मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “माऊली घरी आल्या !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “माऊली घरी आल्या !श्री संभाजी बबन गायके 

मुंबईहून मागवलेले कापडाचे तागे भरून आलेली बैलगाडी मनोहरपंतांच्या वाड्यासमोर उभी राहिली. संध्याकाळची सात-साडेसातची वेळ होती. मनोहरपंत हरिपाठात मग्न होते. त्यांनी खुणेनेच गाडीवानाला “पार्सल आतल्या खोलीत ठेवून जा…उद्या बाजारात आल्यावर गाडीभाडं अदा करतो” असं सांगितलं. गाडीवानानं ती पाच सहा पोती,एक लाकडी खोकं अलगद आत आणून खोलीत ठेवलं आणि तो मनोहरपंतांना नमस्कार करून निघून गेला. त्याचे मनोहरपंत हे नेहमीचे ग्राहक,त्यामुळे गाडीभाड्याची चिंता त्याला नव्हती! 

पोटापाण्यासाठी मनोहरपंतांचा पिढीजात वस्त्रालंकार शिवून देण्याचा व्यवसाय होता. मात्र व्यवसाय आता केवळ नावालाच करीत असत. त्यांचे वडील विष्णुपंत हे पंचक्रोशीत नेमाचे वारकरी म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे मनोहरपंतही जन्मापासून माळकरी झाले होते. थोरला चिरंजीव लवकरच कमावता झाल्याने त्यांच्यावरील प्रपंचाचा भार नाही म्हटलं तरी काहीसा कमीच झाला होता. त्यामुळे ते आपला बहुतांशी वेळ देवाधर्माच्या कार्याला देत असत. 

त्यांच्या शहरातल्या अतिशय प्रसिद्ध गणपती मंदिरातल्या मूर्ती,हत्ती आणि पालखीसाठी आवश्यक अशा मखमली वस्त्रांची निर्मिती करावी ती मनोहरपंतांनीच. देवाचं काम म्हणून तर मनोहरपंत अतिशय मन लावून काम करीत. एरव्ही अगदी पहाटेपासून सुरू झालेलं देवदर्शन दिवस अगदी वर येईस्तोवर सुरूच असे. खाकी अर्धी विजार,अनेकानेक खिसे असलेली पांढरी कोपरी, पायात साध्याशा वहाणा,डोक्यावर पांढरी टोपी असा त्यांचा पोशाख. चालणे अतिशय निवांत. बोलणे मऊ. आयुष्यात कुणाशी तंटा,वाद,भांडण असा विषयच नव्हता. 

कापडाचे तागे उद्या सकाळी उघडून पाहू, असा विचार करून मनोहरपंत जेवण आटोपून झोपी गेले. नित्यनेमाने पहाटे उठून देवदर्शन आटोपून आले. आल्यावर सामानाच्या खोलीत गेले. देवांसाठी विशेष दर्जाचं कापड मागवलं होतं. गणेशोत्सव तोंडावर आला होता. देवांना सजवायला हवं. 

कापडाच्या पार्सलशेजारी ठेवलेल्या लाकडी खोक्यावर त्यांची नजर पडली. कापड लाकडी खोक्यात पाठवायचे कारण काय मुंबईच्या दुकानदाराला? असा त्यांना प्रश्न पडणं साहजिकच होतं. पण खोक्यावर नाव-निशाणी तर काहीच नव्हती. स्क्रू ड्रायवरने त्यांनी ते लाकडी पार्सल उघडलं…..माउली! माउली! मनोहरपंत काहीशा मोठ्या आवाजात उद्गारले! खोक्यात छान रेशमी कापडाने झाकलेली मूर्ती होती..पद्मासन घातलेल्या अवस्थेतील…..ज्ञानोबा माऊलींची! बोलके डोळे,प्रमाणबद्ध शरीर,गळ्यात तुलसीमाला…साक्षात कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय घरी आलेले होते! मनोहरपंत काही क्षण भांबावलेल्या अवस्थेत उभे होते…हात जोडायचे भानही त्यांना राहिले नव्हते ! 

आपण तर कधी कुठलीही मूर्ती मागवली नव्हती. कुणी पाठवलं असेल पार्सल? तोवर सारं घर आणि शेजारची माणसं गोळा झालेली होती. चुकून आपल्या पत्त्यावर आलेले असेल पार्सल असे मनोहरपंत मनात म्हणाले. पण माऊलींना असंच कसं ठेवायचं म्हणून त्यांनी अलगद ती मूर्ती उचलली आणि पुंडलिकवरदा हरिविठ्ठलच्या गजरात देवघरात नेऊन ठेवली! त्या दिवशी दसरा आणि दिवाळी असे दोन सण एकमेकांच्या हातांत हात घालून घरात अवतरले होते! 

मूर्ती ज्याची असेल त्याची त्याला देऊन टाकू असा त्यांचा विचार झाला. त्याकाळी मुंबईत संपर्क साधायचा म्हणजे एकतर पत्र धाडणे किंवा स्वत: जाऊन धडकणे हाच पर्याय असायचा. मनोहरपंत पेठेत गेले. गाडीवानाला विचारताच तो म्हणाला “पार्सल आलं तुमच्या मालासोबत म्हणून तुमच्या घरी टाकलं. आता कुणी पाठवलं,कधी पाठवलं हे काही मला सांगता यायचं नाही!” 

एका मोठ्या पेढीतून मनोहरपंतांनी मुंबईच्या व्यापा-याला फोन लावला. त्यालाही या पार्सलविषयी काही खबर नव्हती. तो दिवस निघून गेला. माऊली आता नव्या घरात स्थिरावल्या होत्या.  मनोहरपंतांनी त्यांच्यासाठी खास मखमली वस्त्रं शिवली. गावातल्या विठ्ठल मंदिरात होणारं ज्ञानेश्वरी पारायण आता मनोहरपंतांच्या घराच्या ओसरीत सुरु झालं…अशी एक दोन नव्हेत…दहा बारा वर्षे निघून गेली…वर्षातून किमान दोन तरी पारायणे होत असत या मूर्तीसमोर. माऊलींवर हक्क सांगायला कुणीही आलं नाही. मात्र ज्याने कुणी मोठ्या प्रेमाने ही मूर्ती घडवून घेतली असेल, त्या भक्ताविषयी मनोहरपंतांना कळवळा वाटत असे! पण आता तो भक्त खरंच आला आणि त्याने माऊलीवर हक्क सांगितला तर…? पंत आतून हलून जात असत. मातीची मूर्ती ती..पण हृदयात मोठी जागा पटकावून बसली होती. आता मूर्तीचा उल्लेख मूर्ती असा न होता केवळ ‘माऊली’  असाच होऊ लागला होता…जणू संजीवन वास्तव्य नांदत होतं घरात. भोळ्या माणसांच्या मनात अशी खूप विस्तीर्ण पटांगणे असतात…कितीही दिंड्या उतरू द्यात! 

दरवर्षीच्या आषाढीला पंत माऊलीसोबत वाटचाल करू लागले! ते अगदी त्यांच्या शेवटच्या वारीपर्यंत! 

 त्यावर्षी दिंडी गावात परतली. परतवारी करून आल्यावर जसं आळंदीत माऊलींचं  स्वागत होतं..तसंच गावात स्वागत होई! 

त्या रात्रीचं कीर्तन मोठं रंगतदार झालं. खास आळंदीहून मातब्बर कीर्तनकार बोलावले होते गावाने. जुन्या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करायचं मनात होतं गावाच्या. यावर्षीच्या हरीनाम सप्ताहात वर्गणीही गोळा करायला प्रारंभ झाला होता. पंत माऊली नव्या मंदिरात स्थापन करायला परवानगी देतील का? असाही विचार काहींच्या मनात असावा. माऊली…माऊली जयघोषात कीर्तन संपलं आणि लोक घरी जायला निघाले. पंत नेहमीच मंदिराच्या दगडी खांबाला टेकून बसून कीर्तन ऐकत असत. बहुदा डोळे मिटलेले असत. मंदिर रिकामं झालं तरी पंत डोळे मिटूनच बसलेले होते. काही वेळाने कुणीतरी त्यांना हात लावून हाक मारली…तर प्रतिसाद शून्य! झोप लागून गेली असेल..लोकांना वाटलं. जोरात हलवलं तर पंत एका कुशीवर कलंडले! अकालीच असले तरी पंतांना मरण तर मोठे भाग्याचे आले, हरिनामाच्या चिंतनात आले!  

पंत गेल्यानंतर माऊलींचे काय होणार अशी चिंता करावी लागली नाही. मनोहरपंत यांच्या घरातील मुक्काम आवरता घेऊन माऊली आता नव्या घरात आल्या आहेत…तेच सौंदर्य,तेच पावित्र्य,तेच डोळे आणि त्यातील मार्दव! 

पन्नास वर्षे उलटून गेलीत….अजून कुणी माऊली मागायला आलेलं नाही…आणि आता कुणी आलं तरी स्वत: माऊलीच इथून प्रस्थान करणार नाहीत ! 

“ठायीच बैसोनी करा एक चित्त.. आवडी अनंत आळवावा ! “ असं सांगत माऊली विराजमान आहेत! रामकृष्णहरि! 

(सत्यघटनेवर आधारित)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कागदाची नाव… भाग-२ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

 

🔆 जीवनरंग 🔆

☆ कागदाची नाव… भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर

(पुढचे काही क्षण अवघडलेल्या अवस्थेत गेले.काय बोलावं सुचत नव्हतं कारण दोघंही डोळ्याच्या काठापर्यंत आलेलं पाणी अडवायचा प्रयत्न  करत होतो.इतक्यात…) – इथून पुढे —

छतातून पडणाऱ्या थेंबामुळे डोकं पुसत रस्त्याकडं पाहणाऱ्या काकाच्या डोक्यावर छत्री धरल्यावर त्यानं मागे वळून पाहीलं आणि एकटक बघतच राहीला.त्याच्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता.खूप दिवसांनी खरं तर वर्षांनी भेटत असल्यानं पुढचे काही क्षण अवघडलेल्या अवस्थेत गेले.काय बोलावं हेच समजत नव्हतं.साऱ्या जुन्या आठवणी दाटून आल्या.डोळ्याच्या काठापर्यंत आलेलं पाणी अडवायचा प्रयत्न दोघंही करत होतो. इतक्यात जोरात वीज कडाडली.आकाशाकडं बघण्याच्या निमित्तानं दोघांनी डोळे पुसले.शेवटी काकानं सुरवात केली “भारतात कधी आलास” 

“दीड वर्ष झालं”

“थांबणारेस कि परत जाणार ”

“नवीन थ्री बीएचके घेतलाय.आता इथंच सेटल झालोय.”

“वा.चांगली बातमी दिलीस.आत्ता तू इथं कसा?” 

“माझं ऑफिस समोरच आहे.खिडकीतून तुला पाहीलं आणि..”

“गर्दीत ओळखलसं कसं?”

“उभं राहण्याच्या स्टाईलवरून” 

“बरी लक्षात राहिली.” काकाच्या बोलण्यावर मी फक्त हसलो. 

“रेनकोट नाही का”

“गडबडीत विसरलो.नेमकं पावसानं गाठलं.आडोशाला थांबलो तरी निम्मा भिजलोच.”काका. 

