मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रक्षक–भक्षक (मूळ कथा – रक्षक-भक्षक) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ रक्षक–भक्षक (मूळ कथा – रक्षक-भक्षक) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

सरहद्दीवरच्या रात्री आपल्या सोबत दररोज एक नवी गोष्ट घेऊन यतात.  धडधड वाढवणार्‍या, श्वास रोखायला लावणार्‍या या रात्री अनेकदा आयुष्यापेक्षा लांबलचक वाटू लागतात. इतक्या लांबलचक की सकाळ होता होता वाटतं, एक शतक उलटलय. कसरती करणार्‍या या रात्रींमुळे वाढणारी धडधड मोजण्याचं काही यंत्र बनलेलं नाही. जगातील सर्वश्रेष्ठ ईसीजी मशीनदेखील या रात्रीतील धडधड मोजायला आलं, तर या रात्रींपुढे शरणागती पत्करेल.

त्या दिवशीची सरहद्दीजवळची ती रात्र, एक विलक्षण गोष्ट आपल्याबरोबर घेऊन आली होती. सरहद्दीजवळील, उत्तुंग पहाडावर असलेल्या सीमारक्षकांच्या बंकरचा, संध्येने एवढ्यातच निरोप घेतला होता. बंकर अपादमस्तक बर्फात बुडून गेला होता जसा काही. या असल्या बर्फाळ पहाडांवर लवकर येण्याची, या निर्लज्ज रात्रीला जरा घाईच असते. सतत बर्फवृष्टी होत असलेला हा तिसरा महिना होता. खालून येणारे सगळे रस्ते गेल्या पाच महिन्यांपासून बंद होते. डब्यातील फ्रोजन भाज्या खाऊन आणि पावडरच्या दुधाचा चहा पिऊन तिथल्या सगळ्या लोकांच्या स्वाद-ग्रंथी विटून गेल्या होत्या पण जोपर्यंत बर्फ पूर्णपणे वितळत नाही, तोपर्यंत आणखी दोन-अडीच महीने हे असंच चालू रहाणार होतं. त्या रात्री, बर्फाच्या शुभ्र चादरीवर उठलेल्या दाट धुळीने रात्रीचा थोडासा पडदा उचलला गेला आणि उड्या मारत मारत एक मध्यम बांध्याचा हरण- शावक भय आणि आतंकाची नवी परिभाषा लिहीत, एका बांकरमध्ये येऊन लपून बसला. रात्रीची बेलगाम धडधड त्या शावकाच्या मोठ्या मोठ्या घाबरलेल्या डोळ्यात विक्राळ नृत्य करत होती.

सरहद्दीच्या त्या बाजूला, दुश्मनांच्या बाजूला एक दाट जंगल आहे. त्यातून या बाजूला वन्य प्राण्यांची ये-जा नेहमी दृष्टीपथात येते. बंकरमधील तत्पर, तरतरीत रखवालदाराने जेव्हा भयग्रस्त झालेल्या त्या शावकाला आत येऊन बंकरच्या एका कोपर्‍यात आश्रय घेताना पाहिलं, तेव्हा या गोष्टीचा छ्डा लावणं योग्यच होतं. जेव्हा त्या रखवालदाराला नियंत्रण रेषेपालीकडे  २-३ चित्त्यांची एक टोळी भटकताना दिसली, तेव्हा सगळी वस्तुस्थिती स्पष्ट झाली. सरहद्दीवर लावलेल्या काटेरी कुंपणापलिकडेकडे ते हळू हळू गुरगुरत होते. पांढर्‍या शुभ्र बर्फावर त्यांच्या पावलांच्या उमटलेल्या खुणा त्यांना पडलेला पेच स्पष्ट करत होता. आपल्या आहारावरचा अधिकार मिळवण्यासाठी रायफल घेतलेल्या रखवालदाराशी भिडणं ठीक होईल की नाही, असा पेच त्यांना पडला असावा. चित्त्यांच्या टोळीच्या बाजूने थोडीशी गंभीर  गुरगुर आणि पहारेकर्‍यांच्या बाजूने हाट.. हाट .. हुश.. हुश… या बरोबरच बर्फाचे गोळे करून त्यांच्यावर फेकणं, यामुळे चित्त्यांच्या टोळीने आपल्या आहाराच्या मागे लागण्याचा विचार सोडून दिला आणि ते खालच्या, दुश्मनांच्या बाजूच्या जंगलात पळाले. इकडे बंकरच्या कोपर्‍यात आखडून बसलेलं शावक, आपल्या फुंकणीसारख्या वर-खाली होणार्‍या श्वासांवर नियंत्रण मिळवत जगभराची शांती आपल्या मोठमोठ्या डोळ्यात सामावून घेत होतं. त्याला हे कुठे माहीत होतं की त्याचे रक्षक असलेले रखवालदार, गेल्या ३-४ महिन्यांच्या बर्फवृष्टीमुळे बंद झालेल्या रस्त्यांमुळे, टीनच्या बंद डब्यातील फ्रोजन कोबी आणि मटार खाऊन वैतागले होते आणि आपल्या जीभेवर नवीन स्वादाचा लेप चढवायला आतुर झाले होते. वखवखलेल्या नजरेने ते त्याच्याकडे बघत होते.

जवळच असलेल्या दुसर्‍या बंकरमधील कमांडरला वायरलेसवरून, इकडच्या बाजूच्या घटनेची ‘ब्रेकिंग न्यूज’ देत,  रखवालदाराने शावकाचा बळी देण्याची परवानगी मागितली. सगळी घटना ऐकल्यावर कमांडरच्या बाजूच्या बंकरवर काही काळ मौन पसरले. अवखळ रात्रीच्या कोलांटया उड्यांमुळे, त्या निरागस शावकाच्या काळजाची धडधड अधीकच वेगाने होऊ लागली होती.

किती क्षण उलटले, कुणास ठाऊक? इकडे आश्वस्त होणार्‍या शावकाच्या श्वासाबरोबरच तिथे बर्फगार मौन पसरलेलं. ‘गो अहेड’ ऐकण्यासाठी उतावीळ झालेलं. अचानक त्या पसरलेल्या मौनावर, वायरलेस रेडिओ- सेटवरून कमांडरचा, सक्त ताकीद देणारा आवाज उमटला…. अगदी सपाट, गुळमुळीत असा त्याचा तर्क होता. …’जो आपल्या प्राणरक्षणासाठी तुम्हाला शरण आला आहे, त्याचं भक्षण कसं करू शकता तुम्ही?’  वैतागाने पुटपुटणार्‍या पहारेकर्‍यांना कमांडरचा आदेश पाळणं भागच होतं. त्यांच्या हिरव्या वर्दीने त्यांच्यापुढे दुसरा विकल्प ठेवलेलाच नव्हता मुळी.

