतो.

“काय झालं. असा का बसलायेस. ”बायकोच्या आवजानं भानावर आलो. काकूंविषयी सांगितल्यावर तीसुद्धा अस्वस्थ झाली. “हे नवीनच ऐकायला मिळालं.

“वयस्कर आईला धाकात ठेवायला काहीच कसं वाटत नाही. ”

“त्यांच्याही काही अडचणी असतील आणि फक्त एका बाजूनं विचार करू नकोस. ”

“तुला नक्की काय म्हणायचंयं”

“काकूंचं ऐकून लगेच मित्राला दोष देऊन मोकळा झालास. ”

“वस्तुस्थिती तीच आहे ना. काकू कशाला खोटं सांगतील. ”

“आणि अवीभाऊजी सुद्धा मुद्दाम असं वागत असतील हे वाटत नाही”

“तुला काय माहीत”

“नसेल माहिती पण भाऊजीची सुद्धा काहीतरी बाजू असेल ना. ”

“क्षणभर तू म्हणतेस ते मान्य केलं. काकूंच्या वागण्याचा त्रास होत असेल तरी त्यांच्या वयाचा विचार करता घरातल्यांनी समजून घ्यायला काय हरकत आहे. थोडी अडजेस्टमेंट करावी. ”

“शंभर टक्के मान्य पण एक सांग आजकाल आपण सगळेच एकाच वेळी अनेक फ्रंटवर लढतो. वेगवेगळ्या अडचणींना तोंड देताना वारंवार तडजोडी कराव्या लागतात. इच्छा नसताना मन मारावं लागल्यामुळे चिडचिड होते. ऑफिसमध्ये बोलता येत नाही. मग वड्याचं तेल वांग्यावर निघतं” 

“म्हणजे”

“घरातली लहान मुलं आणि म्हातारी माणसं म्हणजे सॉफ्ट टार्गेट.. म्हणून त्यांच्यावर राग निघतो. त्यातल्या त्यात म्हाताऱ्यांवर जरा जास्तच…”

“खरंय तुझं. यात अवीची सुद्धा काही बाजू असेल याचा विचारच हा केला नव्हता. बरं झालं तुझ्याशी बोललो. कधीही एका बाजूनं विचार करू नये. हा चांगला धडा मिळाला. ”

‘तेच तर सांगायचं होतं. नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा देखील विचार करावा. ”

“मग आता??”

“अवीभाऊजीना फोन कर”

“त्याच्याशी डायरेक्ट बोललो तर काकूंना त्रास होईल. ” 

“त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐक. तुझ्या पद्धतीनं समजावून सांग आणि तसंही भाऊजी काकूंवर चिडतातच फार तर अजून जास्त चिडचिड करतील. ”एवढं बोलून बायको किचनमध्ये गेली आणि मी अवीचा नंबर डायल केला रिंग वाजत होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चार बालकांची कथा – हिन्दी लेखक : श्री घनश्याम अग्रवाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ चार बालकांची कथा – हिन्दी लेखक : श्री घनश्याम अग्रवाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर  

(असं म्हणतात की ज्या दिवशी मूल जन्माला येते, त्याच दिवशी त्याची आई पण जन्म घेते. त्यामुळेच जेव्हा ‘मदर्स डे’ असतो, त्याच दिवशी अघोषित असा ‘शिशु दिवस’ही असतो. त्याला अनुलक्षून ही व्यंग कथा. चार मुलांच्या वेगवेगळ्या कथा, पण एकाच सूत्रात गुंफलेल्या.)

श्री घनश्याम अग्रवाल

भल्ला मॅडमच्या किटी पार्टीची सगळ्यांनाच उत्सुकता होती. दोघी-चौघी जणी जरा चिंतीत होत्या. कारण त्यांची मुले 3-4 महिन्यांची होती पण भल्ला मॅडमनी ती पण व्यवस्था केली होती. पार्टीच्या शेजारच्या खोलीत मुलांना दूध पाजून झोपवायचं. म्हणजे मग एखादं मूल रडलं, तर त्याची आई लगेच येऊन त्याला घेऊ शकेल.

शेजारच्या खोलीत चार शिशू झोपले होते. पार्टीत अडथळा येऊ नये, म्हणून त्यांच्या आयांनी मुलांच्या तोंडात रबरी निपल्स घातली होती. म्हणजे मुलं स्तन समजून ते चोखत राहतील आणि चूपचाप पडून राहतील.

 इकडे पार्टी सुरू झाली आणि तिकडे चारी मुले आपापसात बोलू लागली. ‘बघितलत, आपल्या मम्मींकडे… मोठ्या हुशार समजतात स्वत:ला. रबराचं निपल घातलय तोंडात. निपलचा चिपचिपितपणा आणि स्तनाचा उबदारपणा आम्हाला काय समाजत नाही?’ एकदा तर त्यांच्या मनात आलं, आशा आयांना चांगली शिक्षा दिली पाहिजे. जेव्हा पार्टी अगदी ऐन भरात येईल, तेव्हा मोठमोठ्याने रडायला सुरुवात सुरुवात करायची आणि जोपर्यंत ओरिजनल स्तन मिळत नाही, तोपर्यंत रडत रहायचं. पण मग पुन्हा त्यांनी विचार केला, मोठं झाल्यावर परंपरेनुसार आपण तिला सतावणारच. आता आपण अगदी लहान आहोत. जाऊ दे झालं.

पहिला म्हणाला, ‘ मी गप्प आहे कारण भविष्यात मला पॉलिटिक्समध्ये जायचय. मी जेव्हा मोदीजींना भेटेन… ‘

‘हे मोदीजी कोण आहेत?’ बाकीच्या दोघांनी विचारले. ’

‘मोदी माहीत नाहीत? अरे तेच मोदी… मागे काही दिवसांपूर्वी आईने मांडीवर घ्यावे म्हणून रडत, किंचाळत गोदी… गोदी… म्हणत होतो आणि आपली आई त्याला मोदी.. मोदी समजून आपल्याला मांडीवर घेत होती आणि तिच्या डोळ्यात तिला तिचा नरेंद्र मोदी दिसत होता. तेच मोदी… हं! तर जेव्हा मी मोदींना भेटेन, तेव्हा त्यांना सांगेन, ‘या दिवसात तुमचा ‘मन की बात’चा टी. आर. पी. खालावत चाललाय आणि का खालावला जाणार नाही. ? तुम्ही ‘मन की बात’ विचारपूर्वक आणि लिहून करता, तेही मोठ्या लोकांकडून. ‘मन की बात’ करायचीच असेल, तर ती आमच्याशी करा, आमच्याकडे मनाशिवाय दुसरं काहीच असत नाही. मोदीजी मी आपल्याला सांगतो, भ्रष्टाचाराची मुळं कुठे आहेत! पण माझी एक अट आहे. जेव्हा केव्हा आपल्याला अमीत शहांसाठी विकल्प शोधाची वेळ येईल, तेव्हा या मुलाकडे लक्ष असू दे किंवा मग मला मिनिस्टर बनवा. मी घोटाळा करेन. सी. बी. आय. शोध घेईल आणि शोध ईमानदारीने झाला, तर बोट माझ्याकडे नाही, माझ्या आईकडे दाखवलं जाईल कारण तिने स्तनाच्या जागी रबराचं निपल देऊन मला भ्रष्टाचाराची घुटी पाजली होती. एक राजकारणी दुसर्‍याच्या कमजोरीचा तोपर्यंत फायदा उठवत नाही, जोपर्यंत तो स्वत: कमजोर होत नाही.

‘यावर तिन्ही मुलांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाली, ‘जेव्हा आम्ही मोठे होऊ, तेव्हा तुलाच मत देऊ. ’

‘माझ्या गप्प राहण्याचं कारण थोडं वेगळं आणि रोमॅँटिक आहे. ’ दुसरा म्हणाला. ‘माझी आई माझ्यावर नाराज असते. तिला असा संशय आहे की माझ्या जन्मानंतर तिची फिगर बिघडली. लोक म्हणे तिला रखा म्हणायचे. आता मम्मीला कोण समजावणार की दोन भुवयांच्या मध्ये कुंकवाचा टिळा लावल्याने काही कुणी रेखा होत नाही. मम्मी आपल्याला कुणी सांगितलं की मुलाच्या जन्मामुळे आईची फिगर बिघडते. आम्ही तर मागच्या जन्मापासून ऐकत आलोय, की ज्या क्षणी स्त्री आई होते, त्या क्षणी तिचं सगळं सौंदर्य प्रकट होतं. आई बनल्याशिवाय सौंदर्याच्या परिपूर्णतेला कुणीच स्पर्श करू शकत नाही. हां! रेखाची गोष्ट वेगळी. तिचं सौंदर्य पूर्णपणे तिच्यातच प्रगत होतं म्हणून तर ती इतकी मोठी कलाकार आहे. मी रेखावर जबरदस्त फिदा आहे. मी तर देवाला सांगणार आहे, पुढल्या जन्मी मला रेखा मिळणार असेल, तरच मला जन्माला घाल. मग ती प्रेमिकेच्या रूपात मिळो की आईच्या रूपात, तुझी मर्जी असेल तसं. माझ्या मम्मीला कुणी रेखा म्हणत नाही. तीच तेवढी स्वत:ला रेखा समजते. तिच्या या आशा चुकीच्या समजण्यामुळेच मी या घरात जन्माला आलो. तसाही या संपन्न घरात मी सुखी आहे. एकुलता एक वारस आहे ना!’

‘आत्ता तर तू तीन महिन्यांचा आहेस. आत्तापासूनच कसं म्हणू शकतोस की तू एकुलता एक वारस आहेस?’ बाकीची मुलं म्हणाली.

‘म्हणू शकतो. माझ्या मम्मी आणि डॅडींचा विवाह दोन वर्षे लांबला कारण डॅडींना दोन मुले हवी होती आणि मम्मीला एकदेखील नको होते. शेवटी खूप चर्चा झाल्यावर, तिला समजवल्यावर दोघांनीही एका मुलावर शिक्कामोर्तब केले. त्याचा परिणाम म्हणजे मी रडलो, तर मम्मी डॅडींवर राग काढेल. डॅडी इतर डॅडींप्रमाणेच दबकू आहेत. चूक मम्मीची असली, तरी पुन्हा पुन्हा तेच तिची समजूत काढणार. तिची मनधरणी करणार. मम्मीला समजावण्याच्या चक्करमध्ये पुन्हा माझा कुणी भाऊ येऊ नये, मी कुठलीच रिस्क घेऊ इच्छित नाही म्हणून मी गप्प आहे. माझ्यासाठी शानदार घर आणि जनदार रेखा एवढं पुरेसं आहे. ’

‘यार, पुढल्या जनमाता तुला रेखा मिळेल, तेव्हा आम्हाला तिचा ऑटोग्राफ घेऊन दे. सांग की हे माझे मागच्या जन्मीचे दोस्त आहेत. ’ मुले म्हणाली.

आता तिसरा म्हणाला, ’ मी तर शायराना वृत्तीचा आहे. मी जेव्हा पोटात होतो, तेव्हा माझी मम्मी आणि पापा कायम मुशायरे ऐकायला जायचे. त्यामुळे मुशायरेचे शेर मी अभिमन्यूप्रमाणे गर्भातच म्हणू लागलो होतो. जन्माला येताच मुनव्वर राणाचा फॅन झालो.

‘हे मुनव्वर राणा कोण?‘ मुलांनी विचारले.