“ऑफिसमध्ये चल.गरमागरम कॉफी घेऊ.”

“आम्ही चहाबाज,कॉफी चालत नाही.”काका टाळतोय हे लक्षात आलं. 

“चहापण मिळेल”

“आता नको नंतर!!.तसंही पावसाचा जोर कमी झालाय.थोड्या वेळानं निघेन.ऑफिस माहिती झालंय.भेटायला येईन” पुन्हा एकदा शांतता.दोघंही गप्प.एकदम ऑकवर्ड परिस्थिती. 

“कसायेस”यावेळी मी पुढाकार घेतला.

“जसा असायला पाहिजे तसा.”

“म्हणजे”

“खाऊन पिऊन सुखी आहे.थोडाफार सोडला तर विशेष बदल नाही.”डोक्यावरून हात फिरवत काका हसला. 

“सेम पिंच.माझंही तसंच आहे.”

“थापा मारू नकोस.आरशात बघितलं का.अजून चाळीशी यायचीय तरीही पोक्त बाप्या वाटतोस.पोट बघ. व्यायाम बियाम सगळं बंद वाटतं.दिवसभर फक्त मोबाईल,आरामदायी खुर्ची आणि लॅपटॉप.तब्येतीची हेळसांड करून पैसे कमवायचे आणि डॉक्टरची बिलं भरायची.हो ना.”

“वेळच मिळत नाही.तू मात्र चांगलं मेंटेन केलंय” मी शिफातीनं विषय बदलला.

“पर्याय नाही.तब्येत चांगली तर सगळं ठिक नाहीतर..तसंही आयुष्य आता उतरणीला लागलं.एकदा का उतार संपला की सदामुक्कामी !!”काका भकास हसला.ते खूप खोलवर भिडलं. 

“असं का बोलतोस”

“जे खरं आहे तेच बोलतोय.बाकी,तुझी प्रगती बघून समाधान वाटलं.खूप अभिमान वाटतो.अजून भरपूर यश मिळू दे.मोठा माणूस झालास.माझी भविष्यवाणी खरी ठरली.दादा-वहिनीची पुण्याई फार मोठी म्हणूनच त्यांच्या पोटी तुझ्यासारखा हिरा आला.घराण्याचं नाव मोठं केलसं.”इतक्या वर्षानंतर भेटलो तरी काकाची  माया तसूभरही कमी झाली नव्हती.लहानपणीसारखंच अफाट कौतुक तो आताही करत होता.त्याच्याकडे माझे सगळे अपडेट्स होते आणि मला त्याच्याविषयी काहीच माहिती नव्हतं कारण मीच त्याला आयुष्यातून हद्दपार केलं होतं.एवढ्या वर्षात एक साधा फोन करून चौकशी केली नाही.कोणतेही ठोस कारण नसताना इतरांचे ऐकून मनात अढी निर्माण झाली आणि संबंध तोडले.कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी निर्णय घेतला त्याचचं  वाईट वाटतं होतं.काका मात्र मनमोकळं बोलत होता.माझा गिल्ट वाढला.स्वतःचीच लाज वाटायला लागली.काकाच्या नजरेला नजर देण्याची हिंमत होईना.

“काय रे!! कसल्या विचारात हरवलास.”काकाच्या आवाजानं भानावर आलो.

“तूझं मन खूप मोठयं.”काका फक्त हसला. 

“चल,निघतो आता,पाऊस कमी झालाय”

“जाणार कसा”

“बाइक जिंदाबाद”

“भिजशील ना”

“थोडफार भिजलेलं तब्येतीला चांगलं असतं.”

“एक विचारू,”

“बिनधास्त!!”

“माझा राग नाही आला” 

“अजिबात नाही पण खूप वाईट वाटलं.भांडणं नाही कि मतभेद नाही तरी तुझं बदललेलं वागणं जिव्हारी लागलं.परक्यासारखा वागण्याचा खूप त्रास झाला.” 

“कान पकडून जाब का विचारला नाही”

“मला तो हक्क नव्हता. दादाच्या जाण्यानं खूप काही बदललं म्हणून गप्प राहिलो. माझी मर्यादा माहिती होती.जाऊ दे.जे झालं ते झालं, जुने विषय आता नको.उगीच शिळ्या कढीला ऊत आणून उपयोग नाही.अचानक भेटलास,महत्वाचं म्हणजे स्वतःहून बोललास.खूप खूप छान वाटलं.आजचा दिवस सार्थकी लागला.आता भेटत राहू.पुढच्या वेळेला चहा नक्की!! बाय”. काका निघाल्यावर अस्वस्थता अजून वाढली.नक्की काय करावं सुचत नव्हतं.समोर बंद पडलेली बाईक सुरू करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या  काकाला पाहून हुंदका आला. स्वतःला रोखू शकलो नाही.धावत जाऊन काकाला बिलगल्यावर आपसूक बांध फुटला.

“काका,माफ कर.तुझ्याशी खूप चुकीचा वागलो.”

“मघाशी सांगितलं ना.सोडून दे”

“तू अजूनही तसाच आहेस पण मी बदललो रे.ईगोला कुरवाळत बसलो.”

“तुझं तुला कळलं यातच सगळं काही आलं.फार विचार करू नकोस.आता आपल्या नात्यावरची जळमटं निघून मनं स्वच्छ झाली.अजून काय पाहिजे.”त्याचवेळी विजेचा कडकडाट झाला. 

“सत्ययं,बंद पडलेलं नातं रिचार्ज झाल्याची पावती मिळाली.”

“आता माझ्या बरोबर चल.कडक चहा पिऊ” बाइक ढकलत निघालो.ऑफिसजवळ आल्यावर पुन्हा पावसाला सुरवात झाली.काकानं बॅगेतून कागद काढला अन त्याची नाव बनवून माझ्याकडं  दिली. लहानपणीचे दिवस आठवले.काका नाव बनवणार आणि मी पाण्यात सोडणार हा आमचा खेळ बराच वेळ चालायचा.खूप वर्षानंतर कागदाची नाव हातात घेतल्यावर पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं.काकाला घट्ट मिठी मारली. ईगो,यश,श्रीमंती,अहंकार,गैरसमज,रूसवे-फुगवे,मान-अपमान सगळं सगळं कागदाच्या नावे सारखंच तकलादू असतं. वाहत्या पाण्यात नाव सोडताना डोळ्यातून पश्चातापाचे थेंब नावेवर पडले आणि नाव पुढे गेली तेव्हा मन खूप शांत झालं.इतका वेळ आडोशाला थांबलेला काका अचानक पावसात जाऊन उभा राहीला.कदाचित त्याला डोळ्यातलं पाणी माझ्यापासून लपवायचं होतं.—

– समाप्त –

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कागदाची नाव… भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

 

🔆 जीवनरंग 🔆

☆ कागदाची नाव… भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

पावसाळ्यात ऑफिस सुटण्याच्या वेळी येणारा पाऊस वैताग आणतो.दिवसभर कितीही पडला तरी काही वाटत नाही पण नेमकं घरी जायच्या वेळी आला की खूप चिडचिड होते.आतादेखील तीच परिस्थिती होती.पाच वाजताच अंधारून आलेलं.गच्च भरलेलं आभाळ मुसळधार पावसाची लक्षणं दाखवत होतं.जोरदार पाऊस म्हटलं की थांबलेले रस्ते,जागोजागी साचलेलं पाणी,बंद पडलेल्या गाड्या,जाणारे लाइट,गोगलगाय सारखं चालणारं ट्राफिक आणि गर्दी अशी टिपिकल दृश्य नजरेसमोर आली.या चक्रात अडकण्यापेक्षा ऑफिसमधून लवकर निघावं याच विचारात असताना बॉसचा फोन आला.त्यांना हवी असलेली माहिती मेल करून लॅपटॉप बंद करेपर्यंत धो धो पडायला सुरूवात झाली.

जोर पाहता पाऊस लवकर थांबण्याची चिन्ह नव्हती.आता लवकर निघूनही वेळेत पोचणं तर शक्यच नव्हतं.निवांत झालो.लॅपटॉप सुरू करून कामात डोकं खुपसलं पण लक्ष लागतं नव्हतं.कॉफीची तल्लफ आली.वाफळलेल्या कॉफीचा मग घेऊन खिडीकीतून पाऊस पाहयला लागलो.चौकात गुडघ्याइतकं पाणी साचल्यानं तलाव झालेला.गाड्यांच्या लांब रांगा,बंद पडलेल्या टू व्हीलर ढकलणारे.पावसापासून वाचण्यासाठी अनेकांनी आडोशाचा आधार घेतलेला.सहज लक्ष समोरच्या बसस्टॉपकडं गेलं तिथं काहीजण थांबलेले.जो तो मोबाईलमध्ये हरवलेला.त्यातच पाठीवर बॅग लावलेला एकजण डावा हात कमरेवर आणि उजव्या हातानं हनुवटी धरून तल्लीन होऊन पाऊस बघत होता.त्याची उभं राहण्याची स्टाईल ओळखीची वाटली.रस्त्यावरच्या लाईटच्या प्रकाशात चेहरे नीट दिसत नव्हते.त्या व्यक्तीला नक्कीच भेटलो आहोत असं मनापासून वाटत होतं पण नेमकं लक्षात येत नव्हतं.एकदम आयडिया सुचली.मोबाइल कॅमेरा झुम करून पाहीलं तर अंदाज बरोब्बर निघाला तो मोहन काका होता.

डोक्यावरचे विरळ केस आणि चष्मा सोडला तर काकात फार  बदल झाला नव्हता.अंगकाठी पूर्वीसारखीच शिडशिडीत होती.त्यामुळेच तर पटकन ओळखता आलं.तब्बल अकरा वर्षानंतर काकाला पाहिलं.भावनांचा कल्लोळ झाला.मन एकदम भूतकाळात गेलं.

मोहनकाका सख्खा काका,त्याच्या नशिबात संसारसुख नव्हतं.लग्न टिकलं नाही.त्या अनुभवावरून काका दुसऱ्या लग्नाच्या भानगडीत पडला नाही.काकाचा माझ्यावर विशेष लोभ.लहानपणी सगळ्यात जास्त लाड त्यानं केले.मागेल ती वस्तु आणून द्यायचा.यावरून बाबांबरोबर वादावादी व्हायची तरीही लाड थांबले नाहीत.दरवर्षी पास झालो की काकाकडून हटके गिफ्ट ठरलेलं.त्याच्या गिफ्टची उत्सुकता मलाच नाही तर घरातल्या सर्वानांच असायची.दहावीला नव्वद टक्क्यांनी पास झाल्यावर भरपूर गिफ्ट मिळाली पण काकानं दिलेला दाढीचा ब्रश आणि शेविंग क्रीम सर्वात आवडलं.उमलत्या वयात त्या दोन्ही गोष्टींचे फार अप्रूप होतं.काकाची समयसूचकता खूप आवडली म्हणूनच नंतर बरीच वर्षे त्या दोन्ही गोष्टी जपून ठेवल्या होत्या.बारावी पास झाल्यावर एक शर्ट आवडलेला पण किंमतीमुळे आई-बाबांनी घेऊन दिला नाही.काकाला कळलं आणि संध्याकाळीच तो शर्ट माझ्या अंगात होता.त्यावरून घरात खडाजंगी झाली पण काकानं शर्ट परत केला नाही.असा हा मोहन काका. 