आत्तापर्यंत शांत आणि निश्चिंत झालेल्या शावकाला प्रथम डब्यातून काढलेले फ्रोजन मटाराचे दाणे खायला दिले गेले आणि नंतर आपल्या आजूच्या जंगलात त्याला सोडून दिलं गेलं.

सरहद्दीवरची ती बर्फाळ रात्र, आता हसत हसत पहाटेला बोलावत होती.

मूळ कथा –   रक्षक- भक्षक मूळ लेखक – गौतम राजऋषि

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ कथा- निरागस भाग-४ ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ जीवन रंग ☆ कथा- निरागस भाग-४ ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

एकदा ती शरयू ताईंना म्हणाली, “आजी गं, मार्था आजीला बरं वाटत नसेल का? बेडवरून उठता पण येत नसेल का? आजी आपण जाऊन पाहू या ? चल नाऽ.”

असं म्हणत ती आत निघाली सुद्धा. शरयू ताई पण नातीच्या मागून तिच्या घरा पाशी जाऊन पोहोचल्या. बेलच्या बटनावर हात ठेवताना त्यांच्या मनात विचार आला.  इतक्या दिवसापासून तिला भेटतोय त्यामुळे तिच्याबद्दल मनात स्नेहभाव उत्पन्न झालाय. तिची विचारपूस करायला…. माणुसकीच्या नात्याने तिची खुशाली विचारायला काय हरकत आहे? ज्योतीचा व्यवहारीकपणा राहू दे तिच्या जवळच. तिला हे काही नाही सांगायचंच.

बेलचा आवाज ऐकून मार्था आजीनं दार उघडलं. हर्षदाला पाहून तिला इतका आनंद झाला की सांगता सोय नाही. “प्लिज कम् इन” ती म्हणाली.

आपल्या तोडक्या-मोडक्या इंग्लिश मधून शरयू ताईंनी तिची चौकशी केली. वायरल फीवर… मेडिसिन… विकनेस असे शब्द ऐकून काय झालं ते त्या समजल्या. हर्षदा जाऊन तिच्या रॉकिंग चेअरवर बसून आरामात झुलायला लागली. जणूकाही स्वतःचं घर आहे अशा थाटात!  दोघी परत जायला निघाल्या. हर्षदाच्या डोक्यावरून हात फिरवताना मार्था आजीच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले.’ प्रेमाला शब्दांचं… भाषेचं.. वयाचं.. जाती-धर्माचं.. वंशाचं..  रीतीरिवाजांचं.. कशा कशाचंही बंधन नसतं हेच खरं शरयू ताईंच्या मनात विचार आला.

थोड्या दिवसांनी पुन्हा मार्थाचं बागेत चेअरवर बसणं आणि या जोडगोळीला भेटणं सुरू झालं… पण आता फार दिवस उरले नव्हते. सहा महिने कधी संपत आले त्यांना कळलेच नाही. त्यांची परतीची तयारी सुरु झाली. शॉपिंग आणि ज्योती-प्रकाशच्या फ्रेंडस् कडं डिनरला जाणं असा त्यांचा नवा दिनक्रम सुरू झाला. त्यामुळे संध्याकाळचे फिरणे एकदमच बंद झाले.

त्या विमानात बसल्या आणि एखादा चित्रपट पाहावा तसा या सहा महिन्यातील सुखद आठवणींचा पट मनातल्या मनात उलगडून पाहत राहिल्या. त्यावेळी मार्थाला आपण निरोपाचं ही भेटू शकलो नाही ही रुखरुख मात्र त्यांना तीव्रतेने जाणवत राहिली.

भारतात पोचल्यावर फोन वर सुखरुप पोहोचल्याचे बोलणं झाल्यावर त्या म्हणाल्या,” ज्योती बेटा हर्षदाला घेऊन एकदा मार्था आजीला भेटून ये बाई. तिला कोणी नाहीये गं. तिला मी निघायच्या आधी भेटू शकले नाही, याची फार चुटपुट लागून राहिली बघ मला.”

“अगं कालच ती आपल्याकडे आली होती “ज्योती म्हणाली. चार दिवसांपूर्वी हॉस्पिटलमधून आले म्हणाली. मी पूर्वी पाहिली होती त्यापेक्षा खूपच अशक्त वाटली. थोडा वेळ बोलत बसली. तुमच्या तिघींच्या सेल्फी दाखवल्यान्. तुम्हा दोघींबद्दल फारच जिव्हाळ्याने बोलत होती बघ. जायला निघाली तेव्हा हर्षदा कडं डोळे भरून पाहिलेन्. तिच्या डोक्यावरून हात फिरवून नेहमीप्रमाणे “गॉड ब्लेस यू, माय चाइल्ड!”म्हणून हळूहळू चालत निघून गेली…. खरंच गं, काल तिच्याकडे पाहून माझे पण डोळे पाणावले. हे म्हातारं एकटेपण फारच वाईट नाही?” बोलता बोलता ज्योती पण हळवी झाली, “चहाच्या एका कपाचं पण देणं-घेणं नाही. कसलाही स्वार्थ नाही. छल कपट नाही. दोघींनी एकमेकींना फार जीव लावला आहे गं” भरल्या आवाजात ज्योती म्हणाली.

एक आठवडा पण उलटला नसेल ज्योतीचा अचानक फोन आला, “आई हर्षुला कसं सांगू हेच कळत नाहीये गं. पुन्हा काल संध्याकाळी फिरायला जाऊया… ग्रॅंडमाकडं जाऊया.. म्हणून खूप हट्ट केला तिनं. रडली सुद्धा. पण काय झालंय मी परवा सकाळी बागेत काम करत होते ना तेव्हा मार्थाच्या घरासमोर ऍम्ब्युलन्स उभी असलेली पाहिली. तिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलंय… आणि….”

“आणि काय…?” अधीरपणे शरयू ताईंनी विचारलं.

“बहुतेक बरं वाटायला लागलं की तिला ओल्ड पिपल्स होममध्ये पाठवतील. तिची काळजी आता सरकारच घेईल.. आमच्या या छोट्याशा पाडसाला मात्र पुढं काही दिवस तरी काहीतरी खोटं सांगून गप्प करावे लागणार आहे बघ. अजून अजाण आहे आणि फारच सेन्सिटिव्ह आहे नां ती.” ज्योती रडवेली झाली होती.