‘अरे, मुनव्वर राणाला कोण ओळखत नाही. कसं माहीत असणार? कधी मुशायर्‍यांना गेला नाही आहात ना! तोच मुनव्वर राणा, ज्याने आईवर इतके शेर म्हंटलेत, इतके शेर म्हंटलेत की जर त्याने आपल्या प्रेयसीवर शेर म्हंटला, तर समोर बसलेला त्यातही आपली आई शोधू लागतो. मला कधी भेटलाच, तर सांगेन त्याला, ‘हे मादरेआजम, तू आईच्या ममतेवर किती तरी शेर लिहिलेस. दोन चार शेर आशा मम्मींवर पण लिही, जे आपल्या मुलाच्या तोंडात स्तनाच्याऐवजी निप्पल कोंबतात. काहीही म्हणा पण, मुनव्वर राणा मोठा शायर आहे. आईच्यावर त्याने हजारो शेर म्हंटले, जे लाखो लोकांनी ऐकले. मला तर वाटतं, त्यांचे शेर ऐकूनच, ते आठवत एखादा आपल्या म्हातार्‍या आईला पाणी देतो, तेव्हा मला वाटतं, मुनव्वर राणा आपली सगळी शायरी जगले. लहान तोंडी मोठा घास होईल कदाचित, की प्रत्येक शायर फक्त एक शेर म्हणण्यासाठी जन्माला येतो. बाकी शायरी ही त्या शेरापर्यंत पोचण्याचा मार्ग असतो. हे शेर त्यांच्या शायरीचा असा पुरस्कार आहे, की ते इच्छा असूनही मिळवू शकत नाहीत आणि इच्छा असूनही परत पाठवू शकत नाहीत. मी मुनव्वर राणाच्या त्या शेराला सलाम करत गप्प बसतोय. कुणी आई आपल्या मुलाला धोका देऊ शकते? ‘बेंनीफिट्स ऑफ डाउट’ तर अपराध्यालाही मिळतो. मग या तर आपल्या आयाच आहेत. जर आईनं दिलाय, तर निप्पल नाही, स्तनच असणार.

‘वा: वा: वा: वा:.. ’ बाकीची तीन मुले म्हणाली.

शेवटी चौथा मुलगा, जो मळक्या, फाटक्या कपड्यात होता, म्हणाला, ‘माझी आई आपल्या आयांप्रमाणे पार्टीत मजा करायला आलेली नाही. ती पार्टीत काम करायला आली आहे. भल्ला मॅमने आधी नको म्हणून सांगितलं होतं, पण आईने खात्रीपूर्वक सांगितलं की माझा मुलगा समजूतदार आहे. तो मुळीच रडणार नाही. गुपचुप पडून राहील. माझ्या आईने केवढा विश्वास ठेवला माझ्यावर. मी रडून तिचा विश्वासघात करू शकत नाही. मला माहीत आहे, माझी आई तुमच्या आयांची खरकटी भांडी घासेल, सगळं स्वच्छ करेल, तेव्हा भल्ला मॅम तिला काही पैसे देईल. त्या पैशाने माझी आई काही तरी खाईल. त्या खाण्याने जे दूध बनेल, ते दूध माझी आई मला पाजेल. निप्पलने नाही. तिच्या स्तनाने पाजेल. ’

‘यू आर ए लकी बॉय!’ बाकीची तीन मुले म्हणाली. ‘हं! आमची आईसुद्धा भांडी -कुंडी, साफ-सफाईची कामं करत असती तर…. ’

पार्टीमधला आवाज वाढत चालला होता॰ मुले कंटाळली. गालिब जसं म्हणाला होता, ‘दिल को बहलाने को गालिब ये खयाल अच्छा है… ’ मुले निप्पलची वस्तुस्थिती जाणूनसुद्धा स्वत:ला रमवत…

एक मोदीला, एक रेखाला, एक मुनव्वर राणाला आणि एक आपल्या आईला आठवत झोपी गेले.

मूळ कथा – चार शिशुओं की कथा

मूळ लेखक : श्री घनश्याम अग्रवाल, मो. – 9422860199

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मुंगी उडाली आकाशी… – भाग – ३ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ मुंगी उडाली आकाशी… – भाग – ३ ☆ डॉ. शैलजा करोडे

 (रेखा परवा येऊन गेलेल्या हेमांगी जोशीचा टेस्ट रिपोर्ट आलाय तो जरा मला दाखवशील. निवांतपणा आहे तर थोडं बारकाईने त्याविषयी मला विचार करता येईल. “होय मॅडम, मी घेऊन येते ती रिपोर्ट फाईल”. ) –  – इथून पुढे —- 

लग्नाला चांगली पाच वर्षे होऊनही मातृत्व सुखाने वंचित हेमांगी माझ्याकडे आली होती मोठी आशा घेऊन. “डॉक्टर ताई मदत करा हो माझी. तुम्ही सांगाल ते सगळे औषधोपचार, तपासण्या करून घेण्यास मी तयार आहे. त्यासाठी कोण कोणती दिव्ये मी केली मलाच माहित. उपवास, व्रतवैकल्य, घरगुती उपचार, पवित्र नद्यांचं स्नान. सगळं सगळं केलं. घरात सासूबाईचा तगादा वाढलाय. नातेवाईक, शेजारी, मित्र मैत्रीणी, शुभचिंतक, हितचिंतक, प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तर देताना माझी दमछाक होते हो. आणि डॉक्टर बाळाच्या मऊ कोमल स्पर्शासाठी मी सुद्धा आसुसले हो. ” “हेमांगी, अगं इतकी सेंटीमेंटल होऊ नकोस. आपण करू उपचार. सगळे प्रयत्न करू. ईश्वर नक्कीच आपली मदत करेल. “

मी हेमांगीची फाईल चाळली हेमांगीचं गर्भाशयचं अविकसित होतं जन्मतःच त्यात दोष होता. ईश्वराने तिला स्त्रीत्व तर दिलं होतं, पण मातृ सुखाचा तिचा तो मार्ग मात्र अविकसित राहिला होता. अशा स्थितीत तिला मातृत्व लाभणं कठीण होतं. हेमांगीला माता होण्यासाठी दोनच मार्ग आता शिल्लक होते. एक तर तिने मूल दत्तक घेणे. दुसरा भाडोत्री आईच्या (सरोगेट मदर) गर्भाशयात मूल वाढविणे. हेमाचे यजमान अविनाश जोशी तसे समजदार गृहस्थ होते. पण कुटुंबातून किती सहकार्य मिळेल याविषयी मी साशंक होते.

माझ्या हातातील फाईल काढून घेत आई म्हणाली, “एक दिवस तर आराम कर माझी बाई. ” मी मंद स्मित करीत फाईल ठेवली. आईला बरं वाटावं म्हणून बेडवर आडवी झाले. आणि हळूहळू भूतकाळाची आवर्तने माझ्या मन: पटावरून सरकू लागली. आई-वडिलांच्या संसार वेलीवरचं मी पहिलं वहिलं फूल. माझा जन्मच सगळ्यांना आनंद देणार होता. सगळ्यांच्या मुखावर हास्य होते. कारण बऱ्याच दिवसातनं रांगती पावलं घरभर दुडूदुडू धावत होती. माझ्यानंतर घरात दोन भावांचा जन्म झाला. सुखाच्या राशीवर आम्ही सगळे खेळत होतो, बागडत होतो.

माझा शाळा प्रवेश, शिक्षणातील गती, इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड, माझा वाचनाचा छंद- घरात नेहमीच कौतुकाचा, प्रोत्साहनाचा विषय ठरला. मुलगी म्हणून कुठलीही आडकाठी दुय्यम दर्जा मला कधी मिळाला नाही. वयाची बारा वर्ष मी पार केली आणि आईची काळजी वाढू लागली. मुलगी तारुण्यात पदार्पण करेल, तिला सांभाळायला पाहिजे, या चिंतेने ती पोखरली जाऊ लागली. पण वयाची पंधरा वर्षे पार होऊनही माझ्यात स्त्रित्वाची कोणतीच लक्षणे न दिसल्याने आई-बाबांनी मला डॉक्टरांकडे नेले. माझी सगळी शारीरिक तपासणी, सोनोग्राफी करण्यात आली. आणि विधात्याने माझ्यावर केलेला अन्याय लक्षात आला. मुलगी म्हणून मला जन्म तर मिळाला पण स्त्रित्व बहाल करणारा तो अवयवच (गर्भाशय) माझ्या शरीरात नव्हता. माझ्या कुटुंबावर तर हा आघात होताच. पण माझ्या तनामनावर आघात करणारा हा क्रूर नियतीचा खेळ होता. पण माझे वडील मोठे खंबीर आणि धीरोदत्त विचारसरणीचे, ताठ कण्याचे एक सद्गृहस्थ होते. त्यांनी आईला व मुख्यतः मला सावरले.

 ” काही काळजी करू नकोस बेटा. तुझा अभ्यास उत्तम चालू ठेव. त्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित कर. खूप शिक. मोठी हो आणि स्वतःच्या पायावर उभी रहा. ताठ मानेने ताठ कण्याने जगायला समर्थ करण्याइतका तुझा बाप नक्कीच तुला मदत करणारा आहे. “अहो पण मुलीची जात, परक्याचं धन आणि हा समाज- कसं सगळ्यांना तोंड देणार ?. मुलीचं लग्न कसं होणार?कोण करील तिच्याशी लग्न? आणि मुलींचे लग्न नाही केलं तर समाज काय म्हणेल?” माझी आई बोलत होती. थोडीशी पॅनिक झाली होती

 “कोणता समाज, कोणते लोक, कोणाला घाबरताय तुम्ही. तुमचं दुःख, तुमचे कष्ट, कमी करायला काही हा समाज येत नाही. मग तुम्हाला बोलणारा, तुम्हाला बोट दाखवणारा कोणता समाज म्हणता तुम्ही. त्यांना अधिकार तरी आहे का तुम्हाला बोलण्याचा. “

 बाबांचा खंबीरपणा, आईची मदत, भावांचं सहकार्य मी यशाच्या पायऱ्या भरभर चढत होते. बारावीचा माझा परीक्षेचा निकाल लागला. आणि मी बाबाजवळ मनमोकळेपणाने बोलले. “बाबा मला उत्तम डॉक्टर व्हायचंय. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून अनेक माता-भगिनींची सेवा करायचीय. विधात्याने माझ्यावर अन्याय केला स्त्रि जन्मा येऊनही स्त्रीचं पूर्णत्व मातृत्व सुखापासून मी वंचित राहिले. माझं दुःख सहन करण्याची विधात्यानचं मला शक्ती दिलीय. आता माझ्यासारख्या अनेक भगिनींची सेवा करून माझा हा जन्मच ही सफल करीन. मी अभागी नाही हो बाबा. “

 “कोण म्हणते बेटा तू अभागी आहेस म्हणून. आणि तुझा विचार केवढा उदात्त. समाजानं आपल्याला काय दिलं, यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो. “जनसेवा हीच ईश्वरसेवा” मांडणारी माझी मुलगी खरंच महान आहे. बेटा तुझ्यापुढे आज तुझा हा बाप, जन्मदाता नतमस्तक होतोय. जा बेटा, पुढे पुढे जा. माझा मदतीचा हात सदैव तुझ्या पाठीशी राहील. “

आईबाबांच्या आशीर्वादाने व खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिल्याने आज मी डाॅ. शर्वरी गोखले एक. नामांकित स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ होते 

माझ्या नेत्र पाकळ्या केव्हाच जडावल्या व मी झोपेच्या आधीन झाले. सकाळी उठल्यावर थोडे फ्रेश वाटले. रेखा आज हेमांगीला आणि तिच्या पतीराजांना बोलावून घे. मी सविस्तरपणे हेमांगी व अविनाशला समजावून सांगितले. आणि मूल दत्तक घेणे किंवा सरोगेट मदर द्वारा प्राप्त करण्याचे मार्गही सुचवले. अविनाश उच्चशिक्षित व समंजस होता मूल दत्तक घेण्याचाच त्याने विचार केला आणि कुटुंबाला समजावून सांगण्याची जबाबदारी ही स्वीकारली.