पण म्हणतात ना,आयुष्याला कधी अन कुठं वळण मिळेलं हे सांगता येत नाही. काही घटनांमुळे  आमच्यात अंतर पडलं.इतकंकी एकमेकांचं तोंड पहाणं सोडलं.लग्नकार्यात भेट झालीच तर उसनं हसणं आणि कोरडी विचारपूस यापलीकडे काही नाही.इतका दुरावा येण्याचं मुख्य कारण बाबा आणि काका यांच्यातला वडीलोपार्जित जमिनीचा वाद.बाबांना जमीन विकायची होती तर काकाचा विरोध.यावरून बरेच दिवस धुसपुस होती.नातेवाईकांनी,वडीलाधाऱ्यांनी समजावून सांगितलं पण तोडगा निघाला नाही.शेवटी  जमिनीच्या वाटण्या झाल्या आणि एकमेकांविषयीच्या भावनांच्याही.खरंतर दोघांनाही मनातून खूप वाईट वाटत होतं पण ईगो आडवा आला.अबोला सुरू झाला.जवळ राहणाऱ्या काकानं दोनचार दिवसात घर बदललं.त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि माझ्या शिक्षणासाठी बाबांना जमीन विकावी लागली परंतु धाकटा भाऊ दुरावला ही गोष्ट बाबांनी खूप मनाला लावून घेतली.तब्येतीवर परिणाम झाला.सहा महिन्यातच हार्ट अटकचं निमित्त होऊन बाबा गेले.वाटणी आणि काका यामुळेच हे घडलं अशी माझी पक्की धारणा झाली.आईनं देखील दुजोरा दिला.अजून कटुता वाढली.मोबाईलमध्ये नंबर होते पण कधीच कॉल नाही की मेसेज नाही.आधीच नावापूरतं असलेलं आमच्यातले संबंध पूर्णपणे तुटले.ते पुन्हा जोडण्यासाठी कुणाकडूनच प्रयत्न झाले नाहीत.     

आयुष्य असंचं असतं.काही गोष्टींना बाजूला करून पुढे जावचं लागतं  कारण वेळ कोणासाठी थांबत नाही.माझ्याही बाबतीत तेच झालं.शिक्षण संपल्यावर लगेच नोकरी मिळाली नंतर यशाच्या नवनवीन पायऱ्या गाठत आयुष्यात स्थिरावलो.नोकरीच्या निमित्तानं परदेशी गेलो.पहिल्यांदा परदेशी जाताना काकाचे शब्द आठवले.तो नेहमी म्हणायचा की हा पोरगा फॉरेनला जाणार.तेच खरं ठरलं.नुसताच गेलो नाही तर चांगली दहा वर्षे राहिलो.लग्न,बायको,संसार,मुली,नवीन नाती आणि जबाबदाऱ्या या सगळयात ‘काका’ विस्मृतीत गेला.कधीतरी चुकूनमाकून आठवण यायची पण तेवढ्यापुरतीच. 

आणि आज खूप दिवसांनी अचानक काका दिसला.मनात खोलवर असलेल्या आठवणी सरर्कन डोळ्यासमोर आल्या.वास्तविक आई-बाबांशी वाद असले तरी काका माझ्याची कधीच वाईट वागला नाही तरीसुद्धा आईच्या दबावामुळे मी काकाशी बोलणं सोडलं.दुरावा इतका वाढला की माझ्या लग्नाचं आमंत्रणसुद्धा दिलं नाही तरीही अक्षता टाकण्यापूरती काकानं हजेरी लावली.माझी भेट न घेता लांबूनच आशीर्वाद देऊन न जेवताच परत गेला.त्यावेळी खूप वाईट वाटलं होतं.काकासोबतच्या एकेक हळव्या आठवणींनी खूप भरून आलं.कोणालाही समजण्याआधी चटकन डोळे पुसून टाकले.

“कोणीतरी स्पेशल व्यक्ती दिसली वाटतं.बराच वेळ खिडकीतून बघतोयेस” मित्राच्या आवजानं भानावर आलो.काकाला भेटायची तीव्र इच्छा झाली.आज ईगोपेक्षा नात्याचं पारड जड होतं. 

“छत्री आहे का रे” मी मित्राला विचारलं.

“आहे.एवढ्या पावसात कुठं जायचयं.खास व्यक्ती आहे वाटतं”

“येस.खासमखास आहे.परत आल्यावर सांगतो.आधी छत्री दे” छत्री घेऊन निघालो.बसस्टॉप जवळ आलो.पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानं थांबलेले एकेकजण जात होते.छतातून गळणाऱ्या थेंबामुळे सारखं सारखं डोकं पुसत काका  रस्त्याकडे पाहत होता.मी डोक्यावर छत्री धरली तेव्हा काकानं मागे वळून पाहीलं आणि एकटक बघतच राहीला.चेहऱ्यावरून  आश्चर्याचा बसलेला सुखद धक्का जाणवत होता. पुढचे काही क्षण अवघडलेल्या अवस्थेत गेले.काय बोलावं सुचत नव्हतं कारण दोघंही डोळ्याच्या काठापर्यंत आलेलं पाणी अडवायचा प्रयत्न  करत होतो.इतक्यात ……….

– क्रमशः भाग पहिला

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मला माफ करा… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ मला माफ करा…  भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(आई-बाबा आमच्याकडे राहत नाहीत म्हणून राहुल आणि माझी भावजय मनापासून हळहळ व्यक्त करीत असतात. आजी-आजोबांच्याकडे राहता येत नाही म्हणून माझा पुतण्या व पुतणी सदैव खंत व्यक्त करत असतात.) – इथून पुढे —  

खरं तर सगळीच नाती प्रेमाच्या पायावर उभी असतात. परंतु जीवनयात्रा मात्र तडजोड नावाच्या कुबड्यांच्या साहाय्यानेच पूर्ण करावी लागते. चल, आपण गप्पा मारत बसलो आहोत. इतक्यात आमची दुरंतो एक नंबरवर येईल. बी-नाईन डबा समोरच लागतो. तुला मात्र तीन नंबर प्लॅटफॉर्मवर जावं लागेल. पुन्हा भेटू या. हे माझं कार्ड” असं म्हणत राघवेंद्र आईला घेऊन प्लॅटफॉर्मकडे निघाला. 

बेंगलुरूला जाणारी उद्यान एक्सप्रेस उशीराने धावत असल्याने अजून एका तासाचा अवधी होता. महेश अस्वस्थपणे बसून राहिला. राघवेंद्राने महेशवर पुन्हा एकदा मात केली होती. संस्काराच्या बळावर ह्यावेळी त्याने महेशला खुजं ठरवलं होतं. महेश आत्ममग्न होऊन विचार करीत बसला. 

चार महिने संपून एक आठवडा झाला तरी अविनाश दादाचा बाबांना घेऊन जाण्याविषयी निरोप आला नाही. बाबांना सांभाळायची त्याची पाळी येते त्याचवेळी त्याची रजा मंजूर होत नाही किंवा तो कुठल्याशा टूरवर असतो. ऑफिसचा कर्मचारी बाबांना बेंगलोरला पोचवायला चाललाय. 

बाबा आजही निघायला आढेवेढे घेत होते. चुकार मुलं शाळा चुकवण्यासाठी काहीतरी कारणं सांगतात ना, तसं तब्येत बरी नाही म्हणून बाबा बेंगलोरला जायला कुरकुरत होते. मी आधीच टू-टायर एसीची रिझर्वेशन करवून घेतली होती म्हणून बरं आहे. 

मी घरात मात्र खलनायक ठरलो. 

‘बाबा, आजोबांना बेंगलोरला पाठवायची एवढी जबरदस्ती कशाला करताय? राहू द्या ना इथंच’ असं दोन्ही मुलं म्हणत होती. काल रात्री मुग्धा तर माझ्याशी चक्क भांडत होती. ‘अहो, मामंजीना त्यांच्या मनाविरूध्द कशाला पाठवताय? त्यांचा तुम्हाला काय त्रास होतोय? माझं ऐका. आपली मुलेही मोठी झाली आहेत. त्यांना सगळं समजतं. पुढे जाऊन त्यांनीही आपल्याला दर सहा महिन्याला असं बस्तान हलवा म्हटल्यावर तुम्हाला सहन होईल का, त्याचा एकदा विचार करा म्हणून विनवत होती. आज हा राघवेंद्र अचानक उगवला आणि मला शाब्दिक चपराक मारून गेला. 

महेशचं दुसरं मन म्हणालं, ‘राघवेंद्र म्हणतो त्यात काय चुकीचं आहे? माझ्याहून दोघे मोठे बंधू पदवीधर झाले, नोकऱ्या मिळवल्या. दोघांची लग्ने एकाच मांडवात झाली. नोकरीच्या निमित्ताने घर सोडून बाहेर पडले. मी शेंडेफळ असल्याने आईबाबांचा लाडका होतो. आज मी जो काही आहे ते केवळ बाबांच्या प्रोत्साहनानेच. ते सदैव माझ्या पाठीशी असायचे. मी रात्री अभ्यासासाठी जागत असायचो त्यावेळी ते जागे असायचे. नोकरीच्या वेळी देखील त्यांचंच मार्गदर्शन उपयोगी पडलं. माझं लग्नही त्यांनी किती हौसेनं आणि थाटामाटात केलं. 

आई गंभीर आजारी होती तेव्हा एका रात्री मी आईबाबांचं संभाषण आडून ऐकलं होतं. मी असं कसं विसरलो? आई म्हणत होती, ‘अहो, मी फार दिवस जगेन असं वाटत नाही. मी गेल्यावर तुमची हेळसांड होईल म्हणून माझा जीव इथेच घुटमळतोय हो.’ बाबा आईला धीर देत म्हणाले, ‘सरस्वती, तुला काही होणार नाही. तू माझी काळजी करू नकोस. महेश आणि मुग्धा मला कधीच अंतर देणार नाहीत. ते मला फुलासारखं जपतील ह्याची मला खात्री आहे.’ बाबांना माझ्याविषयी किती खात्री होती.

आई गेली अन पहाडासारखे बाबा खचून गेले. ज्या बाबांनी माझा हात धरून मला पुढे नेलं होतं, त्यांना आज माझ्या आधाराची आवश्यकता आहे आणि मी त्यांना दूर लोटू पाहतोय. आईबाबांच्या आशीर्वादाने देवानेही मला भरभरून दिलंय. बाबांना सांभाळणं काहीच अवघड नाहीये. माझ्यासारखा नतद्रष्ट मीच आहे.