फोन ठेवला तरी मार्थाचेच विचार शरयूताईंच्या मनात घोळत होते. ‘खरंच मार्था आजी आणि हर्षूमधलं हे नातं…. अंतकरणातून जुळून आलेले हे प्रेमाचे धागे… या सगळ्या तर्का पलीकडल्या गोष्टी आहेत… दोघींना एकमेकींबद्दल वाटणारी आपुलकी…हे सगळं  परमेश्वरी गूढच नाहीतर दुसरं काय’..? शरयुताई स्वतःचेच काहीतरी हरवल्यासारख्या हळव्या होऊन गेल्या. त्यांना वाटलं आता ती मार्थाआजी हर्षुला भेटणार सुद्धा नाही .हळू हळू शाळा, अभ्यास, मित्र-मैत्रिणी यात गर्क झालेली ती कालांतराने हे सगळे विसरुनही जाईल, पण त्या दोघींच्या निरागस प्रेमाची साक्षीदार असलेल्या आपल्या मनाला मात्र त्यांच्या बद्दलच्या या हळव्या आठवणी अस्वस्थ करत राहतील…..!

समाप्त

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – फसवणूक ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – फसवणूक ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा १०. फसवणूक

‘याचवर’ नावाच्या गावात ‘सिकतामायी’ नावाचा मनुष्य होता. तो गरिबीतच जीवन व्यतीत करत होता.  एकदा त्याला दुसऱ्या गावी जाण्याची इच्छा झाली.  त्याने एका वस्त्रात वाळू भरून ती उत्तम  प्रकारे गुंडाळून तो प्रवासाला निघाला. त्याच्या गावाच्या जवळच ‘माचवर’  नावाचे गावात होते. तेथे ‘गोमयमायी’  नावाचा दुसरा एक दरिद्री मनुष्य रहात होता. त्यालाही दुसऱ्या गावी जायचे होते. जातांना त्याने चाळीस-एक  गोवऱ्या एका वस्त्रात बांधून घेतल्या होत्या.

दैवयोगाने सायंकाळच्या सुमारास दोघेही  एकाच धर्मशाळेत  मुक्कामाला उतरले. तेव्हा सिकतामायीने गोमयमायी जवळचे वजनदार गाठोडे पाहून ते खाद्यपदार्थाचे  गाठोडे असावे असा विचार केला.  ते गाठोडे कपटाने हरण  करण्याच्या इराद्याने सिकतामायीने विचारले, “अरे मित्रा,  तुझ्या गाठोड्यात काय आहे?” तत्पूर्वीच गोमयमायीने सिकतामायी  जवळचे वजनदार गाठोडे पाहून त्यात नक्कीच तांदूळ असणार या समजुतीने ते मिळवण्याचा पक्का निर्धार केला होता. म्हणून गोमयमायीने “माझ्या गाठोड्यात अन्नपदार्थ आहेत” असे  सांगून  “तुझ्या गाठोड्यात काय आहे?”असे सिकतामायीला  विचारले असता “माझ्या गाठोड्यात तांदूळ आहेत” असे त्याने प्रत्युत्तर दिले व पुढे म्हणाला, “ मी तुझ्या प्रमाणे  भात वगैरे आणला नाही म्हणून मला दुःख होत आहे.  मला खूप भूक लागली आहे. आता काय करावे ते कळत नाही.” ते ऐकून  गोमयमायी म्हणाला, “  मला आता भूक नाही. माझे खाद्यपदार्थांचे गाठोडे तू घे व मला तुझे तांदळाचे गाठोडे दे.” “ठीक आहे” असे म्हणून दोघांनी एकमेकांची गाठोडी घेतली.

आपली लबाडी दुसऱ्याला कळू नये  म्हणून  क्षणभरही न थांबता दोघेही  निघाले.  काही अंतर पार केल्यावर दोघांनी गाठोडी उघडली. आतील वस्तू पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले.

तात्पर्य –दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दैवच फसवते.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ कथा- निरागस भाग-३ ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ जीवन रंग ☆ कथा- निरागस भाग-३ ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

नेहमीप्रमाणेच दोघी फिरायला बाहेर पडल्या. पुन्हा घरात पोहोचेपर्यंत त्यांची एक प्रदक्षिणा पूर्ण व्हायची. घरा जवळच्या कॉर्नर पर्यंत त्या दोघी येऊन पोहोचल्या होत्या. काही-बाही गप्पा चालूच होत्या. हर्षदा एकदम तेथे एका घरासमोर थांबली. फ्रंट यार्ड मध्ये एक युरोपियन गोरी म्हातारी काहीतरी बागकाम करत होती. शरयू ताईंना बस स्टॉप वर पाहिलेल्या वृद्ध महिलांची आठवण आली. तशीच ग्रेसफुल आणि आत्मविश्वासानं ताठपणे चालणारी! आणि…. आश्चर्य म्हणजे एरवी लोकांसमोर बोलताना इतके एटीट्यूड दाखवणारी हर्षदा चक्क हात हलवून तिला “हॅलो ग्रंडमा” म्हणत तिच्यासमोर जाऊन उभी राहिली.

वृद्धेनं चमकून वर पाहिलं. 1, 2 क्षण ती बोललीच नाही‌.मग प्रेमळ नजरेने तिनं

हर्षदा कडे पाहिलं. तिच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर हास्य उमटलं. “हाय बेबी! गॉड ब्लेस यू” उत्तरादाखल तीअगदी मनापासून म्हणाली.

या गोष्टीला आठ दहा दिवस होऊन गेले. एके दिवशी संध्याकाळी डोअरबेल वाजली. ज्योती किचन मध्ये उभी होती. तिथल्या मॉनिटरवर तिला एक गोरी महिला दिसली. “ही कोण बाई इथे उपटली? चर्चसाठी काही चॅरिटी मागायची असेल” ज्योती पुटपुटली.

दरवाज्याजवळ जावून तिला वाटेला लावायचा तिचा विचार होता. पण तिच्या आधीच हर्षदा दरवाज्या जवळ पोहोचली होती आणि कुतूहलानं शरयू ताई पण ! ज्योतीनं दार उघडलं. तिच्या हाताखालून हर्षदा बाहेर पडली.

“गुड इव्हिनिंग ग्रॅन्डमा” ती उद्गारली.

ग्रँडमाला आता घेणे भागच होते. मोठ्या संकोचने तिने आपली अडचण सांगितली. तिच्या चेहऱ्यावरचा केविलवाणे पणा च शरयू ताईंना जाणवला. तिला वृद्धावस्था पेन्शन मिळायची. दर गुरुवारी तिच्या खात्यावर ती जमा व्हायची. आज बुधवार होता आणि तिला $5 उधार हवे होते. इंग्लिश बोलता येत नसलं तरी तिच्या बोलण्याचा साधारण अर्थ हर्षदा ला समजला होता . पळतच ती ड्रॉईंग हॉलकडं गेली.