“ताई ताई तुम्ही खरोखरच धन्य आहात. मदतीचा हात देणाऱ्या दाता आहात आणि रोज नवीन कुटुंबाला जन्म देणाऱ्या अनेक माता भगिनींच्या ओटीत मातृत्वाचा दान देणाऱ्या तुम्ही धन्वंतरी आहात. “

“मी कसली धन्वंतरी. करता करविता तो ईश्वर आहे. तो सगळ्यांची मदत करणारा सगळ्यांचा भाग्यविधाता आहे. तुम्ही सगळेच मला धन्वंतरी, मातृरुपिणी मानतात. पण स्त्री जन्मा येऊनही स्त्रीचं पूर्णत्व मातृत्व मला कधीच मिळालं नाही. अपूर्णत्व असलेली मी एक स्त्री. “

“नाही डॉक्टरताई, तुमचं दुःख तसं मोठं आहे पण स्वतःचं दुःख विसरून इतरांच्या दुःखावर मायेनं फुंकर घालणाऱ्या तुम्ही एक असामान्यचं आहात. या मानवीय दुःखावर मदतीचा हात देऊन तुम्ही त्यावर मात करतात, हे मानव जातीवर तुमचे उपकारच आहेत ताई. येते मी आणि बाळ दत्तक घेतल्यावर मिठाईचा बॉक्स घेऊन लवकरच येईल मी. “

माझी ओ. पी. डी. संपली होती. मी घरात आले. फ्रेश झाले. आईची सायंकाळची दिवाबत्ती नुकतीच झालेली होती. तिचे हरिपाठ स्तोत्र गुणगुणणे सुरू होते.

“मुंगी उडाली आकाशी,

तिने गिळले सुर्याशी. “

देवघरातील त्या दिव्याच्या मंद प्रकाशात आज मलाही अनोखे सौख्य लाभले होते. मनःशांती मिळाली होती. सौख्य आनंदाने भरलेला माझा तो तेज:पुंज चेहरा पाहिल्यावर आईलाही समाधान वाटले होते. तिचा आशीर्वादाचा हात माझ्या मस्तकावर होता.

– समाप्त –

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मुंगी उडाली आकाशी… – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ मुंगी उडाली आकाशी… – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे

(“मावशी तुम्ही स्वतःही या दिव्यातून गेल्या आहात. आणि आज तुम्हीच घाबरताय. रीमा च्या नैसर्गिक प्रसुतीची सगळी चिन्हे आहेत. हे सगळं आपण तिच्या आणि बाळाच्या भल्यासाठीच करीत आहोत. थोडा धीर धरा. होईल सगळं व्यवस्थित.”) — इथून पुढे — 

“मॅडम, बालरोग तज्ञ डॉक्टर राहुल पाटील आलेत. “

“माझ्या केबिनमध्ये बसव त्यांना चहा कॉफीचं विचारशील. मी येतेच थोड्या वेळात. “

“या डॉक्टर साहेब, काल माझ्याकडे एक अपूर्ण दिवसाची सातव्या महिन्यातच प्रसूती झालीये. बाळ अतिशय कमी वजनाचं. फक्त सोळाशे ग्रॅम वजनाचं आहे. इनक्यूबेटर मध्ये ठेवलंय. तुमचा सल्ला हवाय. बाळाला तुम्हीच ट्रीट करा. ” “ओके मॅडम, बघूया पेशंट” म्हणत मी आणि डॉक्टर त्या रूम कडे वळलो. “मॅडम बाळ कमी वजनचं अवश्य आहे. पण हेल्दी आहे. निरोगी आहे. जवळपास एक महिनाभर तरी याला इनक्यूबेटर लागेल. होईल सगळं व्यवस्थित. “

डॉक्टर पाटील माझ्या दवाखान्यातील प्रत्येक बाळाची देखभाल करीत. प्रत्येक जन्माला येणाऱ्या बाळाला बालरोग तज्ञाला दाखवून देणे हा अलिखित नियमच केला होता मी माझ्यासाठी.

“रेखा आज जन्माला आलेल्या बाळांची यादी दिलीस कां महानगरपालिकेत. ” “होय मॅडम, काल जन्मालेल्या तिघी बाळांची, दोन मुली एक मुलगा याची यादी दिली मी महानगरपालिकेत, जन्म मत्यू नोंदणी विभागात. ” “व्हेरी गुड-चल रीमा काय म्हणतेय बघूया. “

रीमाने आता संपूर्ण हॉस्पिटल दणाणून सोडलं होतं. आणि तो सुवर्णक्षण मी एका झटक्यासरशी टिपला. बाळाचं डोकं बाहेर येतात त्याला हळुवारपणे संपूर्ण बाहेर ओढलं. आणि रेखाच्या हाती दिलं. तिनं बाळाच्या नाका तोंडावरची घाण साफ केली आणि लगेच बाळाने टाहो फोडला. रीमाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. संपूर्ण कुटुंब आनंद सागरात न्हाऊन निघालं. बाळाच्या जन्माच्या वेळी बाळ ओढल्याने प्रत्येक पहिलटकरीणीला टाके येतातच. मी ते काम करण्यात गर्क झाले. माझ्या धाकटा भाऊला व्हिडिओ चित्रीकरण यांचं मोठं वेड. अर्थात हा त्याचा छंद होता. शिक्षण त्याचं सुरू होतं. त्याने बाळाच्या जन्माची सीडीच तयार केली. बाळाला प्रत्येक नातेवाईकांकडे देणं, त्यांचे ते आनंदाचे चेहरे कॅमेर्‍यात बंद करणं, नवजात आईचं नवजात बालकाशी संवाद साधणं – सगळं सगळं त्याने चित्रीत केलं.

पेढ्यांचा बॉक्स माझ्या हाती देत रीमाची आई उद्गारली, “ताई तोंड गोड करा तुमचं” “अहो मावशी, तुमचं तोंड गोड होऊ देत आधी. आजीबाई झालात तुम्ही. ” म्हणून मी तिने दिलेल्या बॉक्स मधील पेढा तिला भरवला. “ताई बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. चांगले आहेत. निरोगी आहेत. भरून पावले मी. “

“ही सगळी परमेश्वराची कृपा. आपण फक्त मदतीचे हात सगळं नियंत्रण तर त्याच्याच हाती आहे. “

आज सकाळी सकाळी माझ्याकडून अंथरुणातून उठवलेही जात नव्हते. अंगात तापाची कणकण जाणवत होती. डोकं दुखत होतं. सर्दीनं नाक बंद झालं होतं. थोडासा खोकलाही येत होता. रेखा ड्युटीवर हजर झालीच होती. “मॅडम काय त्रास होतोय आपल्याला, चेहराही बराच उतरलाय. ” “अगं रेखा, बघ अंगात ताप आहे माझ्या. थर्मामीटर आण बघू”. “बापरे मॅडम 102 डिग्री ताप आहे तुम्हाला. ” “थांबा मी डॉक्टर देवकरांना बोलवते”. म्हणत तिने डॉक्टरांना फोन लावला.

“काय होतंय गं माझ्या बछडीला” म्हणत आई माझे जवळ आली. वार्धक्याने तिचा थरथरणारा हात, डोळ्यातून माझ्या विषयी ओसंडून वाहणारी अपार माया, करुणा पाहून मला भडभडून आलं. “उगी उगी बाळ, अंगं केवढं तापलंय. रात्रंदिवस काम, काम आणि काम. आजार पण नाही येणार तर काय होणार अशानं. कधी विश्रांती म्हणून नाही की चार आठ दिवस कुठे गावी जाणं नाही. सातत्याने कामाच्या दावणीला जुंपलेली. आता काही ऐकणार नाही मी तुझं. पंधरा दिवस डॉक्टर वृशालीला सोपव तुझ्या हॉस्पिटलचं काम. करील ती तुझी मदत. ” “अग आई किती काळजी करशील माझी. ऋतू बदलामुळे होतो त्रास. काही काळजी करू नकोस. “

“हा काय म्हणतोय आमचा पेशंट” म्हणून डॉक्टर देवकरांनी माझ्या रूममध्ये प्रवेश केला. मनगटावर बोटे ठेवून नाडीचे ठोके घेतले. टॉर्च चा झोत टाकून डोळ्यांची बुब्बुळे तपासली. स्टेथास्कोपने हृदयाचे ठोके घेतले. ” “केव्हापासून आलाय ताप. ” ” काल रात्रीपासूनच मला बरं नव्हतं डॉक्टर साहेब. आज तर अंथरुणातूनही उठवले जात नाही आहे. ” ताप, सर्दी, खोकला सगळी व्हायरल फिवरची लक्षणे आहेत. मी औषधे लिहून देतो, ती वेळेवर घ्या आणि रेखा ही दोन इंजेक्शनने सलाईनच्या ड्रिप मधून जाऊ देत शरीरात. होईल ताप लवकर कंट्रोल. आणि आई काही काळजी करू नका. लवकरच बऱ्या होतील मॅडम.

“माझं मेलीचं म्हातारपण. त्यात या पोरांना काही त्रास झाला तर माझं अवसानचं संपतं. हातपाय गळतात माझे. कधी आराम करीत नाही पोरगी, विश्रांतीसाठी कुठे जात ही नाही. 24 तास नुसती कामाला वाहिलेली. अहो यंत्राला सुद्धा काही तासांची विश्रांती लागते. तेव्हा ते पुन्हा पुर्ववत काम करतात. आम्ही तर हाडामासांची माणसे. त्यांना विश्रांती नको. मग व्हायचा तो परिणाम होतोच. बघा ना कसं अंथरुणातूनही उठवत नाही आहे आज हिच्याकडून. “

“हो बरोबर आहे आई. विश्रांती तर पाहिजेच. सक्तीच्या विश्रांतीसाठी तर सलाईनची बाटली लावली आहे. काळजी करू नका तुम्ही. येतोय मॅडम” डॉक्टर देवकर निघून गेले.

अंगात असलेला ताप, त्यामुळे आलेली ग्लानी, प्रचंड थकवा आणि पाच-सहा तास पुरणारे सलाईनमुळे माझ्या

पापण्या केव्हा जडावल्या आणि मी निद्रेच्या आधीन झाले मला कळलेही नाही. आज दिवसभराच्या माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट्स रेखाने रद्द केल्या होत्या. अगदीच इमर्जन्सी केस असली तर डॉक्टर वृशालीला बोलवण्यात येणार होते.

सायंकाळपर्यंत माझा ताप बराच कंट्रोल झाला होता. पण अंग मात्र ठणकत होतं. विकनेस खूप जाणवत होता. ” उठलीस बाळ, चल थोडीशी चूळ भर आणि खाऊन घे. मूग डाळीची मऊ खिचडी केली आहे तुझ्यासाठी, त्यावर थोडीशी शुद्ध तुपाची धार. चवीला पापड आणि खुर्चणीची चटणी केलीय. जेवून घे बेटा. त्याशिवाय तुला तकवा कसा राहील. आईने मला जेवायला भाग पाडले. पण अन्नाची चव लागत नव्हती. सगळंच कडू वाटत होतं. अन्न गिळले न जाता तोंडातच गोळी होत होती. “होतंय बेटा तापात असं आणि हा अशक्तपणा चांगला आठ-दहा दिवस घेईल पूर्णपणे बरं व्हायला. आईने हलकेच माझ्या कपाळावर थोपटले. “

सायंकाळची मंद वाऱ्याची झुळूक हिरवळीवरचा प्रशांत गारवा, रात राणीचा मंद सुगंध माझ्या खिडकीतून माझ्यापर्यंत पोचत होता. या आल्हाददायी वातावरणानं थोडं मोकळं वाटलं. माझी कळी खुलली. आणि काहीतरी काम करावं, माझं मन मला खुणावू लागलं.

रेखा परवा येऊन गेलेल्या हेमांगी जोशीचा टेस्ट रिपोर्ट आलाय तो जरा मला दाखवशील. निवांतपणा आहे तर थोडं बारकाईने त्याविषयी मला विचार करता येईल. “होय मॅडम, मी घेऊन येते ती रिपोर्ट फाईल”.

– क्रमशः भाग दुसरा

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कार्बन फुटप्रिंट आणि तुम्ही आम्ही – भाग – १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

??