अचानक “ शंभू” या हाकेने महेशची तंद्री भंग पावली. आपला थरथरता हात महेशच्या मनगटावर ठेवत बाबा काकुळतीने म्हणाले, “शंभू, बाळा तू मला न्यायला येशील ना रे? मला बेंगलुरूत अजिबात करमत नाही. अरे, पुण्यातलं घर हे माझं आनंदनिधान आहे. ते घर आम्ही मोठ्या कष्टानं उभं केलंय. ह्या घराचा प्रत्येक कोपरा न कोपरा, त्या खिडक्या, भिंती यांच्याशी माझं अतूट नातं आहे, मैत्री आहे. खिडकीजवळ थांबून मी तुळशी वृंदावनाकडे बघतो, तेव्हा मला तुझ्या आईची आठवण येते. नकळत डोळ्यांच्या पापण्या ओलावतात. मग खिडकीतून येणारा मंद वारा माझे ओघळलेले अश्रू पुसून माझं सांत्वन करून जातो रे.” 

महेश पटकन जागेवरून उठला आणि म्हणाला, “बाबा, तुम्ही इथेच थांबा. हा मी आलोच.” महेश धावतच बाहेर पडला. दुरंतो अजून सुटायची होती. बी-नाईनचा डबा समोरच होता. राघवेंद्रच्या कार्डावरून महेशने मोबाईल लावला. “राघवेंद्रा मी बी-नाईनच्या बाहेर उभा आहे. एका मिनिटासाठी येशील का?” 

राघवेंद्र काही क्षणासाठी खाली उतरला. महेशने राघवेंद्रला घट्ट मिठी मारली आणि एवढंच बोलला, “‘मित्रा, आपली ही भेट माझ्या स्मरणात कायमची राहील. दिल्लीहून परत आल्यावर तुम्ही सहकुटुंब माझ्या घरी या. हे माझं कार्ड!” एवढ्यात गाडीने शिट्टी दिली आणि वेग घेतला तसा हळूहळू राघवेंद्र दृष्टीआड झाला.             

महेश वेटींग रूमवर परत आला. दोघा कर्मचाऱ्यांना म्हणाला, “चला, घरी जाऊ या. ट्रीप कॅन्सल. बॅगा आपल्या कारमध्ये ठेवा.”

बाबा गोंधळून जात म्हणाले, “शंभू बेटा, अचानक असं काय झालं? मी काही चुकीचं बोललोय का? नाराज होऊ नकोस रे बाळा, मी जाईन बेंगळुरूला राहायला.” 

महेशने हात धरून बाबांना उठवलं. भावूक झालेल्या महेशने कित्येक वर्षानी बाबांना गळामिठी मारली आणि कसंबसं सावरत म्हणाला, “बाबा, मला माफ करा. आपण आपल्या घरी जाऊ या. आता तुम्ही कायमचे पुण्यातल्या घरात राहा. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, हे माझं वचन आहे.”  

बाबा पाणावलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहत पुटपुटले, ” पाहिलंस सरस्वती, माझं म्हणणं खरं ठरलंय ना? तू उगाच काळजी करत होतीस…” आणि बाबा त्यांच्या लाडक्या शंभूचा हात धरून समाधानाने आपल्या घराकडे जाण्यासाठी परत निघाले…….       

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मला माफ करा… – भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ मला माफ करा…  भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

आज राघवेंद्राला दुरंतो एक्सप्रेसने दिल्लीला जायचं होतं. पुण्यातल्या ट्रॅफिकचं काही सांगता येत नाही म्हणून आईला घेऊन सकाळी नऊ वाजताच त्यानं घर सोडलं. स्टेशनवर लवकर पोहोचले. ट्रेन सुटायला अजून अवधी होता. त्यानं आईला वेटिंगरूममध्ये बसवलं. पेपरस्टॉलवरून काही मासिकं विकत घ्यायला गेला तेव्हा समोरून येणारी व्यक्ति त्याला ओळखीची वाटली. त्याच्याबरोबर एक वृद्ध गृहस्थ आणि इतर दोघे बॅगा घेऊन चालले होते.

ते लोक काहीसे पुढे गेल्यावर, काहीसे आठवल्याने राघवेंद्राने “अहो, महेशसाहेब” म्हणून हाक मारली. 

त्या गृहस्थानं पटकन मागं वळून पाहिलं आणि थांबून राहिला. तो महेशच होता. त्याला भेटून जवळपास वीस वर्षे झाली होती. 

राघवेंद्र आणि महेश एकाच कॉलनीत राहणारे वर्गमित्र आणि अभ्यासात एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. राघवेंद्र नेहमीच महेशहून वरचढ असायचा. कॉलेजला गेल्यावर त्यांचे मार्ग बदलले. महेशच्या बाबांनी बावधनला घर बांधल्यानंतर ते कॉलनी सोडून गेले. त्यानंतर पुन्हा त्यांची कधी भेट झाली नाही. 

महेश आता सेंट्रल एक्साईजमध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे असं कुणाकडून तरी कळलं होतं. राघवेंद्र त्याच्या जवळ जात म्हणाला, “साहेब, मला ओळखलंत का?” राघवेंद्रने ‘साहेब’ म्हटल्यामुळे महेशचा अहंकार सुखावला होता. 

“का नाही ओळखणार? तुझ्यात तसा काही फारसा फरक पडलेला नाही. आहे तसाच आहेस. ठेविले अनंते तैसेचि रहावे….” असं म्हणून मिश्किलपणे हसत पुढे बोलला, “काय करतोस? कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आहेस?” 

“मी, प्राध्यापक आहे. तुम्ही म्हणता तसे मी आहे तसाच आहे आणि चित्ती समाधानही आहे.”  

महेश मनातल्या मनात विचार करत होता. आज मी त्याच्याहून कितीतरी उंचावर आहे. आज मी केवढ्या मोठ्या हुद्द्यावर आहे आणि हा मात्र प्राध्यापकच आहे. बोलता बोलता ते वेटिंगरूममध्ये आले.

“राघवेंद्र, तू अव्वल नंबरचा विद्यार्थी होतास ना? पण तुला सरकारी नोकरी मिळवता आली नाही. खरं आहे ना?” महेशनं सहेतुक विचारलं. 

“मी प्रयत्नच केला नाही. एम टेकला गोल्डमेडल मिळाल्यावर प्राचार्यानी मला केबिनमध्ये बोलावलं अन म्हणाले, ‘तुझ्यासारख्या विद्यार्थ्याने स्वत:च्या अर्थाजनासाठी ही पदवी न वापरता विद्यादानासाठी वापरावी. तुझ्या शिकवण्याने कित्येक मुलांचे भवितव्य घडेल. कदाचित मोठ्या कंपनीतल्यासारखा पगार मिळणार नाही. अर्थार्जन कमी होईल. परंतु कित्येक विद्यार्थ्यांच्या आदरास पात्र होशील. मला त्यांचं म्हणणं पटलं. प्राचार्यानी नेमणुकीचं पत्र हातात दिलं. असो.”

“आता तुम्ही कुठे निघाला आहात साहेब?” असं म्हणत राघवेंद्रानं नकळत महेशवर मात केली. 

“उद्यान एक्सप्रेसने बाबा बेंगलुरूला चालले आहेत, तर त्यांना सोडवायला आलोय.” महेशने सांगितलं. 

“ते एकटे जातील काय?” राघवेंद्रने भाबडेपणानं विचारलं. 

“त्यांच्या सोबतीला ऑफिसातला एक कर्मचारी आहे. अरे मला अजिबात वेळ नसतो. मी सेंट्र्ल एक्साईजमध्ये असिस्टंट कमिशनर आहे.” 

“एवढे मोठ्या हुद्द्यावर आहात म्हटल्यावर तुम्हाला वेळ मिळणे शक्यच नाही.” 

“राघवेंद्रा, मघापासून मी तुला अरेतुरे करतोय आणि तू मला अहोजाहो करतो आहेस. बरं, तू कुठे चालला आहेस सांग.”

“महेश, तुम्हा सरकारी अधिकारी लोकांचा मान असतो. चार-चौघात अरेतुरे कसं म्हणणार? कॉलेजच्या बाहेर आम्हाला कोण ओळखतो? बरं असो. अरे, मी आईला घेऊन दिल्लीला चाललोय. माझा धाकटा भाऊ राहुलला ओळखतोस ना? तो दिल्लीला असतो. त्यानं तिथे एक फ्लॅट विकत घेतलाय. आम्ही वास्तुशांतीला चाललो आहोत. आईला सांधेदुखीचा तसंच हृदयविकाराचा प्रॉब्लेम आहे. गेल्यावर्षी बाबा गेल्यानंतर ती थोडीशी डिप्रेशनमध्ये गेली होती.”        

“आईला सांभाळणं तुला एकट्याला फारच अवघड जात असेल. तुम्ही दोघे भाऊ सहा सहा महिने सांभाळता वाटतं.”

“छे छे ! महेश मी असा विचार देखील करू शकत नाही. आई-बाबा सुरूवातीपासूनच पुण्यात राहिले आहेत. इथेच वाढले आहेत. त्यांना दुसरीकडे करमत नाही म्हणून ते राहुलकडे कधीच राहायला गेले नाहीत. केवळ पोट भरण्यासाठी म्हणून दर सहा महिन्याला त्यांनी निर्वासितांच्यासारखे बाडबिस्तरा गुंडाळून दुसरीकडे जावं ही कल्पनाच मला पटत नाही. 

आज आम्ही दोघे भाऊ आहोत म्हणून सहा-सहा महिन्याची वाटणी करावी असं म्हणतोस. जर आम्ही तिघे भाऊ असतो तर आईबाबांना चार-चार महिने वाटून घ्यायचं की काय?

माणसाला फक्त दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न नसतो. समाजप्रिय माणसाला कुणाशी सतत तरी संवाद साधावं असं वाटत राहतं. राहुल आणि वहिनी कामावर गेल्यावर दिल्लीसारख्या ठिकाणी ते कुणाशी संवाद साधतील, सांग ना?

“राघवेंद्रा, असं म्हणून कसं चालेल? आईने राहुललासुध्दा जन्म दिलाय. हा व्यवहार आहे. त्यांनं देखील आईला सहा महिने सांभाळायला हवं. तू एकट्यानेच ह्या जबाबदारीचं ओझं का उचलावं? माणसानं असं भावनाप्रधान होऊन चालत नाही. थोडंसं व्यावहारिक असायला हवं. वहिनी काही बोलत नाहीत काय?”

“महेश, मुळात मी आईला सांभाळतो आहे ह्या भ्रमात कधीच नाही. आईबाबांनीदेखील मुलांचा भविष्यकाळ घडवण्यासाठी त्यांच्या वर्तमानकाळाचा बळी दिला आहे. आमचे शिक्षण, आमचं भवितव्य ह्यातच ते गुरफटले होते. त्यांनी स्वत:चा विचार कधीच केला नाही. 

ज्या आई-बाबांनी निरपेक्ष मनानं मला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं त्यांना मी सांभाळतोय असं कधी मानलंच नाही. त्यांनी आम्हा मुलांना कधी ओझं मानलं होतं काय? मग त्यांच्या वृद्धत्वात मी त्यांना ओझं का समजायचं? 

माझी पत्नी रेणुचं म्हणत असशील तर, एकदा ‘आमच्या सासूबाई राहुल भावोजींच्याकडे जायला नाही म्हणतात.’ असं ती कुणाशी तरी बोलताना मी ओझरतं ऐकलं होतं. दोन तीन दिवसानंतर मी तिला सहज म्हटलं, “रेणु, आपल्याला दोन मुलं आहेत. म्हातारपणी तू कुणाकडे राहायचं ठरवलंस? मोठ्याकडे की धाकट्याकडे?” तर ती पटकन म्हणाली, ‘माझी मर्जी मला ज्या मुलाकडे राहावेसे वाटेल मी त्याच्याकडे राहीन. मला कोण अडवतं बघू.’ 