“डॅडी ऽऽ डॅडी” हातवारे करून तीसांगू लागली, ” अं… तिकडे … समोर एक आजी राहते. तिला ना पाच डॉलर बॉरो करायचे आहेत. आपण देऊ शकतो?”

तिचं लडिवाळपणे आजी म्हणणं शरयू ताईंना खूपच भावलं.

डॅडी कडून पैसे घेऊन ते तिने जेव्हा ग्रँडमाच्या हातात दिले. तेव्हा त्या म्हातारीच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले.

“गॉड ब्लेस यु माय चाइल्ड!” कृतज्ञतेने थँक्स देऊन ती निघून गेली.

तिची पाठ वळताच हर्षदाच्या तोंडासमोर हात ओवाळत ज्योती आईला म्हणाली, ” पाहिलस नां किती ढालगज आहे ही, परस्पर काम उरकून मोकळी!… गोऱ्या लोकांच्या जास्त भानगडीत आम्ही नाही पडत. त्यांच्या जाती-धर्माचे लोक काय कमी आहेत का इथं !पण सरळ तोंड वर करून आपल्याकडे पैसे मागायला यायचे म्हणजे काय?… ‘दिज पीपल आर फ्रेंडली बट नॉट फ्रेंड्स… असुदे, असुदे आता..पाच डॉलर अक्कलखाती खर्च टाकायचे!” ज्योती चांगलीच वैतागली होती.

पण तशी वेळच आली नाही त्या आजी ने दिलेला शब्द पाळला दोन दिवसात आठवणींना ती पैसे परत देऊन गेली… मग काय संध्याकाळी फिरून येताना हर्षदा चा आणखी एक थांबा वाढला.

बहुतेक ती आजी बागेत दिसायची. ती दिसली रे दिसली की हर्षदा तिच्या लॉनवर जायची. हिची भाषा तिला कळायचे नाही आणि तिची भाषा हिला.. पण देहबोली नं दोघी एकमेकींना समजू लागल्या होत्या. ‘ विश’ करताना एकदा शरयू ताईंना आपादमस्तक न्याहाळत आजी म्हणाली होती,” व्हेरी नाईस स्कर्ट!”

आपल्या साडीला ती स्कर्ट म्हणते हे लक्षात आल्यावर आपल्या स्कर्टमध्ये रूप कसे दिसेल या कल्पनेनं त्यांना लाजल्यासारखं झालं. अलीकडे तर आजी लॉनवर खुर्ची टाकून त्यांची वाटच पाहत असायची. आजीला हॅलो म्हणणं, लॉनवर मनसोक्त धावणं, पळणं, फुलं न्याहाळणं, शेवटी बाय् करून घरी येणं. हा हर्षदा चा रोजचा नेमच झाला होता.

तिथल्या रिवाजाप्रमाणे गॅंडमाची जास्त चौकशी करणं ज्योतीला योग्य वाटत नव्हतं . पण कधीतरी इकडून-तिकडून समजलेल्या माहितीनुसार…. तिचं नाव मार्था आहे. तिला कोणीही नातेवाईक नाहीत. 85 वर्षांचे ती वृद्धा स्वतःच्या हाऊसमध्ये एकाकी आयुष्य जगतेय…. इतपत माहिती शरयू ताईंना मिळाली होती.

तीन चार महिन्याचा कालावधी असाच मस्त उलटून गेला. नंतर सलग पंधरा दिवस ती त्यांना बागेत दिसलीच नाही. हर्षदा पळत पळत तिच्या घरासमोर जायची आणि ती दिसली नाही ती चेहरा पाडून उभी राहायची.

क्रमशः…..

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ कथा- निरागस भाग-२ ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ जीवन रंग ☆ कथा- निरागस भाग-२ ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

पाच नंबरचा बंगला आला की म्हणायची, “आजी थांब इथं.” कंपाउंड मधून आत बघत आज किती रॅबिट दिसत आहेत. ते मोजायची 3…5..7.” बघून पुढं निघालं की एका बंगल्यात पक्षांचे पिंजरे-घर दिसायचं… तसच पुढं गेलं की एका ठिकाणी बोट दिसायची. पिसं, पानं-फुलं गोळा करत त्यांचं फिरणं चालू असायचं. एका ठिकाणी वेगळ्या जातीची गलेलठ्ठ मांजरी दिसायची. कधीतरी ती दिसली नाही तर फिस्-फिस्-फिस् करून बोलावलं जायचं.

‘आपण पण ती बरोबर असल्यामुळे बालपणात शिरलोय’ शरयुताई विचार करायच्या.

मुख्य स्वयंपाक संध्याकाळीच. त्याची जबाबदारी शरयू ताईंनी अंगावर घेतली होती. संध्याकाळी दोघं कामावरून दमून यायची आल्या-आल्या छान छान पदार्थ वेगळ्यावेगळा मेनू!सगळी मनापासून त्याचा आस्वाद घ्यायची.

हर्षदा ला सकाळी शाळेत सोडून त्या थोडं फिरायला जायच्या. ते पण रेल्वे स्टेशनच्या रस्त्याला. चार माणसं तरी जाता-येताना दिसायची. नाही तर रस्त्यावर नुसता शुकशुकाट! पण कोणी अनोळखी जरी समोर दिसलं तरी ‘विश’ केलं जायचं. गोरी, भुरी,काळी सगळीजणच असं करायची. त्यांनीही मोठी हिंमत करून ‘विश’ करायला सुरुवात केली. एक सरदारजी कुटुंब, एक गुजराती बा, एक बांगलादेशी औरत, एक फिजी इंडियन महिला. सगळ्यांशीच त्यांची ओळख झाली.गप्पा सुरू झाल्या.

आपण परदेशात राहतोय हे त्या विसरूनच गेल्या.

एकदा संध्याकाळी हर्षदा ला घेऊन त्या एका बागेत गेल्या होत्या. घसरगुंडी, झोपाळ्यावर तीचं खेळणं चालू होतं. तिथं ती फिजी इंडियन-संगीता-आपल्या मुलांना घेऊन आली होती. मुलं खेळत होती आणि त्या दोघी गप्पा मारत होत्या. फीजींची भाषा हिंदीच असते पण उच्चारात थोडा फरक,  त्यामुळे शरयू ताईंना काही अवघड वाटले नव्हते. हर्षदा ते पहात होती. परत येताना रस्त्यात सरदारजी फॅमिली भेटली. “सत् श्रीअकाल” विश करुन थोड्याशा गप्पा सुरू झाल्या.

पुढे गेल्यावर हर्षदा त्यांना समजावण्याच्या सुरात सांगू लागली, “आजी फक्त मराठी लोकांशी बोलायचं. इतर कोणी इंग्लिश, फ्रेंच बोलत असलं ना तर त्यांच्याशी नाही बोलायचं. आईनंच मला सांगितलय. ती अंकल आणि ऑंटी मराठी होती का?”