कार्बन फुटप्रिंट आणि तुम्ही आम्ही – भाग – १  ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

“बाबा, तुम्हाला माहित आहे का ? ते शेजारचे काका एकटेच (चारचाकी) गाडी घेऊन ऑफिसला जातात. त्यांच्या घरात कोणी असो नसो, त्यांचा AC ढणढणा चालूच असतो. त्यांची मुलं स्विगी झोमॅटोवरून भरमसाट अन्न मागवतात आणि त्यातलं बरंचसं अन्न न खाता तसंच फेकून देतात, अन्नाची नासाडी करतात. या सगळ्यांनी कार्बन फुटप्रिंट किती वाढतो माहितीये ?” 

मी आपला रविवार सकाळी चहासोबत वर्तमानपत्राचा आस्वाद घेत होतो, आणि आमचे चिरंजीव – कधी नव्हे ते (रविवार असूनसुद्धा) लवकर उठून त्यांच्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसले होते – ते अचानक वदते झाले.

“बाबा रे, तू अशी संदर्भाशिवाय आकाशवाणी करत जाऊ नकोस रे. हे कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय ? त्याचा काकांच्या गाडीशी, AC शी आणि अन्न वाया घालवण्याशी काय संबंध ? आणि कार्बन फुटप्रिंट वाढला म्हणजे चांगलं झालं का वाईट ?”

हा असा अजाण बाप माझ्याच नशीबी का यावा असा मला नेहमीसारखा हताश लूक देत, निरगाठ उकल तंत्राने, संदर्भासहित स्पष्टीकरण देत तो म्हणाला, “बाबा, एखादी वस्तू तयार करण्यासाठी अथवा एखाद्या सेवेचा वापर करण्यासाठी किती इंधन खर्च होतं आणि त्याच्या ज्वलनाने किती कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो, याला त्या वस्तूचा / सेवेचा कार्बन फुटप्रिंट म्हणतात. ” 

“गाडी चालवण्यात इंधन जळलं हे समजू शकते. पण AC चालवल्याने आणि अन्नाची नासाडी केल्याने कसं काय इंधन जळतं बुवा ?” मी नि:संकोचपणे माझे अज्ञान प्रकट केले.

“अहो, दर वेळी प्रत्यक्ष इंधनच जळले पाहिजे असे नाही. बघा, AC साठी इलेक्ट्रिसिटी लागते की नाही, मग thermal power असेल तर त्याला कोळसा वापरला जातोच की नाही ? म्हणजेच AC साठी अप्रत्यक्षरीत्या का होईना इंधन जाळले जातेच.

अहो, हा खूप मोठा आणि क्लिष्ट विषय आहे. तुम्हाला समजावं म्हणून मी थोडक्यात सांगितला.

अन्नधान्य निर्मितीसाठी ट्रॅक्टर वापरला जातो, शेतीसाठी पाणी उपसा करायला पंप मोटार वापरले जातात, या सगळ्यात इंधन लागतंच. शेतमालामधून आपल्याला खाण्यायोग्य अन्न बनवण्यासाठी – जसे गहू दळण्यासाठी, आइस्क्रीम करण्यासाठी, श्रीखंड करण्यासाठी ऊर्जा लागतेच.

 शिवाय अगदी शेतकामासाठी बैल वापरले तरी त्यांना खायला प्यायला अन्न लागतं, त्यांचे ते अन्न निर्माण करायला परत ऊर्जा लागतेच की. ” चिरंजीव.

हे कार्बन प्रकरण लेकानं बरंच मनावर घेतलेलं दिसत होतं, बराच सांगोपांग अभ्यास केलेला दिसत होता त्यानं. “ते सगळं ठीक आहे, पण शेजारच्या काकांच्या एका घरामुळे जगाला असं काय मोठंसं नुकसान होणार आहे ? आणि ते त्यांच्या पैश्याने या गोष्टी करत आहेत ना ? त्याबद्दल तू आक्षेप घ्यायचं कारण काय ?” मी.

“बाबा, एका अर्थी तुमचे म्हणणे थोडेसे बरोबर आहे. उद्योगधंद्यांच्यामुळे प्रदूषण आणि कार्बन फुटप्रिंट प्रचंड वाढतो. त्या मानाने, घरगुती पातळीवर तेवढं नुकसान होत नाही. पण माणसांची लोकसंख्या लक्षात घेतली, तर हा गुणाकार अक्राळ विक्राळ होऊन उभा ठाकतो.

तासभर AC चालवल्याने जवळजवळ १ किलो कार्बन डायऑक्साइड फुटप्रिंट तयार होतो. आपल्या सोसायटीतील अशी १०० घरे धरली, शहरातील अशा हजारो सोसायट्यांचे गणित केलं, तर बघता बघता हा आकडा केवढा तरी अवाढव्य होत जातो.

तेच गणित गाडीचं. एक किलोमीटर अंतर कापायला पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाडीचा कार्बन फुटप्रिंट ०. २ किलो इतका आहे, तेच बस किंवा ट्रेनचा हा फुटप्रिंट प्रति किलोमीटर जेमतेम ०. १ किलो इतका – गाडीच्या निम्मा आहे. शिवाय ट्रेन – बस मधून एका गाडीच्या कितीतरी पट अधिक माणसे प्रवास करू शकतात. ” तो अतिशय गांभीर्याने सांगत होता.

मला या प्रकरणात उत्सुकता वाटू लागली. “बरं, जळलं इंधन, झाला निर्माण कार्बन डाय ऑक्साईड. पण त्यानं असं काय कोणाचं घोडं मारलं जाणार आहे ? आणि अशा एखाद्या गाडीने आणि एखाद्या AC ने असा काय तो मोठासा फरक पडणार आहे ?” मी विचारता झालो.

“बाबा, हा जो कार्बन डाय ऑक्साईड किंवा तत्सम वायू तयार होतो त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस – हरित गृह वायू म्हणतात. सूर्यकिरणांनी आपल्या वातावरणात जी उष्णता आली असते, ती या वायूंमुळे आपल्या वातावरणातच अडकून राहते, त्यामुळे वातावरणाचे तापमान वाढते. Global warming, climate change होतं यामुळे बाबा ! ही खूप गंभीर बाब आहे. “

“पण याने तुला मला काय फरक पडतो ?” 

“अहो बाबा, या तापमान वाढीने उत्तर ध्रुवावरचे बर्फ वितळू लागले आहे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. सेशेल्स, मॉरिशस असे अनेक देश नजीकच्या भविष्यकाळात पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहेत आणि अगदी मुंबईसह भारतातीलही किनाऱ्यावरील अनेक शहरांनाही धोका निर्माण झालेला आहे.

पाऊस पडण्याचे वेळापत्रक बिघडले आहे. गेली पाच दहा वर्षे आपल्याकडे, अगदी दिवाळीत, जानेवारी महिन्यातही बेदम पाऊस पडतो. Climate change मुळे उन्हाळे अधिक तीव्र होत चालले आहेत. यंदा तर पुण्यातसुद्धा तापमान ४०° च्यावर गेलं होतं.

हवामानाच्या या बदलांमुळे प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या अनेक जाती नामशेष होऊ लागल्या आहेत, हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू नद्यांच्या, समुद्रांच्या पाण्यात विरघळल्याने पाणी आम्लधर्मी (acidic) झाले आहे, त्याने पाण्यातील अनेक वनस्पती व मासे यांना हानी पोचत आहे. जैवविविधता (biodiversity) धोक्यात आली आहे.

प्रदूषणाने हवेची गुणवत्ता बिघडली आहे, लोकांना श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने उष्माघातासारखे प्रकार वाढू लागले आहेत. रोग पसरविणारे जीवाणू (pathogens) व विषाणू (virus) वाढू लागल्याने रोगराई वाढत आहे.

जमिनीची कृषी संबंधित उत्पादन क्षमता कमी होऊ लागली आहे, पाण्याच्या उपलब्धतेच्या अनियमिततेमुळे शेतीचे नुकसान होऊ लागले आहे.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मुंगी उडाली आकाशी… – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ मुंगी उडाली आकाशी… – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे

“अगं थोडसं सैल सोड तू. आक्रसून घेऊ नकोस. तुला भीती वाटणं साहजिकच आहे. पण आई व्हायचंय ना तुला. मग हे उपचार तर करावेच लागतील. काही त्रास होणार नाही तुला. या उपचारानंतर पुढच्या वेळेस येशील तू गोड आनंदाची बातमी घेऊनच. आणि मग पुढे बाळंतपणासाठी. मग मला सहकार्य कर. ” पेशंटची कळी खुलली. उपचार करून घेण्यास मला सहकार्य देण्यास तयार झाली.

“बाई, तुम्ही धन्वंतरी आहात. आजपर्यंत अनेक घरात तुमच्या मदतीने, ज्ञानाने वंशाचा दिवा उजळलाय. घरात पाळणा हलला आहे. सगळी आशा सोडून दिलेल्यांना तुम्ही पुन्हा त्यांच्या काळोख्या जीवनात दीपज्योती प्रज्वलित केलेल्या आहेत. अनेक मातांची ओटी भरून तुम्ही त्यांचे आशीर्वाद घेतलेत. त्यांच्या कुटुंबात आनंद निर्माण केलात. खरंच बाई, परमेश्वराला तर मी पाहिलं नाही पण परमेश्वरा समान माणूस मी तुमच्या रूपात पाहिलाय. ” पेशंटची सासू शेवंता सोनटक्के बोलत होती.

“अहो, मी काही करत नाही. जे काही घडतं त्यामागे परमपित्या परमेश्वराचीच प्रेरणा असते. मी तर एक निमित्त मात्र. पेशंट्सची सेवा करणे हे तर माझं व्रत. त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, औषध उपचार करणं, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यानुसार उपचार करणं हे तर माझं कर्तव्यचं. माझ्या हाताला यश आहे असं तुम्ही मानता, पण मावशी माझ्या पेशंटचे सहकार्य, जिद्द, इच्छाशक्ती आणि मनोबल ही त्यांना मदत करतं. माझ्या प्रयत्नांना अशी सहकार्याची जोड मिळाली तर यश मिळणारच ना मावशी. होय एक गोष्ट मात्र मी कटाक्षानं पाळलीय, मी आणि पेशंटच्या दरम्यान पैसा हा महत्त्वपूर्ण घटक मी कधीही ठरू दिला नाही. एखादा गरजवंत अडचणीतील पेशंट असेल तर पैशा अभावी त्याचे उपचार न करणं हे माझ्या तत्त्वात कधीच बसलं नाही. अनेकांची मी मदत केली आहे, करीत आहे आणि करीत राहीन. “

“तेच तर म्हणते ताई मी, माणसापेक्षा त्याच्यातील माणुसकी ही श्रेष्ठ असते. तुमच्यातील माणुसकी, तुमच्यातील जिद्द, कामातील सचोटी यामुळेच तर माणूस ओढला जातोय तुमच्याकडे. तुमचं लाघवी बोलणं, पेशंटसच्या समस्या अगदी मातेच्या ममतेनं जाणून घेणं, सगळंच विलक्षण. तुमच्या बोलण्यानेच बाई पेशंटचा निम्मा आजार बरा होतो. अनेक माता भगिनी रित्या ओटीन, रित्या मनानं तुमच्याकडे येतात, आणि निराश न होता भरभरून सुख घेऊन जातात. म्हणून तर म्हणते तुम्ही धन्वंतरी नाही तर कोण आहात बाई?” शेवंताबाई दिलखुलास हसली.

“ठीक आहे मावशी, तुमच्या सुनेसाठी मी, ही काही औषधे लिहून देते. ती वेळेच्या वेळी घ्या. तिच्या खाण्यापिण्याकडे ही लक्ष असू द्या. थोडीशी ॲनिमिक झालीय ती. रक्ताची कमतरता भरण्यासाठी सकाळच्या वेळी खजूर, राजगिऱ्याचा लाडू, पालकाची भाजी, सफरचंदे, दूध, डाळी यांचा आहारात समावेश असू द्या. या महिन्याचं मासिक चक्र संपलं की लगेचच घेऊन या तिला. ” 

“होय, डॉक्टर ताई तुम्ही सांगितलेला प्रत्येक सल्ला पाळीन मी. माझ्या ही सुनेची ओटी भरू द्या. माझ्याही घरात चिमणी पावलं उमटू द्या. आणि आजी म्हणून आता माझंही प्रमोशन होऊ द्यात. ऋणी राहीन तुमची. “

मी माझा आश्वासक हात त्यांच्या हातावर ठेवला. मायेने थोडासा दाबला. शेवंताबाईच्या नेत्रात आसवांनी दाटी केली. “या मावशी आता. ” मी टेबलावरची बेल दाबली तशी नर्स आत आली “नेक्स्ट”, “येस मॅडम” म्हणत तिने पुढील पेशंटला माझ्या केबिनमध्ये सोडलं.