मग मी तिला हसत हसत म्हटलं, “रेणु, माझी आई देखील तुझ्यासारखाच विचार करते बघ. ती सुद्धा म्हणते की मी मरेपर्यंत राघवेंद्राकडेच राहणार आहे, मला कोण अडवतं बघू म्हणून.’ खरं आहे. इथे माझ्याकडे राहायचं की राहुलकडे राहायचं हे आईच ठरवू शकते. नाही का?’  त्यानंतर रेणु ह्या विषयावर आजवर कधीच बोलली नाही. 

“राघवेंद्रा, मुळात आईवडिलांना आपण एकट्यानेच का सांभाळायचं हा प्रश्न आहे.” 

“जर मी एकटाच मुलगा असतो तर आईबाबा आणि आम्ही सगळे एकत्रच राहिलो असतो ना? दुसरी गोष्ट, माझा भाऊ राहुल आईला सांभाळायला नाही म्हणतो म्हणून ती माझ्याकडे राहते असं समजू नकोस. आई-बाबा आमच्याकडे राहत नाहीत म्हणून राहुल आणि माझी भावजय मनापासून हळहळ व्यक्त करीत असतात. आजी-आजोबांच्याकडे राहता येत नाही म्हणून माझा पुतण्या व पुतणी सदैव खंत व्यक्त करत असतात.  

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विकी माऊस – भाग-२ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

☆ विकी माऊस – भाग-२ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

(सतीश अंकल म्हणाले होते, ” जर मला देव भेटला  आणि त्याने मला वर मागायला सांगितला तर मी त्याला म्हणेन देवा मला कायमच बालपणात ठेव.”) आता पुढे….

‘त्यांना काय माहित आमची लहान मुलांची  दुःखं ! मोठी माणसं कधी आम्हाला मनासारखं करू देत नाहीत. खेळू देत नाहीत. टीव्ही पाहू देत नाहीत… सारखं आपलं नो..नो,डोन्ट… डोन्ट… डोन्ट! काही शंका विचारली तर ओरडा खावा लागतो…. पुन्हा ती शाळा… होमवर्क’ रडत असला तरी रोहनचं विचार चक्र चालूच होतं. स्टडीरूम मध्ये ठेवलेल्या पिंजऱ्या समोर तो अखंड बसून होता. नंतर कसाबसा चार घास खाऊन झोपला.

सकाळी उशिरा, कलाऑन्टीने उठवल्यावर उठला. रेंगाळत पेंगाळत बसला. आज मेच्या सुट्टी दिलेल्या होमवर्कला तो हात पण लावणार नव्हता. बोर्नविटा पिता पिता दोन-चार चमचे विकीच्या पिंजऱ्यात गेले. त्याचे निरीक्षण करता करता त्याच्याशी खूप गप्पा मारून झाल्या. विकीला खायला कायआवडेल

याचे ऑन्टी बरोबर डिस्कशन ही झाले. रोहन बाबा ‘ त्याला ‘ घरात सांभाळणार आहे हे ऐकून ऑन्टी गालातल्या गालात हसत होती.

आंघोळ, नाश्ता आवरल्यावर ऑन्टीने टीव्ही लावून दिला. तो आणि पिंकी मिकी माऊस, डॉगी प्लूटो ,डोनाल्ड डक, गुफी पेटे यांची दंगा मस्ती पळापळी पहाण्यात रंगून गेले. थोडे टॉम अँड जेरी… नंतर थोडा छोटा भीम…. वेळ कसा गेला कळलंच नाही. मधून मधून विकीला पाहण्याचा मोह ही रोहन आवरू शकत नव्हता.

संध्याकाळी बाबा जरा लवकर घरी आला होता. बाबाच्या  अवतीभवती घुटमळत बाबाला काय आणि कसे सांगायचे, पटवून द्यायचे याचे प्रॅक्टिस रोहन करत होता. चहा पिता पिता बाबा म्हणाला,” रोहन बेटा बैस इथं. पहिल्यांदा तुझं काय म्हणणं आहे ते सांग.” पुन्हा डोळ्यात आपण होऊनच अश्रू दाटून आले. जे बोलायचं ठरवलं होतं ते काहीच आठवेना. मग जे सुचलं ते बोलू लागला, “बाबा, गणपती बाप्पाचा पेट ॲनिमल उंदीरच होता ना?….. मग माझा?”…. त्याला पुढे बोलू न देता बाबा म्हणाला, “अरे ती पुराणातली कथा आहे… आणि तो उंदीर गणपती बाप्पाचे वाहन होता. बाप्पाला पाठीवर बसवून नेणारा उंदीर किती मोठा असेल…. कल्पना कर. आणखी म्हणजे शंकराचे वाहन नंदी, विष्णूचे गरुड, कार्तिकेयचे मोर! त्यावेळी आत्ता सारख्या स्कूटर, बाईक, कार नव्हत्या ना.” हे सगळं आपल्या मनाने रचून या चिमुरड्याला पटेल असं करून सांगताना बाबाला घाम फुटला .

बाबाचे बोलणे ऐकता ऐकता रोहन बाबाच्या मांडीवर डोके ठेवून सोफ्यावर कधी आडवा झाला त्याला कळलेच नाही. 

“तो उंदीर आपल्या आपणच पिंजऱ्यात आलाय” रोहन म्हणाला. “तो पण इतक्या वर आपल्या आठव्या मजल्यावर! मग राहू दे ना तो इथे.” “ठीक आहे, हे बघ आपल्या घरात मुंग्या, झुरळे, कोळी, डास, माश्या, पाली असे कितीतरी जीव जंतू आपण होऊन शिरतात. तसाच हा उंदीर! त्यांना कोणी पाळत नाही. ते सगळे आपल्याला त्रास देतात. रोगराई पसरवतात. मागं एकदा तुला आठवतंय? एका उंदरानं पिंकीच्या दोन वह्या, एक पुस्तक पूर्णपणे  कुरतडून टाकलं होतं. आणखी म्हणजे कावळा चिमणी यासारख्या पक्षांना पण कोणी पाळत नाही.” बाबाचं म्हणणं थोडं थोडं  रोहनला पटू लागलं होतं.

“तू त्या उंदराकडे बघ, त्यानं पिंजऱ्यातलं काही खाल्लंय?”रोहननं उठून काळजीपूर्वक लक्ष देऊन पाहिलं.कालपासून विकीला सगळ्यांनी दिलेला खाऊ पिंजऱ्यात तसाच पडून होता. विकी फास्ट रन पण काढत नव्हता. त्याच्या डोळ्यातली चमक पण नाहीशी झाली होती. रोहनला हे बघून खूप वाईट वाटलं. पुन्हा तो बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून सोफ्यावर आडवा झाला. रोहनच्या डोक्यावर, केसातून हात फिरवता फिरवता त्याला थोपटत बाबा म्हणाला,” बाळा, पिंजऱ्यात तो काहीच खाणार नाही. असाच मरून जाईल. त्याला कळलंय की आपण मृत्यूच्या सापळ्यात अडकलोय. जर आपण आता त्याला बाहेर सोडलं तर तो बाहेर पळून जाईल. ‘पेट’ म्हणून आपल्या घरात थांबणार नाही. एखादं मांजर किंवा कुत्रा त्याच्यावर झडप घालून त्याला खाऊन टाकेल. किंवा तो आणखी कोणाच्यातरी घरी जाऊन उत्पात माजवेल.”बाबा त्याला आपण ‘पेट’का पाळत नाही याबद्दल बरेच काही सांगत होता.रोहन विचारात गुंतला होता, ‘बाबाच्या बोलण्यातलं काही आपल्याला समजतंय काही नाही, काही पटतंय काही नाही! पण बाबाचं असं प्रेमानं थोपटणं आपल्याला खूप छान वाटतंय’

पुन्हा रोहनच्या मनात शंका आली,” बाबा तू मला रागवू नकोस. मी तुला एक विचारतो. टीव्हीवर तर मिकी माऊस, पेटे का कोणीतरी ती कॅट… प्लूटो, गुफी डॉग्स सगळे एकत्र खेळतात. दंगा करतात. कॅट माऊसला नाही खात!.. मग ते सगळं खोटं असतं का? टॉम- जेरी, छोटा भीम काहीच खरं नाही ?”

 “हे बघ, आत्ता तुला ही सगळी कार्टून सिरीअल्स आवडतात. हो ना?… मग मनात काही शंका न आणता ती एन्जॉय कर. अरे हे फॅन्टसी मध्ये रमायचंच वय आहे बाळा. जसा जसा मोठा होत जाशील तसं तसं तुला सगळं आपोआप समजेल.” बाबाचं म्हणणं त्याला पटलं होतं. ‘म्हणजे आपण थोडे थोडे मोठे आणि स्ट्रॉंग होऊ लागलोय.’त्याच्या मनात विचार आला .

बाहेर पिंकी ताई आणि मित्र-मैत्रिणींचा गलका त्याला ऐकू आला. खेळायला बाहेर जाता जाता त्याला वाटलं,’ आपण आता थोडे थोडे बिग आणि स्ट्रॉंग झालोय.  मग आता सारखं रडायचं नाही. बाबाला हे सांगताना की बाबा तू विकीला जलस्नान का जलसमाधी जे काय ते देऊ शकतोस. त्यानं दोन्ही डोळे ताणून धरून डोळ्यातलं पाणी रोखलं.

…… पण विकीच्या पिंजऱ्याजवळ जाऊन ” बाय बाय विकी ! ” म्हणताना त्याच्या डोळ्यातून दुष्ट अश्रू गालावर ओघळलेच !…

— समाप्त — 

©  सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विकी माऊस – भाग-१ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

☆ विकी माऊस – भाग-१ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ ☆

हाताची कोपरं बाल्कनीच्या कट्ट्यावर टेकवून दोन्ही हात गालाला लावून रोहन बाल्कनीत उभा होता. सोसायटीत शिरणाऱ्या प्रत्येक कारवर तो नजर ठेवून होता.’आज आधी बाबा येतो का आई?एक खूप छान बातमी त्यांना सांगायचीय आणि नेमका आज त्या दोघांना उशीर होतोय’… रोहनचं विचार चक्र चालू होतं. ‘यापेक्षा आपण कला ऑन्टी बरोबर पिंकी ताईला आणायला तिच्या डान्स क्लासला गेलो असतो तर खूप बरं झालं असतं’.. ऑन्टी त्याला सांगून सांगून थकली,अन् शेवटी एकटीच गेली.

इतक्या दूर पायी चालत जायचा त्याला कंटाळा आला होता. शिवाय पैसे पण जवळ नव्हते सहा लॉलीपॉप आणायला!… चार आपल्या चौघांना, एक कला ऑन्टीला आणि एक’ विकीला’. ‘तोआपल्याकडे आलाय तर वेलकम सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं.’ विचार करून कंटाळला तसा तो दरवाजा उघडून कॉरिडॉर मध्ये आला. मोहितच्या घरातून  अंकल ‘स्टेफीला’ फिरवून आणायला बाहेर पडले होते.”स्टेफीऽ स्टेफीऽ” रोहनने हाक मारली. कान टवकारून त्याच्याकडे बघून मान हलवत स्टेफी लिफ्ट कडे धावली.