“अगं बाई नाही. पण ती इंडियन होती ना. ती लोकं हिंदीत बोलत होती गं, आईला विचार ती पण सांगेल की हिंदी लोकांशी आपण बोलू शकतो म्हणून. “त्यांनी तिला समजावलं. घरी गेल्यावर त्यांनी खात्री करून घेतली.

“हो ग आई. “ज्योती म्हणाली. नंतर मोठे झाल्यावर बाहेरच्या जगाशी संपर्क आला की मुलांना इंग्लिश येईल पण मातृभाषा नाही ना येणार. म्हणून इकडे छोट्या शाळेत पण जोर देतात की घरात तुम्ही मुलांबरोबर मातृभाषेतच बोला. त्यामुळे हर्षुला बघ ना ,मराठी शिवाय इतर भाषा बोलता येत नाही. इंग्लिश थोडीशी समजते बस्स्. शिवाय इकडच्या मुलांचे संस्कार आणि आपले संस्कार यात फरक पडतो.समजा ती तीन-चार मुलं असली आणि आपलं एकटंच असलं तर ती फार आगाऊपणानं वागतात, दादागिरी करतात. म्हणून आम्ही आपलं सांगतो. फक्त आपल्या लोकांशी बोलायचं. इकडच्या लोकांना कसलाच रिस्पॉन्स द्यायचा नाही म्हणून…..बरं झालं बाई तुझी हिंदी भाषिकांची ओळख झाली ते. आता सहा महिने कसे जातील कळणार ही नाही” ती पुढे म्हणाली.

आजी नातीचं संध्याकाळी फिरायला जाणं मध्ये मध्ये गॅप पडत असली तरी चालूच होतं.

एक दिवशी शरयू ताई ज्योतीला सांगू लागल्या, “काय ग बाई आपलं हे पिल्लू !ते देशपांडे आजी-आजोबा भेटले होते. माझ्याशी बोलत होते. हिला किती प्रेमाने काही विचारत होते ,तर पठ्ठी चक्क पाठ करून उभी राहिली. त्यांच्याशी एक अक्षर पण बोलली नाही.

“हर्षु का ग बोलली नाहीस आजी आजोबांबरोबर” ज्योतीनं विचारलं.

“मला ना त्या दोघांची भीती वाटली” हर्षदाने सांगितले.

प्रकाश पण तिथेच होता. सासुबाईना दुजोरा देत तो म्हणाला “फार बेकार मुलगी आहे आई ही. मध्यंतरी एकदा आमच्या क्लबची क्रिकेट मॅच पाहायला तिला घेऊन गेलो होतो. तिथं माझा मित्र विथ-फॅमिली आला होता. हिनं साधा हाय-हॅलो पण केला नाही. ते हिचा फोटो काढायला लागले तर हाताने चेहरा झाकून टाकला हिने. आगावू कुठली!”

“आई अगं हीचं लाईक डिस् लाइकच फार जास्त आहे. कपडे, खेळणी, खाणं-पिणं आणि माणसं सगळ्यात तिची वेगळी त-हाचअसते.” ज्योती म्हणाली.

“असु दे. लहान आहे अजून. असतं एखादं  मुल लहरी.” हर्षुला जवळ घेत त्या म्हणाल्या.

क्रमशः…..

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ कथा- निरागस भाग-१ ☆ सौ. सुनिता गद्रे

 ☆ जीवन रंग ☆ कथा- निरागस भाग-१ ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

हो, नाही करता-करता शेवटी शरयू ताईंचं ऑस्ट्रेलियात सिडनीकडं प्रस्थान झालं.  ज्योतीच्या लग्नाला सहा वर्षं होऊन गेली होती. ती आणि प्रकाश त्यांच्या कित्ती मागं लागायचे…. आमच्या संसार बघायला या म्हणून. पण दरवेळी काही ना काही कारणं निघायची आणि त्यांच्या पाय उंबरठ्यातच  अडखळायचा.

एकदा चार वर्षांची चिमुकली नात हर्षदा फोनवर बोलता- बोलता म्हणाली “बघ हं आजी, आता तुझी टर्न आहे तू आली नाहीस तर आम्हीपण येणार नाही इंडियात.”

त्या चिमुकलीचं रुसून गाल फुगवलेलं लोभस रुप त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. “नाही… नाही, आता कुठलंही कारण नाही. या डिसेंबरमध्ये मी तुमच्याकडे येणार म्हणजे येणारच” त्यांनी आश्वासन देऊन टाकलं.

शेवटी दुधापेक्षा दुधावरची साय जास्त प्रिय असते ,म्हणतात ना तसंच झालं. त्या मायेच्या ओढीनच त्या सिडनीला जाऊन पोहोचल्या. तिघेही एअरपोर्टवर रिसिव्ह करायला आले होते. हर्षुनं आजीला पाहताक्षणी तिचा ताबा घेतला.

“मी आजीजवळ बसणार बुस्टर सीटवर नाही” तिचा हट्ट चालू झाला. तिला समजवता-समजवता दोघांच्या नाकी नऊ आले.

“काय करणार? इथं लहान मुलांना एखादी चापटी मारणं तर दूरच सार्वजनिक ठिकाणी जोरात रागावूनही चालत नाही. न जाणो कुणी पाहून कंप्लेंट करायचं आणि आम्हाला फाईनचा भूरदंड पडायचा.” ज्योती म्हणाली.

शेवटी आजीचा हात घट्ट पकडून ठेवून बूस्टर सीटवर बसायला ती तयार झाली आणि मुलीच्या घरी माहेर पण अनुभवायला  शरयूताई तिच्या घरात दाखल झाल्या. दोन-तीन दिवस आराम झाला. नंतर ज्योतीने विकेंडला जोडून दोन दिवसांची रजाच टाकली.

“ए, तुझी गाडी बाहेर काढूच नकोस बाई आता. आपण बसनं नाही तर मेट्रोनंच हिंडू या. शहर, रस्ते कसे छान लक्षात राहतात” त्या ज्योतीला म्हणाल्या.

मग आजी, मुलगी, नात बस स्टॉप वर उभ्या राहिल्या. एक भली मोठी वोल्वो समोर येऊन थांबली. मोजून सात-आठ माणसं होती. सवयीप्रमाणे दार उघडल्या-उघडल्या शरयूतार्ई बसमध्ये चढायला पुढे सरकत होत्या.

“वेट् आजी !” हर्षदा त्यांचा हात घट्ट धरून म्हणाली.

“अगं बघ ना त्या दोन ओल्ड लेडीज खाली उतरताहेत. त्यांच्या हातात कित्ती सामान आहे . मी थोडी हेल्प करते त्यांना.” थोडी सारवासारव करत त्या ज्योतीकडे पाहून म्हणाल्या.