सुनिता निनावे व तिचे यजमान माझ्यासमोर बसले. “काय त्रास होतो. ” “मॅडम आमच्या लग्नाला एक वर्ष होत आलंय. पण अजून बाळाची चाहूल लागली नाही. घरात आई-बाबांनाही नातवंडाचं मुख पाहण्याची तीव्र इच्छा वाढलीय.

“हे बघा, निनावे साहेब, एक वर्ष म्हणजे काही फार मोठा काळ नाही. अजून एक वर्ष आपण वाट पाहूया. दोन वर्षांच्या कालावधीतही अपयश आलं तर मग पुढील सगळ्या टेस्ट, उपायोजना आपण करूयात. “

“सुनिता तुझे चेकअप करूयात. ” नर्स ने सुनीताला टेबलावर झोपले. सुनिता मासिक चक्र व्यवस्थित सुरू आहे ना. त्यात काही अनियमितता तर नाही ना. ” “नाही मॅडम, मला कसलाही त्रास होत नाही. पोटात दुखत नाही की ब्लीडिंग चा त्रासही होत नाही. ” “गुड गुड, बाकी सर्व ठीक आहे. ” मी काही शक्तिवर्धक औषधे लिहून देते. आहार-विहार-योग्य व्यायामाचीही जोड असू दे. आणि मुख्य म्हणजे चिंता करू नकोस. काळजी करणं सोडून दे. “ऑल द बेस्ट” “येस मॅडम, ” सुनिता व तिच्या यजमानांचा चेहऱ्यावर हास्य पसरले.

काम आटोपून मी थोडी रिलॅक्स झाले. अर्थात असे निवांत क्षण माझ्या जीवनात फार कमी प्रमाणात येत. सातत्याने पेशंट, प्रसुती, दिवसाचे 24 तास मी जणू कामाला वाहिलेली होते. माझ्या दोन सखी भारती आणि रेखा या दोघींची मला खूप मदत व्हायची. बरीचशी जबाबदारी त्या सांभाळत. जणू माझा उजवा हातच होत्या ह्या दोघीजणी. “

“मॅडम कॉफी” भारती ने गरमागरम कॉफीचा मग माझ्या हाती दिला. माझ्या थकल्या भागल्या जीवाला ती कॉफी अमृता समान वाटली. “भारती, सगळ्या पेशंट ठीक आहेत. ” “होय मॅडम, रूम नंबर सात मधील पेशंटचं बाळ दूध पीत नाही हे तिचं म्हणणं ” “अगं मग बाळाच्या पायाला गुदगुल्या करा. त्याच्या कानाच्या चाफ्यावर हळूवार मसाज करा. कपाळावर मायेने हात फिरवा. बाळ लगेच दूध प्यायला सुरुवात करेल” “होय मॅडम, करते मी हे सगळं आणि मॅडम लेबर रूममध्ये एक पहिलटकरीण तळमळतेय. मी प्राथमिक स्तरावर तिची सर्वस्वी मदत करीत आहे. पण तिला काही वेदना सहन होत नाही आहेत. खूप आरडाओरडा करतेय. संपूर्ण हाॅस्पिटल दणाणलंय. आपण बघा मॅडम आता तिला ” ” ओ के, मी आलेच, वेळ पडली तर आँपरेशन थिएटर सुसज्ज ठेवा सिझेरियनसाठी. आपण नैसर्गिक सुटकेवरच भर देऊयात. सिझेरियन शेवटचा उपाय. “

मी पेशंटला स्टेथास्कोपनं तपासलं, तिचे व बाळाचे ठोकेही ठीक होते. ” हे बघ बाळ जन्माला येणार, ते आसुसलंय जगात पहिलं पाऊल टाकायला आणि तू त्याची मदत नाही करत. पोटात वेदनेची कळ उठली की तू ही प्राणपणानं शक्ती लाव. बाळाचा मार्ग सुकर होईल. ” 

“आता नाही सहन होत डॉक्टर ताई. मी पाया पडते तुमच्या पण माझी सुटका लवकर करा. सिझर करा माझं. “

“अगं जगात बाळाचं पहिलं पाऊल पाहणं, त्याच्या संघर्ष पाहणं आणि त्याने फोडलेला पहिला टाहो ऐकणं हे तर प्रत्येक मातेचं आद्य कर्तव्य, नव्हे तो तिच्या जीवनातला सोनेरी क्षण. अशा सोनेरी क्षणाची साक्षीदार होण्याऐवजी झोपी जाऊन बाळाला जन्म देणार होय. तुला तपासलंय मी. नैसर्गिक प्रसुतीची सगळी चिन्हे आहेत. मग कशासाठी सिझेरियन करायचं. आणि ऑपरेशन नंतर दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती. जखमेचं दुरुस्त होणं, त्यामुळे येणारा अशक्तपणा, का ओढवून घेतेस”.

“नाही नाही डॉक्टर ताई. खूप त्रास होतोय मला तुम्ही करा माझं ऑपरेशन. मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही”. मी तिला हलकेच थोपटून आश्वस्त केले.

“डॉक्टर ताई कशी आहे माझी मुलगी खूप त्रास होतोय हो. तिच्या वेदना ऐकल्याही जात नाहीत माझ्याकडून. “

“मावशी तुम्ही स्वतःही या दिव्यातून गेल्या आहात. आणि आज तुम्हीच घाबरताय. रीमा च्या नैसर्गिक प्रसुतीची सगळी चिन्हे आहेत. हे सगळं आपण तिच्या आणि बाळाच्या भल्यासाठीच करीत आहोत. थोडा धीर धरा. होईल सगळं व्यवस्थित. “

– क्रमशः भाग पहिला

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मूर्ख… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

 

🔆 जीवनरंग 🔆

☆ मूर्ख ☆ श्री मंगेश मधुकर ☆

सामंतांनी बोलावले म्हणून तीन मजले चढून लाल्या आला.

“लिफ्ट बंद आहे. खुर्ची खाली घेऊन जा. टेम्पो आला की त्यात ठेव. समजलं” दहाची नोट हातात देत सामंत म्हणाले. खुर्ची घेऊन गेलेला लाल्या बराच वेळ परत आला नाही. वाट पाहून वैतागलेले सामंत खाली आले तर तिथं लाल्या खुर्चीसोबत उभा.

“ए बावळटा, बाकीच्या खुर्च्या आणायला परत का नाही आलास”

“तुम्ही परत ये म्हणून कुठं म्हणाला” सामंतांनी कपाळावर हात मारला. “झक मारली अन तुला काम सांगितलं” चिडलेले सामंत बडबडत होते तेव्हा आपला काहीच संबंध नाही अशा आविर्भावात ‘लाल्या’नखं खात उभा. शेवटी थकलेले सामंत ओरडले “चल निघ. तोंड काय बघतोस”. मान फिरवून लाल्या निघून गेला.

 

पाच फुटी, गोल चेहऱ्याचा, बारीक डोळे, तिशीतच पडलेलं टक्कल, काळ्या-पांढऱ्या केसांची खुरटी दाढी, स्थूल शरीराचा, अंगापेक्षा मोठा शर्ट अन ढगाळी पॅन्ट असा कायमचा वेष असलेला “लाल्या”. पक्का सांगकाम्या. डोकं न वापरता जेवढं सांगितलं तेवढंच कामं.. तेही कासवाच्या गतीनं करायचा. सोसायटी म्हणजेच त्याच जग. मागेपुढे कोणीही नव्हतं. स्वतःहून कधीच बोलायचा नाही फक्त विचारलं त्याला उत्तरं द्यायचा. काम नसेल तेव्हा वॉचमन केबिनच्या बाहेर बसलेला ‘लाल्या’ सोसायटीचा बिनपगारी नोकर. कमी पैशात कामं होत असल्यानं सभासदांचीसुद्धा तक्रार नव्हती. सगळे मस्करी करायचे. चिडवायचे, वाट्टेल ते बोलायचे, रागवायचे पण लाल्या ढिम्म!!

 

‘बी’ बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये चारपाच जण टाइमपास करत बसलेले. त्यांच्यातल्या एकानं लाल्याला बोलावून नेहमीचा खेळ सुरू केला. एक रुपयाची बारा कॉईन आणि वीसचा डॉलर ठेवत लाल्याला विचारलं “बोल, यापैकी तुला काय पाहिजे” लाल्या पाहत असताना “हे, घे” “नको ते घे” असं बोलून बाकीचे आधीपासून असलेला लाल्याचा गोंधळ अजून वाढवत होते. “काय येडा समजता का?ठोकळा नको. ही जास्त असलेली चिल्लर दे” लाल्या मोठ्यानं म्हणाला तेव्हा सगळे खी खी करत हसले.

“लई हुशारेस, भारी” ‘लाल्यासाहेब, तुम्ही ग्रेट आहात” म्हणत चिडवाचिडवी सुरु झाली. डोक्यावर टपली मार, शर्टची बाही खेच, गाल ओढ असले प्रकार सुरू झाल्यावर कशीबशी सुटका करून पळतच लाल्या नेहमीच्या ठिकाणी येऊन बसला. त्याला डोळे पुसताना पाहून वॉचमननं विचारलं. “लाल्या, काय झालं रे” 

“काय नाई”

“लक्ष देऊ नकोस. ते गॉन केस आहेत. आईबापाशी सुद्धा अशीच वागत असतील. ” वॉचमनच्या बोलण्यानं लाल्याला बरं वाटलं. त्यानं पिशवीतून एक केळ काढून वॉचमनच्या पुढे केलं. “मला नको तू खा”

“घ्या वो, माझ्याकडे अजून आहेत. ”लाल्या.

“इथं कामाला आल्यापासून बघतोय. सोसायटीतील लोक वाट्टेल ते बोलतात, त्रास देतात. फुकट काम करून घेतात. तुला राग येत नाही. ”

“येतोच पण गप राहायला लागतं. ”

“म्हणून काहीही सहन करायचं. तुला मूर्ख म्हणतात ह्ये माहितीयं.. ”

“काय पण म्हणू दे. मला फरक पडत नाही. ”

“अरे पण तुजी काळजी वाटते. ” वॉचमन बोलत असताना ‘लाल्या’ एकटक बघत होता.

“काय झालं. असं का बघतोय”

“काई नाई”

“अरे सांग ना”

“आई गेल्यानंतर पयल्यांदाच कोणीतरी काळजीनं बोलतय. लई बरं वाटलं. बावळट, मूर्ख, येडा, इडियट, यडपट, हुकलेला असलं ऐकायची सवय झालीयं. तुमच्या बोलण्यात माया दिसली. म्हणून जरा.. ”

“तु माझ्या लेकरासारखा हायेस” लाल्या उठला अन वॉचमनला घट्ट मिठी मारली. भरून आल्यानं तोंडातून शब्द फुटत नव्हते. डोळे घळाघळा वाहत होते. काही वेळानं लाल्या शांत झाला

“एक बोलू. तुझं वागणं आपल्याला पटत न्हाई. येवडा अपमान सहन करण्यापेक्षा दुसरी नोकरी बरी” लाल्या हसायला लागला “काय झालं”

“कुणी सांगितलं की कामाला हाय. इथं मी बिनपगारी फुल अधिकारी”

“तरिबी एवढं सहन करतोस मग तर कमाल आहे गड्या तुझी!!आपल्याला हे जमलं नसतं”

“दुसरा पर्याय नाहीये. माजी आई ही सोसायटी बांधताना कामाला होती. नंतर इथंच साफसफाईचं काम करायला लागली. आई आणि मी दोगच. इथंच बाजूला भाड्याच्या खोलीत रहायचो. दिसभर आईला मदत करायचो. करोनात आई गेली अन मग समदी कामं मीच करायला लागलो. खोली सोडून इथंच आलो. ”

“कोणी बोललं नाई”

“२४ तास लक्ष ठेवणारा, कमी पैशात काम करणारा माणूस मिळाल्यावर कोण कशाला बोललं”

“अरे पण सगळे तुझ्या नावानं बोंबा मारतात. त्याच काय?”