कित्ती क्यूट आहे स्टेफी’ रोहन विचार करत होता. ‘सगळ्यांच्याच घरात एक ना एक ‘पेट’ आहे. डाॅगी तर खूप जणांच्याकडे आहेत. शिवाय मांजरे, बर्ड्स, फिश पण आहेत. शिवानीकडे तर गिनीपिग आहे, त्यांच्या टेरेस वरील मोठ्या टॅंक मध्ये कासव सुद्धा आहे. ऋषीकडे दोन ससे आहेत आणि मृणाल कडे मुंगुस !फक्त… फक्त आपल्याकडेच ‘पेट’ नाहीय. आईला कितीला सांगितलं नुसती हसते. म्हणते,” बघू या, पिंकी आणि तू जरा मोठे व्हा मग आणूया एखादा छानसा प्राणी.” बाबा तर हसत म्हणतो “आपल्या घरातच आहोत की आपण चार प्राणी!…. आणखी एकाची भर कशाला?… आपल्या घराला तू प्राणी संग्रहालय म्हण किंवा सर्कस!”… पण नाही, आज रोहन कडे सुद्धा एक छानसा, छोटासा प्राणी आलाय. दुपारची वेळ… कला ऑन्टी ने हाक मारली, “रोहन बाबा, जरा लवकर इकडे ये….हा बघ पिंजऱ्यात एक उंदीरआलाय.” रोहन धावत आला. “ओऽहोऽ हो!”… उंदीर बघून तो आनंदाने नाचायलाच लागला. पिंकी क्रीम बिस्कीट चे छोटे छोटे तुकडे करून पिंजऱ्यात टाकू लागली. दोघंजणं जाम खुष! “ताई तो कसा पिंजऱ्यात छान रन काढतोय बघ. आता आपण ह्याला सांभाळू. हाच आपला ‘ पेट’….आणि त्याचे नाव काय ठेवू या?”दोघेजण विचार करू लागली.”कास्मो, नाही तर बॉस्की” कसं आहे?” पिंकी म्हणाली. रोहननं नकारार्थी मान हलवली. “पिंकी ताई जसा मिकी माऊस असतो ना तसा हा विकी माऊस! विकी नाव छान आहे ना?” “हो रे, मस्तच!” पिंकी उद्गारली. तोपर्यंत त्यांच्या मित्र-मैत्रिणीचा घोळका घरात आला आणि पिंजऱ्या भोवती गोल करून उभा राहिला. “हाय कित्ती क्यूट!”… “त्याचे पाणीदार डोळे पाहिलेस?”…” आणि नजर बघ किती शार्प आहे.” ” सो नाईस!”…” सो एनर्जिक”… “कसा क्रिकेटर सारखा रन काढतोय बघ”… “यार तुमचा विकी आम्हाला फार आवडला.” सगळे मित्र-मैत्रिणी म्हणत होते. शेजारी राहणाऱ्या एक दोघांनी तर काहीतरी खाऊ आणून पिंजऱ्यात टाकला.

आई बाबा एकदमच घरी आले. दोघांना विकी माऊसची कथा इत्थंभूत सांगून झाली. “आपण आता विकीला पाळणार आहोत.बाबा बघ,आला की नाही आपल्याकडे पण एक पेट.” रोहनच्या तोंडाला खळ नव्हती. आई, बाबाला आपण कितीही सांगितलं तरी कमीच आहे असं त्याला वाटत होतं. शेवटी “विकी बाय”म्हणत तो खेळायला निघून गेला.

” काय वेडा मुलगा आहे. आता काय करायचं?” आई म्हणत होती. बघू या उद्या संध्याकाळी देऊन टाकू त्याला जलसमाधी.” बाबाचं हे बोलणं बॅट घेऊन जायला घरात आलेल्या रोहननं ऐकलं. त्या बिचार्‍या सहा वर्षाच्या चिमुरड्याला त्याचा अर्थही कळला नाही.      

“जलसमाधी म्हणजे काय रे ?” रोहनने एक थोड्या मोठ्या मित्राला विचारलं. “जल मीन्स वॉटर अँड समाधी मीन्स?…. आय डोन्ट नो!” तोउत्तरला. दुसरा एक जण विकीला बघून गेलेला, एकदम जोरात ठासून म्हणाला ,”अरे वेड्या, तुझे बाबा विकीला पाण्यात बुडवून मारणार आहेत.” 

“ओह् नो!”रोहन रडकुंडीला आला. धावत घरात आला.

“बाबा तू आपल्या विकीला मारणार आहेस? पाण्यात बु..ड.वू…न”…. हुंदके देत देत तो विचारू लागला.” हे बघ बेटा, तू अजून लहान आहेस. फक्त सहा वर्षाचा… काही गोष्टी तुला समजण्यासारख्या नाहीत. मी तुला उद्या समजावून सांगेन.” बाबा त्याची समजूत घालत होता.

रोहनचं रडणं आणखीनच वाढलं. “सारखं सारखं तू आणि आई मी काही विचारलं तर हेच म्हणता, तू अजून लहान आहेस, मोठा झालास की तुला आपोआप समजेल. कधी होणार मी मोठ्ठा?” विचारताना हुंदके आवरत नव्हते…. आणि परवा ते सतीश अंकल, तुझे दोस्त म्हणत होते, “कशाला तुला मोठं व्हायचय रे?  मोठेपणीची दुःखं,त्रास, कटकटी, जबाबदाऱ्या… हे भगवान !मोठेपण चांगलं नसतं बच्चू ,जर मला आता देव भेटला आणि त्याने मला वर मागायला सांगितलं ना, तर मी म्हणेन देवा मला कायमच बालपणात ठेव.”

क्रमशः भाग पहिला 

©  सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ढवरा… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ ढवरा… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे 

(आमंत्रित, निमंत्रित पाहुणेमंडळी यांनी जेवण करण्यास बसून घेण्याची कृपा करावी. अशी मालकाची आग्रहाची नम्र विनंती आहे.” ते ऐकून आमचा चालण्याचा वेग अधिकच वाढू लागला. “ – इथून पुढे) 

आम्ही कार्यक्रम स्थळी पोहोचेपर्यंत सुज्याच्या दारात जेवणाची पहिली पंगत बसली होती. सुजाच्या घरासमोर आणखी शे -दीडशे माणसं जेवणाच्या प्रतीक्षेत उभी होती. घराच्या उजव्या बाजूला चुलवानावर एक मोठं तपेलं ठेवलं होतं. त्यात बहुतेक मटण शिजवलं असावंकारण दोन माणसं त्याला भकाभका जाळ घालत होती.तर एकजण मोठ्या पळ्याने मटण बाजूच्या मोठया परातीत काढत होता. दोन जाणती माणसं मटणाच्या खड्याचे द्रोण अंदाजाने भरून देत होती.सुजाच्या घरासमोर 200 वॉटचा मोठा बल्ब लावला होता. त्याच्या उजेडात पंगत बसली होती. आम्ही पुढे जाताच आमच्या तोंडावर उजेड पडला ते पाहून मोठ्या मुलांनी, ” हितं नग, आपुन तिकडं चला, आडबाजूला,” असा इशारा केला. कारण उजेड सोडून थोडा अंधारात उभे राहणं त्यांनी पसंत केलं. त्यांनी तसं का केलं ते मला काही समजत नव्हतं त्यामुळे मी मात्र उजेडात उभा राहून माझा वर्गमित्र असलेल्या सुज्याला शोधत होतो…

 तेवढ्यात कुठून कसं काय माहित सुज्याने मला पाहिलं आणि धावत माझ्याकडं आला. “आयला इज्या (लहानपणी मला कोणी ‘ विजय ‘म्हणत नव्हते इज्या प्रेमाने माझ्या नावाचा केलेला  अपभ्रंशच प्रचलित होता)आलाच व्हयं?लय भारी वाटलं…!” मी म्हटलं, “व्हयं आम्ही समधी आलोय. कुठं हाईत बाकीची?”

 “ती काय तिकडं अंधारात उभी राहिल्यात समदी. त्यांनला लाज वाटतीय उजेडात उभं राह्यची.”

“बरं, बरं असूदे, चल, तुला आमची शेरडं दाखवतो.” असं म्हणत सुजाने माझ्या सदऱ्याला धरून मला ओढतच त्याच्या शेळयांच्या गोठ्याकडे नेलं. तिथं मला त्याने त्यांच्या आठ ते दहा शेळ्या आणि दोन-चार करडं दाखवली. त्याच्याकडं इतक्या शेळ्या अन त्याचं पत्र्याचं मोठं घर बघून तो खूप श्रीमंत असल्याचं जाणवत होतं. त्यामुळे  मित्र म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटत होता…!

“सुजा, आयला लईच भारी वाटतंय इथं येऊन,”मी सुजाचा हात धरून म्हटलं.

तोपर्यंत इकडं पहिली पंगत जेवण करून उठली होती आणि दुसरी पंगत बसत होती. तेवढ्यात मला आमच्यातल्याच कुणीतरी हाताला धरून ओढत नेलं,”चल, जेवायला उशीर व्हाईल अंधार पडलाय रात व्हईल आपल्याला घरी जायला,” मोठा भाऊ मला म्हटला.

मी म्हटलं ” सुज्या, चल की आपण दोघं शेजारी बसून जेऊ. ” 

” व्हयं गड्या, मलाबी लय भूक लागलीया,”सुज्या उत्तरला.

पंगतीच्या शेवटच्या टोकाला सुज्या मग मी आणि मग एकेक करून आम्ही सगळे पंगतीत बसलो होतो. मोठी पोरं मला काहीतरी इशारा करत होती,” सुज्याला  नगं हित आपल्या शेजारी जेवायला बसवू. ” असं काहीतरी म्हणत होती पण मी म्हटलं, “मी सुज्या बरोबरच जेवणार…!  शाळेतबी आम्ही दोघं संगच जेवतो.”

माझ्या या हट्टा पायी पुढे काय घडणार याची मोठ्या मुलांना चाहूल लागत होती. आणि झालेही तसेच. कोणीतरी सुज्याच्या अन माझ्या तोंडावर अचानक बॅटरीचा उजेड मारला…!  मग बाकीच्यांच्या तोंडावर सुद्धा मारला. मोठ्या पोरांनी तेव्हा माना खाली घालून आपली तोंडे लपवली…

पत्रावळेवाला आम्हाला पत्रावळ्या वाढणार तेवढ्यात सुजाला त्या बॅटरीवाल्या इसमाने त्याच्या बखोटीला धरून फराफरा ओढत त्याच्या घराकडे नेलं….

त्यानंतर तावातवाने एक जण ओरडला, ” ये उठा, उठा, च्याआयला  पाहुण्यावाणी ऐटीत जेवायला बसलाय की सगळी? उठा बघू? व्हा  तिकडं?सगळे पाहुणे जेवून झाल्यावर तुम्हाला बोलावतो, “असे म्हणून त्या गृहस्थाने आम्हाला भर पंगतीतून उठवले….!  