“आई अगं, उतरणारे सगळे लोक उतरल्याशिवाय पुढे जायचंच नाही आणि हेल्प-बिल्प म्हणत असशील ना, तर अशी चूक चुकूनही करायची नाही. तो त्यांना अपमान वाटतो”. ज्योतीनं समजावलं.

“सगळं वेगळंच बाई इथलं. मला जर कुणी सामान उतरवायला मदत केली असती ना तर धन्य धन्य वाटलं असतं मला. तोंडभर आशीर्वाद दिले असते मी त्या व्यक्तीला “शरयू ताई पुटपुटल्या.

“अगं इथं एकटी राहणारी माणसं … बायका, पुरुष आपण आपलं लाइफ मॅनेज करू शकतो असं वाटतं तोपर्यंत एकटे राहतात. कार चालवायचा कॉन्फिडन्स संपला तर बसनं  फिरतात आणि अगदीच होईनासं  झालं तर वृद्धाश्रमात राहायला जातात.”

शरयू ताईंच्या ज्ञानात हळूहळू भर पडत होती त्या टी शर्ट-शॉर्टस् घालणाऱ्या, बॉब केलेले केस हेअर फिक्सरनं व्यवस्थित सेट केलेल्या, आत्मविश्वासाने आपलं ओझं आपण उचलणाऱ्या स्त्रियाअन् आपल्या देशातील सीनियर सिटिझन्स बायका… आणि पुरुषही… या मधला नेमका फरक त्यांना जाणवला.

सकाळी हर्षुला प्री-स्कूल मध्ये सोडायला अन् दुपारी परत आणायला शरयू ताई जाऊ लागल्या .शाळा जवळ होती. सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच हे टाइमिंग. त्या मुदतीत केव्हाही सोडा आणि केव्हाही घेऊन जा. टाइमिंगच्या पाच मिनिटं आधी नाही की पाच मिनिटं नंतर नाही… त्या वेळेचा वेगळा चार्ज आकारला जायचा फी भरपूर आणि सगळं प्रोफेशनल.

शरयू ताईंना हिंडण्या- फिरण्यात गंमत वाटू लागली. आणि हर्षु ला आपल्या आजीला नाचवण्यात! संध्याकाळी आजी-नात फिरायला बाहेर पडायच्या. फिरणं म्हणजे रमणं-गमणंच असायच. हर्षु प्रत्येक बंगल्यासमोर लेटर बॉक्स वरील घर नंबर थांबून-थांबून वाचत चालायची.

क्रमशः…..

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – काळूचे दु:ख ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – काळूचे दु:ख ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

नेहेमी आनंदात असणारा काळू कुत्रा, आज असा उदास होऊन अवेळीच घरी आलेला पाहून, त्याच्या आईने, मिल्कीने त्याला विचारलं…” काय झालं काळू? रोज तुला हाका मारुन मारुन मी अक्षरशः दमून जाते, तरी तू येत नाहीस. आणि आज कसा आलास? आणि इतका उदास का दिसतो आहेस? कुणी मारलं का तुला ?”

मग खूप दुःखी स्वरात काळूने आपल्या मनातली व्यथा सांगितली …..

“आई, ज्या बंगल्याच्या बाहेर मी रोज बसायचो, तिथे रात्री मी जे काही पाहिलं ना, त्यामुळे मला फार वाईट वाटतंय.”

“असं काय पाहिलंस तू तिथे?”

“आई तिथे माझ्यासारखे किती तरी कुत्रे आणि नोकर – चाकर रहातात. काल एका अगदी छोट्याशा, बाहुली-सारख्या मुलीला त्यांनी कपड्यात गुंडाळले, आणि अंधारात दूर कुठेतरी तिला एकटीलाच सोडून, ते परत आले. एखादा माणूस इतका निर्दय आणि दुष्ट असू शकतो, याचा मी विचारही करू शकत नाही. त्या बिचारीने त्या माणसांचा काय गुन्हा केला होता? सांग ना आई.”

त्याचं बोलणं ऐकून मिल्कीचेही डोळे भरून आले होते. गळा दाटून आला होता. जड आवाजात ती म्हणाली…..

“बाळा आपल्यासाठी लहान मुलं ही फक्त लहान मुलंच असतात. पण ती माणसांची दुनिया आहे. तिथे मुलं औरस-अनौरस, म्हणजे कायदेशीर-बेकायदेशीर तर असतातच, पण त्याबरोबरच, ती लिंग-भेदाचीही बळी ठरतात. त्या मुलीच्या बाबतीतही असेच काहीतरी झालेलं असेल.”

आईने लहान मुलांच्या बाबतीत जे कुठले शब्द वापरले होते, ते काळूला समजणं अशक्य होतं. आणि ते समजण्यासाठी आपण असमर्थ आहोत, असं काळूला वाटत होतं

मूळ हिंदी कथा : सुश्री मीरा जैन

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आय लव्ह यू फ्लाय बॉय (उत्तरार्ध) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ आय लव्ह यू फ्लाय बॉय (उत्तरार्ध) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

27 जानेवारी :  पीरपंजालच्या बरोबर वर

संध्याकाळचे पाच वाजू लागले आहेत. हेलीकॉप्टरचं पूर्ण नियंत्रण मेजरने आपल्या ताब्यात घेतलय. थोड्या वेळापूर्वी बेफिकीर वाटणारा कॅप्टन आता उत्तेजित झालाय. धुकं आणि षड्यंत्री ढगाच्या टोळीशी झुंजत झुंजत हेलीकॉप्टर आता पीरपंजालच्या बरोबर वर आहे. मेजरला बेसकडून, त्याच्या बरोबर खाली चाललेल्या चकमकीविषयी आणि या चकमकीच्या दरम्यान घायाळ झालेल्या जवानाविषयी रेडिओ- सेटवर संदेश मिळतो. बेस अद्यापही अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. अंधारही वाढतोय. मेजरच्या मनात संभ्रम आहे. कायद्यानुसार तो आपल्या बेसच्या दिशेने उडू शकतो. त्याच्यावर कोणताही दबाव नाही. नियम आणि आदेशानुसार त्याला आपलं हेलीकॉप्टर साडे पाच वाजता बेसवर लॅंड करायला हवं. महागडं हेलीकॉप्टर आणि दोन प्रशिक्षित पायलट यांच्या सुरक्षिततेचा विचार करता ते आवश्यक आहे. संभ्रमाच्या या पराकोटीच्या अवस्थेत त्याला आपल्या मेजर दोस्ताची सक्सेनाची आठवण होते. त्यांचा जिगरी दोस्त. तो त्या राष्ट्रीय राइफल्स बटालियनमधेच आहे आणि अचानक हेलीकॉप्टरची दिशा बदलते. पीरपंजालच्या जंगलाच्या दिशेने ते वळतं. कॅप्टनच्या विरोधस्वरूप बडबणार्‍या ओठांकडे दुर्लक्ष करत, मेजर आपल्या कपाळावर डावा हात फिरवत त्यावर उमटलेल्या वाकड्या तिकड्या रेषा, स्लेट पाटीवर आखलेल्या वेड्या-वाकड्या रेषा पुसून टाकाव्या, तसा मिटवून टाकतो.