“तेवढं चालायचचं. फुकट रहायला मिळतंय त्याची किंमत हाय. स्वतःला शाणी समजणारी येडी हायेत”

“हळू बोल. कुणी ऐकलं तर नसता कुटाणा व्हईल” 

इतक्यात दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून देशमुखांनी नेहमीच्या सवयीनं ओरडत ऑर्डर सोडली “लाल्या, रिक्षा घेऊन ये”

“जी”लाल्या धावतच रिक्षा आणायला पळाला. पंधरा मिनिटांनी चडफडत देशमुख खाली आले तर समोर रिक्षा उभी. “रिक्षा आणली तर सांगितलं का नाहीस”

“तूमी कुठं बोल्ला की रिक्षा आणली की सांग”

“डोकं वापरता येत नाही. इतका कसा रे तू सांगकाम्या” देशमुख प्रचंड वैतागले. लाल्या नेहमीसारखा निर्विकार. देशमुख रागानं बोलत असताना लाल्यानं रिक्षाचं मीटर वाकून पाहीलं तेव्हा देशमुख गप्प झाले अन रिक्षात बसून निघून गेले. वॉचमन हसत म्हणाला “तुझ्याबी अंगात किडा हायेच की.. एक सांग तुला खरंच कळत नाई की…… ??”लाल्या गालातल्या गालात हसला

“बोल ना” 

“दादा, समोरचा कसा वागतो यावर ठरवतो”

“म्हणजे”

“कोणाशी कसं वागायचं हे बरोबर समजतं. कायी चांगली लोकं पण हायेत. खायला देतात, कपडे देतात, माज्याशी नेहमी नीट बोलतात. अशांची कामं मनापासून करतो पण काही नमुने जे फुकट राबवून घेतात, दमबाजी करतात. त्यांना इंगा दाखवतो. कामाला ‘नाही’ म्हणता येत नाही म्हणून मग सांगकाम्यासारखा वागतो. फुकटयांचा जळफळाट होतो तीच माझी कमाई!! “

“आयला, हे नवीनचयं”

“ते ‘बी’बिल्डिंगमधे एक स्वतःला हुशार समजणारे हायेत. चारचौघात मला मूर्ख बनवण्याचा खेळ खेळतात. तो बाबा नेहमी इसची नोट आणि धा-पंदरा रूपयाची नाणी ठेवतो. दरयेळेला मी नोटेऐवजी नाणीचं घेतो. ”

“अरं येडया, वीसची नोट मोठी नाही का”

“दादा, ज्या दिशी ईसची नोट घेईल त्यायेळेपासून माझी नाण्यांची कमाई बंद!!चार चौघांसमोर मूर्ख ठरवून त्यांना आनंद मिळतो आणि मला पैसे मिळतात आता तुमीच सांगा खरा मूर्ख कोण?

“म्हणजे तू.. ”

“मुद्दाम असा वागतो. सगळे येडा, मूर्ख समजतात त्यातच फायदा आहे. माज्या येडेपणातच भलं आहे.

माज्यापासून कोणाला काही धोका नाही. म्हणून तर इथं राहून देतात. दुनिया शाण्या माणसाला घाबरते. त्यापरिस सोयीस्कर मूर्ख असणं कवाबी चांगलंच की.. ”…… लाल्याचं बोलणं ऐकून वॉचमननं कोपरापासून हात जोडले.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चमचाभर आनंद – लेखक : सुश्री मेधा नेने  ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ चमचाभर आनंद – लेखक : सुश्री मेधा नेने  ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर 

“स्वानंदी, यार वैताग आलाय नुसता सगळ्याचा. “… प्रिया चिडचिड करत म्हणाली. सुट्टीच्या दिवशी सकाळी स्वानंदीच्या घरी दोघी गप्पा मारत होत्या. स्वानंदी ओट्यापाशी पोळ्या करत होती.

“आता काय झालं ? “… स्वानंदीने विचारलं.

“एक गोष्ट मनासारखी घडत नाही. मला पाचशेचे सुट्टे हवे होते म्हणून आत्ता इथे येताना रिक्षावाल्याला दिले तर त्याच्याकडे नेमके सुट्टे पैसे नव्हते. त्याच्याशी थोडा वाद झाला. मग शेवटी ऑनलाईनच ट्रान्स्फर केले. सगळीकडे नेहमी मलाच लक्ष द्यावं लागतं…. घरी काय नाहीतर ऑफिसमध्ये काय ! जेंव्हा गरज असते तेंव्हा विनीतला बरोब्बर ऑफिसचं काम असतं. माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा माझ्याच अंगावर काम पडतं. “… प्रिया वैतागणाऱ्या सुरात म्हणाली.

“एवढ्या सकाळी नसतील रिक्षावाल्याकडे सुट्टे ! एखाद्या दुकानातून घे. आणि विनीतचा जॉब कसा आहे हे तुला आधीपासूनच माहीत होतं की नाही ? शिवाय दुसऱ्याने केलेल्या कामावर तुझा विश्वास नसतो, म्हणून ऑफिसमध्ये तुलाच जास्त काम पडतं. पण या कामामुळेच तर तुला प्रमोशनही मिळालं की नाही?

तुला नाही वाटत प्रिया की तू सारखी किरकिर करत असतेस ? नेहमी याला नावं ठेव, त्याची तक्रार कर… हेच चालू असतं तुझं. अख्ख्या दिवसात एकही चांगली घटना कशी काय घडत नाही तुझ्या बाबतीत ? बघ, तुझ्याबरोबर घडणारी आजच्या दिवसातली पहिली चांगली घटना मीच घडवते. “…. नाटकी पण धीरगंभीर आवाजात स्वानंदी म्हणाली.

“कोणती घटना ?”… न कळून प्रियाने विचारलं.

“अगं विशेष काही नाही. पोळ्या करतेच आहे मी, तर गरमागरम पोळी देते खायला. तूच म्हणतेस ना, तव्यावरून थेट ताटामध्ये येणारी पोळी आणि त्यावर घरचं साजूक तूप, म्हणजे परमानंद असतो. ”

असं बोलून स्वानंदीने प्रियाला ताटामध्ये तव्यावरची पोळी काढून वाढली. पोळीवर चमच्याने तूप सोडताना म्हणाली… “हा घे तुझ्यासाठी चमचाभर आनंद !”.

“मायेने, आयतं असं कोणी खायला वाढणं म्हणजे एखाद्या संसारी बाईसाठी खरच मोठी आनंदाची गोष्ट असते…. “…. प्रियाच्या मनात आलं.

स्वानंदीच्या घरून निघाल्यापासून प्रियाचं‌ विचारचक्र सुरू झालं. प्रियाच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती. तिला कोणाचं काहीच पटायचं नाही…. सारख्या कसल्या न कसल्या तक्रारी करायची. त्यामुळे वर्गातलं कोणीही तिच्याशी जास्त बोलायच्या फंदात पडत नसे. त्या मुलीच्या मागे तिचा उल्लेख ‘कुरकुरे’ असा केला जायचा. स्वानंदी आज जे काही बोलली, ती प्रियाच्या मते धोक्याची घंटा होती. प्रियाला कुरकुरे म्हणवून घ्यायची इच्छा तर‌ नक्कीच नव्हती.

“चमचाभर आनंद…. “… स्वानंदीनी सहज म्हणून उच्चारलेले हे शब्द प्रियाच्या डोक्यात घुमत होते. तिने मनातल्या मनात एक निर्णय घेऊन टाकला. त्याची अंमलबजावणी कशी काय जमतीये हे बघणं महत्त्वाचं होतं.

रात्रीचं जेवण सुरू होतं….

“आज चक्क तू भात खात नाहीयेस ? आज सूर्य पश्चिमेला उगवला का काय ?”…. प्रियाचं भात प्रेम सगळ्यांना माहिती होतं. आज ती भात खाताना दिसली नाही तेंव्हा विनीतने, प्रियाच्या नवऱ्याने आश्चर्याने विचारलं.

“खरच की आई ! तुला कमी पडतोय का भात ? माझ्यातला घे ! “…. छोटा प्रणव निरागसपणे म्हणाला.

“मी खरं तर दक्षिण भारतात जन्माला यायला हवं होतं, असं तुम्ही दोघंही चिडवताना ना मला. म्हणून भात खाण्यावर थोडा कंट्रोल आणायचा प्रयत्न करतीये. “… प्रियाने खोटच कारण सांगितलं.

जेवणानंतरची सगळी आवराआवर झाल्यावर प्रियाने एक रिकामा डबा काढला. “सकाळी आयती गरमागरम तूप पोळी खायला मिळाली त्याचा हा चमचाभर आनंद !”…. असं मनात म्हणून एक लहान चमचा भरून तांदूळ तीने त्या डब्यात घातले. “आणि हा चमचाभर आनंद, लहानग्या प्रणवने आईच्या काळजीने स्वत:च्या ताटातला भात आईला देण्याची तयारी दाखवली त्याचा ! आज दोन चमचे तरी डब्यात जमा झाले. “… मनातून खुश होत प्रिया म्हणाली. त्या डब्याला‌ तिने‌ नाव‌ दिलं…. ‘आनंदाचा डबा’.

जेवताना दोन तीन दिवस प्रियासाठी थोडे कठीणच गेले तसे. कारण वाटीभर तांदूळ जमा झाल्याशिवाय भात खायचा नाही असं ठरवलच होतं तीने. त्यामुळे दिवसभरात आपल्या दृष्टीने काय चांगलं घडलं हे शोधायचा छंदच लागला तिला.

आज भाजी घेऊन घरी पोचते न पोचते तोच लाईट गेले. घामाघुम झालेल्या प्रियाची चिडचिड व्हायला लागली. पण नंतर तिच्याच लक्षात आलं की लिफ्टमध्ये असताना लाईट गेले असते तर ? दोन दिवसांपूर्वी बिल्डींगचा जनरेटर खराब झालाय. तो अजूनही दुरूस्त केलेला नाही. किंवा आधीच लाईट गेले असते तर हातातल्या भाजीच्या पिशव्या घेऊन सहा मजले चढत यावं लागलं असतं. बरं झालं घरी आल्यावर लाईट गेले…… एक चमचा आनंद डब्यात जमा झाला.

आज अति कामामुळे ऑफिसमधून यायला उशीर झाला. पण घरी आल्यावर विनीतने स्वत:हून चहा करून दिला….. एक चमचा आनंद डब्यात जमा झाला.

आज गाडी पंक्चर झाली. त्यामुळे ऑफिसमध्ये पोचायला उशीर झाला. बरं झालं पण बॉसच उशीरा आल्याने बोलणी खावी लागली नाहीत….. एक चमचा आनंद जमा !

रात्री आयत्यावेळी प्रणवने शाळेतल्या सायन्स प्रोजेक्ट बद्दल सांगितलं. विनीत ऑफिसच्या कॉलवर होता. त्याची काहीच मदत झाली नाही. पण दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर प्रणवचा चेहरा किती फुलला होता ! अख्ख्या वर्गासमोर त्याच्या प्रोजेक्टचं कौतुक केलं होतं बाईंनी. त्याने खुशीने मारलेली मिठी आणि “आई, तू कित्ती ग्रेट आहेस”… अशी कॉम्लिमेंट देऊन घेतलेला पापा हा अमूल्य आहे…. एक चमचा आनंद जमा !