तिथे एकच गोंधळ उडाला…! आरडाओरड, शिवीगाळ ऐकू येऊ लागली. 

हा काय प्रकार आहे? ते मला काही समजत नव्हतं आणि ते समजण्याचं माझं वय सुद्धा नव्हतं…!

सगळ्यांची जेवणं झाल्यावर शेवटच्या पंगतीला आपल्याला जेवायला मिळणार इतकंच काय ते मला मोठ्यांनी समाजावून दिलं.

पण आत्ता पंगतीतून उठवून आपल्याला शिव्या का घालतायेत  तेच मला कळत नव्हतं…! 

मोठी पोरं पण काहीच बोलत नव्हती कारण त्यांना या गोष्टींची  अगोदर पासूनच सवय होती.त्यांनी फारसं मनाला लावून घेतलं नव्हतं. कधी का असेना शेवटी जेवायला मिळण्याशी त्यांचा मतलब होता.

त्या वस्तीवर तिथे वडाची तीन मोठाली झाडे होती. तिथल्या एका मोठ्या वृक्षाच्या बुडक्यात आम्ही सगळे गोळा होऊन बसलो होतो. तीन वडांच्या झाडाचा तो सुंदर गुच्छा होता. कदाचित त्यामुळेच तर त्या वस्तीला  ‘वडाचामळा’ असे नाव पडले होते.

पुरुषांच्या दोन-तीन मोठ्या पंगती झाल्यावर मग महिलांच्याही दोन पंगती बसल्या होत्या. आमच्या पोटात तर कावळे ओरडत होते त्याही पेक्षा काळाकुट्ट अंधार पडल्याने आपण घरी कसे जाणार याची मला भीती वाटत होती. जेवायला आपला कधी नंबर येणार ते काहीच समजत नव्हतं…

अखेर सगळे जेवून झाल्यावर एका भल्या माणसाने आम्हाला आवाज दिला, ” ये पोरांनो? या जेवायला… ”  त्याच्या त्या हाकेने त्याही परिस्थितीत आम्हाला इतका आनंद झाला होता की काही विचारू नका…! 

आम्ही सगळे अक्षरशः धावत जाऊन एका ओळीत जेवायला बसलो. मग पत्रावळी आल्या,द्रोण आले…

पत्रावळ्यावर ज्वारीची भाकरीवाढली गेली. भाकरी कसली?सगळ्यात शेवटी आता फक्त भाकरीचे  तुकडेच उरले होते…! तेच वाढले होते.

मटणाचा रस्सा द्रोणात वाढला तो सुद्धा अगदी ढवळून निघालेला होता. कोणाच्यातरी द्रोणात शेळीच्या लेंढी एवढा मटणाचा खडा पडत होता. मग तो शेजारच्यांना खिजवायचा… पण आम्हाला त्याची फिकीर नव्हती. त्यांनी जे पानात वाढलं होतं तेच आम्हाला त्यावेळी पक्वानाहूनही अधिक प्रिय होते. पण काही असो, जे काही शिल्लक होते ते त्या भल्या माणसांनी आम्हाला अगदी भरपेट वाढले होते.

रस्सा म्हणजे कडान पिऊन आमची पोटे अगदी गच्च झाली होती. माझं लक्ष अधनंमधनं सुज्याच्या घराकडं जात होतं.  पण कशाचं काय?तो जो एकदाचा घरात गेला तो पुन्हा काही शेवटपर्यंत बाहेर आलाच नाही… 

आम्ही जेवून उठलो घरचा रस्ता चालू लागलो. रस्त्याने काही दिसत नव्हते. खूप रात्र झाली होती. कुणी डोळ्यात बोट घातले तरी समोरचे काही दिसणार नव्हते इतका अंधार गुडूप तिथे झाला होता…

गावापासून लांब वस्ती असल्याने तिथे स्ट्रीट लाईट नव्हत्या. 

पण आमचे म्होरके तयारीचे होते. ते अंधारातून नीट वाट काढत होते.

आम्ही जेवून परतताना अंदाजे रात्रीचे दहा वाजले असतील. आम्ही कोणाशी काही न बोलता अगदी गुपचूप चाललो होतो. तेवढ्यात इतका वेळ शांत झालेल्या स्पीकरचा आवाज अचानक कानावर आला… कुणीतरी माईकवर जोरात ओरडले, ” शेरडं घरात बांधा, लांडगे आलेत…! ”  बापरे…! लांडगे असा शब्द ऐकल्याबरोबर आमची एकच गाळण उडाली…! मी, भूषण, रवी आणि विकास आम्ही लहान होतो त्यामुळे लंडग्याच्या भीतीने आम्ही जोरजोराने रडू लागलो. त्यातच कुणीतरी ओरडलं, ” आज आमोशा हाय. मागं-पुढं भूतबी असत्याल नीट चला …!” मग काय आम्ही त्या रानात ठो ठो बोंब मारायचेच बाकी होते पण लगेच माझ्या भावाने त्या सगळ्यांना दरडावून आमच्या भोवती सगळ्यांनी कडं केलं आणि मग आम्ही लहान मुले त्यामधून चालू लागलो तेव्हा कुठे आम्हाला धीर आला. तरीपण भीती ही वाटतच होती. आम्ही भीतीने अक्षरशः थरथर कापत होतो…! तो प्रसंग आजही आठवला तरी माझ्या अंगावर काटा उभा राहतो…! 

आम्ही गावच्या ओढ्यात आलो तेव्हा सुद्धा, ” लांडगा आला…!  शेळ्या घरात बांधा..!”अशी अनाउन्समेंट स्पीकरवर चालूच होती.

आम्ही गावात शिरलो तोपर्यंत गाव मात्र सामसूम झाले होते…

जागी होती ती फक्त गावात रात्री पहारा देणारी मोकाट कुत्री…! 

आमची झुंड पाहताच ती  जोरजोराने भुंकू लागली. त्यातून कसेबसे बाहेर पडून आम्ही घरी पोहोचलो…

दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर सुज्या म्हणाला, ” काय इज्या?हाणलं का मटण दाबून?”

मी म्हटलं, ” व्हयं गड्या,  निब्बार हाणलं लयं मज्जा आली …!” 

— समाप्त — 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ढवरा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ ढवरा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे 

त्यावेळी मी इयत्ता 3 रीत होतो. सुज्या आमच्या वर्गात होता. तो सगळ्यात लहान होता. दिसायला गोरापान लालभडक गाजरासारखा होता. त्याचे डोळे किंचित घारे होते. पण तो रडका होता. कोणी त्याची खोडी काढली की लगेच भोकाड पसरायचा. रडताना त्याचे गाल लालबुंद  व्हायचे. याशिवाय तो अतिशय भित्रा होता. त्यामुळे वर्गातली जवळपास सगळीच मुले त्याच्यावर आपला हात साफ करून घ्यायची. त्याच्या डोक्यावरची टोपी सतत वाकडी असायची. म्हणजे तो ती सरळ घालायचा परंतू येताजाता कोणी ना कोणी सुज्याच्या डोक्यावर टपली मारून त्याची टोपी वाकडी  होत असे.मग तो आणखीनच चिडिला जाऊन भोकाड पसरत असे.आमच्या वर्गात गुरुजींनी दहा -दहा मुलांचे गट पाडलेले असायचे. त्यांच्याकडे वेगवेगळी कामे सोपावली जायची. सुज्या माझ्या गटात होता. मी गट प्रमुख होतो. भूषण, आंध्या (आनंद), फरीद, परबती, पट्ट्या (सुनिल)ही सगळी आमची भित्री गँग होती. त्यातले त्यात मी थोडा डेअरिंगबाज असल्याने लीडर होतो. 

एके दिवशी दुपारी वर्गातली मधली सुट्टी झाली. आम्ही खाऊ आणायला शाळे शेजारीच असलेल्या दुकानात गेलो. माझ्याकडे पाच पैसे होते त्याची मी चिक्की घेतली. तेव्हा त्या पाच पैश्याच्या मला चिक्कीच्या छोटया छोटया पाच वड्या मिळाल्या…!  मी एक वडी तोडून तोंडात टाकली व दुसरी माझा जीवश्च कंठश्च मित्र भूषणला दिली. मग आंध्या पुढं येऊन म्हणाला, ” मलाबी दे की रं येक… मी कसा परवादिशी तुला पेरू दिला.” मी आठवू लागलो तेव्हा आठवले, सहा एक महिन्यापूर्वी कधीतरी आंध्याने ताराबाईकडून एक पेरू विकत घेतला होता. त्यावेळी आम्ही सगळे त्याच्या तोंडाकडे पहात होतो परंतू तो मात्र मोठया साहेबांच्या ऐटीत पेरू कडाकडा फोडून खात होता. त्याच्याकडे पाहून आमच्या तोंडातून अक्षराशः लाळ टपकायला लागल्यावर मग त्याने त्यातली एक फोड आम्हा पाच जणात वाटून दिली होती. त्यातला 5 वा खारट मिट्ट झालेला तुकडा माझ्या वाट्याला आला होता. तो ही मी मोठया आनंदाने चाटून खाल्ला होता. ते आठवून मी आंध्याला माझी एक चिक्कीची वडी दिली. मग फरीद आणि सुज्या अशी त्याची वाटणी झाली… त्यावेळी पैसा फार नव्हता परंतू आनंद मात्र उदंड होता. विशेषता: तो सहजीवनात अधिक वाटला जायचा. त्या कोवळ्या निरागस वयात सुद्धा आम्हाला एकमेकांची मने कळत होती आणि जपता सुद्धा येत होती हे त्यातले विशेष होते. त्या तेवढ्याश्या शिदोरीवर त्यातल्या अनेक मित्रांशी आजही माझी मैत्री घट्ट टिकून आहे.

माझ्याकडून चिक्कीचा एक तुकडा मिळाल्यामुळे सुज्या माझ्यावर जाम खुश झाला. चिक्कीचा तुकडा चघळतच तो म्हणाला, ” दोस्तांनो, तुमाला एक जम्मड सांगतो. ” 

मी म्हटलं, ” काय? “

आंध्या म्हटला, ” सांग की लका. “

” आज ना आमच्या घरी ढवरा हाय, समद्यानी जेवायला या.” ढवरा हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकल्याने म्हटले, ” सुज्या ढवरा मजी काय रं? ” 

तो म्हटला, ” मला पण माहित न्हाय पण आमच्या घरी सगळ्या गावाला मटान जेवायला हाय एवढं माहीत हाय. चार दिवस झालं आमच्या दादांनी दोन बोकडं खास ढवऱ्यासाठी घरात आणून ठेवल्याती,तुमी या जेवायला सगळी. उशीर करू नगा.” मटण म्हटल्यावर मी जिभल्या चाटायला लागलो. म्हटलो, ” व्हयं सुज्या येतो आम्ही तुझ्या घरी समदी. ” 

” मला न्हाय जमणार मला बकऱ्याकडं झोपाय जावं लागतंय, तुमी जावा बाकीची. ” असं म्हणत आंध्यानं पहिली नकार घंटा वाजवली…

पाठोपाठ फरीद म्हटला, ” आमच्या घरी तर रोजच मटान असतं खाऊन कटाळा येतो मला, मी न्हाय येत.” 