27 जानेवारी :  पीरपंजालच्या खाली दक्षिणी काश्मीरी घाटीचा निबीड जंगलाचा एक भाग

संध्याकाळचे सव्वा पाच वाजले आहेत. जंगलातल्या या आतल्या भागात संध्याकाळ जरा लवकरच उतरून आलीय. रातकिड्यांच्या किरकिरीत विव्हळण्याचा आवाजही मिसळलाय त्या घायाळ लांस नायकाच्या अवती भवती असलेल्या त्याच्या साथीदार सैनिकांच्या नजरा वारंवार आकाशाकडे वळताहेत. घेरून येणार्‍या अंधारात विव्हळणार्‍या नायकाचा आवाज मंदावत चाललाय. रातकिड्यांच्या करकरीत मधेच एक आवाज आकाशातून येतो. झाडांच्या वर दिसणारं हेलीकॉप्टर, त्याचे मोठे फिरणारे पंख, निराश लांस नायकासाठी संजीवनी घेऊन आले आहेत.  पृष्ठभागापासून थोड्या उंचीवर थांबेलेलं हेलीकॉप्टर सगळ्या जंगलाला थरथरायला लवतय. घायाळ लांस नायक आणि त्याचा एक साथीदार, हेलीकॉप्टरमध्ये बसलेले मेजर आणि कॅप्टन यांच्या साथीला येतात. झाडांना, वृक्षांना हलवत, डोलवत हेलीकॉप्टर अंधारात आपला मार्ग शोधत आपल्या बेसच्या दिशेने उडू लागतं. कॉकपिटमध्ये चमकणारं घड्याळ ठरलेल्या वेळेपेक्षा १५ मिनिटे जास्त झाल्याची चेतावणी देतं.

   २८ जानेवारी: मध्य काश्मीर घाटीतील एव्हिएशन – बेसची छावणी

सकाळचे सात वाजलेत. घायाळ लांस नायकतज्ज्ञ चिकित्सकांच्या देखरेखीखाली गेले बारा तास आय. सी. यू मध्ये सुरक्षित श्वास घेऊ लागलाय.

मेजर वर्मा आपल्या बिछान्यात गाढ झोपलेत. त्यांचा मोबाईल वाजतो. चिडून, वैतागून, अस्वस्थ होत ते मोबाएल स्क्रीनकडे टवकारून पाहतात. स्क्रीनवर त्यांचे जिगरी दोस्त मेजर सक्सेनांचा नंबर फ्लॅश होतो. अस्वस्थ होत ते मोबाईल उचलतात.

मेजर वर्मा : हा! बोल!

मेजर सक्सेना : कसा आहेस तू?

मेजर वर्मा : थॅंक्स म्हणायला फोन केलायस का?

मेजर सक्सेना : नाही.

मेजर वर्मा : मग?

मेजर सक्सेना : आय लव्ह यू, फ्लाय-बॉय!*

मेजर वर्मा : चल… चल…

आणि मोबाईलच्या दोन्ही बाजूंनी एकदमच खदा खदा हसण्याचा आवाज गुंजत राहातो.

समाप्त  

* फ्लाय-बॉय – हेलीकॉप्टर चालवणार्‍याला फ्लाय-बॉय म्हणतात.

मूळ कथा –   आय लव यू फ्लाय ब्वाय     मूळ लेखक – गौतम राजऋषि

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आय लव्ह यू फ्लाय बॉय (पूर्वार्ध) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ आय लव्ह यू फ्लाय बॉय (पूर्वार्ध) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

27 जानेवारी : जम्मू-नगरौटा दरम्यान एका ठिकाणचे सैन्याचे हेलीपॅड

दुपारचे चार वाजले आहेत.  दिवसभराची धावपळ झाल्यानंतर, धुकं चिरत सूर्यदेव शेवटचं स्मितहास्य करत आहेत. आपलं हेलीकॉप्टर घेऊन, आर्मी एव्हिएशनचे दोन पायलट, एक मेजर आणि एक कॅप्टन, इथल्या हेलीपॅडवरून, मध्य काश्मीरमधील एका भागात असलेल्या आपल्या एव्हिएशन बेसकडे जाण्यासाठी आपल्या कडक, स्मार्ट युनिफॉर्ममध्ये सज्ज आहेत. इथल्या हेलीपॅडपासून ते एव्हिएशन – बेसपर्यंतचा प्रवास सव्वा तासाचा आहे. हे अ‍ॅडव्हान्स लाइट हेलीकॉप्टर ‘ध्रुव’ घेऊन, पीरपंजालची बर्फमय शिखरांची साखळी ओलांडत परवाच तर दोघे इथे आले होते. 26 जानेवारीला मिळालेल्या अनेक धमक्यांना अनुलक्षून अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी ते इथे आले होते.

हेलीकॉप्टरचे पंखे हळू हळू गती घेऊ लागले आहेत. मेजर वर्मा सगळीकडे धावती नजर टाकून कॉकपीटमध्ये येऊन बसले आणित्यांनी हलकेच मान हलवत कॅप्टनला इशारा दिला. कॅप्टनच्या उजव्या हाताचा जॉय- स्टिकवरचा दबाव त्यांनी वाढवला. फूल थ्रॉटल. धुळीची वावटळ उठली.  पंखांची फिरण्याची गती, एका मिनिटाला तीनशे पंधरापर्यंत पोचली, तेव्हा ते मोठसं पाच टनी वजन असलेलं हेलीकॉप्टर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला वाकुल्या दाखवत हवेमध्ये उचललं गेलं.

थोड्याशा खालच्या बाजूला रेंगाळणारी भटक्या ढगांची टोळी, मेजर वार्मांच्या कपाळावर आधीच उठलेल्या आठयांमध्ये आणखी एक दोन आठयांची भर घालते. भटक्या ढगांशी खेळ करत हेलीकॉप्टरचे पंखे आता हेलीकॉप्टरला एका सुरक्षित उंचीवर घेऊन येतात… दूरच्या क्षितिजावर क्षणोक्षणी जवळ येणारी पीरपंजालची शुभ्रशी शिखरे दिसू लागतात. बस! एवढी शिखरं पार केली की झालं. मग पुढचं व्हॅली फ्लॉवरचं उड्डाण म्हणजे मुलांचा खेळ. तिकडे पीरपंजालवर लटकलेल्या ढगांची गर्दी जशी काही कुठल्याशा षड्यंत्रात सामील होऊन, येणार्‍या हेलीकॉप्टरकडे बघत हसते आहे. कॅप्टन काहीसा बेफिकीर आहे. या बाजूचं त्याचं बहुतेक पाहीलंच उड्डाण आहे.