आज सकाळी मॉर्निंग वॉकवरून येताना शेजारच्या काकू फारच गप्पा मारत बसल्या. घरी यायला‌ उशीरच झाला. आवरायची फार घाई झाली. असू दे…. पण त्यामुळेच सकाळी मनासारखी ताजी भाजी मिळाली. एरवी, पहाटेच फिरून येते, तर तोपर्यंत भाजीवाले बसलेले पण नसतात…. एक चमचा आनंद जमा !

अचानकच रवीवारी विनीतचे मामा मामी घरी आले. स्वयंपाकाची जरा गडबड झाली. पण वेगवेगळ्या कितीतरी विषयांवर मस्त गप्पा झाल्या. नेहमीच्या रूटीनपेक्षा छान वेगळा रविवार गेला….. एक चमचा आनंद जमा!

आनंदाचा डबा भरत चालला होता. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काय चांगलं घडलय, हे शोधायचा नादच लागला प्रियाला. दिवसेंदिवस ती जास्त आनंदी आणि प्रसन्न दिसायला लागली. तिच्या स्वभावातला बदल सगळ्यांना जाणवत होता. तिचा सहवास आता ऑफिसमधले सहकारी, विनीत, प्रणव, शेजारीपाजारी अशा‌ सगळ्यांना हवाहवासा वाटायला लागला.

दिवसांमागून दिवस जात राहिले.

आज बऱ्याच दिवसांनी स्वानंदी प्रियाकडे आली तर प्रिया घरी भांडी घासत होती. भांडी घासता घासता चक्क गाणं गुणगुणत होती.

“काय ? आज बाईने दांडी मारली वाटतं ?”

“मग काय तर ! पण बरं झालं एका अर्थी. बाई भांडी घासते तेंव्हा काही काही भांड्यांवर पावडरचा पांढरटपणा तसाच राहतो. कधी कधी चमचे मागून खराब राहतात. एरवी ऑफिसमुळे या गोष्टी चालवून घ्याव्या लागतात. आज कसं ? सुट्टीचं छानपैकी मनासारखी चकचकीत करते भांडी. “… प्रिया चेहऱ्यावर हसू खेळवत म्हणाली.

“बाईने दांडी मारली आणि तू चक्कं चिडचिड न करता हसून बोलतीयेस ?”… स्वानंदीला आश्चर्य वाटल्यावाचून राहिलं नाही.

एव्हाना‌ प्रियाची भांडी घासून झाली होती. कुकरमधला मस्त सुगंध दरवळणारा गरमागरम पुलाव तिने एका डिशमध्ये काढला. ती डिश स्वानंदीपुढे करून प्रिया म्हणाली,

“हाआनंदाचा पुलाव पहिल्यांदा चाखायचा मान तुझा ! त्याचं काय आहे ना, आयुष्य मला चमचा चमचा आनंद देत होतं. पण डबाभर आनंद एकदम मिळायला हवा या हट्टापायी मी या चमचाभर आनंदांकडे दुर्लक्ष करत बसले. पण माझा आनंदाचा डबा भरलाय आणि तोच आनंद मी आज वाटतीये. “…. प्रियाच्या बोलण्याने स्वानंदी कोड्यात पडली.

“काय बडबडतीयेस ? भांडी घासून घासून मेंदूत पण चमचे न् डबे घुसले का ? नीट बोल की !”

मग त्या दिवशी स्वानंदीच्या घरून निघाल्यापासून अथ पासून इति पर्यंतची सगळी कथा प्रियाने स्वानंदीला सांगितली.

“अस्सं होय ! माझ्या बोलण्याने हा कायापालट झाला आहे, तर याचा मला काय मोबदला मिळणार? “…. स्वानंदीने प्रियाला चिडवत विचारलं.

“देणार तर ! तुझ्या घरून सुरूवात झालेल्या चमचाभर आनंदाचा मोबदला, मी माझ्याकडचा डबाभर आनंद देऊन करणार आहे. “…. असं बोलून प्रियाने एक मोठा डबाभरून पुलाव स्वानंदीकडे सोपवला.

“हा माझा आनंद मी तुझ्या बरोबर आणि तुझ्या घरच्यांबरोबर मी शेअर करतीये. आणि यापुढेही करत राहणार…. ”

“चिंकी तू तो बदल गयी रे !’ “…. स्वानंदी मुन्नाभाई एमबीबीएस मधला डायलॉग मारत बोलली आणि दोघींच्या हसण्याने घर भरून गेलं.

लेखिका : सुश्री मेधा‌ नेने

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक सहजीवन… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ एक सहजीवन…  भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(असं म्हटल्यावर रजनीने रविवारी सकाळचा नाश्ता झाल्यावर रघुवीरजींच्या समोर विषय काढला. ‘पप्पा, आम्ही तुम्हाला सोसायटीतल्या राजेश्वरी आंटीबरोबर पार्कमध्ये गप्पा मारताना पाहिलं आहे.’) – इथून पुढे — 

रघुवीरजी शांतपणे म्हणाले, ‘हो, अलीकडेच आमची ओळख झाली आहे. राजकीय घडामोडी, आवडती पुस्तके, जुनी अवीट गाणी ह्याविषयी होणाऱ्या गप्पांतून आमची मैत्री फुलत गेली आहे एवढंच. ’

‘पप्पा, मला ठाऊक आहे की तुमच्या हृदयातील सासूबाईंची जागा कुणीच घेऊ शकणार नाहीत, तरीही मी राजेश्वरी आंटीशी एकदा बोलून पाहते. ’ यावर काय बोलावं हे रघुवीरजींना सुचलंच नाही.

रजनीने माहिती काढल्यावर कळलं की राजेश्वरींच्या लग्नानंतरच्या दोन महिन्यांतच त्यांचे पती कायमचे परदेशी स्थायिक झाले. काही महिन्यानंतर त्यांच्या पतीने फोनवर सांगितलं, ‘आईवडिलांच्या इच्छेखातर मी हे लग्न केलं होतं. मी इथल्याच एका मुलीशी लग्न केलं आहे. तू तुझा निर्णय घ्यायला मोकळी आहेस. ’

हे ऐकल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काय करावं हे सुचत नव्हतं. त्यांनी ठरवलं असतं तर त्या गुंत्यातून बाहेर पडल्या असत्या. घटस्फोट घेऊन त्या माहेरी जाऊ शकल्या असत्या पण त्यांच्या पोटात बाळ वाढत होतं.

स्थानिक हायस्कूलमध्ये त्या शिक्षिका होत्या. त्यावेळी त्यांनी माहेरी जाण्यापेक्षा सासू सासरे यांच्याबरोबर राहून आपल्या होऊ घातलेल्या अपत्याला वाढवत जीवन व्यतीत करण्याचा कठोर निर्णय घेतला. जो पर्यंत सासू सासरे होते तोवर त्यांची सेवा करीत राहिल्या. आपल्या लेकीला शिकवून विद्याविभूषित केलं.

एकुलत्या एका मुलीच्या लग्नानंतर राजेश्वरी मॅडम एकट्या पडल्या आणि त्या नुकत्याच सेवानिवृत्तही झाल्या. त्यांच्या आयुष्यात प्रचंड पोकळी निर्माण झाली. एकटेपणाच्या धास्तीने त्यांची तब्येत खालावत चालली. जावई आणि मुलीने राजेश्वरींना त्यांच्याकडे येऊन राहण्याचा आग्रह केला पण त्या तयार झाल्या नाहीत. अलीकडेच त्यांना रघुवीरजींच्या रूपाने सुखदु:ख वाटून घेणारा एक मित्र भेटल्याने त्यांच्या चित्तवृत्ती फुलून आल्या होत्या.

एके दिवशी रजनी भाभी थेट राजेश्वरींच्या घरी पोहोचली. रघुवीरजींची सून असल्याचं सांगून ती बसली. त्यांनी दिलेला चहा घेतला. विषयाला हात कसा घालावा या विचारात रजनी अवघडली होती. अखेर धैर्य एकवटून तिने तोंड उघडलं. ‘ मी काय म्हणत होते, तुम्ही दोघांनी लग्न केलंत तर तुम्हाला एकमेकांची सोबत होऊन तुमच्या जीवनातील एकटेपणा संपून जाईल. ’

राजेश्वरी अस्वस्थ होऊन म्हणाल्या, ‘निघा आता. ’ त्यांना तो विवाहाचा प्रस्ताव अजिबात रूचला नाही.

एवढ्यावरच न थांबता रजनीने राजेश्वरींच्या मुलीचा, अर्चनाचा मोबाईल नंबर मिळवला आणि तिला फोनवरून सगळी हकीगत सांगितली.

अर्चनानेही आईला भेटून तोच विवाहाचा प्रस्ताव मांडला. राजेश्वरी म्हणाल्या, ’अर्चू बेटा, संपूर्ण आयुष्य मी एकटीनं घालवलं आहे. मला लग्नच करायचं असतं तर मी माझ्या तारुण्यातच केलं असतं. या वयात लग्नाचा विचार केला तर लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल? अन लक्षात ठेव, सातासमुद्रापलीकडे असेना का, माझा पती अजून जिवंत आहे. ’

‘आई, त्यावेळी मी तुझ्या पोटात होते. तुला पुन्हा लग्न न करण्यासाठी ते एक सबळ कारण होतं. पण आता हे एकटेपण तुला सुखाने जगू देणार नाही आणि तुझ्या काळजीत मीदेखील सुखी राहू शकणार नाही.

आई, समाजाचं काय घेऊन बसली आहेस. बाबांनी केलेल्या अन्यायावर तुझ्या पाठीमागे त्यांनी चविष्ट चर्चा केली असेल. तुझं दु:ख वाटून घ्यायला कुणी पुढे आले नाहीत. आपलं स्वत्व सांभाळून, तू या स्वार्थी जगाच्या खडकाळ वाटेवर हरवून न जाता वाट काढत चालत राहिलीस. आपल्या पोटच्या गोळ्याला आणि त्याच माणसाच्या आईबाबांना सांभाळत नेटाने तू पुढे चालत राहिलीस.

आई, ज्यानं स्वत:च्या अपत्याचं तर सोड, जन्मदाते आईबाबा, जिच्याशी सप्तपदी घातली ती पत्नी ह्यांच्याकडे परत कधी वळूनही पाहिलं नाही त्या माणसाबद्दल बोलते आहेस? तू आपल्या अपत्याच्या वात्सल्यापुढे हरलीस हे त्यानं ओळखलं. तुझ्या काळजाला निर्दयीपणे नख लावून गेलेल्या त्या माणसाला तुझी तडफड कधीच कळली नाही. त्या पतीचं कसलं कौतुक सांगते आहेस?

अगं नोकरीच्या निमित्ताने ‘दोन ध्रुवावर दोघे आपण’ असं म्हणत जगणारी जोडपीही असतात; तरीही ही जोडपी मनाने, संवादाने एकमेकांशी जोडलेली असतात. एकमेकांच्या साथीने पुढे जातात, एकत्र स्वप्नं पहातात आणि ती पूर्ण करण्यासाठी आयुष्य वेचतात. पण गेल्या अठ्ठावीस वर्षात तो माझा ‘बाप’ म्हणवला जाणारा माणूस मी कधी पाहिलाच नाही.