मग राहता राहिलो मी आणि भूषणच. मी खेदाने म्हटले, ” सुज्या आरं, आमाला बारक्या पोरांना कोण पाठवतंय रातचं जेवायला?मंग कसं येऊ? मला तर काईच कळंना?”

” आता बघा तुमचं तुमी. ” असं म्हणत सुज्या वर्गात पळाला. 

वर्गात गेल्यावर माझं गुरुजींच्या शिकवण्याकडं काही केल्या लक्ष लागेना. मी एकासारखा फक्त सुज्याकडं पहात होतो. त्याच्या निमंत्रणाचं काय करायचं?हा एकच विचार राहूनराहून माझ्या डोक्यात घोळत होता….

अखेर मी सुज्याला पाठीमागून त्याच्या पाठीत ढोसून म्हटलं, ” आयला सुज्या, कसं काय करायचं? मला तर लयं मटान खाव वाटतंय. “

त्यो म्हणला, ” ये की मंग लेका.” 

” येतो की पण कुणाबरं येऊ? “

” ये की तुमच्या वाड्यातली म्होटी पोरं घिऊन.”

” आयला सुज्या, लयभारी माझ्या तर लक्षातच येत नव्हतं, काय करावं त्ये.तू लयभारी आयड्या दिलीच! ” 

” पण सुज्या,  तुझ्या घरची काय म्हणणार न्हाईत ना? आमाला सगळ्यांनला जेवाय वाढत्याल ना? ” 

” मंग? तुला काय वाटलं? मी हाय की! तू माझा मैतर म्हणल्याव कोण काय म्हणलं… “

” बरं येतु. “

” सुजाच्या घरी मटण खायला जाण्याच्या नादात दुपारापासून गुरुजींनी वर्गात काय शिकवलं त्यातलं मला काहीच कळलं नव्हतं… पाच वाजता शाळेची घंटा टण टण वाजल्यावरच मी भानावर आलो…! शाळा सुटल्यावर घरी जाता जाता मोठ्या पोरांना ही आनंद वार्ता सांगितली…! ते सगळे तयारच होते. 

अंधार पडायला लागल्यावर तिन्ही संजेला आई कामावरनं घरी आली. मी तिला धावत जाऊन मिठी मारून म्हटले, ” आई मी मटान जेवायला जाऊ का? “

” कुटं? ” 

“वडाच्या मळ्यात, सुज्याच्या घरी, त्यानं मला बोलावलंय.” मी एका हातानं चड्डी ओढत आईला एकादमात सगळं सांगितलं… “

” अगं बया! इतक्या लांब अन रातचं? नगं माझ्या राज्या… ” 

” आई, सगळी पोरं निघाल्यात…”

” मंग जा.”

संध्याकाळ झाली तशी सगळ्या पोरांची जमवाजमव झाली. प्रमोद, रवी, संदिप, भाऊ, माझा मोठा भाऊ राजेंद्र, चंदर नाना,राज्या,प्रल्हादनाना असे करताकरता दहा पंधरा जणांचा मेळा जमला. 

” ईज्या नक्की ढवरा हाय ना? ” माझ्या मोठया भावाने मला दरडावून विचारलं. 

” व्हयं, सुज्यानं मला दुपारीच सांगितलंय, घरी दोन बोकडं पण आणून ठिवल्यात असं त्यो म्हणत होता. 

” मंग चला… ” 

मोठा भाऊ आमच्या टोळक्याचा प्रमुख होता. त्यानं इशारा केला तशी सगळी पोरं वडाच्यामळ्याच्या दिशेने रस्ता चालू लागली.

गावापासून वडाचा मळा साधारणपणे अडीच ते तीन किलोमीटर होता. पण मटण खायाच्या ओढीने सगळे खुशीत झपाझप पावले टाकीत चाललो होतो…

आमचा मोर्चा गावचा ओढा ओलांडून म्हस्कोबा मंदिराच्या पुढे निघाल्यावर लांबवर माईकचा आवाज येऊ लागला तसा आम्हाला धीर आला. त्यावेळी गावात कुठलेही कार्य असेल की तिथे स्पीकर वाजायचा. कार्यक्रम नियोजित ठिकाणी असल्याची ती एक खूणच होती.

आम्ही कार्यक्रम स्थळाच्या अर्धा किलोमीटर जवळपास आलो तेव्हा माईकवर सूचना चालू होती, ” देव -देव झालेला आहे.तरी, आमंत्रित, निमंत्रित पाहुणेमंडळी यांनी जेवण करण्यास बसून घेण्याची कृपा करावी. अशी मालकाची आग्रहाची नम्र विनंती आहे.” ते ऐकून आमचा चालण्याचा वेग अधिकच वाढू लागला. 

– क्रमशः भाग पहिला 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक बोधकथा : आनंद चेंडू… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ एक बोधकथा : आनंद चेंडू ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

एक खूप गरीब माणूस… त्याचे नाव नारायण. शेतकरीच होता. अखंड काळ्या आईची सेवा करण्यात गुंतलेला. पण कोणत्याही वेळी त्याच्याकडे पहा.. कायम हसतमुख. सगळ्यांच्या मदतीला धावणारा, सगळ्यांना आपला सहारा देणारा. त्याच्या सान्नीध्यात जो कोणी येईल त्याला दिलासा वाटायचा. एक अनामिक सुख मिळायचे.

सगळ्यांनाच त्याचे कौतुक वाटायचे. कसा काय हा माणूस नेहमी आनंदी असतो हा प्रश्न सगळ्यांनाच पडायचा. त्याच्यावर कितीही संकटे येऊ देत, कितीही अडचणी येऊन ही  हसतच त्यावर मात करायचा.

शेवटी न रहावून त्यालाच हा प्रश्न विचारून याचे रहस्य जाणून घेऊया ठरले.

एक दिवस गावामध्ये मोठी जत्रा होती. त्यासाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ऐनवेळेस एका कार्यक्रमाचे सादरकर्ते येऊ शकत नसल्याचे कळवले. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण आयोजक नाराज झाले. त्यांना खूप वाईट वाटून दु:ख झाले.

पण नारायण होतं असं कधी कधी त्यात कशाला वाईट वाटून घ्यायचे म्हणाला… नेहमी प्रमाणे हसरा चेहरा ठेवला… आणि जाऊ दे बाकी जत्रा बघायला मिळतेय ना? त्या निमित्ताने जास्त वेळही मिळतोय या समाधानाने तो आनंदी झाला व तेथून जाऊ लागला.

तेवढ्यात आयोजकांनी त्याच्याच मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला आणि त्याला स्टेजवर बोलावले.

प्रश्न पहिला :- तुमचा व्यवसाय कोणता आणि त्यातील समस्या काय काय आहेत?

नारायण :- व्यवसाय म्हणजे फायदा तोटा आला. म्हणून मी शेती करत असलो तरी त्याला माझा व्यवसाय मानत नाही. काळ्या आईची सेवा करणं असं मी मानतो. त्यामुळे आईच्या सेवेतून फायदा मी बघतच नाही तर त्यातून मिळणारे फळ असे मी मानतो आणि मग आईने दिलेले फळ जसे आपल्या आईने केलेले जेवण कोणी एकटा नाही खात तर सगळे मिळून खातो तसे सगळ्या बांधवाना ते देण्याचा प्रयत्न करतो. यामधे मला मी कोणासाठी तरी काहीतरी करू शकलो याचे समाधान मिळते आणि मी आनंदी होतो.

यातील समस्या म्हणजे पाऊस वेळेवर पडत नाही पडलाच तर योग्य प्रमाणात पडत नाही, त्यातूनही चांगले पीक मिळाले तरी अडते, दलाल योग्य भाव देत नाहीत, वेळेवर वाहनेही उपलब्ध होतं नाहीत.अशा अनेक सांगता येतील…

प्रश्न दुसरा :- तरीही तुम्ही कसे समाधानी रहाता?

नारायण :- मी अशावेळी जगाकडे पहातो, माझ्यापेक्षा जास्त अडचणी असलेल्या लोकांकडे बघतो आणि यातूनही आशावाद अंगी घेऊन सतत काही चांगलं होणार आहे असे मनाला समजावतो. त्यामुळे मला मी दुसऱ्यांपेक्षा जास्त बरा आहे ही जाणीव होते आणि मी आनंदी होतो. जे होते ते चांगल्यासाठीच ही धारणा ठेऊन आता काहीतरी चांगले घडणार आहे हे जाणून त्या चांगल्याच्या स्वागतासाठी मी आनंदी होतो.जगाकडे पाहिल्यावर आपल्याला काहीतरी चांगले शिकायला मिळणार आहे आणि त्यातून मिळणारे ज्ञान हे प्रगतीसाठी उपयोगी ठरणार असल्याने प्रगतीचित्र डोळ्यापुढे आणून मी आनंदी होतो.

प्रश्न तिसरा :- तरी पण जे भल्या भल्याना जमत नाही ते तुम्ही कसे जमवता? काय आहे याचे रहस्य?

नारायण :- रहस्य तर काहीच नाहीये. हे एक सोपे तंत्र आहे. मी दुःख झाल्याचे तोटे जाणतो म्हणून मी सतत मनाला दुःखी न होण्याची करणे सांगत असतो. त्यामुळे मन दुःखी होतं नाही, पर्यायाने आनंदी होते.

दुसरे असे की आनंदाच्या मागे लागायचे नाही असे ठरवल्याने आनंद पुढे पळतोय आपल्या हाती लागतं नाही हे दुःख होतं नाही. दुसरे आनंदी बघितले की ते आनंदी राहू शकतात मग आपण का नाही असे मनाला सांगितले की मन निदान आनंदी रहायच्या प्रयत्नाच्या नादात नकळत आनंदी होते. किंवा कोणी दुःखी दिसला तर आपल्याला ते दुःख नाही ना या विचाराने आनंद मिळतो आणि दुःखीतांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करून जर त्याचे दुःख हलके केले तर त्या समाधानाने पण आनंदी रहाते.

तिसरे आणि महत्वाचे म्हणजे आनंद कोणती वस्तू नाही की ती मिळवायला पाहिजे. ती एक शाश्वत गोष्ट आहे जी स्वतःमधे असते याची कायम जाणीव ठेवली पाहिजे आणि आनंद कोणत्याही गोष्टीत नसून तो आपल्या दृष्टीत असला तर आपल्याला प्रत्येक गोष्टीत आनंद दिसेल. मग आपोआप आनंद मिळेल.

आपण जेवढे जे देऊ त्याच्या कैक पटीने ते आपल्याकडे चेंडू जमिनीवर आपटल्यावर अधिक उसळून परत आपल्याकडे येतो तसा दुसऱ्यांना दिलेला आनंद परत आपल्याकडे येतो मग परत हाच आनंद आपण दुसरीकडे पाठवला तर तेथूनही हा आनंद चेंडू परत आपल्याकडे येतो आणि या आनंद चेंडूच्या टप्प्याचा आनंदही आपल्याला मिळून एक चिरंतन निरंतर आनंद अनुभव आपण घेऊ लागतो.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print