मेजरच्या ललाटावर इथे तिथे पसरलेल्या रेषांवर उमटलेले घामाचे बिंदू वेगळंच काही तरी सांगताहेत. धुकं आणि ढग यांच्यामुळे हेलीकॉप्टरची गती अगदी कमी आहे. आदेशानुसार संध्याकाळी साडे पाचपूर्वी बेसवर पोचणं जरूरीचं आहे.  या काकडणार्‍या थंडीत दिवसाला लवकर पळून जाण्याची घाई असते आणि रात्र तर जशी कंबर कसून बसलेली असते. सहा वाजतात न वाजतात, तोच येऊन धडकते. म्हणण्यापुरतं हे अ‍ॅडव्हान्स हेलीकॉप्टर आहे, पण रात्री उडण्याची याची क्षमता शून्याबरोबर आहे.

27 जानेवारी :  पीरपंजालच्या खाली द्क्षिण काश्मीरमधील एक जंगल   सकाळचे साडे नऊ वाजले आहेत. पीरपंजालच्या घाटीमधील या जंगलाचा एक भाग अचानक गोळ्यांच्या धमाक्याने गुंजत उठलाय. आदल्या दिवशी रात्री जवळच्याच राष्ट्रीय राइफल्स बटालियनला चार आतंकवादी जंगलात लपून बसल्याची पक्की खबर मिळाली होती. सूर्यदेवाचं पहिलं दर्शनच चकमकीचा बिगुल वाजवत होतं. दोन आतंकवादी मृत झाले आहेत आणि दोघांचा शोध सुरू आहे. ही सगळी कार्यवाही होता होता सात तास होऊन गेले आहेत. आता पाठलाग करणारी सैन्याची एक तुकडी जंगलाच्या खूप आतापर्यंत पोचलीय. उरलेल्या दोघांपैकी आणखी एक आतंकवादी मारला गेलाय. दुसर्‍याची मात्र कुठे चाहूल लागत नाहीये. तुकडीचा लांस नायक जखमी झालाय. त्याला पोटात गोळी लागलीय. प्राथमिक उपचारानंतर रक्त वाहणं थांबलय, परंतु त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोचवणं गरजेचं आहे. सगळ्यात जवळच्या रस्त्यापर्यंत जायचं झालं, तरी कमीत कमी चार तास लागतील. एव्हिएशन बेसला लवकरात लवकर हेलीकॉप्टर पाठवण्याविषयी वायरलेसवरून संदेश पाठवला गेलाय.

उत्तरार्ध – उद्याच्या अंकात

मूळ कथा –   आय लव यू फ्लाय ब्वाय     मूळ लेखक – गौतम राजऋषि

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – अविवेकिता ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – अविवेकिता ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ९.  अविवेकिता

कलिंगदेशात कोणी एक राजा होऊन गेला. त्याला एक धोबी वस्त्रे उत्तम प्रकारे धुवून देत असे. एक दिवस त्याने धुतलेली, ती निर्मळ सुंदर वस्त्रे पाहून राजा खूष झाला. तो राजा मनस्वी होता. त्याने धोब्याला बोलावून म्हटले, “तुझ्या या वस्त्र स्वच्छतेमुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा तो वर माग. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.”  राजाने वचन  दिल्यावर धोब्याचा आनंद गगनात मावेना. तो उत्तरला, “ महाराज, मला आपला मंत्री होण्याची इच्छा आहे. तेव्हा आपण माझी मंत्रीपदी नियुक्ती करावी.”

राजाला ही मागणी अनपेक्षित होती. पण वचनपूर्ती करणे भाग होते. तेव्हा राजाने दीर्घकाळापासून मंत्रीपदी  आरूढ असलेल्या मंत्र्याच्या जागी धोब्याला  नियुक्त केले. काही काळानंतर या राजाचा नवा मंत्री मूर्ख व असमर्थ आहे हे जाणून राजाच्या  शत्रूंनी सेनेसह राज्यावर आक्रमण केले. हे वृत्त कळताच राजाने मंत्र्याला बोलावून  युद्धासाठी  सेना सज्ज करण्याची आज्ञा दिली. त्यावर मंत्री बोलला, “भविष्यकाळाचा विचार करून मी पूर्वीच  सगळी व्यवस्था केली आहे. म्हणून शत्रूपासून आपण भयभीत होऊ नये.” राजाने त्याच्या वचनावर विश्वास ठेवला.

मंत्र्यावरचा विश्वास राजाला भोवला. शत्रूच्या सेनेने नगराला पूर्ण वेढा घातला. परत राजाने मंत्र्याला पाचारण  करून  विचारले, “शत्रूच्या ह्या कृतीला उत्तर देण्यासाठी काय योजना आखली आहे ?” मंत्री राजाला म्हणाला, “महाराज,  शत्रूंनी नगर बंदिस्त केले तरी आम्हाला काहीही भय नाही. या राज्याचे रक्षण व पालन करणे हे अत्यंत कष्टदायक कार्य आहे. या कष्टदायक  कार्याचे कसे निवारण करता येईल याची मी चिंता करत असतानाच दैवयोगाने शत्रूने हे नगर बंदिस्त केले. राज्य रक्षणाचा आपल्यालाही खूप त्रास होतोय. मी ह्या नगरात चिरकाळपासून   वस्त्रे धुण्याचा उद्योग करतोय. मंत्रीपद प्राप्त  झाल्यावर मी तो उद्योग सोडला. आता पुनश्च तो उद्योग सुरू करून त्या प्राप्तीतील अर्धा वाटा आपल्याला देईन  व उरलेला मी घेईन आणि सुखाने जगेन. ह्या उद्योगाचे मला काहीच कष्ट वाटत नाहीत. हा सर्व विचार करून युद्धासाठी मी काहीही सज्जता केली नाही.”

मंत्र्याचे हे वक्तव्य ऐकल्यावर अपात्र, अविवेकी व्यक्तीची अयोग्य जागी नियुक्ती केल्यामुळेच हे संकट ओढवले ह्या विचाराने राजाला खूप दुःख झाले.

तात्पर्य –अपात्र,अविवेकी व्यक्तीला उच्चपदी नियुक्त करू नये.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print