आई, पती म्हणजे कोण हे मी सांगावं तुला? अगं, जो पुढे होऊन तिच्या डोळ्यांतला भाव टिपतो, कधी काळी चूक झालीच तर क्षमा करून तिचं न्यूनत्व तिला जाणवू न देता जो समजून घेतो आणि कसलीही उणीदुणी न काढता जो तिला उराशी धरतो, तो खरा जीवनसाथी. लग्नानंतरच्या दोन वर्षात मी हे अनुभवते आहे. तुला एवढा चांगला जावई शोधता आला ह्याचा अर्थ रघुवीरजींच्यात तू नक्कीच काही तरी चांगलं पाहिलं असणार. आई, माझ्यासाठी तरी हो म्हण. ’

‘बाळा, तरुणपणी आपण लग्न करतो किंवा एक नातं निर्माण करतो तेव्हा त्या नात्यासोबत काही जबाबदारीदेखील उचलतो. परंतु म्हातारपणी तसं नसतं. म्हातारपण म्हणजे व्याधींचं घर. आता त्या जबाबदारीचे ओझे शरीराला झेपत नाही, म्हणून एकटे राहावेसे वाटते. म्हातारपणी सोबत न राहता निखळ मैत्रीचे नाते जास्त उपयुक्त ठरते. या नात्याने आधार मिळतो आणि जबाबदारीचे ओझे देखील वाटत नाही. म्हातारपणी साथ देणारे मित्र- मैत्रीणी मात्र जरुर हवेत. ते आपला भावनिक प्रवास सुखकर करतात. त्यात स्त्री पुरूष असा मात्र भेद नसावा. ’

‘आई, आम्ही सदैव तुमच्यासोबत असणार आहोत’ हे लेकीने पटवून दिल्यानंतर अखेर राजेश्वरीने त्या प्रस्तावास होकार दिला. एकमेकांच्या सहवासात भावनात्मक आधार मिळणार होते, हे जरी खरं असलं तरी या वयात विवाहाच्या बंधनात अडकणे आणि वारसा हक्काने मिळणाऱ्या कुणाच्याही संपत्तीला धक्का लावणे हे मात्र त्यांना प्रशस्त वाटत नव्हते.

कसल्याही नात्यांची चौकट न स्वीकारता, त्या दोघा कुटुंबियांच्या आणि आप्तेष्टांच्या संमतीने त्या दोघांनी लग्नाविना सहजीवनाचा निर्णय घेतला.

आजवर एकटीनेच झुंजत राहिलेल्या राजेश्वरींच्या जीवनातले रितेपण संपून सौख्य पदरी आलं. साहेब, आता रघुवीरजींची काळजी घ्यायला राजेश्वरी आंटी असल्याने. लवकरच शेखर सपत्निक परदेशातल्या कंपनीत जॉइन होण्याच्या तयारीत आहे. अर्चनाला हक्काचे ‘पप्पा’ मिळाले म्हणून ती खूश आहे. एकच वाटतं, सहजीवन आजही तितकं समाजमान्य नाही. आपण सुद्धा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. ” असं जगदीशने आपले मत मांडलं.

रघुवीरजींना भेटून जुन्या आठवणी ताज्या करून उगाच त्यांच्या मनांत काहूर माजवायला नको म्हणून मी त्यांना भेटायचा विचारच सोडून दिला.

– समाप्त – 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक सहजीवन… – भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ एक सहजीवन…  भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

नुकतीच माझी बदली दिल्लीला झाली होती. रघुवीरजी, एकेकाळचे माझे सहकारी, दिल्लीच्या जवळच फरिदाबादला स्थायिक झाले होते. एकदा रघुवीरजींना आणि सविता दीदींना भेटायची इच्छा होती. ते साताठ वर्षापूर्वी निवृत्त झाले असल्याने त्यांचा मोबाईल नंबरही नव्हता. खरं सांगायचं तर, कामाच्या धबडग्यात मला वेळही मिळत नव्हता.

आमच्या ऑफिसातला जगदीश फरिदाबादलाच राहतो. एकदा त्याच्याकडे रघुवीरजींच्याविषयी चौकशी केली. रघुवीरजी त्याच्या जवळच्या कॉलनीत त्यांच्या मुलासोबत राहत असल्याचं त्यानं सांगितलं. सविता दीदी एका वर्षापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने परलोकवासी झाल्या हे कळल्यावर मला त्यांच्या सोबत व्यतित केलेलं मुंबईतलं वास्तव्य आठवलं.

रघुवीरजींची मुलं हॉस्टेलमधे राहून दिल्लीत शिकत होती. त्यामुळे कांदिवलीच्या स्टाफ क्वार्टर्समध्ये ते सपत्नीक अकराव्या मजल्यावर राहायचे तर मी सातव्या मजल्यावर एकटाच राहायचो. बऱ्याच वेळा सवितादीदी मला आग्रहाने त्यांच्याकडे जेवायला बोलवायच्या. मी चार पाच वेळा तरी त्या माऊलीच्या हातचं खाल्लं असेल. त्या म्हणायच्या, “हृषिकेश, आप मुझे दीदी कहते हो ना? फिर अपने दीदी के घर आने में इतना क्यों झिझकते हो?”

एकदा सवितादीदी कुठल्याशा समारंभाच्या निमित्ताने दिल्लीला गेल्या होत्या. रघुवीरजींनी फोनवर विचारलं, ‘हृषिकेश, मैं तुम्हारे फ्लॅट में रहने आऊं क्या?’ 

सवितादीदी नसल्याने त्यांना घर खायला उठलं होतं. मी ‘हो’ म्हणताच ते माझ्या फ्लॅटवर राहायला आले. मला म्हणाले, ‘हृषिकेश, मेरे भाई, सविताजी ह्या फक्त दोन दिवसासाठी बाहेर गेल्या आहेत तर मी इतका अस्वस्थ झालो आहे की काय सांगू? देव न करो अन त्या माझ्या अगोदर गेल्या तर माझी काय अवस्था होईल?’ हे ऐकल्यावर, अशाच विरह व्यथेचे मनोज्ञ दर्शन घडवणाऱ्या बोरकर यांच्या कवितेतल्या ओळी माझ्या मनात रूंजी घालत होत्या.

‘तू गेल्यावर दो दिवसांस्तव जर ही माझी अशी स्थिती 

खरीच माझ्या आधी गेलीस तर मग माझी कशी गती?….

‘तू गेल्यावर फिके चांदणे, घर परसूंही सुने सुके

मुले मांजरापरी मुकी अन् दर दोघांच्या मधे धुके’….

खरंच रघुवीरजी आणि सवितादीदी ‘मेड फॉर इच अदर’ असं कपल होतं. रघुवीरजींना शेवटची पोस्टिंग दिल्लीला मिळाली त्याचवेळी माझी चेन्नईला बदली झाली. त्यानंतर रघुवीरजींचा कधी संपर्क झाला नाही.

जगदीश पुढे सांगायला लागला आणि माझी तंद्री भंग पावली, ‘साहेब, रघुवीरजींचा मुलगा शेखर हा माझा घनिष्ठ मित्र आहे. शेखर आणि त्याची पत्नी रजनी त्यांची अतिशय काळजी घेतात. गेल्या वर्षभरापासून ते दोघेही ऑफिसला गेल्यानंतर रघुवीरजींना घरी एकटेच राहावे लागायचे. पत्नींच्या आठवणीने हळूहळू ते निराशेच्या गर्तेत जात होते.

त्यांची सून रजनीच्या आग्रहामुळे, रघुवीरजी घराच्या जवळच असलेल्या पार्कमध्ये सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जायला लागले. पार्कमध्येच त्यांची राजेश्वरींशी ओळख झाली. हळूहळू ती जुजबी ओळख गाढ मैत्रीत रूपांतरित झाली. रघुवीरजींना राजेश्वरींच्या वागण्यातून, बोलण्यातून सविताजींचे लाघवी रूप दिसायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीनच तजेला आला. त्यांच्या मैत्रीची गोष्ट आजूबाजूला पसरली.

शेखरने ती हकीगत माझ्या कानावर घातली. मी म्हटलं, “शेखर, अरे रजनी भाभींना ही हकीगत इतरांच्याकडून कळण्या अगोदर तूच सांगावंस. ” 

घरी पोहोचल्यावर शेखरने रजनी भाभींना ही हकीगत शांतपणे सांगितली.

सगळं ऐकल्यावर रजनी भाभी म्हणाल्या, ‘हे पाहा शेखर, ज्यांनी एकटेपणा अनुभवला नाही ना असेच लोक पप्पांच्या विषयी बोलत असतील. एकटेपणाशी लढण्यात हार मानून निराशेच्या गर्तेत जाऊन आपलं नुकसान करून घेण्यापेक्षा किंवा चिडचिड करून आपल्या मुलांच्या संसारात लुडबूड करीत राहण्यापेक्षा; त्यांनी त्यांच्या वयाला, स्वभावाला जुळणाऱ्या व्यक्तिशी सुखदु:खं वाटून घेतली तर काय हरकत आहे? या वयातल्या मैत्रीत समोरची व्यक्ती आपल्याला कितपत समजून घेतो एवढंच माणूस पाहत असतो. ‘

‘मग त्यांनी पुरूष मित्र जोडावेत. त्याला कोणाची हरकत असणार आहे?’ शेखरनं सांगितलं.

‘शेखर, स्त्रियांमध्ये वात्सल्य-ममता हे भाव जात्याच असतात, तसे पुरुषांमध्ये नसतात. एक स्त्री म्हणून नव्हे तर ती त्यांच्या भावना समजून घेते म्हणून पप्पांनी त्यांच्याशी मैत्री जोडली असेल. पप्पांना त्यांच्या एकाकी जीवनात योगायोगाने एका स्त्रीमधे मैत्र भेटलं आहे. एरव्ही कोणा परस्त्री सोबत बोलताना मी मामंजीना कधी पाहिलेलं नाही.

आज वयाच्या या टप्प्यावर सासूबाई नसल्याने त्यांना आलेले मानसिक रितेपण न सांगताच राजेश्वरीजी समजून घेत असाव्यात. माणसाला एकटेपणा, नैराश्य ह्यातून सहानुभूतीचे चार जादुई शब्दच तारू शकतात. स्त्री आणि पुरुष हा आदिम व मूलभूत भेद अनादिकाळापासून माणसाच्या प्रवृत्तीला चिकटलेला आहे.

आजकाल तरूण वयातल्या मुला-मुलींची मैत्री स्वाभाविक वाटते, मग वृद्धत्वात झालेल्या मैत्रीत कसली आली आहे विसंगती? ते वृद्ध झाले आहेत म्हणून त्यांची लहानसहान सुखे आपण हिरावून घ्यावीत का? स्त्री पुरुषात शारीरिक ओढीच्या पलीकडचे मैत्र असूच शकत नाही का?’

‘रजनी, तू जे बोलते आहेस ते बरोबर आहे, पूर्वीच्या मानाने आता स्त्री-पुरुष या नात्यात बराचसा मोकळेपणा आलेला आहे, हे मान्य आहे. परंतु अजूनही तो पुरेसा नाही. आपल्या समाजात आजही स्त्री-पुरुषांच्या मैत्रीकडे वाकड्या नजरेनेच बघितले जाते हे तर मान्य करशील की नाही?’ 

‘शेखर, दिवसेंदिवस भोवतालचे वातावरण आणि राहणीमान वेगाने बदलत चालले आहे आणि त्याच बरोबर लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन आणि विचार करण्याच्या पद्धतीतदेखील बदलत होतोय. प्राप्त परिस्थितीला सामोरे जाणे ही काळाची गरज होत चाललीय.

आपल्या जीवनाचे निर्णय बरोबर की चूक किंवा चांगले की वाईट एवढ्याच कसोट्यांवर घासून न पाहता त्यातून होणाऱ्या सोयी सुविधांच्या हिशेबाने योग्य तो विचार करून आज माणूस निर्णय घेतो आहे. परदेशातल्या नोकरीच्या निमित्ताने मुलं दूर जाण्याने वृद्धांची एकाकी कुटुंबे वाढत चाललेली आहेत. परिणामत: कधीही विचारात न घेतल्या गेलेल्या अनेक नवीन समस्यांना तोंडे फुटत चाललेली आहेत. आईबाबांना एकटे राहायला लागू नये म्हणून विदेशातली संधी नाकारणारा तुझ्यासारखा एखादाच शेखर असतो. कळलं?’

‘खरंच, रजनी मी हा विचार कधी केलाच नव्हता. तूच बाबांशी बोलून एकदा राजेश्वरी आंटीशी बोलून घे. ’ 

असं म्हटल्यावर रजनीने रविवारी सकाळचा नाश्ता झाल्यावर रघुवीरजींच्या समोर विषय काढला. ‘पप्पा, आम्ही तुम्हाला सोसायटीतल्या राजेश्वरी आंटीबरोबर पार्कमध्ये गप्पा मारताना पाहिलं आहे.’

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares