श्री भगवान वैद्य ‘प्रखर’
संक्षिप्त परिचय
जन्म : 23 डिसेंबर 1946
सेवा-काल: मध्य प्रदेश लोक निर्माण विभाग, भारतीय डाक-तार विभाग, भारतीय आयुर्विमा महामंडळ यांत एकूण 40 वर्ष.
प्रकाशन/प्रसारण : 4 व्यंग्य- संग्रह, 3 कथा-संग्रह, 2 कविता-संग्रह, 2 लघुत्तम कथा-संग्रह , मराठी तून हिंदीत 6 पुस्तकें व 30 कथांचा अनुवाद प्रकाशित। आकाशवाणी हून सहा नाटकांसह अनेक कथा, कविता,लेख प्रसारित ।
पुरस्कार- सम्मान: भारत सरकार चा ‘हिंदीतर-भाषी हिंदी लेखक राष्ट्रीय पुरस्कार’, लघुकथा-संग्रह बोनसाई यास किताब घर दिल्ली चा ‘आर्य स्मृति साहित्य सम्मान 2018, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई द्वारा सीढ़ियों के आसपास आणि चकरघिन्नी या कथा-संग्रहांस मुंशी प्रेमचंद पुरस्कार(दोन बेळा), अंतस का आदमी या कविता-संग्रहास संत नामदेव पुरस्कार, धर्मक्षेत्रे -कुरुक्षेत्रे ला मामा वरेरकर अनुवाद पुरस्कार इत्यादि
☆ जीवनरंग : लघुकथा : दुर्घटना , अट – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’☆
☆ दुर्घटना ☆
‘अहो, तुम्हीं फक्त ऐकलेच असेल परंतु आमचे घरी आजसुद्धा जादू चा एक आकर्षक दिवा ठेवलेला आहे. आमच्या पूर्वजांच्या काळापासून जपून ठेवलेला आहे तो दिवा.’
‘खरंच! पण त्या पासून कार्यसिद्धि कशी काय होत असते हो?’
‘ते तुम्हीं ऐकलच असेल ना, की जादूच्या दिव्याला थोडं घासलं की लगेच जिन्न प्रगट व्हायचा आणि म्हणायचा, ‘बोलो, मेरे आका…आणि जी वस्तू मागितली ती घेऊन तो क्षणार्धात हजर व्हायचा.’
‘व्हायचा म्हणजे …! आजकाल नाही का होत जिन्न प्रगट?’
‘नाही, कांही वर्षापूर्वी एक दुर्घटना घडली तेव्हांपासून …’
‘कसली दुर्घटना..?’
‘तेव्हां आमचे ताऊजी (वडिलांचे मोठे भाऊ) म्हणे चौथीमध्ये शिकत होते. आपण स्वत: जादूचा दिवा घासून जिन्न प्रगट करावा, अशी त्यांची खूप इच्छा होती आणि एक दिवस सापडली त्यांना संधी. एकटे असतांना दिवा हाती लागला. मग काय, ताऊजींनी दिवा घासला, तोच समोर जिन्न हजर! जिन्न बघितल्याबरोबर ताऊजींची घाबरगुंडी उडाली. आता त्यास काय मागावे, हे त्यांना सुचेना. त्यांनी कांही दिवसांपूर्वीच आपल्या पाठ्य-पुस्तकात ‘ईमानदार माणूस’ नावाची एक कथा वाचली होती. त्यांना ती खूपच आवडली होती.
कथेतील ईमानदार माणूस, त्यांच्या मनावर चांगलाच ठसा उमटवून गेला होता. बस्, झटकन ताऊजींनी त्या जिन्नला म्हंटले, ‘मला एक ईमानदार माणूस आणून दे.’ या घटनेस आज कितीतरी वर्षे होऊन गेलीत. ताऊजींनी केलेली मागणी ऐकून गेलेला जिन्न अद्याप परत आलेला नाही.’***
☆ अट ☆
‘काय हो, तो कुख्यात तस्कर वारंवार आत्मसमर्पणाची इच्छा दर्शवितो आहे मग सरकार का बरं त्याची मागणी पूर्ण करीत नाही?’
‘सरकार कशी काय पूर्ण करणार त्याची मागणी? त्याचा खात्मा करण्याकरिता कितीही पोलीसांचा बळी द्यावा लागला तरी चालेल, पण सरकार त्याची आत्मसमर्पणाची मागणी काही पूर्ण करणार नाही.’
‘पण कां बरं?’
‘त्या तस्कराची आत्मसमर्पणाची अटच तशी आहे.’
‘अट हीच ना की त्याचे सगळे गुन्हें माफ करण्यांत यावे आणि त्यावर कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यांत येऊ नये!’
‘नाही हो, ही अट नाही त्याची.’
‘मग ही अट असेल की त्यास सरकारकडून थोडी जमीन अथवा काही आर्थिक मदत देण्यांत यावी जेणे करुन तो आपले व आपल्या कुटुंबियांचे पालन-पोषण सामान्य नागरिकां प्रमाणे करु शकेल.’
‘कित्येक वर्षांपासून निवडणूक लढविण्याकरिता जो गृहस्थ नेत्यांना आणि मंत्र्यांना कोट्यावधि रुपये देतो आहे तो शासनासमोर कशाला अशी भीक मागेल?’
‘मग त्याची अट तरी काय आहे की जी शासनास मान्य नाही?’
‘अहो, त्याच्याकडे त्याची एक वैयक्तिक डायरी आहे आणि त्याची अट ही आहे की आत्मसमर्पणानंतर त्यास त्याची ही डायरी प्रकाशित करण्याची सूट असावी.’ ***
© श्री भगवान वैद्य ‘प्रखर’
संपर्क : मो. 9422856767, 8971063051 * E-mail: [email protected] * web-site: http://sites.google.com/view/bhagwan-vaidya